कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 136 – विजय साहित्य
☆ आठवण श्रावणाची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आठवण श्रावणाची
व्रत वैकल्याचा नारा
सामावल्या अंतर्यामी,
हळवेल्या स्मृती धारा…!
आठवण श्रावणाची
आली माहेरवाशीण
जपलेल्या गंधमाळा,
रेशमाची घट्ट वीण…!
आठवण श्रावणाची
मोहरले तनमन.
बरसल्या जलधारा,
वेचताना क्षण क्षण…!
आठवण श्रावणाची
सजे मंगळा गवर
सय नाजूक साजूक
फुल पत्री शब्द सर…!
आठवण श्रावणाची
गौर श्रावणाची सजे
जिवतीचे शुक्रवार
औक्षणात मन भिजे…!
आठवण श्रावणाची
जणू कवितेचे पान
सणवार ओली शाई ,
देई जीवनाचे दान…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈