मराठी साहित्य – विविधा ☆☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(नमस्कार रसिकहो! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भारतीय स्त्रीशक्तीला प्रस्तुत लेखाद्वारे मानाचा मुजरा प्रदान करीत आहे.)

भारतीय संस्कृतीत ‘स्त्रीला’ अनन्य साधारण स्थान आहे. पुरातन काळापासून आजच्या अत्याधुनिक युगापर्यंत ती ‘शक्ती देवता’ म्हणून ओळखल्या जाते.  ती मांगल्य, सुचिता, पावित्र्य यांची मूर्ती आहे.  प्रेम, वात्सल्य, ममता यांची कीर्ती आहे.  नररत्नांची खाण आहे. कुटुंबाची शान आहे. समाजाची मान आहे.

आजची स्त्री उच्चविद्याविभूषित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आपल्या कर्तव्य कर्मात उभी आहे.  चूल व मूल ही दोन्ही क्षेत्रे सांभाळून तिने आर्थिक बाजूही सांभाळली आहे.  खरेच कुटुंबाची ती ‘कणा’ आहे. स्वाभिमान,अस्मिता हा तिचा बाणा आहे.  जवळ जवळ सर्वच क्षेत्रे तिने आज पादाक्रांत केली आहे.  केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात जाणारी भारतीय पहिली स्त्री कल्पना चावला हिने हा मान मिळविला आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.  प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या राष्ट्रपती पदाचे स्थान भुषविले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वाती महाडिक व सुप्रिया म्हात्रे यांचे देता येईल.  तसेच अगदी अलीकडे अंतराळात गेलेली भारतीय महिला म्हणजे शिरीष बंदला ही होय.

स्त्रीचे महत्व हे नदीसारखे असते. म्हणून केवळ प्रसंगोचित तिचा उदो उदो न करता नेहमीच तिला शाश्वत मानबिंदू देणे समाजाचे कर्तव्य नव्हे का?  कोणत्याही विकृत भावनेला बळी न पडता समाजाने तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.  या नवीन दृष्टिकोनाचे पालन केल्यास आज आपण समाजात तिचे भेसुर, भयान, निंदास्पद अपमानकारक चित्र बघतो ते मिटविण्यास मदत होईल.  स्त्री एक आदर्श माता आहे. याचा अंगीकार केल्यास जिजाबाई ला शिवबा निर्माण करता येईल.  नव्या युगाला औरंगजेबाची गरज नसून शिवबाची नितांत गरज आहे.  शिवरायाचा आदर्श व आदर म्हणजेच स्त्रीत्वाचा गौरव होईल व स्त्रीत्वाचा गौरव हाच तिला केलेला  मानाचा मुजरा होईल. म्हणूनच कवी म्हणतो,

| मूर्तिमंत लक्ष्मी तू घरादारांची

     कुशल अष्टपैलू मंत्री तू जीवनाची

    शिल्पकार तू नवनिर्मितीची

     खाण असे तू नररत्नांची |

  | दुर्गा असे तू जीवन संघर्षाची

    कालिका भासे तू रौद्ररुपाची

    राणी असे तू स्वातंत्र लक्ष्मीची

    संगम देवता तू शक्तीयुक्तीची |

  | ढाल असे तू कुटुंब देशाची

    प्रतिकाराच्या तलवारीची

    कीर्तिवंत तू कर्मभूमीची

    सदा वंदनीय तू युगायुगांची |

या स्त्रीच्या यशोगाथेचा गौरव करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देते

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गेली अनेक वर्षे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, मी विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आठ मार्चच्या निमित्ताने लिहिल्या आहेत. आज मी ज्या महिलेचा परिचय करून देणार आहे ती अत्यंत कर्तृत्ववान आणि उच्चविद्याविभूषित स्त्री आहे, कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात त्या,प्रमाणे….”दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती” …तशीच जिच्या दिव्यतेची गेली अनेक वर्षे प्रचिती वैद्यकीय क्षेत्रात येत आहे ती डाॅ.आरती किणीकर !

डाॅ. आरती किणीकर कार्य कर्तृत्ववाने महान आहे पण वयाने माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तिला एकेरी संबोधत आहे.

आरती किणीकर बी.जे.मेडिकल काॅलेजमध्ये प्रोफेसर असून, ससून हाॅस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ (विभाग प्रमुख ) आहे.

विद्यार्थीप्रिय प्रोफेसर, निष्णात डॉक्टर अशी ख्याती असूनही कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नसलेलं, मृदू भाषिक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.आरती किणीकर!
बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे लहानमुलांच्या आजारावर विशेष संशोधन, थॅलेसेमिया या आजाराविषयक जागरूकता निर्माण करून यशस्वी उपाय योजना, ससून हाॅस्पिटलच्या माध्यमातून अनेक खेडी दत्तक घेऊन कुपोषित बालकांच्या समस्येवर उपाय शोधून, त्या बाबतीतही भरीव कार्य करीत आहे.

डाॅ. आरती किणीकर शालेय शिक्षण काॅन्व्हेंट मधे झाले असून, वडिलांच्या बदलीच्या नोकरी मुळे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई इ.शहरात शालेय शिक्षण झाले!

वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी( मुंबई ), एम.आर.सी.पी.(इंग्लंड)

अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी, यशस्वी डॉक्टर! कर्तव्यदक्ष संसारी स्त्री, पत्नी, सून, आई या सर्व भूमिकेत उत्कृष्ट महिला!

कोरोनो काळात कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या काळात पुण्यात प्रतिबंधक उपायांसाठी दहा डॉक्टर्स ची टीम नियुक्त करण्यात आली त्यात डॉ.आरती किणीकरचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत – व्हेंटिलेटरचा तुटवडा पडल्याने अनेक रूग्ण दगावले, डाॅ. आरती किणीकर यांनी स्वतः संशोधन करून विशिष्ट प्रकारचे व्हेंटिलेटर्स अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले, इतरही अनेक वैद्यकीय यशस्वी प्रयोग केलेआहेत.

डॉक्टर असल्यामुळे कोरोना योद्धा तर आहेच.अतिशय व्यग्र असूनही घर संसारही अतिशय नीटनेटका, वयोवृद्ध सासू सासरे यांची अतिशय उत्तम देखभाल आणि निगराणी राखली! पती डाॅ.अविनाश किणीकर हे सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहेत. मुलगा आशुतोष इंजिनिअर आहे.

डाॅ. आरती किणीकर पूर्वाश्रमीची नयना चव्हाण, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ती माझी मावस बहीण आहे.

डॉक्टर म्हणून ती ग्रेट आहेच पण माणूस म्हणूनही खूप चांगली आहे. वैद्यकीय व्यवसायातलं तिचं कार्यकर्तृत्व मोठं आहेत, त्या क्षेत्रात तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, गेली अनेक वर्षे मी तिचे तिच्या क्षेत्रातील अथक परिश्रम पहात आहे!

आठ मार्चच्या निमित्ताने तिचे अभिनंदन आणि कौतुक!

स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणा-या स्वयंसिद्ध स्त्रिया म्हणजे मला अष्टभूजेच्या कन्याच वाटतात. विविध क्षेत्रातील या अष्टभूजेच्या कन्यांना माझा सलाम!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर☆

स्री म्हणजे देवाने निर्माण केलेली एक अद्भुत चमत्कृती आहे…

अनेक दैवी तेजापासून उत्पन्न झालेली स्त्री म्हणजे दिव्य शक्तीचाच साक्षात्कार आहे..

निसर्गानेच स्त्रीला निर्मीतीचे वरदान दिले आहे.

म्हणूनच स्त्री ही सृष्टीची सर्वश्रेष्ठ अपूर्व कलाकृती आहे..

जीवनातला प्रमुख रंग आहे…

तरीही स्त्री पुरुषांच्या एकत्रित जीवनाचा विचार केला तर ती दुय्यम स्थानावर असते.. तिला अबलाच मानले जाते. तिची जीवनपद्धती, तिच्या वर्तणुकीचे नियम तिच्या चारित्र्याविषयीचे आराखडे हे पुरुषप्रधान संस्कृतीने बांधल्यामुळे ही महान स्त्रीशक्ती दडपल्यासारखी वाटते मात्र… पण जेव्हा या परंपरेच्या साखळ्या तोडून ती लखलखत्या रंगात अवतरते तेव्हांच घडते तिच्यातले दिव्यत्वाचे तेज….!! मग हीच गौरी दुर्गा बनते… दुष्ट वृत्तीची, असत्याची, अनैतिकतेची संहारक बनते… ही नम्र, शालीन, शांत सात्विक, त्यागमूर्ती तेजमूर्ती संभवते… आणि एका वेगळ्याच रंगाने नटते…

माझे काका मला नेहमी सांगायचे, तुझी काकु अशक्त वाटते ंना.. दुर्बल वाटते ना… गरीब वाटते ना.. परावलंबी वाटते ना…

नाही बरं.. जेव्हा संसारात काही समस्या. संकट निर्माण होते तेव्हा हीच काकु बलदंड बनते. मी पार ढेपाळून  गेलेला असतो तेव्हा ही शक्ती बनून रणरागिणी बनते…

बहु शस्त्रधारिणी बनते… संकट पार होई पर्यंत तिची ताकद संपत नाही. श्रद्धेचं विलक्षण बळ तिच्या पाठी असते.. तेव्हा जाणवते, मीच सगळा वेळ एक अबला स्त्री होतो. आणि ती योध्याच्या भूमिकेतील पुरुष असते… स्त्री म्हणून तिचे हे रंग जेव्हा मी अननुभवतो तेव्हांच तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे….. हे  तीव्रतेने जाणवते…

माता भगिनी पत्नी या नात्यांत तिचे मूलभूत रंग असतातच, पण तिच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त रंग असतात, जे जीवनात रंग भरतात… ओळखणारे ओळखतात आणि त्यांच्या जीवनाची सफर सुखदायी करतात…. माझे आजोबा नेहमी म्हणायचे,

“ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो…..”

म्हणून स्री शक्तीची पूजा फक्त गाभार्‍यात नको ती घराघरात हवी…

स्त्री …जीवनाचे रंग निरनिराळे…

जीवन  अनेकांगाने रंगवणारे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

  1. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं – “जगलास किती दिवस?”
  2. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं – “माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?” लाकडं म्हणाली, “मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?”
  3. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,”बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
  4. माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ? – देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
  5. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे? – दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
  6. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, “माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?” त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. “माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?”

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

३) मध्ययुगीन काल~ इ.स. ८०० ते १८००.

या कालखंडांत रागसंगीताचा उगम व प्रसार झाला.साधारण १५०० ते २००० वर्षापूर्वीचा हा काळ.जयदेवाचे गीतगोविंद याच कालखंडांतील असून त्यांतील अष्टपदींवर मालवी, वराटी,वसंत,बिभास,   भैरव अशी रागांची नावे आढळतात.विलक्षण कल्पनाशक्तीचे व बुद्धीचातूर्याचे लक्षण असणारी ही रागपद्धती नेमकी केव्हा,कोणी,कशी आणली या संबंधीचा कोणताही पुरावा अस्तित्त्वांत नाही. परंतु परकीय स्वार्‍या, राज्यांची उलथापालथ ह्यामुळे समाजजीवन फार अस्थिर स्वरूपाचे होते.अशावेळी अनेक संगीत जाणकारांनी आपल्या बुद्धीचातूर्याने लोकसंगीतांतून रागपद्धतीस जन्म दिला आणि पुढे शेकडो वर्षांच्या कालखंडांत सतत नवनव्या रागांची भर पडत गेली.मुसलमान व इंग्रज यांनी दीर्घकाळ एकछत्री साम्राज्य चालविले,भारतीय मनावर परकीयांचे अनेक संस्कार झाले,मात्र भारतीय रागसंगीत हे पूर्णपणे भारतीयच राहीले.जातिगायन पूर्णपणे लुप्त झाले आणि धृपद गायकी अस्तित्वात आली.अकबराच्या दरबारांतील नवरत्नांपैकी मिया तानसेन(रामतनू)हा धृपदिया म्हणून प्रसिद्ध होता.मियाकी तोडी,मिया मल्हार वगैरे आजचे लोकप्रिय राग हे तानसेनाने निर्माण केले आहेत.ह्या संबंथी अशी कथा सांगतात की,तानसेनाने दीपक राग गावून दीप प्रज्वलन केले पण हा राग गात असताना त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा तानसेनाच्या बायकोने व मुलीने मल्हार गाऊन होणारा दाह शांत केला.

मुघल साम्राज्यांत त्यांनी आणलेल्या पर्शियन संगीताने भारतीय संगीतावर थोडा परिणाम केला.तेराव्या शतकांत अमीर खुश्रो या संगीतकाराने भारतीय संगीतावर पर्शियन संगीताची कलमे केली आणि त्यातून एक नवीन गायनशैली अस्तित्त्वांत येऊ लागली.हीच ती आजची लोकप्रिय ख्याल गायन पद्धति. ठुमरी,गझल,कव्वाली हे गायनप्रकारही यावनी कालखंडांतच प्रसार पावले.परिणामी धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकीने पूर्णपणे मैफीली व्यापून टाकल्या.आजही भारतीय संगीताची मैफल ख्याल गायकीनेच व्याप्त आहे.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

“कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

त्यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?इंद्रधनुष्य?

केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

आज एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्या भेटण्या, ऐकण्याचा योग मैत्र या आमच्या ग्रुप मुळे आला! मूळ अहमदाबादच्या पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या आईचे केस अचानक जाऊ लागतात. ऍलोपेशिया असे निदान होते. steroids मुळे 85 kg वजन झाले. पूर्ण केस गेल्याने विद्रुपता आली. लोकांच्या नजरा, प्रश्नोत्तरे, केविलवाणी मुले, सतत विग किंवा स्कार्फ वापरणे याने जेरीला आली. लोकांना कॅन्सरची शंका येई! तुमची आई वारणार सोसायटीतील मुले हिच्या मुलांना म्हणत! नैराश्यात जाऊन स्टूल, दुपट्टा असा सरंजाम पंख्याखाली मांडला आणि समोरच्या खोलीत झोपलेल्या मुलांकडे पाहून विचार बदलला आणि ती पण आमूलाग्र बदलली!

दुसऱ्या दिवशी विग फेकून दिला, स्कार्फ टाकून दिला!  लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी, प्रश्न टाळण्यासाठी वेळेआधी ऑफिसला पोचून वेळेनंतर बाहेर पडणारी ताठ मानेने, आनंदी चेहऱ्याने वेळेत ऑफिसला पोचू लागली, बाहेर पडू लागली.

मी जशी आहे तशीया भावनेने स्वतःवर प्रेम करू लागली! पूर्ण लाईफ स्टाईल बदलली.  आहार, व्यायाम, योगा, सकारात्मकता यांची कास धरली! नवी क्षेत्रे, यशाच्या वाटा खुणावू लागल्या.

मॉडेलिंग ला निवड झाली आणि मागे वळून पाहिले नाही बालभारती मधील नोकरी आणि शनि रवि मॉडेलिंग!

Mrs Universe 2018

Mrs Confidence

अशी खूप खूप बक्षिसे मिळवली!

सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने आपले न्यून मागे टाकून पाय रोवून आयुष्यात उभी राहिली! केसांविना डोक्यावर अपार वेदना सोसून पूर्ण गोंदवून घेतले.

तिचा जन्म झाल्यावर आजी म्हणाली पत्थर जन्मला!

मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला , आजीला कळले नाही तो  हिरा होता!

उपेक्षित आणि खडतर गेलेल्या बालपणाने पुढचे आघात ती झेलू शकली!

तिच्यासारख्या स्त्रियांसाठी आधार गट स्थापन करायचा तिचा मानस आहे.

‘अग्निजा’ तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक गुजराती भाषेत प्रसिद्ध झाले आहे. ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?विविधा ?

☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

 श्री गुरुदेव दत्त .

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवळातील घंटा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? देवळातील घंटा… ? सौ राधिका भांडारकर ☆

फुलोरा कलेचे माहेर घर

१२/०१/२०२१

? देवळातली घंटा ? 

गंमत आठवते.

लहानपणी आम्ही कोपीनेश्वरच्या देवळात देवदर्शनाला जात असू.ठाण्यातलं हे प्रसिदध मंदीर. भव्य, रम्य परिसर..समोर सुरेख तलाव..

देवळातला ऐसपैस चौक..देखणा नंदी आणि गाभार्‍यातली ती ऊंच शंकाराची पिंड..

देवळात शिरताशिरताच,प्रथम घंटा वाजवायची.

तेव्हां माझा हात घंटे पर्यंत पुरायचा नाही. मग आजीच्या कडेवर बसुन छान दणदण घंटा वाजवायची…मग नंदीचेआणि पिंडीचे दर्शन..

देवळातून परततानाही मला घंटा वाजवावीशी वाटे. पण आजी सांगायची ,”परतताना घंटा  नसते वाजवायची…”

तेव्हां मनात हे प्रश्न कधी आलेच नाहीत. देव दर्शनाआधीच घंटा का वाजवायची.परतताना का वाजवायची नाही…

पण नंतर माझ्या थोड्याशा खेळकर, मिस्कील स्वभावानुसार मी काही संदर्भ लावले.

म्हणजे शाळेत असताना वर्गात शिरताना, नोकरी विषयक मुलाखतीच्या वेळी ,नंतर बाॅसच्या केबीन मधे जाताना ,”मे आय कम ईन सर..!!”अशी परवानगी घेउनच जायचे असते.

किंवा कुणाच्या खोलीत शिरताना दार ठोठावायचे.. दारावरची बेल वाजवायची.. हे सारे शिष्टाचार पाळताना देवळातल्या घंटेचा अर्थच उलगडला…दर्शनापूर्वी देवाचीही परवानगी घ्यावी लागते..किंवा घंटा वाजवून भक्ताने देवाला सांगायचे असते!”देवा मी तुझ्या दर्शनासाठी आलोय बरं का…

“घंटेच्या माध्यामातून देवाशी केलेला हा संवादच असतो.

अशा पद्धतीने देवाची अपाॅईंटमेंट घ्यावी लागते, किंवा असे तर नाही ना, घंटा बडवून, देवाला आपल्यासाठी जागे करायचे, म्हणायचे, “परमेश्वरा ,आता तरी डोळे उघड. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सदैव राहू दे,…!!!

मात्र गंमतीचा भाग सोडला तर… घंटानाद म्हणजे ब्रह्मनाद असतो. त्या नादातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे वातावरण मंगलमय, शुद्ध होते.

सर्व नकारात्मकता नष्ट होते.आपल्या मनात विचारांचा कल्लोळ असतो.मन अशांत असते.

घंटानादामुळे चित्त शांत, एकाग्र होते. आणि देवरुपाशी  एक प्रकारचे तादात्म्य अनुभवास येते.

थोडक्यात, जेथे वाजते घंटा तेथे सरतो तंटा.

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print