मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय दिलं कवितेनं ? ☆ सौमित्र ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ काय दिलं कवितेनं ? ☆  सौमित्र ☆

काहीच दिलं नाही कवितेनं

उलट बरंच काही घेतलं माझ्यातलं

बरंच काही देऊन

 

गाणं दिलं आधी गुणगुणणं दिलं

छंद दिले मुक्तछंद दिले मग एक दिवस

प्रेम विरह आणि हुरहुर दिली

रडणं दिलं उगाचचं हसणं दिलं

 

कडकडीत ऊन घामाच्या धारा

संध्याकाळ कातरवेळचा पाऊस

पावसाची पहिली जाणीव दिली

 

समुद्र दिला किनारा दिला

लाटांवर हलणारी बोट

वाट पाहणं दिलं बोटीवरलं

 

नंतर रस्त्यांवरली निरर्थक वर्दळ

रात्री अपरात्रीचे रिकामे रस्ते

त्यावरलं उगाचचं दिशाहीन चालणं दिलं

 

निरंतर जागरण बिछान्यातली तळमळ

हळूहळू डोळ्या देखतची पहाट दिली

 

पुढे निरर्थक दिवस निर्हेतुक बसून राहाणं

 

त्यानंतर दारू, नशा, गडबड, गोंधळ

हँगओव्हर्स दिले हार्ट ॲटॅक वाटणारे

लगेच ॲसिडीटी, झिंटॅग-पॅनफॉर्टी

 

काल कागद दिला कोरा

 

आज न सुचणं दिलं

 

थांबून राहिलेला पांढराशुभ्र काळ

कागदावर पेन ठेवताना अनिश्चिततेचा बिंदू

बिंदूतून उमटलेला उत्स्फूर्त शब्द वाक्य होताहोता

झरझर वाहणारा झरा दिला

 

प्रसिद्धी, गर्दी, एकांत दिला गर्दीतला

ताल भवतालासह आकलन दिलं

 

दिलं सामाजिक राजकीय भान

 

लगेच भीती दिली पाठलाग

मागोमाग दहशत घाबरणं

गप्प होण्याआधीचं बोलणं दिलं

 

चिडचिड स्वत:वरली जगावरला राग

 

अखेर जोखीम दिली लिहिण्याची

लिहिलेलं फाडण्याची हतबलता

 

अपरिहार्यता दिली दिसेल ते पाहण्याची, पाहात राहण्याची आज़ादी दिली

स्वातंत्र्य दिलं पारतंत्र्य दिलं

आंधळं होण्याचं

 

दिलं बरंच काही दिलं पण

काढूनही घेतलं हळूहळू एकेक

 

आणि आज

बोथट झालेल्या संवेदनेला

कविता म्हणते

लिही

आता लिही

 

– सौमित्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रीत बरसते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

प्रीत बरसते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

शुभ्र चांदणे शुभ्र चमेली

त्यात आपुली दोन मने

 

धुंद होऊनी तुझ्या संगती

जाग जागलो कितेक राती

त्या रातींच्या आठवणीनी

फुलतील आणिक नवस्वप्ने

त्यात आपुली दोन मने

 

         कर देता तू माझ्या हाती

         स्वर्ग उतरला धरणीवरती

         त्या स्वर्गाच्या बागेमधूनी

         गात फिरूया प्रीत कवने

         त्यात आपुली दोन मने

 

अशीच राहो शांत निशा ही

समीप आणिक माझ्या तू ही

सुख स्वप्नांच्या नंदनवनी या

प्रीत बरसते,नव्हे चांदणे

त्यात आपुली दोन मने

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 130 ☆ फाळणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 130 ?

☆ फाळणी ☆

फक्त देहाची नको रे मागणी

भावनांची त्यात व्हावी पेरणी

 

लावणी ही सांगते आध्यात्म पण

का तरी बदनाम केली लावणी ?

 

अब्रु नाही राखता आली तिला

फास झाली तीच माझी ओढणी

 

प्राण तू मातीत आहे ओतला

का तरीही मोडतातच खेळणी ?

 

पाठिवर नागीन काळी डोलते

अन् फण्यावरती सुगंधी चांदणी

 

ना सुखाने नांदता आले तुम्हा

व्यर्थ केली का उगाचच फाळणी

 

जीवनाचे सार झालेले सपक

त्यास दे तू छान आता फोडणी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो. डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती… त्यात काही पाय गमावलेले, हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले, तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते. मग त्यात काही नर्तक होते, चित्रकार होते, मॅरेथॉन धावणारे होते, ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला … आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली. ते शब्द होते ….

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर …

त्या साऱ्या मंडळींची जिद्द, त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते. ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती.

नेमका दोन चार दिवसांनी मला ‘ इंद्रधनू पुरस्कार ‘ जाहीर झाला. ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली. लोकांची छान दाद मिळली. कार्यक्रम संपताच शं. ना. नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले, ‘ एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?’ मी म्हटलं, ‘ बोला काय आज्ञा आहे ?’ तर म्हणाले, ‘ आत्ता जी कविता ऐकवलीत, तीच हवी आहे. काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं.’ माझ्याकरता ही मोठी दाद होती. मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं, ‘ आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता …’ ते म्हणाले, ‘ का ? अहो, ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तेव्हा ही सादर करत चला यापुढे..’

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ‘ कसे गीत झाले ‘ या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात.

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला. कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो. ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ‘ कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता. माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते. त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली. योगिताचा गोंधळ उडाला होता. मी ती कविता विसरतोय, असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती. अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो. अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला. तिलाही तो पटला. हुशारीने सावरून घेत ती म्हणाली, ‘ आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !’ इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली, ‘ गुरू ठाकुरांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये ‘ ही आयुष्यावरची कविता सादर करावी. मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत. खूप प्रोत्साहन देतात. मला पूर्ण कविता ऐकायची आहे.’ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणाचाही अवलंब न करता मी सुरुवात केली …

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ………!!

असे जगावे

 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची

आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना

गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना

स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 – श्री गुरू ठाकूर

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

प्रिय सावित्रीबाई

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं

की आज तुझी पुण्यतिथी

बायकोला सांगितलं,

अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.

मग स्वतःलाच विचारलं

सावित्रीबाईंची पुण्यतिथी ?

कसं शक्य आहे ?

अगं, माझ्या गावातली, शहरातली,

देशातली प्रत्येक मुलगी

जेव्हा शिक्षण घेऊन

एखाद्या मोठ्या पदावर जाते,

शिक्षणाच्या भरोशावर एखादा

सन्मान प्राप्त करते

तेव्हा – तेव्हा तूच तर

जन्माला आलेली असतेस

यंदा माझी पुतणी पदवी घेईल

म्हणजे यंदा तू माझ्या घरातही

जन्माला येणार आहेस

सुरुवातीला प्रश्न पडला

तुला काय म्हणावं ?

बाई म्हणावं की आई म्हणावं ?

आमच्याकडे गावात

मोठ्या बहिणीला बाई म्हणतात

मग विचार केला

माझी आई शिकलेली,

थोरली बहीण शिकलेली,

मावशी शिकलेली,

माझी पुतणी शिकतेय

म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात

माझ्याभोवती आहेस,

सरकारचं घोषवाक्य आहे

‘मुलगी शिकली, प्रगती झाली !

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली’.

आजही वाटतं तुला

भारतरत्न मिळायला हवं होतं

मग लक्षात येतं की

या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत

ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत

जेव्हा कुठल्या महिलेला

भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू

ज्योतिबांना सांगत असशील

‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला

भारतरत्न मिळालं’

तुझ्या बद्दलचा मुळातच असलेला आदर

सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार

सहन करीत तू तुझं काम करीत राहिली

म्हणजे आतून तू किती कणखर

असली पाहिजेस

ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी.

तसूभरही ढळली नाही

आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने

काळाच्या मागे जावं,

लहान बनून तुमच्या घरात यावं

ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्या

तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत.

मला एक प्रश्न नेहमी पडतो

आपण करतो आहोत

ते काम क्रांतिकारी आहे याची तुला

जराशीही कल्पना नव्हती का ?

कारण नखभर ही अटीट्युड नव्हता तुझ्यामध्ये

नखभर सोडा, अणू – रेणू इतका

सूक्ष्म पण नाही

हे कसं साध्य करायचीस ?

नाहीतर आम्ही बघ

हीतभर करतो आणि हात भर

त्याचा हो हल्ला, कल्ला करत

ती दुखणी सांगत

ते यश सांगत गावभर हिंडतो

कदाचित म्हणूनच

तू त्यावेळच्या स्त्रियांना

शिक्षित करण्यासाठी म्हणून

जी अक्षरं पाटीवर गिरवलीत

ती काळाच्या पाठीवर गिरवला गेलीत

आणि या भारतात

जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री

शिक्षित होत राहील

तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील

पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील.

 

–  श्री गजानन घोंगडे

9823087650

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 74 ☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 74 ? 

☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆

हे शब्द अंतरीचे…

तप्त उन्हाच्या झळा

 

तप्त उन्हाच्या झळा

चैत्र महिना तापला

पळस फुलून गळाले

होळीचा सण आटोपला…०१

 

तप्त उन्हाच्या झळा

जीव अति घाबरतो

थंड पाणी प्यावे वाटे

उकाडा बहू जाणवतो…०२

 

तप्त उन्हाच्या झळा

शेतकरी घाम गाळतो

अंग भाजले उन्हाने

तरी राब राब राबतो…०३

 

तप्त उन्हाच्या झळा

फोड आला पायाला

अनवाणी फिरते माय

चारा टाकते बैलाला …०४

 

तप्त उन्हाच्या झळा

सोसाव्या लागतील

थोड्या दिसांनी मग

मृगधारा बरसतील…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बोलीची आई… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बोलीची आई… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

आईच्या गर्भात असल्यापासून, तुलाच ऐकते,

तूच माझी सखी तुझ्या वर भरभरुन प्रेम करते.

बोबडे बोल तुझ्याच ओठानी, आई म्हटले तुझ्याच शब्दानी.

एक जन्मदात्री आई,

एक कर्मदात्री आई भारतमाई,

एक मायमराठी बोलीची आई.

तू आहेस, म्हणून व्यक्त होता येत,

प्रेम, जिव्हाळा, आदर, राग, नावड सार सांगता येत.

माऊली, तुकोबा, चोखोबा, जनाबाई,

बहिणाबाई उमगतात, तुझ्याचमुळे,

अत्रे, पु.ल., ग.दि.मा., व.पु., शिरवाडकर आणि खूप सारी दैवत भेटतात तुझ्याचमुळे.

उतराई कशी होऊ, न फिटे हे ऋण,

राहीन ऋणातच तुझ्या, किर्ती तुझी वाढवेन.

 

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 3 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 3 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५.

तुझ्या चरणकमळाजवळ निवांत बसावे

असे  आज मला वाटते

हातात असलेली कामं नंतर करता येतील

 

किनारा नसलेल्या सागरासारखी असंख्य

निरर्थक कामं मी करीत राहतो

पण तुझ्या दर्शनावाचून माझ्या मनाला

ना विश्रांती ना आराम

 

गाणी गात वसंत ॠतू  माझ्या गवाक्षाशी

रुंजी घालतो आहे.

फुलपाखरं बागडणारी आणि

पुष्पगुच्छांचा सुवास हवेत दरवळत आहे

 

जीवन समर्पणाचं गीत गात,

शांत मनानं तुझ्या समोर

विसावा घ्यावा असा हा क्षण आहे

 

६.

कोमेजून आणि धुळीत मिसळून जाण्याअगोदर

हे छोटेसे फूल तू खुडून घे l आता विलंब नको

 

तुझ्या गळ्यातल्या हारात त्याला स्थान नसेलही,

पण तू ते खुडताना त्याला होणाऱ्या

यातना  त्याचे गौरवगीत आहेत.

मला समजण्याअगोदरच समर्पणाचा

हा दिवस कधीच निघून गेला असेल.

 

फिकट रंगाचे आणि मंद वासाचे हे फूल

तुझ्या चरणसेवेतच यावे.

अजून वेळ आहे, तोवर ते खुडून घे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

दुःख झाले एवढे की, आसवांना वाट नाही

तो किनारा दूर झाला, नाविकाला घाट नाही ||धृ.||

 

लाट आली, लाट गेली

जाहल्या ताटातुटी..

ऐन माध्यानी सुखाच्या

दाटले तम भोवती,

शुक्रतारा निखळला जो, तो पुन्हा दिसणार नाही ||१||

 

या मनाच्या मर्मबंधी

स्मरण यात्रा राहिली,

वेदना लपवून पोटी

जी जिवाने साहीली,

मंद झालेल्या प्रकाशी, सावली दिसणार नाही ||२||

 

हात हातातून सुटला

अंतरीचा बंध तुटला,

पंख तुटल्या पाखराला

सांत्वनाने धीर कुठला ?

आसवांची तेवणारी, ज्योत ही विझणार नाही ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होळीचा रंग… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ होळीचा रंग.. ☆ श्रीशैल चौगुले ☆

रंग ऊधळतील दिशा

मनात भिजवीत आशा

होळी सप्तल इंद्रधनू

जीवन अनुभूती श्रुषा.

 

ओल्या संस्कृतीचा हा रंग

संस्काराने ओलेते अंग

प्रेम-भक्तीचा मैत्र संग

जणू गोकूळी राधा-श्रीरंग.

 

भेटी-गाठी नव्या जुन्या त्या

भरुन जाईल अंतरंग

ऋणानूबंध माणूसकीत

भेद विसरुन होळीत दंग.

 

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares