सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
दशके लोटली सात तरी तो स्वातंत्र्यलढा अजुनी गाजे
‘मला पहा अन फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।
स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही.. रुचे मना ते करूही धजतो
लोकशाहीचे नायक आम्ही.. कोण आम्हाला अडवू शकतो ।।
जो तो आहे स्वतंत्र तर मग.. का आम्हा चिंता इतरांची
आपले आपण फक्त पहावे, , जळो ना तिथे भ्रांत दुजांची … ।।
कामापुरते गोड आम्ही अन काम संपता पाठ करू
गरज आमची पडेल तेव्हा.. नन्नाचा पाढाच सुरु ।।
सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी
अन सहाय्य तेही कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।
निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही
निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।
शतक की आले एकविसावे.. तिकडे आम्हा झेपायाचे
यायचे जयांना त्यांनी यावे, इतरां मागे सोडायाचे ।।
राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच स्थिती
नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दिन अती ।।
राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती
एकाची नित चाले ‘प्रगती’.. दुज्या नशिबी अधोगती ।।
मर्कटहाती कोलीत तैसा स्वैराचारा जणू परवाना
दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।
उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला
जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन परजा आपल्या मनशक्तीला ।।
शक्ती एकजुटीची जाणून … मिळवा मतभेद की मातीला
स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला……..
मिरवा सशक्त स्व-राज्याला…… ।।
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ वीट अवीटाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
शीणली पाऊले,
झाली ओढाताण.
जीर्ण झाली आता,
पायीची वहाण.
पायांची दुर्दशा,
प्रवास संपेना.
वाट सापडेना,
मुक्कामाची.
आक्रंदते मन,
अंतर्यामी खोल.
नात्यांचीही ओल,
हरवली.
कशासाठी देवा,
करु पायपीट.
वीट आला असे,
अवीटाचा.
लखलाभ तुला,
तुझे पंढरपूर.
चंद्रभागा वाहो,
पापणीत.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आनंदहरी
कवितेचा उत्सव
☆ कसा जाऊ सांग आता… ☆ श्री आनंदहरी ☆
☆
पडेना हे पाऊल पुढे
जगणे भार होई गं ss
कसा जाऊ सांग आता
विठ्ठलाच्या पायी गं ?…।।
*
काळजात अद्वैती तो
गळाभेट नाही
रूप साजिरे पाहण्यासी
मन ओढ घेई
किती वाट पाहू आता
जीव तुटत जाई गं ss।। १ ।।
*
त्याला आस नाही उरली
माझिया भेटीची
वेळ झाली वाटे आता
ताटातुटीची
डोळ्यांमध्ये त्याच्यासाठी
आसवांची राई गं ss ।। २ ।।
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ भेट… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
होता भेट तुझी ती
रात पौर्णिमेची
मिठीत दडलेल्या
विश्व मोहिनीची
*
ते नयन का व्हावे
सैरभैर तेव्हा
माझाच मी नुरलो
आला सुगंध जेव्हा
*
ती चांद रात होती
फुलांची वरात
होते नक्षत्रांचे देणे
सुखाची बरसात
*
ती कस्तुरीची किमया
मृगया होती खास
राना पल्याड गेला
केशराचा वास
*
मधुरम निनाद तो
पायी नुपुरांचा
स्वच्छन्द मनमोर
नाचे वनी केतकीच्या
*
अधीर शुक्रतारा
ओघळते मोती
कोंदणाच्या जागी
पाझरल्या ज्योती
*
सृजनशील नियम हा
प्रेमराग गाती
सर्व काही उघड गुपीत
अनादी अनंत राती
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ प्राजक्त… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
बागेत तो इतर झाडांबरोबर दिसत होता ,
जागोजागी आलेल्या पांढर्या नाजूक फुलांनी शोभत होता ,
त्याचा मधुर सुगंध सर्वत्र येत होता ; सर्वांना स्वतःकडे आकर्षित होता .
फांद्यांच्या अग्रा – अग्रांना आलेली नाजूक फुले
पडून गेलेल्या पावसाच्या थेंबाप्रमाणे वाटत होती ,
अगणित जन्मलेली अशी डोळ्याला खूप सुखावून जात होती .
गवतावर पडलेला त्यांचा मोठा खच ,
झाडाची उदारता जणू दाखवत होता .
फुले पाहून वेचायला आलेल्या प्रत्येकाला ,
त्याने त्यातून उदारतेचा धडा दिला होता .
उदारतेतील आनंद उपभोगत होता ,
त्यामुळेच त्याला रोज बहर येत होता ,
उद्याचे काय ? हा विचार करत नव्हता
त्यानेच की काय तो आनंदित होता .
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
संस्कृत श्लोक…
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १ ॥
कथित अर्जुन
शास्त्रविधी विरहित श्रद्धेने जे अर्चन करिती
सात्विक राजस वा तामस काय तयांची स्थिती ॥१॥
श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २ ॥
कथित श्रीभगवान
देह स्वभावज श्रद्धा पार्था असते तीन गुणांची
ऐक कथितो सात्विक राजस तामस या गुणांची ॥२॥
*
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३ ॥
*
स्वभाव मनुजाचा श्रद्धामय तसे तयाचे रूप
अंतरी असते श्रद्धा जागृत अंतःकरणानुरूप ॥३॥
*
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४ ॥
*
सात्विक भजती देवांना यक्षराक्षसांसि राजस
प्रेत भूतगणांचे पूजन करिताती ते असती तामस ॥४॥
*
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५ ॥
*
त्याग करुनिया शास्त्राचा घोर तपा आचरती
युक्त कामना दंभाहंकार बलाभिमान आसक्ती ॥५॥
*
कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६ ॥
*
कृशावती कायास्थित सजीव देहांना
तथा जेथे स्थित मी आहे त्या अंतःकरणांना
मतीहीन त्या नाही प्रज्ञा असती ते अज्ञानी
स्वभाव त्यांचा आसुरी पार्था घेई तू जाणूनी ॥६॥
*
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ ७ ॥
*
भोजनरुची प्रकृतीस्वभावे तीन गुणांची
यज्ञ तप दानही असती तीन प्रकाराची
स्वभावगुण असती या भिन्नतेचे कारण
कथितो तुजला भेदगुह्य ग्रहण करी ज्ञान ॥७॥
*
आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८ ॥
*
आयु सत्व बल आरोग्य प्रीति वर्धकाहार
सात्विका प्रिय स्थिर रसाळ स्निग्ध हृद्य आहार ॥८॥
*
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९ ॥
*
अत्युष्ण तिखट लवणयुक्त शुष्क कटु जहाला
दुःख शोक आमयप्रद भोजन प्रिय राजसाला ॥९॥
*
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १० ॥
*
नीरस उष्ट्या दुर्ग॔धीच्या अर्ध्याकच्च्या शिळ्याप्रती
नच पावित्र्य भोजनाप्रति रुची तामसी जोपासती ॥१०॥
☆
मराठी भावानुवाद © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ सिंधुताई– – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
संघर्षाचेच नाव असते जीवन
कुणी निघते त्यात होरपळून
कुणी निघते तावून सुलाखून
कुणी उडते नवीन पंख लेवून
*
आधी होती ती फक्त छोटा बिंदू
घरीदारीही जग तिला लागले निंदू
बिंदुची झाली सपकाळांची सिंधू
संघर्षाच्या बिंदुचा झाला महासिंधू
*
संशयाच्या भूताने घरच्यांना पछाडले
घरातल्यांनी तिला मग लाथाडले
मायनी पण तिच्या तिला नाकारले
सरणावरही तिने जीवन चितारले
*
फाटकं चितारतांना, दिसली नवी वाट
माय झाली ती लेकरांची, नवी पहाट
स्विकारला संघर्षाच्या वळणांचा घाट
निंदणारे सगळे झाले मग तिचे भाट
*
संघर्षाच्या ठिणगीतून वेचली तिने फुले
आनंदाने खूप खूप नाचली तिची मुले
समाजापुढे मदतीला हात तिने पसरले
सिंधुताई तू लेकरांना आकाश केले खुले
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ माझ्यातुन मी मला वगळले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
माझ्यातुन मी मला वगळले
तुटे पिंजरा विमुक्त पक्षी
मिटल्या पंखां गगन लाभले
*
माझ्यातुन मी मला वगळले
परिधीमधल्या प्रत्येकाशी
जन्मबंध मग सहजी जुळले
*
माझ्यातुन मी मला वगळले
श्रवणी घेता त्यांच्या गाथा
मौनही माझे धन्य जाहले
*
माझ्यातुन मी मला वगळले
नभ करुणेचे रुजले ह्रदयी
शिवार माझे नंदन झाले
*
माझ्यातुन मी मला वगळले
रंगविलेल्या माझ्या चित्रा
दूर राहुनी बघता आले
*
माझ्यातुन मी मला वगळले
परदुःखांना माझ्या देशी
बिनपरवाना शिरता आले
*
माझ्यातुन मी मला वगळले
भिजत राहिलो जन्मजळी पण
कमलपत्र मज होता आले
*
माझ्यातुन मी मला वगळले
नोंदवहीतुन परंतु त्यांच्या
मला वजा ना होता आले !
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ “सहज काही साधं सोपं !” – लेखक : अज्ञात – अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(आमच्या गुजराती शाळेच्या ग्रुपवर एक छान (गुजराती) मेसेज आला त्याचा स्वैर अनुवाद करायचा मोह आवरला नाही.)
☆
नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी
कि हत्ती नाही करत विचार वजन कमी करण्याचा
*
कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची
घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची
*
हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी
आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी
*
सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची
जिराफाचे नाही झिजत माकडहाड किंवा मणका कधी
*
पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी
आणि चोवीस तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी
*
उच्च स्वरात कूजन करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी
पक्षी नाही अपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधी
*
मग आपल्यालाच का
भय चिंता कंटाळा थकवा झीज स्खलन
काळजी माया भोग आणि रोग.. !
*
पशु पक्ष्यांसारखे सहज सोपे साधे
जगता आले तर !
प्रयत्न तर करून बघावा
*
मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा…..
कोणताही अर्ज केला नव्हता
नव्हता लावला कोणताही वशिला
तरीही
डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यन्त
चोवीस तास रक्त प्रवाहित ठेवतोस
जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस
निरंतर पडत राहतात ठोके हृदयाचे लयबद्ध
असं ते कोणतं यंत्र बसवलं आहेस देवा
*
पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत
निर्वेध संदेशवहन करत राहतोस
कोणती शक्ती आहे ही.. नाही कळत मला.
*
हाडं आणि मांस यांच्यामधून वाहणारं रक्त
याचे मूळ आणि अर्थ कसे मी शोधावे
*
हजार हजार मेगापिक्सेलवाले दोन कॅमेरा
अहोरात्र बारीक बारीक दृश्य टिपत असतात
*
दहा हजार चवी आणि अगणित संवेदनांचा अनुभव देऊ शकणारी
जिव्हा नामक अफाट सेन्सर प्रणाली
*
विविध फ्रिक्वेन्सीचे आवाज काढणारी स्वरप्रणाली
आणि येणाऱ्या असंख्य आवाजाचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान
*
७५ टक्के पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या
त्वचेवर असणारी कोट्यवधी छिद्र
पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेजचा
*
कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ
गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावलं कधीही
*
केवढी अजब रचना, काळजी, शक्ती, यंत्रणा, प्रतिपाळ
स्मृती शांती समज ही…… सगळंच अदभूत अविश्वसनीय
माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणता तंत्रज्ञ बसला आहे न कळे
या सगळ्याचे भान ज्ञान राहू दे बस,
तूच बसवलेल्या वसवलेल्या आत्म्यामध्ये.
राहो सदबुद्धी कृतज्ञता स्मरण, चिंतनाचे भान
हीच एवढी प्रेरणा प्रार्थना.
परमेश्वरा…. तू कोण कुठे असशील त्या चरणी.
☆
मूळ कर्ता : अज्ञात
अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈