सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 209 ?

धुकं (बारा वर्षापूर्वीचं) ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

महाबळेश्वरचा मस्त पाऊस,

तसं महाबळेश्वर कुठल्याही

ऋतूत मस्तच!

 

भर पावसात मुलांनी,

महाबळेश्वरला जायची टूम काढली,

त्यांची इच्छा,

आम्हीही जावं,

त्यांच्या समवेत,

मुलं, सूना, नातवंडं…..

आणि झिम्माड पाऊस!

 

जाणवलं होतं तेव्हाही,

कालचक्र वेगात फिरतंय!

 

 

चिकन रस्सा,गरम घावन….

आणि पाऊस!

आहा ऽऽऽ मस्तच!

 

दुसऱ्या दिवशी पहाटे,

प्रतापगडला जाताना…

सर्वदूर पसरलेलं धुकंच धुकं!

“धुक्यात हरवली वाट”

असंच काहीसं …..

 

अशात ड्रायव्हिंग करणं,

धाडसाचंच!

जीव मुठीत धरून

आम्ही दोघेच!

तरूणाई, शैशव– मस्त मजेत!

 

आयुष्यात अनेकदा,

धुकं अनुभवलं ते महाबळेश्वरातच!

गड चढताना आठवलं होतं  ,

तारूण्यातलं महाबळेश्वर ….

अंहं….हनीमून नाही,

लेकुरवाळी असतानाचं,

कुटुंब कबिल्यासह,

देवीदर्शन!

डोईवर पदर, हातभार बांगड्या!

आणि समोर  साक्षात जगदंबा !!

 

कित्येक वर्षानंतरही…

निशिगंधाच्या मंद सुवासाने

दरवळणारा  तोच गाभारा,

 देवीच्या छायेतली मुलं,सूना,     

 नातवंडं!

 आशिर्वादीत होऊन,

गड उतरताना,

धुकं….पूर्ण नाहीसं झालेलं!

 

तीन पिढ्यांनी अनुभवलेलं,

ते धुरकट धुकं आणि लख्ख उजळणंही…

भर पावसातलं !!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments