मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #119 – इवलीशी पणती ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 119 – इवलीशी पणती ☆

इवलीशी पणती

वाइवलीशी पणती-यावर डुलते

अंधाराशी कशी

एकटीच भांडते…?

 

अंधाराशी तिचं

मुळीच पटत नाही

एकटीच असते

तरी घाबरत नाही..!

 

तिची ही धडपड

खूप काही शिकवते

उजेडाने तिच्या

अंधाराला पळवते…!

 

तिच्यासारखं मला

धीट व्हायला हवं

तिच्यासारखं जिद्दीने

जगता यायला हवं…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वास्तव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ 📌वास्तव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

अनेक मरणे बघुन सुद्धा

अजुन आहे जगतो मी

कर्म भोग तो कुणास चुकला

त्यासाठी तर उरलो मी

       

अस्तीत्वा च्या साठीच केवळ

कितीक लढाया लढलो मी

कपटजाल ते मला न कळ ले

स्वकियांकडूनच हरलो मी

 

नाते गोते माया ममता

या साठी किती झुरलो मी

खस्ता खाऊन जीर्ण होऊनी

वस्त्रासम   जणु विरलो मी

 

सुख स्वप्नांची झाली शकले

जोडीत तुकडे फिरलो मी

वेड्यापरी या निळ्या नभाला

ठिगळे लावीत बसलो मी

 

ते तर केवळ मृगजळ होते

शोधीत ज्याला फिरलो मी

वास्तव म्हणजे ज्वलंत विस्तव

इतुके नक्कीच शिकलो मी

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 143 ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 143 ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सांज झाली, संपली की प्रार्थना

एवढे  आता  तरी  तू   ऐकना

 

नाखवा नाही कुणीही सोबती

जीवनाची नाव ही चालेचना

 

पैलतीरा पोचण्याची आस रे

 सागरा आहेस तू आथांग ना

 

 वादळी वाटा कशा मी आक्रमू

तोल जातो चालताना मोहना

 

तार तू वा मार आता या क्षणी

तूच आहे संगती ही भावना

 

ईश्वरा आहेस तू सर्वात्मका

शेवटाची हीच रे आराधना

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतूचक्र… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ऋतूचक्र… ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

पाने सुवर्ण होऊन

तरुतळी विसवली

वर हासतात फुले

रत्नझळाळी ल्यालेली

 

आज हसतात फुले

उद्या माती चुंबतील

हसू शाश्वताचं त्यांचं

रस फळांचा होईल.

 

रस जोजवेल बीज

बीज तरु अंकुरेल

पाना फुलांचा सांभार

वृक्ष समर्थ पेलेल.

 

पुन्हा झडतील पाने

फुले मातीत जातील

फळ जोजावेल बीज

बीज वृक्ष प्रसवेल.

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #148 ☆ स्वाद त्याचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 148 ?

☆ फांदीवरचा काटा…

कळी उमलली गुलाब थोडा फुलला होता

तारुण्याच्या भाराने तो कलला होता

 

मला भावला रंग गुलाबी सौंदर्याचा

तोच रंग मग डोळ्यानेही टिपला होता

 

गुलाब पाहुन सुचल्या होत्या दोनच ओळी

त्या ओळींचा छानच झाला मतला होता

 

गजलेने या कौतुक केले जसे सखीचे

केसामधला गुलाब तेव्हा खुलला होता

 

स्वागत करण्या हात जरासे पुढे धावले

फांदीवरचा काटा तेव्हा डसला होता

 

प्रतिभेच्या ह्या किती पाकळ्या तुझ्या भोवती

त्या प्रतिभेने गुलाब केवळ नटला होता

 

तुझा भास अन् समोर नव्हते कोणी माझ्या

सुगंधात त्या तुझा चेहरा लपला होता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ सुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आषाढ सुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

ऊधळावा अबीर  गगनातला बुका

गजर  ज्ञान-तुका   पावसातली वारी.

आषाढाचे अभंग  टाळ-चिपळी वारा

वृक्ष-वल्लरी दारा  सृष्टीशृंगारे न्यारी.

भक्त-थोर सकळ  पामराचे अंगण

वाखरिचे रिंगण  स्वर्गापरी पंढरी.

हसू आनंदी मुखी  चंद्रभागा ऊजळे

पाप कर्माचे ढळे  पवित्र निरभावे.

ऐसा सुखाचा योग  पाही विठ्ठले डोळा

सारे पाहुनी भोळा  चैतन्याचा पुतळा.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 90 ☆ एक छत्री… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 90 ? 

☆ एक छत्री… ☆

एका छत्रीत येण्यासाठी

एकच छत्री असावी लागते

एका छत्रीत येण्यासाठी

प्रियेसी असावी लागते.!!

 

एका छत्रीत येण्यासाठी

पाऊस असावा लागतो

एका छत्रीत येण्यासाठी

बहाणा करावा लागतो.!!

 

एका छत्रीत येण्यासाठी

कळ सोसावी लागते

एका छत्रीत येण्यासाठी

तयारी ही करावी लागते.!!

 

असे हे छत्री पुराण

असे हे जवळ येणे

आपल्या व्यक्तीसाठी

कुठेही धावून जाणे..!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

? मनमंजुषेतून ?

☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

माझं असं का होत माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

घरात प्रचंड पसारा असतो त्याचवेळी सगळे येतात,

फर्निचरच्या धुळीवरून हळूच एक बोट फिरवतात !

मी मनात खजील, तर ते गालातल्या गालात हसत असतात,

बाई फारच आळशी म्हणून चक्क एक शेरा ठोकतात !

घर टकाटक आवरल्यावर कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

दिवसभराच्या कामानं मीही दमलेली असते !

रात्री फक्त खिचडी हीही ठरलेली असते !

किचनचा लाइट off  करणार, तेवढ्यात बेल जोरात वाजते,

surprise म्हणून पाहूणे येतात, खिचडीला पाहून नाके मुरडतात,

चार पदार्थ वेगळे असतात तेव्हा कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असच होत पण उत्तर काही मिळत नाही !

 

कधीतरी माझ्या हातात चार पैसे खुळखुळत असतात,

लक्ष्मी रोडवरचे dress आता मला बोलवायला लागतात,

त्यांच्या हाकेला ओ देऊन मी लगेच पुण्याला जाते,

नेमके त्याच वेळी सेल संपून हाय प्राइस लागते !

matching आणि size चे ही गणित का जुळत नाही,

माझं असं कां होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

गणिताचाच पेपर माझ्या स्वप्नात येतो,

पेपर चालू झाला पण मला उशीर झालेला असतो,

मायनस झिरो मार्क मला दिसायला लागतात,

भीतीने लटपट पाय कापायला लागतात !

स्वप्नात तरी मी विद्यापीठात पहिली का येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

नेहमीच मी ठरवते जरा कमी बोलायचं,

स्वतःचीच टकळी लावण्याआधी दुसऱ्याचं थोडं ऐकून घ्यायचं !

परदेशातून मावशी आली, मी माझीच cassette लावली,

Backlog भरून काढण्यासाठी मी बडबड चालू केली !

मौनाचं महत्त्व माझ्यासाठी का applicable होत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं ,दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

आत्ताच मी ठरवलं मुद्दाम काही लिहायचं नाही,

ओढून ताणून शब्द जुळवून कविता त्याला म्हणायचं नाही !

कुणीही काहीही म्हटले तरी कवयित्री अशी होत नसते,

आपलीच फजिती इतरांना सांगून पाठ आपली थोपटायची नसते !

तरीही मी लिहायचं कधी सोडत नाही,

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही……।।

 

– श्री सुहास आपटे. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२८.

    पायातला साखळदंड अवजड असतो.

    तो तोडायचा प्रयत्न मी करतो.

    तेव्हा ह्रदयात कालवाकालव होते.

 

    मला स्वातंत्र्य हवं पण त्याची हाव धरणं

    मला लाजिरवाणं वाटतं.

 

    हे माझ्या मित्रा, तुझ्याकडे अमाप संपत्ती आहे.

    पण माझ्या दालनातला पातळ पडदा

    दूर करण्याचं बळ माझ्यात नाही.

 

    धूळ आणि मृत्यू

    यांचं आवरण असलेलं हे वस्त्र-

    याचा मला तिरस्कार असला तरी प्रेमानं

    मी ते लपेटून घेतलंय.

 

    माझ्यावर कर्जाचा बोजा असून

    मी अंध: पतित आहे.

    माझी लज्जा बोजड पण लपलेली आहे.

   पण माझ्या उध्दाराची प्रार्थना करताना

    मला भिती वाटते की

    माझी प्रार्थना मान्य करशील.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

विजेत वाजत ढगात गाजत

नाचत नाचत पाउस आला

भिरभिर भिरभिर वारा ओला

गंध मातिचा उधळत आला !

 

टपटप टपटप थेंब टपोरे

झरझर झरझर कौलारांवर

ढोल नि ताशा बडवत येती

धडधड  धारा अन् पत्र्यांवर !

 

चिंब तरुंवर चिंब पाखरे

फडफड फडफड पंख पसरती

निथळत निथळत दुजा पाखरां

पुन्हा एकदा चिंब भिजवती !

 

पहिलावहिला पाउस उत्कट

सहस्र हस्ते धरेस कवळी

अशा बरसती धो धो धारा

जन्मांतरिचे वणवे विझती !

 

सूंसूं सूंसूं सुसाट वारा

रानोरानी पानोपानी

रुद्रविणांच्या छेडित तारा

करीत गुंजन दरीदरितुनी !

 

खळखळ खळखळ झरे वाहती

वाहत वाहत वाटा जाती

जलथल जलथल जिकडे तिकडे

चराचरा ये अपार भरती !

 

गल्लोगल्ली पोरेसोरे

भिजती न्हाती ब्रह्मानंदी

नाचत थुइथुइ मोर वनीचे

जणु स्वच्छंदी छंदीफंदी !

 

भिजल्या भेगा भग्न भुईच्या

बळिराजाही सुखी होवु  दे

नष्टचर्य हे संपो , बाप्पा

दिवस सुगीचे पुन्हा येवु दे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares