श्री सुहास रघुनाथ पंडित
संक्षिप्त परिचय
सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी. कथा, ललित, प्रासंगिक लेखन, पुस्तक परिचय. कविता विशेष आवडीचा विषय.सा.सकाळ, जत्रा, दिवाळी अंक यात लेख, कथा, कविता प्रकाशित. लोकमान्य वाचनालय, मालाड, व संस्कार भारती ठाणे यांचे काव्य पुरस्कार. साहित्य कलायात्री प्रकाशन, पुणे यांचा काव्ययात्री पुरस्कार. ‘शब्द माझ्या सोबतीला’ हा पहिला कविता संग्रह 2017 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्याला तीन पुरस्कार मिळाले आहेत. ते असे.:
1 अग्रणी साहित्य पुरस्कार, देशिंग, जि. सांगली
2 दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा प्रथम प्रकाशन पुरस्कार
3 महाराष्ट्र साहित्य परिषद, पलूस, जि. सांगली व ग्रामीण साहित्य परिषद, पलूस यांचा काव्यरत्न पुरस्कार.
अखिल भारतीय तसेच अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनात काव्यवाचन, परिसंवादात सहभाग.
मो – 9421225491
ईमेल – [email protected]
☆ कवितेचा उत्सव : इंद्रधनुस – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
इंद्राचे धनु म्हणून तुजला मान लाभला जरी
रंग रुपाचे वैभव तुजला क्षणभरअसते परी.
काळ्या माझ्या रंगावरती जाऊ नको तू असा
रंगांची मी उधळण करिते विचार तू पावसा.
फळे,फुले अन् पानोपानी खुलून येती रंग
रूप पाहूनी माझे तूही गगनी होशील दंग.
खजील होऊन लपशी का तू मेघांच्या मागे
वैभव माझे चिरंजीव हे वर्षा ॠतूच्या संगे.
धरणीमाता म्हणती मजला एक तुला सांगते
क्षणभर मोहीत करणे म्हणजे जगणे नसते.
© श्री सुहास रघुनाथ पंडित, सम्पादक ई-अभिव्यक्ति (मराठी)
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491