सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्वला सहस्रबुद्धे यांचा  ‘कवडसे’ हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे.त्यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा   !

 

– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कारप्राप्त आलेख – “कवडसे…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

🔅 विविधा 🔅

☆ कवडसे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले पंधरा दिवस पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता. जून मध्ये सात जूनला पावसाची थोडी सुरुवात तर झाली पण नंतर पाऊस  गायब झाला.  जवळपास एक दोन नक्षत्रे पावसाने हुलकावणी दिली पण नंतर गणपती बाप्पा आले तेच मुळी पाऊस घेऊन! मग काय सर्वांनाच खुशी झाली. पाऊस पाणी चांगलं झालं तरच शेत पिकणार आणि पावसाची नऊ नक्षत्र अशी नवरात्रीपर्यंत पडली की  पीक पाणी चांगले येणार.. त्यावेळी नवरात्रात येणारे  उन्हाचे कवडसे आपल्याला मनापासून आनंद देतात!

आज खूप दिवसांनी खिडकीतून उन्हाचा कवडसा घरात आला आणि त्याच्या सोनेरी उबेत घराचा कोपरा न् कोपरा सुखावला! बाहेरची सुंद, ढगाळ हवेने इतके दिवस आलेली मरगळ त्या एका कवडशाने घालवून टाकली! खरंच हा सूर्य नसता तर..!

लहानपणी आपण असे निबंध लिहीत असू. सूर्य, पाऊस, हवा, वातावरण यातील काहीही नसतं तर आपलं जीवन कसं वैराण झालं असते याची कल्पनाच करवत नाही!

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंचे चक्र फिरत राहते, तेव्हा कुठे सूर्याचे फिरणं आपल्या लक्षात येतं! पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे हे ऋतू आपण उपभोगतो .या प्रत्येक ऋतूचा आपण अनुभव घेत असतो. एका ऋतू नंतर दुसरा ऋतू सुरू होताना नकळत त्याचा कवडसा त्यात डोकावत असतो. पाऊस संपून हिवाळ्याची चाहूल लागते तेव्हा हळूहळू ऋतू बदलाचा कवडसा दिसू लागतो. ऋतू बदलताना ती काही आखीव रेखीव गोष्ट नसते की, एका विशिष्ट तारखेला हा ऋतू संपेल, आणि दुसरा ऋतू येईल! तर हा बदल होतो अलगदपणे! एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाताना  त्या दोन्ही ऋतूंची सरमिसळ होत असते.त्यांची एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया चालू असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलीकडे या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी आधी कळतात ही गोष्ट अलहिदा! तरीही एखाद्या वेळी अचानक येणारे वादळ या अंदाजावर पाणी फिरवते! असे हे ऋतूंचे चक्र आपल्याला त्यातील असंख्य धुली कणांच्या रूपात सतत दिसून येत असते.

जेव्हा घरात उन्हाचा कवडसा डोकावतो, तेव्हा आपल्याला त्या कवडशात दिसणारे असंख्य धुलीकण वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतात!

तसेच जीवनात येणारे चांगले वाईट असे विविध प्रसंग हे आपल्या आशेने भरलेल्या मनाचे प्रतिक आहे! खूप निराशा, खूप दुःख जेव्हा वाट्याला आलेले असते  तेव्हा नकळतच कुठेतरी आशेचा कवडसा  दूरवर दिसत असतो. नुकतीच घडलेली एक घटना.. माझी पुतणी कॅन्सरच्या आजाराने मृत्यूला सामोरे गेली. खूप वाईट वाटले.. असं वाटलं, परमेश्वर इतका का दुष्ट आहे की त्या तरुण मुलीला मृत्यू यावा! जिचे आता उमेदीचे वय होतं. संसारात जोडीदाराबरोबर उपभोगायचं वय होतं, ते सगळं टाकून तिला हा संसाराचा सारीपाट  अकाली उधळून टाकून जावे लागले! सगळेच अनाकलनीय होतं! इतक्या दुःखद प्रसंगा नंतर हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा नवीन बातमीचा कवडसा आम्हाला दिसू लागला! तिची बहीण प्रेग्नेंट आहे असे कळले, पुन्हा एक नवीन जीव आपल्याला आनंद देण्यासाठी जन्माला येणार आहे, नकळतच त्या बातमीने मन व्यापून टाकले. मनाचा गाभारा उजळून गेला नुसत्या आशादायक  विचाराने! हाच तो कवडसा खूप मोठ्या तेजोवलयाचा भाग असतो! असंच काहीसं या कवडशात दिसत रहातं  ते गेलेल्या गोष्टींचं अस्तित्व!

लहानपणी काचा कवड्या  खेळताना कधी मनासारखं दान पडे तर कधी नाही! पण म्हणून काही त्यातलं यश- अपयश मनाला  लावून घेऊन खेळणं कधी कोणी सोडत का?

अशीच एका जवळच्या नात्यातली गोष्ट! त्या मुलीच्या नवऱ्याचा एक्सीडेंट होतो आणि कित्येक महिने त्याला हॉस्पिटलायझेशन करावे लागते. त्या मुलीला दोन लहान मुली असतात. शिक्षण पदवीपर्यंत झालेले असते. नवरा आजारी, घरात मिळवते कोणीच नाही, अशावेळी ती मनाने खचून गेलेली असते…., पण अचानक तिने  एका नोकरीच्या  ठिकाणी अर्ज केला होता तिथून नोकरीचा कॉल येतो. ती मुलाखत योग्य तऱ्हेने देते, तीन महिने तिला ट्रेनिंग असते.. लहान दोन मुली पदरात.. पण सर्वांनी तेव्हा तिची अडचण काढली. तिने ट्रेनिंग पूर्ण केले आणि कामावर जॉईन झाली.. हा किती सुंदर सोनेरी कवडसा तिच्या जीवनात आला! पुढे तिने दोन्ही मुलींना चांगले शिकवले. तिचा नवराही बऱ्यापैकी ठीक झाला. एक जीवन मार्गाला लागले. असे हे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट प्रसंगी येत असतात, पण त्या  संकटांना न घाबरता ती संधी म्हणून त्याचा लाभ घेता आला पाहिजे! कवडसा हा आशादायी असतो. तो कुठूनही कसाही आला तरी त्यातील धुलिकण न बघता त्याचे तेज पाहिले पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.. तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, अशा या कवडशावर माझा विश्वास आहे. पुढे पूर्ण अंध:कार आहे असं भवितव्य कधीच नसतं! तर दयाळू परमेश्वर एक तरी झरोका असा देतो की तिथून हा  कवडसा आपल्या आयुष्यात डोकावतो आणि आपला जीवन प्रवास सुकर करण्यासाठी आशावादी ठेवतो….

रोज दिसतो एक कवडसा,

मनात माझ्या आशेचा !

विरतील निराश ढग मनातून,

येईल उत्साह जगण्याचा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

(दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!) – इथून पुढे —-

पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई… दया, करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही… यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते…

तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो… आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा, माया आणि प्रेम नावाच्या भावना…! यातलंच एक नाव श्री. दानिश भाई…!!!

आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? 

आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो…. असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे. 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण) –

वैद्यकीय, त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे ) हे आमच्या पथ्यावर पडले…! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत.

अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला “निर्माल्य” म्हटले जाते…. अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला “कचरा” म्हटले जाते… आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं …! आपण “निर्माल्य” की “कचरा”… ? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो. 

* आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 

* ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे 😊) वर्गवारी करतील. 

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 

* यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. 

यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत… जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला  सेंचुरी एन्का कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 

तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत…. रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं… आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई… लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती…  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो…. आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली… आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे… या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे… आईच ती… नाही म्हणेल कशी…. ? 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही‌)

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 

Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे.

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे… ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे… ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे… 

भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी…  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती… जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा… अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं… विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं… या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले… डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला… !

ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल… सन्मानाने ! 

दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात…. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात… आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील…. आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… ते स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!

ठरलं… आता ठरलं…. 

आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य…!!!” हेच ठेवायचं ठरलं… 

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो…. आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल…

सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे 25 लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून …

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 150 प्रतिदिन.
  2. सकाळचा चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा.

अंदाजे रुपये 300 दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे…  25 लोकांसाठी रुपये 7500 प्रति दिवस… सुट्ट्या वगळता 25 दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये 1, 87, 000 (एक लाख सत्याऐंशी हजार)… यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 

आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे… रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील…! असो…

हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 

चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात 30 मार्च 2025  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची “मनीषा” आहे…! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन…

प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे… इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल… हि श्रद्धा आहे… आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे…

मला काही नको… फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा…!!!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा… ☆ सौ शालिनी जोशी

पंढरपूर जवळील मंगळवेढा हे संतांच गाव. संत दामाजी, संत चोखामेळा या मंगळवेढ्याचे होते. येथेच १५ व्या शतकात शामा गणिकेचे पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. चिखलात उमललेले कमळच हे. अप्रतिम लावण्य आणि गोड गळा तिला लाभला होता. साहजिकच आपलेच काम आपल्या मुलीने करावे अशी तिच्या आईची इच्छा होती. पण पूर्व पुण्याईने कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ होती. तिला नृत्य, गायन शिकवणारे गुरुजीही भजने शिकवत असत. त्यामुळे सतत हरिनामात दंग राहणे हाच तिचा छंद झाला. सौंदर्यामुळे मोठमोठ्या सावकारांच्या तिला मागण्या येत असत, पण ती नकार देत असे. त्यामुळे तिचा छळही झाला.

शामा नायकिणीने चिडून तिला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले. पण विठ्ठलाच्या कृपेने तिच्यासाठी तो एकांत ठरला. ती अखंड नामस्मरणात गुंतली. एकादशीचा दिवस होता. वारकऱ्यांचे अभंग ऐकून तिला स्वस्त बसवेना. तिने खिडकीतून उडी मारली आणि वेश बदलून वारीत सामील झाली. हातात वीणा घेऊन वारकऱ्यांबरोबर पंढरीला पोहोचली. चंद्रभागेत स्नान करून, नामदेव पायरीचे दर्शन, घेऊन राऊळी धावली. देहभान विसरून, विठ्ठलाचे अनुपम रूप तिने डोळ्यात साठवले. चरणाला मिठी मारली. नामभक्ती सांगताना ती म्हणते,

घ्यारे घ्यारे मुखी नाम l अंतरी धरोनिया प्रेम ll

माझा आहे भोळा बाप lघेतो ताप हरोनी ll

कान्होपात्रीने मंगळवेढ्याहून पंढरपूरला दर्शनासाठी येण्याचे धाडस केले. ती परत मंगळवेढाला गेली नाही. उलट तीच विठुरायाला प्रश्न करते,

‘पतित पावन म्हणविसी आधी l

मग भक्ता मागे उपाधी कां बरे लावतो?ll’

नामस्मरणातून सुरू झालेल्या कान्होपात्रेचा प्रवास अनुभूती पर्यंत पोहोचला. पांडुरंगाच्या चरणी ती आनंदाने विसावली. कान्होपात्राचे अप्रतिम सौंदर्य बिदरच्या बादशहाच्या कानावर गेले होते. ती लावण्यवती आपली अंकित असावी, अशी ईर्षा बादशहाच्या मनात निर्माण झाली. कान्होपात्रा पंढरपूरला आहे हे कळतात तिला नेण्यासाठी बादशहाचे शिपाई आले. कान्होने मंदिराचा आश्रय घेतला. सरदार शिपायानी मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना मंदिर ताब्यात घेण्याची धमकी दिली. तेव्हा मंदिर उध्वस्त होण्यापेक्षा मी यवनांसोबत जाते. अशी तयारी कान्होपात्रेने दर्शविली. आणि शेवटचे म्हणून विठ्ठलाच्या चरणावरती डोके ठेवले. तिच्या शुद्ध, अनन्य भावभक्तीला भगवंत पावला. तिची आळवणी ऐकून तिला सगुण रूपात दर्शन दिले. निर्भय केले. पाहता पाहता कान्होपात्रा अदृश्य झाली. दोन चैतन्ये एक झाली. उरले ते शुष्क कलेवर. भक्तीत अडसर आणणाऱ्या यवनाला हात हलवत जावे लागले. त्याप्रसंगी तिने केलेला विठ्ठलाचा धावा,

नको देवराया अंत आता पाहू l प्राण हा सर्वथा जाऊ पाहेll१ll

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले l मजलागी झाले तैसे देवा ll२ll

मोकलून आस झाले उदास l घेई कान्होपात्रेस हृदयांतरी ll३ll.

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी l धावे हो जननी विठाबाई ll ४ll

आपल्या अनन्य भक्ताची आळवणी भगवंतापर्यंत पोहोचली. भगवंताने आपले ब्रीद खरे केले. पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिण दरवाजात तिला पुरण्यात आले. तेथे एक तरटीचा वृक्ष उगवला. कानोपात्रीच्या भक्तीची व संतत्वाची ग्वाही तो देतो. त्या झाडाखाली तिची छोटीशी मूर्ती आहे. मंगळवेढा गावात तिचे छोटेसे देऊळ आहे.

अशाप्रकारे कान्होपात्रेचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. तिचा शेवटही तसाच थरारक. जन्मजात प्राप्त झालेले उपभोग्य म्हणून जगणे तिने नाकारले. तिने स्वतःची वारकरी संप्रदायातील स्त्रीभक्त, अभंग रचनाकार अशी नवी ओळख निर्माण केली. तिच्या नावे ३३ अभंग आहेत. वारकरी संप्रदायाने तिला मान दिला. कान्होजी संत कान्होपात्रा झाली. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचे वातावरण नाही. तरीही केवळ भक्तीने तिने ईश्वराजवळ स्थान मिळवले. तोच तिचा सखा, मायबाप, बंधू, भगिनी आणि तारणहार झाला. ‘दिनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती बाही’ दिनोद्धार करावा असे वेदच सांगतात. त्यामुळे मी कुळहीन असले तरी मला भक्तीचा अधिकार आहे. भक्ती मधून स्वतःचा उद्धार करावा असे वेदांत सांगितले आहे. अशी भूमिका घेऊन कान्होपात्रेने भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पतीताना पावन करणाऱ्या विठ्ठलावर सर्व भाग टाकून निष्काम भावनेतून भक्ती केली. भक्तीचे बळ यवन बादशाहालाही कळलं.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगछटा… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ रंगछटा… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले

“बाबा, किती जुनं दिसतय आपलं घर..! ! बदलून टाकायचं का? “

लेकीनं एखादा कपडा किंवा चपला बदलून टाकायच्या सहजतेनं विचारलं..

आम्हाला ते सहज पचणारं नसलं तरी तिचं वय आणि तिची पिढी विचारता घेता ते फारसं अयोग्य नव्हतं.

मधला मार्ग म्हणून आम्ही घर रंगवायचं ठरवलं..

रंगाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली.

 

लेकीनं जांभळा, पिवळा, हिरवा असे व्हायब्रंट रंग निवडले..

मी पांढरा, आकाशी, क्रीम अशा मंद रंगांना पसंती दिली..

नव-याला रंगाशी देणंघेणं नव्हतं..

“मला रंगातलं काही कळत नाही ” म्हणत तो मोकळा झाला..

त्याला फक्त काम लवकर नि चांगलं व्हायला हवं होतं..

“घर रंगवायचय की वृद्धाश्रम.. का मंदिर..? ” म्हणत लेकीनं पांढरा रंग निकालात काढला..

“संपूर्ण घराला एकच रंग लावूया म्हणजे घर मोठं दिसतं नि घराला कंटिन्युटी येते.. “

या पेंटरच्या सल्ल्यावर कशी कुणास ठाऊक पण आम्हा दोघींत एकवाक्यता झाली..

नि एक फिकटसा रंग आम्ही फायनल केला..

 

एका शुभदिनी रंगकामाला सुरुवात केली..

घरातल्या सा-या सामानानं आपापल्या जागा सोडून एखाद्या सभेला हजेरी लावावी त्याप्रमाणे दिवाणखान्यात गर्दी केली..

उड्या मारत, धडपडत, ठेचाकाळत चालावं लागू लागलं..

आमचा एककक्षीय (एका खोलीतला) संसार सुरू झाला..

 

“तुम्ही दोघी खाटेवर झोपा, मी खाली झोपतो.. ” म्हणत नव-याने जमिनीवर पथारी पसरली..

 

घरातल्या समस्त उशा, पांघरुणे, बेडशीट्स खाटेवर मुक्कामाला आल्याने आम्ही दोघी अंग चोरून कशाबशा झोपलो होतो..

मध्यरात्री लेक सरळ झाली नि तिची मला धडक बसली..

मी थेट खाली कोसळले ते नव-याच्या अंगावर..

त्याच्या किंचाळण्याने गल्ली जागी झाली..

पण वाचला बिचारा..

अडचण एवढी की मला उठता येईना.. ना त्याला..

शेवटी लेकीनं मला ओढून कसंबसं वर काढलं..

या प्रकरणाचा तिने एवढा धसका घेतला की 

“आता इंटर्नशिप करायला हवी ” म्हणत रंगकामाची पुरस्कर्ती लेक सुट्टीतही काढत्या पायाने पुण्यास रवाना झाली..! !

टुथपेस्ट सापडली तर ब्रश न सापडणं, पावडर सापडेपर्यंत कंगवा गायब होणं..

वरणभात आणि पिठलंभाकरी सोडून इतरही पदार्थ असतात, याचा विसर पडणं..

कधीही घराकडे ढंकुनही न पहाणारी पाहुणे मंडळी नेमकी या काळात टपकणं..

पेंटरबाबुंची रोजची पैशाची मागणी..

मालाच्या एस्टिमेटची पानफुटीप्रमाणे होणारी अखंड वाढ आणि पैशाचा बाहेरच्या दिशेने वाहणारा अखंड झरा…

यामुळे आम्ही दोघे नवरा-बायको रोज

“कुठून या नस्त्या फंदात पडलो.. नि सुखातला जीव दु:खात घातला.. “

या मंत्राचा अखंड जप करू लागलो..

मला तर स्वप्नंही रंगकामाची पडू लागली होती..

एखाद्या भिंतीचा रंग सगळा खराब झालाय…

असलं काहीतरी बेकार स्वप्न पडून मी ओरडत उठत असे नि झोपमोड केल्याबद्दल नव-याच्या शिव्याही खात असे..

याच काळात पेंटरमामांची आजी वारली, वडिलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं, त्यांचे किती दोस्त आणि शेजारी मयत झाले.. याला तर गणतीच नाही..

” आता तुम्ही स्वत: मयत व्हायच्या आधी आमचं काम पूर्ण करा.. “.

अशी आम्ही त्यांना विनंती केली..

तेंव्हा कुठे दहा दिवसात पूर्ण होणारं आमचं रंगकाम दीड महिन्यांंनी पूर्ण झालं..! !

रंगकामाचं घोडं एकदाचं गंगेत जाऊन न्हालं…!!

रोडावलेल्या बॅंकबॅलन्समुळे नव-याचं वजन चार-पाच किलोंनी घटलं असलं तरी मी मात्रं खुशीत होते..

नवीन फर्निचरचे, शोपिसेसचे बेत डोक्यात घोळत होते..

पैसे कमी झाले असले तरी उगीचच शेजारणींपेक्षा आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं..

“संक्रांतीचं हळदीकुंकु करून सगळ्या शेजारणींना बोलवायचं नि त्यांना जळवायचं. “.

अशी कल्पना जेंव्हा मनात जन्मली तेंव्हा झालेला सगळा त्रास विरून गेला आणि मनमोर. नुसता थुईथुई. नाचू लागला..! !

याच आनंदात मी नवीन रंग पहायला खोल्याखोल्यांतून हिंडू लागले..

आणि लक्षात आलं की प्रत्येक खोलीतला रंग वेगवेगळा दिसतोय…

नव-याला बोलावलं..

“प्रत्येक खोलीतला रंग वेगळा दिसतोय.. बघ नां..! ! “

“सुरू झाली का तुझी किरकिर.. कितीही पैसा खर्च करा.. त्रास सहन करा.. या बाईला समाधान म्हणून नाही.. रंग वेगळा कसा दिसेल?” माझ्यावरच करवादत घालवलेले पैसे मिळवायला नवरोबा तडक निघून गेले.

“तुला प्रत्येक खोलीतले रंग वेगळे दिसतायत का बघ गं.. ” कामवाल्या सुमनला मी विचारलं..

“बाई, तुम्ही इथं लाल न्हाईतर पिवळाजर्द रंग द्यायला पायजे हुता.. आमच्या जावेच्या भैनीकडं तसलाच दिलाय.. कसला भारी दिसतुय.. तुमास्नी रंगातलं कळत न्हाई बगा..”

सुमननं नेहमीप्रमाणे ती कशी हुशार… आणि मला कसं काही कळत नाही.. हे दाखवायची नि मला डिप्रेस करायची, हिही संधी सोडली नाही..

दुपारी पुन्हा एकदा पाहणी केली..

आता तर रंग आणखी वेगळा वाटत होता..

अन् रात्री दिव्यांच्या प्रकाशात अजूनच वेगळा..

स्वयंपाकघरातला डार्क, हॉलमधला फिकट, बेडरूम्समधला थोडासा डल्…

आता मात्रं मी चक्रावून गेले.

सकाळी उठल्याबरोबर पेंटरकाकांना फोन केला..

“पैसे घेऊन जायला लगेच या.. “

पैशाच्या लालचेने पेंटरकाका दहा मिनिटांत हजर झाले..

“काका, आपण सगळीकडे एकच रंग वापरायचं ठरवलं होतं नं.. मग प्रत्येक खोलीतला रंग वेगळा कसा दिसतोय?”

पेंटरकाका थोडं गूढंसं हसले..

“ताई, रंग एकच आहे सगळीकडं..

पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..

आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..

स्वयंपाकघरात एकच खिडकी आहे.. हॉलमधे चार खिडक्या आहेत..

शिवाय स्वयंपाकघर लहान आहे.. हॉल मोठा आहे.. म्हणून हॉलमधे रंग फिकट आणि ब्राईट वाटतोय.. तर स्वयंपाकघरात डार्क..

बेडरूमच्या बाहेर झाडं आहेत.. प्रकाशच येत नाही.. म्हणून तिथला रंग डल् वाटतोय..

शिवाय खोलीतल्या फर्नीचरच्या रंगाच्या रिफ्लेक्शननं भिंतीचा रंग वेगळा दिसतो..

ताई, रंगाच्या छटा त्याच्या मुळच्या रंगावर अवलंबून असतातच पण त्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात..

या सा-या गोष्टी सारख्या करा.. मग रंगही समान दिसेल..!!

अजून काही महिन्यांनी बघा.. रंग अजूनच वेगळा दिसेल..

शिवाय पहाणा-याच्या नजरेवरसुद्धा रंगाचं आकलन अवलंबून असतं..

साहेबांना नाही वेगळेपणा जाणवला..

तुम्हाला जाणवला.. कारण तुमचा जीव या भिंतीत आहे.. या घरात आहे..! !

मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते..

त्या अशिक्षीत माणसाकडून केवढं मोठं तत्त्वज्ञान मला समजलं होतं.. रंगाच्या निमित्ताने..!!

माणसाचंही असच आहे नाही..

खरंतर प्रत्येक माणूस सारखाच…

पंचमहाभुतापासूनच बनलेला..

पण प्रत्येकाचा रंग.. म्हणजे स्वभाव, वागणूक, मन, बुद्धी, आचार, विचार किती वेगळं..

मग आपण. लावून टाकतो..

हा चांगला..

ती वाईट

ती उदार

तो कंजुष

तो दुष्ट

ती दयाळु

ती हुशार

तो मठ्ठ

तो कोरडा

ती प्रेमळ

अशी अनंत लेबलं..

 

तो माणुस जन्मत:च असा आहे, असं आपण ठरवूनच टाकतो..

आणि तो असा बनायला सभोवतालच्या कितीतरी गोष्टी जबाबदार आहेत, याचा आपल्याला विसर पडतो..

तो उद्या बदलेल.. हे मानायला आपण तयारच होत नाही..

निसर्गाकडून मिळालेलं शरीर, बुद्धी, बालपणीचे संस्कार, मिळालेलं प्रेम किंवा तिरस्कार, वाट्याला आलेली गरिबी किंवा लाभलेली श्रीमंती, लाड किंवा भोगावे लागलेले अत्याचार..

किती किती गोष्टींच्या प्रभावामुळे बनलेली अनंत छटांची अनंत व्यक्तीमत्त्वे…

काळी, पांढरी, करडी, हिरवट, पिवळी, निळी नि गुलाबी…!!

यातल्या कुणाला चांगलं म्हणत कौतुक करणं.. नि कुणाला वाईट म्हणत हेटाळण्यापेक्षा..

जाणीवेच्या शोभादर्शकातून पाहिलं तर रंगीबेरंगी नक्षीचं नयनसुख मिळेल..

नि सारं जग सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं सुरेख होऊन जाईल…!!

 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

सुश्री अश्विनी अभ्यंकर

??

☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

परदेशात गेलं ना, की त्यांच्या चलनातील नाणी किंवा नोटा पटापट उलगडत नाहीत. रक्कमेची जुळवाजुळव करायला वेळ लागतो. डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीमुळे आपल्या देशातील नागरिकांना देखील स्वतःच्या देशात हा अनुभव मिळेल, असं वाटतं. माझ्यासारखीला, जिला याची फारशी सवय नाही, तिला तर हे अजबच वाटतं.

हैदराबादमध्ये मला, याचा प्रकर्षाने अनुभव आला. पण, मला याची खात्री आहे की, देशातील सर्वच महानगरांमध्ये हेच चित्र असणार.

हैदराबादला मागच्या वेळेस गेले, तेव्हा मला झटकाच बसला होता. मी रडकुंडीला आले होते. एक टॅक्सी चालक तर म्हणाला, “पाच रुपयांचं नाणं चालत नाही इथे. महाराष्ट्रातून आल्या आहात वाटतं. मी ठाण्यात काम करत असतानाची काही नाणी माझ्याजवळ आहेत. ती तुम्हालाच देतो.” 🙉

या वेळेस मात्र, मी तयारीनिशी गेले होते. पोरीनेही मुद्दामहून फ़ोन करून आठवण करून दिली होती. सुटे पैसे घेऊन गेले होते. मनाची तयारी ही करून गेले होते कि, वरचे २-४ रुपये सोडून द्यावे लागतील. झालं ही तसंच.

पुन्हा एकदा कसोटीचा क्षण आला. एका प्रख्यात कॉफ़ीशॉपमधे मी पाच रुपयांचं नाणं पुढे केलं. काऊंटरच्या पलीकडच्या मुलीने एखादी अज्ञात वस्तू असावी तसं ते नाणं उलट सुलट करून पाहिलं. परदेशात गेल्यावर त्यांच्या नाण्यांकडे पाहताना जो कावराबावरा भाव माझ्या चेहऱ्यावर येत असावा ना, अगदी तसाच तिच्या चेहऱ्यावर होता. आधी, मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला आणि मग, मला हसूच फुटलं. एक क्षण वाटलं, आपला उद्धार करून (पुन्हा) नाणं परत करेल. पण, घेतलं तिने ते. त्यावरून असा विचार आला, उद्या हिला पन्नासची नोट कोणती, शंभरची कोणती, हे पण कळेनासं होईल कदाचित.

पुण्यामुंबईकडे याचं लोण आज इतकं पसरलेलं दिसत नसलं तरी, उद्या येईलच की. हम कहाँ किसीसे कम है?

मग, कामाच्या ठिकाणी नोटांचा एक तक्ता लावायला लागेल. माझ्यासारखा एखादा ग्राहक तिकडची वाट चुकला तर आणि, माझ्याकडून नगद पैसे घ्यायची वेळ आली तर…

 © सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा… माऊली आपल्या सर्वांसमोर सादर… कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे… फक्त तुमच्यामुळे!!!

तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले.

आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटारा जवळ, भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते.

दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात…! भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली..!

तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात… माझा हूरूप वाढला… तुम्हीच माझे आई बाप झालात…!

माझ्या आई बापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले!

तर, हे सर्व करत असताना लक्षात आले; की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत. आणि म्हणून नोकरी, धंदा – व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत. यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली.

यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना “आम्हाला जागा देता का? जागा…?” म्हणत झोळी घेऊन फिरलो. “अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत… यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे… जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का? जागा….?” गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या “सम्राटांसाठी मी नट झालो… ” 

मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे…. परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार? किती घाण करतील हे लोक? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने ‘शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा’, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला…. आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले…!

ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, ‘सर मिळाली का जागा आपल्याला?’ अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात… तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना? अहो काय हे…??’ ”इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही???’ या

सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे… डोकंच चालायचं नाही…!

खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे… असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे… ‘धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक… ‘ अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे… प्रचंड राग यायचा… खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही… तर मला तरी ती गरज का वाटावी? मरू दे…. सोडून देतो उद्यापासून हे सर्व…! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो…

मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं… ‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?’ महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं…. भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो…! ‘ 

भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य…! भुकेच्या पलीकडे काही नाहीच…! भुकेसाठी लढायचं…. भुकेसाठी मरायचं…! जन्माला येऊन एवढं एकच करायचं…! ! ! या भुकेची शिसारी आली आहे आता मला…! “भूक”… मग ती कसलीही असो…. माणसाला वाकायलाच लावते…!

यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय… ‘ ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं… यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण??? 

आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात… भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो… तेवढ्यातूनही तो ‘मामा मामा’ म्हणत मला घास भरवतो… माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो…!

यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते… हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार… स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले… त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला?’ मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो…

डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा… पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो…! हे असं…. एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे, म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे…

मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच… एक मोठ्या मनाचा… मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा! ! ‘हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार’ अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला.

बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली.

काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात… वर ‘आपण काहीच केलं नाही’ या अविर्भावात नामा निराळे होतात…!

मला या माणसाचा हेवा वाटतो…! ! ! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले… दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे ‘डॉक्टरसाहेब आणखी काय करूया?’ दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो… काही मागायला माझी जीभ उचलायची नाही…

मी बोलत नाही असे पाहून… ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे… फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘ उन्हाळ्यात उकडणार… मोठे पंखे लागतील… थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल…. चांगल्या लाईट इथे लागतील… ‘ प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.

पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही… ‘ 

त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी…. भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो… मी काय बोलणार? 

पुन्हा स्वगत म्हणायचे, ‘आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार…?’ डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे… ‘काय करूया…? अजुन काय करूया…? काय काय करूया….???’ म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची… त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड… हे मात्र मला कधी समजलं नाही…!

माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो… हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना “पाहुणे” म्हणतो…!

भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय, म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे, पण दानिश भाईंचं काय? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा? मी यावर खूप विचार करत असे.

पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते… मातीतून एक सुगंध यायला लागतो… पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात…!

दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कल्पवृक्ष…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कल्पवृक्ष…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

अस्मादिकांच्यां जन्मदात्यांनी बाहेरुनच आल्या आल्या तोफ डागली…

गध्येपंचवीशी पर्यंत तुमच्या शिक्षणात गुंतवणूक केली आहे..

तीला आता चांगली भरभरून फळं आणून दाखवा बरं..

म्हणजे पिताश्रींचे या जन्मीचे पांग फेटलेच म्हणून समजा..

कुठे ते दिनानाथ निस्वार्थपणे आपल्या लेकीसाठी गाण्याचा कल्पवृक्ष लावून गेले…

आणि कुठे आमच्या घरातले…

थर्ड क्लास मधे इतिहास घेऊन बी. ए. च्या पदवीच्या भेंडोळीला…

चणेफुटाणे वाला सुद्धा बाजारात किंमत देत नसताना..

तिथं वरावरा नोकरीच्या दारात हिंडून नकाराचा कटोरा भरलेला घेऊन..

मुळातच बुद्यांकाचा अभाव असलेली माझी मस्तकपेटी…

पिताश्रींच्या अवास्तव अपेक्षेच्या ओझ्याखाली चपटी झाली…

त्यांनी मलाच आपला कल्पवृक्ष मानून घेतला होता की कोण जाणे…

अहो इथे साधे नैसर्गिकरित्या लागणारे नारळ लागण्याची वानवा…

आणि पिताश्रींची तर नारळच काय तर कल्पिलेल्या सगळ्याच फळांची अपेक्षा धरलेली…

छान नोकरी… सुशील सुन… वन बिच एच के.. सायकलच्या ठिकाणी स्पेलंडर… वगैरे.. वगैरे..

इतनो साल कि जो इन्व्हेस्टमेंट की थी उसका मुनाफा लेना तो पडेगाही ना…

सगळीकडे सगळं त्याचंच चाललेलं…

पण मला काय वाटतं तिकडे…

तुला काय लेका कळतंय याच प्रश्नात मला अडवलेला..

पण देवाची करणी नि नारळात पाणी तशी

किमया घडली नि अस्मादिकांना पोस्टमनची नोकरी मिळाली..

दोनवेळेच्या जेवणाची भ्रांत मिटली.. नि आयुष्याची चिंता..

पिताश्रींना जरा हायसं वाटलं पोरगं हाताशी आलं..

तसं दोनाचे चार हात वेळेसरशी झाले तर लेकराचा संसार रांगेला लागेल..

पण कल्पवृक्ष त्यांच्या हयातीत मोहरला नाहीच…

खूप उशीराने सारं सुरळीत पार पडत गेलं..

… पोस्टमास्तरचं प्रमोशन.. घराला घरपण आणणारी पत्नी… दारी मध्यमवर्गीय श्रीमंतीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी.. ओसंडून वाहणारी घरातली सुखाची अनेक साधनं.. आणि वंशाचं नाव पुढे नेणारा दिवटा…

बस्स यही थी तमन्ना माझ्या पिताश्रींची…

एक दिवस दिवट्या चिरंजीवांनी शाळेतून एक चित्र रेखाटून आणलेलं दाखवलं…

कल्पवृक्षाच्या झाडाला नारळाबरोबर केळीचे घड लगडलेले दाखवले..

अरे वेड्या नारळाच्या झाडाला फक्त नारळच लागतील… केळी कशी येतील…

… पप्पा हा तर कल्पवृक्ष आहे. आंबा, फणस सुध्दा त्यासोबत काढणार होतो..

अरे वेड्या नुसत्या कल्पना करून आपल्याला हवं ते मिळत नसतं.. तुला कोणी सांगितलं हे..

आजोबांनी… काल स्वप्नात आले होते.. मला म्हणाले, तुझ्या नजरेतून हा फळलेला फुलेला कल्पवृक्ष पाहून समाधान वाटलं… आता तू तुझ्या पप्पांचा कल्पवृक्ष झाला पाहिजेस… त्याची तेव्हा सत्यात न उतरेली स्वप्न तुलाच पूर्ण करून दाखवायची आहेत…

… दूरवरून

कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला…

लताचं भाव व्याकुळ गाण्याचे सुर…

अस्मादिकांच्यां कानावर आले… नि

क्षण दोन क्षणाची धुंदीत माझे तनमन हरवले

सारखं सारखं राहून मनात दाटून यायचं…

त्यांचा कल्पवृक्ष फळला फुलेला… यालं का हो बाबा बघायला…

आणि तो वंशाचा दिवा माझ्याकडे पाहून मंदस्मितात तेवत राहिला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोमांचक असे काही… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ रोमांचक असे काही… ☆ सुश्री त्रिशला शहा 

निवांत क्षणी काही ऐकलेल्या, अनुभवलेल्या, पाहिलेल्या अनेक गोष्टी मनात खिळून रहातात, मनावर अगदी अधिराज्य गाजवतात. त्याचा आनंद, दुःख त्या गोष्टीवर अवलंबून असले तरी त्या परतपरत आठवतात. मनावर मोहिनी घालतात. कधीकधी मनाचा अगदी ताबा घेतात. अशाच उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या अनेक गाण्यांमध्ये आपण हरवून जातो. अशाच काही रोमांचक वाटणाऱ्या, मनच नव्हे तर देहभान हरवून टाकणाऱ्या, मन उल्हसित करणाऱ्या अनेक आठवणीत रमायला आपल्यालाही नक्कीचं आवडते. मंडळी, हा आठवणींचा खजिना उलगडत जाताना आपल्यालाही मनस्वी आनंद वाटल्याशिवाय रहाणार नाही.

भारतीय संगीत म्हणजे एक अतिशय भावनाप्रधान आणि मन मोहवून टाकणारे, पिढीजात चालत आलेले अजब रसायन आहे, मनातील आनंद, दुःख, प्रेम, विरह यातील कोणत्याही भावनेवर गाणे गाऊन त्याचे प्रकटीकरण केले जाते. मनातील भावनांचा कल्लोळ गाण्यांच्या माध्यमातून मांडताना अभिनयाचा कस लागतो. म्हणूनचं ते गाणे सर्वच द्रुष्टीन अजरामर ठरते. अशीच काही अप्रतिम अशी गाणी आपल्यालाही रोमांचित करुन जातातच आणि परतपरत ते गाणे ऐकताना तोच अनुभव येत रहातो. निव्वळ काही विशिष्ट जागांसाठी ते गाणे पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते, अगदी त्यात हरवून जायला होते. अशीच काही गाणी त्यांच्या शब्दांमुळे, चालीमुळे किंवा त्यातील उत्कंठ अभिनयामुळे, भावभावनेतील तरंगामुळे मनात घर करुन बसतात. अशाच उत्कंठावर्धक अशा काही गाण्यांबद्दल, त्याच्या सुमधूर चालींबद्दल, त्यातू़न अजरामर झालेल्या भूमिकेमध्ये आपणही त्यात किती समरसून जातो त्याविषयी;-

एक अनाडी असलेला नावाडी असा नायक आणि शिकलेली नायिका यांच्या प्रेमकथेतून साकारलेला, सुनील दत्त आणि नूतन यांच्या सजग अभिनयाने नटलेला सुंदर चित्रपट म्हणजे मिलन. यातील सर्वच गाणी अप्रतिम आहेतच, त्यातीलच अतिशय सुंदर असे गाणे म्हणजे सावन का महिना पवन करे सोर. या गाण्याची सुरवात म्हणजे नायक नायिकेला गाणे शिकवित असतो असा प्रसंग पण गाण्याच्या सुरवातीचे शब्द म्युझिक शिवाय येतात. ‘सावन का महिना, पवन करे सोर, जियरारे झुमे ऐसे जैसे बनमां$नाचे मोर. या  नाचे मोर या शब्दांवर पडणारी तबल्यावरची थाप ऐकताना अवघा देह कानात गोळा होतो आणि अंगावर रोमांच उभे रहातात जणू बनात आता मोरच नाचतोय कि काय असे वाटावे इतका सुरेखसा गाणे आणि वाद्यांचा मिलाफ साधलाय त्या संगीताच्या माधुर्यात आपणही रममाण होऊन जातो आणि लता – मुकेशच्या आवाजातील गाण्याचा मनापासून आनंद घेत रहातो. 

असाच छानसा परिणामकारक ठेका पडलाय देवदास या चित्रपटातील गाण्यात. माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या रॉय आणि शाहरुख खान यांच्या दमदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटातील गाणीही त्यांच्या अविट चालींमुळे कर्णमधुर आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात, प्रियकराची वाट पहात नायिका श्रुंगार करुन मैफिल सजवण्याच्या तयारीत असते पण प्रियकराच्या आगमनाशिवाय ती मैफिल खोळंबून ठेवते आणि त्याची चाहुल घेत असताना एकदम तो समोर दिसतो तेव्हा भावविभोर होऊन ती गाते, नाचते हमपें ये किसने हरा रंग डाला. रसिकहो यातील हम या शब्दावर पडणारी तबल्यावरची थाप केवळ अवर्णनीयच. हा ठेका आपल्याच काळजाचा ठोका चुकतोय कि काय, इतका परिणामकारक साधला गेलाय. इतका सुरेख मिलाफ या न्रुत्य, शब्द आणि वाद्यांचा साधलाय म्हणूनच तो नक्कीचं रोमांचकारी वाटतो. संगीतकाराच्या या कौशल्यपुर्ण ठेक्याला खरोखर मनपसंत दाद द्यावीशी वाटते. असाचं अतिशय मनोहारी, श्रवणीय नमुना म्हणजे गाईड या चित्रपटातील गाण्याचा. वहिदा रहेमान आणि देवानंद यांच्या बहारदार अभिनयाने परिपुर्ण असा, यातील असेच एक न्रुत्य संगीताचा सुरेख संगम साधणारे गीत म्हणजे पिया तोसे नैना लागे रे वहिदा रहेमानच्या अप्रतिम अशा न्रुत्याचा एक सुंदर आविष्कार. आपल्या लाडिक आवाजात ‘पिया तोसे नैना लागे रे’ असे म्हणताना वाद्यांचा सुरेखसा पीस वाजतो आणि त्या तालावर अतिशय लालित्यपूर्ण असे वहिदाचे न्रुत्य आणि लतादिदींचा मधुर आवाज यांचा डोळ्याचे पारणे फिटणारा मनोहारी संगम पहायला मिळतो तेव्हा आपण स्वतःला हरवून त्या रमणीय कलेचा आस्वाद घेतो तोच खरा रोमांचकारी क्षण. यावेळी वहिदाच्या अदा पाहू कि लतादिदींचा स्वर मनात साठवू की एस्. डी. बर्मन यांचे संगीत ऐकू, प्राधान्य कोणाला देऊ असा प्रश्न नक्कीच पडतो. भारतीय संगीताचा असा मिलाफ पहाण्याचा आनंद आगळाच.

जुन्या चित्रपटांपैकी संगीताभिनयाने सजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे मीनाकुमारी, राजकुमार आणि राजेंद्रकुमार यांच्या सम्रुध्द अभिनयाने, लतादिदींच्या अविट गाण्यांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला दिल एक मंदिर. 

आजारपणामुळे जन्म-म्रुत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या नायकाच्या जीवनातील ती रात्र. उद्याच्या ऑपरेशनमध्ये काय होईल याची चिंता, त्यामुळे मनात दाटलेले काहुर आणि अस्वस्थता दाखवणारी पतीपत्नीच्या जीवनातील तगमग वाढवणारी ती बैचैनीची रात्र. गतजीवनातील घालवलेले पत्नीसमवेतचे आनंदाचे क्षण आठवताना आपल्या पत्नीला परतत एकदा नववधूच्या रुपात पहाण्याची इच्छा तो बोलून दाखवतो तेव्हा मनात चाललेल्या वादळाला थोपवून धरुन नायिका यासाठी तयार होते. आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे. उद्याचा विचारच नको या भावनेतून नायिका, मीनाकुमारी सारा साजश्रुंगार करुन नववधूच्या वेशात येते आणि खिडकी उघडून निरभ्र आकाशातील चंद्रमालाच म्हणते रुक जा रात ठहर जा रे चंदा, बिते ना मिलन की बेला. 

आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ डोळ्यातून चेहऱ्यावरुन साकारणाऱ्या या अभिनेत्रीला पहाताना आपल्याही अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाहीत. राजकुमार, मीनाकुमारीचा अतिशय दर्दभरा उत्कट प्रेमाचा अभिनय आणि त्याला साजेसा लतादिदींचा करुण स्वर हे सारेच अतुलनीय, अवर्णनीय.

शब्दप्रभू गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर. अनेक चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांना आपण जाणत असलो तरी गीतरामायण या महाकाव्याची रचना करून त्यांनी मराठी माणसाच्या मनामनात अढळस्थान निर्माण केलयं. गदिमा आणि बाबुजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या निर्मीतीतून साकारलेले गीतरामायण श्रवणीय, वंदनीयही आहेच. अनेक उपमा, अलंकारात्मक शब्दांची अक्षरशः उधळण करणारे गदिमा आणि अविट अशा चाली लावून स्वरबध्द करुन आकाशवाणीवर सादर करणारे बाबूजी यांची ही अजरामर कलाकृती. अनेक कलाकारांच्या माध्यमातून गायलं गेलेलं हे महाकाव्य जरासुद्धा कंटाळवाणे वाटत नाहीच उलट ते पुन्हापुन्हा ऐकावेसेच वाटते. गीतशब्दांची ही मोहिनी अनुपम्य अशीच आहे. म्हणूनचं गीतरामायणाच्या कार्यक्रमात कलाकारांकडून पहिलच गीत जेव्हा गायलं जात स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती या शब्दांबरोबर नकळतच श्रोते ठेका धरुन डोलायला लागतात आणि इथून पुढचे दोन तास या मैफिलीत आपण आकंठ बुडणार आहोत या जाणिवेतून मन रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या अजोड आणि अनमोल कलाकृतीच्या माध्यमातून गदिमा आणि बाबूजी़नी एक महान ठेवा रसिकांसाठी निर्माण करुन ठेवलाय.

अनेक रागांवर आधारित असलेली ही आणि अशीच अनेकानेक गाणी चित्रपटांच्या, भावभक्ती गीतांच्या रुपाने आपण रोज ऐकतो, त्याला अभिनयाची जोड देऊन अनेक कलाकारांनी ती सम्रुध्द करुन ठेवलेली आहेत. त्यातून साकारलेल्या अशा कलाकृतींमुळे आपणही भावविभोर होऊन जातो. कान, डोळेच नव्हेतर अवघे तनमन रोमांचित करुन जातो हीच भारतीय संगीताची जादू म्हणता येईल यात शंकाच नाही. काल, आज आणि उद्याही या संगीताची जादू आपणा सर्वांच्या मनावर मोहिनी घालतच रहाणार आहे हे नक्कीच.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आला श्रावण…

‘श्रावण मासी हर्ष मानसी l

हिरवळ दाटे चोहिकडे l.

शाळेत आमचा कवितांचा एक तास असायचा. सुंदर कवितांना सुरेल चालींचा, आस्वाद होता. ऊन पावसाच्या खेळात बरसणाऱ्या श्रावण सरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, गुलाबी गारवा झेलत आम्ही सरमिसळ टिपेला पोहोचणाऱ्या आवाजात, कविता म्हणायचो. सोमवारी शाळा लवकर सुटायची कारण श्रावणी सोमवारी संध्याकाळी उपास सुटायचा असतो ना! दुपारपासूनच आईची लगबग चालू असायची. गरमागरम वरण भातावर तुपाची धार, मऊसूत पोळ्या इतर पदार्थांबरोबर कधी गव्हाची किंव्हा इतर प्रकारची खीर कधीतरी एखादा गोड पदार्थपण असायचाच. पंचपक्वानांना लाजवील असं ते भरगच्च भरलेल् ताट, ती चव अजूनही आठवते, आणि जिभेवर रेंगाळतिय. माझे वडिल ति. नाना शिवभक्त होते. त्यांना जुन्या गोष्टी सांगायच्या छंद होता हाडाचे मूरलेले, प्रतिष्ठित, इतिहास भूगोलाचे शिक्षक होते नां ते! रुक्ष विषयही रसाळवाणीने सहज सोपा करून सांगायची त्यांची हातोटी होती 1740 ते 61 चा काळ होता तो, बाळाजी पेशव्यांच्या काळात हिंदू धर्माला संजीवनी मिळाल्यामुळे पुण्यात विविध देवतांची मंदिरे उभी राहू लागली. पेशवे शिवभक्त होते त्यांनी लिहिलेल्या पत्रात सुरुवातीला श्री शंकर प्रसन्न. असा मायना असायचा त्यांची शिवभक्ती जागृत, ज्वाज्वल्य होती. अर्थात राजधानीच्या ह्या पुणे शहरात शिवमंदिरे भरपूर होती. चिमाजी अप्पांचं नदीकाठचं ओंकारेश्वर मंदिर, थोरल्या बाजीरावांच्या भगिनी, देहू बाईंनी बांधलेलं अमृतेश्वर, मंडई जवळ रामेश्वर मंदिर, धडपळे यांचा पाषाण महादेव, कर्वे रोडचे पेशवेकालीन मृत्युंजयेश्वर, अजून ऐकताय नां मंडळी!पुण्यात सगळीकडे ईश्वरच ईश्वर भरलेला होता. कॉग्रेस हाऊस समोरचं सिद्धेश्वर, वृद्धेश्वर, सदाशिव पेठेतला महादेव, तसंच नागेश पेठेतलं अति प्राचीन नागेश्वर मंदिर,. दमला नाहीत नां नावं वाचून ? अहो भाग्यवान आहात तुम्ही! त्यानिमित्ताने महादेवाचं नामसमरण होतंय आपल्याकडून. हो की नाही,? आता आणखी एक मंदिर राहिलं बरं का, सोमवारांतलं सोमेश्वर मंदिर. अशी एक का अनेक मंदिरे श्रावण सोमवारी शिवभक्तांमुळे फूलून जायची. धवल पुष्पांनी आणि बिल्वदलांनी महादेवाची पिंड झाकून जायची. अशा अनेक महादेवाच्या प्राचीन अति प्राचीन मंदिराची ओळख नानांनी आम्हाला करून दिली आणि संस्काराचं शिवभक्तीचं बीज बालपणीचं आमच्या मनामध्ये रुजवलं. पृथ्वीवर तर आपण राहतोच पण स्वर्ग आणि पाताळ हे शब्द बालवयात आमच्यासाठी नविन होते, त्यामुळे पाताळेश्वर मंदिर बघण्याची मनांत आतुरता होती. ते सगळ्यांनाच बघायला मिळावं म्हणून शाळेतर्फे ट्रीप काढण्याचं नानांनी मुख्यध्यापकांना सुचवलं. एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आदर्श ज्येष्ठ शिक्षक म्हणून माझ्या वडिलांच्या शब्दाला मान होता मुख्यध्यापिका बापटबाईंनी ही कल्पना सहर्ष उचलून धरली आणि आम्ही पांढऱ्या गणवेशानी जंगली महाराज रस्त्याच्या टोकाचं, अति प्राचीन पाताळेश्वर गाठलं. मनांत धाकधूक होती कारण तिथे म्हणे नाग लोकांची वस्ती असते. एखादा नाग पायाखाली आला तर — कल्पनेनीच बोबडी वळली. अति प्रमाणात, नको इतके पौराणिक सिनेमा पाह्यलाचा दुष्परिणाम दुसरं काय!कारण त्यावेळी नागराज, नागकन्या पाताळ लोक असे सिनेमे आम्ही जरा जास्तच पाहत होतो. पाताळेश्वरला आत खाली खोल उतरतांना मनात आलं शिव शंकराच्या गळ्यात नाग असतात म्हणे, तसा इथे महादेवाच्या पिंडीभोवती एखादा नाग विळखा घालून बसला तर नसेल ना ? नको रे बाबा! महादेवाच्या पिंडीचे लांबूनच दर्शन घेतलेलं बरं! बालमनांत भीती दडुन बसली होती. ह्या भीतीने पिंडीचे दर्शन घेण्यापेक्षा बेलफुला आड नागोबा तर लपले नाहीत ना?इकडेच आमचं लक्ष होतं. बाल बुद्धी कशीअसते नाही कां कधी कुठे भरकटेल सांगता येत नाही. पण एकंदरीत गुहेसारखं गुढ असं हे मंदिर आम्हाला फारच आवडलं. तिथले बांधकाम, नंदी, पिंड बघून शिल्पकलेचा अति प्राचीन सुंदर असा अप्रतिम आणि अजूनही जपला गेलेला वारसा मनांत खोलवर ठसला. महादेवाबरोबर त्या स्थापत्य कलेला आणि पूर्वजांनाही नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. चारी बाजूंनी दगडी बांधकाम असल्याने अंत्यन्त सुखद गारवा तिथे होता. पुढे मोठे झाल्यावर, जंगली महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर, आपोपचं या पवित्र पुरातन शांत पातळेश्वराकडे आमची पावलं हमखास वळायची. ट्रीपला गेलो होतो तेव्हां नुकतीच इंग्रजी शब्दांची ‘ जान पेहचान ‘ झाली होती म्हणून एका अति चाणाक्ष मुलीनी प्रश्न विचारला होता, ” सर पाताळ म्हणजे बेसमेंट नां?आणि ईश्वर म्हणजे गॉड हो नां?तिच्या इंग्रजी ज्ञानाचे कौतुक वाटून सर गालांतल्या गालांत हंसले. पुढची गंमत तर ऐका, तिची पुढची उडी म्हणजे ती म्हणाली, “सर मग आपण या टेम्पलला बेसमेंट नाव ठेवूया का?” कट्टर देशप्रेमी असलेले सर ताडदिशी म्हणाले, “मुळीच नाही! इंग्रजांच् अतिक्रमण, त्यांची सत्ता आपण धुडकावून लावली आहे, आणि आता आपण स्वातंत्र्य मिळवलय. केवळ ज्ञान म्हणून आपण त्यांची भाषा शिकतोय, याचा अर्थ असा नाही की आपली मातृभाषा, आपली पुरातन संस्कृती आपण बदलायला पाहिजे. मला हे पटतच नाही. तुम्ही तुमची मातृभाषा जपलीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा आपली भारतीय संस्कृती आपण कायम मनात जतन करून ठेवलीच पाहिजे स्वतंत्र् झालोत नां आपण? मग आपली संस्कृती कां सोडायची? ती आपणच टिकवून ठेवली पाहिजे. ” सरांच्या शब्दा शब्दातून देशाभिमान ओसंडून वाहत होता. सरांनी आम्हाला मोलाची शिकवण दिली होती. ते पुढे म्हणाले, ” देशाभिमान जागृत ठेवा भारत मातेच्या सुसंस्कृत कन्या आहात तुम्ही. आदर्श भारतीय नागरिक म्हणून, आपल्या देशात आपल्या पूर्वजांचा, पूर्व संस्कृतीचा मान राखून, ताठ मानेनी जगा ” किती सुंदर, श्रद्धा भक्ती आणि देशाभिमानाचा संदेश सहजपणे पाताळेश्वराच्या साक्षीने गुरूंनी आमच्या मनात रुजवला होता. “तस्मै श्री गुरवे नमः”.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जंववरी रे तंववरी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“जंववरी रे तंववरी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

कुठल्याही गडाचा घेरा पायी चालत पालथा घालणं, हा वरकरणी रिकामटेकडा उद्योग वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तसं नसतं. आपण फिरायला लागलो की, आपल्याला खूप शिकायला मिळतं. माणसांकडे, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन नक्की बदलले जातात.

पन्हाळा ते विशाळगड असा पावनखिंड ट्रेक आम्ही सगळे करत होतो. त्यावर्षी ऐन मे महिना असूनही दोन दिवस सलग मुसळधार पाऊस पडत होता. वाटेत लागणाऱ्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमधल्या आयाबहिणींची त्या पावसात प्रचंड धावपळ सुरु होती. जंगलातल्या अशाच एका वाटेवरल्या घरापुढं आम्हीं थांबलो. सरपणासाठी दिवसभर जंगल फिरुन गोळा केलेला लाकूडफाटा पावसात भिजू नये, म्हणून त्या घरातली सगळी माणसं प्रयत्न करत होती. सलग दोन दिवस अविश्रांत पाऊस पडल्यानंतर भिजलेलं सरपण कोरडं पडणार कधी अन् घरात चूल पेटणार कधी? 

आमच्या गटात एक सातवीत शिकणारा मुलगा होता. “दादा, हे लोक गॅस वर स्वयंपाक का करत नाहीत?” असा त्याचा प्रश्न. त्या घरातली एक मुलगी म्हणाली, “तो सिलेंडर खालून इथपर्यंत आणणार कोण? सिलेंडरची गाडी इथपर्यंत येत नाही. सिलेंडर बदली करायला रोज खालच्या रस्त्यांवर जाऊन उभं राहावं लागतं. गाडी नेमकी कधी येणार हे सांगता येत नाही. ” दुसरा एक जण त्यावर म्हणाला, “पण तुम्हाला ऑनलाईन बुक करता येईल. त्यावर आधीच मेसेज येतो, सिलेंडर कधी येणार आहे ते समजतं. तेव्हाच आपण जायचं. ” ती मुलगी म्हणाली, ” आमच्या इथं मोबाईल इंटरनेट चालत नाही. रिकामा सिलेंडर एकवेळ कसातरी खाली घेऊन जाऊ. पण भरलेला सिलेंडर वर कसा आणणार? त्याला फार शक्ती पाहिजे. जेव्हा कुणाची गाडी, बैलगाडी खालून वर येणार, तेव्हाच आमचा सिलेंडर वर येणार. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जड सिलेंडर वर आणता येत नाही. ” आम्हीं सगळे ते उत्तर ऐकून गप्पच झालो. त्या परिस्थितीत उत्तर काढणं किती कठीण असतं हे हळूहळू मुलांच्या लक्षात येत होतं. कळत्या वयात संवेदनशीलता योग्य जाणिवेतून विकसित झाली तर उत्तम असतं. तिला पूर्वग्रह किंवा पोकळ अभिनिवेशाची बाधा झाली तर व्यक्तीच काय, समाजाचं सुद्धा नुकसान व्हायला वेळ लागत नाही.

आम्ही दरवर्षी निरनिराळ्या गडांच्या पायथ्याला असणाऱ्या वाड्या वस्त्यांमधून राहतो. अगदी निर्धास्तपणे राहतो, स्वतःचंच घर असल्यासारखे वावरतो. स्वच्छंद भटकंती करतो, गप्पांचे फड रंगवतो. वीस-पंचवीस जणांच्या सामान-सुमानानं घरं आणि त्या समोरची अंगणं भरुन जातात. पण आजतागायत आमच्या सोबतच्या एवढ्या अवाढव्य सामानातून एक साधं फुटण्याचं पाकीटसुद्धा गायब झालेलं नाही. उलट यापूर्वी मुक्कामी राहिलेल्या माणसांच्या टोप्या, गॉगल्स, मोबाईल चार्जर्स, पॉवर बँका, स्विस नाईफ असल्या कितीतरी अति महागड्या गोष्टी सुद्धा त्यांनी वर्षानुवर्षं निरिच्छपणे एका पिशवीत भरून ठेवलेल्या असतात. अशाच एका कुटुंबात मी व्हॅनगार्ड ची दुर्बीण सुती कापडात गुंडाळून ठेवलेली पाहिली. तीस -चाळीस हजार रुपये किंमतीची ती वस्तू गेली दोन वर्षं त्या कुटुंबात आहे. कुणाची आहे, ठाऊक नाही. पण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही, हा संस्कार पक्का रुजलेला असल्यानं इथल्या माणसांना असले मोह होतच नाहीत. आपण करमणूक किंवा निवांतपणा म्हणून त्यांच्या परिसरात एक-दोन दिवस राहणं सोपं आहे. पण त्यांचं आयुष्य कायमस्वरूपी जगणं हे फार मोठं आव्हान आहे.

मागे एकदा एका अनुभूती मध्ये आम्ही आमच्यासोबत भारत-भारती चा पुस्तक संच नेला होता आणि रात्री मुक्कामी सगळीकडे अंधार करुन कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात भारतातल्या स्त्री क्रांतिकारकांच्या कथा त्या त्या गावातल्या मुलामुलींना वाचून दाखवत असू. भगिनी निवेदिता, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुस्तिका वाचत असू. मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, डॉ. रामन, डॉ. विश्वेश्वरय्या, यांच्या गोष्टी गावातल्या मुलामुलींना सांगताना फार वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव आला.

एखाद्या वस्तीत दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलो तर, कोंबड्या पकडण्याचा खेळ एकदम भारी रंगायचा. एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर हा खेळ एकदम मस्त आहे. झाडावरून एखादा फणस उतरवून त्याचा अगदी मनसोक्त आनंद घेणं, विटीदांडू किंवा गोट्या खेळणं, कैऱ्या पाडणं हा तर अगदी स्वाभाविक उद्योग. कनकेश्वर किंवा रायरेश्वर ते जांभळी पर्यंत जाणारी नेसणीची वाट किंवा केंजळगडाचा पायथा.. करवंदांना तोटा नाही. कोल्हापुरात दाजीपूर किंवा राधानगरी परिसरात भटका, तिथं जांभळं मुबलक.. ! कितीही खा हो, त्या फळांचा मालक फक्त एकच. तो म्हणजे निसर्ग.. !

एका वर्षी तर फार मजा आली. आम्ही प्रतापगड उतरून शिवथरघळीच्या वाटेवर होतो. वाटेत रस्ताभर कैऱ्याच कैऱ्या दिसत होत्या. पण संधी मिळत नव्हती. वरंधा उतरुन शिवथर घळीच्या जवळ पोचलो अन् संधी मिळाली. एका काकांना गूळ लावून आठ दहा कैऱ्या काढून घेतल्या. त्यातल्या तीन-चार पाडाच्या होत्या. आमच्यातल्या एकाचं डोकं बरोब्बर चाललं. त्यानं फोल्डिंग सुरी काढली आणि त्यातल्या कच्च्या कैऱ्या बारीक चिरल्या. एका छोट्या पातेल्यात काढल्या, त्यांना साखर, मीठ, तिखट लावलं आणि झाकून ठेवल्या. सॅक मधून दोन लिंबं काढली. चॉपर काढून कांदे, टोमॅटो, काकडी बारीक कापून घेतली. आणि कोरडी भेळ काढून मोठ्या पातेल्यात सगळं एकत्र करायला घेतलं. झकास भेळ तय्यार.. ! एकट्यानंच पंचवीस जणांसाठी भेळ केली आणि तीही फक्त पंधरा मिनिटांत.. ! चारही बाजूंना नुसत्या डोळ्यांच्या भुवया उंचावल्या तरी अवाढव्य डोंगर दिसतात, अशा ठिकाणी एका भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही भेळ खात होतो. आजूबाजूला खारी, साळुंक्या, चिमण्या अगदी निर्धास्तपणे बागडत होत्या. व्वा.. ! ती दुपार आणि ती भेळ मी कधीही विसरु शकणार नाही.

एखाद्या विस्तीर्ण पठारावर आपली छोटीशी राहुटी टाकून, समोर शेकोटी पेटवून, मंद वाहत्या गारव्यात, शाल पांघरून मस्त गप्पा मारत बसणं, हा अनुभव जोवर आपण घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातली श्रीमंती कळणार नाही. एरवी रात्रभर जागरण करत मोबाईल फोनमध्ये डोकं खुपसून बसणारा सुद्धा अशा वातावरणात रात्री साडेनऊ – दहा वाजता गाढ झोपी गेलेला असतो. रात्रभर शेकोटी ऊब देत राहते. पहाटे चाराच्या सुमाराला पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला की, आपोआप डोळे उघडतातच.. ! रात्र-रात्र झोपच लागत नाही असं रडगाणं गाणारे सुद्धा अशा वातावरणात चटकन निद्रादेवीच्या अधीन होतात.. !

अनुभूती मध्ये मोबाईल फोन, स्मार्ट फोन, आयपॉड, कॅमेरा अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत असलेल्या चालत नाहीत, त्याचाच मोठा लाभ सहभागी असणाऱ्यांना होतो. आपले डोळे, कान खऱ्या निसर्गाचा अनुभव आणि आनंददायक प्रत्यय घ्यायला लागतात. आजवर कधीही न जगलेलं खरंखुरं जगणं अनुभवायला लागतात. साहजिकच, आपल्यालाच आपल्या आनंदमय कोषाचा नव्यानं परिचय व्हायला सुरुवात होते. हीच तर खरी अनुभूती… !

यांत्रिक सुखात आळसावलेल्या आणि सुखासीन आयुष्य जगणाऱ्या आपल्या मुलांच्या मनांना आणि शरीरांना आलेलं जडत्व हाच तर त्यांचा खरा शत्रू आहे. यंदाच्या सुट्टीत हे व्हर्च्युअल जडत्वाचं जोखड आपल्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकायला हवं. त्यांनी स्वतः पलिकडचं थोडं तरी जग पहायला हवं, जगायला हवं. त्यातून त्यांना मिळणारी समृद्धता आणि अनुभवांची श्रीमंती इतकी वेगळी आणि अक्षय्य टिकणारी असेल, की आयुष्यभर ही शिदोरी त्यांना आनंद देत राहील.

हॉटेलिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, वातानुकूलित आराम हेच खरं आयुष्य असा आपला समज असतो. पण हा असा नवा अनुभव मिळाला की, ही जुनी बेगडी कागदी सजावट पाचोळ्यासारखी उडून जाते. ज्ञानोबारायांचं एक फार सुंदर भारुड आहे – 

“जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना ।

जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥”

माऊली म्हणतात – कोल्हा मोठमोठ्या गर्जना करत असतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला सिंहाचं दर्शन होत नाही तोपर्यंतच..

आपल्या मुलांचं तसंच काहीसं असतं. वरवर दिसणाऱ्या चकचकाटानं त्यांना मोहिनी घातलेली असणारच. पण कुठपर्यंत? जोपर्यंत साध्या आणि निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या जीवनशैलीशी त्यांची ओळख होत नाही तोपर्यंतच.. !

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares