मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्नं ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

       – स्वप्ने इवली इवली

       – बाळमुठी सामावली….

       – स्पर्श होता माऊलीचा

       – खुले ओठांची पाकळी…

 

       – तारुण्याच्या लाटेवर

       – स्वप्नांचा झुलता पूल….

       – पंखांची जाणीव होता

       – पडे आभाळाची भूल….

 

        – ज्येष्ठपण येता येता

        – स्वप्नांनी ओंजळ भरली…

        – सत्याला सामोर जाता

        – जाग पापण्यांना आली….

 

         – स्वप्न॔ हिंदोला झुलता

         – झुले संगे माझे मनं…

         – अंधारल्या दुनियेत

         – एक दीप मी लावीन….

 

          – थकलेल्या पावलांच्या

          – उरी असे एक भाव….

          – क्षितिजाच्या वाटेवरी

          – भेटे मज  ‘ स्वप्नंगांव ‘

 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆  सुश्री शोभना आगाशे

☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆

निर्गुणाचे डहाळी।

पाळणा लाविला।

तेथे सुत पहुडला।

मुक्ताईचा॥

निज निज बाळा।

न करी पै आळी।

अनुहात टाळी।

वाजविते॥

तेथे निद्रा ना जागृती।

भोगी पै उन्मनी।

लक्ष तो भेदूनी।

निजवतो॥

निभ्रांत पाळी।

पाळणा विणुनि।

मन हे बांधुनि।

पवन दोरा॥

एकवीस सहस्र।

सहाशे वेळा बाळा।

तोही डोळा।

स्थिर करी॥

बालक चुकले।

सुकुमार तान्हुले।

त्याने पै सांडले।

मायाजाळ॥

जो जो जो जो।

पुत्राते निजवी।

अनुहाते वाव।

निःशब्दांची॥

अविनाश पाळणा।

अव्यक्तेने विणला।

तेथे पहुडला।

योगिराज॥

निद्रा ना जागृती।

निजसी काई।

परियेसी चांगया।

बोले मुक्ताबाई॥

– संत मुक्ताबाई 

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

रसग्रहण/अर्थ

चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला.

मुक्ताबाई म्हणतात,

निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत. ॐ कार नाद हा अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद तू मनाच्या उन्मनी अवस्थेतच ऐकू शकशील. सामान्यपणे मनाच्या चार अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा व  तुर्या म्हणजे आत्मशोध किंवा स्वतःची स्वतःला ओळख पटणे, ब्रम्ह व माया दोन्हींचे पूर्ण ज्ञान होणे. पण या अवस्थेत द्वैत असते. यापुढची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत मन तदाकार होते. विश्वातील दिव्यत्व व आत्म्यातील दिव्यत्व यांच्या एकरूपतेची जाणीव होते. अद्वैताचा अनुभव येतो. म्हणून मुक्ताबाई आपल्या शिष्याला सांगत आहेत की तू या उन्मनी अवस्थेचा अनुभव घे. निभ्रांतीच्या म्हणजे निर्मोहाच्या दोरीने तुझा पाळणा विणला आहे. त्याला झोका देण्यासाठी मनाची दोरी बांधली आहे. म्हणजे तुझं मन या निर्मोही अवस्थेचा आनंद घेऊ दे.

सामान्यपणे आपण १०८०० वेळा दिवसा व १०८०० वेळा रात्री श्वास घेतो. मुक्ताबाई सांगतात, सामान्य माणसांप्रमाणे तू एकवीस सहस्र सहाशे वेळा श्वास न घेता, तू तो स्थिर कर म्हणजेच त्यावर ताबा मिळवून त्याची गती कमी कर. (ही गती १०८ पर्यंत खाली आणली तर  परमेश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.) 

माझं बाळ लहान आहे ते वाट चुकलं होतं.(चांगदेव हे सर्व शास्त्रात पारंगत होते. त्यांना योगीराज म्हटलं जायचं. परंतु त्यांचे ज्ञान सत्संग विरहित होते कारण त्यांना अहंकाराची बाधा झाली होती.) पण आता त्याने माया मोह यांचा त्याग केला आहे. म्हणून अशा आपल्या पुत्राला मुक्ताबाई निःशब्दपणे अनाहत नाद ऐकवून झोपवत आहेत.

हा योगीराज चांगदेव बाळ, गुरूंनी विणलेल्या ज्ञानाच्या अविनाशी पाळण्यामध्ये पहुडला आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या गुरूंनी सांगितलेल्या योगमार्गातील उपदेशपर गोष्टी ऐकत आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली

मो. 9850228658

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोनेरी किरणे धरतीवर – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?सोनेरी किरणे धरतीवर? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

रविराज अस्ताला जाता

धरतीवर तम हळुहळू येतो

 पांधरूनी काळी शाल जगी

कुशीतली उब सकलांना देतो

निद्रीस्त  होती, विश्रांती घेती

श्रमणारे जीव आपोआप

काही ठिकाणी अंधारातच

चोरटेपणाने फिरते पाप

 पूर्वदिशेला दिनकर येता

 तमस हळू निघूनी जातो

 सोनेरी किरणे धरतीवर

 कणकण उजळीत रहातो

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काठाशी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काठाशी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

निरागसतेच्या- काठी

          रिमझिमायचे मेघ

कधी… कुठेही.. हाताशी

          निळे खळाळते ओघ

 

आता तृष्णेच्या- काठाशी

          शिडकावा ना ओलावा

निष्पर्णल्या फांद्यांवर

          मूक पाखरांचा थवा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 138– वणव्यात चांदण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 138 – वणव्यात चांदण ☆

तुझ्या हास्यानं रे  फुललं वैशाख वणव्यात चांदणं।

विसरले सारे दुःख अन् उघडे पडलेले गोंदणं ।।धृ।।

गेला सोडून रे धनी गेल डोईचं छप्पर।

भरण्या पोटाची गार भटकंती ही दारोदार।

लाभे दैवानेच तुला समजदारीचं देणं।।१।।

कुणी देईना रे काम कशी रे दुनियादारी।

नजरेच्या विषापरी सापाची ही जात बरी।

याला पाहून रे फुले तुझ्या हास्याचं चांदणं।।२।।

रोजचाच नवा गाव रोज तोच नवा खेळ।

दमडी दमडीत रे कसा बसेल जीवनाचा मेळ।

कसा आणू दूध भात कसा आणू रे खेळणं।।३।।

नसे पायात खेटर पायपीट दिसभर।

घेऊ कशी सांग राजा तुला झालरी टोपरं।

करपलं झळांनी या गोजिरं, हे बालपणं।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे… 🪔 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझा धर्म, माझा धर्म

तुझी जात, माझी जात

माझी देवता, तुझी श्रध्दा

घरात ठेवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझी साडी, माझी माडी

दाग-दागिने, कपडे भरजरी,

पैसे असतील खूप तिजोरी

घरात ठेवू श्रीमंती सारी

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तू गृहीणी, माझी नोकरी

तुझा पक्ष, सत्ता शिरजोरी

द्वेष, मत्सर, व्यंगावर मस्करी

चर्चा यावर नकोच करुया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

माझा गंध, तुझा रंग

सौदर्याचे विपरीत तरंग

विविध लोभी अंतरंग

नकली रुप सोंग-ढोंग

सोडून देऊया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझी माझी स्पर्धा कुणाशी ?

एकोप्याने सुंदर जगण्याशी

तिच्या मदतीला तिने धावण्याची

स्त्रीत्वातील माणूस जपण्याशी

ध्यानात ठेवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

क्षुद्र म्हणून तू-मी हिणलो

सावित्रीजोतीमुळे शिकलो सवरलो

आता कुठे भानावर आलो

निखळ जगणं अनुभवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझ्या माझ्यात द्वेष पसरेल

नफा त्याचा व्यवस्था उठवेल

व्यवस्था मग गुलाम बनवेल

स्वातंत्र्याचे मोल समजून

संघटीत राहूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #160 ☆ दिलाची सलामी….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 160 – विजय साहित्य ?

☆ दिलाची सलामी….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बसा सावलीला, जिवा शांतवाया

शिवारात माझ्या, रूजे बापमाया.

 

परी बापमाया, कशी आकळेना ?

दिठीला दिठीची, मिठी सोडवेना.

 

घरे चंद्रमौळी, तुझ्या काळजाची

तिथे माय माझी, तुला साथ द्याची

 

मनाच्या शिवारी ,सुगी आसवांची

तिथे सांधली तू, मने माणसांची.

 

जरी दुःख आले, कुणा गांजवाया

सुखे बाप धावे , तया घालवाया

 

किती भांडलो ते, क्षणी आठवेना

परी याद त्याची, झणी सांगवेना.

 

कुणा भोवलेली , कुणी भोगलेली

सदा ती गरीबी, शिरी खोवलेली .

 

कधी ऊत नाही, कधी मात नाही

शिळ्या भाकरीची, कधी लाज नाही.

 

कधी साहिली ना , कुणाची गुलामी

झुके नित्य माथा, सदा रामनामी .

 

सणाला सुगीला , तुझा देह राबे

तरी सावकारी, असे पाश मागे .

 

जरी वाहिली रे , नदी आसवांची

तिथे नाव येई , तुझ्या आठवांची

 

गरीबीतही तू , दिले सौख्य नामी

तुला बापराजा , दिलाची सलामी.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

२६/१/२०२३

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सतराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्र देवतेला आणि वरूण देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रवरुण सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

इंद्रा॒वरु॑णयोर॒हं स॒म्राजो॒रव॒ आ वृ॑णे । ता नः॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ १ ॥

राज्य करिती जे जगतावरती इंद्र आणि वरुण

त्यांच्या चरणी करुणा भाकत दीन आम्ही होउन 

शरण पातता त्यांच्या चरणी सर्व भाव अर्पुन

सर्वसुखांचा  करीत ते वर्षाव होउनि प्रसन्न ||१||

गन्ता॑रा॒ हि स्थोऽ॑वसे॒ हवं॒ विप्र॑स्य॒ माव॑तः । ध॒र्तारा॑ चर्षणी॒नाम् ॥ २ ॥

उभय देवता इंद्र वरुण येताती झणी धावत

अमुच्या जैसे भक्त घालती साद तुम्हाला आर्त 

त्या सर्वांचे रक्षण तुम्ही सदैव हो करिता

अखिल जीवांचे पोषणकर्ते तुम्ही हो दाता ||२||

अ॒नु॒का॒मं त॑र्पयेथा॒मिंद्रा॑वरुण रा॒य आ । ता वा॒ं नेदि॑ष्ठमीमहे ॥ ३ ॥

तृप्ती करण्या आकाक्षांची द्यावी धनसंपत्ती

हे इंद्रा हे वरुणा अमुची तुम्हाठायी भक्ती

उदार व्हावे सन्निध यावे इतुकी कृपा करावी

अमुची इच्छा प्रसन्न होऊनि देवा पूर्ण करावी ||३||

यु॒वाकु॒ हि शची॑नां यु॒वाकु॑ सुमती॒नां । भू॒याम॑ वाज॒दाव्ना॑म् ॥ ४ ॥

कृपाकटाक्षासाठी  तुमच्या कष्ट करू आम्ही 

श्रेष्ठ करोनी कर्म जीवनी पात्र होऊ आम्ही 

सामर्थ्याचा लाभ होतसे कृपादृष्टीने तुमच्या  

काही न उरतो पारावार भाग्याला अमुच्या ||४||

इंद्र॑ः सहस्र॒दाव्नां॒ वरु॑णः॒ शंस्या॑नां । क्रतु॑र्भवत्यु॒क्थ्यः ॥ ५ ॥

सहस्रावधी दानकर्मे श्रेष्ठ इंद्र करितो

सकल देवतांमाजी तो तर अतिस्तुत्य ठरतो

वरुणदेवते त्याच्या संगे स्तुती मान मिळतो

या उभयांच्या सामर्थ्याची आम्ही प्रशंसा करितो  ||५||

तयो॒रिदव॑सा व॒यं स॒नेम॒ नि च॑ धीमहि । स्यादु॒त प्र॒रेच॑नम् ॥ ६ ॥

कृपा तयाची लाभताच संपत्ति अमाप मिळे

त्या लक्ष्मीचा संग्रह करुनी आम्हा मोद मिळे

कितीही त्याने दिधले दान त्याच्या संपत्तीचे

मोल कधी त्याच्या खजिन्याचे कमी न व्हायाचे ||६||

इंद्रा॑वरुण वाम॒हं हु॒वे चि॒त्राय॒ राध॑से । अ॒स्मान्त्सु जि॒ग्युष॑स्कृतम् ॥ ७ ॥

हे देवेंद्रा वरुण देवते ऐका अमुचा धावा

धनसंपत्ती सौख्यासाठी आम्हाला हो पावा

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती द्यावे वरदान 

अमुच्या विजये वृद्धिंगत हो तुमचाची मान ||७||

इंद्रा॑वरुण॒ नू नु वां॒ सिषा॑सन्तीषु धी॒ष्वा । अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥

इंद्रा-वरुणा सदैव आम्ही चिंतनात तुमच्या

भविष्य अमुचे सोपविले आहे हाती तुमच्या 

सदात्रिकाळी जीवनामध्ये होवो कल्याण

कर ठेवूनिया शीरावरी द्यावे आशीर्वचन ||८||

प्र वा॑मश्नोतु सुष्टु॒तिरिंद्रा॑वरुण॒ यां हु॒वे । यामृ॒धाथे॑ स॒धस्तु॑तिम् ॥ ९ ॥

सुरेंद्र-वरुणा तुम्हासि अर्पण स्तुती वैखरीतुनी

प्रोत्साहित झालो आम्ही मोहक तुमच्या स्मरणानी

सुंदर रचिलेल्या या स्तुतिने तुमची आराधना  

प्रसन्न होऊनी स्वीकारावी अमुची ही प्रार्थना ||९||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/j7qWOqc8gp8

Attachments area

Preview YouTube video Rugved 1 17

Rugved 1 17

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वास्तव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वास्तव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

पाठीवर हात ठेवून

लढ बाप्पा म्हणणारा

कुठे गुंतलाय

तेच काही

कळत नाही

 

निखळ ज्ञान देऊन

घडवणारा

आश्वासक गुरु

काही केल्या

मिळत नाही

 

काय करावे तरुणांनी

 कुठे शोधावेत आदर्श

 मार्गदर्शक

काही केल्या

त्याना सुचत नाही

 

 संधी साधू समाजात

बोकाळलेला स्वार्थ

 कुठपर्यंत मुरलाय

याचा येत नाही

अंदाज

 

आपल्याकडे पहायचं सोडून

 जो तो पाहतोय

फक्त दुसऱ्याकड

 दोष आपल्यातले

लादतोय दुसऱ्यावर

 

आणि म्हणतोय

 चाललंय तसं चालू द्या

आपल्या हातात काय आहे?

 मी सोडून सगळेच

 वाया गेलेत

 

 हेच आहे आजच वास्तव

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #146 ☆ संत सखू… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 146 ☆ संत सखू… ☆ श्री सुजित कदम ☆

संत सखू भक्ती भाव

दावी नाना चमत्कार

अंतरीची हरीभक्ती

पदोपदी साक्षात्कार…! १

 

साधी भोळी सवाशीण

सासरचा सोसे छळ

मर्यादेच्या पार नेई

दृढ निश्चयाचे बळ…! २

 

भावपूर्ण तळमळ

अनिवार इच्छा शक्ती

सासरच्या जाचालाही

मात देई विठू भक्ती…! ३

 

विठ्ठलाच्या चिंतनात

दूर झाला भवताप

युगे अठ्ठावीस उभे

विटेवरी मायबाप…! ४

 

नाव विठ्ठलाचे घेण्या

नाही कधी थकणार

संत सखू वाटचाल

पांडुरंग नांदणार…! ५

 

संत सखू वाटसरू

सुख दुःख पायवाट

जगुनीया दाखविले

प्रारब्धाचा दैवी घाट…! ६

 

अत्याचारी सासराला

नाही कधी दिला दोष

कृतज्ञता मानुनीया

विसरली राग रोष…! ७

 

दुराचारी कुट़ुंवाने

दिली प्रेरणा भक्तीची

अव्याहत हरीनाम

जोड ईश्वरी शक्तीची…! ८

 

दुःख दैन्य साहताना

संत सखू दावी वाट

नाही कोणा प्रत्युत्तर

पचविली दुःख लाट…! ९

 

पांडुरंग दर्शनाची

पुर्ण करी आस हरी

रूप सखुचे घेऊनी

नांदे पांडुरंग घरी…! १०

 

हरिभक्ती अनुभूती

हरिभक्ती पारायण

सांसारिक वेदनांचे

संत सखू शब्दायण…! ११

 

गेली पंढरीस सखू

पुर्ण केली तिने वारी.

घरकाम करताना

पांडुरंग झाला नारी…! १२

 

मोक्षपदी गेली सखू

इहलोक सोडूनीया

पांडुरंग आशीर्वादे

आली घरा साधूंनीया…! १३

 

श्रद्धा विठ्ठलाच्या पायी

संत सखू भक्ती भाव

वसवून गेला जगी

अध्यात्माचा नवा गाव…! १४

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares