मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हव्यास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ हव्यास…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सुखदुःखाची जात कळाया

जरा तरी वनवास हवा

 

जीवन अभिनव जगवायाला

अविरत चालू श्वास हवा

 

या देहाची भूक शमवण्या

अन्नाचा पण घास हवा

 

भाव मनाचा खुलवायाला

गंधाचा मधुमास हवा

 

मनमोराला नाच कराया

अवती भवती भास हवा

 

जीवनसाथी सामर्थ्याचा

निवडायाला खास हवा

 

ज्ञान संपदा अर्पण करण्या

सेवाभावी दास हवा

 

नियोजनाच्या अचूकतेवर

विजय खरा हमखास हवा

 

चंचलतेने अधिर व्हायला

नित्य नवा आभास हवा

 

कृष्ण राधिका जपता जपता

खेळायाला रास हवा

 

प्रसन्न तेने गीत गायला

गीताला अनुप्रास हवा

 

सामर्थ्याचा बहरायाला

जगण्याचा हव्यास हवा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 – माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

भक्ती वेडा पुंडलीक

भक्ती त्याची साधा भोळी..।

ऊभा राही चंद्रमौळी …।

विटेवरी…।।१।।

धन्य धन्य  सखूबाई ..।

देव बंदी तिच्या घरी..।

संत सखू वारी करी..।

पंढरीची…।।२।।

जनाईचे जाते ओढी.,।

नाम्यासाठी खीर खाई…।

गुरे राखी चोख्या पायी…? 

पांडुरंग …।।३।।

बादशाही दरबारी..।

महार झाला जगजेठी..।

हातामधे घेऊन काठी..।

दामासाठी..।।४।।

थोर भक्त अधिकार..।

देव बनला कुंभार।

देई मातीला आकार..।

गोरोबांच्या…।।५।।

भक्तांसाठी ना ना रंग..।

उधळीतो पांडुरंग ..।

रोज कीर्तनात दंग…।

 नामाचीया…।।६।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्दाची अंगभूत वैशिष्ट्येच त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवतात. घन हा अगदी छोटा, अल्पाक्षरी शब्द याचं अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल.

या शब्दाच्या एका रुढ अशा आणि अनेक प्रतिभासंपन्न कवींनी रसिकमनांत अधिकच दृढ केलेल्या एका अर्थाने  तर या शब्दाचे थेट आकाशाशीच अतूट नाते निर्माण निर्माण केलेले आहे आणि याच शब्दाच्या दुसऱ्या अर्थाने हे नाते अधिकच घट्ट झालेले आहे. घन या शब्दाचे हे दोन्ही अर्थ परस्परवेगळे असूनही परस्परपूरकही ठरलेले आहेत हेच या शब्दाचं अंगभूत असं वेगळं वैशिष्ट्य आहे.

          घन म्हणजे मेघ आणि घन म्हणजे घट्ट.म्हणजेच अप्रवाही.या दुसऱ्या अर्थाचं अप्रवाहीपण हे पहिल्या अर्थाच्या मेघाचं,ढगाचंही अंगभूत वैशिष्ट्य असावं हा निव्वळ योगायोग असेल तर तोही किती अर्थपूर्ण आहे याचे नवल वाटते!

           मेघ हा या शब्दाचा रसिकमनांत रुजलेला काव्यमय अर्थ थेट माणसाच्या जगण्याशी,सुखदु:खाशी जोडलेला आहे हे खरेच.तथापी ‘घट्ट’ या दुसऱ्या अर्थाची व्याप्ती आणि घनताही घन या शब्दाचे मोल अधिकच वृध्दिंगत करते असे मला वाटते.गंभीर शब्दातील गांभीर्य अधिक गडद करायला ‘घनगंभीर’ या शब्दाला ‘घन’च सहाय्यभूत ठरतो.घनघोर हा शब्द  युध्दाचे विशेषण म्हणून येतो आणि युध्दाची भयावहता अधिकच वाढवतो, तर जंगलाची व्याप्ती आणि नेमकं चित्र उभं करायला घनदाट शब्दाला पर्यायच नसतो. झांजा, टाळ,चिपळ्या, टिपऱ्या…. यासारख्या अनेक वाद्यांना सामावून घेणारा ‘घनवाद्य’ हा शब्दही फारसा प्रचारात नसला तरी आवर्जून दखल घ्यावी असाच.घन या शब्दाच्या सहाय्याने आकाराला आलेल्या अशा इतरही अनेक अर्थपूर्ण शब्दांनीच शब्दाशब्दांमधील परस्परसंबंध अधिकच दृढ केलेले आहेत एवढे खरे!

           घन या शब्दांचे वर उल्लेख केलेले मेघ आणि घट्ट हे दोन्ही अर्थ या शब्दाला एक वेगळंच रुप बहाल करतात.घन हा एकच शब्द ‘मेघ’ या अर्थाने नाम तर दुसऱ्या अर्थाने विशेषणाचे भरजरी वस्र परिधान केलेला असा बहुगुणी शब्द बनतो!

          घन हा शब्द नाम आणि विशेषण म्हणूनच नाही तर प्रत्यय म्हणूनही वापरला जातो.प्रत्यय म्हणून येताना तर तो स्वतःचं अनोखं वैशिष्ट्यही अधोरेखित करतो.प्रत्ययरुपात एखाद्या शब्दाच्या आधी जागा पटकावून घननीळ,घनदाट,घनघोर,अशा विविध विशेषणांना जन्म देणारा हा, प्रत्यय रुपात एखाद्या शब्दानंतर येत जेव्हा त्या शब्दाशी एकरुप होतो, तेव्हा आकाराला आलेली ‘आशयघन’,’दयाघन’ यासारखी विशेषणे त्या शब्दांमधील मूळ नामांचे (आशय,दया इ.)अर्थ अधिकच सघन करतात.

          घन हा असा विविध वैशिष्ट्यांनी अर्थपूर्ण ठरणारा शब्द म्हणूनच मराठी भाषेच्या विस्तृत,व्यापक आकाशाशी दृढ नाते जडलेला एक चमचमता ताराच आहे असे मला वाटते.

©️ अरविंद लिमये,सांगली

(९८२३७३८२८८)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

झपझप चालत बापट बाई सहावीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग मॅडम म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग म्हणत मुलांना बसायला सांगितले. बाईंनी डस्टर, खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग त्यांच्या विशेष आवडीचा. गेल्यावर्षी पण पाचवीत बापट बाईच या वर्गाच्या क्लास टीचर होत्या. तोच वर्ग पाचवी पास करत सहावीत आला. सर्व मुले त्यांच्या ओळखीची. फक्त एक सोडून….

बाईंच्या कपाळावर आठी आली. या मुलाचे काय करायचे ? यंदाच दुसर्‍या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलांमध्ये मिसळत नव्हता. अभ्यास करत नव्हता. बोलत नव्हता. गप्प राहून फक्त बघत रहायचा. बापट बाईंना कळेना या मुलाला हसता खेळता कसे करावे ? आज बापट बाई डेस्कवरुन उतरुन खाली आल्या. त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलाला म्हणाल्या,

‘‘अरे मुला, बोल काहीतरी, नाव काय तुझे ?’’

‘‘कृष्णा, कृष्णा सदाशिव शिंदे’’

‘‘ गेल्यावर्षी कुठल्या शाळेत होतास तू?’’

‘‘देवबाग हायस्कूल’’

‘‘मग यंदा मालवणला कसा काय आलास ?’’

‘‘वडलानी तिकडंच काम सोडलं, आत्ता हिथ काम धरलयां’’

‘‘कुठ काम करतात तुझे वडिल?’’

‘‘तेलींच्या गोडावूनमध्ये हमाल हाय.’’

‘‘बरं! तू आता पुढे बसशील का ?’’

आणि कृष्णा पुढून दुसर्‍या बेंचवर बसू लागला. बाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधून मधुन त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता. बाकीची मुलं वहित लिहून घेत होती कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या –

      ‘‘कृष्णा ! बोर्डवरचं लिहून घेत नाहीस?’’

      हु नाही की चु नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापट बाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकावर बसायला गेला. मधल्या सुट्टीत बापट बाई मुख्याध्यापक सामंत सरांना भेटायला गेल्या.

‘‘सर, सहावीतील एका मुलाबद्दल बोलायचं होतं.’’

‘‘हा, कुठला मुलगा ?’’

‘‘कृष्णा शिंदे, देवबाग हायस्कूलला पाचवीत होता. यंदा सहावीत आपल्या शाळेत आला. तो काही वेगळाच आहे. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचे काही लिहून घेत नाही. इतर मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं ?’’

‘‘देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी त्याच शाळेत नोकरी करते. एक दोन दिवसात मी वहिनीची भेट घेतो आणि कृष्णाची चौकशी करतो.’’

बापट बाई गेल्या. शाळा संपवून घरी गेल्या. बाई आणि बाईंचा मुलगा अवि दोघेच मालवणात रहायचे. बाईंचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोज सारखी बाईंची घरकामे सुरु झाली. त्यांनी देवाला निरांजन लावले. चौथीत असलेल्या अवीचा स्कॉलरशीपचा अभ्यास घेतला. बाई सर्वकाही करत होत्या पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा.

दोन दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात प्युनने सामंत सर बोलवल्याचा बाईंना निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या रुममध्ये गेल्या.

‘‘या बापट बाई ! तुम्ही त्या कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलेली ना ? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिच्याकडे चौकशी केली या कृष्णा बद्दल.’’

‘‘हो का ? मग ?’’

‘‘अहो, हा कृष्णा दोन वर्ष सतत पहिल्या नंबरावर होता. अत्यंत हुशार मुलगा पण…’’

‘‘पण काय ? ’’

‘‘फार वाईट वाटते सांगायला. हे शिंदे तिकडे सातारकडचे. मासे पकडायला समुद्रात बोटी जातात ना तशा बोटीवर शिंदे कामाला होता. या बोटीवरील खलाशांचे जेवण या शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनार्‍यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला येत किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका मलबारी खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली.’’

‘‘काय?’’ बापट बाई किंचाळत बोलल्या.

‘‘होय बाई आणि या कृष्णाला एक लहान बहिण आहे चार वर्षाची. तिला ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भेकला पण यांना कुठे शोधणार तो ? ती दोघ केरळच्या बाजूला गेल्याची बातमी होती. त्याने ७-८ दिवस वाट पाहिली आणि बोटीवरची नोकरी सोडली आणि इथे मालवणात तेलींच्या गोडाऊनमध्ये नोकरी पकडली. या कृष्णाला घेऊन तो मालवणात आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव घातलं.’’

‘‘अरे बाप रे ! काय सोसतोय हा पोरगा.’’ बाई कळवळून म्हणाल्या.

‘‘होय बाई, कोवळ्या वयात मोठा आघात बसलाय या कृष्णावर म्हणून तो निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि छोटी बहिण नाहीशी होणे हे किती भयानक आहे ? बाई आपण या मुलाला पुन्हा हसता खेळता करायला हवा. आणि त्याकरिता तुम्हाला त्याच्या बाई नव्हे आई व्हायला लागेल.’’

‘‘हो सर, माझ्या लक्षात आलय ते, मी प्रयत्न करणारच. येते सर !’’

बापट बाई स्टाफरुममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. काय निष्पाप पोर हे, या वयात काय काय सोसावं लागतयं या मुलाला. बाईंना आपला चौथीतला आपला मुलगा अवी आठवला. अवी पेक्षा हा फक्त दोन वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे. आईची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसले आणि इतक्यात बेल झाली तशा त्या सहावीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले दोन दिवस कृष्णा त्यांच्या तासाला दोन नंबरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णा जवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या –

‘‘कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलेस का?’’

कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात पाचवीची एक वही होती आणि एक जुनं पेन होतं.

‘‘अरे आता तू सहावीत आहेस बाळा ! सहावीची पुस्तकं-वह्या घेतली नाहीस का ?’’

‘‘नाही.’’

‘‘ठिक आहे, तो पर्यंत या राहूलच्या पुस्तकात बघ, उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करुया.’’ अस म्हणत बाई पटकन स्टाफरुममध्ये गेल्या आणि एक वही आणि एक पेन घेऊन आल्या.

‘‘कृष्णा, ही वही घे आणि पेन. आता मी बोर्डवर लिहीते ते वहीमध्ये लिही मग मी तुझी वही तपासणार’’असं म्हणत बाई गणित शिकवू लागल्या. त्यांच लक्ष होतं. कृष्णा बोर्डावरचे लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई डायसवरुन खाली आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. भूमितीची पदे व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली.

‘‘बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. काय टापटिप आहे. अक्षर मोत्यासारखं आहे. बघा !’’

मुलं पाहू लागली. एवढ्या दिवसात हा बावळट वाटणार्‍या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कृष्णापण खुश झाला. या नवीन शाळेत त्याच्या कोणी ओळखीचे नव्हते. वर्ग संपला तशा बापट बाई वर्गाबाहेर गेल्या. पण नवीन तास घेणार्‍या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत होत्या. अस करता करता सर्वच शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले.

मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले आपआपले डबे घेऊन बाहेर पडले. एकटा कृष्णा वर्गात बसून होता. एवढ्यात बापट बाई डबा आणि त्यांचा चौथीत शिकणारा मुलगा अवि याचा हात धरुन वर्गात आल्या. आणि एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाल्या –

‘‘कृष्णा ! डब्यातून काही आणलसं का रे ?’’

कृष्णाने मान हलवली. बापट बाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

‘‘हरकत नाही. हा बघ माझा मुलगा अवि. हा चौथीत आहे. चला आपण डबा खाऊ. कृष्णा या अविसोबत बाहेर जा. हातपाय धुवून या तो पर्यंत मी डबा उघडते. अविने कृष्णाचा हात पकडला आणि ते दोघे बाथरुममध्ये गेले. तो पर्यंत बाईंनी आपला आणि अविचा डबा उघडला आणि दोन डब्याचे तीन डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवलं. दोघेही येताच त्यांच्या हातात एक-एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले अन्न खायला संकोचू लागला तेव्हा बाई ओरडल्या.

‘‘कृष्णा आता मी रागवेन. झटपट डबा संपवायचा. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचयं.’’तसा कृष्णा डब्यातली चपाती भाजी खाऊ लागला. अविला नेहमीची सवय होतीच. त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवले –

‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’

क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टेक ऑफ…” – लेखक : श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “टेक ऑफ…” – लेखक : श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

हा टेक ऑफचा क्षण लांबून बघताना मला तरी आतून कुठून तरी भारावून जायला होतं… माझ्या नकळत ‘माझा भारत देश’ हा अभिमान उचंबळून येतो… आतून भरुन येतं… डोळे ओले होतात…

माझं जर हे असं होत असेल तर या प्रोजेक्ट मधे गेली तीन चार वर्षे अव्याहतपणे झोकून देऊन काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना काय होत असेल… 

एका बाजूला १४५ कोटी लोकांकडून अपेक्षांचं ओझं… दुसरीकडे अतिशय क्लिष्ट आणि वेगवेगळ्या विषयांवरचे इंजिनियरिंग … इंजिनियरिंग स्ट्रीम्सचं इंटरलिंकींग… विविध तऱ्हेच्या मानसिकतेंचं सिन्क्रोनायझेशन… एकमेकांशी इंटरफेसिंग… स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या, घरगुती जबाबदाऱ्या… वेळोवेळी येणारे अप-डाऊन्स, प्रॉब्लेम्स, प्रेशर्स…  वगैरे वगैरे… सांभाळणं आणि जमवून घेणं ! 

आणि हे सगळं सांभाळून अखेरीस हा निरोपाचा… टेक ऑफचा क्षण येतो…

लॉन्चिंग पॅड तयारच असतं… सगळं सेटिंग झालेलं असतं… काऊंट डाऊन सुरु होतं… फ्यूएलिंग होतं… कंट्रोल रुममध्ये एक अनामिक शांतता असते… फक्त रिपोर्टिंगचे आवाज ऐकू येत असतात… ‘सिस्टीम इनिशिएटेड’…. ‘सिस्टीम ॲक्टिव्हेटेड’… ‘ऑल चेक्स नॉर्मल’… तरीही सर्वांचे चेहरे दडपणाखाली असतात… आपापल्या पद्धतीने प्रार्थना सुरु असतात… काऊंट डाऊन संपत आलेला असतो… आणि झिरो होतो… 

इग्निशन ॲक्टिव्हेट होतं… अग्निचे लोळ उसळतात… आणि सगळे बंध तडातड तोडून ते निमिषार्धात आकाशात झेपावतं…. सरसर वेगानं पुढं पुढं झेपावत… पहिली स्टेज ओलांडत दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्यात जातं… क्रायोजेनिक इंजिन सुरु होतं आणि मग ते ठरवून दिलेल्या ट्रॅजेक्टरीत स्थापित होत होत ठिपका ठिपका होत दिसेनासं होतं आणि मग इकडं कंट्रोल रुममध्ये उरतं फक्त समोरच्या स्क्रीनवर एक ट्रॅजेक्टरी आणि त्यातून पुढे पुढे सरकणारा एक इवलासा ठिपका… हे एवढंच काय ते त्याचं अस्तित्व… 

सगळ्यांचे चेहरे हलके होतात… थोडं थोडं हसू तिथं उमलायला लागतं… एकमेकांचं अभिनंदन केलं जातं…

एवढं आपण केलेलं आज लाखो किलोमीटर लांब निघालेय… लांबचा पल्ला आहे… ते तिथं लांब आणि आपण इथं बसून त्यावर नियंत्रण ठेवायचं… कसं जमत असेल ना हे सगळं ? 

या सगळ्या मंडळींना ग्रेट म्हणायलाच हवं… 

आणि मग याच क्षणी त्यांना  ‘पूर्णत्वा’चा अनुभव मिळत असेल ना !  

पूर्णात पूर्ण ते हेच असणारेय !

एकदा त्या शास्त्रज्ञांना भेटून हे विचारायलाच हवे… 

खात्री आहे, ते हेच सांगतील…

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…

लेखक : श्री उमेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आई☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आई !  तुझ्यावर काहीतरी लिहावं असे भाचीने सांगितल्यावर तुझ्याविषयी काय काय लिहू असा प्रश्न मनाला पडला ! कळायला लागल्यापासून तू डोळ्यासमोर येतेस ती अशीच कर्तृत्ववान, सतत कामात असणारी आणि स्वाभिमानाने जगणारी, कष्ट करणारी आई ! संसारासाठी सतत दादांच्या पगारात आपला तिखट मिठाचा आणि भाजीपाल्याचा खर्च निघावा म्हणून धडपड करणारी आई ! 

तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगण्यापूर्वी तिचे लग्न कसे ठरले हे सांगणे मला महत्त्वाचे वाटते. कारण पेंडसे कुटुंब कराचीला राहत होते तर आईचं माहेर बेळगावला घाणेकरांच्याकडचे ! इतक्या लांबच्या ठिकाणी राहणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र कशी आली हा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की आमचे आजोबा शिकायला असताना घाणेकरांच्या घरी राहत होते. नंतर नोकरी निमित्ताने ते कराचीला गेले. व त्यांचा संसार तिथे सुरू झाला.. वडिलांच्या वयाच्या 22व्या वर्षी आजोबा काही कारणानिमित्ताने बेळगावला आले होते, त्यावेळी माझ्या आईचे पण लग्नाचे बघतच होते. त्यामुळे मोठ्यांच्यात बोलणी झाली आणि त्यांचे लग्न ठरवले गेले. आईने दादांना तर पाहिलेच नव्हते. पण त्याकाळी मोठ्यांनी लग्न ठरवले की मुलगा -मुलगी यांच्या पसंतीचा प्रश्न गौण ठरवला जाई. १९४५ साली लग्न झाल्यानंतर माझी आई बेळगावहून कराचीला आली.  त्याकाळी बेळगाव ते कराची या प्रवासाला एकूण पाच दिवस लागत ! माहेर सोडून आई एवढ्या लांब प्रथमच जात होती आणि तेही इतक्या दूरदेशी परक्या राज्यात ! त्या काळात आईने कसे निभावले असेल असे आता वाटते ! अचानकपणे लग्न ठरवण्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. केवळ एका विषयात मार्क कमी मिळाल्यामुळे आई मॅट्रिकला फेल झाली. आजोबांना शिक्षणाचा प्रचंड ध्यास.. त्यांनी आईला पुन्हा बेळगावला पाठवले आणि मॅट्रिकचे वर्ष चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आई कराचीला परत आली ! पुढे फाळणीनंतर भारतात येऊन त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.

तिला शिवणकामाची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला शिवणकामाचा कोर्स  करायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने शिवण शिवायला सुरुवात केली.  शिवणकामाचा वर्ग सुरू केला. विशेष करून ती फ्रॉक, स्कर्ट- ब्लाऊज, परकर यासारख्या लेडीज शिवणकामात पारंगत झाली. रत्नागिरीत ती रमली होती. पण मग ती. दादांची बदली प्रमोशन वर मराठवाड्यातील नांदेडजवळील खेड्यात झाली. ती. दादांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे राहणे अवघड होते. त्यांना खोकला, दम्याचा त्रास होता, तरीही ते सतत काम करत असत. त्या दरम्यान आम्ही तिन्ही मुले कॉलेज शिक्षण करत होतो. तेव्हा आईने मन घट्ट करून आम्हाला सांगलीला शिकायला ठेवले. पैशाच्या दृष्टीनेही सर्व अवघडच होते, पण मुलांचे शिक्षण करणे हे आई दादांचे ध्येय होते. 

नांदेडजवळ बेटमोगरा या लहान ठिकाणी वडिलांची सरकारी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती. तेथील वातावरण वेगळेच होते. पण तिथे गेल्यावर आईने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले .पाणी लांबून आणावे लागत असे.त्यामुळे पाणी आणण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवावा लागत असे. मोजक्या पाण्यामध्ये सर्व कामे करावी लागत असत. आईने तिथे राहून तेथील बायकांशी ओळखी करून त्यांच्याकडून काही शिकून घेतले, तसेच त्यांनाही नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा रेडिओ हाच विरंगुळा होता. रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, त्यावर प्रतिक्रिया पाठवणे,  वाचन करणे, शिवणकाम करणे आणि दादांच्या वेळा सांभाळणे यात तिचा दिवस जाई.

मी आणि माझा भाऊ तेव्हा सांगलीला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मराठवाड्यात गेलो की आमचे सगळे विश्वच बदलत असे. आई मला सुट्टीच्या पूर्वीच पत्र लिहून सांगत असे की, ‘काहीतरी भरत काम, विणकाम करायला घेऊन ये’. शाळेची लायब्ररी होती त्यामुळे वाचायला पुस्तकं मात्र भरपूर मिळत असत. सुट्टीत गेले की अधूनमधून आवड म्हणून स्वयंपाक करणे यात माझा वेळ जाई.आई-दादानाही खूप छान वाटत असे. सुट्टीचे दिवस संपत आले की आईची माझ्याबरोबर द्यायच्या पदार्थांची तयारी सुरू होई. नकळत ती थोडी अबोल होत असे आम्ही जाणार या कल्पनेने !

कालक्रमानुसार आम्हा तिघांची शिक्षणं झाली. आणि नंतर भावांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. आईने स्वतःच्या हिमतीवर आमच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नुसती लग्न केली म्हणजे संपत नाही, त्यानंतर सणवार, बाळंतपण, नातवंडांबरोबर संवाद ठेवणे या सर्व गोष्टी ती जाणीवपूर्वक उत्साहाने आणि जबाबदारीने करीत होती. तीर्थरूप दादांचे तिला प्रोत्साहन असे. पण तब्येतीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते. आकुर्डी येथे भावाने घर बांधले आणि आईची ‘घरघर’ थांबवली. तिला आपल्याला घर नाही ही गोष्ट फार जाणवत असे. भावाच्या घराने -विश्वास च्या ‘पारंबी’ ने सर्वांनाच आधार दिला. तिथे तिचे स्वास्थ्यपूर्ण जीवन चालू झाले. गरजेनुसार ती आमच्याकडे येई. पण आकुर्डीला सरोज वहिनीची नोकरी व नातवंडे यामध्ये तिने राहण्याचे ठरवले. आकुर्डीत भजनी मंडळात तिचा सक्रिय सहभाग होता. भजन- भोजन यात तिचा वेळ छान जात असे.आकुर्डीच्या नातवंडांसाठी तिने इतके केले की मी तिला म्हणायची, “तुझी आणखी दोन मुले वाढवायची हौस राहिली बहुतेक !”

 ती. दादांच्या निधनानंतर ती आकुर्डीतच रमून राहिली. पुढे नातवंडांचे लग्न, बाळंतपण यात तिने जमेल तेवढी मदत केली. आज तीन मुले, सात नातवंडे आणि अकरा पंतवंडे असा तिचा वंश विस्तार आहे !

आताआतापर्यंत ती स्वयंपाकघरात भरपूर लुडबुड करत असे. आपलं वय झालंय हेच तिला पटत नाही. मला आता काही काम होत नाही असं म्हणत तिचं काम चालू असे. वयाच्या साठीच्या दरम्यान तिने उत्तर भारत, दक्षिण भारत या यात्रा केल्या. त्यानंतर नेपाळ ट्रिप करून आपण परदेश प्रवासही करू शकतो असा तिला कॉन्फिडन्स आला. वयाच्या ७३ व्या वर्षी तिने दुबई ,अमेरिका या ट्रिप केल्या. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क सगळे बघून ती खुश झाली. तिचा स्वभाव अतिशय उत्साही,! नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असल्यामुळे ती सतत कार्यरत असे. विणकाम हे तर तिचे फार आवडते ! सगळ्या नातवंडांना,पंतवंडांना  स्वतःच्या हाताने विणून स्वेटर, टोपी ती बनवत असे. रोजचे वर्तमानपत्र पूर्ण वाचायची. चांगल्या पुस्तकाचे वाचनही तिचे बरेच होते. टीव्ही जागरुकतेने बघत असे. तिला काळाबरोबर सर्व गोष्टी माहीत असत. तिचे डोळे अजून चांगले होते. जगण्याची उमेद होती. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती चांगले आयुष्य जगली. आम्ही तर तिची शंभरी साजरी करू अशी  आशा करत होतो. परंतु ईश्वरी इच्छेपुढे  इलाज नसतो. तिला फारसा कोणताही  मोठा आजार नव्हता. तिचे खाणे पिणे अतिशय मोजके होते. त्यामुळे तिची तब्येतही ती राखून असे. आईच्या सहवासात चार दिवस राहावे या हेतूने मी आकुर्डीला गेले होते. भाऊ-वहिनींचाही मला राहण्यासाठी आग्रह होता. फारसे काहीही निमित्त न होता एके दिवशी

सकाळी माझ्याकडून तिने नाश्ता घेतला आणि गरम चहा पिण्यासाठी मागितला. तेच तिचे शेवटचे खाणे माझ्या हातून दिले गेले. दोन-तीन तासानंतर सहज म्हणून तिच्याजवळ गेले तेव्हा ती शांत झोपल्याप्रमाणे

दिसली, पण नुकताच तिचा देहांत झाला होता ! इतकं शांत मरण तिला आले ! आजही तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि आईची तीव्रतेने आठवण येते. ती उणीव भरून येत नाही 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाग – श्री समर्थ  रामदास ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ बाग – श्री समर्थ  रामदास ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ‘बाग’ प्रकरण अवश्य वाचावे या प्रकरणात समर्थांनी तब्बल २९५ झाडांची नावे सांगितली आहेत.  एका संताचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास आज आपल्याला थक्क करून सोडणारा आहे.  

 

प्रसंग निघाला स्वभावें । 

बागेमध्ये काय लावावे ।

म्हणूनि घेतली नावे । 

काही एक ॥

 

कांटी रामकांटी फुलेकांटी । 

नेपती सहमुळी कारमाटी ।

सावी चीलारी सागरगोटी । 

हिंवर खैर खरमाटी ॥

 

पांढरफळी करवंदी तरटी ।

आळवी तोरणी चिंचोरटी ।

सिकेकाई वाकेरी घोंटी । 

करंज विळस समुद्रशोक ॥

 

अव्हाटी बोराटी हिंगणबेटी ।

विकळी टांकळी वाघांटी ।

शेर निवडुंग कारवेटी । 

कांटेशेवरी पांगेरे ॥

 

निरगुडी येरंड शेवरी । 

कासवेद कासळी पेरारी ।

तरवड उन्हाळ्या कुसरी । 

शिबी तिव्हा अंबोटी ॥

 

कांतुती काचकुहिरी सराटी ।

उतरणी गुळवेल चित्रकुटी ।

कडोची काटली गोमाटी । 

घोळ घुगरी विरभोटी ॥

 

भोंस बरु वाळा मोळा । 

ऊंस कास देवनळा ।

लव्हे पानि पारोस पिंपळा । 

गुंज कोळसरे देवपाळा ॥

 

वेत कळकी चिवारी । 

ताड माड पायरी पिंपरी ।

उंबरी अंबरी गंभिरी । 

अडुळसा मोही भोपळी ॥

 

साव सिसवे सिरस कुड । 

कोळ कुंभा धावडा मोड ।

काळकुडा भुता बोकडा । 

कुरंडी हिरंडी लोखंडी ॥

 

विहाळ गिळी टेंभुरणी । 

अवीट एणके सोरकिन्ही ।

घोळी दालचिनी । 

कबाबचीनी जे ॥

 

निंबारे गोडे निंब । 

नाना महावृक्ष तळंब ।

गोरक्षचिंच लातंब । 

परोपरीची ॥

 

गोधनी शेलवंटी भोंकरी । 

मोहो बिब्बा रायबोरी ।

बेल फणस जांब भरी । 

चिंच अंबसोल अंबाडे ॥

 

चांफे चंदन रातांजन । 

पतंग मैलागर कांचन ।

पोपये खलेले खपान । 

वट पिंपळ उंबर ॥

 

आंबे निंबे साखरनिंबे । 

रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।

तुरडे विडे नारिंगे । 

शेवे कविट अंजीर सीताफळे ॥

 

जांब अननस देवदार । 

सुरमे खासे मंदार ।

पांढरे जंगली लाल ।

पुरे उद्वे चित्रकी ॥

 

केळी नारळी पोफळी । 

आवळी रायआवळी जांभळी ।

कुणकी गुगुळी सालफळी ।

वेलफळी माहाळुंगी ॥

 

भुईचांफे नागचांफे मोगरे ।

पारिजातक बटमोगरे ।

शंखासुर काळे मोगरे ।

सोनतरवड सोनफुले ॥

 

जाई सखजाई पीतजाई । 

त्रिविध शेवंती मालती जुई ।

पाडळी बकुळी अबई । 

नेवाळी केतकी चमेली ॥

 

सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी ।

जास्वनी हनुमंतजास्वनी ।

केशर कुसुंबी कमळिणी । 

बहुरंग निळायाति ॥

 

तुळसी काळी त्रिसेंदरी । 

त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।

गुलखत निगुलचिन कनेरी ।

नानाविध मखमाली ॥

 

काळा वाळा मरुवा नाना । 

कचोरे गवले दवणा ।

पाच राजगिरे नाना । 

हळदी करडी गुलटोप ॥

 

वांगी चाकवत मेथी पोकळा ।

माठ शेपु खोळ बसळा ।

चवळी चुका वेल सबळा ।

अंबुजिरे मोहरी ॥

 

कांदे मोळकांदे माईणमुळे ।

लसूण आलें रताळें ।

कांचन कारिजे माठमुळे । 

सुरण गाजरें ॥

 

भोंपळे नाना प्रकारचे । 

लहानथोर पत्रवेलीचे ।

गळ्याचे पेढ्या सांगडीचे । 

वक्र वर्तुळ लंबायमान ॥

 

गंगाफळ काशीफळे क्षीरसागर ।

सुगरवे सिंगाडे देवडांगर ।

दुधे गंगारूढे प्रकार । 

किनऱ्या रुद्रविण्याचे ॥

 

वाळक्या कांकड्या चिवड्या ।

कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।

खरबूजा तरबुजा कलंगड्या ।

द्राक्षी मिरवेली पानवेली ॥

 

दोडक्या पारोशा पडवळ्या ।

चवळ्या कारल्या तोंडल्या ।

घेवड्या कुही-या खरमुळ्या ।

वेली अळूचमकोरे ॥

 

अठराभार वनस्पती । 

नामे सांगावी किती ।

अल्प बोलिलो श्रोतीं । 

क्षमा केली पाहिजे ॥

 

– श्री समर्थ रामदास स्वामी

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  समाधान…  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे….

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे….

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत…

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे….

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत….

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत…

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत….

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

दोन गोड लेकी आहेत,

त्यांच्या क्षेत्रात व्यग्र आहेत,

नित्य आमच्या मनात आहेत,

इतके मला पुरेसे आहे…!!

 

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे…

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा….

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे…

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !        

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

चंद्र आणखी भारत यांचे,

गुण जुळले छत्तीस!

देव काढतो मुहूर्त त्याचा,

आज दोन पस्तीस!

 

अग्नीपिसारा फुलवित घेईल,

झेप अंतराळात!

आणिक त्याचा धूर खुशीचा,

भरे अंतरंगात!

 

त्रिदेव आता आतुरलेले,

करावया रक्षा!

भेदतील ते सहजपणाने,

पृथ्वीची कक्षा!

 

भारतभूच्या शास्त्रज्ञांची,

मनिषा दुर्दम्य!

दोन वाजूनी पस्तीस होता,

दृश्य दिसे रम्य!

 

रामही म्हणती,”पुष्पकाहुनी,

यान मला हे हवे!

प्राणच होती जिथे शुभेच्छा,

शब्द कशाला नवे!

 

अभिमान वा गर्व वगैरे,

मिळमिळीत वाटे!

आणि उरातून राष्ट्र प्रितीचा,

माज फार दाटे!

 

प्रेयसीचीही वाट मुळी ना,

अशी पाहिली कधी!

उसळी घेतो उरात माझ्या,

फेसाळुन जलधी!

 

काऊंटडाऊन सहन होईना,

जीव होई कापूर!

उत्सुकता तर स्वतःच झाली,

मरणाची आतूर!

 

चंद्र पहातो वाट कधीची,

वेशीवर येऊन!

आणि चांदणे मऊ मखमली,

ओंजळीत घेऊन!

 

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : बिंदूसरोवर 

लेखक : राजेंद्र खेर.

प्रकाशक : विहंग प्रकाशन, पुणे. 

पृष्ठसंख्या : २०७.  

काही योग हे विलक्षण आश्चर्यकारक असतात. ध्यानीमनी नसताना एखाद्या पुस्तकाची आपण निवड करणं आणि त्या पुस्तकाने आपल्याला झपाटून टाकणं इतकं की जणू आता तेच आवश्यक होतं असं वाटण्याएवढं… मला वाटतं अशावेळी ते पुस्तक वाचन घडणं ही गोष्ट सहज घडलेली नसून ती नियतीचा एखादा भाग असते‌. 

‘बिंदूसरोवर’ हे राजेंद्र खेर यांच्या पुस्तकाचं वाचन हा असाच एक योग…  वाचनालयात जाताना डोक्यात गंभीर, विचारप्रवर्तक असं पुस्तक न घेता, आता एखादं विनोदी हलकंफुलकं असं पुस्तक घ्यावं असा होता. पण तोंडून अचानक राजेंद्र खेर यांचं नाव बाहेर पडलं. तेव्हा हे पुस्तक समोर आलं. वाचून तर बघूया या भावनेतून हे पुस्तक घेऊन मी घरी आले आणि त्या पुस्तकानं मला वाचता वाचता झपाटून टाकलं. आपल्याला आत्ता हे नाव का सुचलं आणि आपण आत्ता अशा स्वरूपाचं पुस्तक का वाचत आहोत हा प्रश्न मला मी ते पुस्तक वाचेस्तोवर पडलेला होता. पण जसं जसं मी ते पुस्तक वाचत गेले तसं मला जाणवलं की आत्ता माझ्या मनाला, विचारांना ज्या प्रकारचं वाचन किंवा बौद्धिक खाद्य हवं होतं, ते हेच पुस्तक देऊ शकतं. आणि उलट आश्चर्य वाटलं की २००८ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजपर्यंत आपण का वाचली नाही? 

संपूर्णतः काल्पनिक म्हणावी अशी (अर्थात प्रत्येक कल्पनेची नाळ ही कुठेतरी, कधी ना कधीतरी वास्तवाशी जोडलेली असतेच) ‘बिंदूसरोवर’ ही कादंबरी भारतीय अध्यात्माचं विलोभनीय रूप दाखवते. आणि गंमत म्हणजे कादंबरीचा कालखंड हा २०२५ सालचा घेतलेला आहे. २००८ साली कादंबरी लिहिताना सतरा वर्षानंतर काय परिस्थिती असेल असा विचार करून यात लेखन केलेलं आहे, याचं मला नवल वाटलं. अर्थात सतरा वर्ष हा काळ संख्येच्या दृष्टीने पाहता फार मोठा नाही. पण वैज्ञानिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून आजच्या वेगवान गतीच्या सापेक्ष नक्कीच महत्त्वाचा आहे. तरीही या ‘सतरा’ च संख्येमागे अजून काही कारण असेल का हा विचार मात्र मनात सतत डोकावतो आहे. माझ्यामते याचं उत्तर लेखकच देऊ शकेल. 

सबंध जगाला अध्यात्माच्या मार्गाने उन्नत मानवी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भारतीय संस्कृतीचा कालसुसंगत उत्तम परिचय करून देणारी ही कादंबरी… या कादंबरीत बिंदूसरोवर हे एक अध्यात्मातील उच्च अनुभूती देणारं महत्त्वाचं, पवित्र, अजेय असं ठिकाण असून, त्याचा मुक्ती या संकल्पनेशी घनिष्ठ संबंध आहे. आजकाल मुक्ती वगैरे थोतांड असून मुळात अध्यात्मातल्या अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत, त्या माणसांमध्ये तेढ, श्रेष्ठ-कनिष्ठ भेद निर्माण करतात असं जोरदारपणे सांगितलं जातं. त्यावर सकस भाष्य करणारं हे कथानक आहे. 

यात अत्यंत भिन्न परिस्थितीत असलेल्या चार व्यक्ती या बिंदूसरोवराचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या सरोवरापाशी पोहोचण्याची आणि आपलं नियोजित कर्तव्य पूर्ण करण्याची ओढ लागलेली असते. फक्त तिलाच या बिंदूसरोवराची महती माहीत असते. पण योगायोगाने काही व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात आणि झपाटल्यासारख्या तिच्याबरोबर या प्रवासात सहभागी होतात. अनेक प्रसंग जीवावर बेतणारे असूनसुद्धा आणि यातून आपल्याला नक्की काय लाभ होणार आहे? हे माहीत नसूनसुद्धा त्या व्यक्ती कसल्या तरी अनामिक ओढीने या सबंध प्रवासात एकत्र राहतात. 

विश्वातल्या मुक्तीच्या प्राप्तीसाठीची तीन महत्त्वाची द्वारं …  वस्तुनिष्ठ, मनोनिष्ठ आणि आत्मनिष्ठ ..  याबाबत फार सुंदर उहापोह यात केला आहे. थेट उल्लेख नसला तरी स्वर्ग, नरक या कल्पना, तसंच पृथ्वीप्रमाणे इतरही विश्व असण्याची कल्पना यात सांगितलेली आहे. काही ठिकाणी पुराणातील घटनांचा आधार घेत या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 

या सगळ्यांच्या मुळाशी मानवाची पूर्ण सृष्टीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववृत्ती ही किती संहारक असू शकते आणि ती दिवसेंदिवस किती बळावत चालली आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं. 

सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या आपल्यासारख्या या चार व्यक्तींचा बिंदूसरोवरापर्यंतचा उत्कंठावर्धक, रहस्यमय आणि थरारक प्रवास हा अत्यंत वाचनीय तर आहेच. पण त्याहीपेक्षा तो जास्त विचार प्रवर्तक आहे. आणि म्हणूनच सत्य आणि असत्याच्या सीमारेषेवर उभे असलेले हे कथानक वास्तव असावे असा मोह पडणारे आहे.

अज्ञानातून… ज्ञानाकडे 

ज्ञानातून… आत्मज्ञानाकडे

विकारातून… विचाराकडे 

आणि 

अस्विकृतीतून… स्वीकृतीकडे नेणारा हा विचारप्रवाह खरोखरच पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. 

***

एक उत्तम विचार, काल्पनिक आणि एकदम वेगळ्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक राजेंद्र खेर यांचे मनापासून आभार ! 

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print