मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 161 ☆ मनमुक्ता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 161 ?

☆ मनमुक्ता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मुक्त मनोमनी झाले

तरी का गुंतते आहे

पुन्हा हे स्वप्न सांजेला

अवेळी साकारताहे

 

जरी ना नीज डोळ्यात

पहाटे लागतो डोळा

खरी होतात ही स्वप्ने

 सजे स्वप्नात पाचोळा

 

जरी ही तृप्तता आली

 स्वतःला सांगते आहे

कळेना कोणता रस्ता

आता धुंडाळते आहे

 

पसारे आवरावे की

करावी संन्यस्त भाषा

कशी मी शिस्त लावावी

अशा बेशिस्त आयुष्या

 

मनाच्या एकांत वेळा

हव्याशा वाटतानाही

कुणी का ओढते आहे

मला गर्दीत आताही

 

असे अस्तित्व इवले

जणू मुंगीच छोटीशी

भरारी घ्यायची आहे

अखेरी याच आकाशी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काळ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मागे काळ पुढे काळ

आयुष्याची रेषा भाळ

काळाचे विश्व बांधिल

विठ्ठल रुप वेल्हाळ.

 

जावे पंढरी एकदा

पहावे त्या पांडुरगा

भयही त्याच काळाला

महिमा चिपळी-टाळ.

 

किती भोग चैन-सुखे

अंतिम क्षणी संगती

चैत्यनाला विझवून

विधी सांगे सत्य काळ.

 

अदृश्याने नित्य सवे

तोच काया क्रीया जंत्री

काळ साम्राज्य अमर

विठ्ठल कृपा  आशाळ.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #167 ☆ निशा सांगते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 167 ?

☆ निशा सांगते… ☆

तेजोमय हा सूर्य नांदतो भाळावरती

ती लाली मग पसरु लागते ओठांवरती

 

श्वासासोबत तुझे नावही घेत राहते

नाव तुझे मी गोंदत नाही हातावरती

 

अंगावरती ऐन्याची ही चोळी आहे

तोच स्वतःला शोधत बसतो चोळीवरती

 

तरुण पणाला सांभाळाया दिला पदर पण

तोच पदर हा कसा भाळतो वाऱ्यावरती ?

 

निशा सांगते वेळ जाहली भेटायाची

नको उशी मज ठेविण डोके छातीवरती

 

अंधाराच्या गुहेत होतो रात्री दोघे

प्रभात काळी लाली दिसली गालावरती

 

फुले उमलली रात्रीमधुनी दरवळ सुटला

प्रसन्नतेचा भाव प्रगटला माळावरती

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

(Innovative Communication Skills of Gadgebaba.)

आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  …….

☆  वंदन दीपस्तंभाला … ☆

बाबांचा संवाद होता ,

संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;

भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,

संविधाननिर्मात्या बाबांशी |

पोटतिडीक होती,

वंचितांच्या शिक्षणाची;

विषमतेच्या चिखलात रुतलेल्या  –

माणसाच्या उत्थानाची |

घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा 

आणि माणसांच्या मनांच्या 

आंतरबाह्य स्वच्छतेचा; 

 बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!

— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —

गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६  हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात  जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.

गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—

कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.

पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.

समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.

गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.

नियतकालिकातून  केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन  ठायी ठायी दिसते. 

 अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत  आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.

संदर्भ — 

१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील. 

२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे. 

३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर. 

४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.

५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर. 

६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत. 

७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.

श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.🙏🏻

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत… श्री कौस्तुभ आजगावकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत… श्री कौस्तुभ आजगावकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

पावलांच्या सुलुसानुच आंगार शिर्शिरी

सळसळटा पदर मना देग भर्जरी

 

काकणांचे किणकिणीन् स्पंद कानसुलां

वाऱ्यान् तुज्या झट्टिं म्हजेर पार्दिका फुलां

 

स्वास तुजें वास जावन् सांसपितात आंग

मनां म्हज्यां लागतां तुज्यां गुमानितां थांग

 

सकाळफुडें आयलें जाल्यार आंगणिं फुलतां पात

सांजचें पावलें जाल्यार येतां चान्नें फाटोफाट

 

असवडींय फळटा म्हाका मोनी तुजी प्रीत

उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत

 

– बा. भ. बोरकर 

— तिच्या नुसत्या चाहुलीनेही मनात काव्य किती वेगवेगळ्या प्रकारे उमलत जातं त्याची ही कविता. 

 

— आणि हा भरड मराठी तर्जुमा आहे. काव्यानुभव नव्हे, तर फक्त अर्थानुभव. 

 

तुझ्या पावलांच्या चाहुलीनेच अंगावर गोड शिरशिरी येते

आणि पदराची सळसळ माझं मन भर्जरी करून जाते. 

 

(तुझ्या) काकणांची किणकिण ऐकूनच कानशिलं थरथरून उठतात 

आणि तुझ्या हलक्या वाऱ्यानेही प्राजक्ताची फुलं माझ्यावर बरसतात

 

तुझा श्वास सुगंध होऊन अंगाला लपेटून जातो  (सांसपितात = चाचपतात)

आणि तेव्हाच मनात तुझी ओळख पटते (?) 

 

सकाळी आलीस की अंगणात पात (सुगंधी हिरवं फूल) फुलते

संध्याकाळी आलीस की पाठोपाठ चांदणं अवतरतं …… 

 

… अशा तुझ्या या शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या प्रेमामुळे 

शब्दांत उतरायच्या आधीच कविता गाणं होऊन मनात अवतरते. 

 

लेखक : श्री कौस्तुभ आजगांवकर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

अल्प परिचय 

Mcom, ADCSSA .

 Hindustan Antibiotics Ltd ह्या Government Organisation मध्ये 26  वर्ष वित्त विभागात  कार्यरत. आता स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे.

कविता करणे,  वाचन करणे, भटकंती करणे आवडते.

संतांच्या कथा – एकादशी कथाकथन ह्या ग्रुप मध्ये संतांच्या कथा कथन. त्यातील संत सोहिरोबानाथ यांची कथा Radio 107.8 FM Puneri Awaj वर प्रसारित झाली आहे. 

सध्या  Kotak Life Advisor -Financial planner म्हणून कार्यरत .

 

? कवितेचा उत्सव ?

☆ मैत्री… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

मैत्री निखळ निर्झर झरणाऱ्या  खळखळीची

मैत्री निर्मळ मंद वार्‍याच्या  सळसळीची

 

मैत्री सुख आनंद,  मनातील बोलण्याच्या तळमळीची

मैत्री नुसता एक शब्द भरपूर मायेच्या सुख जळाची

 

मैत्री वर्षानुवर्षाची कधी नव्या नवलाईची

कधी भेटीची कधी ना भेटीची तरीही न विसरण्याची

 

मैत्री जिवाभावाची अन हसर्‍या रडवेल्या क्षणांची

मैत्री जोडणाऱ्या अखंडित धाग्याची

 

मैत्री नात्यांची बिन नात्यांच्या बहराची

खऱ्या खोट्या  बातांच्या पलीकडील मोजमापाची

 

क्षणात ईथे अन क्षणात तिथे मनात झुलण्याची

कधीही केव्हाही हाकेला साद घालण्याची

 

अशीच रहावी साथ कायमची

तुमच्या माझ्या मैत्रीची

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 109 ☆ ह्या मंतरलेल्या वाटा ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 109  ? 

☆ ह्या मंतरलेल्या वाटा… ☆

ह्या मंतरलेल्या वाटा

मज सदा भूलविती

माझे पाय अडखळती.!!

 

ह्या मंतरलेल्या वाटा

वेधक दिसती हसती

परी सदैव फसविती.!!

 

ह्या मंतरलेल्या वाटा

जीवनात अडसर होती

सर्व कामे राहून जाती.!!

 

ह्या मंतरलेल्या वाटा

पुढे क्षितिज दिसे नवे

मज सदैव हेच हवे.!!

 

ह्या मंतरलेल्या वाटा

अजून मज चालायचे आहे

राज सिद्ध करायचे आहे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 40 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 40 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

६९.

माझ्या धमन्यांमधून जो जीवनस्त्रोत वाहतो आहे

तोच अहोरात्र या विश्वातून वाहात असून

तालबद्ध नृत्य करतो आहे.

 

धरतीच्या मातीतून तो जीवनस्त्रोत

आनंद निर्भरतेनं अगणित तृणपात्यातून आणि आनंदानं नाचणाऱ्या फुलांच्या लहरीतून उमटतो .

 

जनन- मरणाच्या, सागराच्या भरती ओहोटीतून

तोच हेलकावे खात असतो.

 

जीवन – विश्वाच्या स्पर्शामुळं

माझी गात्रं दिव्य झाली.

 

या क्षणी युगांत जीवन स्पंदन

माझ्या अभियानातून नर्तन करत आहे.

 

७०.

या आनंदाच्या, तालाच्या भीषण भोवऱ्यात

फेकलं जाणं,नाहीसं होणं तुला अशक्य आहे का?

 

साऱ्याच गोष्टी धावतात, थांबत नाहीत.

मागे वळून पाहात नाहीत,

कोणाचीच सत्ता त्यांना रोखू शकत नाही,

त्या धावतच असतात.

 

त्या वेगवान व अस्थिर संगीताबरोबरच

ऋतू नाचत येतात, जातात.

निरंतर वाहणाऱ्या झऱ्यातून रंग, ध्वनी आणि

सुगंध यांचा आनंद पसरतो आणि नाहिसा होतो.

 

७१.

मी माझा अहंकार पुरवावा, तो मिरवावा,

तुझ्या तेजावर रंगीबेरंगी छाया फेकाव्यात-

ही सारी तुझीच माया.

 

तू स्वतःच्या अस्तित्वावर बंधनं घालतोस आणि

अगणित स्वरात स्वतःला विभागात राहतोस.

हे तुझं स्वतःचं अलगपण शरीररूपानं माझ्यात आलंय.

 

सर्वत्र आकाशात हे गान भरून राहिलंय.

त्यात किती रंगाचे आसू- हसू आशा नि धोके!

लाटा उठतात आणि विरतात.

स्वप्नं उमटतात आणि शिरतात.

माझा पराजय हा तुझाच पराजय आहे.

 

दिवस रात्रीच्या कुंचलानं अगणित चित्रं काढून

तू हा पडदा रंगवून सोडलास.

या पडद्यामागे तुझं आसन चितारलं आहेस,

त्यात निष्फळ, सरळ रेषा न वापरता

अद्भुतरम्य गोलाकार वळणांचा वापर केलास.

तुझा आणि माझा हा खेळ

सर्व आभाळात चालला आहे.

तुझ्या – माझ्या गीतानं सारं वातावरण

दुमदुमत आहे.

तुझ्या – माझ्या पाठशिवणीच्या या खेळात

लपंडावात किती युगं गेली?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू असताना… तू नसताना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तू असताना…तू नसताना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तू असताना फुले चांदणे

       तू नसताना मन हे दिवाणे

 

तू असताना पंख मनाला

       तू नसताना दुःख जीवाला

 

तू असताना स्वप्ने फुलती

       तू नसताना डोळे झुरती

 

तू असताना तुझेच गायन

       तू नसताना केवळ चिंतन

 

तू असताना नशा निराळी

       तू नसताना दशा विरागी

 

तू असताना मी नच उरतो

      तू नसताना कधीच सरतो.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाविन्याचा शोध… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ नाविन्याचा शोध… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

नाविन्याचा शोध

नाविन्याचा शोध घेत

दिशांताची वाट चालताना

पावलांना चिकटलेल्या

प्रदूषितांचे काय ?

तेच ते जुने धुलीकण

ठसठसणाऱ्या पावलांना

चिकटलेली दुर्गंधी

त्यांचीही वाट

दिशांताकडेच !

नाविन्यात मिसळण्यासाठी

ते ही आतुर….

आपल्याबरोबर…

त्यांचे काय ?

ते प्रथम ठरवावे लागेल

नंतरच नाविन्याचा शोध !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares