मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कामगारांची खंत… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

कामगारांची खंत… ☆ सौ. वृंदा गंभीर

सोमवारी सकाळी मी कामाच्या गडबडीत होते, माझ्या फोनची रिंग आली जरा वैतागतच फोन घेतला आणि हॅल्लो म्हणाले, , , , , तिकडून मॅडम नमस्कार मी एक पट्रोल पंप कामगार बोलतोय मी तुमची कथा वाचली मला फार आवडली खूप छान प्रबोधन केलं तुम्ही असं थोडंसं कौतुक करून त्यांनी त्यांची समस्या सांगण्यास सुरवात केली.

ते म्हणाले माझं वय “66” वर्ष आहे मी पेट्रोल पंपावर काम करतो. गेली दहा बारा वर्ष झाले मी हे काम करतो. खूप अडचणी असतात या कामात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागतं ऊन, वारा, पाऊस झेलत चोवीस तास उभं राहावं लागतं.

आमची दाखल कोणीच घेत नाही वाहतूक ही दळणवळनाच साधन आहे तसाच इंधन ही जरुरीचे आहे त्यासाठी कामगार महत्वाचे आहे.

कोरोनाच्या काळात घरी न जाता आम्ही पंपावर काम केलं कुणी कोरोना झालेलं पण स्पर्श करून जायचं मास्क कोणी लावत नव्हतं तरी आम्ही काम केलं तरीही आमचा उल्लेख कुठेच नाही कुणाला देव म्हणाले कुणाला देवदूत म्हणाले कुणाला रक्षणकर्ता तर कुणाला पाठीराखा म्हणाले.

सर्वांचे सत्कार झाले सगळीकडे कौतुक झाले मग आमचे का नाही आम्हीपण पोटासाठी का होईना पण सेवाच करतो ना? मग आमची का दाखल घेतली गेली नाही.

आमच्याही काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत आम्हाला सुरक्षा हवी असते आम्हाला कुटुंब आहेत थोडं तरी लक्ष द्या………

रोज भांडण कटकटी कधी कधी तर मारामाऱ्या, दादागिरी करणारे कुणी पेट्रोल डिझेल भरून निघून जाणारे कुणी पैसे नाही दिले तरी दिले म्हणणारे त्यांना तोंड देत दिवस भर काम करायचं रात्री मॅनेजर कडे हिशोब द्यायचा हिशोब कमी भरला कि आमच्या पगारातून पैसे कट करायचे यात आमचा काय दोष एकतर पगार कमी त्यात अशी कटींग झाली कि महिन्याचा खर्ष भागवन कठीण होऊन जातं कसबस घर भगवावं लागतं.

कधी मनासारखं जगता येत नाही कुटुंबाला वेळ देता येत नाही. पंपाचा सेल कमी झाला कि पगार कमी अशा अनेक समस्यांना तोंड देत आम्ही पंपावर उभे असतो जनतेच्या सेवेसाठी मग एखादा सत्कार आमचा का नको, एखादी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर का नको, सरकार कडून थोडं अर्थसहाय्य का नको ही अपेक्षा चुकीची आहे का?

एक कामगार कामात होता त्याच्या घरून फोन आला मुलीला खूप ताप आला आहे तुम्ही घरी या तिला घेऊन दवाखान्यात जावं लागेल पण त्याला बदली कामगार नसल्यामुळे जाता आलं नाही. घरची परिस्थिती नाजूक होती त्यांनी घराजवळच्या DR कडे नेलं त्यांनी तिला दुसरीकडे घेऊन जायला सांगितलं पैसे नसल्यामुळे जाता आलं नाही. बरोबर कुणीच नाही त्या मुलीला घरी आणलं दुसऱ्यादिवशी 

वडिलांची ड्युटी संपून वडील घरी येईपर्यंत तिने प्राण सोडला होता.

 किती हृदयद्रावक घटना आहे ही काळीज हेलावून टाकणारी मन सुन्न करणारी.

 सरकारने जरा लक्ष घऊन किमान वेतन आणि थोडी सुरक्षा दिली तर असं होणार नाही.

शेवटी ” कामगार जिंदाबाद “

” माणूस मालक तेंव्हाच होतो, जेंव्हा कामगार काम करत असतो “

 म्हणून कामगारांना चांगली माणूस म्हणून वागणूक द्या.

” कामगार आहेतर मालक आहे ” हे लक्षात असुद्या 

” सर्व कामगारांना मनाचा मुजरा “

सलाम, सलाम, सलाम 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

एकदा एक तरुण मुलगी एका संत महात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

“का नाही… ? नक्कीच येईन मी… ” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही… नाही… तसं नाहीये. ” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही… अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.

परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला. “

“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. ”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मा हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका. ”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला… पण काल सकाळी ते देवाघरी गेले.

त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती, ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं… जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा. ”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे… गाता गळा असणारे सुस्वर सुरात नि भक्ती माधुर्यात तो आळवून आळवून म्हणतात… कानाला ऐकायला देखील तो गोड वाटतो… आणि आणि अभंग तुकयांचे हे साहित्याचे अभिजात लेणं आहे असं नि असचं आपण प्रशंसोग्दार काढतो… बस्स इतकं नि इतकच संत तुकाराम महाराजांच्या प्रती नि त्यांच्या अभंगाप्रती आमचा आदर व्यक्त होतो.. फार फार तर त्यांच्या भक्तीमय जीवनाचा नि त्यांच्या अभंगगाथेचा आम्ही वाड्मयीन दृष्टीने सखोल अभ्यासही करतो.. आपल्याला उच्च विद्याविभूषिताचं प्रमाणपत्र मिळतं आणि आणि कालांतराने विस्मृतीत जातं… पण पण संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनात आत्मसात करतो काय?.. त्यातल्या एकातरी अभंगातील ओळीची उक्ती आपण प्रत्यक्ष जीवनात उतरवतो काय? त्यावर खेदानं नाही हेच उत्तर आपल्या मिळतं… काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी प्रसिद्धी परांङगमुख मंडळी आहेत त्यांना या तुकाराम महाराज कोण आहेत किंवा त्यांची अभंगगाथा म्हणजे काय आहे माहीत नसताना वा निरक्षर सामान्य मंडळीतील एखादाचं स्वतःचं जगणचं तुकाराम महाराजांच्या जीवन शिकवणीनुसार घडत जाताना दिसतं.. मला या ठिकाणी अभंगगाथेच्या तपशीलात न शिरता फक्त वरील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… या अभंगांबाबत बोलणार आहे… संत तुकारामांच्या काळात त्यांनी विठ्ठल भक्ती करताना माणसातला देव जसा पाहिला तसा आजूबाजूच्या भोवतालातही देव त्यांना दिसला.. निसर्गाच्या सानिध्यातही देवाचं स्वरूप त्यांना आकळत होतं… आपण जशी आपल्या कुटुंबाची आपल्या गणगोतांची, शेजारीपाजारी, मैत्र यांच्याशी जन्माने बांधले जातो.. आपला ऋणानुबंध जपतो, वाढवतो.. त्यात असते ती माया, प्रेम स्नेह.. यातून मोहपाशात बद्ध होतो.. ऐहिक, भौतिक, सांसारिक गरजांच्या परिपूर्तीसाठी आपलं जगणं इतरांवर तसचं निसर्गावरही अवलंबून असतचं असतं… एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ… अगदी त्याच धर्तीवर… यात दिले घेतले या व्यावहारीक अटळ गोष्टी येतातच त्या माणसांच्या जीवनाशी निगडीत असतात.. निसर्गाच्या बाबतीत आपलं काय योगदान.. आपण फक्त त्याच्याकडून घेतो घेतो आणि घेतो… देत तर काहीच नाही… उलट जीवनातील अती हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास करण्याकडे कलाकलाने विकृती पछाडली गेलीय.. लोकसंख्येचा उद्रेक, त्याचा पडणारा भूमीवरचा भार, त्यातून वाढलेल्या वाजवी अवाजवी गरजांची कुऱ्हाड निसर्गाच्या अंगोपांगावर पडली… झाडांच्या कत्तली बरोबर जंगल संपत्ती स्वार्थीपणा ने ओरबाडून नामशेष करण्यात धन्यता वाटू लागली… याचा परिणाम पर्यावरणाचा समतोल बिघडत बिघडत आज अशी परिस्थिती आहे कि संपूर्ण र्हास झाला आहे… सुख समृद्धी मानवी जीवनात आली ती निर्सागाचा बळी देऊन… निर्सागाने मात्र याबाबत कुणाकडे तक्रार करावी… मुक्याने सारे सहन केले काहीही दोष नसतात.. सगळे आपले मुक्त हस्ताने लूटून देत असताना त्याला अस्तित्वहिनता आली… जमिनीची धूप, पाण्याचे स्त्रोत, लाकूड, वनौषधी, जंगलातले पशू पक्षी सारे सारे काही नाहीसे झाले.. मानवी जीवाला साह्यभूत होत असलेली हि संपत्ती नामषेश झाली… उष्णता वाढली, पाऊस रोडावला, या सारख्या धोक्याच्या संकेताने निसर्गाने मानवाला सांगून बघितले… पण ऐकण्याच्या मनस्थितीत तो असेल तर ना… मग प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सांसर्गिक लागण असलेले आपण नेहमीचं येतो पावसाळा त्यावेळी वृक्षारोपण करण्याचा सामाजिक मानसिकतेचा आजार फैलावतो.. माणसांच्या झुंडीच्या झुंडी वृक्षारोपण करताना फोटोत दिसतात.. संकल्पाचे लाखातले आकडे ओक्याबोक्या वसुंधरेला हिरवाईची शाल पांघरू पाहतात.. आजचा वृक्षलागवडीचा उत्सव संपला की उद्या तिथचं सगळे वृक्ष माना टाकून पडलेले दिसतात… मगं परत पुढच्या वर्षी याच वेळी हाच खेळ… पैश्याचा चुराडा, वेळेचा अपव्यय, फक्त प्रसिद्ध चा तरू फुलून येण्यासाठी… राजा बोले नि दल डोले अशी बुद्धिची दिवाळखोरी असल्यावर हेच घडत असते…. पण थोडं इथं थांबा काही माणसं जन्माला येतात तेव्हा त्याचं विधिलिखित काही वेगळं असतं.. सामान्यातील सामान्या सारखे प्रतिकुल परिस्थिती जगताना दारिद्र्य, अज्ञाना बरोबर परंपरेच्या सामाजिक साखळ्यांच्या जाचातून जात असताना नि दुःखाच्या उन्हात कुठेतरी सुखाची शलाका चमचमताना पाहताना त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ नकळतपणे गवसतो.. तेव्हा त्यांच्या हातून नियतीने जगाला अचंबित करणारं कार्य घडवून आणते… कर्नाटक राज्यातील थिम्माक्का दगडाच्या खाणीत काम करणारी.. चारचौघी सारखी लग्न संसाराची, मुलाबाळांची छोटी छोटी स्वप्न पाहणारी.. पण मातृत्व तिच्या नशिबातच लिहिलेले नव्हते.. घरचे, दारचे, समाजातले तिला वांझोटी म्हणून सतत पैरण्याने ढोसत जीवन नकोसं करणारे.. तिलाही मनातून खूपणारा आपण आई होऊ शकत नसल्याचा सल… खूपच उदास करून सोडे… पण तिनं त्यावर मार्ग शोधून काढला.. आपल्या घरापासून ते खाणीच्या जाणाऱ्या महामार्गावर चार कि. मी. च्या परिसरात वडाची झाडं लावायला सुरुवात केली… रोज जाता येता थोडा वेळ थांबून त्या झाडांची निगराणी, पाणी वगेरे बघत गेली.. बरोबरीच्या लोकांनी तिच्या या छंदाची कुचेष्टा केली… काही विघ्नसंतोषीनीं तर तिच्या पश्चात त्यातील काही झाडांना उखडून सुद्धा टाकले… तरीही थिम्माक्का डगमगली नाही कुणावर रागावली नाही आपली झाडं लावत गेली वाढवत गेली… आपला वंशवेल तिने असा वृक्षवेलातून वाढवत नेला…. आज त्या चार कि. मी. च्या रस्त्यावर या वडाच्या झाडांचे डेरेदार वृक्ष डौलाने उभे असून थंडगार सावली पसरुन बसलेत… थोडी थोडकी नव्हेत तर तीनशे च्या जवळपास तिने लावली हि वडाची झाडं आज दिमाखात उभी आहेत.. आणि गमंत म्हणजे तिची कुचेष्टा करणारेच जाता येता त्याच झाडाच्या सावलीत क्षणभराचा विसावा घेतायेत… थिम्मक्काच्या अलौकिक कार्याची दखल सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या एका पर्यावरणविषयक संस्थेने घेतली नि आपल्या संस्थेच ‘थिम्माक्का रिसोर्सेस फाॅर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ‘ असं चक्क नामकरण केलयं… आणि आपल्या इथे.. खरंच… मिडियावाले, शासन, प्रशासन, किती आंधळे आणि बहिरे असतात याच सत्याला नेहमी प्रमाणे जागले… असो… माझे त्या थिम्मक्काच्यासाठी विशेष कृतज्ञतेपोटी निशब्द होउन विनम्रतेने कर माझे जुळून येतात…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ” इथे तुझी भरभराट होणाराय. बघशील तू. माझे आशीर्वाद आहेत तुला”

 सरांनी‌ मनापासून दिलेल्या आशिर्वादांचे हे शब्द सरांच्या मनातल्या तत्क्षणीच्या भावना व्यक्त करीत होते हे खरेच. पण त्याच शब्दांत नजीकच्या भविष्यकाळात घडून येणाऱ्या अनेक उत्साहवर्धक घटनांचे भविष्यसूचनही लपलेले होते याचा प्रत्ययही मला लवकरच येणार होता याची मात्र मला त्याक्षणी पुसटशीही कल्पना नव्हती! )

माधवनगरला अतिशय प्रशस्त अशा ब्रॅंच-मॅनेजर क्वार्टर्स होत्या. त्याही ब्रॅंचला जोडून. मधे फक्त एक काॅमन दरवाजा. त्यामुळे येण्याजाण्याचा वेळ तर वाचायचाच शिवाय एरवीच्या मोकळ्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशीही महत्त्वाचा पत्रव्यवहार विचारपूर्वक हातावेगळा करायला मला भरपूर निवांतपणाही मिळायचा. असे सौख्य मला ना पूर्वी कधी अनुभवायला मिळालं होतं आणि ना नंतरही. त्यामुळे माधवनगर ब्रॅंचमधलं प्रचंड वर्कलोडही मला सुसह्य झालं होतं. माझ्यासाठी आणखी एक अतिशय समाधानाची बाब म्हणजे नाईकसरांचं घर आमच्या बॅंकेच्या अगदी जवळ म्हणजे समोरचा रस्ता ओलांडला की त्याला लागूनच होतं. त्यामुळे आमची रोजच भेट व्हायची. त्यांच्या नित्य भेटी, विविध विषयांवरील गप्पा हा माझ्यासाठी विरंगुळाच नव्हे तर एक प्रकारचा सत्संगच असायचा. सरांची ‘आध्यात्मिक आणि साहित्यक्षेत्रातली अधिकारी व्यक्ती’ ही ओळख माझ्यासाठी नवीन होती. त्यांचं बोलणं अतिशय शांत, लाघवी आणि ओघवतं असे. त्यांच्याशी अल्पकाळाचं मोजकं बोलणंही एक वेगळीच ऊर्जा देऊन जात असे. माझ्या मनातल्या कितीतरी शंकांचं निरसन अनेकदा त्यांना नेमकं कांही न विचारताही त्यांच्याकडून नकळत आपोआपच केलं जातं असे. तो अतिशय विलक्षण अनुभव असायचा!

माझ्या सासुरवाडीच्या सर्वांशीही नाईक-कुटुंबियांचा परिचय आणि जवळीक होतीच. त्यामुळे मी महाबळ कुटुंबाचा जावई असणं ही सरांसाठी विशेष कौतुकाची बाब असे. त्यामुळे पहिल्या भेटीनंतरच्या लगेचच्या निवांत भेटीतच सरांनी आरती/सलिलची आवर्जून चौकशी केली होती. तिची नोकरी, राजीनामा, जूनमधलं फॅमिली शिफ्टिंग हे सगळं त्यांना सांगितलं तेव्हा ते विचारात पडले.

“हे बघ, इथलं नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होईल. अनेक शाळांमधल्या नवीन भरतीबद्दलच्या जाहिराती यायला सुरुवात होईल. आपल्या सांगली शिक्षण संस्थेच्या शाळांमधेही नवीन जागा भरायच्यात. अशा जाहिरातींकडे लक्ष ठेवून आरतीला तिथूनच तुझा इथला पत्ता देऊन ताबडतोब अर्ज करायला सांग. कारण ती इथे आल्यानंतर अर्ज करायचा म्हणशील तर मुदत संपून गेलेली असेल. अनुदानित शाळेतली नोकरी सोडल्यानंतर सहा महिन्याच्या आत जर दुसऱ्या अनुदानित शाळेत पुन्हा नोकरी मिळाली तरच पहिल्या नोकरीतली सिनिऑरिटी आणि इतर फायदे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नको म्हणावं. “

पुढे एकदोन दिवसांत ते म्हणाले तशी सांगली शिक्षण संस्थेची आणि सांगलीच्याच वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या रा. स. कन्याशाळेची अशा दोन जाहिराती माझ्या वाचनात आल्या तेव्हा त्याची कटिंग्ज महाबळेश्वरला आरतीकडे पाठवून मी तिला सरांचा निरोपही कळवला. दोन्हीकडे आरतीने लगेच अर्जही केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती इकडे येण्यापूर्वीच दोन दिवस आधी तिची दोन्हीकडची इंटरव्ह्यूची काॅललेटर्स माझ्या पत्यावर येऊन पडली होती!’देता घेशील किती दो कराने’ ही उक्ती कृतीत दृश्यरुप होणं म्हणजे नेमकं काय याचा सुखद अनुभव मला आला तो दोन्हीकडे आरतीची सिलेक्शन झाल्याची बातमी आली तेव्हा!

महाबळेश्वरहून परतल्यावर लगेचच वेध लागले ते दोन्हीपैकी एक प्रस्ताव विचारपूर्वक निवडून नवीन रुटीनला सामोरं जायच्या तयारीचे. सांगली शिक्षण संस्थेत पहिलं पोस्टींग सांगलीतल्या शाळेतच होणार होतं. तरीही पुढे कधीही जिल्हाभर विखुरलेल्या संस्थेच्या कोणत्याही शाळेत होऊ शकणाऱ्या बदल्या गृहित धरुन सांगलीतल्या कायमच्या वास्तव्याची खात्री असणारी रा. स. कन्याशाळेची आॅफर आम्ही पूर्ण विचारांती स्विकारायचं ठरवलं आणि आम्हा तिघांचीही नव्या रुटीनला सामोरं जायची तयारी सुरु झाली.

सलिलची ‘बापट बाल शिक्षण मंदिर’या शाळेतली दुसरीतली अॅडमिशन, आरतीची एक जूलैपासून सुरु होणारी नवीन नोकरी, दोघांचंही सांगलीला जाण्यायेण्यातलं धावपळीचं रुटीन आणि अशा जाण्यायेण्याच्या त्रासापासून पूर्णत: मुक्त असणारं माझं निवांत, स्वस्थ वेळापत्रक हे सगळं मला पुढे कितीतरी दिवस स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! पण या स्वप्नातून अचानक दचकून जाग यावी तसा मी भानावर आलो ते केवळ हे असं कौटुंबिक स्थैर्य मिळणं सोयीचं व्हायला निमित्त व्हावं एवढ्यापुरत्या अगदी अल्पकाळासाठीच माझी इथे माधवनगरला बदली झाली असावी असं वाटायला लावणारी एक बातमी अचानक ब्रॅंचमधे येऊन धडकली तेव्हा! इथं येऊन मला चारसहा महिनेही झाले नव्हते आणि पुढच्या प्रमोशन प्रोसेसच्या हालचाली सुरु झाल्याची ती बातमी होती! 

सगळं प्रोसेस पूर्ण व्हायला चार एक महिनेच लागणार होते. प्रमोशनची संधी हा आनंदाचा भाग असला तरी माझ्यापुरता विचार करायचा तर प्रमोशन नंतरची ‘आऊट ऑफ स्टेट पोस्टींग’ ची टांगती तलवार माझ्या संकल्पसिध्दीत फार मोठा अडसर निर्माण करणारी ठरणार होती आणि हेच माझ्या मनात डोकावू लागलेल्या अस्वस्थतेचं मुख्य कारण होतं. घरचं हसरं वातावरण पाहिलं कीं हे सगळं घरी सांगायचं मी टाळतंच होतो. जे व्हायचं तेच होणार असेल तर आत्तापासूनच सगळ्यांना याचा त्रास कशाला असा विचार करुन मी स्वतःचीच समजूत काढत रहायचो.

ब्रॅंचमधल्या दिवसभराच्या कामांमधली व्यस्तता सोडली तर एरवी मनात नजीकच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या अस्थिरतेचा विचार ठाण मांडून असायचाच. एक दिवस न रहावून मी नाईकसरांना माझ्या मनातली ही बोच बोलून दाखवली. त्यांनी नेहमीच्या शांतपणे हसतमुखाने सगळं ऐकून घेतलं. म्हणाले, “यालाच तर आयुष्य म्हणायचं. ते येईल तसं आनंदाने स्विकारायचं. जिथे जाशील तिथे दत्तमहाराज आहेतच ना पाठीशी?मग काळजी कसली? ते असणारच आहेत. आणि म्हणूनच तुझ्या उत्कर्षाची वाट वळणावळणांची असणाराय. खाचखळग्यांची नाही हे लक्षात ठेव”

त्यांचे हे नेमकी दिशा दाखवत मला निश्चिंत करणारे आश्वासक शब्द त्याक्षणी माझ्यासाठी अतिशय दिलासा देणारे होते! 

माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि समोरच्या त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृपक्ष…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “पितृपक्ष…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला कावळे दिसले नि वेगळेच मनात आले

कावळ्याचा आणि आपला किती जवळचा संबंध आहे ? नाही का? अगदी लहान असल्यापासून एक चिऊ आणि एक काऊची गोष्ट आपण ऐकलेली आहे. नंतर मग लोभी कावळ्याची गोष्ट मग तहानलेल्या कावळ्याची गोष्ट मग कावळ्याला काणा का म्हणतात ती गोष्ट मग कावळ्यासारखी दृष्टी ठेवण्याची शिकवण मग मुलगी वयात आली की काकस्पर्शाची शिकवण अशा अनेक वळणांवर भेटलेला कावळा मेल्यानंतर पिंडाला शिवायला आवश्यकच आणि त्यानंतर येणार्‍या प्रत्येक पक्ष पंधरवड्यात तर यांचा मान जास्तच!!

पण हे एवढे महत्वाचे दिवस•••• त्यासाठी आणि जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर भेटणारा हा कावळा क्षुल्लक का? का त्याला कमी लेखले जाते?

खरं तर त्याच्या रूपाने आपण आपले पूर्वज पहात असतो मग ज्ञानेश्र्वरांनी म्हटल्याप्रमाणे पाहुण्यांचा, आपल्यांचा संकेत घेऊन येणार्‍या या कावळ्याचे पाय खरोखर तुझे सोन्याने मढविन पाऊ ईतके महत्व तर त्याला मिळालेच पाहिजे नाहि का?

अहो हे पक्ष पंधरवड्याचे दिवस ! त्या दिवसांना सुद्धा आपण कमीच लेखतो की••••• म्हणे या दिवसात शुभ कार्ये करायची नाहित•••• म्हणे यामधे चांगले निर्णय पण घ्यायचे नाहीत••• मुलगा मुलगी बघायचे कार्यक्रम करायचे नाहित•••• इत्यादि इत्यादि••••

पण याच अनुशंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो•••• या दिवसांमध्ये कावळ्याच्या रूपाने आपले सगळे पूर्वज आपल्या घरी जेवायला येतात यावर तुम्ही विश्वास / श्रद्धा ठेवता ना? मग मला सांगा आपले पूर्वज आपले कधी वाईट चिंततील का हो? नाही ना?

मग जर तसे असेल तर त्यांच्या हजेरीत चांगला निर्णय घेतला शुभकार्य केले किंवा मुलगा मुलगी पहाण्याचे कार्यक्रम केले तर या कार्यक्रमांना आपले पूर्वजही हजर राहून ते आपल्याला आशिर्वाद नाही देणार का? मग देव आप्तेष्ट आणि पूर्वजांच्या हजेरीत या गोष्टी का करायच्या नाहीत?

उलट इतर कोणत्याही दिवशी केलेल्या कार्यांपेक्षा या दिवसात केलेल्या कार्यांना यश जास्त येईल. तेव्हा शुभस्य शिघ्रम ! तेव्हा या पंधरवड्यासाठी म्हणून काही निर्णय लांबणीवर टाकले असतील तर ते त्वरीत घ्या!! आणि प्रत्यक्षच त्याचे परिणाम अनुभवा!!

आपल्याला पण म्हणावेसे वाटेल••• पैलतोगे काऊ कोकताहे••• शकून गे माये सांगताहे••••

अजून एक विचार आला कावळ्याच्या रुपाने आपण आपल्या पूर्वजांना बोलावतो एक दिवसाचा जुलमाचा रामराम करतो. पण पूर्वज जर खरेच कावळ्याच्या रूपाने येत असतील तर त्यांना असे येणे आवडत असेल का? ज्यांना जीवंतपणी मुलांच्याकडे हाल सोसावे लागले असतील तर ते नाईलाजाने येत असतील का? का मुलांच्या प्रेमापोटी ते सगळे विसरून त्यांना माफ करायला येत असतील?

काही काही कावळे ना घर का ना घाटका अशी वेळ येऊन उपाशीच रहात असतील का?

अजून एक विचार करावासा वाटतो पूर्वजांच्या प्रती सद्भावना प्रेम व्यक्त करायला ठराविक पंधरवडाच कशाला पाहिजे? घरात नेहमी शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा चांगल्या घटना घडतात किंवा वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा त्यांचे स्मरण व्हायला हवे. अगदी छोट्या छोट्या कारणांनीही म्हणजे खाण्याचे पदार्थ कपड्याचा रंग प्रकार आदिंनीही त्यांना आठवणीतून जपले पाहिजे. त्यांची चांगली शिकवण आचरली पाहिजे.

मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही. रोजच्या जेवणातल्या सारखे गोग्रासा सारखा कावळ्याचा घासही बाजूला ठेवा. मग पितृजनाच्या कृपेने आपले सगळेच जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कृष्ण माझ्या विचारातून…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “कृष्ण माझ्या विचारातून…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

कृष्णाचा विचार मनात येताच त्याची विविध रूपे मनःचक्षुसमोर येतात.

परंतु ती सर्व त्याची सगुण रूपे आहेत.

कृष्णाची ही सगुण रूपे सुद्धा खूप प्रतीकात्मक आहेत.

 

संत ज्ञानेश्वर महाराजांनी गोपींची मधुरा भक्ती खूप सुंदर वर्णिली आहे.

गोपी सखीला म्हणते,

“मी माझे रूप आरशात बघते, परंतु मला मी दिसतच नाही. मला आरशात कृष्णच दिसतो. “

तेव्हा सखी म्हणते, “कारण तू कृष्णमय झाली आहेस. तुझे स्वतःचे अस्तित्व, तुझा मीपणा विरघळला आहे. ”

 

गोपी म्हणते, “मी कृष्णाला शोधले. सर्व वृदांवन धुंडाळले पण कृष्ण कुठेच सापडला नाही. “

ती अतिशय व्याकुळ होते.

तेव्हा तिची सखी सांगते, “कृष्ण तुला बाहेर सापडणार नाही. तू तुझी दृष्टी बाहेर टाकण्या ऐवजी स्वत:च्या आत पहा. तिथे तुला तो दिसेल कारण कृष्ण तुझ्या अंतरात आहे, तुझ्या हृदयात आहे. “

 

गोपींची मधुरा भक्ती तशी द्रौपदीची आर्त भक्ती तिच्या आर्त हाकेला धावून कृष्ण येतो व तिची लाज राखतो.

गजेंद्र मोक्ष हे सुद्धा कृष्णाप्रती असलेल्या आर्त भक्तीचेच प्रतीक आहे.

आपल्या सामान्यांच्याही जीवनात कुणाच्या रूपाने कृष्ण संकटात धावून येतो.

 

कृष्ण खरा उलगडत जातो, तो गीतेत, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्ववेत्ता म्हणून.

तो अर्जुनाला सांगतो, “तू मला जाणून घे. माझ्या या सगुण रुपाच्या पलीकडचा जो मी आहे त्या मला, परमतत्वाला जाणून घे, माझे परम अव्यय रूप जाणून घे. मला जाणल्यावर तुला दुसरे काही ज्ञान शिकायचे बाकीच उरणार नाही. “

मी चराचरात भरून आहे, पाण्यातल्या रसात मी आहे, चंद्र सूर्यांच्या प्रभेत मीच आहे, पृथ्वीच्या गंधात मी आहे, बुद्धीवंतांची बुद्धी मी आहे, तेजस्वींचे तेज मी आहे, बलवानांचे बळ मी आहे,

तपस्वींचे तप मी आहे. “

 

कृष्णाला दुर्गुणी लोकांचा अतिशय राग आहे.

तो त्यांना दुष्कृतिनः, नराधमाः, आसुरम् भावम् आश्रिताः 

असे म्हणतो. तो म्हणतो, “अशा लोकांना मी कधीच दिसत नाही. ”

न अहम् प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत्तः। 

आज जो हाहा:कार माजला आहे—

चिमुकल्या मुलींवर बलात्कार होतात,

भर रस्त्यात खून होतात, दरोडे पडतात,

दारुच्या नशेत बेदरकारपणे गाड्या चालवून निरपराध्यांच्या हत्या होतात

हे सर्व थांबविण्यासाठी आकाशातून कृष्ण येणार नाही.

तो म्हणतो, ” माझेच बीज, माझा अंश तुमच्यामधे आहे. ”

बीजं माम् सर्व भूतानाम।

…….. त्या आतल्या अंतर्मनातल्या कृष्णाला जागवा.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय !” लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय !”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पत्रकार प्रसाद गोसावी

(प्रसाद गोसावी ठरले अवयवदान करणारा पहिला पत्रकार)

पुण्यातील ‘पोलिसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. पावणेदोन महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (lungs), यकृत (liver), व एक मूत्रपिंड (kidney) व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले.

प्रसाद गोसावी याच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशनजवळ गंभीर अपघात झाला होता. त्याच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा जीव वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पुढे होते. उपचार सुरु असतानाच पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचा जीव वाचणे महत्वाचे होते. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण प्रसादच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, वकृत्व एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.

प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डी वाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मुलीच्या आग्रहाखातर मालाडला पॉश कॉम्लेक्समध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर. नवीनच होती. त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.

 

सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता. सुरेश …. बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले “ माझी गाडी पुसशील का ?” तो हो म्हणाला.

“पैसे किती घेशील ?”

तो …”. तुम्ही द्याल ते.” … अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.

 

आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली. गाड्याही वाढल्या. गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली.

सुरेशला म्हणालो… “ तुला कॉम्पिटिशन वाढली. ”

तो म्हणाला “ नाही, ही मुले मीच आणली, मीच कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो. ”

 

त्या भागात कबुतरे जास्त होती. एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले. काय करावे कळेना. शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्या माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली

 

US ला जाताना वरून बॅग्स काढणे, आल्यावर परत वर ठेवणे … सर्व सुरेश करत होता. पंखे पुसणे, काचा पुसणे ही कामे त्याचीच झाली. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला. ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो.. “ ड्राइवर शोध “.. त्याने खिशातून काढून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले, मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला…

“साहेब… हा चांगला मसाज करतो. आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे करतो, चांगला आहे.” 

 

एक दिवस फिरून येताना गेटसमोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.

बायको म्हणाली सुरेशने आणून दिली. त्याच्या भावानेच ती गाडी लावली आहे.

 

पार्ल्याची जागा तयार झाली. सुरेशला म्हटले “ घर साफ करायला चल “… गाडी तोच चालवत होता.

मी …” सुरेश काय नवीन ?”

सुरेश …”.. चायनीज फूडची गाडी टाकतोय … रात्री 11 ते 2 म्युनिसिपालिटी, पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो.. त्याने मदत केलीये. साहेब एक सांगू..

ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं, वो पुरे करकेही रहुंगा…. माझे प्रिंसिपल एकच… कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही … “ 

 

मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती. बायको म्हणाली घर साफ करून घ्या. चांगल्या प्रोफेशनल लोकांकडून. मग गूगल सर्च करून एका प्रोफेशनल क्लीनर्सला फोन केला. काम आणि रेट ठरला. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली. मला धक्काच बसला …. त्यातला एक सुरेश होता.

सुरेश…” साहेब ही माझीच कंपनी. मीच फॉर्म केली आहे. काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मी स्वतः च आलो. कामाची सवय मोडायची नाही …” 

मला त्याचे शब्द आठवले …. “ सपने पूरे करकेही रहूँगा…. ” 

 

मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले….

नाहीतर आम्ही मुंबईकर… भूमिपुत्र… आमची स्वप्नं तरी काय … 

  1. ते 5 नोकरी….

ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट.. फार फार तर विंडो सीट 

नाहीतर 

एखादी वडा पावची गाडी…

लेखक : रवींद्र भुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे 

प्रिय मित्र प्रदीप,

कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रा पार! कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे. टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. ऊर अभिमानाने भरून आला आहे. आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य ! 

या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत, अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !

महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रो मध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्ट च्या शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता. आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक वर्षानंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस. परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते. तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटर मध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्ली साठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेट पेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?

हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे. आम्ही फक्त पेपरमधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं. पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस हा शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे. तो युट्युब वर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ? ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही.

राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे. त्यांनी जे विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष! कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवर चा खूप मोठा उपयोग केला गेला आहे.

या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. खरं म्हणजे मला माझ्या भावना नीट पणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे. परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती. कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी

इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ वैज्ञानिक इंजिनियर्स जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन.

एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…

 !! नम….. नमस्तुभ्यम ! नमस्तुभ्यमस्तुभ्यम !!!

या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

*

ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो

खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो

चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

*

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी

अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी

रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

*

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!

काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

*

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते

अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते

नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !

कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ? अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो. असो वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही. त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही.

जय हिंद! भारत माता की जय !!

तुझा प्रिय मित्र,

सुनील

(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. भारताच्या यशस्वी चंद्र मोहीमेनंतर त्यास पाठवलेले हे पत्र. मुद्दाम सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बावरा मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ बावरा मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बावऱ्या बाल मनात काय कल्पना व विचार येतील सांगू शकत नाही. आज आवरताना एक कॅसेट सापडली आणि त्यातच त्यातील रिबन प्रमाणे तिने गुंडाळून घेतले. माझ्या लहानपणी ज्याच्या कडे रेडिओ, टेप रेकॉर्डर, टिव्ही असेल, घरात नळ असेल, गॅस असेल, झोपायला कॉट आणि त्या वर गादी असेल, तर त्या घराकडे फार श्रीमंत आहेत, त्यांचे काय बाबा! अशा आविर्भावात बघितले जायचे.

तर अशा काळात वडिलांनी एक बॉक्स घरी आणला. ( बॉक्स उघडणे ही पण एक दिवाळीच बरं का! ) तर त्या बॉक्स भोवती वाड्यातील सगळे बालवीर जमले. अगदी आनंद व उत्सुकता चेहेऱ्यावर घेऊन! मोठी माणसे कडेकडेने उभी राहिली. त्यातील स्त्रियांच्या चेहेऱ्यावर नानाविध भाव! कौतुक, आसुया, उत्सुकता, थोडी इर्षा, थोडी हळहळ असे संमिश्र भाव! तर विविध सूचनांच्या भडिमारात बॉक्स उघडला. आणि आतून मस्त काळा, चमकदार अनेक बटणं असलेला एक पाहुणा घरात प्रविष्ट झाला. तो म्हणजे टू इन वन

प्रथम त्यातले काहीच कळेना. हळूहळू त्याच्याशी परिचय वाढत गेला आणि नवनवीन गुपिते कळू लागली. रेडिओ तसा थोडा फार परिचित होता. पण त्यातील कॅसेट प्लेअर हा नवीनच होता. अगदी कॅसेट फिरते कशी याचे पण निरीक्षण झाले.

त्याचा आवाज, हवी तीच गाणी ऐकणे सगळेच नवीन!

त्यात माझी बाल बुध्दी गप्प बसू देईना! या बाल कुतूहलाने कोणी नसताना खूप वस्तू खोलून बघायचे प्रताप केले आहेत.

ती कॅसेट वाजते कशी? मग घरात कोणी नसताना ती कॅसेट उलट सुलट बघितली. त्याला A व B बाजू असते. आणि दोन्हीकडे वेगळी गाणी कशी वाजतात? हा मोठाच प्रश्न होता.

आणि एका गाफील क्षणी त्यातली काळी रिबन बाहेर आली. आणि आता ओरडा मिळणार म्हणून मी घामाघुम झाले. पण कॅसेटच्या चाकात करंगळी घालून ती फिरवली आणि रिबन आत गेली. आणि मी श्वास सोडला. पण कुतूहल होतेच! मग अशी हव्या त्या कार्यक्रमाची कॅसेट मिळते हे समजले. त्या कुतूहलाने दुकाने फिरले. त्यातून हे समजले की, आपल्याला हवी ती गाणी त्यात भरून मिळतात. मग काय कोरी कॅसेट घ्यायची घरातील सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाच्या आवडीची गाणी निवडायची, त्याची यादी करायची आणि ती दुकादाराकडे सोपवायची. हा एक नवीनच खेळ मिळाला. नंतर हेही समजले की आहेत ती गाणी पुसून नवीन गाणी पण त्याच कॅसेट मध्ये भरून मिळतात. मग तर अजूनच आनंद! त्यावेळी TDK आणि SONY च्या कॅसेट सर्वात उत्तम असतात हे ज्ञान पण मिळाले. आणि जे कथाकथन, गाण्याचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकावे लागत, ते या कॅसेट मुळे घरात आले. एकदा घ्या आणि परत परत ऐका याचा खूप आनंद व्हायचा. पु. ल. , व. पु. , शंकर पाटील, हे सगळे जणू घरातच आले आहेत असे वाटायचे. विशेष म्हणजे ती कॅसेट विशिष्ट बटणे वापरून मागे पुढे करून हवे ते गाणे पुन्हा ऐकता यायचे. रेडिओ ऐकण्याची सवय असणाऱ्यांना आपल्या बोटावर आवडते गाणे वाजवताना फारच छान वाटायचे.

असे आनंदात ऐकणे चालू असताना अचानक खटक असा आवाज येऊन तो टेप बंद पडला. आणि सगळ्यांची नजर माझ्याकडे वळली. मी शक्य तितका निरागस की बावळट चेहरा करुन माझा त्यात काही हात नाही, मी आज टेपला हातही लावला नाही हे पटवून दिल्या नंतर ती कॅसेट बाहेर काढण्यात आली. तर त्यातून खूप लांब रिबन बाहेर आलेली. तिथे माझा पूर्वानुभव उपयोगी पडला फक्त या वेळी करंगळी ऐवजी त्या स्पूल मध्ये पेन्सिल घालून ती रिबन गुंडाळून पुन्हा आत बसवली. एकदा तर ती रिबन तुटलीच! पण ती सेलोटेपचा बारीकसा तुकडा घेऊन ती रिबन सरळ करुन, त्या वर तो तुकडा चिकटवणे हे पण काम मी करत असे. हे काम ज्यांनी केले असेल त्यांना डॉ ऑपरेशन किती टेन्शन मध्ये करत असतील याचा अनुभव आला असेल.

आता या ढगात (क्लाउड), तू नळी (यू ट्यूब), आपले गुगल बाबा यावर मागाल ते एका टिचकी (क्लिक) वर मिळते. आणि प्रत्येकाला हवे ते कानात हेड फोन घालून हवे ते ऐकता येते. पण आज काय ऐकायचे असा जेवणाचा आणि कॅसेट ऐकण्याचा मेन्यू एकदमच ठरायचा. त्या सहभोजन व सहश्रवण यात जी गंमत होती, ती हे सगळे ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहिती! 

 तर हे सगळे एका कॅसेट मुळे पुन्हा अनुभवले.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares