मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी

? काव्यानंद ?

☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆

☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆

 

जयोस्तुते

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवाs स्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे

 *

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची

स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची

परवशतेच्या नभात तू ची आकाशी होशी

स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी

 *

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्य तू ची

स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट होशी

 *

मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रम्ह वदती

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते

 *

हे अधम रक्त रंजिते सुजन पुजिते

श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते

 *

तुझं साठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण

तुज सकल चराचर शरण

भरत भूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे

 *

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला

क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला

होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला

सुधा धवल जानवी स्त्रोत तू का गे त्यजिला

स्वतंत्रते भगवती ss

या सुवर्णभूमीत कमती काय तुला

कोहिनूरचे पुष्परोज घे ताजे वेणीला

 *

ही सकल संयुता, अमुची माता, भारती असता

का तुवा ढकलुनी दिधली

पूर्वीची ममता सरली

परक्याची दासी झाली

जीव तळमळे, का तू त्यजिले उत्तर याचे दे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे

 – स्वा. विनायक दामोदर सावरकर.

स्वतंत्रतेचे स्तोत्र

स्वा. सावरकरांच्या अनेक उत्कृष्ट कवितांमधूनही ही कविता मला अतिशयच आवडते. मोराचा पिसारा ज्याप्रमाणे सुंदर रंग लेवून मोराचा बाज खुलवितो, त्याचप्रमाणे आशयसौंदर्य, भाषासौंदर्य व काव्यसौंदर्याने मराठी भाषेचा बाज खुलविणारी तसेच छंदबद्ध, वृत्तबद्ध व लयबद्ध असलेली ही कविता मला फारच आवडते.

स्वा. सावरकरांचे विचारधन म्हणजे शुद्ध, निखळ सौंदर्य! त्याला आणखी आशयघनता देऊन आणि विविध अलंकारांनी नटवून त्यांनी ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे. देशप्रेमाची तीव्र भावना व उपजत बुद्धिमत्ता यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.

आपण काव्यार्थाचा आस्वाद घेऊ या. कवितेकरता घेतलेली मध्यवर्ती कल्पना अतिशय सुंदर रितीने त्यांनी आपल्यापुढे मांडली आहे.

आपण आपल्या संस्कृतीत जलदेवता, अग्निदेव, वरुणदेव मानले आहेत. त्यांचा कोप होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो. हीच कल्पना डोळ्यापुढे ठेऊन, स्वतंत्रतेलाच देवी मानून, तिने पारतंत्र्यातून भारतमातेला मुक्त करावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे स्तोत्र लिहिले आहे.

आपण बघतोच की घरात कर्त्या पुरुषाची हुकूमशाही असली, वागण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसले तर सगळ्यांचाच जीव गुदमरतो. परकीय सत्तेच्या अंमलाखाली पूर्ण देशच त्याकाळी गुदमरला होता. त्यातून सुटकेसाठीच्या इच्छेच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.

” हे मातृभूमि तुजला मन वाहियेले

वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले”

हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट आहे.

अशाच देशभक्तिच्या उदात्त आशयसौंदर्यानी युक्त अशी ही कविता आहे. शब्दसौंदर्य व इतरही अलंकारांनी नटलेल्या कवितेचे वर्णन करायला खरं म्हणजे माझ्यासारखीचे शब्दच अपुरे पडतील.

जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य खुलायला स्वातंत्र्य अत्यावश्यक असते, हे किती सुंदर कल्पना व शब्दांचा मेळ घालून या कवितेत त्यांनी मांडले आहे बघा…..

स्वातंत्र्यामधे काय सामावलेले नसते?म्हणूनच स्वातंत्र्य-देवीला आळवतांना ते म्हणतात….

“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची

स्वतंत्रते भगवती!श्रीमती राज्ञी तू त्यांची”

हे स्वातंत्र्यदेवते!आमच्या राष्ट्राचे मूर्तीमंत चैतन्य तूच आहेस. पारतंत्र्यात असल्याने, तुझी अनुपस्थिती असल्याने साहाजिकच ते चैतन्यच आज हरवले आहे. तसेच नीती आणि संपत्ती यांची देखील तू राणी आहेस. कारण नीतिमत्ता काय?किंवा संपत्ती काय ? जो आपल्याला पारतंत्र्यात ठेवतो त्याच्या मर्जीवरच अवलंबून असते.

स्वातंत्र्यदेवते! तू कशी आहेस? तर… 

“परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी

स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी”

परवशतेचा काळ म्हणजे एक अंधःकारमय पर्व, या पर्वात मिळालेले थोडीशीही स्वातंत्र्याची आशा म्हणजे पर्वणीच!ही आशा म्हणजेच जणू लखलखणारी चांदणीच!जी आपल्याला आकर्षित करू शकते. योग्य प्रतिमान वापरून ‘चमचम’ ‘लखलखशी’ सारख्या शब्दांनी काव्याचे माधुर्य वाढतेच व ते वाचणे म्हणजे आपल्यालाही आनंदाची पर्वणीच!

प्रत्येकच कडव्यात मांडलेल्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना म्हणजे शब्द आणि विचार यांचा अपूर्व संगमच! उपजत बुद्धिमत्ता व सुंदर कल्पना यांचे दुग्ध-शर्करा मिश्रणच!हे काव्यरसाचे मिश्रणच रसपाना साठी आपल्या समोर ठेवले त्यांनी. रसपान करतांना त्यांच्या आर्त शब्दांचे घोटही आपल्या मनाला भिडतात.

पूढे ते लिहितात…

“गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली”

हे कडवे वाचतांना तर एक अपूर्व शब्दचित्रच आपल्यापुढे डोलते. गालावरच्या लालिमायुक्त सौंदर्याचे

फूल केव्हा विलसेल? गालावरच्या सुंदर फुलाची लाली मुक्त विहार करणार्‍या व्यक्तिच्या गालावरच विलसू शकेल. गालावरचे फूल किंवा फुलांचेच गाल ही एकमेकांवरच्या प्रत्यारोपाची भ्रांतिमान कल्पना एक अपूर्व शब्दमाधुर्य निर्माण करते. ते फक्त रसिकांनाच जाणवू शकते, व्यक्त करणे कठीणच!

पुढे देवीला किती अर्थपूर्ण विशेषणे लावतात बघा….

“तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूची”

हे स्वातंत्र्यदेवते! सूर्याचे तेज तथा सागराचे गांभीर्यही तूच आहेस. अतिशय तेजस्वी असूनही ग्रहण लागल्यावर तो तेजोहिनच होतो. ग्रहण सुटल्यावरच त्याला परत पूर्वीचे तेज प्राप्त होते. सागराच्या गंभीरतेचा अर्थ तरी काय आहे?उथळ किनार्‍यावर, आपल्या मनातली खळबळ, लाटांच्या स्वरुपात धडकवण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आतल्या खोल समुद्राला गंभीरतेचे सौंदर्य प्राप्त होते नं!विचारस्वातंत्र्य नसतांना मांडलेल्या तत्त्वज्ञानाला काय अर्थ आहे?ते ही परतंत्रच असते. आणिबाणीत स्वराज्यात देखील आपण ते अनुभले आहेच.

त्यांची स्वातंत्र्याबद्दलची ओढच इतकी जबरदस्त होती की त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना सहजस्फूर्तच वाटतात. भारतीय तत्त्वज्ञानातील कल्पनांचा आधार घेऊन पुढे ते म्हणतात….

“मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती”

मोक्ष आणि मुक्ति तरी काय?तुझीच म्हणजेच स्वातंत्र्याचीच रूपे! इतकेच नाही तर या जगात जे काही उत्तम! उदात्त! आणि नितांत सुंदर आहे त्याला ‘तुझा’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा’ परीसस्पर्श असतोच! कारण राजकीय दडपशाही असेल तर कुठलाही योग्य विचार, तत्त्वज्ञान मांडण्याचे स्वातंत्र्यच कुठे असते?पृथ्वी गोल आहे आहे हे सिद्ध करू शकत असला तरी शास्त्रज्ञाला ते मांडायचा अधिकार राजसत्तेच्याच मर्जीवर!

म्हणूनच दुर्गामाता, कालीमातेप्रमाणेच अधम अधम लोकांच्या रक्ताने रंगलेल्या व चांगल्या लोकांचे पूजन करणार्‍या देवतेला ते सांगतात….

“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण

तुज सकल चराचर शरण चराचर शरण”

 स्वातंत्र्यासाठी जगण्याची इच्छा असणारी पूर्ण चराचर सृष्टी तुलाच शरण जाते, तुला मिळवण्याचीच धडपड करत असते. म्हणूनच आम्हा सगळ्या भारतवासीयांतर्फे मी तुला प्रार्थना करतो की आम्हाला अलिंगन द्यायला तू लवकर ये”.

” सकल चराचर शरण चराचर शरण”

 अनुप्रासयुक्त ओळी मधून नादमाधुर्याबरोबरच आशयही द्विगुणीत होतो. अलंकाराचे सौंदर्य जपतांना अर्थाची ओढाताण कुठेही होत नाही या काव्यात!आशयासोबत अलंकार रत्नजडीत दागिण्यांप्रमाणे मिरवतात या कवितेत.

 यानंतरच्या कडव्यात तर त्यांचा सूर अतिशयच हळवा व लाडिक झाला आहे. ते म्हणतात….

 “हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला

क्रीडा तेथे करण्याचा का वीट तुला आला”

 प्रत्यक्ष भगवान शंकरालाही कैलास पर्वतावर रहाण्याचा मोह झाला आणि तुला मात्र येथे क्रीडा करायला देखील यावेसे वाटत नाही?

यानंतरची कल्पना बघा किती सुंदर आहे! ते म्हणतात, जान्हवीचा सुधाधवल स्त्रोत अप्सरांना देखील सरसे करण्याला आवडतो. भारतभूमीला ‘सुवर्णभूमी’ म्हटल्या जाते. या सुवर्णभूमीत रहायला काय कमी पडले तुला?हवं तर कोहिनूरचे ताजे पुष्प वेणीत माळायला घे पण इथे वास्तव्याला लवकर ये. पूर्वीप्रमाणेच आमच्यावर प्रेम कर. माझ्या सकलगुणसंपन्न मातेसाठी, तुला प्राप्त करण्यास यश मिळावे म्हणून मी माझ्या शब्दांची आरती करतोय तुझी!

खरंच! या शब्दप्रभूने किती आंतरिक तळमळीने व सुंदर शब्दात आळवणी केली आहे या स्तोत्राद्वारे!

मम्मटाने काव्यप्रकाशात काव्याच्या रसास्वादासाठी अनेक निकष व अलंकारांचे वर्णन केले आहे. स्वा. सावरकरांनी देखील अर्थालंकार व शब्दालंकारांची पखरण करीत, उत्तमोत्तम कल्पना व प्रतीमांच्या आधारे काव्याची एक मनोहर यात्रा या कवितेद्वारे आपल्याला घडवली हे आपण बघितलेच. काव्यात गेयता असेल तरच एखादे सुंदर काव्य संदेशासकट लोकांपुढे सादर होते. मधुकर गोळवलकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लतादिदींनी आपल्या मधुर आवाजात गाऊन अजरामर केले आहे. अर्थातच स्वा. सावरकरांची किर्ती म्हणजे ‘स्वयमेव मृगेंद्रता!

मम्मटानी काव्यप्रकाश मधे म्हटले आहे..

“काव्यं यशसेsर्थकृते, व्यवहारविदे, शिवेतरक्षतये,

सद्यःपरनिवृत्तये, कांतासंमिततयोपदेशयुजे”

काव्य यश, पैसा, कल्याणकारी, वाचल्याबरोबर आनंद देणारे, पत्नी व मित्राप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे असावे.

देशासाठी घरादाराची होळी झालेल्या या देशभक्ताला अर्थप्राप्तीची अभिलाषा कधीच नव्हती.

पारतंत्र्यरूपी अमंगलाचा नाश व्हावा व देशाचे कल्याण व्हावे हेच यातून सूचित होते. सद्यः परिस्थितीत लोकांपुढे कार्याचे उद्दिष्ट काय असावे याचा परिपाठच या स्तोत्राने घालून दिला आहे.

त्यांच्या काव्याचे गाण्यामधून जे सुंदर रुपडे रसिकांपुढे येते ते हे गीत रसिक आपसुकच गुणगुणतात व नंतर त्यांच्याही मनात सावकरांइतकी नसली तरी अंशतः का होईना, देशभक्तिची भावना जागृत होते. त्यातूनच देशाने वेळोवेळी पुकारलेल्या आव्हानांना आपण एकत्र येऊन प्रतिसाद देतो. कानीकपाळी अोरडून सांगितलेल्या भाषणापेक्षा सुंदर काव्यातून निर्माण होणारी जागृती नक्कीच दीर्घकाळ परिणामकारक ठरते.

कुठलाही भाव मनात नसतांना ‘जयोस्तुते’ हे भावपूर्ण गीत कानावर पडते त्यावेळी गाण्यातील एकेक शब्द रसिकांच्याही मनात घर करून रहातो. त्यावेळी उरलेले असते ते गाण्याचे शुद्ध, सात्त्विक स्वरुप! आणि ते आपल्याला आनंदाची वारंवार प्रचिती आणून देत असते.

या काव्यात संस्कृतप्रचुर शब्द असूनही काव्याची मधुरता कुठेही कमी होत नाही. तसेच मला तरी असे वाटते की पहिल्यांदा वाचतांना काव्य थोडे कठीण वाटले तरी पुन्हा वाचतांना काव्य दुर्बोध वाटत नाही. मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेतल्यानंतर अनेक शब्दांचा अर्थ आपल्यापुढे आपोआप उलगडत येतो. कुठलेही कठीण शब्द उगाच मधे आल्यासारखे बोचत नाहीत. उलट हवा तो आशय व्यक्त करणारे व काव्याची गोडी वाढवणारेच वाटतात. ऐकणार्‍या प्रत्येकाला, तो कुठल्याही प्रकारच्या पारतंत्र्यात असला तरी हे गीत स्वातंत्र्याची ओढ लावल्याशिवाय रहाणार नाही. हेच या काव्याचे मोठे यश आहे असे मला वाटते.

जयहिंद

© सौ. ज्योती प्रकाश कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #273 ☆ जिद्द हारते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 273 ?

☆ जिद्द हारते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीवनात या असतातच ना सोशिक काही वर्षे

आयुष्याला गिळतातच ना सोशिक काही वर्षे

*

भट्टीमधला माठ भाजुनी होतो जेव्हा पक्का

माठासाठी जळतातच ना सोशिक काही वर्षे

*

सावध असलो जरी कितीही नसते हाती काही

सापळ्यातही फसतातच ना सोशिक काही वर्षे

*

विश्व विजेता असतानाही खात्री नसते काही

हार पाहुनी रडतातच ना सोशिक काही वर्षे

*

संकटकाळी पाय गाळुनी संयम कोठे बसतो

जोर लावुनी भिडतातच ना सोशिक काही वर्षे

*

आजाराची टोळी येते अंगावरती जेव्हा

जिद्द हारते हरतातच ना सोशिक काही वर्षे

*

प्रेम लावुनी वाढवलेली लेक सासरी जाता

काळजासही पिळतातच ना सोशिक काही वर्षे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुरुचरण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गुरुचरण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

गुरु चरण / मन शरण/

नित्य स्मरण/देवधर्म//

*

गुरु मंदिर/भाव भक्तीत/

भव मुक्तीत/ज्ञानदान //

*

क्षमा सकळ/पुण्य नि पाप/

जन्म उःशाप/आत्मबंदी //

*

दिक्षा दर्शन / नाश वेदना /

मंत्र साधना//जीवलोकी //

*

गुरु महात्म / ध्यान लोचनी/

कर्म संचनी /प्रारब्धात//

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सांज झाली सख्या रे… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांज झाली सख्या रे... ? श्री आशिष  बिवलकर ☆

सांज झाली सख्या रे,

दिनकर गेला अस्तासी |

कातरवेळ छळते मज,

घोर जडला हृदयासी |

*

दिल्या घेतल्या वचन सुमनांची,

झालीत आता निर्माल्य |

वाटेवर एकटाच सोडून गेलास,

हृदयी दिलेस शल्य |

*

तुच घातलीस हृदयास फुंकर,

ओवाळून टाकला रे जीव तुझ्यावर |

घाव देऊन दूर गेलास,

व्रण चिघळतात रोज सांजवातेवर |

*

पक्षीही परतले पुन्हा घरट्यात,

किलबिलाटही नकोसा तो मना |

भयाण शांततेची ओढ लागली,

कुणास सांगू रे विरह वेदना |

*

धावून येतोय तिमिर अंगावर,

किर्रर्र आवाज घुमतोय भोवती |

सहवास नकोय कुणाचा,

एकांत हाच वाटतोय खरा सोबती |

*

सुगंध दरवळतोय रातराणीचा,

नाही उरलीय गंधातली गोडी |

अर्ध्यावर साथ का रे सोडलीस,

सुटता सुटत नाही रे कोडी |

*

नक्षत्रांची रास नभांगणात,

खिजवतोय मज शुक्रतारा |

प्रीत आपली विरून गेली,

लोचनातून वाहतेय धारा |

*

दोर कापलेत परतीचे,

माझ्याशीच मी लढतेय |

उतरला साजशृंगार सारा,

तुझ्याचसाठी रे सख्या झुरतेय |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळोख… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

काळोख ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी संत कुळीचा झालो संतांच्या सहवासाने

मन झाले साक्षात्कारी भक्तीच्या अभिमानाने

 *

नादान जगाचे वारे घोंगावत होते भवती

मज वास्तव कळले माझे गाथेची वाचत पाने

 *

भवसागर ओलांडाया झालीच तयारी होती

देहाची सुंदर नौका तरताना आनंदाने

 *

काळोख गडद करणारे होतेच बिलंदर काही

त्यांनीच ठरवल्या जाती स्वार्थाच्या हव्यासाने

 *

भलतेच कुणी तर होते समतेला तुडवत पायी

त्यानीच ठरवल्या जाती स्वार्थाच्या हव्यासाने

 *

आताही होते आहे रणकंदन भलते येथे

सोसावे कितपत कोणी हे सगळे अपमानाने

 *

खोट्याच्या वाजे डंका सत्याला नाही थारा‌

हे घडते सारे आहे कोणाच्या कर्तृत्वाने

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मीच माझी व्हॅलेंटाईन!… कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

मीच माझी व्हॅलेंटाईन!... कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

माझ्या मनाचे गाणे

 माझ्यासाठीच गाईन

आवडत्या ठिकाणी माझ्या,

माझ्याच बरोबर जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

इतरांसाठी जगण्याचा

काळ मागे गेला,

वाळूसारखा हातातून

काळ निसटून गेला.

 

दुसऱ्यांचे शब्द जितके

फुलासारखे झेलले.

तितके तितके तेही मला

गृहीत धरत गेले.

 

ताट होते माझे

पण मेन्यू होता त्यांचा.

प्रवास होता माझा

 पण व्हेन्यू होता त्यांचा.

 

यालाच मी प्रेमाची

व्याख्या म्हणत गेले.

बेमालूमपणे मनाला

अलगद फसवत गेले.

 

फसवे असले बंध सारे

हलकेच सोडवत जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

 मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

मित्र मैत्रिणी, सगे सोयरेही

 महत्त्वाचे असतात.

स्टेशन येता ज्याचे त्याचे

उतरून सर्व जातात.

 

कुठे माहीत कोणा कोणाची

कुठपर्यंत साथ?

आपल्या हाती शेवटपर्यंत

 फक्त आपलाच हात.

 

सन्मान करेन स्वतःचा,

स्वानंदात राहीन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

गुलाबाची सुंदर फुले

स्वतःलाच घ्यायची.

दुसरं कोणी देईल म्हणून

 वाट कशाला पाहायची?

 

शुगर आहे, बी पी आहे

असायचंच की आता.

देवाइतकाच धन्वंतरी

या देहाचा त्राता.

 

८०% डार्क चॉकलेटचा

अख्खा बार घेईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

कवी: सौ. शुभांगी पुरोहित

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझ्या प्रेमात रमले… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तुझ्या प्रेमात रमले…” ☆  डॉ. शैलजा करोडे

नव्या एका दुनियेत 

मन माझे विहरले 

हळू गालात हसता 

रूप पुन्हा बहरले 

*

जग भासते सुंदर 

उणे न काही वाटते 

चारीदिशा प्रितगंध 

प्रेम मनात दाटते 

*

थंड हवेची झुळूक 

अंगी शहारे आणले 

प्रिया बावरी मी झाले 

तुझ्या प्रेमात रंगले 

*

आठवता गोड क्षण 

स्वर जणु कानी येतो 

त्याचा पाठलाग मला 

सैरभैर रानी नेतो 

*

तुझ्या प्रेमात रमले 

विसरले तृष्णा भूक 

ओठ मिटून घेतले 

शब्द झालेयात मूक 

*

भाव माझ्या मनातले

बघ गीत जसे जमले 

सात जन्म साथ हवी 

तुझ्या प्रेमात रमले 

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत हा आला… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत हा आला… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आला वसंत हा आला

कूजनात जो रंगला

पंचमात आळविला

सुरांसवे तो दंगला ||१||

*

पर्णपाचू तो सजला

मोद मना-मना झाला

हर्षभरे तो नटला

स्वर्ग थिटा ही भासला ||२||

*

पुष्पासंगे बहरला

बहुरंगे प्रगटला

पीत, रक्त, नील छटा

पुष्पा देत जो सुटला ||३||

*

गालिचाही मखमाली

वाटेवरी झळकला

नेत्रद्वया सुखदायी

पवनाने उधळला ४||

*

मोहरला आम्रतरु

गंधानेही तो खुलला

ऋतुराज हा पातला

येता जो हर्ष फुलला ||५||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

स्मृतीरंजन संगीत रचनेचे

साधारणपणे १९८६ च्या दरम्यानची घटना असावी. दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात विनय देवरुखकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा कार्यक्रम होता. पुढे काही दिवसांनी त्यातील एका गीताच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते गीत विनय वापरू शकत नव्हता; तथापि त्याला त्या गीताला दिलेली संगीत रचना अतिशय आवडली होती. म्हणून त्याने मला त्याच चालीवर एक नवीन गीत लिहून द्यायचे आवाहन केले. त्या चालीतून प्रेमवेड्या प्रेयसीची आर्तता जाणवत होती. नकळतच क्षणार्धात माझ्याकडून पुढील ‘धुंद वाऱ्या’ हे गीत प्रसवले गेले.

 ☆ धुंद वाऱ्या ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभ देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

 *

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

 *

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतिची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

हे गीत माझ्या मनाची पिल्ले या काव्यसंग्रहात समाविष्ट होते. अत्यंत गुणी गायक आणि संगीतकार चंद्रशेखर गाडगीळ याच्या वाचण्यात हे गीत आले. त्याला ते इतके आवडले की त्याने ते सूरबद्ध केले आणि मला घरी बोलावून ते ऐकविले. ती स्वररचना माझ्या अगदी हृदयात जाऊन पोहोचली.

पुढे आकाशवाणीवर हेच गीत जानेवारी महिन्याच्या स्वरचित्रे साठी निवडले गेले आणि त्याला स्वरबद्ध करण्यासाठी विलास आडकर यांच्याकडे ते सोपविले गेले. अतिशय सुरेल आणि भावपूर्ण अशा चालीत त्यांनी ते माधुरी सुतवणे यांच्याकडून गाऊन घेतले. खूप गाजले हे गीत.

तरीही या गीताची चंद्रशेखर गाडगीळ याने दिलेली चाल माझ्या मनातून जात नव्हती. एवढी उत्कृष्ट स्वररचना अशीच वाया जावी हे मनाला पटत नव्हते. अशा घालमेलीतच पुलाखालून बरेच पाणी गेले. अखेरीस, साधारण पंधरा वर्षांनंतर चंद्रशेखर गाडगीळ याच्या स्वररचनेवर मी आणखी एक गीत लिहायचे ठरवले.

गीत लिहून झाले आणि आकाशवाणीवर माझ्या काही गीतांना स्वरबद्ध केल्यानंतर माझ्या खूप जवळ आलेले आकाशवाणीचे आणि एकेकाळी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत असलेले ज्येष्ठ संगीतकार सुरेश देवळे घरी आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘डॉक्टर, एखादे नवीन गीत?’

नुकतीच प्रसविलेले गीत मी त्यांना वाचून दाखविले:

☆ चांदण्याच्या राजसा रे ☆

 *

चांदण्याच्या राजसा रे वाकुल्या दावू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||ध्रु||

मन्मथाने धुंद केले कुच मनी मी बावरी

स्पर्श ओठांनाच होता हरवले मी अंतरी

भान जाता हरपुनीया जग तू आणू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||१||

रोम रोमा जागवी तो स्पर्श मी विसरू कशी

चिंब झालेल्या मनाची प्रीत मी लपवू कशी

प्रेमवेडी आर्त होता संयमा शिकवू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||२||

रात्र सजवीता अनंगे लाजुनी राहू कशी

धुंद झाला देह माझा अंतरी वेडीपिशी

आज माझ्या राजसाची पापणी लववू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||३||

‘छान आहे डॉक्टर, द्या मला; मी याला चाल देणार आहे, ’ त्यांनी माझ्या हातातून गीताचा कागद ओढूनच घेतला.

मी त्यांना ते गीत रचण्यामागील माझी भूमिका सांगितली, ‘चंद्रशेखरच्या चालीसाठी रचले आहे मी हे गीत. ’

‘त्याकरता तुम्ही आणखी एक गीत बनवा हो, ’ देवळे काही मागे हटायला तयार नव्हते.

अखेरीस चाल देण्यासाठी ते गीत ते घेऊन गेलेच. पुढे त्यांनी ते गीत आकाशवाणीवर गाऊन देखील घेतले.

मला मात्र स्वस्थ वाटेना. चंद्रशेखरची चाल काही मला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा हातात लेखणी घेतली नी त्या स्वररचनेच्या मीटरमध्ये नव्याने गीत रचले:

रात्र तू विझवू नको

 *

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा क्षितिजावरी उतरू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||ध्रु||

चांदण्याने आज तुझिया रंग मी भरले इथे

उर्मीच्या मम कुंचल्याने प्रेम हे साकारले

धुंदिचा बेरंग माझ्या करुनिया जाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||१||

 *

आर्त झालेल्या मनातुन सूर हे धुंदावले

छेदुनीया मुग्धतेला अंबरी झेपावले

प्रेम भरलेल्या सुरांना बेसुरी गाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||२||

फुलविली मी मुग्ध कलिका रात्र सजवीली नभी

भान हरुनी रातराणी गंध दरवळते जगी

फुलून येता मन्मनी तिज निर्दळी बनवू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||३||

आणि आता जगदीश कुलकर्णी यांनी या गीतावर उत्कृष्ट स्वरसाज चढविला आहे.

मी आता मात्र विचार करतोय, माझ्या ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शिका कै. संजीवनी मराठे यांच्या ‘नकळता निघून जा’ या गीताला जर चार संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला आहे तर माझ्या गीतांना देखील तसे झाले तर बिघडले कोठे? उलट हा तर माझा मानच आहे.

तरीही मला चंद्रशेखर गाडगीळची स्वररचना वाया नाही जाऊ द्यायची. बघू कोणच्या स्वररचनेचा कोणत्या गीतासाठी कसा योग येतो आहे ते!

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ असेही एक गाढव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ असेही एक गाढव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

खाजगी क्षेत्रात काम करता

आपोआप आपले होते गाढव

कामाचा बोजा वाढत जाता

जगण होऊन जातं बेचव

*
बाॅसच्या अपेक्षांची शिडी

दिवसेंदिवस वाढत जाते

खाली मान घालून काम करणे

असेच आपसूक घडत जाते

बंगला होतो गाडी येते

कापड चोपडासह अंगी भारी साडी येते

मिळवायचं ते मिळवून होतं 

टिकवण्यास्तव लढाई चालूच रहाते

सुखनैव जगायचे तेवढे राहून जाते

*
सतत मनाची ओढाताण

शरीर थकते नसते भान

गाढव होऊन ओझे वहाता

स्वतःसाठी किती जगतो. .

याचे रहात नाही भान

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares