कालची पहाट उगवली, ती अतिशय दु:खद बातमी घेऊन. आपल्या अमोघ वाणीने शिवशाहीचे साक्षात दर्शन घडवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चाहत्यांना वाटत होते, बाबासाहेब नाबाद सेंच्युरी पूर्ण करून पूढील वाटचाल सुरू करणार, पण ईश्वरेच्छा बलीयसी हेच खरं!’शिवचरितराच्या रूपाने घराघरात पोचलेल्या बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२चा. बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारने २०१५ मधे ‘महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले. ‘जाणता राजा’ या महानाट्याने त्यांना जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. शंभरीठी त्यांच्या वाणीतला जोश आणि उत्साह कायम होता. ई- अभिव्यक्तीचे लेखक श्री. प्रमोद वर्तक यांनी सार्थपणे म्हंटले आहे,
रडू कसळले गड किल्ल्यांना, हरपला तारणहार तयांचा
आज सर्वां सोडून गेला, कर्ता धर्ता शिवचरित्राचा.
तो शिवशाहीर स्वर्गी गेला, राजांचरणी सेवेस रुजू झाला.
शिवशाहीरांच्या निधनाने, इतिहास पोरका झाला.
या शिवशाहीरांच्या स्मृतीस आज विनम्र अभिवादन.?
☆☆☆☆☆
१६ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे जन्मलेले डॉ. निर्मलकुमार फडकुले जसे संतसाहित्याचे आभासक होते, तसेच ते परिवर्तनवादी विचारसरणीचे अध्वर्यू होते. ते ललित लेखक होते आणि समीक्षकही होते. ते उत्तम वक्ते होते. त्यांच्या वक्तृत्वाला एक वेगळाच डौल होता. त्यांच्या व्याख्यानात चिंतनशीलता, वैचारिकता आणि सौंदर्य यांचा सुरेख मेळ होता. त्यांचे वडील पंडीत जीनशास्त्री, हे सस्कृत भाषेचे मोठे विद्वान होते.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा ‘लोकहितवादी : काल आणि कर्तृत्व’ हा संशोधनाचा प्रबंध होता. नांदेड आणि नंतर सोलापूरयेथील संगमेश्वर कोलेज येथे त्यांनी अध्यापन केले. त्यांनी ललित लेखन केले, त्याचप्रमाणे संतसाहित्यावरही विपुल लेखन केले.
अमृतकण कोवळे , अश्रूंची कहाणी,आनंदाची डहाळी, कल्लोळ अमृताचे, काही रंग काही रेषा, चिंतनावच्या वाटा , परिवर्तनाची चळवळ, मन पाखरू पाखरू, , संतकवी तुकाराम: एक चिंतन, संत साहित्य आणि समकालीन संतांच्या रचना, संत साहित्य: सौंदर्य आणि सामर्थ्य, साहित्यातील प्रकाशधारा, सुखाचा परिमळ,हिरव्या वाटा इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांची स्वतंत्र अशी २८ पुस्तके आहेत व ११ पुस्तके त्यांनी संपादित केलीत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी आंबेडकर , कवी कुंजविहारी, ना.सी. फडके, प्र.के. अत्रे, म. फुले, सावरकर यांच्यावर दिलेली व्याख्यानेही लिखित स्वरुपात प्रकाशित आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना साहित्य समेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही अनेक वेळा मिळाला आहे. राष्ट्रीय बंधुता समाज साहित्य संमेलन, जैन साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन इ. साहित्य संमेलनानचे ते अध्यक्ष होते.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा, आचार्य कुंदकुंद, विद्यानंद साहित्य, प्रज्ञावंत, चरित्र चक्रवर्ती, भैरूरतन दामाणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण जीवनगौरवइ. पुरस्कार मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फेही २००७ पासून दरवर्षी साहित्य व समाजासेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.
राज्य मराठी विकास संस्थेचे ते काही काळ संचालक होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्यावर साहित्य: सामाजिक अनुबंध हा गौरव ग्रंथ तयार करण्यात आला आहे. सोलापूरयेथील एका सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
. . या महान लेखकाला आणि वक्त्याला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २.इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
भडिमार..!नकारात्मकता हाच स्थायिभाव असलेला एक शब्द.एखाद्या कृतीचा हानिकारक परिणाम अधोरेखित करणारा हा शब्द. कोणत्याही गोष्टीचा अविरत ओघ,सातत्याने घडणारी क्रिया, ऐकणाऱ्याला उसंत न देता भान हरपून ऐकवलं जाणारं बरंच कांही यापैकी कशातही नकारात्मकता असेल तर त्याचे अचूक वर्णन करायला ‘भडिमार’ या शब्दाला पर्याय नाहीच.पण याच प्रत्येक बाबतीत जर सकारात्मकता असेल,तर त्याचे चपखल वर्णन करायला मात्र जेव्हा ‘भडिमार’हा शब्द कुचकामी ठरतो आणि तेव्हा इतर अनेक सुंदर शब्द नेमके दिमतीला हजर होतात.
पाऊस पडण्याची एक साधी घटना.ऊन-पावसाच्या खेळातल्या हलक्या सरी असतील तर तो पाऊस ‘रिमझीम’ पाऊस असतो. जीवघेण्या कडक उन्हाने तावून सुलाखून निघालेल्या धरणीला सुखावणारा आणि त्रस्त जीवाला शांतवणारा पाऊस अथक जोरदार पडणारा असला तरी तो पावसाचा भडिमार नसतो तर ‘वर्षाव’ असतो.पण तोच पाऊस जर जगणं उध्वस्त करणारा, जीव नकोसा करणारा,जोरदार वाऱ्याच्या साथीनं तांडव करीत प्रचंड झाडांनाही उपटून फेकून देत घरांची छपरं उडवीत भिंती उध्वस्त करणारा असेल तर मात्र तो पाऊस टपोऱ्या थेंबांचा भडिमार करणारा विध्वंसकच असतो.
मुलांना प्रेमानं समजून सांगत त्यांना योग्य वळण लावणं आणि धाक दाखवून त्याना सक्तीने शिस्त लावू पहाणं यात उद्देश एकच असतो पण त्यांचे परिणाम मात्र परस्परविरोधी..!प्रेमाने समजावणं मुलांना आश्वस्त करत योग्य मार्ग दाखवणारं असतं तर धाक दाखवणारा शब्दांचा भडिमार मुलांच्या मनात भिती तरी निर्माण करतो नाहीतर तिरस्कार तरी.
परस्परांना समजून घेत सामंजस्याने एक पाऊल मागे घेण्याची तयारी साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंदाचा खजिना खुला करते,तर मी म्हणेन तीच पूर्वदिशा हा हेकेखोरपणा कर्कश्श बोचऱ्या शब्दांचा भडिमार करीत नात्यांची वीण उसवत असतो.
भडिमाराची अनेक रुपे असतात. भडिमार प्रश्नांचा असतो,अपशब्दी शिव्यांचा असतो,कडवट डोस वाटावेत अशा उपदेशांचा असतो,अनाहूत सल्ल्यांचा असतो,आग्रही जाहिरातींचा असतो, कोणत्याही निवडणूकांच्या बाजारातल्या खोट्या आश्वासनांचाही असतो.जिथं जिथं ज्या ज्या रुपात तो असतो,त्यात नकारात्मकताच ठासून भरलेली दिसेल.सकारात्मकता असेल तिथे भडिमार असूच शकत नाही. उत्स्फुर्त प्रतिसादाचं प्रतिक म्हणून वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचा प्रचंड ‘कडकडाट’ असतो.भडिमार नव्हे.एखाद्या चमकदार यशाबद्दल चारही दिशेने होत असतो तो कौतुकाचा वर्षाव असतो, कौतुकाचा भडिमार नव्हे.उत्स्फुर्त प्रतिसाद,कौतुकाचा वर्षाव,यात असा प्रसन्नतेचा उत्साहवर्धक प्रकाश असतो आणि भडिमाराच्या अंगांगात मात्र अंधाऱ्या नकात्मकतेच्या कृष्णाछायाच..!!
एका लग्नाला गेलो होतो. बायकोकडच्या नातलगांकडचं लग्न होतं. तिच्या माहेरच्यांकडे जाताना मी साधे कपडे घातले तर ते तिला चालत नाही. ती मला चांगलेचुंगले कपडे घालून नटवून नेते. तस्मात तिच्याबरोबर लग्नाला जाताना मी शेरवानी परिधान केली होती.
कार्यालयात प्रवेश केल्यावर दारातल्या मुलीने कागदाची सुबक पुडी दिली. पुडीत अक्षता होत्या. मी पुडी उघडली, अक्षता हातात घेतल्या आणि माझ्या व बायकोच्या पुडीचे कागद खिशात कोंबले. मंगलाष्टके संपली. चारसहा मुली उपस्थितांना पेढे वाटू लागल्या. आम्ही पेढे तोंडात टाकले आणि वरचे कागद मी खिशात कोंबले. सर्वजण माझ्यासारखे नव्हते. वधूवरांचे अभिनंदन करायला आम्ही स्टेजकडे निघालो. वाटेत सर्वत्र पायांखाली अक्षता आणि पेढ्यांच्या कागदाचे कपटे पडलेले होते. तेवढ्यात माईकवरून घोषणा झाली – “ उपस्थितांना उभय परिवारांतर्फे नम्र विनंती– भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. दुसरी महत्त्वाची विनंती— सर्वांनी कृपया आपापल्या जवळील अक्षतांचे आणि पेढ्यांच्या पुड्यांचे कागद जपून ठेवावेत. त्या कागदांवर नंबर छापलेले आहेत. पाचच मिनिटात त्यातून तीन लकी नंबर्स काढून त्यांना वधूवरांतर्फे खास पारितोषिके दिली जाणार आहेत.”—
ही घोषणा ऐकल्यावर तुंबळ धुमश्चक्री उडाली. आपापल्या तुंदिलतनू आणि त्यावर ल्यालेले जडशीळ पोषाख सावरीत अनेकजण-अनेकजणी खाली वाकण्याचे आणि जमिनीवर दिसतील ते कागद उचलण्याचे प्रयास करू लागले-लागल्या. थोडा वेळ गोंधळ झाला. पण लवकरच हॉल बऱ्यापैकी स्वच्छ झाला. पाच मिनिटांनी माईकवरून लकी नंबर्स घोषित झाले. आणि अहो आश्चर्यम्— माझ्या खिशातल्या नंबरला पहिला पुरस्कार मिळाला होता. माझा आनंद फार टिकला नाही. पहिला पुरस्कार म्हणून साडी मिळाली होती. ती बायकोने बळकावली. घरी आल्यावर आमचा संवाद झडला.
“कागद खाली न टाकता खिशात ठेवायची माझी सवय कामी आली.”
“माझ्या माहेरच्या माणसांनी ही अभिनव कल्पना राबवली आणि पाहुण्यांकडून हॉल स्वच्छ करून घेतला. त्याचं तुम्हाला कौतुकच नाही.”
“तुझ्या भावाला विचार. ही सगळी आयडिया त्याला मीच सुचवली होती. पेढा खाल्ल्यावर मी लगेच त्याला कागदावरचा नंबर एसएमएस केला होता. म्हणून तुला साडी मिळाली.”
“अच्छा. म्हणजे ही साडी दादाने दिली आहे मला. आता तुम्ही मला एक साडी घ्या. बरेच दिवस झाले, घेतली नाही.”
मी कपाळावर हात मारून घेतला.
☕?☕
प्रस्तुती :- संग्राहिका मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
लिगो म्हणजे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.
जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढानागनाथ इथे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पना ही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी.ए.ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षापासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठ प्रोजेक्ट करत आहे इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनाला कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
लिगो म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕवीटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी ) समजून घ्यावी लागेल. विश्वात अश्या अनेक घटना घडत असतात की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडे ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालन उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की जेव्हा वैश्विक घटना, म्हणजे कृष्णविवरांच (Black Holes) मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अश्या घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांना आदळतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं .
पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकी प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणे कठीण आहे. कारण ह्या तरंगामुळे पृथ्वीचं होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघ्या एका फोटोन च्या आकाराचे असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमता ही त्या उलथापालथी वर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अश्या गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात त्या म्हणजे, दोन कृष्णविवरांच मिलन, दोन न्युट्रॉन ताऱ्यांचं एकमेकाभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अश्या घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हंटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणे आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटोनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान सतत पुढे जात आहे, त्यामुळे आत्ता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत, नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली ह्याबद्दल सांगू शकतो.
२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही गुरुत्वीय लहर १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितले आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचे योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपले योगदान दिले आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते, तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की अस लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा, जश्या ( DAE,TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.) ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे.
आईनस्टाईनने बघितलेले आणि अभ्यासलेले स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचे स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे “ लिगो “चे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम.
–– श्री विनीत वर्तक
(माहिती स्त्रोत :- गुगल, नासा)
संग्राहक :- मंजुषा सुनीत मुळे ।
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…!
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!
जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो. मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!
? श्री स्वामी समर्थ ?
सग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈