सौ. दीपा नारायण पुजारी
मी प्रवासीनी
☆ सुखद सफर अंदमानची… नैसर्गिक पूल – भाग – ७ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
मानवनिर्मित अनेक पूल आपण पाहतो. ते स्थापत्य शास्र बघून अचंबित होतो. कोकणात किंवा काही खेड्यात ओढ्यावर, लहान नद्यांवर गावकऱ्यांनी बांधलेले साकव आपल्याला चकीत करतात. असाच एक अनोखा पूल आपल्या पावलांना खिळवून ठेवतो.
हा नैसर्गिकरीत्या तयार झालेला पूल आहे, नील बेटावर. अर्थात शहीद द्वीप येथे. भरतपूर किनाऱ्यावर प्रवाळ खडकांचा बनला आहे. किनाऱ्यावर केवड्याच्या झाडांसारख्या वनस्पतींची दाट बने आहेत. काही पायऱ्या चढून जावं लागतं. नंतर पुन्हा काही पायऱ्या आणि काही वेडीवाकडी, खडकाळ पायवाट उतरून जावं लागतं. पण एवढे श्रम सार्थकी लागतात असं दृश्य समोर असतं. निळा, शांत समुद्र. खडकाळ किनारा. किनाऱ्यावर दाट हिरवी बेटं. आणखी थोडंसं खडकाळ किनाऱ्यावरुन, तोल सावरत, उड्या मारत गेलं की हा नैसर्गिक पूल आपलं स्वागत करतो. पाणी जाऊन जाऊन खडकाची झीज होऊन खडकात पोकळी तयार झाली आहे. या कमानीतले काही महाकाय खडकांचे अवशेष हा पूर्वी एक मोठा विशाल खडक असल्याचा पुरावा देतात. या कमानीच्या खालून मात्र आपण सहज जाऊ शकत नाही. या उरलेल्या खडकांवर चढून वर जायचं, आणि पुन्हा उतरायचं. मगच या पुलापलिकडील दुनिया नजरेत भरते. पाण्यामुळं शेवाळ झालंय. निसरडं आहे. पण हे धाडस केले तर समाधान आहे. तुम्हाला शक्य नसल्यास पुलाच्या पलिकडून जो खडकाळ किनारा आहे त्यावरून ही तुम्ही पलिकडे जाऊ शकता. या कमानीत फोटोप्रेमींची गर्दी होते.
एकूणच या खडकाळ किनाऱ्यावर चालणं हे एक आव्हान आहे. आमच्या सोबत काही पंचाहत्तरीचे तरुण तरुणी होते. ते देखील या किनाऱ्यावर आले. त्यांच्याकडं बघून मी मध्येच कधीतरी माझ्या नवरोजीचा आधार घेत होते याची लाज वाटत होती.
या दगडांत अध्ये मध्ये पाणी साठलं आहे. या पाण्यात अनेक सागरी प्राणी दर्शन देतात. नेहमीप्रमाणे शंख शिंपले तर आहेतच. अनेक प्रकारचे मासे, शेवाळ, खेकडे यांची रेलचेल आहे इथं. हिरव्या पाठीची समुद्र कासवं इथं बघायला मिळतात. या खडकाळ किनाऱ्यावर असणाऱ्या डबक्यांपाशी थांबून कितीतरी मजेशीर गोष्टींचं निरीक्षण करता येतं. फोटोग्राफी करणाऱ्यांना वेगळे फोटो मिळतात. आमच्या टूर गाईडनं सांगितलं की या खडकांभोवती विळखे घालून मोठमोठाले साप सुद्धा असतात. हे विषारी असतात. आम्हाला दिसले तरी नाहीत. विश्वास ठेवायलाच हवा होता कारण, त्याच्याच मोबाईलवर त्यानं स्वतः घेतलेला फोटो दाखवला. असेलही. त्या शांत, खडकांमध्ये समुद्रसाप वस्तीला येतही असतील. खडकांची झीज होऊन तयार झालेला हा पूल पूर्वी हावडा पूल म्हणून ओळखला जाई. येथे बंगाली लोकांची वस्ती आहे. म्हणून असेल. याला रविंद्रनाथ सेतू असेही नाव कुणी दिलंय असं कळलं.
अंदमान मध्ये शेती फारशी केली जात नाही. बहुतेक सगळं अन्न धान्य, फळं भाज्या कलकत्त्याहून येतात. पण हिंदी महासागरातल्या या शहीद द्वीपवर पालक, टोमॅटो सारख्या काही भाज्या घेतल्या जातात. शहाळी मात्र भरपूर मिळतात. नैसर्गिक पूल बघण्यासाठी केलेले श्रम नारळाच्या थंडगार, मधुर पाण्यानं विसरले जातात.
शहीद बेटावरील लक्ष्मणपूर किनारा सुर्यास्त बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किनारा मऊ, पांढरी शाल ओढून बसला आहे. शांत किनारा, तितकाच शांत शीतल निळा समुद्र. आणि निळ्या आकाशात लांबवर चाललेली रंगपंचमी. केशरी, पिवळी लाल, गुलाबी, जांभळे रंग धारण करणारा ते नीळाकाश. त्याच्या बदलत्या छटा बघत शांत बसून रहावं. स्वतः बरोबर निळ्या खोलीचाही रंग बदलवणाऱ्या जादुई संध्येला अभिवादन करावं. आणि मग नि:शब्द पायांनी परतावं. हो, पण, पाण्यात बुडणारा सूर्य बघायला मिळेल असं नाही. कारण इथलं अनिश्चित हवामान. दुपारपासून तापलेलं आकाश अचानक कुठुनतरी आलेल्या काळ्या ढगांनी झाकोळतं. मग संध्येला भेटायला केशरी पाण्यात शिरणारं ते बिंब शामल ढगा़आड दडताना बघावं लागतं.
– समाप्त –
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈