सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
आपले दोन्ही हात उंचावत अथर्व ओरडला, “हेऽऽ किती छान. आजी, आई आता मला कोणी डिस्टर्ब करू नका हं. बाईंनी सांगितलंय त्याचा मी विचार करणार आहे” आणि हाताची घडी घालून डोळे मिटून विचार करायला लागला. प्रत्येकाच्या घरी तीच अवस्था. अथर्वला वाटलं, खरंच मी हत्तीचं पिल्लू झालो तर मला क्रिकेट खेळता येईल का? प्रत्येक बाॅलला सिक्सर हाणीन. वाॅव केवढा स्कोअर होईल माझा. सचिन आणि कोहलीपेक्षा जबरदस्त! पणऽ पण हत्ती झालो तर ह्या घरी कसं राहता येईल मला? आई, बाबा, आजी कसे भेटतील? माझ्या बर्थडे ला आई केक कसा देणार? बाबा नवीन शर्ट कसे आणतील? नको रे बाबा, मी आहे तो अथर्वच चांगला.
तिकडे रमाही स्वप्नामध्ये रमली. “आहाऽऽ मासा झाले तर मला सारखे पोहायला मिळेल. पाण्यातले इतर मासे माझे मित्र-मैत्रिण होतील. ओऽ पण खायचे काय? आईनं इडली, लाडू केले तर मला कसे खायला मिळणार? आणि पाण्यात सारखं राहून सर्दी झाली तर? ताप आला तर? नको रे बाबा, कोरोनाचं संकट नकोच आपल्याला. त्यापेक्षा बाबा सांगतात तसे घरी राहू आणि स्वस्थ राहू. शिवाय गाणी म्हणता येणार नाहीत. पुस्तकं वाचायला मिळणार नाहीत. नको बाई, मी आपली रमाच बरी.”
आर्यनच्या डोळ्यांपुढे सगळ्या हायस्पीड गाड्यांपुढे आपण पांढराशुभ्र घोडा होऊन सुसाट धावतोय, हे चित्र दिसायला लागले. क्षणात त्याच्या मनात विचार आला, ओऽ, पण दमल्यावर खायचे काय? ओन्ली ग्रीन ग्रास?! ओ, नो नेव्हर! पटकन त्याने आपल्या पळत्या पायांना ब्रेक लावला. नको रे बाबा, घोडा झालो तर नो बॅडमिंटन, नो स्कूल आणि हो, त्या आजी-आजोबांकडेही जायला मिळणार नाही. तिकडे झाडावर चढता येणार नाही. धमाल करता येणार नाही. आपले फ्रेंड्स भेटणार नाहीत. आपण घोडा झालो तर आई रडेल, बाबा कुठे शोधतील? नाना-नानी किती काळजी करतील? आपण आहोत तसेच चांगले आहोत.”
राधाही खुशीखुशीत आपल्या अंगाचं वेटोळं करून आपलं मऊ मऊ पांढरं शुभ्र अंग चाटत मनीमाऊ होऊन कोपर्यात बसली. पटकन डोळे मिटून गेले आणि झोपही लागली तिला. थोड्या वेळानं काठी घेऊन आई आली आणि “शुक शुक, जा गं मने” म्हणून तिच्यावर उगारली. “म्याऊ, नको गं आई, मारू नको मला” म्हणून रडायला लागली. आईनं हलवून जागं केलं राधाला. “राधा, उठ आज बाईंना लिहून द्यायचंय ना? उठ” “ओऽ म्हणजे मी राधाच आहे तर. देवा, मला राधाच राहू दे हं! मनी माऊ नको.” म्हणत राधा उठली.
खिडकीतून टक लावून बाहेर बघत असलेली अवनी एकदम सुंदरसे फुलपाखरू होऊन या फुलावरून त्या फुलावर भिरभिर उडायला लागली. आपले नाजूक नाजूक रंगीबेरंगी पंख तिला खूप आवडले. आऽहाऽ किती छान वाटतंय. फुलांवर अलगद बसायला मस्त वाटतं, पण गुलाबाच्या झाडाचा टोकदार सुईसारखा काटा बोचला तर? पंख फाटला तर? बापरे, काय करायचे? घरी कसे जायचे? अरेच्चा, आजीने आपल्याला बिस्कीटे बरणीत भरायला सांगितलीत ना? पण आता तर हात नाहीत! कशी भरू बिस्कीटं? “आगं अवनी, किती तंद्री लावून बसलीस! एक काम आजीचं करत नाहीस.” आई पाठीत धपाटा घालत म्हणाली. भानावर येत अवनी आपल्या हातांकडे पाहात हसत म्हणाली, “अगं, नो प्रॉब्लेम, भरते मी आता. बागेत उडून आले गं जराशी, पण पुन्हा नाही हं जाणार.” अवनीच्या या असल्या येडपट बोलण्याकडे आई आश्चर्याने पाहातच राहिली.
क्रमशः…
© अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈