श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ खुली कवाडं..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्री-शिक्षण आणि स्त्री-स्वातंत्र्य याबाबतीत पराकोटीचं प्रतिकूल, उदासिन वातावरण असणारा दिडशे वर्षांपूर्वीचा काळ.वयाच्या नवव्या वर्षी तत्कालीन प्रथेनुसार बालविवाह झालेली एक मुलगी जाण येईपर्यंत असलेल्या माहेरच्या वास्तव्यात आवडीने अभ्यास करू लागते. तिची अभ्यासाची ओढ आणि गोडी लक्षात घेऊन पुरोगामी विचारांचे तिचे सावत्र वडील तिच्या शिक्षणाला प्रोत्साहनही देतात. पुढे ती जाणत्या वयाची होताच रितीनुसार तिची सासरी पाठवणी होते.तिथलं जुनाट वातावरण, कांहीही कामधंदा न करता बसून खाणारा नवरा हे सगळं शिक्षणामुळे प्रगल्भ होऊ लागलेल्या तिच्या मनाला पटणं शक्यच नसतं.ती पहिल्या माहेरपणाला येते ते सासरी कधीच परत जायचं नाही हे मनोमन ठरवूनच.सासरहून नांदायला यायचे तगादे सुरु होतात तेव्हा ‘ न कळत्या वयात झालेलं हे लग्न मला मान्य नाहीs’ असं ती ठणकावून सांगते.

हा वाद तत्कालीन इंग्रज राजवटीच्या कोर्टात जातो.सासरी नांदायला जाणे किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास या दोन पर्यायांपैकी एक पर्याय स्विकारायची वेळ येते तेव्हा ‘नको असलेल्या सासरच्या बंदिवासापेक्षा मी तुरुंगवास पत्करेन पण सासरी जाणार नाही ‘असं ती ठामपणे सांगते.

या घटनेनंतरच्या तिच्या संपूर्ण आयुष्याला मिळालेली सकारात्मक कलाटणी आणि पुढे तिने गाजवलेलं अफाट कर्तृत्त्व हा आवर्जून जाणून घ्यावा असा एक प्रदीर्घ अध्याय आहे!

ही गोष्ट आहे दिडशे वर्षांपूर्वी जगभर गाजलेल्या ‘रखमाबाई केस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या खटल्याची ! रखमाबाई राऊत या खंबीर स्त्रीची ! भारतातली प्रॅक्टिस करणारी पहिली स्त्री डाॅक्टर- रखमाबाई राऊत यांची..!

रखमाबाईंचे सावत्र वडील बुरसटलेल्या विचारांचे आणि म्हणून स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत अनुदार असते,तर शिक्षणाच्या गोडीची चवही चाखायला न मिळता रखमाबाईंचं उभं आयुष्य तत्कालीन अन्यायग्रस्त स्त्रियांसारखं जळून राख झालं असतं. पण सावत्रमुलीच्या आयुष्यात पसरु पहाणारा मिट्ट काळोख आपल्या चैतन्यदायी विचारांच्या उत्साहवर्धक स्पर्शाने नाहीसा करुन तिच्या आत्मसन्मानाची ज्योत तेवत ठेवणारे तिचे सावत्र वडील , श्री.सखाराम राऊत  रखमाबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तिच्या कर्तृत्वाला आपल्या चैतन्य स्पर्शाने सतत झळाळीही देत राहिले हे महत्त्वाचं आहेच.आणि रखमाबाईंनी  सकारात्मक विचार आणि चैतन्यदायी प्रकाशकिरण आत येण्यासाठी स्वतःच्या मनाची कवाडंही खुली ठेवलेली होती हेही तितकंच लक्षणीय आहे.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments