सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
पिंजर्यात कोंडलेल्या प्राण्यांप्रमाणे या वर्षी सगळ्या मुलांची अवस्था झाली होती. सारखे सारखे घरी बसून कंटाळा आला होता. गणपती आले आणि गेले सुद्धा! मुलांना काॅलनीमधल्या, बिल्डींगमधल्या गणपतीबाप्पाची आरती मनसोक्त करायला मिळालीच नाही. प्रसादाच्या खाऊची गंमत नाही की कुठली स्पर्धा नाही. बाप्पा घरी गेल्याबरोबर घरी बसून ऑनलाईन शाळा सुरू.
अथर्वनं आज ठरवलंच होतं, बाईंना आज काही म्हणजे काही शिकवू द्यायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. मोठ्या उत्साहात तो स्क्रीनसमोर बसला. वर्गातली सगळी मुलं दिसल्यावर बाईंनी बोलायला सुरूवात केली. “मुलांनो, आज तुम्हाला असं वाटतंय ना गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हालाऽ” “नको तो अभ्यास, नको ते शिकणे”. अथर्व जोरात ओरडला, “होऽय. नकोच आहे अभ्यास.”
आई-बाबांनी आणि आजींनी चमकून अथर्वकडे पाहिलं. आज काय झालं याला? एवढा जोरात का ओरडतोय? तेवढ्यात तिकडे बाई पण जोरात म्हणाल्या, “आज मुळी नाहीच करायचा अभ्यास.” सगळी मुलं खुष. अथर्वच्या चेहर्यावर आनंद पसरला. बाई आता काय सांगताहेत, याकडे मोठ्ठे डोळे करून तो पहायला लागला आणि मनापासून ऐकायला लागला. बाई म्हणाल्या, “तुम्ही सगळ्यांनी उद्या मला, तुम्हाला आपण काय असतो तर आवडलं असतं, ते सांगायचं. म्हणजे बघा हं, अवनीला वाटतं, मी फुलपाखरू असायला पाहिजे होतं. रमाला वाटतं, मी पाण्यातला मासा असते तर किती छान झालं असतं. आर्यन सांगेल तो घोडा असता तर गाडीपेक्षा जोरात, हाय स्पीडनं धावला असता. राधा म्हणेल, नाही बाई, मी आपलं मनीमाऊचं पिल्लूच होणार. सुश्रियाला पक्षी होऊन उंच आकाशात उडायला आवडेल. अथर्वला वाटेल हत्तीचं पिल्लू होऊन सोंडेनं पाणी मारायला मिळेल. जंगलात फिरायला मिळेल. ओके? आता सगळ्यांनी मोबाईल बंद करायचा आणि शांतपणे विचार करायचा. आपल्याला काय वाटतं, ते वहीमध्ये लिहायचं आणि उद्या वाचून दाखवायचं. अंडरस्टूड?”
क्रमशः…
© अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈