☆ अँटनी लैरीस आणि त्याचा पेटता ऊर… भावानुवाद : डॉ. प्रवीण आवटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जाती धर्माच्या नावाखाली समाजात विद्वेष पसरवणाऱ्या सर्वांसाठी एक चपराक
आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको – हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.
☆ “चालले कोण तिकडच्या घरी–…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. .. अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही
देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच.
परंतु कालमान परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली. पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले. तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत. स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.
साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही. मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.
कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही. हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही. काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी.
ती कविता पुढे देत आहे. त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा ….
— पण मुलंही जातात घर सोडून…!
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.