मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #143 ☆ संत  एकनाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 143 ☆ संत  एकनाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

भानुदासी कुळामध्ये

जन्मा आले एकनाथ

जनार्दन स्वामी गुरु

शिरी गुरुकृपा हात.! १

 

दत्त दर्शनाचा योग

देवगिरी सर्व साक्षी

तीर्थाटन करूनीया

आले पैठणच्या क्षेत्री..!२

 

अध्यात्माची कीर्तंनाची

एकनाथा होती ओढ

अध्ययन पुराणांचे

शास्त्र अध्यात्माची जोड…! ३

 

नाथ आणि गिरिजेचा

सुरू जाहला संसार

गोदा,गंगा, आणि हरी

समाधानी परीवार…. ! ४

 

साडेचार चरणात

एकनाथी ओवी साज

स्फुट काव्य गवळण

दिला आख्यानाचा बाज…! ५

 

गेय पद रचनेत

एकनाथी काव्य कला

सुबोधसा भाष्यग्रंथ

भागवती वानवळा..! ६

 

शब्द चित्रे कल्पकता

एकनाथी व्यापकता

धृपदांची वेधकता

लोककाव्य विपुलता..! ७

 

एकनाथी साहित्याने

दिलें विचारांचे धन

गुरूभक्ती लोकसेवा

समर्पिले तन मन…! ८

 

नाट्यपुर्ण कथा काव्य

वीररस विविधता

भारुडाच्या रचनेत

सर्व कष वास्तवता…! ९

 

बोली भाषेतून केले

भारूडाचे प्रयोजन.

लोकोद्धारासाठी केला

अपमान  ही सहन…! १०

 

ईश्वराचे नाम घेण्या

नको होता भेदभाव

एकनाथी रूजविले

शांती, भक्ती, हरिनाम. ..! ११

 

नाना ग्रंथ निर्मियले

लाभे हरी सहवास.

विठू, केशव, श्रीखंड्या

नाथाघरी झाला दास. .! १२

 

भागवत भक्ती पंथ

बहुजन संघटित

शास्त्र आणि समाजाची

केली घडी विकसित…! १३

 

दत्तगुरू द्वारपाल

नाथवाडी प्रवचन

देव आले नाथाघरी

नाथ देई सेवामन…! १४

 

केले लोक प्रबोधन

प्रपंचाचे निरूपण.

सेवाभावी एकनाथ

भक्ती, शक्ती समर्पण. ! १५

 

शैली रूपक प्रचुर

मराठीचा पुरस्कार

कृष्ण लिला नी चरीत्र

भावस्पर्शी आविष्कार…! १६

 

रामचरीत्राचा ग्रंथ

महाकाव्य रामायण

पौराणिक आख्यायिका

जनलोकी पारायण…! १७

 

एकनाथी भागवत

नाथ करूणा सागर

एकनाथी साहित्यात

लोक कलेचे आगर…! १८

 

राग लोभ मोह माया

नाही मनी लवलेश

खरे अध्यात्म जाणून

अभ्यासला परमेश…! १९

 

नाथ कीर्तनी रंगल्या

गवळणी लोकमाता.

समाधीस्त एकनाथ

कृष्ण कमलात गाथा. ..! २०

 

वद्य षष्ठी फाल्गुनाची

नाथ षष्ठी पैठणची

सुख,शांती,धनसौख्य

नाथ कृपा सौभाग्याची..! २१

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ कर्ण… शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर

सुश्री शोभना आगाशे

अल्प परिचय  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एस व एम डी (पॅथाॅलाॅजी) या पदव्या प्राप्त. त्याच महाविद्यालयात २००७ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत. सन १९६८-६९ मधे आकाशवाणी सांगलीच्या महाविद्यालयीन कविसंमेलनात सहभाग. ‘सावळ्या’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. टागोर रचित इंग्लिश ‘गीतांजली’ चा काव्यानुवाद ‘गीतांजली जशी भावली तशी’ प्रकाशित.

☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆

         हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

         जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।

         तुमच्या तेजाचा अंश मी सतत वागवला काळजात।

         त्या दिव्य तेजाने  दिपले लोक, पण मी जळत राहिलो अंतरात।।

         गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले।

         आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले।।

         हे भास्करा, तुम्हाला माझ्यावरचा अन्याय पाहून काय वाटले?

         परोपकार करताना मी धरणीमातेला अनावधानाने सतावलं।

         तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं।।

         हे हिरण्यगर्भा तुम्हाला हे योग्य का वाटलं?

         ‘रथहीन, शस्त्रहीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना।

         कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?।।

         भर राजसभेत द्रौपदीनं माला सूतपुत्र म्हणून हिणवलं।

         परशुरामाचा शिष्य असूनही त्यांच्या धनुष्यापासून दूर ठेवलं।।

         हे आदित्या, त्यावेळीही माझ्या मदतीला कोणी नाही धावलं।

         मला निस्तेज करण्यासाठी इंद्राने माझी कवचकुंडलं नेली।

         पुत्रप्रेमापोटी त्याने भृंग होऊन माझी जंघा पोखरली।।

         हे पुष्कराक्षा, तुम्हाला कधीच का पुत्रप्रेमाची अनुभूती नाही आली ?

         ‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली।

          त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली।।

      सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

      द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ।।

      जाताना अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली।

      हे विवस्वता, त्यावेळी तुम्हालाही ती खरी का वाटली?।।   

      ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता।

      माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता?।।

      प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच।

      या प्रश्नांच्या जंजाळातून मला-माझ्या

      आत्म्याला मुक्त व्हायचं आहे।।

      ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

      हे धरित्री, हे मधुसूदना।

      मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे।।

     आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

     हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे।।

– सुश्री शोभना आगाशे, मो. 9850228658

☆ काव्यानंद – कर्ण….सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण ☆  श्रीमती उज्ज्वला केळकर☆

महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने अनेक साहित्यिकांना भुरळ घातली आहे. आपल्याला उमजलेले कर्णाचे व्यक्तिमत्व, त्यांनी कथा, कविता, लेख, कादंबरी यातून उलगडून दाखवले आहे. शोभना आगाशे यांनाही कर्णाच्या जीवन प्रवासाने व्यथित केले आहे. ‘कर्ण’ या कवितेत त्यांनी त्याबद्दलचे विचार, चिंतन कर्णाच्या मनोगतातून प्रगट केले आहे. कर्ण तेजस्वी. पराक्रमी. दानशूर. मृत्यूपासून दूर ठेवणारी कवच-कुंडले घेऊन जन्माला आलेला. तरीही त्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात. का? असं का? सूतपुत्र म्हणून त्याला वारंवार अपमानित व्हावं लागतं. कवितेत तो आपल्या पित्याला सूर्याला प्रश्न विचारतोय,

तो म्हणतो, ‘ हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।’ कुंतीचं मातृत्व स्वार्थी होतं. मातृप्रेमासाठी त्याचा जीव आसुसलेला होता. पण ती त्याला केव्हा भेटली? तर कौरव-पांडव युद्धाच्या वेळी. आपल्या मुलांना विशेषत: अर्जुनाला त्याच्याकडून धोका प्राप्त होऊ नये म्हणून. म्हणूनच तो तिचं मातृत्व स्वार्थी आहे, असं म्हणतो. त्याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी ती सम्राटपदाची, द्रौपदीची लालूच दाखवते. कर्ण म्हणतो, 

‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली

त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली.

सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ‘

‘जाता जाता ती अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली.’ कर्णाला प्रश्न पडतो,

 ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता

 माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता.?’

 इथे सूर्याची वेगवेगळी नावे प्रत्येक वेगळ्या ओळीत आली आहेत. भास्करा, हिरण्यगर्भा, आदित्या, पुष्कराक्षा, विवस्वता अशी संबोधने कवयत्रीने सूर्याबद्दल वापरली आहेत. 

 कर्ण म्हणतो, ‘गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले

 आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले.’ या ओळींमागे एक संदर्भकथा आहे. ही संदर्भकथा बहुतेकांना माहीत आहे. कर्णाला परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायची होती. फक्त ब्राम्हणांनाच धनुर्विद्या देणार, हा परशुरामांचा पण. आपण ब्राम्हण आहोत, असं खोटंच सांगून कर्ण परशुरामांकडे धनुर्विद्या शिकतो. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्राम करत होते. यावेळी इंद्राने भृंग होऊन कर्णाची जंघा पोखरायला सुरुवात केली. कर्णाला खूप वेदना झाल्या. मांडीतून रक्त वाहू लागले पण गुरूंच्या विश्रामात व्यत्यय नको म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही. शेवटी रक्ताचा ओघळ मानेखाली जाऊन परशुरामाला जाग आली. एखादा ब्राम्हण हे सारं सहन करू शकणार नाही, याबद्दल परशुरामाची खात्री. त्याने खोदून खोदून विचारल्यावर कर्णाला आपण सूतपुत्र असल्याचे कबूल करावे लागले. परशुराम यावेळी त्याला शाप देतो, ‘ऐन युद्धात तुला शिकवलेले मंत्र आठवणार नाहीत.’ ही कथा आठवताना मनात येतं, कर्ण खोटं बोलला हे खरे? पण का? त्या मागची त्याची ज्ञाननिष्ठा परशुरामाला का नाही जाणवली? परशुरामाला जाग येऊ नये, म्हणून त्याने सोसलेल्या वेदनांचे, त्याच्या गुरुनिष्ठेचे मोल काहीच का नव्हते?

 कर्ण पुढे म्हणतो, ‘परोपकार करताना मी धारणीमातेला अनावधानाने सतावलं

 तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं. ‘ हा संदर्भ मात्र फारसा कुणाला माहीत नाही. एकदा कर्ण आपल्या राज्यातून फिरत असताना त्याला एक मुलगी रडताना दिसली. त्याने कारण विचारलं असता ती म्हणते की तिच्याकडून मातीचं भांडं पडलं. त्यात तूप होतं. ते आईला कळलं, तर आई रागावणार, म्हणून ती रडत होती. कर्ण म्हणाला, तुला नवीन तुपाचे भांडे घेऊन देतो, पण तिने हट्ट धरला, तिला जमिनीवर पडलेले तूपच हवे आहे. कर्णाला तिची दया आली. त्याने स्वत:च्या हाताने मातीत पडलेले तूप उचलले. ती माती हातात घेऊन, पिळून त्यातून तूप काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातातून एका बाईचा आवाज आला. ती धरणीमाता होती. ती म्हणाली, ‘या मुलीसाठी तू माझी पिळवणूक करीत आहेस.’ आणि तिने कर्णाला शाप दिला की युद्धाच्या वेळी ती त्याच्या रथाचे चाक पकडून ठेवेल आणि त्यामुळे शत्रू त्याच्यावर सहज हल्ला करू शकेल.

 या प्रसंगी कर्णाने दाखवलेली माणुसकी, परोपकाराची भावना धारणीमातेला नाही का जाणवली?

 कवयत्रीने इथे कुठेही तपशिलाचा फापटपसारा मांडला नाही. एक-दोन ओळी लिहून त्यातून घटिताचा संदर्भ सुचवला आहे. 

 कर्ण प्रश्न विचारतो, ‘रथहीन, शास्त्रीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना

कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?’

असे अनेक प्रश्न कर्णाला सतावताहेत. कर्णाच्या आत्म्याला त्या प्रश्नांच्या जंजाळातून मुक्ती हवीय. कर्ण तेजस्वी, धैर्यशील, उदार, गुणसंपन्न. तरीही आयुष्यभर त्याला अपमान, अवहेलना सहन करावी लागते. त्याचा दोष नसतानाही त्याचं आयुष्य रखरखित वाळवंट होतं. अनेक व्यथा, वेदना भोगत त्याला जगावं लागतं आणि तरीही कर्ण त्यांना क्षमा करतो. शेवटी त्या लिहितात, ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

हे धरित्री, हे मधुसूदना

मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे.’

ब्रह्मांडाला तेज देणारा आपला पिता आपल्यासाठी काहीच का करू शकला नाही, ही खंत वागवत, अखेरीस तो त्यालाही क्षमा करून टाकतो.

आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे.’

आणि कविता एका परमोच्च बिंदूशी येऊन थांबते.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

हे ईश्वरा ,

तुझ्या  असण्याविषयीच्या भोव-यात गुंतण्यापूर्वी

नि तुझ्या बासरीच्या सुरांनी मोहित होण्यापूर्वी ….  

विचारायचा आहे  तुला एक प्रश्न ! 

 

पुन्हा पुन्हा अवतार घेताना..  

एकदाही तू स्त्रीचा जन्म कसा नाही  घेतलास ?

तिच्या दुर्दैवाचे दशावतार भोगायला का कचरलास ? 

सोपे होते रे तुझे कुब्जेला सुंदर करणे …. 

…. नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे ! 

जगून तरी पाहायचे त्यांचे अपमानित जगणे !

 

मोरपिसाच्या स्पर्शाने बुजतात का क्षणात …. 

…. सा-या जखमांचे व्रण ?

नि शिळा जिवंत होताच सरते का रे …. तिचे अपराधीपण ? 

 

हे सर्वज्ञा , 

जन्माचे रहस्य  तूच जिच्याकडे  सोपवलेस ,

तिच्या मनाचा थांग तुला कसा नाही लागला ? 

लेखिका – डॉ. नीलिमा गुंडी

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून…

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

 

विचाराचा कोंब फुटता क्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

 

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई…

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई…

 

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

सिग्नल संपायची घाई….

 

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

सगळंच पटकन उरकायची घाई…

 

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

 

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

 

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

 

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यानां दमवायची घाई…

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमुन जाई…

 

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे

काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – चिरयौवन – कवी अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– चिरयौवन – कवी अज्ञात ? ☆ प्रस्तुती – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

भल्या पहाटे दारावरती

कुणी न कळे केली टकटक

 उत्सुकतेने दार उघडले

कुणी पाहुणा येई अचानक

निमिषातच मज कळून चुकले

 वार्धक्यच ते होते माझे

वेळेवरती येणे त्याचे

पण मी तर बेसावध होते.

घरात घुसण्या पुढे सरकले

जेव्हा त्याचे अधीर पाऊल

वाट अडवूनी उभी राहिले

विनवीत त्याला होऊन व्याकूळ

‘अजून आहे बराच अवधी

उगा अशी का करीशी घाई?

हसून म्हणाले, पुरेत गमजा’

ओळखतो मी तव चतुराई !’

‘अरे, पण मी अजून नाही

जगले क्षणही माझ्यासाठी

व्याप ताप हे संसाराचे

होते सदैव माझ्यापाठी

एवढ्यात तर मिळे मोकळिक

मित्रमंडळी जमली भवती

ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये

सदा रहावे असे सोबती!

मित्रांचे अन् नाव ऐकता

दोन पावले मागे सरले

हर्ष नावरे वार्धक्याला

जाता जाता हसून म्हणाले,

‘मित्रांसाठी जगणार्‍याला

मी कधीही भेटत नाही.

वय वाढले जरी कितीही

अंतरी त्याच्या चिरयौवन राही.!!

कवी – अज्ञात

प्रस्तुती – सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मृत्युचक्र… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मृत्युचक्र… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

मृत्युचक्र हे फिरे निरंतर , त्याच्या हाती नियती

अग्निडाग तो कुणास मिळतो,कुणास मिळते माती.   धृ

 

 

रंक असोवा राव कुणी ना, या चक्रातुन सुटतो ,

तेल संपता दिप अचानक, हलके हलके  विझतो,

एका मगुन एक प्रवासी, वस्ती सोडुन 

जाती.  ………..(१)

 

 

अटळ सत्य हे जाणे तरीही, उगा लाविती लळा,

हा माझा, तो माझा म्हणुनी, गळा घालीती गळा.

क्षणात सारी . विरुन जाती, ती तकलादू नाती.   ………(२)

 

 

चराचरांवर सत्ता ज्याची, तो मृत्यू अविनाशी.

तोच वाटतो, ते नवजीवन , या साऱ्या विश्वासी.

तू केवळ कठपुतळी मनुजा, त्या मृत्युच्या हाती.   ………(३)

 

 

म्हणती सारे जन्म मरण हे असते देवा हाती,

तरी चिरंजीव होतो कोणी कर्तृत्वाच्या हाती.

युगे युगे मग जिवंत असती, ते सारे मरणांती.    ……..(४)

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 164 ☆ युगांतर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 164 ?

☆ युगांतर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

शांत धरित्री शांत सरोवर

एक मी आणि एकाकी हे मन….

आयुष्याच्या सायंकाळी,

उमगली नात्यातील….

सूक्ष्म शी कळ !

 

असंख्य नाती अवती भवती,

स्नेह, जिव्हाळा,

असतो कोठे ?

वाढत जाते असेच अंतर …

 

शांत धरित्री शांत सरोवर…

मनात मात्र अजून खळबळ

एकाकी मन शोधत राही,

हरवलेले ते आपलेपण!

 

नसेच काही इथले शाश्वत,

परंतु दिसले काल अचानक,

तुझ्या डोळ्यातील,

ते गहिरेपण,

की या जन्माचे हे…

अनुबंधन ??

 

रक्ताचीच ओढ रक्ताला,

मिटले वादळ,

मिटले ..आक्रंदन….

वाद विवाद ही मिटून गेले !

तुझ्या मिठीतच बहिणाबाई…

आताच झाले इथे युगांतर…

 

अखंड घडते, घडत रहाते…

रोजच येथे एक महाभारत..

शांत धरित्री.. शांत सरोवर…

हे जगण्याचे मर्म खरोखर!

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रणय प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रणय प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्रणयास साजणा कधी येशील

अजून वाट तुझी मी पहाते रे

आठवणीत झुरतो जीव कसा

अजून मन ऊन्हात नहाते रे.

 

त्याच पाऊलखुणा रेतीत जुन्या

पुसल्या किनारी ऊभी रहाते रे

बघ सांज ऊतरुन रात्र झाली

चांदण्यात हा गारवा सहाते रे.

 

क्षण-क्षण क्षितीज भाव हृदयी

कधी अश्रूंना गीत मी वहाते रे

श्रावण-वसंत भान न ऊरले

अंतीम सुखाचे स्वप्न पहाते रे.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #170 ☆ हळदीचे अंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 170 ?

☆ हळदीचे अंग…  ☆

एक कळी उमलली

तिचे गुलाबी हे गाल

ओलसर पुंकेसर

रक्तरंजित ते लाल

 

फूल तोडले हे कुणी

कसे सुटले माहेर

काय होईल फुलाचे

डहाळीस लागे घोर

 

आहे गुलाबी पिवळा

आज बागेचा ह्या रंग

हाती रंग हा मेंदीचा

सारे हळदीचे अंग

 

वसंताच्या मोसमात

पहा फुलाचे सोहळे

दिसे फुलाला फुलात

रूप नवीन कोवळे

 

नव्या कोवळ्या कळीला

वेल छान जोजावते

नामकरण करून

तिला जाई ती म्हणते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बिदागी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बिदागी… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

जसे करावे तसे भरावे असेच आहे

 पुराणातले वचन खरे तर शिळेच आहे

 

मनी भरवले तसेच केले चुकले तेथे

 बंधन काही वागायाला हवेच आहे

 

नकळत थोडा स्वार्थ साधला तुझाच तेव्हा

तुला वाटले जग सगळे हे खुळेच आहे

 

 डळमळताना अंदाजाने पाय टाकला

 थोडे घडले घडणे बाकी बरेच आहे

 

भ्रमात राहू नको वेंधळ्या उगीच खोट्या

 तुला बळीचा बकरा केला बळेच आहे

 

 सौजन्याच्या बुरख्या मागे लपव चेहरा

 अपराधाने तुला बनवले लुळेच आहे

 

माणसासही प्रखर लालसा फसवत जाते

 अविचाराने पाय घसरतो खरेच आहे

 

 सोन्याची तर कुठे मिळाली तुला बिदागी

हाती आले ते कथलाचे कडेच आहे

 

आनंदाचा वसा घेतला टिकला नाही

उरले नशिबी अपमानाचे रडेच आहे

 

आता जगती कोण कुणाचा तारक नाही

तुझ्या चुकांचे भोग भोगणे तुझेच आहे

(अनलज्वाला)

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares