मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आंबटगोड नातं…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आंबटगोड नातं…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(माझ्याकडून तुम्हाला हा घ्या किंडल रीडर !. मी पैजेतून जिंकलेल्या आणि माझ्या बचतीच्या पैशातून घेतला आहे, बरं का !” असं म्हणून पैठणी घेऊन वहिनी आत गेल्या.) – इथून पुढे – 

मी साहेबांना विचारलं, “ साहेब, वहिनींशी कसली पैज लावली होती हो? ” 

साहेब मिश्कीलपणे म्हणाले, “अरे, काय आहे ना, तिने आजवर मला कित्येक वेळा बुद्धिबळाच्या डावांत हरवत पैजा जिंकल्या आहेत.” 

मी म्हटलं, “ साहेब, काय सांगताय? तुम्ही तर बुद्धिबळातले चॅम्पियन ! तुम्हाला हरताना मी तरी कधीच पाहिलं नाही.”

“वसंता, अरे दिवसभर टीव्ही किती वेळ पाहत बसणार? काहीतरी विरंगुळा हवा ना? मग एकदा बुद्धिबळाचा डाव मांडला. दोन तीन चालीतच मी तिला शह दिला. त्यानंतर ती पुन्हा खेळायलाच तयार होत नव्हती. मग एकदा पैज लावली. तिनं मला हरवलं तर मी पाचशे रूपये द्यायचे आणि ती हरली तर तिने काहीच द्यायचे नाहीत. बराच वेळ खेळून झाल्यावर मी मुद्दामच हरलो. त्यानंतर मी दरवेळी मुद्दामच हरत गेलो. माझ्या टाईमपासची सोय झाली आणि पैसे काय माझ्या पाकिटातून तिच्या पर्समध्ये!” मला टाळी देत साहेबांनी खुलासा केला. 

इतक्यात सुधा वहिनी व सविता तयार होऊन आल्या. धूपछांव रंगांची पैठणी नेसलेल्या सुधावहिनींना साहेब कौतुकाने न्याहाळत होते. आम्ही चौघे कॅंडल डिनरसाठी एका हॉटेलात गेलो. हलकंफुलकं खाऊन परत आलो. 

सकाळीच जाग आली ती वहिनींच्या बडबडण्याने. “ किती वेळा सांगून झालं, लाद्या पुसत जाऊ नका म्हणून.. एक शब्द ऐकतील तर शप्पथ. अचानक पाय घसरून पडले तर कितीला पडेल ते…” 

“तू ऐकतेस काय माझं? कंबर दुखेपर्यंत एक एक फरशी घासत बसतेस ते.” साहेब बोलत होते. मला पाहताच म्हणाले, “ वसंता, चल बाहेर चक्कर टाकून येऊ.” मी हो म्हणून तोंडावर पाणी मारून कपडे करून आलो. 

“सुधा, अग माझ्या चपला कुठायत? रात्री इथंच काढून ठेवल्या होत्या. ह्या बाईला सवयच आहे माझ्या चपला लपवायची..”    

“समोर शूज दिसताहेत ना, निमूटपणे घालून जा. एक तर मधुमेह. पायाला जपायचं नावच नाही. शूज असले तरी चपलाच पाहिजेत..”      वहिनींचा तोंडाचा पट्टा सुरू होता. 

साहेब शूज घालून निघाले. वॉकिंग ट्रॅक असलेली बाग खूपच छान होती. आम्ही फिरून आलो. आल्या आल्या वहिनींनी फक्कड चहा दिला.  

मी म्हटलं, “अहो, वहिनी बाग छान आहे हो. मी तर म्हणतो, तुम्हीही साहेबांच्या बरोबर रोज जायला हवं.” 

“तुमचे साहेब सकाळी उठून चोरासारखे कधी बाहेर पडतात हे मला कळायला हवं ना. मगच त्यांच्याबरोबर जायचा विचार करता येईल.” असं ताडकन बोलून त्या आत गेल्या. 

साहेब मला हळूच म्हणाले, “अरे, माझं काय, मी बेडवर पडल्या पडल्या डाराडूर झोपतो. पण तिला लवकर झोपच लागत नाही. पहाटे पहाटे तिला छान झोप लागलेली असते. साखरझोपेतून तिला कशासाठी उठवा, म्हणून मी हळूच सटकतो.”                       

“साहेब, आज कामवाली आली नाही का? तुम्ही लादी पुसत होता म्हणून ….” मी सहज विचारलं.

“ती नाही आली. ती आमची कामवाली बाई नाही, ती आमची केअरटेकर आहे. अरे तिच्या मुलीचं बाळंतपण ह्याच आठवड्यात आहे. बिचारी काल दुपारीच गेलीय. वसंता, तुला एक सांगू? एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वय वाढल्यावर माणसाला कुठलंही काम केलं की थकायला होतं. कुठलीही दगदग नकोशी वाटायला लागते. हळूहळू ही माणसे मग कृतिशील आयुष्यातून निवृत्त होत जातात. निवृत्ती म्हणजे विश्रांती. पण निवृत्ती म्हणजे चोवीस तास रिकामपण असेल तर मात्र त्याचाही कंटाळा आल्यावाचून राहात नाही. त्याकरिता आपल्या प्रकृतीला झेपतील अशा बेताने आपण आपली कामे करायला हवीत.” 

“तुला सांगतो, बागेत रोपे लावून, त्यांची निगा ठेवत राहिल्याने सुद्धा आपल्याला बाह्य जगाशी जिवंत संबंध जोडल्याचा आनंद मिळतो. परिणामी आपले मन ताजे व टवटवीत रहाते. बरेच लोक फ्यूज जोडायचं काम स्वत: करतात. स्क्रू ड्रायव्हर वगैरे हत्यारे घरी ठेवतात आणि सवड असेल तेव्हा छंद म्हणून का होईना छोटीमोठी कामे करत असतात. हे लोक कधीच कंटाळलेले नसतात. ह्या उलट आपल्या कौशल्याचा उपयोग करण्याची संधी मिळाल्याबद्दल ते स्वत:वरच खूश असतात. ‘बोअरडम’ विषयी मोराव्हिया नावाच्या लेखकाने लिहिलेलं असंच काहीबाही वाचलेलं मला आठवतं.” 

“वसंता, आमची मुलं गुणी आहेत. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण निवृत्तीनंतर मला जाणवायला लागलं की आम्ही दोघे एकमेकांच्या आनंदासाठी कधी जगलोच नव्हतो. फक्त मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत होतो. मी तेव्हाच ठरवून टाकलं की जीवनाच्या ह्या सांजसमयी आम्ही दोघांनी एकमेकांचे आधार बनून राहायचे. आयुष्यात उरलेले अनमोल क्षण एकमेकांच्या आनंदासाठी समर्पित करायचे. मी तर म्हणतो वृद्धापकाळातच पतीपत्नींच्या नात्यातल्या सहवासाची खुमारी अधिकच वाढायला लागते.”

दोन दिवसानंतर अगदी जड मनाने आम्ही त्या उभयतांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. थ्री टायर एसीच्या बोगीत येऊन बसलो. थोडेसे स्थिरस्थावर झाल्यावर, सविता म्हणाली, “आपले चार दिवस इथे किती मजेत गेले ना? त्या दोघांची दिवसभर कशी अविरत जुगलबंदी चाललेली असते. नवरा-बायको या नात्याची गंमतच काही और असते. काय ते, लुटुपुटीचं भांडण आणि काय तो एकमेकांचा प्रेमाचा वर्षाव. त्या दोघांच्या दरम्यान असलेलं आंबटगोड नातं मला पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहायला मिळालं.” 

 “अग, मी सुद्धा पहिल्यांदाच साहेबांचे आणि वहिनींचे हे रूप पाहत होतो. त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, लोभ, त्यांचे रुसवे, फुगवे, त्यांचे परस्परांतील प्रेम, आदर सगळं काही किती लोभस वाटत होतं. चपला लपवल्या म्हणून रागावणारे साहेब आणि मधुमेही साहेबांच्या पायांची काळजी करणाऱ्या वहिनी, कामवाली बाई आली नाही म्हणून लाद्या पुसणारे साहेब आणि ‘अचानक पाय घसरून पडले तर’ म्हणून काळजी करणाऱ्या वहिनी, वहिनींच्या आवडीची पैठणी आणणारे साहेब आणि साहेबांच्या वाचनाची आवड ओळखून त्यांना किंडल रीडर भेट देणाऱ्या वहिनी …. अशी कितीतरी मनोहर रूपं आपल्याला पाहायला मिळाली. पण एक जाणवलं, त्या दोघांच्या एकमेकांच्या विरूद्धच्या तक्रारीत, लुटुपुटीच्या भांडणात तर त्यांचं परस्परांविषयी असलेलं प्रगाढ प्रेम व काळजीच दडलेली जाणवत होती. सगळं कसं स्वच्छ, पारदर्शी असं ते आंबटगोड नातं ! ”

 “सविता, तू पाहिलंस ना, लिंबाचं लोणचं जितकं अधिक मुरत जातं, तितकी तिची चव अधिकच बहारदार होत जाते. अगदी तसंच, साहेबांचे आणि वहिनींचे हे नाते प्रेमाने छान मुरत गेलेले आहे. नवरा बायकोचे नाते असेच असते कधी गोड तर कधी आंबट. लग्नानंतर फुलत फुलत जाणारे हे नाते आयुष्यात सुखाचा गोडवा घेऊन येते. वैवाहिक जीवन हे वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जाते. कधी प्रेम तर कधी भांडणे अशा प्रकारे आयुष्य पुढे सुरु राहते. आंबट गोड असे हे नाते हळुवारपणे जपायचे असते. लुटुपुटीची भांडणं हा सहजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्या भांडणातून प्रेम वाढत जायला हवे आणि परस्परांतील नाते आणखी फुलत जायला हवे.” 

“होय ना? मग आजपासून आपणही तसंच भांडायचं का? ” असं म्हणत सविता जोरजोरात हसत होती आणि मीही मनमोकळेपणाने हसत तिच्या हास्यात सामील झालो. आजूबाजूचे लोक आमच्याकडेच पाहत होते…!

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शाॅवर…’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘शाॅवर…’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

(मागील भागात आपण पाहिले – त्याचं नशीब थोर म्हणून मनिष आणि सुनिता, श्वेता भेटले. त्यांनी मोठ्या मनाने त्याला ठेवून घेतलं. एवढंच नाही, आता जूनमध्ये शाळा सुरू होतील म्हणून त्यांनी गणूच्या शाळेची चौकशी केली. गणू चौथीत गेला होता. त्याला शाळेत पाठवायची पण व्यवस्था त्यांनी केली. – आता इथून पुढे)

दिवसामागून दिवस जात होते. आपल्या आईबापाची आठवण विसरून गणू शर्मांच्या घरातच रुळत होता. त्याच्या प्रगती पुस्तकावरही मनिषच सही करत होता. आपलं घर समजून गणू घरातली कामंही करत होता. झाड-झूड करणे, फरशी पुसणे, कपबश्या धुणे, बाग बनवणे अशी अनेक कामं तो मनापासून करत होता. मनिष त्याच्या अभ्यासाकडेही थोडंफार लक्ष देत होता. तल्लख बुद्धीचा गणू अभ्यासात चांगली प्रगती करत होता.

बघता-बघता दिवस, महिने करत वर्ष लोटलं. छोट्या मुलीला घेऊन पुन्हा रखमा आली. पण गणूवर काहीच परिणाम झाला नाही. आता तर श्वेतासारखाच मनिष-सुनिताचाही गणूवर जीव जडला होता. चार जणांचं सुखी कुटुंबच बनलं होतं ते.

त्यातच मध्यंतरी एक-दोन घटना घडल्या. श्वेताचं बोट सुरीशी खेळता-खेळता कापलं. गणूनं झटकन् तिचं बोट तोंडात गच्च पकडलं. रक्त ओढून घेतलं. त्यावर एका झाडाची पानं ठेचून लावली. रक्त थांबलं. गणूने हे सगळं इतकं वेगानं अन् सफाईनं केलं की, श्वेताला रडायलाही अवधी मिळाला नाही. इतकी ती त्याच्याकडं पहाण्यात गुंगून गेली होती.

त्यानंतर असेच दोघं बंगल्याच्या अंगणात खेळत होते. खेळता-खेळता बागेतल्या हौदातच पडली. हौद जमिनीच्या पातळीतच होता, पण 4फूट खोल होता. 2-2॥ फूट उंचीच्या श्वेतासाठी तो खूप होता. शिवाय पाण्यानं भरलेला. गणूही काही फार उंच नव्हता. पण त्याला पोहता येत होतं. त्यानं किंचितही विचार न करता हौदात उडी मारली अन् श्वेताला बाहेर काढलं. त्याच्या ओरडण्यामुळं मनिष-सुनिता बाहेर आले. समोरचं दृश्य पाहून घाबरून गेले. पण श्वेताला सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं पाहून त्यांना फारच आनंद झाला. दोन्ही घटनांमुळे त्यांचा गणूवर जीव जडला.

देवाची काय योजना होती कुणास ठाऊक? पण दिवसेंदिवस गणू, शर्मा कुटुंबात साखरेसारखा विरघळत राहिला. परिणाम अर्थातच गोड होता.

‘दैव’ किंवा नशीब किंवा नियती… किंवा काहीही, जे आपल्या हातात नाही ते निश्चित काहीतरी असावं, जे परिणामकारक रीतीने कार्यरत असतं. बघा ना…

जेमतेम 10 वर्षांचा मुलगा, आईबापाला सोडून कसा राहू शकतो? तेही अजिबात ओळख नसलेल्या कुटुंबात?

तेही त्याला कसे सहज स्वीकारू शकतात? आश्चर्य तर पुढेच आहे.

हळू-हळू श्वेता आणि गणूची दिवसेंदिवस गट्टी होत गेली. गणूला मनिषा आणि सुनिताच्या हृदयात स्थान मिळालं. व्हरांड्यात झोपणारा गणू आता हॉलमध्ये झोपू लागला. शर्मा कुटुंबाबरोबर जेवायला बसू लागला. केजीतली श्वेता आणि चौथीतला गणू एकत्र अभ्यास करू लागले. चौथी, पाचवी… करत करत दहावीचा टप्पाही गणूने पार केला. चांगल्या मार्कांनी. दिवसेंदिवस सगळ्यांचंच नातं घट्ट होत गेलं. सोय म्हणून मनिषने सुनिताची स्कुटीही त्याला शिकवली होती.

परक्या अनोळखी लोकांना आता हे एक मुलगा आणि एक मुलगी असलेलं सुखी कुटुंबच वाटू लागलं.

दहावी झाल्यावर पुढं काय? किंवा कधीच पुढं काय असा विचार गणूने केला नव्हता. ज्या बंगल्याचं सुख भल्याभल्यांना खूप उशीरा, खूप खर्च करून महत्प्रयासानं मिळायचं! ते त्याला 9व्या-10व्या वर्षीपासूनच सहज मिळत होतं. एक मात्र खरंय, त्याची तीव्र इच्छा अन् जिद्द!

मनिषने काही विचार करून गणेशला कॉमर्स शाखेला घातलं. त्याच्या व्यवसायाला ते उपयुक्त होईल, असाच त्याचा विचार असावा. गणूनेही बी.कॉम. करता-करता मनिषच्या व्यवसायातली थोडी-थोडी करत बरीच माहिती मिळवली होती. हळू-हळू तो जबाबदार, हुशार तरुण होत होता.

मधल्या काळात मनिष-सुनिता 3-4 वेळा मुलीला घेऊन राजस्थानात त्यांच्या गावी जाऊन आले. तेव्हा 15-20 दिवस गणूने बंगला उत्तम रीतीने सांभाळला. बागेकडेही लक्ष दिलं. तेव्हा शर्मा दांपत्याला गणेशचा चांगलाच आधार आणि विश्वास वाटू लागला.

रखमा, धर्मा 2-3 वेळा येऊन गेले, पण गणू त्यांच्याबरोबर गेला नाही. तेही पुढच्या-पुढच्या कामावर लांब-लांब गेले. बरेच दिवसात त्यांची बंगल्यावर चक्कर झाली नाही. ते एक दिवस असेच अचानक मुलीला घेऊन आले. गणूला न्यायला नाही, फक्त भेटायला. ते गाव सोडून चालले होते. तारुण्यात पदार्पण केलेल्या, शिकून शहाण्या झालेल्या गणूला पाहून रखमा आणि धर्मा हरखून गेले. हा आपलाच मुलगा आहे, यावर त्यांचा विश्वासच बसेना. रखमाच्या डोळ्यांना धाराच लागल्या होत्या. धर्माही त्या शहाण्या-सुरल्या पांढरपेशा लेकाकडे पहातांना अवघडून गेला होता. हा इथं राहिला हे बरंच झालं असं त्याला क्षणभर वाटून गेलं.

यावेळेस मात्र गणूला आई-बापाकडं पाहून भरून आलं. तो धर्माला म्हणाला, ‘‘बा, आता मी शिकलो आहे. नोकरी करून तुम्हाला पैसे देत जाईन.’’ त्याचं हे बोलणं ऐकून धर्माचा बांध फुटला. तो त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागला. बाकी भाषा बदलली होती, पण ते ‘बा’ ऐकून धर्माच्या जिवाची घालमेल झाली. ‘‘नको रं पोरा. मला काही नको. तू सुखाचा रहा – बसं!’’

यावेळेस त्या सगळ्यांना घरात बोलावून सुनिताने चहापाणी केलं. जातांना मनिषने धर्माला 1000 रु. दिले. धर्मा अन् रखमा ‘‘कशाला? नगं-नगं’’ म्हणत होते. पण मनिषने ऐकलं नाही. त्यांचा पुढच्या गावचा पत्ताही नीट विचारून घेतला. 25-30 कि.मी.वर होता. त्यानं आई-बापाला रिक्षात बसवलं अन् तो स्कुटीनं त्यांच्या मागं-मागं गेला. त्यांच्या नव्या घराच्या टपरीत सोडून आला. तिथून निघतांना परत आई-बापानं त्याला अंजारून-गोंजारून डोळे भरून पाहून घेतलं. पोरगं आता आपलं राहिलं नाही असंच त्यांना वाटत होतं.

जाणत्या झालेल्या गणेशला आता वाटू लागलं, आपण बंगल्यात रहातोय, पण आई-बाप मात्र टपरीत. हे काही बरं नाही.

दुसरे दिवशी, तो मनिषला म्हणाला, ‘‘साहेब (पहिल्यापासून तो मनिषला साहेबच म्हणत होता.) मी आता नोकरी करतो म्हणजे मला घरी पैसे पाठवता येतील.

मनिष म्हणाला, ‘‘घरातच मला ऑफिसमध्ये मदत कर. मी तुला पगार देईन. नाहीतरी तुझं बेसिक कंम्प्युटर शिक्षण झालं आहे. टॅली वगैरे पण येतंय. अजून थोडंफार मी शिकवेन. या एक तारखेपासून तुझं काम न् पगार सुरू करू.’’

‘‘आंधळा मागतो एक डोळा…’’ गणूला तर 3-4 डोळे मिळाले. रहायला बंगला, शिक्षण, नोकरी, प्रेमळ कुटुंब, बहीण… काय हवं अजून?

खरंच बोलल्याप्रमाणे 1 तारखेपासून गणूचं काम सुरू झालं. ऑफिसच्या कामाचा भाग म्हणून त्याला बँकेतही जावं लागत होतं. मनिषच्या बँक अकौंटस्चीही त्याला माहिती झाली. म्हटलं ना दैव गणूवर प्रसन्न होतं. आता दर महिनाअखेर तो आई-बापाला ठराविक रक्कम देऊ लागला. त्यांच्या घरी जाऊन.

पण जसजश्या जबाबदार्‍या वाढत होत्या गणूचा अल्लडपणा कमी-कमी होत होता. श्वेता मोठी होत होती. तिच्याशी खेळणंही संपलं होतं. पण बहीण-भावाचं नातं घट्ट बनलं होतं.

बारावीला श्वेताला 94% गुण मिळाले. अमेरिकेत M.S. करण्यासाठी तिला स्कॉलरशिप मिळाली. ती गेली. घरात मनिष, सुनिता आणि गणू तिघंच. सतत कामात.

बघता-बघता श्वेताचं M.S. पूर्ण झालं. तिकडंच तिचा जॉब सुरू झाला. अन् तिनं लग्नही जमवलं. केलंही तिकडेच. लग्नासाठी मनिष-सुनिता तिकडं गेलं. तेव्हाच श्वेताच्या नवर्‍यानं आणि श्वेतानं त्यांना अट घातली. तुम्हाला आता इकडे आमच्याबरोबरच रहावं लागेल काहीही झालं तरी!

खूप मोठ्ठा आणि अवघड निर्णय होता. पण एकुलत्या एक लाडक्या लेकीसमोर – जावयासमोर त्यांचं काही चालेना.

लग्न करून ते सर्व व्यवस्था लावून निरवा-निरव करण्यासाठी भारतात आले. त्यांनी पूर्ण बंगला गणूच्या नावावर करून दिला आणि कायमच्या वास्तव्यासाठी अमेरिकेत गेले.

गणूला फार दुःख झाले. पण आता खर्‍या अर्थाने कायदेशीररित्या तो बंगला त्याचा झाला होता. अर्थात त्यासंबंधी गणूनं कधीच विचार केला नव्हता. बंगल्यात रहावं एवढंच त्याला पुरेसं होतं. लगेचच गणू आईवडिलांना बंगल्यात रहाण्यासाठी घेऊन आला. त्याच्या बहिणीचं धर्मानी लग्न लावून दिलं होतं. आता ते दोघंच होते.

अश्रुभरल्या डोळ्यांनी दोघं बंगल्याच्या दारातच थांबले. आपल्या हातांनी बांधलेल्या बंगल्यात प्रवेश करतांना त्यांची पावलं जड झाली.

गणू म्हणाला, आये, बा – या ना आत. आपलाच बंगला आहे.

थकलेला धर्मा म्हणाला, ‘‘आमच्या पायाची घाण लागंल ना रे आत!’’

गणु त्यांना थेट बाथरुममध्ये घेऊन गेला अन् शॉवर चालू केला. पण शॉवरपेक्षाही त्याचे अश्रु अधिक वहात होते. फक्त शॉवरमुळे ते दिसत नव्हते.

 – समाप्त –

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शाॅवर…’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘शाॅवर…’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

वर्षभर .चाललेलं बंगल्याचं काम आता संपलंच होतं. कधी पण ठेकेदार सांगेल, ‘‘आता पुढच्या कामावर जा.’’ त्याला रखमा अन् धर्माची तयारी असायली हवी. त्याच विचारात रखमा होती. तेवढ्यात गणू येऊन तिला बिलगला. म्हणाला,

‘‘आये, कवा यायाचं आपल्या नव्या घरात र्‍हायाला?’’

‘‘कुठलं रं नवं घर?’’

‘‘ह्योच की आपला बंगला. तू अन् बानंच बांधलाय न्हवं? तू घमेले वहायची, बा भित्ती बांधायचा. मंग? आता झाला ना पुरा?’’

रखमाला हसावं का रडावं कळंना. ‘‘आरं बाबा ह्यो आपला न्हाय बंगला. काम झालं. आता जावं लागंल म्होरल्या कामावर.’’

हे ऐकताच गणुनं भोकाड पसरलं. हातपाय आपटत म्हणू लागला, ‘‘न्हाय! म्या न्हाय येणार. हे आपलं घर हाय. हिथंच र्‍हायाचं.’’ असं म्हणून तो पळत सुटला.

रखमा तिच्या टपरीत आली. बराच वेळ झाला, तरी गणू येईना. ती हाका मारून दमली. शेवटी बंगल्यातच आहे का बघावं म्हणून हाका मारतच आत शिरली. पाण्याचा जोरात आवाज आला. ती बाथरुमपाशी आली. तिथं गणूचा जलोत्सव चालू होता. शॉवर सोडून त्याखाली नखशिखांत भिजत-नाचत होता. ओरडत होता. त्या आवाजात त्याला आईचा आवाजही आला नाही.

आता मात्र रखमा जोरात ओरडली, ‘‘आरं एऽ मुडद्याऽ, कवाधरनं हाका मारतीया… चल घरी.’’ गणुला कुठलं ऐकू यायला?

रखमानं पुढं येऊन शॉवर बंद केला. खस्कन त्याच्या दंडाला धरून ओढत, फरफटत टपरीत घेऊन आली. त्याचा अवतार पाहून त्याचा बापही ओरडला, ‘‘कुठं रे गेला हुता, एवढं भिजाया?’’

‘‘अवं, बंगल्याच्या मोरीत नाचत हुता. वरचा पावसाचा नळ सोडून.’’

लुगड्यानं, गणुचं अंग, डोकं खसाखसा पुसत रखमा करवादली!

‘‘काऽय?’’ धर्मा ओरडला.

‘‘जाशील का जाशील परत?’’ म्हणून रखमानं त्याला जोरदार थप्पड मारली.

एवढा वेळ आनंदात नहाणारा गणू, आता मुसमुसून रडू लागला. त्याला कळतच नव्हतं आपल्याल घरात जायला आपल्याला बंदी का? ‘‘चल मुकाट्यानं भाकरटुकडा खाऊन घे!’’

‘‘मला न्हाय खायाची भाकर.’’ असं म्हणून गणू तणतणत उठला.

‘‘जाऊ दे. जाऊ दे. भूक लागली की चट् खाईल.’’ … गणूचे लाड करायला, त्याच्याकडं ना वेळ होता, ना पैसा.

गणू मनानं अजून बंगल्यातच होता. शॉवरखालची आजची अंघोळ त्याच्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग होता. त्या आनंदातच जमिनीवर पसरलेल्या फरकुटावर तो झोपून गेला. त्या इवल्याश्या जिवाला अंघोळीनं नाही म्हटलं तरी थकवाच आला. पण त्या आनंदातच त्याला झोप लागली.

झाकपाक करून रखमा त्याच्याशेजारी लवंडली. पोर उपाशी झोपलं म्हणून तिला गलबलून आलं. ‘‘काय बाई यडं प्वार’’ थोडंसं कौतुकानं, थोडं काळजीनं तिनं त्याला जवळ ओढलं. पोटातलं पोर लाथा मारत होतं. रखमाला बाळंतपणाची काळजी वाटू लागली.

दुसर्‍याच दिवशी ठेकेरादानं सांगितलं, ‘‘8 दिवसांनी मुहूर्त हाय मालकाचा. बंगला साफसूफ करून घ्या. आता दुसर्‍या कामावर जायला लागंल. धर्माच्या पोटात धस्स झालं. पण ते चुकणार नव्हतंच. संध्याकाळी त्यानं रखमाला सांगितलं, ‘‘आरं देवा’ म्हणत तिचा हात पोटावर गेला. पण त्यांनी मनाची तयारी केली.

वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी शर्मा कुटुंब बंगल्यात आलं. तोपर्यंत गणू रोज बंगल्याच्या ओट्यावरच झोपायचा. आई-बापाशी त्यानं पूर्ण असहकारच पुकारला होता. आई-बापालाही त्याची मनधरणी करायला वेळ नव्हता.

बंगल्याची वास्तुशांत झाली. त्यात शर्मांचं सारं कुटुंब राबत होतं. संध्याकाळी धर्माला अन् गणूला कापड अन् रखमाला साडीचा आहेर मिळाला. गोडाचं जेवण झालं. दुसर्‍या दिवशी धर्मा अन् रखमाचा मुक्काम दुसर्‍या कामावर हालला. किती समजावून सांगितलं रखमानी, पण गणू त्यांच्याबरोबर गेला नाही. त्याचा एकच हेका होता, ‘‘आपला बंगला सोडून म्या येणार न्हाय.’’ राहू दे हितंच. पोटात कावळे कोकलतील तेव्हा येईल चट्! मुकाट्यानं!

दोघांनी विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर घेतलं अन् मुक्काम हलवला. रखमाचा जीव तुटत होता, पण करणार काय? इथल्या टपरीचे पत्रेही काढले होते. संध्याकाळी त्याला घेऊन जाऊ म्हणून ती काळजावर दगड ठेवून निघाली. गणूने ढुंकूनही तिकडे लक्ष दिलं नाही.

बंगल्याचे मालक मनिष शर्मा आणि सुनिता शर्मा, हे साधं-सुधं प्रेमळ दांपत्य होतं. गडगंज श्रीमंत तेवढंच मनानंही श्रीमंत अन् दिलदार! मनिष शेअर ब्रोकर होता. घरातच त्याचं ऑफिस होतं. सुनिता घरकाम सांभाळून त्याला मदत करत होती. त्यांना श्वेता नावाची 4 वर्षाची गोड मुलगी होती. तिची गणूशी लगेच गट्टी जमली.

आईबाप गेल्यावर श्वेताशी खेळण्यात गणूचा दिवस गेला. रात्री गणू बंगल्याच्या ओट्यावरच झोपला. झोपण्याचं फटकूर त्यानं ठेवून घेतलं होतं. तसा तो हिंमतीचाच!

पहाटे मनिष आणि श्वेताही बाहेर आले तेव्हा त्याला गणू दिसला. पाय पोटाशी घेऊन झोपला होता. मनिष तिला म्हणाला, ‘‘देखो ये बच्चा सोया है । उसे कुछ शॉल वगैरे देना । श्वेतानेही स्वतःची शाल आणून त्याच्या अंगावर घातली.

सकाळी गणूला जाग आली. अंगावरच्या त्या मुलायम शालीने तो हरखून गेला. त्या मुलायम स्पर्शाने आईच्या पातळाचा स्पर्श आठवला. डोळे भरून आले. श्वेताने त्याला विचारलं, ‘‘रोते क्यौं?’’ आपल्या इवल्याशा हाताने त्याचे डोळे पुसले. आता तर त्याला आणखीनच रडू यायला लागलं. तिने आईलाच बोलावून आणलं. ‘‘देखो भैय्या रोता है.’’

सुनिताने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला विचारलं, ‘‘काय झालं, भूक लागली का? तू आईबरोबर नाही गेला का?’’

तो फक्त रडत राहिला. सुनिताने त्याला विचारलं, ‘‘चाय पिओगे?’’ तो काहीच बोलला नाही. सुनिता त्याला चहा देण्यासाठी आत गेली. श्वेता त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. पेस्ट देऊन म्हणाली, ब्रश करो. यहा पानी है ।‘

ती बाथरुम पाहून गणू एकदम मूडमध्ये आला. त्यानं नुसतेच दात घासले, खुळखुळ करून तोंड धुतलं.

चहा पिऊन गणूला तरतरी आली. श्वेता सारखी त्याच्या मागेमागेच होती. घरात तिला खेळायला कुणीच साथीदार नव्हतं. मूळचं राजस्थानातलं हे कुटुंब! फारसे आप्तस्वकीय जवळ नव्हते. कामाच्या व्यापात सुनितालाही श्वेताकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे गणू म्हणजे तिच्यासाठी हवाहवासा होता. तसंही त्यांना माणसांचं मोल होतंय. सारा दिवस श्वेता गणूच्या मागंमागंच होती. लकाकत्या डोळ्यांचा, तल्लख बुद्धीचा गणू, मोठा तरतरीत होता. हा बंगला आपलाच आहे अन् तो सोडून जायचं नाही ह्या निर्धारामुळे एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वाला धार आली होती. आत्मविश्वासही होता. एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वानं तिला भारून टाकलं होतं. भैया-भैया करत ती त्याच्या भोवतीच रुंजी घालत होती. गणूबद्दल बालसुलभ निर्व्याज्य प्रेम तिच्या मनात वाटत होतं. तिचे आईवडीलही तश्याच प्रेमानं गणूशी वागत होते.

बघता-बघता दिवस मावळतीला आला. रखमा उतावीळपणे पोटातलं बाळ सांभाळत धावत-धावत आली गणूला न्यायला. बंगल्याची पायरी पण न चढता खालूनच हाक मारत राहिली. गणूला ऐकूही आलं नसावं. ऐकलं तरी त्याला ऐकायचंच नव्हतं म्हणा! श्वेताच त्याच्या आईला पाहून धावत आली. रखमा म्हणाली, ‘‘गणू हाय का?’’ तिनं धावत येऊन गणूला सांगितलं. गणूही धावत बाहेर आला. रखमा म्हणाली, ‘‘चल घरला. तुला न्याया आले मी.’’

गणू तडक म्हणाला, ‘‘म्या न्हाय येणार.’’

श्वेताला काही कळत नव्हतं. श्वेताचे आईवडील दोघेही बाहेर आले. त्यांना गणूच्या आईने सांगितले ती गणूला न्यायला आली आहे. त्यांनी गणूला सांगितलं, पण गणू तेवढाच ठाम होता. नाही जायचं म्हणाला, ते दोघेही म्हणाले, ‘‘राहू दे त्याला. त्याला वाटेल तेव्हा येईल तो.’’ श्वेताला त्यांनी विचारलं, ‘‘जाऊ दे का गणूला?’’ ती तर रडायलाच लागली. रखमाही रडकुंडीला आली. पण गणूला कशाचंच देणंघेणं नव्हतं. शेवटी रखमा माघारी गेली.

आता गणूची चिंताच मिटली. तो बंगल्यातच राहू लागला. श्वेता त्याच्याशिवाय जेवत-खात नव्हती. त्यामुळं त्याच्या पोटाचीही चिंता मिटली. रात्री तो बाहेरच्या ओट्यावर जाऊन झोपला. पण मनिषने त्याला उठवून व्हरांड्यात झोपायला सांगितलं. त्याला अंथरुण, पांघरुण दिलं. दुसर्‍या दिवशी मनिषने गणूसाठी 2 शर्ट-पँट आणले.

गणूवर बहुधा दैव प्रसन्न असावं. त्याच्या अगदी किमान असलेल्या गरजा सहज पूर्ण होत होत्या.

पण ‘‘हा बंगला माझाच आहे’’ हे त्याचं ईप्सित मात्र कसं पूर्ण होणार?

एक आठवड्यानं रखमा अन् धर्मा दोघंही परत आले. रखमाचे दिवस भरत आले होते. तिला कामाला गणूच्या मदतीची गरज होती. पण गणू नाहीच म्हणाला. तो बंगला सोडून जाणं शक्यच नव्हतं. खरंच त्याचं नशीब थोर म्हणून मनिष आणि सुनिता, श्वेता भेटले. त्यांनी मोठ्या मनाने त्याला ठेवून घेतलं. एवढंच नाही, आता जूनमध्ये शाळा सुरू होतील म्हणून त्यांनी गणूच्या शाळेची चौकशी केली. गणू चौथीत गेला होता. त्याला शाळेत पाठवायची पण व्यवस्था त्यांनी केली.

क्रमश: भाग १

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – ३  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(बाहेर वणवण केलीस की मग समजेल, नोकरी मिळणं किती अवघड आहे. जा !आजपासून तुझा हा स्वैराचार मी खपवून घेणारच नाही.. नाही म्हणजे नाही“.)  – इथून पुढे 

नरेंद्रने कित्येक दिवसात ब्रशला हातसुद्धा लावला नव्हता. त्याने शोधाशोध करून सगळे साहित्य जमवले. त्याच्या आधीच्या जुन्या खोलीत गेला. तिथल्या माळ्यावर पडले होते इझल्सआणि वाळून गेलेल्या रंगांच्या  ट्यूबज्. ते बघून नरेंद्रला वाईटच वाटलं. तो आल्याबरोबर घरमालक आले. “ नरेंद्र, चार महिन्यांचं भाडं थकलंय ,कधी देणार? वहिनी आल्याच नाहीत भाडं द्यायला. भाडं द्या नाहीतर लवकर खाली करा खोली बरं का !” नरेंद्र घरी आला. विजूला म्हणाला, “ हे काय,भाडं नाही भरलंस हो ग? तो मालक किती बोलला मला ! “ विजू म्हणाली “ हो? मग भर की तू ! माझा काय संबंध त्या खोलीशी? आता मी अजिबात सगळ्या जबाबदाऱ्या घेणार नाही. मी तुला आधीपासून सांगत होते की आता ती खोली सोडून दे. पण एक लक्षात ठेव.  आता .. म्हणजे आत्ता या क्षणापासून.. माझ्या हातात तू  पैसे ठेवल्याशिवाय मी या घरात येऊच देणार नाहीये तुला. हे घर माझं आहे. रिकामे बसून आयते खाणाऱ्या माणसासाठी नाहीये हे.” .. आज विजू अगदी वेगळीच दिसत होती .. वागत होती. 

नरेंद्रला शॉक बसला हे ऐकून. संध्याकाळी मित्रांच्या अड्ड्यावर गेल्यावर सुभाष लगेच म्हणाला,” पैसे मागायला आला असलास तर असाच परत जा. मागचे पाच हजार उसने घेतलेले कधी देणारेस? देऊ नका रे याला कोणी आता पैसे ! नरेंद्र, अरे काय हे ! सगळ्यांची उधारी कधी आणि कशी फेडणार आहेस तू? आम्हीही कोणी जहागीरदार नाही लागून गेलोत .आम्हाला ताबडतोब परत कर आमचे पैसे ! नुसता आयता बसून खात असतोस बायकोच्या जिवावर? तुला जराही लाज नाही वाटत का रे? त्या बिचारीची दयाच येते आम्हाला ! एखादी असती तर केव्हाच तुला बाहेरचा रस्ता दाखवला असता. कर की काम कुठेतरी ! हातात कला आहे ती वापर ! “ सुभाष अगदी संतापून बोलत होतं….. नरेंद्र घरी आला तर घराला कुलूप होते आणि विजूने नेहमीसारखी किल्लीही शेजारी ठेवली नव्हती ! एक चिट्ठी तेवढी अडकवली होती कुलपात,…. 

“मी आज आईकडे राहणार आहे आणि तिकडूनच बँकेत जाईन उद्या ! “ नरेंद्र चिडचिड करत घराबाहेर पडला. दोन वडा पाव विकत घेतले आणि  टपरीवरच  खाऊन, चहा पिऊन परत वाड्यातल्या खोलीवर गेला. 

कालच त्याला एक जुना मित्र भेटला होता रस्त्यात. एका ऍड कम्पनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी  होती, आणि छान चाललं होतं त्याचं. ‘ तू हल्ली काय करतोस ‘ विचारल्यावर नरेंद्रला  ठोस उत्तर कुठे देता आलं?  हल्ली अनेक दिवसात त्याने काहीही केले नव्हते. भटकणे, मन मानेल तसे वागणे, या पलीकडे त्याने काहीच केले नव्हते .. कष्ट तर केलेच नव्हते.  नरेंद्र त्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, “ मला मिळेल का जॉब तुमच्या कंपनीत? लाज वाटते रे सांगायला, पण मी विजूला फार छळले. ती बिचारी बोलत नव्हती. पण मी कधी  शंभर रुपयेही हातावर ठेवले नाहीत तिच्या. ‘ आहे की बँकेत तिला भरपूर पगार..’  असं म्हणत तिला खूप ओरबाडून घेतलं मी ! पण काल जेव्हा तिने मला शेवटचे अल्टीमेटम् दिले, की ती मला सोडून जाईल, तेव्हा मी हादरलो. ती करारी  आहे आणि नक्की जाईल बघ सोडून मला. बघ माझ्यासाठी काही करता येते का.” मित्राला समजले की याला खरा पश्चाताप दिसतोय झालेला !

“ बघतो रे नक्की, “ मित्र म्हणाला ! तो पूर्ण महिना नोकरी शोधण्यात गेला नरेंद्रचा. इतके सोपे नाही नोकरी मिळणे हे प्रखरपणे जाणवले त्याला. विजू म्हणाली, “ काय झालं नोकरीचं? मी फक्त आणखी एकच महिना वाट बघेन. नाहीतर तू इथे राहायचं नाहीस. माझा तुझ्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय ! तू आणि तुझं नशीब. मी तुला जन्मभर पोसायचा मक्ता नाही घेतला.” आणि विजू तिथून निघून गेली. 

नरेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली. रोज जाहिराती पाहू लागला तो ! अचानक मित्राचा फोन आला की  त्याच्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. सध्या पगार खूप नाहीये, ‘ पण तू घे ही नोकरी ! नंतर बघू या दुसरीकडे.’   नरेंद्रचा रीतसर इंटरव्ह्यू झाला. त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार आणि कामाचे तास जास्त होते. पण नरेंद्रने ही संधी घेतली, आणि तो रुजू झाला कामावर. नरेंद्रच्या हातात कला होती आणि त्याला काम आवडायला लागले.  

एक  महिन्यानंतर त्याचा पगार झाला. नरेंद्रने  सगळा पगार विजूच्या हातात ठेवला. “ विजू, हा पगार खूप कमी आहे, पण मी आणखी चांगली नोकरी नक्की मिळवीन. तू माझे डोळे उघडलेस विजू. नाहीतर मी असाच बसलो असतो तुझ्या जिवावर ऐश करत..मला इतका आनंद झाला ग, ब्रश आणि  पेंटस हातात घेताना. खरंच सॉरी ! मी खूप छळले तुला. मला माफ करशील ना?” विजूचे डोळे भरून आले…  “नरेंद्र,आईअण्णांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न केलं आणि तू जर मला हालातच ठेवणार असलास तर मी  हरले असते रे.  कायम लक्षात ठेव, मी तुझ्यासाठीच आहे, पण तूही माझी जाणीव ठेवली पाहिजेस.  आत्ता ठीक आहे ही नोकरी, पण तू जास्त चांगली नोकरी मिळवू शकतोस. तुझी क्षमता खूप जास्त आहे. तू स्वतंत्र कामही मिळवू शक्यतोस. मला खूप छान वाटले, तुझ्यातला आत्मसन्मान जागा झाला.” 

दुसऱ्या दिवशी हे सर्व कलाला सांगताना विजूला गहिवरून आले. “ कला, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ग ! मी तुझ्याकडे मन मोकळे करायला, तू सल्ला द्यायला ,मला खंबीर राहा असे सांगायला, योग्य वेळ आली. तुझे उपकार कसे फेडू ग बाई?” 

कला म्हणाली, “ फेडशील फेडशील. अजून वेळ आहे. मग हक्काने  मागून घेईन मला हवं ते .बघच !आता नरेंद्र मागे वळून नाही बघणार. त्याच्यातला खरा कलाकार तू जागा केलास, त्याला डिवचून ! आता सगळं छान होईल विजू !”

 

.. …. विजूला हे सगळं आठवलं. नरेंद्र त्या नोकरीतून दुसऱ्या, असे करत खूप चांगल्या नोकरीवर गेला. दरम्यान त्याची मोठी पेंटिंग्ज लोक नावाजू लागले.  आज जहांगीरसारख्या प्रतिष्ठित आर्ट  गॅलरीत नरेंद्रच्या निवडक पेंटिंग्जचे प्रदर्शन होते.  दाराशी विजू,आणि तिची मुलगी सई हसतमुखाने उभी होती. अकस्मात विजूला कला, कलाचा नवरा विश्राम आणि आई अण्णांना हाताला धरून आणणारा नरेंद्र दिसला. त्याच्या हाताला धरून अण्णा येत होते. विजू धावत आई अण्णांजवळ गेली. अण्णांनी नरेंद्र आणि  विजूला जवळ घेतले. नरेंद्रने दोघांना वाकून नमस्कार केला. विजूच्या डोळ्यात अश्रू आले.” पोरी, जिंकलीस हो. नरेंद्र, आज खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतोय तुमचा, जावई म्हणून !”अण्णांनी आपल्या  गळ्यातली  चेन नरेंद्रच्या गळ्यात घातली. “ नरेंद्र, घाला बरं, सासऱ्याची आठवण म्हणून ! अहो, मुलं आपलीच असतात, पण चुकली की आईबाप बोलणारच. यशस्वी झाली की कौतुकही करणारच. बोललो असेन तर राग मानू नका हो ! मुलीत आतडे गुंतलेले असते बरं बापाचे. ती दुःखात असेल तर सहन होत नाही त्या पितृहृदयाला. तुमची ही मुलगी सई, मोठी होईल तेव्हा समजेल तुम्हाला.”   नरेंद्रने  आपल्या लेकीला- सईला जवळ घेतले,आणि म्हणाला, “अण्णा, मी तुमचे शब्द कायम ठेवीन लक्षात. चला आता आत, जावयाच्या प्रदर्शनाचं उदघाटन करायला ! “ …. 

…. हसतमुखाने  विजूने रेशमी फीत कापायला कात्री अण्णांच्या हातात दिली आणि आनंदाने भरलेले डोळे पुसत आई अण्णा  जमलेल्या गर्दीतून आत गेले.

— नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही …… हेच खरं।

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(शहाणपणा करून तिने तिच्या डॉक्टरकडे आधीच जाऊन  उपाय योजले, म्हणून निदान दिवस जाण्याची भीती तरी उरली नाही. ) – इथून पुढे — 

आईला विजूचं अत्यंत वाईट वाटे. पण सांगूनसुद्धा तिने ऐकले नाही, ते आता तिला भोगणे प्राप्त होते. गुणी मिळवती मुलगी आपली, आणि नुसता तिच्या जिवावर जगणारा तो नवरा बघून संताप होई आईचा. पण विजूला हे कुठे समजत होतं? तिचं नरेंद्रवर आंधळ्यासारखं प्रेम होतं. त्याला नवीन ड्रेस घे, त्याच्या पाकिटात गुपचूप  पैसेच ठेव, हे चालूच  होतं तिचं. दरम्यान  विजूला तिच्या घराचा ताबा मिळाला. छोटेसे का होईना, आज तिचे स्वतःचे घर झाले. टू रूम किचन का  होईना, आज हक्काचं घर झालं तिचं. पण त्याचे हप्ते आणि बाकी सर्व खर्च भागवताना नाकी नऊ येत होते विजूच्या.  

बँकेतली अगदी जवळची मैत्रीण  कला तिला म्हणाली, “ विजू,आरशात बघितलं आहेस का अलिकडे?

कशी दिसते आहेस अग? वजन किती कमी झालंय आणि किती ओढला आहे चेहरा. काय झालंय मला सांग. मी त्याशिवाय सोडणार नाही तुला. दोन वर्ष सुद्धा झाली नाही लग्नाला आणि ही दशा तुझी? कधी चांगले ड्रेस घालत नाहीस, कधी हॉटेलमध्ये येत नाहीस. मागच्या महिन्यात साधे दोन दिवसाचे पिकनिक होते तरी आली नाहीस. काय झालंय नक्की? आज मी बँक झाली की तुला घरी नेणार आहे. काहीही कारणे सांगायची नाहीत.” 

विजूला भरून आले. तिला कलाचा आग्रह मोडवेना. इतक्या गोष्टी होत्या सांगण्यासारख्या, पण विजू मनात कुढत होती. विजूला कलाने तिच्या घरी नेलेच. तिच्याचतर एवढी होती कला ! पण डोळे उघडे ठेवून केलेलं लग्न, त्यामुळे आपसूक जमलेली बेरीज आणि पदरात पडलेलं बिनचूक दान. क्षणभर विजूला कलाचा हेवाच वाटला. ही आपल्याहून दिसायला डावी, कशीबशी डिग्री मिळाली आणि नशीब म्हणून  बँकेत नोकरी मिळाली… आपल्या या विचारांची लाज वाटली विजूला. कला स्वभावाने मात्र फार चांगली आणि भाबडी होती. विजूबद्दल फार प्रेम होते तिला. लग्न करायचे ठरवल्यावरही पहिल्यांदा कलाने तिला सावध केले होते, की, ‘ बघ विजू, कुठेही स्थिर नसलेला हा मुलगा तुला काय सुख देणार? तुझी फरपट होईल ग ! अजून नीट विचार कर. अण्णांनी किती चांगला आणलाय तो डॉक्टर, कर की त्याच्याशी लग्न. सुखी होशील विजू तू !’ पण तेव्हा प्रेमाची.. त्यागाची धुंदी चढली होती ना डोळ्यावर ! आणि हा असा निष्क्रिय होत जाईल असं वाटलं तरी होतं का तेव्हा? 

कलाने छान पोहे करून आणले, जवळ बसली आणि म्हणाली, “ शांतपणे खा विजू. मग बोलूया आपण.” कितीतरी दिवसानी कोणीतरी असे आस्थेने गरमागरम खायला देत होते विजूला !

आईकडे  तिला  जावंसंच वाटायचं नाही. काय तेच तेच बोलायचं आणि रडून परत यायचं ! कलाने छान चहा दिला.आणि म्हणाली, “आता सगळं बोलून टाक विजू. अग प्रश्न असेल तिथे उत्तरंही असतात. आपणच शोधायची ती ! होईल सगळं छान ! अशी हरून नको जाऊ.” विजूने भडाभडा सगळं सांगून टाकलं कलाला ! कला आश्चर्यचकित झाली. “ विजू,काय ग हे ! एवढी हुशार शिकलेली मुलगी ना तू ? खुशाल त्याला पोसत बसली आहेस का? अग, त्यामुळे आणखीच ऐदी झालाय तो. मूर्ख आहेस का? असं अजिबात नको वागू ! मी सांगते ते ऐकणार आहेस का? तर बोलते.”  

“ सांग ना कला, म्हणून तर आलेय ना तुझ्याकडे? सगळ्या बाजूने कोंडी झालीय ग माझी. मला संसार मोडायचा नाही ,आणि पराभूत होऊन आईकडेही जायचं नाहीये.,पण मला एकटीला हे ओझे उचलेनासे झालेय ग आता ! “ विजू रडायला लागली. कला तिच्याजवळ बसली.

“ विजू, मी आहे ना तुला? वेडे, आधीच नाही का मला विश्वासात घ्यायचं? किती सहन करत बसलीस. एवढेही समजू नये का, की एखादा आपला जीव जाईपर्यंत फायदा घेतोय. थांब आता ! मी सांगते तसे केलेस तर वाचेल तुझा संसार. करशील का? त्यातून नाही हा उपाय योग्य ठरला तर पुढे बघू. आता धीट हो जरा. अशी मुळूमुळू राहू नकोस .ठणकावून सांग आजच नरेंद्रला, इथे राहायचं तर तुला नोकरी करावी लागेल. मला इतकी इतकी रक्कम द्यावीच लागेल. तरच इथे रहा, नाहीतर जा तुझ्या त्या खोलीत. जरा कठोर हो विजू. काय हे वागलीस वेडे ! तो सोकावलाय ग तुझ्या जिवावर मजा मारायला. तू मात्र दोन्ही बाजूनी जळते आहेस बाई ! मेणबत्ती दोन्हीकडून जळतेय बाळा ! असे स्वतःला जाळू नकोस. आपण त्याला नोकरी लावून देऊ या. माझ्या नवऱ्याच्या आहेत खूप ओळखी ! आधी तू नरेंद्रलाच प्रयत्न करायला लाव. आहे ना चांगला आर्टिस्ट? वापरू दे की ते सगळे स्किल !”…. 

कलाने विजूला खूप समजावले. विजूला धीर आला.  विजू घरी आली, तेव्हा नरेंद्र  खेकसला आणि  म्हणाला, “कुठे ग होतीस इतका वेळ? मला चहा दे आधी. आता यापुढे कधी करणार स्वयंपाक? एक काम धड नाही करत तू.” विजू म्हणाली, “आज मी खूप दमलेय. आता चहा तू कर आणि मलाही ठेव थोडा. आज हवं तर ब्रेड आण आणि खा. मला अजिबात भूक नाही. डोकं अतिशय दुखतंय माझं.” … विजू आतल्या खोलीत निघून गेली.

नरेंद्र रागाने बघतच बसला. हे काय एकदम? अशी नकार देणारी विजू प्रथमच बघितली होती त्याने. तणतणत चहा केला त्याने आणि विजूला नेऊन दिला. विजूला वाटलं, ‘ हे आपण आधीच का नाही केलं? आणि आता कलाने सांगितले तसे वागायला सुरवात  करायचीच. ह्या प्रयोगाने टिकला संसार तर टिकला, नाही तर देईन सोडून. आता अशी मेणबत्तीसारखी नाहीच जळणार. मूर्खपणा झाला माझा तो.’ 

दुसऱ्या दिवशी नरेंद्र म्हणाला, “ मला पैसे देऊन जा ग ! अजिबात नाहीत पाकिटात.” विजू  म्हणाली, “ मी काय सांगते ते नीट ऐक. आता फक्त दोनशे रुपये  देतेय.. पण ते शेवटचे ! यापुढे मी तुला पैसे देणार नाही. बाहेर पड आणि नोकरी शोधायला लाग. यापुढे घरात जर मला दरमहा पैसे दिले नाहीस तर मी  घरात तुला ठेवून घेणार नाहीये. खुशाल त्या जुन्या खोलीत जाऊन रहायचं. अरे किती पिळून घेशील मला? शरम वाटली पाहिजे थोडी. असा नव्हतास रे नरेंद्र तू ! मी प्रेम केलं ते या असल्या स्वार्थी नरेंद्रवर नाही. तुझ्या हातात आयतं सगळं  देऊन तुला आरामात ठेवत राहिले, हे चुकलंच माझं. यापुढे मी हे चालू देणार नाही. तुला जमणार नसेल तर मी सोडून देईन तुला. लोक काहीही म्हणोत. ते नाही येत माझा खर्च भागवायला.  जातेय मी. बाहेर वणवण केलीस की मग समजेल, नोकरी मिळणं किती अवघड आहे. जा ! आणि शेवटचं सांगते आहे .. आजपासून तुझा हा स्वैराचार मी अजिबात खपवून घेणारच नाही .. नाही म्हणजे नाही. “. 

  – क्रमशः भाग दुसरा

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – १  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

 तसं बघितलं तर विजू अगदी सामान्य कुटुंबातली. दिसायला मात्र सुरेख. चार भावंडं होती ती, पण विजू सगळ्यात हुशार आणि सुंदर सुद्धा. निम्न मध्यमवर्गातल्या मुलांना देव उपजत शहाणपण देतो ना, तसं शहाणपण, समजूतदारपणा, हे सगळं त्या चारी भावंडात आपोआप आलं होतंच.

विजू शाळेतसुद्धा फार हुशार होती. शिवण, चित्रकला, फार चांगली होती विजूची. ती बीकॉम झाली आणि तिने बँकेच्या एंट्रन्स दिल्या. तिला दोन बँकांतून कॉल आले.साहजिकच तिने सरकारी बँकेतली नोकरी स्वीकारली. ती खरे तर आणखी खूप शिकू शकली असती, पण आत्ता स्वतःच्या पायावर उभे रहायची आणि पैसे मिळवण्याची नितांत गरज होती तिला. बँकेत रोज बसने जावे लागायचे आणि ती बसच्या प्रतीक्षेत ठराविक वेळी उभी असायची. 

 नरेंद्र तिला रोज बघायचा. रोज बसस्टॉपवर नुसती टाईम पास न करता कोणते ना कोणते पुस्तक वाचणारी ही मुलगी आवडली त्याला ! तो रोज त्याचवेळी बससाठी येतो, हे तिच्या गावीही नव्हते. बस आली की चढायचे आणि जायचे एवढेच सध्या आयुष्य होते तिचे !

 नरेंद्रने हळूहळू तिची ओळख करून घेतली. तीही मोकळी होऊन त्याच्याशी बोलायला लागली. तिला  जवळच्या अशा फारशा मैत्रिणी नव्हत्याच ! नरेंद्रने तिला आपली सगळी कुटुंबाची परिस्थिती सांगितली.

आईवडील खेड्यात, एक बहीण लग्न होऊन विदर्भात गेलेली, त्यामुळे त्याला मुंबईत कोणीच नातेवाईक नव्हते. आर्थिक परिस्थितीही अगदी जेमतेमच ! नरेंद्र होता मोठा कसबी आर्टिस्ट ! हातात कला होती त्याच्या. मासिकाची, पुस्तकांची, कधी नाटकांची जाहिरातकामे करणे, हेच काम होते त्याचे. कायमची नोकरी नव्हती किंवा ठराविक उत्पन्नही नियमित नव्हते. कित्येकवेळा चहाचे पैसेही विजूच द्यायची. 

घरी विजूच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. रात्री अण्णा तिला म्हणाले, “ विजू, आज  दुपारी डॉ. देशपांडे येऊन मला भेटून गेले. ते डॉक्टर ग?आपला  किशोर पडला तेव्हा तू नाही का त्याला लगेच त्यांच्याकडे नेलेस आणि त्याला टाके घालावे लागले? आज ते आलेले बघून आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले,

‘ मी रोज तुमच्या मुलीला बघतो जातायेताना ! मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. तिला विचारा ती तयार आहे का?’ किती छान स्थळ आहे हे विजू ! किती हुशार,उमदा मुलगा दारात आपण होऊन आलाय बघ मग, करायची का पुढची बोलणी? “

विजू शांतपणे म्हणाली, ”अण्णा, थोडं थांबा, मी विचार करून दोनच दिवसात सांगते.”

अण्णा जरा नाराज झाले. इतक्या चांगल्या मुलाला  हो म्हणायला वेळ का घेतेय ही? असेल काहीतरी विचार तिचा, असं म्हणत अण्णा दोन दिवस थांबले. विजूने नरेंद्रला विचारले, ‘ हे असं असं झालंय. तुझा काय विचार आहे ते लगेचच सांग बाबा. नाहीतर अण्णा आता  थांबणार नाहीत.’ 

नरेंद्र म्हणाला, “ मला लग्न तर करायचं आहेच तुझ्याशी, पण तू माझी परिस्थिति बघते आहेस ना? मला रहायला फक्त एक खोली आहे भाड्याची.  मला कायमस्वरूपी नोकरी नाही, त्यामुळे  माझे  शाश्वत उत्पन्न नाही. तुझ्या पगारावरच आपला संसार चालणार हे सत्य आहे. मला जे मिळेल ते मी तुलाच आणून देणार. आत्ता सगळं ठीक वाटतंय  पण हे अवघड जाईल तुला. तरीही  तुझी तयारी असेल तर मी तुझ्या आईवडिलांना भेटतो. मग बघूया काय घडते ते.” 

दुसऱ्या दिवशी नरेंद्र विजूच्या अण्णा आईला भेटायला आला. त्याचे रुप, व्यक्तिमत्व, काहीच आवडले नाही त्यांना. पुन्हा ठराविक उत्पन्न नाही, घर नाही, कसं व्हायचं आपल्या या मुलीचं? त्यांना  प्रश्नच पडला. या मुलात विजूने काय पाहिले हेच त्यांना समजेना. तो गेल्यावर अण्णा म्हणाले, “अवघड आहे असल्या भणंग मुलाशी संसार करणं ! तो काय सिनेमा आहे का? प्रत्यक्ष संसार सुरू करशील तेव्हा जमिनीवर पाय येतील बरं विजू. नको करू असं ! चांगले ते देशपांडे डॉक्टर मागणी घालत आहेत तर हो म्हण ग बाळा . “ 

विजू निक्षून म्हणाली, “ मी याच्याशीच लग्न करणार अण्णा ! तुम्ही साधं कोणताही खर्च न करता लग्न लावून द्या. मला रोख पैसे द्या, त्यातून मी घर बुक करीन. आणि हप्ते भरीन लोन काढून,आमच्या बँकेचं !” 

अण्णा गप्प बसले. त्यांना हे अजिबात पटले नाही. “ अग, हा कसला त्याग? म्हणे मी त्याची परिस्थिति सुधारून दाखवीन. मूर्ख आहेस का? ही कसली जिद्द? याला तद्दन  मूर्खपणा म्हणतात विजू ! पश्चातापाची वेळ नको यायला तुझ्यावर ग बाई !” विजूच्या भावी आयुष्याचा पट त्यांना स्पष्ट दिसला. पण आता ही   ऐकणार नव्हती. 

इतकी सुरेख मुलगी या स्वार्थी माणसाच्या हातात देताना आई वडिलांचा जीव तळमळला. साधे लग्न लावून दिले, शक्य होते तेवढे रोख पैसे तिला दिले आणि विजू नरेंद्रच्या एका खोलीत रहायला गेली.  त्याने काहीही तयारी करून ठेवली नव्हती, की विजूला विचारून चार भांडी, गॅस कुकर आणला होता. विजूने आपल्या  पैशांनी मांडामांडीला सुरवात केली. त्या एका खोलीत स्वयंपाक, नळ नाही त्यामुळे खालून पाणी भरणे, यात विजूची सकाळी अतिशय  धावपळ होई. ‘अरे, निदान पाणी तरी भरून ठेवत जा ना नरेंद्र !’ ती वैतागून म्हणे, पण त्याचा काहीही उपयोग होत नसे. विजू बँकेत काम आणि घरकाम याने भरडून जात होती. मध्यंतरी आई अण्णा तिच्या घरी येऊन गेले. ती एक खोली,ती चार भांडी बघून कपाळाला हातच लावला त्यांनी. श्रीमंत नसले तरी इतके दारिद्र्य नव्हते अण्णांचे. “ विजू,हे काय बघतोय आम्ही?  फ्लॅट बुक केलास ना? निदान तो तरी तुझ्या स्वतःच्या नावावर घे. कठीण आहे बरं सगळं !” हताश झाले अण्णा आणि आई हे बघून. 

पण विजूची कोणतीच तक्रार नव्हती. “अग, निदान गॅस तरी घेऊन जायचास ना आपल्या कडून ! आहेत आपल्याकडे तीन तीन गॅस ! “ विजू काहीच बोलली नाही. आई अण्णा घरी परत आले. अण्णा म्हणाले, “काय ही मुलगी. तुला सांगतो उषा, काही माणसांना आपण जे केलंय ते शेवटपर्यंत नेण्याची जिद्द असते. आपला हा त्याग हीच जिद्द वाटते त्यांना. त्याचीही नशा येते माणसाला. विजूचं तसंच झालंय. आपण गप्प बसून बघूया. तिला जर आपली कोणतीही मदत नकोय, तर आपण काय करू शकतो? तिला तिची चूक पहिल्या महिन्यात समजली असणारच, पण ती कबूल नाही करणार ! बसेल झगडत.” अण्णा उद्वेगाने म्हणाले. उषाबाईना अत्यंत वाईट वाटले. गप्प बसण्याखेरीज त्या तरी काय करणार होत्या? दिवाळसणाला अण्णांनी जावई-लेकीला बोलावले. यथोचित आदर केला. विजूला त्यांनी  स्कूटीच्या किल्ल्या दिल्या.

“ विजू,ही तुला दिवाळसणाची भेट. आता बसने अजिबात जायचे नाही.”  विजूचे डोळे भरून आले. “अहो कशाला अण्णा? मी मोटारसायकल घेणारच होतो यंदा !” नरेंद्र म्हणाला.अण्णा काहीही बोलले नाहीत. फक्त म्हणाले,” विजू ही फ़क्त तू वापरायचीस.” 

त्या स्कूटीने विजूचं काम हलकं झालं.  तिच्या बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळायला अजून एक वर्ष होतं.  त्या एका खोलीत जीव नुसता उबून जाई तिचा. लग्नाला वर्ष होत आलं तरी नरेंद्रने तिच्या हातात म्हणावे असे पैसे नव्हतेच ठेवले. कंटाळून गेली विजू. आता बोलून आणि भांडून काही उपयोग नव्हताच.

उलट नरेंद्र आता काम मिळवायच्याही भानगडीत पडेनासा झाला. विजूचा पगार आयता येत होताच. ती सगळे खर्च भागवत होतीच.  शहाणपणा करून तिने तिच्या डॉक्टरकडे आधीच जाऊन  उपाय योजले, म्हणून निदान दिवस जाण्याची भीती तरी उरली नाही. 

– क्रमशः भाग पहिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बा…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘बा…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये एका नातेवाईकाला भेटून अंजली बाहेरच्या दिशेनं भराभर निघाली होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती तिथं आली होती आणि आता सात वाजून गेले होते.  ठाकुर्लीला घरी पोचायचं म्हणजे

साडेआठ तरी होणार या विचारात तिची पावलं वेगानं पडत होती. त्यामुळे आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे तिचं  लक्ष नव्हतं. पण कशी कोण जाणे तिची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका बाईकडे गेली आणि ती क्षणभर  थबकली. गुजराती साडी नेसलेल्या त्या बाईचा चेहरा एकदम ओळखीचा वाटला, पण नेमकं कुठे पाहिलंय तिला हे काही आठवत नव्हतं. त्या बाईच्या चेहऱ्यावरही ओळखीचे भाव उमटले आहेत असं  वाटलं,

पण उलगडा होत नव्हता.

तेवढ्यात ती बाईच म्हणाली, दादर स्टेशनलाच जाणार ना, चला सोबतच जाऊ. मी रोज सकाळी बघते ना तुम्हाला ठाकुर्ली स्टेशनवर. आणि अंजलीची ट्यूब पेटली. रोज सकाळी ती ९.०२ ची लोकल पकडायला ठाकुर्ली स्टेशनला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर यायची, तेव्हा एक नंबर प्लॅटफॉर्मवर

लेडीज फर्स्टक्लास समोरच्या बाकावर ही बाई बसलेली असायची. तिच्या बाजूला तिचा मुलगा वाटेल असा एक पुरूष उभा असायचा. काही वेळा ही बाई  हळू आवाजात काहीतरी बोलत असायची त्याच्याशी, पण एकतर ती  गुजरातीत बोलत असायची आणि अंजली गाडी पकडण्याच्या घाईत, त्यामुळे ती दोघं काय बोलतात, हे कधी कळण्याचा प्रश्नच नव्हता आणि अंजलीला त्याच्याशी काही देणं – घेणंही नव्हतं.

बाई तशी सज्जन, घरंदाज वाटत होती. दादर पर्यंत टॅक्सीनं  सोबत जायला अंजलीची काही हरकत नव्हती.

म्हणून दोघी टॅक्सीनं दादरला आल्या. त्या बाईनं उतरताना पटकन टॅक्सीचे पैसे दिले, तशी अंजलीला संकोच वाटला. तिनं निदान अर्धे पैसेतरी घ्यावे, म्हणून अंजलीनं सुचवलं.’ राहू दे ना बेटी,’ असं म्हणत तिनं हातानं अंजलीला थोपवलं, तसं अंजलीचा नाईलाज झाला. प्लॅटफॉर्मवर समोरच दादर – कल्याण गाडी उभी होती. ठाण्यानंतर ती स्लो असल्याने अंजलीला ठाकुर्लीला उतरायला सोईचीच होती. तिच्या पाठोपाठ ती गुजराती बाईही लेडिज फर्स्टक्लासमध्ये चढली आणि अंजलीच्या समोरच्या सीटवर बसली. ऑफिस टाईम उलटून गेल्याने गाडीला गर्दीही बेताची होती.

त्या बाईनं अंजलीला विचारलं कोण अ‍ॅडमिट आहे हाॅस्पिटलमध्ये? तसं अंजलीनं आपल्या चुलत काकांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं. तिनंही मग साहजिकच त्या बाईंची चौकशी केली.’  हं, कोण म्हणून सांगू बेटा? म्हटलं तर मुलगा, म्हटलं तर काहीच नातं नाही. ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत बेटा या.’ अंजलीच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव आणि उत्सुकता बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

त्यांचं नाव हंसाबेन जयंतीलाल जैन असं होतं. त्यांची अंबरनाथ ते ठाणे परिसरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सात-आठ दुकानं होती. त्यांचे पती आणि दोन्ही मुलं हा सगळा व्याप सांभाळत होते. डोंबिवलीत, ठाकुर्लीला त्यांचा स्वतःचा प्रशस्त बंगला होता. दोन्ही मुलं, सुना, नातवंडं असा मोठा परिवार होता. लग्न झालेली मुलगी पलक, नाशिकला होती.

बेटी, या पलकचं आणि रितेशचं लग्न ठरलं होतं. रितेशचं कुटुंब अहमदाबादचं. तिथे त्यांचा कापडाचा मोठा धंदा होता. पण रितेशच्या बाबांनी स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला, म्हणून घरातल्यांनी त्यांना घरातून आणि धंद्यातूनही बेदखल केलं. रितेशची आई गुजरातीच, पण गरीब घरातली होती. तिला सासरच्यांनी स्वीकारलं नाही. म्हणून रितेशचे आई-वडील सुरतला आले आणि त्यांनी तिथं कापड व्यवसायात आपलं बस्तान बसवलं. काही वर्षांनी तिथंच मोठं घरही बांधलं. रितेशला कापड धंद्यात रस नव्हता. त्याला ज्वेलरीच्या धंद्याचं आकर्षण होतं. बारावी झाल्यावर नशीब आजमावायला आणि या धंद्याचा अनुभव घ्यायला तो मुंबईत आला. सुरतच्या जयंतीलालच्या कोणा नातेवाईकाच्या ओळखीने तो जयंतीलालजींच्या व्यवसायात पगारी मदतनीस म्हणून काम करू लागला. डोंबिवलीत भाड्याचं घर घेऊन राहण्याचा त्याचा विचार होता. पण जयंतीलालजींचा बंगला भरपूर मोठा होता. त्यांनी त्यातलीच एक खोली रितेशला राहायला दिली. त्याचं जेवणही या कुटुंबातच होत होतं. एवढ्या दहा जणांच्या कुटुंबात एक माणूस काही जड नव्हता.  हंसाबेनही रितेशला आपल्या मुलांसारखंच वागवत होत्या.

हळूहळू रितेश धंद्यात पारंगत झाला. तोआता स्वतःचं दुकान काढण्याची तयारी करत होता. भांडवल जमा करत होता. त्याला हिऱ्यांची विशेष पारख होती, हे जयंतीभाईंच्या लक्षात आलं होतं आणि त्याचं त्यांना कौतुकही वाटत होतं.

पलकचंही शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं. मग तिनं ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला होता. घरच्याच व्यवसायात आपल्या कौशल्याचा उपयोग ती करू लागली होती. तिने डिझाईन केलेल्या दागिन्यांना लोकांची पसंती मिळत होती आणि मागणी वाढत होती.

तिच्या लग्नाच्या दृष्टीने हंसाबेनची मुलांची चाचपणी करायला सुरुवात केली होती. रितेशचा विचार करायला काय हरकत आहे, असं हंसाबेनच्या डोक्यात आलं आणि त्यांनी तसं आपल्या नवर्‍याला सुचवलं देखील.

रितेशच्या एकूण प्रगतीवर जयंतीलाल खूष होतेच. तेव्हा रितेशशी आधी बोलून मग त्याच्या आई-वडिलांशी बोलायचं त्यांनी ठरवलं.

इकडे एकाच घरात राहात, संपर्कातअसल्याने, हंसाबेनची पलक आणि रितेशही एकमेकांना आवडू लागले होते. त्यामुळे रितेशच्या पसंतीचा प्रश्न सहज सुटला. रितेश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा.त्यामुळे त्याच्या पसंतीला ते हरकत घेणार नव्हतेच. शिवाय पलकला नाकारण्यासारखं काही नव्हतंच. तिचं दिसणं, वागणं-बोलणं सारंच लाघवी होतं. शिवाय व्यवसायाचं ज्ञानही रितेशच्या धंद्यात उपयोगी पडणार होतं. आता फक्त मुहुर्त काढायचाच अवकाश होता. पण आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच, तसंच झालं बघ!

लग्नानंतर आई-वडिलांनी आपल्या सोबत राहावं अशी रितेशची इच्छा होती. त्यांनाही त्यात आनंदच होता. त्यांचे बाकीचे नातेवाईक आधीच  दुरावलेले होते. आपला तिथला व्यवसाय बंद करून रितेशसोबत

राहायला येण्याचं त्यांनी आनंदानं मान्य केलं होतं. रितेशही त्या दृष्टीने डोंबिवली – ठाणे परिसरात घर आणि दुकानासाठी जागा शोधत होता.

मार्च २००३ची गोष्ट आहे ही!  सुरतचं आपलं दुकान विकून ते पैसे घेऊन रितेशचे आई-बाबा इकडे यायला निघाले.  संध्याकाळी मुंबई-सेंट्रलला उतरून टॅक्सीने ते दादरला आले आणि तिथून ठाकुर्लीला  येण्यासाठी त्यांनी दुसरी ट्रेन पकडली.  सुरतचा रितेशचा एक मित्र पण  त्यांच्यासोबत होता. त्याला दादरला जायचं होतं. त्यानेच त्यांना दादरला गाडीत बसवून दिलं आणि दुकानात फोन करून आई-बाबा येत असल्याचं  रितेशला कळवलं होतं. म्हणून पलक आणि रितेश दोघंही त्यांना घ्यायला ठाकुर्ली स्टेशनवर येऊन उभे राहिले. पण नशिबाने डाव साधला. मुलुंड स्टेशनला त्यांची ट्रेन पोचत असतानाच त्या गाडीत बाॅम्बस्फोट झाला. रितेशचे आई-वडील त्यातच गेले.

देह इतके छिन्न विच्छिन्न झाले होते की ओळख पटवणंही मुश्किल होतं.

रितेशच्या मित्राला बाॅम्बस्फोट झाल्याचं कळलं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो डोंबिवलीला आला. त्याच्या मदतीनेच  कपड्यांच्या अवशेषावरून  रितेशच्या आईबाबांची कशीबशी ओळख पटली.

या प्रसंगाने रितेशला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला आई-वडिलांशिवाय कोणंच नाही ना! त्याची स्मृती नष्ट झाली. तो फक्त मला बा म्हणून मिठी मारायचा आणि विचित्र रडायचा. माझा हात घट्ट धरून ठेवायचा. बाकी कोणालाच तो ओळखेना. तीन-चार वर्षे त्याच्यावर उपचार चालू होते. त्यानंतरही त्याची स्मृती परत आली नाही. तो ठीक होईल का नाही याबाबत डाॅक्टरही निश्चित सांगू शकत नव्हते. आम्ही त्याच्या काका वगैरेंना शोधून, संपर्क करून, सर्व परिस्थिती सांगितली, पण त्यांनी जराही आपुलकी दाखवली नाही, या पोरक्या मुलासाठी. मग आम्हीच त्याला सांभाळायचं ठरवलं. बाम्हणून गळ्यात पडून रडणार्‍या लेकराला मी कसं दूर करणार? आईचं ह्रदय आहे ना माझं, लेकराचं दुःख जाणणारच ना?

पलकची कशीबशी समजूत घालून आम्ही तिला लग्नाला तयार केलं आणि सगळी खरी हकीकत सांगून

नाशिकच्या शहा कुटुंबात तिचं लग्न करून दिलं. तिचं सगळं आता मार्गी लागलंय.

रितेशवर उपचार करण्यात आम्ही कोणतीच कसर ठेवली नाही. मोठमोठे न्यूरोसर्जन झाले, मानसोपचारतज्ज्ञ झाले. देवधर्म, नवस, कोणी काय सांगेल ते सगळं केलं. असंच एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं म्हणून मी त्याला ठाकुर्ली स्टेशनवर घेऊन गेले. जिथे मी रोज सकाळी तुम्हाला दिसते ना तिकडे तो मला ओढत घेऊन गेला. तिथे बसून खूप ओक्साबोक्शी रडला मला मिठी मारून! नंतर कसंबसं दादापुता करून मी त्याला घरी घेऊन गेले. पण त्या दिवसानंतर त्याचं रडणं- ओरडणं हळूहळू कमी झालं.बोलत काही नव्हता, पण मी दिलेलं शांतपणे खायला लागला. औषधही कटकट न करता घ्यायला लागला, पण मी दिली तरच! बाकी कोणाला जवळ फिरकू देत नसे की कोणाचं काही ऐकत नसे. मी लहान लेकरासारखं त्याला सांभाळलं.माझी सत्त्वपरीक्षाच होती. तो झोपल्याखेरीज मला इतर काही करताच यायचं नाही. मग मी रोजच सकाळी त्याला ठाकुर्ली स्टेशनला घेऊन येऊ लागले. एकदा सकाळी तिथे नेऊन आणलं की दिवसभर तो शांत राहतो.

औषधांचा उपयोग म्हणा की आणखी काही! पण हळूहळू तो कामापुरतं बोलू लागला, म्हणजे जेवण दे, आता झोपतो वगैरे. त्याला मागचं काही आठवत नाही. पण आता स्वतःचं स्वतः व्यवस्थित करतो. यांच्यासोबत दुकानात जाऊन  नुसता शांतपणे बसून राहतो. पण आता आमचंही वय वाढतंय. हे सगळं कुठवर झेपणार?

आता जर्मनीतून कोणी न्यूरोसर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ आले आहेत हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये . त्यांनी खूप विचित्र पेशंटना बरं केलं आहे. आम्ही रितेशला आधीही इथे ट्रिटमेंटसाठी नेलं होतं. इथले डाॅक्टर्स त्याच्या केसचा अभ्यास करत आहेत. त्यांनीच या विशेषज्ञांना बोलावून घेतलं आणि आम्हाला कळवलं.  चोवीस तास एक नर्स असतेच. डाॅक्टरही येऊन-जाऊन असतात. शिवाय माझ्या घरच्यांनाही माझी काळजी वाटते ना.रात्रीचं मला इथे थांबू देत नाहीत. आणि त्यांनाही थोडावेळ दिला पाहिजे ना मी? म्हणून संध्याकाळी घरी परत जाते. सकाळी लवकर उठून इथे येते. दोन दिवसांपूर्वी रितेशला इथे अ‍ॅडमिट केलंय. बघू त्याला काही फायदा होतो का?

पण माझं  आईचं वेडं मन एकीकडे असंही म्हणतं की त्याला काही आठवत नाही तेच बरंय ना? सगळं आठवलं तर माझं लेकरू हे दुःख पेलू शकणार नाही ग! आणि त्यातून त्याला सावरायला माझी ताकदही पुरी पडेल की नाही कोणजाणे. हंसाबेनच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

ऐकता ऐकता अंजलीचेही डोळे भरून आले होते. कोणावर कधी काय वेळ येईल, खरंच सांगता येत नाही.

बाहेर बघण्याच्या बहाण्याने तिने आपले अश्रू पुसले आणि तेवढ्यात  ठाकुर्लीचा बोर्ड तिला दिसला, गाडी स्टेशनात शिरून थांबत होती.

गाडीतून उतरताना तिने अगदी सहजपणे हंसाबेनचा हात धरून त्यांना उतरवलं आणि मनोमन या बाला साष्टांग नमस्कार घातला.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तिकडे सुश्रिया झाडाच्या फांदीवर बसून मस्त झोके घेत होती. तिथून तिला स्वयंपाकघरात काम करणारी आई दिसत होती. तिची स्वयंपाक करायची गडबड सुरू होती. सुश्रिया पंख पसरून मस्त भरारी मारून आली. हिरवी हिरवी झाडं, त्यावरची रंगीबेरंगी नाजूक नाजूक फुलं तिला खूप आवडली. तिच्या पलीकडच्या फांदीवर एक पक्षी चोचीनं किडा खात होता. ईऽऽई सुश्रिया मनात म्हणाली. आपण आता किडे खायचे? पटकन ती आपल्या घराच्या खिडकीजवळच्या फांदीवर आली. आईच्या पोळ्या करून झाल्या होत्या. आता तिच्या आवडीच्या काचर्या करत होती. सुश्रियाच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले. अं! आता मो आत कशी जाणार? पोळी कशी खाणार? सुश्रियाला रडायला आलं. तेवढ्यात आई म्हणाली, “ए सुश्रिया, इतकं वाकडं रडवेलं तोंड करून का बसलीस? ये बरं पटकन पोळी खायला.” सुश्रियानं डोळे किलकिले करून पाहिले. अरेच्चा! पुस्तक वाचता वाचता डुलकी लागली अन् स्वप्न पडले की काय? बरे झाले, आपण पक्षी नाही ते!”

दुसर्या दिवशी सगळ्यांनी आपले मनोगत वाचून दाखवले. बाई एकदम खूष! “शाब्बास मुलांनो, सगळ्यांनी छान लिहीलंय आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आपण मानव असल्याचे महत्त्व समजलंय. हो ना! आता एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून तुमच्याकडे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कसं ते बघा हं, आर्यनकडे घोड्यासारखी चपळता आहे. त्याचा उपयोग त्याने बॅडमिंटन सारख्या खेळात करून शाळेला, राष्ट्राला आणि देशाला बक्षीस मिळवून द्यायचं, देशाचं नाव उज्ज्वल करायचं. अवनी, सुश्रियाला उडायला आवडतं, त्यांनी त्यांना जे करायला येतं, आवडतं, त्यामध्ये उंच भरारी घ्यायची. राधानं मनीमाऊ सारखं नुसतं झोपायचं नाही, तर जे करायचं ते तल्लीन होऊन, एकाग्रचित्तानं करायचं.  ती गाणी छान म्हणते, पेटी वाजवते. ते चांगल्यात चांगलं करायचं. रमाला वाचायला आवडते ना, तिने मोठ्या लोकांची, शास्त्रज्ञांची चरित्रे वाचायची आणि खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवून शास्त्रज्ञ व्हायचं, शोध लावायचा आणि आमचा ऑल राऊंडर अथर्व इतका हुशार आहे, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काहीही करू शकेल. बाॅडी बिल्डर होईल, क्रिकेटीयर होईल किंवा डाॅक्टर, इंजिनियरसुद्धा बनेल. तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. त्या हुशारीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करा आणि आपल्या शाळेला, देशाला खूप मोठ्ठं करा. ठीक आहे? आता आपण उद्या भेटू.”

सगळ्यांचे मोबाईल बंद झाले. पण प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे खूप मोठ्ठं होण्याचं स्वप्न दिसत होतं.

 – समाप्त –

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

आपले दोन्ही हात उंचावत अथर्व ओरडला, “हेऽऽ किती छान. आजी, आई आता मला कोणी डिस्टर्ब करू नका हं. बाईंनी सांगितलंय त्याचा मी विचार करणार आहे” आणि हाताची घडी घालून डोळे मिटून विचार करायला लागला. प्रत्येकाच्या घरी तीच अवस्था. अथर्वला वाटलं, खरंच मी हत्तीचं पिल्लू झालो तर मला क्रिकेट खेळता येईल का? प्रत्येक बाॅलला सिक्सर हाणीन. वाॅव केवढा स्कोअर होईल माझा. सचिन आणि कोहलीपेक्षा जबरदस्त! पणऽ पण हत्ती झालो तर ह्या घरी कसं राहता येईल मला? आई, बाबा, आजी कसे भेटतील? माझ्या बर्थडे ला आई केक कसा देणार? बाबा नवीन शर्ट कसे आणतील? नको रे बाबा, मी आहे तो अथर्वच चांगला.

तिकडे रमाही स्वप्नामध्ये रमली. “आहाऽऽ मासा झाले तर मला सारखे पोहायला मिळेल. पाण्यातले इतर मासे माझे मित्र-मैत्रिण होतील. ओऽ पण खायचे काय? आईनं इडली, लाडू केले तर मला कसे खायला मिळणार? आणि पाण्यात सारखं राहून सर्दी झाली तर? ताप आला तर? नको रे बाबा, कोरोनाचं संकट नकोच आपल्याला. त्यापेक्षा बाबा सांगतात तसे घरी राहू आणि स्वस्थ राहू. शिवाय गाणी म्हणता येणार नाहीत. पुस्तकं वाचायला मिळणार नाहीत. नको बाई, मी आपली रमाच बरी.”

आर्यनच्या डोळ्यांपुढे सगळ्या हायस्पीड गाड्यांपुढे आपण पांढराशुभ्र घोडा होऊन सुसाट धावतोय, हे चित्र दिसायला लागले. क्षणात त्याच्या मनात विचार आला, ओऽ, पण दमल्यावर खायचे काय? ओन्ली ग्रीन ग्रास?! ओ, नो नेव्हर! पटकन त्याने आपल्या पळत्या पायांना ब्रेक लावला. नको रे बाबा, घोडा झालो तर नो बॅडमिंटन, नो स्कूल आणि हो, त्या आजी-आजोबांकडेही जायला मिळणार नाही. तिकडे झाडावर चढता येणार नाही. धमाल करता येणार नाही. आपले फ्रेंड्स भेटणार नाहीत. आपण घोडा झालो तर आई रडेल, बाबा कुठे शोधतील? नाना-नानी किती काळजी करतील? आपण आहोत तसेच चांगले आहोत.”

राधाही खुशीखुशीत आपल्या अंगाचं वेटोळं करून आपलं मऊ मऊ पांढरं शुभ्र अंग चाटत मनीमाऊ होऊन कोपर्यात बसली. पटकन डोळे मिटून गेले आणि झोपही लागली तिला. थोड्या वेळानं काठी घेऊन आई आली आणि “शुक शुक, जा गं मने” म्हणून तिच्यावर उगारली. “म्याऊ, नको गं आई, मारू नको मला” म्हणून रडायला लागली. आईनं हलवून जागं केलं राधाला. “राधा, उठ आज बाईंना लिहून द्यायचंय ना? उठ” “ओऽ म्हणजे मी राधाच आहे तर. देवा, मला राधाच राहू दे हं! मनी माऊ नको.” म्हणत राधा उठली.

खिडकीतून टक लावून बाहेर बघत असलेली अवनी एकदम सुंदरसे फुलपाखरू होऊन या फुलावरून त्या फुलावर भिरभिर उडायला लागली. आपले नाजूक नाजूक रंगीबेरंगी पंख तिला खूप आवडले. आऽहाऽ किती छान वाटतंय. फुलांवर अलगद बसायला मस्त वाटतं, पण गुलाबाच्या झाडाचा टोकदार सुईसारखा काटा बोचला तर? पंख फाटला तर? बापरे, काय करायचे? घरी कसे जायचे? अरेच्चा, आजीने आपल्याला बिस्कीटे बरणीत भरायला सांगितलीत ना? पण आता तर हात नाहीत! कशी भरू बिस्कीटं? “आगं अवनी, किती तंद्री लावून बसलीस! एक काम आजीचं करत नाहीस.” आई पाठीत धपाटा घालत म्हणाली. भानावर येत अवनी आपल्या हातांकडे पाहात हसत म्हणाली, “अगं, नो प्रॉब्लेम, भरते मी आता. बागेत उडून आले गं जराशी, पण पुन्हा नाही हं जाणार.” अवनीच्या या असल्या येडपट बोलण्याकडे आई आश्चर्याने पाहातच राहिली.

क्रमशः…

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

पिंजर्यात कोंडलेल्या प्राण्यांप्रमाणे या वर्षी सगळ्या मुलांची अवस्था झाली होती. सारखे सारखे घरी बसून कंटाळा आला होता. गणपती आले आणि गेले सुद्धा! मुलांना काॅलनीमधल्या, बिल्डींगमधल्या गणपतीबाप्पाची आरती मनसोक्त करायला मिळालीच नाही. प्रसादाच्या खाऊची गंमत नाही की कुठली स्पर्धा नाही. बाप्पा घरी गेल्याबरोबर घरी बसून ऑनलाईन शाळा सुरू.

अथर्वनं आज ठरवलंच होतं, बाईंना आज काही म्हणजे काही शिकवू द्यायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. मोठ्या उत्साहात तो स्क्रीनसमोर बसला. वर्गातली सगळी मुलं दिसल्यावर बाईंनी बोलायला सुरूवात केली. “मुलांनो, आज तुम्हाला असं वाटतंय ना गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हालाऽ” “नको तो अभ्यास, नको ते शिकणे”. अथर्व जोरात ओरडला, “होऽय. नकोच आहे अभ्यास.”

आई-बाबांनी आणि आजींनी चमकून अथर्वकडे पाहिलं. आज काय झालं याला? एवढा जोरात का ओरडतोय? तेवढ्यात तिकडे बाई पण जोरात म्हणाल्या, “आज मुळी नाहीच करायचा अभ्यास.” सगळी मुलं खुष. अथर्वच्या चेहर्यावर आनंद पसरला. बाई आता काय सांगताहेत, याकडे मोठ्ठे डोळे करून तो पहायला लागला आणि मनापासून ऐकायला लागला. बाई म्हणाल्या, “तुम्ही सगळ्यांनी उद्या मला, तुम्हाला आपण काय असतो तर आवडलं असतं, ते सांगायचं. म्हणजे बघा हं, अवनीला वाटतं, मी फुलपाखरू असायला पाहिजे होतं. रमाला वाटतं, मी पाण्यातला मासा असते तर किती छान झालं असतं. आर्यन सांगेल तो घोडा असता तर गाडीपेक्षा जोरात, हाय स्पीडनं धावला असता. राधा म्हणेल, नाही बाई, मी आपलं मनीमाऊचं पिल्लूच होणार. सुश्रियाला पक्षी होऊन उंच आकाशात उडायला आवडेल. अथर्वला वाटेल हत्तीचं पिल्लू होऊन सोंडेनं पाणी मारायला मिळेल. जंगलात फिरायला मिळेल. ओके? आता सगळ्यांनी मोबाईल बंद करायचा आणि शांतपणे विचार करायचा. आपल्याला काय वाटतं, ते वहीमध्ये लिहायचं आणि उद्या वाचून दाखवायचं. अंडरस्टूड?”

क्रमशः…

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print