मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहेर… ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ माहेर… ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(षडाक्षरी)

   माहेर विसावा,

  मनाला गारवा,

  भावाची ही छाया

  वहिनीची माया!

 

 आईची नजर,

प्रेमाची पाखर !

 थकल्या देहात,

माया ती अपार!

 

माहेर बंगली,

 प्रेमाची सावली!

माहेर प्रेमाने,

मनात गुंतली!

 

 माहेर ओसरी,

 प्रेमाची शिदोरी!

ओढ राही मनी,

  नित्य मनांतरी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #82 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 82 ? 

☆ अभंग…   ☆

 

वात कफ पित्त, त्रय दोष युक्त

नच कधी मुक्त, जीव पहा…!!

 

रोगाचे आगार, मानवाचा देह

सुटतो का मोह, कधी याला…!!

 

संपूर्ण आयुष्य, हावरट बुद्धी

नाहीच सुबुद्धी, याच्याकडे…!!

 

शेवट पर्यंत, पाहिजे म्हणतो

स्वतःचे करतो, अहंकारी…!!

 

वाईट आचार, सदैव साधतो

देवास भजतो, स्वार्थ हेतू…!!

 

कवी राज म्हणे, स्वभाव जीवाचा

उपाय कुणाचा, चाले ना हो…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 [१९]

 जर तू अबोला धरलास,

 तर तूझे मूकपण मनात साठवून,

 तेच मी सोसत राहीन, गप्प बसेन,

 तारकांप्रमाणे सतत पहारा करेन

 आणि सहनशीलपणे

 नतमस्तक होणाऱ्या निशेप्रमाणे स्तब्ध राहीन

 

 निश्चितच पुन्हा उजाडेल,

 अंधार नाहीसा होईल,

 आकाशातून वाहणाऱ्या सोनेरी किरणांतून

 तुझी साद ऐकू येईल

 

तुझ्या गीतांचे शब्द

माझ्या घरट्यातील पक्ष्यांच्या पंखावर

झुलू लागतील

आणि माझ्या रानफुलाबरोबरच

 तुझ्या गीतांची धून उमलत राहील.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यावी सर हलकीच आता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ यावी सर हलकीच आता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

ग्रीष्मामधले नको निखारे,नको उन्हाचा भाता

यावी सर हलकीच आता

 

कृष्णघनांची व्हावी गर्दी यावे थेंब टपोरे

माळावरूनी फिरून यावे मृद्गंधाचे  वारे

बघता बघता चिंब भिजावा अवघा डोंगरमाथा

यावी सर हलकीच आता

 

फडफडणारे पंख भिजावे,तुषार पानोपानी

आसुसलेले गवत नहावे पिवळ्या कुरणामधूनी

दूर दिसावी माळ खगांची नभात उडता उडता

यावी सर हलकीच आता

 

रंगमंच हा सहज फिरावा क्षणात दुसरा यावा

कुंचल्यातूनी जलधारांच्या अवघा ग्रीष्म पुसावा

नूर मनाचा बदलून जावा वसंत सरता सरता

यावी सर हलकीच आता

 

ग्रीष्मामधले नको निखारे नको उन्हाचा  भाता

यावी सर हलकीच आता.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगीत भोंगे… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगीत भोंगे… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दोन भोंगे समरासमोर, मिरवत होते दिमाखात

आरती अजान गात होते, रहात होते एकांतात

 

दृष्ट लागली देवाचीच, अल्ल्लालाही कबूल नव्हते

भोंग्यांमुळेच जाग यायची, दोघानांही ते मान्य होते

 

न्यायदेवतेने आदेश दिले, आवाजावर बंधन घातले

समस्त भोंगे जातीवर, मर्यादेचे आभाळ कोसळले

 

स्वतःच्याच रुबाबात दोघे, आदेशाचे पालन नव्हते

भटजी मौलवी हेच त्यांचे, पालन कर्ता हार होते

 

राजकर्त्यांना कैफ आला, निवडणुका त्या जवळ आल्या

जातपातीच्या चुलीवर, पोळ्या त्यांनी भाजायला घेतल्या

 

शांत असलेल्या भोंग्यांनाही, भगवे हिरवे रंग चढले

अजान हनुमानचालीसानी, महा राष्ट्र ते दुमदुमले

 

भगव्या हिरव्यांनी ठरविले, गळे आपले नाही कापायचे

नेत्यांसाठी आपणच आपले, बळी कदापी नाही घ्यायचे

 

शेवटी ठरविले भोंग्यांनी, आपणच ह्यातून मार्ग काढू

नेत्यांसाठी न भांडता, आपणच वेळेचे बंधन पाळू

 

सामोपचाराने दोघांनी, पहाटेचा आवाज विसावला

भगव्या हिरव्या भोंग्यांनी, शांतीचा सफेद स्विकारला

 

काकड आरतीच्या भोंग्यालाही, वेळेचे बंधन झाले

हिंदू देशातील महा राष्ट्राचे, समस्त डोळे पाणावले

 

मुगींच्या पायांतील घुंगुरांचा, आवाजही वर पोचत असतो

भोंग्यांशिवाय तुमचा आवाज, त्यांना ऐकायला येत असतो

 

भोंग्यांशिवाय मनातला हुंकार, त्यांच्या हृदयी पोचत असतो

भोंग्यांशिवाय मनातला भाव, त्यांच्या जास्त जवळचा असतो

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१५-०५-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सौन्दर्य घळीचे … ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? सौन्दर्य घळीचे … ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

धुरकट निळाई धुक्याची

पसरे दो डोंगरांच्या कुशीत,

हिरव्या पिवळ्या लव्हाळ्या

लटकती दगडांच्या कपारीत !

शुभ्र दुधाळ जलप्रपात

पडे संथ नदी जळात,

वाटे नदीपात्री फिरावे

सॊदर्य घळीचे न्याहाळत !

छायाचित्र – प्रकाश चितळे, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

१०-०५-२०२२

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

जीवन आहे नितांत सुंदर  ध्यान असू दे जगताना

विसरुन जा तू गत दुःखांना नको खिन्नता हसताना

 

आयुष्याच्या वाटेवरती वळणे असली फार जरी

त्या वळणांवर हसत रहावे सुखदुःखांना बघताना

 

माहेराचे अंगण सोडुन लेक निघाली सासरला

कष्टी झाले मन आईचे निरोप तिजला देताना

 

चुकला नाही वनवासही जो रामाला अन् सीतेला

प्राक्तनात जे लिहिले आहे ते बघते मी घडताना

 

संसाराची दोनच चाके आपण दोघे समजावे

सुखदुःखांना सोबत घेऊ संसारातच रमताना

 

चंदन झिजुनी गंध पसरतो वार्‍यासोबत सभोवती

संसाराचा गाडा उपसत आई बघते झिजताना

 

नाही केव्हा विचार आला छंद स्वतःचे जपण्याचा

कायम तत्पर दुसर्‍यासाठी अनेक कामे करताना

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 103 – नकोस देऊ आज साजणा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 103 – नकोस देऊ आज साजणा ☆

नकोस देऊ आज साजणा भास नव्याने सारे।

आठवणींच्या मोर पिसांचे रंग उधळती तारे।

 

मऊ मुलायम कुरणावरती प्रीत पाखरू येई।

साद घालता ओढ लाविते नित्य जिवाला कारे।

 

शब्दतार तव नाद छेडती धुंद जणू हे गाणे।

मुग्ध जाहला देह स्वरांनी भाव अनामिक न्यारे।

 

गुंजन करितो भ्रमर कळीशी गूज तयांचे चाले।

अधर थरथरे अवचित जुळता नयन राजसा घारे।

 

तव स्पर्शाची किमया न्यारी गाली येई लाली।

स्पर्श फुलांचा गंध दरवळे दाही दिशांत वारे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.

________

स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.

_________

एकटाच मी अन् माझं जग तूच होतीस.

________

या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.

________

तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.

________

तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.

_________

तुला मला जोड़णारी एक कोमल दोर आत होती.

________

तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.

_________

तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.

_________

कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.

_________

तू स्वतःला किती किती जपायचीस.

_________

एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.

_________

जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.

_________

पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.

_________

गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाहीत.

_________

पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही.

 

            – माझी आई..

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नात्याची विण… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नात्याची विण… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

चुली चुली तुला एक विचारु काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग …. १

 

दिवसभर एकमेकींच्यात गुंतलेल्या असता

एवढे हितगुज तरी काय करता

 एकमेकींच्यात असे तुम्ही सुखातता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. २

 

तिच्या खरबडीर हाताने तुला ती सारवते

तुझ्या उबित ती आपल्या वेदनांना हरवते

असेच तुमचे नाते मुक पणे फुलवता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ३

 

तिच्या मनातील तगमग तुझ्या पोटी धगधगते

तुझ्या पोटातील माया तिच्या हाती जाणवते

सुख दुःख दोघींचे तुम्ही वाटुन घेता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ४

 

दोघींमुळे घरादाराला येतो जेव्हा तृप्तीचा ढेकर

देही तेव्हा उसळत असेल भुकेचा डोंगर

एकमेकींच्या जाणिवांना कसे झाकुन ठेवता ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ५

 

तुझ्या दिव्य प्रकाशात तेजाळते माझी आई

तिच्या नयनांच्या निरांजनी तुच असे ठाई ठाई

एकमेकींच्यात असे कसे लवणापरी रहाता ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ६

 

पाण्याच्या शिपकाऱ्याने शांत होता तुझा दाह

आईचाही रात्री मग विसावतो थकलेला देह

दुराव्याच्या या क्षणी दोघींच्या मनी असता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ७

 

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares