सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘बा…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये एका नातेवाईकाला भेटून अंजली बाहेरच्या दिशेनं भराभर निघाली होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती तिथं आली होती आणि आता सात वाजून गेले होते.  ठाकुर्लीला घरी पोचायचं म्हणजे

साडेआठ तरी होणार या विचारात तिची पावलं वेगानं पडत होती. त्यामुळे आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे तिचं  लक्ष नव्हतं. पण कशी कोण जाणे तिची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका बाईकडे गेली आणि ती क्षणभर  थबकली. गुजराती साडी नेसलेल्या त्या बाईचा चेहरा एकदम ओळखीचा वाटला, पण नेमकं कुठे पाहिलंय तिला हे काही आठवत नव्हतं. त्या बाईच्या चेहऱ्यावरही ओळखीचे भाव उमटले आहेत असं  वाटलं,

पण उलगडा होत नव्हता.

तेवढ्यात ती बाईच म्हणाली, दादर स्टेशनलाच जाणार ना, चला सोबतच जाऊ. मी रोज सकाळी बघते ना तुम्हाला ठाकुर्ली स्टेशनवर. आणि अंजलीची ट्यूब पेटली. रोज सकाळी ती ९.०२ ची लोकल पकडायला ठाकुर्ली स्टेशनला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर यायची, तेव्हा एक नंबर प्लॅटफॉर्मवर

लेडीज फर्स्टक्लास समोरच्या बाकावर ही बाई बसलेली असायची. तिच्या बाजूला तिचा मुलगा वाटेल असा एक पुरूष उभा असायचा. काही वेळा ही बाई  हळू आवाजात काहीतरी बोलत असायची त्याच्याशी, पण एकतर ती  गुजरातीत बोलत असायची आणि अंजली गाडी पकडण्याच्या घाईत, त्यामुळे ती दोघं काय बोलतात, हे कधी कळण्याचा प्रश्नच नव्हता आणि अंजलीला त्याच्याशी काही देणं – घेणंही नव्हतं.

बाई तशी सज्जन, घरंदाज वाटत होती. दादर पर्यंत टॅक्सीनं  सोबत जायला अंजलीची काही हरकत नव्हती.

म्हणून दोघी टॅक्सीनं दादरला आल्या. त्या बाईनं उतरताना पटकन टॅक्सीचे पैसे दिले, तशी अंजलीला संकोच वाटला. तिनं निदान अर्धे पैसेतरी घ्यावे, म्हणून अंजलीनं सुचवलं.’ राहू दे ना बेटी,’ असं म्हणत तिनं हातानं अंजलीला थोपवलं, तसं अंजलीचा नाईलाज झाला. प्लॅटफॉर्मवर समोरच दादर – कल्याण गाडी उभी होती. ठाण्यानंतर ती स्लो असल्याने अंजलीला ठाकुर्लीला उतरायला सोईचीच होती. तिच्या पाठोपाठ ती गुजराती बाईही लेडिज फर्स्टक्लासमध्ये चढली आणि अंजलीच्या समोरच्या सीटवर बसली. ऑफिस टाईम उलटून गेल्याने गाडीला गर्दीही बेताची होती.

त्या बाईनं अंजलीला विचारलं कोण अ‍ॅडमिट आहे हाॅस्पिटलमध्ये? तसं अंजलीनं आपल्या चुलत काकांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं. तिनंही मग साहजिकच त्या बाईंची चौकशी केली.’  हं, कोण म्हणून सांगू बेटा? म्हटलं तर मुलगा, म्हटलं तर काहीच नातं नाही. ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत बेटा या.’ अंजलीच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव आणि उत्सुकता बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

त्यांचं नाव हंसाबेन जयंतीलाल जैन असं होतं. त्यांची अंबरनाथ ते ठाणे परिसरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सात-आठ दुकानं होती. त्यांचे पती आणि दोन्ही मुलं हा सगळा व्याप सांभाळत होते. डोंबिवलीत, ठाकुर्लीला त्यांचा स्वतःचा प्रशस्त बंगला होता. दोन्ही मुलं, सुना, नातवंडं असा मोठा परिवार होता. लग्न झालेली मुलगी पलक, नाशिकला होती.

बेटी, या पलकचं आणि रितेशचं लग्न ठरलं होतं. रितेशचं कुटुंब अहमदाबादचं. तिथे त्यांचा कापडाचा मोठा धंदा होता. पण रितेशच्या बाबांनी स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला, म्हणून घरातल्यांनी त्यांना घरातून आणि धंद्यातूनही बेदखल केलं. रितेशची आई गुजरातीच, पण गरीब घरातली होती. तिला सासरच्यांनी स्वीकारलं नाही. म्हणून रितेशचे आई-वडील सुरतला आले आणि त्यांनी तिथं कापड व्यवसायात आपलं बस्तान बसवलं. काही वर्षांनी तिथंच मोठं घरही बांधलं. रितेशला कापड धंद्यात रस नव्हता. त्याला ज्वेलरीच्या धंद्याचं आकर्षण होतं. बारावी झाल्यावर नशीब आजमावायला आणि या धंद्याचा अनुभव घ्यायला तो मुंबईत आला. सुरतच्या जयंतीलालच्या कोणा नातेवाईकाच्या ओळखीने तो जयंतीलालजींच्या व्यवसायात पगारी मदतनीस म्हणून काम करू लागला. डोंबिवलीत भाड्याचं घर घेऊन राहण्याचा त्याचा विचार होता. पण जयंतीलालजींचा बंगला भरपूर मोठा होता. त्यांनी त्यातलीच एक खोली रितेशला राहायला दिली. त्याचं जेवणही या कुटुंबातच होत होतं. एवढ्या दहा जणांच्या कुटुंबात एक माणूस काही जड नव्हता.  हंसाबेनही रितेशला आपल्या मुलांसारखंच वागवत होत्या.

हळूहळू रितेश धंद्यात पारंगत झाला. तोआता स्वतःचं दुकान काढण्याची तयारी करत होता. भांडवल जमा करत होता. त्याला हिऱ्यांची विशेष पारख होती, हे जयंतीभाईंच्या लक्षात आलं होतं आणि त्याचं त्यांना कौतुकही वाटत होतं.

पलकचंही शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं. मग तिनं ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला होता. घरच्याच व्यवसायात आपल्या कौशल्याचा उपयोग ती करू लागली होती. तिने डिझाईन केलेल्या दागिन्यांना लोकांची पसंती मिळत होती आणि मागणी वाढत होती.

तिच्या लग्नाच्या दृष्टीने हंसाबेनची मुलांची चाचपणी करायला सुरुवात केली होती. रितेशचा विचार करायला काय हरकत आहे, असं हंसाबेनच्या डोक्यात आलं आणि त्यांनी तसं आपल्या नवर्‍याला सुचवलं देखील.

रितेशच्या एकूण प्रगतीवर जयंतीलाल खूष होतेच. तेव्हा रितेशशी आधी बोलून मग त्याच्या आई-वडिलांशी बोलायचं त्यांनी ठरवलं.

इकडे एकाच घरात राहात, संपर्कातअसल्याने, हंसाबेनची पलक आणि रितेशही एकमेकांना आवडू लागले होते. त्यामुळे रितेशच्या पसंतीचा प्रश्न सहज सुटला. रितेश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा.त्यामुळे त्याच्या पसंतीला ते हरकत घेणार नव्हतेच. शिवाय पलकला नाकारण्यासारखं काही नव्हतंच. तिचं दिसणं, वागणं-बोलणं सारंच लाघवी होतं. शिवाय व्यवसायाचं ज्ञानही रितेशच्या धंद्यात उपयोगी पडणार होतं. आता फक्त मुहुर्त काढायचाच अवकाश होता. पण आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच, तसंच झालं बघ!

लग्नानंतर आई-वडिलांनी आपल्या सोबत राहावं अशी रितेशची इच्छा होती. त्यांनाही त्यात आनंदच होता. त्यांचे बाकीचे नातेवाईक आधीच  दुरावलेले होते. आपला तिथला व्यवसाय बंद करून रितेशसोबत

राहायला येण्याचं त्यांनी आनंदानं मान्य केलं होतं. रितेशही त्या दृष्टीने डोंबिवली – ठाणे परिसरात घर आणि दुकानासाठी जागा शोधत होता.

मार्च २००३ची गोष्ट आहे ही!  सुरतचं आपलं दुकान विकून ते पैसे घेऊन रितेशचे आई-बाबा इकडे यायला निघाले.  संध्याकाळी मुंबई-सेंट्रलला उतरून टॅक्सीने ते दादरला आले आणि तिथून ठाकुर्लीला  येण्यासाठी त्यांनी दुसरी ट्रेन पकडली.  सुरतचा रितेशचा एक मित्र पण  त्यांच्यासोबत होता. त्याला दादरला जायचं होतं. त्यानेच त्यांना दादरला गाडीत बसवून दिलं आणि दुकानात फोन करून आई-बाबा येत असल्याचं  रितेशला कळवलं होतं. म्हणून पलक आणि रितेश दोघंही त्यांना घ्यायला ठाकुर्ली स्टेशनवर येऊन उभे राहिले. पण नशिबाने डाव साधला. मुलुंड स्टेशनला त्यांची ट्रेन पोचत असतानाच त्या गाडीत बाॅम्बस्फोट झाला. रितेशचे आई-वडील त्यातच गेले.

देह इतके छिन्न विच्छिन्न झाले होते की ओळख पटवणंही मुश्किल होतं.

रितेशच्या मित्राला बाॅम्बस्फोट झाल्याचं कळलं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो डोंबिवलीला आला. त्याच्या मदतीनेच  कपड्यांच्या अवशेषावरून  रितेशच्या आईबाबांची कशीबशी ओळख पटली.

या प्रसंगाने रितेशला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला आई-वडिलांशिवाय कोणंच नाही ना! त्याची स्मृती नष्ट झाली. तो फक्त मला बा म्हणून मिठी मारायचा आणि विचित्र रडायचा. माझा हात घट्ट धरून ठेवायचा. बाकी कोणालाच तो ओळखेना. तीन-चार वर्षे त्याच्यावर उपचार चालू होते. त्यानंतरही त्याची स्मृती परत आली नाही. तो ठीक होईल का नाही याबाबत डाॅक्टरही निश्चित सांगू शकत नव्हते. आम्ही त्याच्या काका वगैरेंना शोधून, संपर्क करून, सर्व परिस्थिती सांगितली, पण त्यांनी जराही आपुलकी दाखवली नाही, या पोरक्या मुलासाठी. मग आम्हीच त्याला सांभाळायचं ठरवलं. बाम्हणून गळ्यात पडून रडणार्‍या लेकराला मी कसं दूर करणार? आईचं ह्रदय आहे ना माझं, लेकराचं दुःख जाणणारच ना?

पलकची कशीबशी समजूत घालून आम्ही तिला लग्नाला तयार केलं आणि सगळी खरी हकीकत सांगून

नाशिकच्या शहा कुटुंबात तिचं लग्न करून दिलं. तिचं सगळं आता मार्गी लागलंय.

रितेशवर उपचार करण्यात आम्ही कोणतीच कसर ठेवली नाही. मोठमोठे न्यूरोसर्जन झाले, मानसोपचारतज्ज्ञ झाले. देवधर्म, नवस, कोणी काय सांगेल ते सगळं केलं. असंच एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं म्हणून मी त्याला ठाकुर्ली स्टेशनवर घेऊन गेले. जिथे मी रोज सकाळी तुम्हाला दिसते ना तिकडे तो मला ओढत घेऊन गेला. तिथे बसून खूप ओक्साबोक्शी रडला मला मिठी मारून! नंतर कसंबसं दादापुता करून मी त्याला घरी घेऊन गेले. पण त्या दिवसानंतर त्याचं रडणं- ओरडणं हळूहळू कमी झालं.बोलत काही नव्हता, पण मी दिलेलं शांतपणे खायला लागला. औषधही कटकट न करता घ्यायला लागला, पण मी दिली तरच! बाकी कोणाला जवळ फिरकू देत नसे की कोणाचं काही ऐकत नसे. मी लहान लेकरासारखं त्याला सांभाळलं.माझी सत्त्वपरीक्षाच होती. तो झोपल्याखेरीज मला इतर काही करताच यायचं नाही. मग मी रोजच सकाळी त्याला ठाकुर्ली स्टेशनला घेऊन येऊ लागले. एकदा सकाळी तिथे नेऊन आणलं की दिवसभर तो शांत राहतो.

औषधांचा उपयोग म्हणा की आणखी काही! पण हळूहळू तो कामापुरतं बोलू लागला, म्हणजे जेवण दे, आता झोपतो वगैरे. त्याला मागचं काही आठवत नाही. पण आता स्वतःचं स्वतः व्यवस्थित करतो. यांच्यासोबत दुकानात जाऊन  नुसता शांतपणे बसून राहतो. पण आता आमचंही वय वाढतंय. हे सगळं कुठवर झेपणार?

आता जर्मनीतून कोणी न्यूरोसर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ आले आहेत हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये . त्यांनी खूप विचित्र पेशंटना बरं केलं आहे. आम्ही रितेशला आधीही इथे ट्रिटमेंटसाठी नेलं होतं. इथले डाॅक्टर्स त्याच्या केसचा अभ्यास करत आहेत. त्यांनीच या विशेषज्ञांना बोलावून घेतलं आणि आम्हाला कळवलं.  चोवीस तास एक नर्स असतेच. डाॅक्टरही येऊन-जाऊन असतात. शिवाय माझ्या घरच्यांनाही माझी काळजी वाटते ना.रात्रीचं मला इथे थांबू देत नाहीत. आणि त्यांनाही थोडावेळ दिला पाहिजे ना मी? म्हणून संध्याकाळी घरी परत जाते. सकाळी लवकर उठून इथे येते. दोन दिवसांपूर्वी रितेशला इथे अ‍ॅडमिट केलंय. बघू त्याला काही फायदा होतो का?

पण माझं  आईचं वेडं मन एकीकडे असंही म्हणतं की त्याला काही आठवत नाही तेच बरंय ना? सगळं आठवलं तर माझं लेकरू हे दुःख पेलू शकणार नाही ग! आणि त्यातून त्याला सावरायला माझी ताकदही पुरी पडेल की नाही कोणजाणे. हंसाबेनच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

ऐकता ऐकता अंजलीचेही डोळे भरून आले होते. कोणावर कधी काय वेळ येईल, खरंच सांगता येत नाही.

बाहेर बघण्याच्या बहाण्याने तिने आपले अश्रू पुसले आणि तेवढ्यात  ठाकुर्लीचा बोर्ड तिला दिसला, गाडी स्टेशनात शिरून थांबत होती.

गाडीतून उतरताना तिने अगदी सहजपणे हंसाबेनचा हात धरून त्यांना उतरवलं आणि मनोमन या बाला साष्टांग नमस्कार घातला.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments