मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind! 

भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.

“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं. 

साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ” 

साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला… 

चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”

यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला ! 

“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं ! 

“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू  माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे. 

युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.

…  क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !

पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान  लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना ! 

अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय. 

१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.

… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते. 

नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत.  त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले…  Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की ! 

सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य ! 

…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार? 

नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच. 

 

        २४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला…..  आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —  

— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं !  पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी ! 

नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…

जयहिंद! 🇮🇳

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात. 

हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !

🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलू लागला होता. पश्चिम क्षितिजावर रंगांची उधळण होऊ लागली होती. त्या रंगात प्रियम् चालली होती. गेल्या सहा महिन्यांपासून जवळ जवळ रोजच या नागमोडी रस्त्यावरून चालत जाण्याचा तिचा शिरस्ता होता. हा रस्ता तिला भयंकर आवडायचा! कुठेतरी जगाच्या पल्याड, स्वप्नांच्या गावाला घेऊन जाणारा!

तिच्या खोलीच्या टेरेसवरून हा रस्ता तिला दिसत राहायचा. एका अनामिक ओढीनं, ती त्याकडं बघत राहायची. भान विसरून! अभ्यासाचं टेबलच तिनं असं ठेवलं होतं की, मान वर करताच तिला हा रस्ता दिसायचा. शांत, निर्मनुष्य, थोडासा गूढ, पण रमणीय! डाव्या बाजूला एक छोटीशी टेकडी, उजव्या बाजूला हिरवंगार शेत. मधून नागमोडी वळणं घेत जाणारा हा शांत रस्ता. खूप लांबपर्यंत दिसायचा. जिथं दिसेनासा व्हायचा, तिथं पुन्हा दाट झाडी. त्यामुळं त्याची गूढता अधिकच वाढत होती. टेकडीच्या जवळून एक छोटासा ओढाही वहात होता. त्यामुळं त्याची रमणीयता वाढत होती. पुढं गेल्यावर एका वळणावर एक छोटासा कट्टा होता. मनातल्या मनात त्या कट्ट्यावर ती कितीदा तरी येऊन बसत होती. लहानपणापासून या रस्त्यानं थेट चालत जावं, असं तिला वाटायचं. आईजवळ तिनं तसा हट्टही केला अनेकदा, पण कधी मनावर घेतलं नाही.

शेवटी एकदा तिने पप्पांनाच विचारलं. तेव्हा पप्पांनी तिला समजावून सांगितलं, ‘‘पियू बेटा, तिथं जायला बंदी आहे. हा रस्ता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो ना?’’

‘‘मग तिथं जायला बंदी का बरं?’’

‘‘अगं तिथं संशोधन चालतं! अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ तिथे काम करत असतात, संशोधन करत असतात. संशोधनाबद्दल फार गुप्तता पाळली जाते. तिथं अनावधानानं छोटीशी जरी चूक झाली, तरी दुर्घटना घडू शकते. सामान्य नागरिकाला यातलं काहीही माहीत नसतं. काही शोधही फार महत्त्वाचे असतात. त्याबद्दल गुप्तता पाळणं अपरिहार्य असतं. ’’

‘‘पण मग पप्पा तुम्ही कसे तिथं जाता? कधी कधी तर रात्र-रात्र?’’

ते ऐकल्यावर पप्पांना तिच्या निष्पाप, निरागसपणाची गंमत वाटली. ते मोठमोठ्यानं हसू लागले. त्यांच्या हसण्याने छोटी पियू मात्र गोंधळून गेली. आपलं काय चुकलं तिला कळेना. तिचा चेहरा उतरला. डोळे पाण्यानं भरून आले.

ते पहाताच पप्पांनी तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसत म्हटले, ‘‘अगं वेडे, तुझा पप्पा शास्त्रज्ञ आहे ना! तुला माहीत नाही का?’’

‘‘अय्या खरंच? मग तुम्ही न्या ना मला तिकडे. ’’

‘‘हो हो जरुर जरुर, पण तू थोडी मोठी झाल्यावर’’

हे सगळं बोलणं प्रियमने आपल्या मेंदूत पक्क नोंद करून ठेवलं. खरंचच ग्रॅज्युएट झाल्यावर तिनं पप्पांना आठवण करून दिली. पप्पांनीही लगेच स्पेशल परवानगी काढून तिला इन्स्टिट्यूटमध्ये नेण्याचं ठरवलं.

इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याच्या कल्पनेनेच प्रियमच्या काळजात अनामिक धडधड होऊ लागली. अपार उत्सुकता वाढू लागली. ‘‘उद्या मी तुला घेऊन जाणार बरं का इन्स्टिट्यूटमध्ये’’ असं पप्पांनी सांगितल्यावर रात्रभर तिला झोपच आली नव्हती. सकाळी 10 वा. जायचं होतं तर ही 9 वाजल्यापासून तयार होऊन बसली होती.

10 वाजता पप्पांची कार आली. आवडत्या रस्त्यावरून गाडी धावू लागली. प्रियम् हरखून गेली. आता या जगापल्याड वेगळ्या जगात आपण जाणार, असं तिला सारखं वाटत होतं. नेहमीच जिथं रस्ता संपल्यासारखा वाटायचा, त्याच्याहीपुढं लांबच लांब रस्ता होता. तोही तेवढाच सुंदर, शांत, निर्मनुष्य! गंमत म्हणजे संपूर्ण रस्त्यावर अनेक छोट्या, छोट्या टेकड्या होत्या. दुतर्फा सुंदर, सुंदर वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. कधी न पाहिलेली. बघता बघता इन्स्टिट्यूटच्या गेटपाशी गाडी उभी राहिली. भक्कम दगडी कंपाऊंड आणि त्यावर काटेरी तारा होत्या. बंदूकधारी सुरक्षारक्षक गेटपाशी उभा होता. त्यानं कारपाशी येऊन पाहिलं. पप्पांना सॅल्यूट ठोकला. पप्पांचं एंट्रीकार्ड गेटवर स्वाईप करताच गेट उघडलं. गाडी आत शिरली. आतमध्येही पुन्हा मोठा रस्ता होता. आकर्षक फुलझाडांचा कलात्मक बगीचा होता. या आकर्षक दुनियेत विरघळून जावं असं प्रियमला वाटत होतं.

पुढं जाऊन एका भव्य इमारतीपाशी कार थांबली. ड्रायव्हरने तत्परतेने उतरून पप्पांचा न् तिचा दरवाजा उघडला. सारी निरीक्षणं करीत पप्पांच्या मागे ती चालत राहिली. प्रचंड मोठमोठी यंत्र, असंख्य वायर्स, स्तब्ध शांतता, अन् स्वतःला विसरून काम करणारी माणसे. कमालीची स्वच्छता अन् टापटीप.

या वातावरणाची नकळत प्रियमला भीती वाटू लागली. पण पप्पा बरोबर होते. पप्पांवर तिचा गाढ विश्वास होता, त्यामुळे आश्वस्त होऊन त्यांच्यामागून ती चालू लागली.

चालता चालता एका ठिकाणी पप्पा थांबले. ज्या ठिकाणी पप्पा थांबले तिथे डेंटीस्टकडे असते, तशी खुर्ची होती. त्या खुर्चीला असंख्य वायर्स अन् बटणं होती. त्या खुर्चीवर एक माणूस झोपला होता. त्याच्या डोक्याला असंख्य वायर्स अन् इलेक्ट्रोड्स लावलेले होते. त्याच्या हातात एक रिमोट होता. त्यावर अनेक बटणं होती. ती तो मधून मधून दाबत होता. समोरच्या स्क्रीनवर काही आलेख, आकडे दिसत होते.

तिथंच बिपीन उभा होता. पप्पांना पाहताच त्याने कमरेत वाकून ‘सर’ म्हणून आदराने नमस्कार केला. त्याला पाहताच प्रियमच्या मनात असंख्य सतारीच्या तारा झंकारू लागल्या. बिपीनने हॅलो म्हटले. प्रियमने फक्त हसून मानेनं नमस्कार केला.

‘‘येस बिपीन काय रिझल्टस्’’

‘‘येस सर! सकाळपासून मी बरीच ऑब्झर्वेशन्स घेतोय पण अजून तरी म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही. ’’

‘‘तो माणूस पूर्णपणे तयार आहे ना प्रयोगासाठी?’’

‘‘येस सर त्याने तसं रिटनमध्ये दिलं आहे. शिवाय त्याला पैशांची फार गरज आहे. त्यामुळे त्याची काही तक्रार नाही. ’’

‘‘ओ. के. कॅरी ऑन. मला अपडेट्स देत रहा. त्याच्या टेस्टस्चे काय?’’

‘‘झाल्यात! पण काही निगेटिव्ह आहेत. ’’

‘‘अच्छा. देन ट्राय अनदर पर्सन’’

‘येस सर हा रिटर्न आला की बघतो. ’’

त्यानंतर संपूर्ण इस्टिट्यूट पप्पांनी तिला दाखवली. पण बिपीन आणि त्याचा प्रयोग यातच ती अडकून पडली. पुढे फारसं काही तिला लक्षात राहिलं नाही. त्या प्रयोगाबद्दल अनेक प्रश्न तिला पप्पांना विचारायचे होते. पण त्यानंतर दोनच दिवसांनी आईला हार्टअ‍ॅटॅक न् तिचा मृत्यू. यामुळे सारंच बदलून गेलं. हसतं खेळतं घर गप्प-गप्प झालं. पप्पाही गप्प गप्प झाले.

प्रियमसाठी हा धक्का फार मोठा होता. सारं घर अनोळखी वाटत होतं. तो एक रस्ता तेवढा आपलासा वाटत होता. का कुणास ठाऊक खुणावत होता.

पौर्णिमेची रात्र होती. चंद्रप्रकाशात न्हालेली. पप्पा अजून आले नव्हते. एकटीला घरात बसणं असह्य झाले. पायात चपला सरकवून प्रियम निघाली. कट्ट्यावर जाऊन बसली. पहिल्यांदाच एकटी या रस्त्यावर आली होती प्रियम! पुढे त्या दिवशापासून बहुतेक रोजच येत होती. येऊन कट्ट्यावर बसत होती.

कट्ट्यावर बसल्यावरही आईची आठवण येत होती. आईचा मृत्यू, बिपीनचा प्रयोग न् हा रस्ता यात काहीतरी कनेक्शन आहे असं तिला वाटत होतं.

अचानक एक मोटारसायकल तिच्यासमोर थांबली. मोटारसायकलवर बिपीन होता. खाली उतरून तो तिच्याजवळ आला.

‘‘मिस रंगराजन? तुम्ही? आत्ता? इथं एकट्या’’

प्रियम काहीच बोलली नाही.

‘‘येस मिस रंगराजन’’

‘‘प्रियम नाव आहे माझं’’

‘‘हो! प्रियम्! तुम्ही काय करताय इथं’’

प्रियमच्या मनात दुःख दाटलेलं होतं. त्याचवेळेस बिपीन तिची चौकशी करत होता. तिचा बांध फुटला. डोळ्यांना धारा लागल्या. हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदू लागलं.

बिपीनला कळेना काय करावं. त्यानं हातरुमाल तिच्यापुढं केला. ती आणखीनंच स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तो थोडा पुढे झाला तर ती त्याच्या गळ्यातच पडली. कोसळली. बिपीनने निःशब्दपणे तिला आधार दिला. त्या क्षणापासून त्यांच्यातलं मानसिक अंतर मिटलं. मनाने ते खूप जवळ आले.

नंतर ते रोजच त्या कट्ट्यावर भेटू लागले. बघता बघता 6 महिने झाले असतील. बिपीनच्या सहवासानं तिचं दुःख थोडं हलकं झालं. एक दिवस बिपीनला तिने विचारलं, ‘‘त्या दिवशी तुझा काय प्रयोग चालू होता?’’

अचानक तो सावध झाला. त्यांच्यात कितीही जवळीक असली तरी तिला ते सांगणं नैतिकदृष्ट्या संमत नव्हतं. गुप्तता पाळणं भाग होतं. त्यानं ते कसंबसं टाळलं. पण रोजच प्रियम खोदून खोदून विचारत होती. रोज तो उद्यावर ढकलत होता.

पण आज! आज तिला ते नक्की विचारायचंच होतं. कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठीच आज प्रियम चालली होती बिपीनला भेटायला. त्याच्या भेटीची ओढ होती. तेवढीच प्रयोगाबद्दल उत्सुकता. त्याच विचारात ती कट्ट्यापर्यंत येऊन पोहोचली होती. अत्यंत आतुरतेने त्याची वाट पाहत होती. थोड्याच वेळात तो तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण तसेच गेले. एकमेकांचे अस्तित्व आणि जवळीक अनुभवण्यात.

‘‘सांगणार आहेस ना आज?’’ अचानक प्रियमनं विचारलं. नाही म्हटले तरी बिपीन सटपटलाच.

‘‘कसं सांगू प्रियम? अगं तुझ्या पप्पांचाच हा प्रयोग आहे. मी सांगितले तर तो मोठा गुन्हा ठरेल. ’’

‘‘तुझी शपथ! मी कुणालाही सांगणार नाही. तुझा विश्वास नाही का माझ्यावर?’’

‘‘तसं काही नाही गं, पण खरंच आम्ही तसं बाँडपेपरवर लिहून दिलेलं असतं. ’’ माझ्या मनाला ते पटत नाही.

‘‘ठीक आहे तर मग आता आपली ही शेवटची भेट. येते मी. ’’ असं म्हणून खरंच प्रियम उठली. तिचा हात धरून बिपीननं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठामपणा तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. शेवटी बिपीननं मनातल्या मनात माफी मागून तिला सांगायला तयार झाला नाईलाजास्तव! तोही गुंतला होता प्रियममध्ये.

क्रमश: – भाग १

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हे शूरा….निश्चिंतपणे जा तुझ्या प्रवासाला !” — ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “हे शूरा… निश्चिंतपणे जा तुझ्या प्रवासाला ! —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

(The Last Post story ! – यावर आधारित ) 

वातावरणात शोक भरून उरलेला असतो…..कुठे पापण्यांचा बांध धुडकावून लावून आसवांच्या धारा अधोदिशेला धावत असतात, तर कुठे आसवांचा झरा मनातल्या मनात.. आतल्या आत झिरपत झिरपत अधिक खोलवर जात असतो. कितीही सुकुमार देह असला तरी त्यातील चैतन्याने निरोप घेतलेला असला की देहालाही निरोप देणे भाग पडते. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देऊन आपल्या जन्माचं सार्थक करून तृप्त झालेल्या त्या सैनिकाचा देह आता अंतिम निरोपाच्या प्रतिक्षेत असतो. तो क्षण आता समीप आलाय…..त्याचे सहकारी सज्ज उभे आहेत…..आणि दुस-याच क्षणाला आसमंतात बिगुलचे सूर अलगदपणे अवतरतात. या सूरांना शब्दांची सोबत नाही….पण तरीही ते काहीतरी निश्चित असे सुचवू पाहतात……निरोप देऊ पाहतात !

दी लास्ट पोस्ट….ही सुरावट वातावरण अधिकच गंभीर बनवून टाकते…..ती संपल्यानंतर काही क्षणांचा सागराच्या धीरगंभीर शांततेचा प्रत्यय देणारे क्षण अवतरतात आणि संपता संपत नाहीत…..पण क्षणांनाही थांबता येत नाही मर्यादेपलीकडे….त्या संपणा-या क्षणांना बाजूला सारून आणखी एक काहीशी उच्च स्वरातील धून कानी पडते….’ रिवाली ‘ म्हणतात तिला सैनिकांच्या जबानीत……ही सुरावट जन्मापासून सुरू झालेलं आवर्तन पूर्ण करूनच विसावते…नंतर इतर भावना पुढे सरसावतात !

१७९० या वर्षापासून विलायतेतील सैनिकांच्या आयुष्यात ‘ दी लास्ट पोस्ट ‘ नावाच्या एका ध्वनिकल्लोळाचा प्रवेश झाला आणि आजच्या घडीला जगातल्या सर्वच सैनिकांच्या जीवनाचा आणि मृत्यूचाही एक भाग बनली आहे ही…लास्ट पोस्ट !

खरं तर पहा-यावर उभ्या असलेल्या सैनिकांच्या चौक्या व्यवस्थित आहेत ना? हे तपासून पाहण्याचं काम एखाद्या वरिष्ठ अधिका-याकडे सोपवलेलं असायचं. हे काम दिवसभर सुरू असायचं. जुन्या काळी निरोप देण्याचं काम करायला यंत्रं नसत, सैनिकांच्या मनगटांवर घड्याळं नसत. मग हे काम वाद्यं करत असत. प्राण्यांची लांब शिंगे आतून पोखरून पोकळ केली, आणि त्या शिंगाच्या निमुळत्या शेवटच्या टोकास छिद्र पाडले आणि त्याला ओठ लावून जोरात हवा फुंकली की एक विशिष्ट तार स्वर निर्माण होतो, हे माणसाने बसल्या बसल्या शोधून काढले होतेच. त्यातूनच शिंग फुंकणे हा शब्दप्रयोग रूढ झाला. ही शिंगं नंतर विविध आकार आणि प्रकार घेऊन वाद्यवृंदांत सामील झाली.

तपासणी करणा-या सैन्याधिका-याने त्या सैन्यशिबिरातली शेवटची पहारा-चौकी तपासली आहे…सर्व काही ठीक आहे…सुरक्षित आहे….आता सैनिकांनी दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आराम करायला हरकत नाही असं सांगणारी बिगुलची किंवा अन्य वाद्याची धून म्हणजेच दी लास्ट पोस्ट. इथे पोस्ट म्हणजे सैन्य चौकी असा अर्थ अभिप्रेत आहे. आणि सूर्योदय झाला आहे…आता सैनिकहो, उठून कर्तव्यावर रुजू व्हा…..अशी साद देणारी सुरावट म्हणजे ‘ दी रिवाली ‘ !

सैनिकांच्या मृत्यूंचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे. मानवी वर्चस्ववाद, मतभेद इत्यादी कारणांमुळे झालेल्या युद्धांत बलिदान देणा-या सैनिकांची संख्या अर्थातच अपरिमेय आहे. या सैनिकांना अखेरची मानवंदना देण्याची पद्धत देशपरत्वे वेगळी असेलच. पण दुस-या महायुद्धात सैनिकांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी दी लास्ट पोस्ट ही धून वाजवण्याची परंपरा सुरू झाली. या स्वरांचा मूळ उद्देश आधी अर्थातच वेगळा होता आणि आता हीच धून आपल्या वेगळ्या स्वरूपात रूढ झाली आहे, हे सहज ध्यानात येते.

ही धून रचणारा तसा स्मृतींच्या पडद्याआड निघून गेला आहे. ऑर्थर लेन नावाच्या एका बिगुलरने ही धून जास्त उपयोगात आणली. पण या धुनेचे शब्द मात्र अज्ञातच आहेत. सैनिकांच्या अंत्यसंस्कारांप्रसंगी वाजवली जाणारी ही धून नंतर काही राजकीय नेत्यांच्या अंत्यसंस्कारांतही वाजवण्याची प्रथा सुरू होऊन बरीच वर्षे झालीत. विंस्टन चर्चिल यांनाही दी लास्ट पोस्टने निरोप दिला आहे. देशांच्या सीमा ओलांडून दी लास्ट पोस्ट सध्या तरी अमर झाली आहे…..भावना व्यक्त करण्याचं सुरांचं सामर्थ्य दी लास्ट पोस्ट ने अधोरेखित केले आहे…हेच खरे !

इथं सारं काही ठीक आहे…सैनिका…मित्रा…तू  तुझे कर्तव्य पूर्ण केले आहेस…आता तू शांतपणे तुझ्या वाटेवर चालू लाग…असा भावनेने ओथंबलेला निरोपच देतात हे सूर. पण त्यानंतरच्या काही क्षणांनंतर लगेच रिवाली ही धून वाजवली जाते. दी लास्ट पोस्ट हे मृत्यूचं प्रतीक …  तर दी रिवाली ही मृत्यूनंतर पुन्हा जन्माला येण्याचं प्रतीक. म्हणूनच रिवाली चे सूर म्हणतात…..चल,उठ गड्या….आपल्याला देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी पुन्हा सज्ज व्हायचं आहे…..हे आपणच तर करू शकतो !

(दी लास्ट पोस्ट या विषयावर लिहिलेली ही ‘ दी लास्ट पोस्ट ‘ ! काहीजणांना पोस्ट म्हणजे पत्रं वगैरे किंवा हल्ली पोस्ट म्हणजे फेसबुकवरचा लेख एवढं ठाऊक असतं. काही जणांना युद्धचित्रपटांमुळे पोस्ट म्हणजे सैन्यचौकी हेही माहीत झालेलं आहे. दी लास्ट पोस्टबद्दल मी इंटरनेटवर वाचलेलं मराठीत आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. तपशील तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहता येतील. इथे तांत्रिक बाबी मी थोड्या बाजूला ठेवल्या आहेत. कॉपीराईट नाही. छायाचित्र इंटरनेटवरून साभार. धन्यवाद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तीन हजार शेवटचे निरोप !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “तीन हजार शेवटचे निरोप !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

(The Last Post story ! – यावर आधारित ) 

मी ऑर्थर लेन…वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ब्रिटीश सैन्यात मॅंचेस्टर रेजिमेंटमध्ये ड्रम-वादक म्हणून भरती झालो होतो…विविध वाद्ये खुबीने वाजवायचो..त्यात बिगुल वाजवायला मला खूप आवडायचं…! पण आवडीनं पत्करलेलं हे काम मला मनाविरुद्ध करावं लागेल कधीकाळी याची मला पुसटशी शंकाही आली नाही कधी…पण नियतीच्या मनातलं कोणी ओळखू शकलंय का आजवर? 

दुस-या जागतिक महायुद्धाचा काळ. आम्हा ब्रिटीश दोस्तसैनिकांचा सामना जपान्यांशी सुरू होता….आणि युद्धभूमी होती सिंगापूर. जपानी अधिक आक्रमक आणि तितकेच क्रूर…त्यात आमच्या वरीष्ठांच्या काही निर्णयांमुळे आमची बाजू पडती होती….अगदीच नाईलाज झाला म्हणून आमच्या सेनापतींनी सपशेल शरणागती पत्करली ! आम्ही आमच्या रायफल्स जमिनीवर ठेवल्या आणि दोन्ही हात उंचावून आमच्या खंदकांतून बाहेर आलो. समोर शत्रूने आमच्यावर त्यांच्या रायफल्स ताणलेल्या. थोडीशी जरी वेडावाकडी हालचाल केली तर एकाच वेळी अनेक रायफल्स धडधडतील हे निश्चित. माझ्या शेकडो साथीदारांसोबत मी ही रांगेत उभा होतो…खाली मान घालून. सैनिकाला खरं तर मृत्यूपेक्षा पराभव जास्त झोंबतो. पण कमांडर साहेबांची आज्ञाच झाली शरणागती पत्करण्याची. कदाचित ‘ बचेंगे तो और लढेंगे ‘  असा विचार असावा त्यांचा. 

लालबुंद झालेले डोळे गरागरा फिरवीत शत्रूसैन्याचा एक अधिकारी प्रत्येक रांगेतून फिरत होता. तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कमरेकडे निरखून पाहू लागला तेव्हा कुठे माझ्या ध्यानात आलं की रायफल तर मी टाकून दिली आहे, पण कमरेचा बिगुल तसाच राहिलाय ! आता माझी शंभरी भरली अशी माझी खात्री झाली. खरं तर एक निरूपद्रवी संगीत वाद्य ते. त्यापासून कुणाला मिळाला तर आनंदच मिळणार ! पण शत्रूच्या ते लक्षात तर आले पाहिजे ना? तो अधिकारी जवळ आला…त्याच्यासोबतच्या एकाने माझ्या डोक्याच्या दिशेने आपल्या रायफलची नळी केलेली होतीच. अधिका-याने विचारले,” बिगुल वाजवतोस?” ‘ हो ‘  म्हणण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. रायफल हाती घेण्याआधी मी तारूण्याच्या अगदी उंबरठ्यावर असताना हे बराच दमसास लागणारं वाद्य शिकलो होतो. काय असेल ते असो…मला ही धून वाजवताना एक वेगळीच अनुभूती यायची. पराक्रम गाजवून हे जग सोडून जाणा-या मृत सैनिकाच्या अंतिम प्रवासाची सुरूवात आपल्या सुरांनी होते….हे अंगावर शहारे आणणारे असायचे. खरं तर लास्ट पोस्टची फक्त धून मी वाजवायचो, शब्द मला सुद्धा निश्चित ठाऊक नव्हते. हात अगदी काटकोनात आडवा ठेवून, सावधान स्थितीत उभे राहून, बिगुलच्या माऊथ पीसला ओठ चिकटवून त्यात हवा फुंकून सुरूवात करताना मनावर नेहमीच एक अनामिक तणाव असायचा….सूर नीट लागला पाहिजे. ती दहा वीस सेकंद कधी एकदा संपून जातील असं व्हायचं…  आणि कधी एकदा ‘ रिवाली ‘ धून वाजवतोय असं व्हायचं. ‘ रिवाली धून ‘ म्हणजे मृत सैनिकाचा दुस-या दुनियेतील पुनर्जन्म……उठ सैनिका, तुला आता नव्या आयुष्यातल्या नव्या कर्तव्यावर रुजू व्हायचंय..तुझा पुनर्जन्म झालाय मर्दा ! 

मी सैन्यात रायफल चालवायलाही शिकलो…आणि लढाईत ती वापरायचोही. पण रायफलसोबत मी बिगुलही जवळ बाळगायचो. पण युद्धात कामी आलेल्या सैनिक मित्रांच्या दफन प्रसंगी लास्ट पोस्ट वाजवताना जीव कासावीस व्हायचा…वाटायचं एखादे दिवशी आपल्यासाठीही असंच कुणी बिगुल फुंकेल…दी लास्ट पोस्ट चा ! 

शरणागतीनंतर शत्रूने आम्हा सर्वांची रवानगी श्रम-शिबिरांमध्ये केली. त्यांना त्यांच्या सोईसाठी रेल्वे लाईन टाकायची होती. कामास नकार म्हणजे मृत्यू. आणि अपुरे अन्न शरीर खंगवत चाललेले होते. डोंगर फोडून जीव मेटाकुटीला यायचा. काम सुरू असताना झालेले अपघात, रोगराई, दगाफटका होईल या संशयातून केलेल्या हत्या, कुपोषण, यामुळे थोडे-थोडके नव्हे ….सुमारे बारा-तेरा हजार युद्धकैदी प्राणांस मुकले या रेल्वेच्या कामादरम्यान. तोडकामाची जुनी हत्यारं, जुनाट यंत्रं वापरावी लागल्याने मजुरांचे मरणहाल झाले ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. युद्धकैद्यांचे मृत्यू तर झालेच झाले…आणि सर्वसामान्य मजूर किती मेले म्हणता…..नव्वद हजारांपेक्षा अधिक. असं म्हणतात की जपान्यांनी बर्मा ते थायलंड पर्यंत रेल्वेचे जितके लाकडी स्लीपर्स युद्धकैद्यांकडून आणि मजूरांकडून जबरदस्तीने टाकून घेतले त्या स्लीपर्सच्या संख्येएवढी माणसं मारली गेली या कामात….म्हणूनच हिला ‘ डेथ रेल्वे ‘ म्हणतात ! आणि ह्या स्लीपर्सची संख्या लाखापेक्षा अधिक भरते ! 

एकाच दिवशी शेकडो अंत्यसंस्कार व्हायचे. मृतदेह जाळण्यासाठीची सर्व तयारी करण्याची जबाबदारी जपान्यांनी युद्धकैद्यांवरच टाकलेली होती. चिता रचण्याचं काम दिवसभर चालायचं…त्यावर कित्येक मृतदेह रचून ती चिता व्यवस्थित पेटेल आणि ते दुर्दैवी देह या जगातून कायमचे नष्ट होतील अशी तजवीज करावीच लागायची. काळ्या धुराने आकाश सतत काळवंडलेले असायचे…युद्ध असेच असते…जीवघेणे ! देश लढतात…सैनिक जळत राहतात ! 

या अंत्यसंस्कारांच्या वेळी कशी कुणास ठाऊक, जपान्यांनी मृत सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ दी लास्ट पोस्ट ‘ धून बिगुलवर वाजवण्यास अनुमती प्रदान केली होती. आणि मला बिगुल वाजवता यायचा…..माझी कामं करून हे जादाचं काम करण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता ! पण माझ्या देशवासियांसाठी, माझ्या प्राणप्रिय सैनिक-मित्रांसाठी मला निदान एवढं तरी करायला मिळतं याचं समाधान होतं मला. मी कधीही कंटाळा केला नाही. डोळ्यांत आसवे आणि ओठांत प्राण गोळा करून मी बिगुल फुंकायचो….जा मित्रांनो….जा तुमच्या अंतिम प्रवासाला…तुम्ही तुमच्या मातृभूमीप्रति असलेलं कर्तव्य जिद्दीने पूर्ण केले आहे….जा … स्वर्ग तुमची प्रतिक्षा करतोय…सायंकाळचा सूर्य अस्तास जात असताना शेकडो देह अग्निच्या स्वाधीन होत राहायचे….ज्वाळा आणि धूर….आणि मानवी देहांचा उग्र दर्प आसमंतात भरून रहायचा ! तीन वर्षांत मी दोनशे वेळा दी लास्ट पोस्ट वाजवली ! सैनिकांना दिल्या जाणाऱ्या टॉयलेट पेपरमधील काही तुकडे मी चोरून लपवून ठेवायचो..आणि त्या तुकड्यांवर कोळशानं मी निरोप दिलेल्या सैनिकांची नावे लिहून ठेवायचो…….असे तीन हजार निरोप झाले होते माझे देऊन…शेवटचे निरोप ! आपल्या माणसांपासून दूर, यमयातना सोसत मृत्यूच्या दाढेत गेलेले ते हजारो तरूण देह माझ्या स्वप्नात यायचे पुढे कित्येक वर्षे….माझी सुटका झाल्यानंतरही !   

(ऑर्थर लेन तब्बल ९४ वर्षे जगले. कित्येक रात्री त्यांनी दी लास्ट पोस्टच्या आठवणींच्या दु:स्वप्नांच्या भीतीने जागून काढल्या असतील. जपान्यांच्या छळाला बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतींना योग्य तो मानसन्मान मिळावा, यासाठी लेन आग्रही राहिले. ब्रिटीश सैन्याने ह्या ‘मृत्यूच्या संगीतकारा’च्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ खास ‘दी लास्ट पोस्ट ‘ बिगुल धून वाजवली…!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(इंटरनेटवर विविध लेख, बातम्या, विडीओ पाहून मी हे लिहितो. इंग्रजीत असलेलं हे साहित्य मराठी वाचकांना वाचायला लाभावं अशी साधी सरळ भावना आहे. तपशील, संदर्भ अचूक असतीलच असे नाही…मात्र खरे असण्याची दाट शक्यता असल्याशिवाय मी लिहीत नाही हे मात्र नक्की. )

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 6 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 6 ☆ श्री आनंदहरी 

“ दिगंत, खूपच थकलास ना? हॉस्पिटल म्हणले कि खूपच थकायला होतं. खूप केलंस तू माझ्यासाठी.”

“ मॅडम, आभार प्रदर्शन करून मला निरोप द्यायचा, घालवायचा विचार आहे का काय?”

दिगंत चेष्टेच्या सूरात हसत हसत म्हणाला.

“ काहीतरीच काय बोलतोयस ? पण मी काय म्हणत होते, निर्मलाताईच्या सारखीच एखादी बाई रात्रीसाठी मिळतेय का पाहूयात का? “

“ कशाला मी आहे ना..”

“ तू तर आहेसच रे.. पण तू ऑफिसला जाणार. तुझी किती दमणूक होईल. जागरण होईल. आजारी पडशील रे अशाने .. तू आजारी पडून  कसं चालेल? म्हणून म्हणते. शिवाय तुझं स्वतःचं आयुष्य आहेच ना ? त्याचाही विचार नको का करायला ?”

“ म्हणजे मला घालवायचा विचार करताय . ”

काहीसं मनोमन ‘ हर्ट ‘ होऊनही तसं न दाखवता दिगंतने हसतच विचारलं.

“ नाही रे..तुला कशाला घालवीन? तुच्यावाचून दुसरं कोण आहे मला? “

“ मग ? तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतंय का?”

“ मलाच काय, प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून सेवा करून घ्यायची म्हणलं कि अवघडल्यासारखं होतंच.. “

“ नवरा असला तरी?”

“ अरे, नवऱ्याच्या बाबतीत कसे वाटेल? थोडं फार त्याच्याबाबतीतही  वाटणारच पण तितकंसं नाही.”

“ मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय…”

” अरे, मघापासून तू तेच करतोयस , बोलतोयस, सांगतोयस, विचारतोयस.”

मॅडम हसत हसत म्हणाल्या.

“ मॅडम, प्लिज. मी सिरियसली बोलतोय.”

“ काय झालं दिगंत ? काही प्रॉब्लेम किंवा अडचण आहे का ? अरे, माझ्याशी बोलताना एवढी प्रस्तावना न् परवानगी कशाला? “

“ मॅडम, खूप दिवस तुम्हाला सांगायचा विचार करीत होतो. मॅडम,  मला तुमच्याशी लग्न करायचंय.”

त्याच्या वाक्यानं मॅडम दचकल्या.

“ काssय ? काय बोलतोयस तू दिगंत ? तू वेडा आहेस काय?” 

“ लग्न करणारे वेडे असतात काय? मॅडम, रागावू नका. गेले काही दिवस मी खूप विचार केला आणि माझा निर्णय पक्का आहे.”

“ अरे पण? माझी ही अवस्था पाहून  दयेपोटी म्हणतोयस ना असं? मला दया नकोय कुणाची.. आणि आत्ता तुला वाटत असले तरी चार दिवसांनी तुला पश्चाताप वाटायला लागेल.. असा भावनेच्या भरात वेड्यासारखा विचार नको करुस.”

“ नाही मॅडम, मी भावनेच्या भरातही म्हणत नाही आणि तुमची दया वगैरे वाटूनही म्हणत नाही. मला मनापासून जे वाटतंय ते आणि खूप सारासार विचार करून म्हणतोय.”

“ नाही दिगंत. अरे, मी तुझ्यापेक्षा नाही म्हणलं तरी नऊ- दहा वर्षांनी मोठी आहे.”

“ ते ठाऊक आहे मला .”

“ तरीही? अरे कसं करता येईल लग्न ?”

“ का ? अशी लग्नं  यापूर्वी कधीच केली नाहीत काय कुणी?”

“ केली असतीलही पण ती सगळी प्रेमातून.”

“ प्रेम म्हणजे काय असतं , मॅडम? एखादी व्यक्ती आवडू लागते, आपलीशी वाटू लागते .तिची ओढ वाटू लागते, तिचा सहवास हवाहवासा वाटू लागतो यालाच प्रेम म्हणतात ना ? “

“ व्वा ! प्रेमावर पीएचडी केल्यासारखा बोलतोयस .”

“ तुम्ही विषय बदलताय मॅडम. कधीतरी तुमच्याशी बोलणार, तुम्हाला सांगणार होतोच. मॅडम,मी पीएचडी केलीय का नाही ते ठाऊक नाही पण मी प्रेम केलंय, अगदी मनापासून.अजूनही करतोय. एक क्षणही विसरू शकलेलो नाही. त्यामुळेच तर सगळं सोडून इकडं आलो.”

“ अरे मग तिच्याशीच लग्न कर . सुखी होशील. काही अडचण असेल तर सांग मला, मी करीन मदत.”

“ नाही मॅडम,  हवाहवासा वाटणारा मी नकोनकोसा वाटू लागलो आणि तिथंच विषय संपला. प्रेमात स्वतःला लादता येत नाही . नकोय म्हणल्यावर समोर तरी कशाला ऱ्हावा ? झालं. आलो इकडे. पण मॅडम, मला तेव्हापासून  वाटायला लागलं की  जगात कोणीही कोणाचं नसतं किंबहुना अजूनही तसंच वाटतं. इथं आल्यावर, काळाने म्हणा किंवा परिस्थितीनं म्हणा, मला एक गोष्ट शिकवली, सांगितली ती म्हणजे जगण्यासाठी आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीची सोबत हवी असते जीवनात. तुम्ही भेटलात आणि ते पटू लागलं. माझे तुमच्यावर प्रेम आहे का नाही ते नाही सांगता येणार मला.. पण  तुम्ही, मला आपल्या वाटलात, मला तुमचा सहवास आवडू लागला. हे जीवन जगताना मला तुमची सोबत हवी आहे.. वय काय ? कुठल्याच गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत त्यापुढे.. महत्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हालाही माझी सोबत हवी असणे, हवीशी वाटणे. “

दिगंत खुर्चीतून ऊठला. मॅडमांच्या बेडजवळ गेला.मॅडमांचे डोळे भरून आले होते. त्यानं त्यांचे डोळे पुसले. त्यांना बसतं केलं. त्यांच्या समोरच बेडवर बसून त्यांचे हात हातात घेत म्हणाला,

“ मॅडम, तुमचा निर्णय काहीही असला तरी हा दिगंत आत्तासारखा तुमच्या आयुष्यात असणार आहेच… पण तरीही मला जीवनात साथ- सोबत हवी आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही कराल माझ्याशी लग्न?”

दिगंत बोलत होता, विचारत होता .मॅडमांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा ओघळू लागले होते.. त्याला आपण मॅडमना दुखावलं ,असं वाटून वाईट वाटू लागलं. तो उठून त्यांच्याजवळ गेला. त्यांचे अश्रू पुसता पुसता त्यांना म्हणाला,

“ तुमचं मन मी दुखावलं असलं तर माफ करा मला ,मॅडम.”

“ तसं नाही रे, तू वेडाच आहेस.. अरे अशा वेळी विचारतोयस कि  होकार देताना तुझ्या कुशीत तोंड ही लपवता येत नाही मला.”

दिगंतने पुढं सरकून जवळ बसत त्यांना त्रास होणार नाही , वेदना होणार नाही अशा बेताने त्यांना कुशीत घेत विचारलं,

“ अस्सं काय?”

दिगंतला  त्यांचं, ‘ होss !‘  हे उत्तर त्यांच्या स्पर्शातून जाणवत राहिलं ,कितीतरी वेळ.

 – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी 

बराच वेळ कुणी काहीच बोलले नाही. शांतता खुपत होती . या शांततेचा भंग व्हावा असे दिगंतला वाटत होतं पण ‘ काय बोलावं?’ हे  त्याला सुचत नव्हते.

“ तुला कांदा चिरता येतो काय रे?”

मॅडमनी स्वतःला सावरून, त्या शांततेचा भंग करीत दिगंतला विचारलं तसे त्याने दचकून ‘ काss य?’ ,म्हणून विचारलं.

“ काही नाही. बघ किती वेळ झालाय ते.. चल आत किचनमध्ये . काही येत असलं तर मदत कर ..नसेल तर गप्पा मारायला चल.”

त्यानं ,’ हो ‘ ,म्हणत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं.त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा मागमूसही नव्हता. त्यांनी जणू सारी भळभळणारी  दुःख मनात परत कुलूपबंद करून ठेवली होती.

गप्पा मारत छानपैकी जेवण झालं. गप्पा मारताना मॅडमनी स्वतःबद्दलचा कुठलाच विषय जरासुद्धा काढला नाही किंवा त्याला त्याच्याबद्दल काहीच विचारलं नाही. त्यांना वाचनाची, नाटकं पाहण्याची आवड असल्यानं साऱ्या गप्पा त्याअनुषंगाने होत्या.

“ आता तुम्ही बसा मॅडम,मागचं सारे मी आवरतो. ते जमेल मला.”

“ काहीतरीच काय दिगंत? तू बस. मी आवरते पटपट.”

मॅडमनी त्याला नकार दिला तरी त्यानं मागचं सारं आवरताना खूप मदत केली. सारे आवरून बाहेर येऊन बसल्यावर दिगंत म्हणाला,

“ खूप जेवलो मॅडम, गप्पा मारता मारता. खूप दिवसांनी घरचं जेवण जेवलो. खूप छान चव आहे तुमच्या हाताला.”

“  माझ्यावरची स्तुतीसुमनांची उधळण पूरे आता. खरंच पोटभर जेवलायस ना? गप्पा मारताना माझं तुझ्या जेवणाकडं लक्षच नव्हतं.”

“ पोटभर? इतकं जेवलोय कि आता शतपावली नाही सहस्त्रपावली घालायला हवीय. चला. येतो मॅडम. आता वन-टू करीतच जातो.”

“ पुन्हा ये रे .”

निरोप घेऊन दिगंत निघून गेला. मॅडम जराश्या विसावल्या. त्यांना खूप रिलॅक्स वाटत होतं. दिगंतने  गप्पा  मारल्या पण तो स्वतःबद्दल एक शब्दही बोलला नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. पण तरीही त्यांना तो मोकळ्या स्वभावाचा आहे असं वाटू लागलं होतं.

मॅडमांच्या बाबतीत दिगंत काहीसा मोकळा झाला असला तरी ऑफिसमध्ये तो पूर्वीसारखाच काहीसा रिझर्व्हड् असायचा. ‘ कदाचित आपण त्याला पर्सनल काही विचारणार नाही याची त्याला खात्री वाटत असावी. त्यामुळेच तो आपल्याशी वागता-बोलताना काहीसा मोकळा होत असावा.’ असं मॅडमना वाटू लागलं होतं. त्या ही ते लक्षात ठेऊनच त्याच्याशी बोलत असत.

***                        

दिवसभर निर्मलताईं असल्यानं  मॅडमना खूपच आधार वाटला. त्यांनी स्वयंपाकापासून सारं काही सांभाळलं होतं. शिवाय निर्मलताईंनी  स्पंजिंग ही अगदी व्यवस्थित केल्यामुळे त्यांना खूप प्रसन्न वाटू लागलं होतं .हातातलं काम पटापट उरकून ताई त्यांच्याजवळ खुर्चीत येऊन बसत. काहीबाही गप्पा मारत, स्वतःबद्दल सांगत.मॅडमना दिगंतने विचारपूर्वक केलेल्या नियोजनाचे आश्चर्य वाटत होतं. निर्मलाताईंना शोधणे, त्यांच्याशी सविस्तर बोलून कामाचं ठरविणे..सारं त्यानं व्यवस्थित केलं होतं. मॅडम घरी आल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची काही गैरसोय होऊ नये याचा त्यानं काळजीपूर्वक विचार केला होता. मॅडमना ते दिवसभर जाणवत होतं. निर्मलाताई संध्याकाळी स्वयंपाक करून जाणार होत्या.

बरोबर सहाचा टोल घड्याळात पडत असतानाच दिगंत आला.

“ काय म्हणतायत मॅडम?”

तो आल्याचं जाणवून पाणी घेऊन आलेल्या निर्मलाताईंना , पण मॅडमांच्याकडे पाहत, खुर्चीत बसता बसता विचारलं.

“ तुम्हीच पहा साहेब. चहा ठेवते. मॅडम तुम्ही घेताय ना?”

मॅडमनी ‘ हं ‘ म्हणताच ताई चहा करायला आत गेल्या.

“ कसं वाटतंय ? ताईंचं काम व्यवस्थित आहे ना? तुम्हाला आवडलं ना? “

“ खूप छान. कुठून मिळाल्या तुला त्या? “

“ ढुंढनेसे तो खुदाभी मिलता हैं ,मॅडम ।”

“अरे व्वा ! आज एकदम हिंदी. खरं सांगू दिगंत , तू आलास आणि खूप बरं वाटलं. नाही तशा ताई आहेत… तरीपण तू केव्हा येतोयस असं उगाच वाटत होतंच.”

“ ऑफिसला गेलो होतो. आज हजर झालो. तुमचं मेडिकल सर्टिफिकेट ही सबमिट केलं. कालच घेऊन ठेवलं होतं.“

 “ काय म्हणत होते सगळे? हॉस्पिटलमध्ये भेटून जात होतेच म्हणा अधूनमधून. “

 “ काही नाही मिस करतायत तुम्हाला.”

 ताई चहा घेऊन आल्या. दिगंतला चहा देऊन ट्रे टीपॉयवर ठेवला.मॅडमना बसतं केलं. चहा दिला आणि नंतर स्वतःचा कप घेऊन बाजूला खुर्चीत बसल्या. दिगंतला चहा खूप आवडला.

 “ खूपच छान झालाय चहा ,ताई, एकदम मस्त.”

 “ खरंच आवडला ना साहेब? “

 “ म्हणजे काय? खूपच आवडला.एकदम मस्त.”

 “ हे बघा, सारा स्वयंपाक करून ठेवलाय . हवं तेव्हा जेवा..भांडी सिंकमध्ये ठेवा फक्त. मी सकाळी आले की करते सारे..आता मी निघू का मॅडम? सहाला येते …कि आधी येऊ मॅडम?तुम्ही म्हणत असला तर अजून थांबते थोडा वेळ.”

 “ नको  ताई , आता गेलात तरी चालेल. सकाळी मात्र बरोबर सहाला या. जाऊ दे ना त्यांना ,मॅडम? “

 “ हो. तुम्ही आता गेलात तरी चालेल.”

 मॅडमनी परवानगी देताच ताई निघून गेल्या. दिगंतने दार पुढे केलं. खुर्चीत बसून जरा आळोखे-पिळोखे दिले तेव्हा त्याला रिलॅक्स वाटलं. 

मॅडम दिगंतकडे पाहत होत्या. ‘ तसा खूपंच थकल्यासारखा वाटतो. खूपच केलं त्यानं आपल्यासाठी.अगदी घरचं, नात्याचं कुणी करणार नाही इतकं.’ त्यांच्या मनात त्याचेच विचार रेंगाळत असतानाच, आत्तापर्यंत ध्यानांत न आलेली एक गोष्ट चमकून गेली आणि त्या अस्वस्थ झाल्या. सकाळपासून आत्तापर्यंत निर्मलताई होत्या पण आता त्या उद्या येईपर्यंत फक्त दिगंतच सोबत असणार. त्याला आपली सेवा करायला लागणार  हे जाणवल्यावर त्यांना खूपच अवघडल्यासारखं झालं.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी 

हातातली पिशवी खाली ठेवून कुलूप काढेपर्यंत त्यांन ती पिशवी उचलली. तो काहीच ऐकणार नाही असं वाटून त्या काहीच बोलल्या नाहीत आत जाऊन त्यांनी फॅन लावला.

“ बस. आतातरी देणार आहेस ना पिशव्या?”

“ द्याव्याच लागतील, घरी नेवून काय करणार? मला स्वयंपाक करायला थोडाच येतोय?”

तो हसत म्हणाला पण लगेच गप्प झाला. त्यांना त्याचं एकदम गप्प होणं जाणवलं.. त्या खरंतर त्याला त्याच्याबद्दल विचारणार होत्या पण ओठात आलेला प्रश्न त्यांनी तसाच गिळून टाकला. आणि आत जाऊन पाण्याचा तांब्या-भांडं आणून त्याच्या हातात दिलं.

“ आलेच चहा घेऊन. तुला साखर कशी लागते ?”

“ तुमच्या हाताला गोडी असणार तेव्हा थोडी कमीच घाला.”

तो स्वतःच्याच मनावरचा ताण घालवण्यासाठी हसत म्हणाला. मॅडमनाही आलेलं हसू रोखता आलं नाही. त्या काही बोलल्या नाहीत. हसत हसत चहा करायला आत गेल्या. तो घोटभर पाणी पिऊन हॉल न्याहाळत बसला. हॉलमध्ये  लावलेला फोटो दिसताच उठून जवळ जाऊन पाहू लागला.

“ मिस्टरांचा आहे .”

किचनमधून चहा घेऊन हॉलमध्ये आल्यावर त्याला फोटोजवळ उभं राहिलेलं पाहून मॅडम म्हणाल्या.त्यांच्या आवाजाने,त्या आल्याचं जाणवून ‘ ओ s ह !’ ,म्हणत मनातले विचार पुसून टाकत तो खुर्चीवर बसला.. त्यांनी दिलेल्या चहाचा एक घोट घेऊन ,’ एकदम मस्त’ अशी कॉम्प्लिमेंट देऊन वातावरणात नकळत निर्माण झालेला ताण कमी करण्याचा प्रयत्न त्यानं केला.

“ खरंच म्हणतोयस कि उगाच ?”

“ अहो खरंच.इतका चांगला चहा झालाय कि रोज प्यायला यावं वाटायला लागलंय. ”

“ मग येत जा.नको कोण म्हणतंय आणि हे बघ साडे सहा झालेत आता जेवूनच जा. “

“ नको मॅडम, जेवण कशाला ?”

“ मी म्हणतेय म्हणून.”

“ अहो पण…”

“ मी काहीही ऐकणार नाही. सिनियर आहे मी, इट्स माय ऑर्डर ..आणि महत्वाचं म्हणजे मी चांगला नसला तरी बरा करते स्वयंपाक.”

“ पण उगाच तुम्हाला..”

“ उगाच मला त्रास व्हायला नकोय ना ? मग थांब.”

त्याचं बोलणं मध्येच थांबवत त्या म्हणाल्या. त्यानं होकारार्थी मान हलवली.

“ काय करू सांग? तुझ्या आवडीचं करते काहीतरी.”

“ काहीही करा साधंसं. आवडेल मला.”

‘ओके ‘ म्हणून मॅडम चहाचे कप घेऊन विसळून ठेवायला आत गेल्या. त्याची नजर परत मॅडमांच्या मिस्टरांच्या फोटोकडे गेली. मिस्टरांचा फोटो ते साधारण त्याच्याच वयातले असतानाचा होता.मॅडमांच्या मिस्टरांचं व्यक्तिमत्व  हसतमुख, प्रसन्न आणि लोभस असं वाटत होतं. मॅडम बाहेर आल्या तेव्हाही तो खुर्चीवर बसल्या बसल्या फोटोकडे पहात होता. त्याला काही विचारावंसं, बोलावंसं वाटतंय पण तो काहीच विचारणार , बोलणार नाही हे त्यांना आजवर उमगलेल्या त्याच्या स्वभावावरून वाटत होतं. त्या समोरच्या खुर्चीवर बसल्या.

क्षणभर कुणीच काही बोललं नाही. ती क्षणभराची शांतता त्यांना असह्य झाली कदाचित त्यालाही.

“ एखादी गोष्ट शिगेला पोहोचली कि तिचा उतरता प्रवास सुरु होतो . ती कमी कमी होत जाते . कधी उतू जाऊन तर कधी आटून.. दुःखाचंही तसंच आहे दिगंत.”

“ म्हणजे ? मी नाही समजलो.”

“ मघापासून तू तो फोटो पाहतोयस. तूला विचारावं वाटतंय त्यांच्याबद्दल पण मला त्रास होईल म्हणून तू विचारत नाहीस हे लक्षात आलंय माझ्या … पण दिगंत, दुःख न बोलता, न सांगता काळजात ठेवली तरी त्रास होतोच. शिवाय तुला  ठाऊक व्हायला हवं असताना कळलं नाही म्हणून तुलाही त्रास. प्रत्येकाजवळ नाही पण आपल्या वाटणाऱ्या आणि खरंच ज्यांना आपल्याबद्दल आपलेपणा वाटतो त्यांच्याजवळ बोलावं, मोकळं व्हावं.

दहा वर्षे झाली त्यांना जाऊन.. अपघातात ऑन द स्पॉट गेले ते. वर्षही झालं नव्हतं लग्न होऊन..दुःख करायलाही वेळ दिला नाही नियतीनं.  वर्षभर घरची लक्ष्मी वाटणारी सून एका क्षणात पांढऱ्या पायाची ठरली. घरातून कुठं जाणार? माहेर होतं पण ते चार दिवसाचं असते. चार दिवसानंतर सारे बदलतं. नकोसे वाटतो आपण सगळ्यांनाच, जेव्हा आपण पर्याय नाही म्हणून त्यांच्या आश्रयाला जातो तेव्हा. तेच जाणवलं. आधी नोकरी करत होतेच. परत तिथेच गेले .तिथं मात्र दैवाने साथ दिली.. माझी रिकामी झालेली जागा भरली नव्हती.. पुन्हा जॉयनिंग मिळालं . लगेच विनंती करून बदली घेऊन दूरवर इथं आले.

दिगंत, आपण नको असतो ना तिथं कधीच राहू नये.. अगदी क्षणभरही. इथं आले पुन्हा मागं वळून नाही पाहिलं. अर्थात त्यांनीही कुणी, ‘ आहे का मेले’ याची चौकशीही कधी केली नाही , माहेरच्यांनी नाही.. सासरच्यांचा तर प्रश्नच नव्हता. जो आपला होता तो गेला. ज्यांच्यामुळं ते जग आपलं असते , आई-वडिलांमुळं माहेर आणि नवऱ्यामुळं सासर, तीच माणसे गेली म्हणल्यावर  त्या जगात आपलं काहीच उरत नाही. ते जगही नाही.”

“सॉरी मंडम, माझ्यामुळे…”

“ नाही दिगंत, काही दुःख, काही जखमा अशा असतात, त्या कधीच खपली धरत नाहीत. भळभळत असतात आतल्याआत.”

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी 

वर्षांपूर्वी बदलून आल्यापासून दिगंत तसा कशात आणि कुणात फारसा मिसळत नव्हता पण म्हणून तो माणूसघाणा आहे असंही कुणाला वाटलं नव्हतं. काहीसा अबोल, आपल्याच कोषात राहणारा असाच वाटत होता. ऑफिसच्या कार्यक्रमात काहीसं अंतर राखून, पण तसं भासवू न देता वावरत होता. असा दिगंत आपल्या मदतीला धावून का आला ? तेही स्वतःचं काम बाजूला ठेवून. कितीतरी वेळ त्या विचार करत होत्या पण त्यांना दिगंतच्या वागण्याचं कारण काही सापडत नव्हतं, ध्यानात येत नव्हतं.

तब्येत बरी होऊन त्या ऑफिसात कामावर रुजू झाल्या. त्या पर्स टेबलवर ठेवून खुर्चीत बसत होत्या त्याचवेळी दिगंत ऑफिसमध्ये आला. त्यांनी  बसता बसता दिगंतकडे पाहून स्मित केलं. त्यानेही हसून प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्या टेबलजवळून जाता जाता विचारलं,

“ आलात मॅडम? तब्येत पूर्ण बरी झाली ना? ,”

“ हो, एकदम छान.”

तो आणखी काहीही न बोलता स्वतःच्या टेबलजवळ गेला. हातातील बॅग ठेवून त्यानं आपल्या कामाला सुरवातही केली. त्यांनी दिगंतकडे एकदा पाहिलं आणि ‘ असा काय हा? ‘असा मनात आलेला विचार झटकून टाकून आपल्या कामाकडे वळल्या.

ऑफिसमध्ये सारा दिवस कामातच गेला. घरी आल्या न् त्यांनी खिचडीचा कुकर लावला. त्यांचं रोजचं रुटीन ठरून गेलेलं होतं. त्या सकाळी पोळी- भाजी करीत, थोडं खाऊन , डबा घेऊन ऑफिसला जात. संध्याकाळी मात्र आमटी- भात किंवा मुगाची खिचडी असाच बेत असे. ऑफिसमधून येतानाच भाजी किंवा किराणा खरेदी करत. इतर सारी कामं सुट्टीदिवशी.

कुकर लावून त्या भाजी निवडत बसल्या. त्या सरावाने काम करीत होत्या पण त्यांच्या मनातून दिगंतचा विचार जात नव्हता. त्यांच्या नजरेसमोरून  दिगंत ऑफिसात हजर झाला त्या दिवसापासूनचे सारे वर्ष तरळून गेलं. दूरवर गाव असणारा दिगंत त्याच्या जिल्ह्यातील ऑफिसमधून विनंती बदलीवर इकडे आलाय म्हणल्यावर प्रत्येकाच्याच मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं पण अजूनही कुणाला त्याचं उत्तर मिळालं नव्हतं .

दिगंत आलेल्या क्षणापासूनच रिझर्व्हड् राहिला होता. त्यानं कार्यालयीन संबंध कार्यालयापुरते मर्यादित ठेवले होते.कुणी मागितली तर ऑफिसच्या कामात मदतही करायचा पण ते तेवढ्यापुरतंच असायचं. अवांतर गप्पातसुद्धा सहसा सामील व्हायचा नाही. ऑफिसमध्ये लंचब्रेक झाला की सारे आपले टिफिन घेऊन एकत्र गप्पा मारत जेवत असत. दिगंत आला त्यादिवशी आणि नंतरही दोनतीन दिवस सारे त्याला जेवायला  बोलवायचे पण तो थँक्स आणि सॉरी म्हणून बाहेर जेवायला जायचा.

दिगंतच्या अशा वागण्याबद्दल ,सुरवातीचे काही दिवस , त्याच्या अपरोक्ष चर्चा चालायची, कारणांचा अंदाज बांधला जायचा पण हळूहळू सारे बंद होत गेलं होतं. तरीही प्रत्येकाच्या मनात ,सुप्तावस्थेत का होईना,त्याच्याबद्दल  कुतूहल हे होतंच. तो कसाही असला तरी त्याच्यापासून कुणालाही कसला त्रास नव्हता. तो तसा खूपच सरळमार्गी वाटत होता आणि म्हणूनही असेल कदाचित पण तो जसा आहे तसा साऱ्यांनी त्याला स्वीकारलं होतं.

ऑफिसमधले दिवस कामाच्या रामरगाड्यात पूर्ववत जात होते पण ऑफिसमधून बाहेर पडलं की रात्री उशिरापर्यंत झोप येईपर्यंत सारिका मॅडमांच्या मनात मात्र दिगंतचाच विषय घोळत असायचा. तसं म्हणलं तर त्या आजारपणानंतर दिगंतशी ऑफिसातसुध्दा फारसं बोलणं झालं नव्हतं पण तरीही त्यांच्या मनातून दिगंतचा विषय गेला नव्हता.

काही दिवस असेच गेले आणि एका रविवारी त्या मार्केट मध्ये किरकोळ खरेदी करत असताना त्यांना दिगंत दिसला. त्याला हाक मारली तर ऐकू जाणार नाही जाणवून ‘ काय करावं?’ असा विचार, त्याच्यावरची नजर न हटवता त्या करीत असतानाच दिगंतने त्यांना पाहिलं. त्यांनी हातानेच , ‘ इकडे या.’ अशी खूण केली. दिगंत आला.हसत म्हणाला,

“ तुम्हाला पाहिल्यावर न भेटता जाईन कसा?”

“ पाहिल्यावर ना? पाहिलं नसतं तर..हाकही पोहोचली नसती म्हणून कसं बोलवावं याच विचारात होते मी. “

“ पहा, न पहा. बोलवा, न बोलवा. भेट व्हायची असली तर होणारच ,मॅडम.”

“ पाचच मिनिटं. एवढे सामान घेते. मग घरी जाऊ.”

“ घरीss?”

“ आता कोणतंही कारण ऐकणार नाही मी, आधीच सांगून ठेवते.”

‘ ओsके !’ ,म्हणत तो हसला.

“ चला, झाले सारे. निघूया.”

सगळी खरेदी झाली तेव्हा त्या दिगंतला म्हणाल्या.

“ घरी येतो पण एक अटीवर…”

“ आता आणि कसली अट घालताय ?”

त्याच्या वागण्या-बोलण्याचा अर्थ न समजून आश्चर्याने त्याच्याकडे पहात मॅडम म्हणाल्या.

“ मला तुम्ही यापुढं ‘अहो जाहो’ करायचे नाही. एकेरी बोलवायचं.”

“ अहो पण तसं कसं…”

“ ते काहीही नाही. तुम्ही या क्षणापासून तसं म्हणणार आहात आणि मी घरी येणार आहे. चला.”

“ ओके बाबा.. चल. का अजून काही अट आहे?”

“ आता कसं बरं वाटलं.अजून आहे ना..हातातल्या दोनपैकी एक माझ्या हातात येणार आहे आणि घरी गेल्यावर मस्त चहा द्यायचा.”

“ नाही हं आता काही ऐकणार . एक अट मान्य केलीय ना तुझी?”

“ ठीक आहे . पिशवी दया. चहा राहू दे. एक माझं एक तुमचं मान्य. चालेल ना?”

हसत हसत त्यांच्या हातातील काहीशी जड असणारी पिशवी घेत तो म्हणाला. त्याच्या बोलण्यानं हसू आलेल्या त्या काहीच न बोलता घराच्या दिशेनं चालू लागल्या.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी 

ऑफिसमध्ये असतानाच अचानक दुपारी कणकण आल्यासारखं त्यांना वाटू लागलं. सारे अंग आणि डोकं दुखायला लागलं होतं. ‘हाफ डे’ घेऊन घरी जावं म्हणलं तरी ते शक्य नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी साहेबांची रिजनला अत्यंत महत्वाची  मिटिंग होती. त्यामुळे साहेबांनी सगळ्यांनाच सगळी इन्फॉर्मेशन अपडेट करून फाईल्स संध्याकाळपर्यंत द्यायला सांगितल्या होत्या. क्षणभर उसंत घ्यायलाही कुणालाच सवड नव्हती. कधी नव्हे ते ऑफिसमधला प्रत्येकजण खाली मान घालून कामात गर्क झाला होता. खरंतर त्यांना काम करणं शक्यच होत नव्हतं कारण खाली नुसतं पाहिलं तरी त्यांना खूप त्रास होत होता.

दिगंतने आपल्या टेबलवरची एक फाईल पूर्ण केली. तो ती बाजूला ठेवून दुसरी फाईल घेता घेता त्याची नजर सारिकामॅडमकडे गेली आणि तो चमकला. त्याने क्षणभराने पुन्हा सारिका मॅडम कडे पाहिलं आणि त्याला जाणवलं, नेहमी आपलं काम हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या मॅडम आज काहीशा त्रस्त दिसतायत. खरंतर वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये बदलून आलेला दिगंत कुणाशी फारसा पर्सनल व्हायचा नाही. आपण बरं आपलं काम बरं असा तो वागत होता.

सगळ्यांशी गरजेपुरतं बोलत होता पण त्याने सर्वांनाच सारखंच दूर ठेवलं होतं पण कामाची एवढी गडबड असूनही त्यानं जेव्हा सारिका मॅडमकडे पाहिलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याला राहवेना. त्यानं साऱ्या ऑफिसभर नजर फिरवली पण जो तो आपल्या कामात गर्क होता.. कुणालाच दुसऱ्याशी बोलायला, कुणाकडे पाहायला सवडच नव्हती. त्यानं पुन्हा सारिका मॅडम यांच्याकडे पाहिलं.

काहीतरी त्रास होतोय बहुदा.. त्यांची तब्येत बरी नाही असं वाटतंय ‘ स्वतःशी पुटपुटत त्यानं हातातली फाईल टेबलवर ठेवली न् तो उठला आणि त्यांच्या टेबलच्या दिशेनं निघाला. काही पावलं गेला आणि ‘आपण चौकशी केली तर मॅडमना खटकणार नाही ना?’ असा विचार मनात येऊन थबकला न् त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना खूपच त्रास होत असल्यासारखा त्यांचा चेहरा दिसला. काहीही विचार मनात न आणता तो त्यांच्या टेबलजवळ गेला .

“ तब्येत बरी नाहीय का मॅडम ?”

अचानक प्रश्न कानावर पडल्यानं त्यांनी काहीसं दचकून समोर पाहिलं. समोर दिगंतला पाहून त्यांना नाही म्हणलं तरी आश्चर्याचा धक्काच बसलाच.

“ हो. अचानक कणकणल्यासारखं वाटायला लागलंय. डोकं ही खूप दुखतंय.”

“ औषध ?”

“ जवळ कुठलं असतंय ? आता घरी गेल्यावर घेते.”

तो झटकन माघारी वळला. आपल्या बागेच्या बाहेरच्या कप्प्यातून पॅरासीटॉमॉलची गोळी घेतली. कॉफी मशीन मधून कॉफी घेऊन त्यांच्या समोर गेला.

“ घ्या मॅडम, बरं वाटेल जरा.”

“ अरे, तुम्ही कशाला? मी घेतली असती कॉफी. थँक्स!”

“ तुमच्याजागी आमच्यापैकी कुणीही असतं तर तुम्ही हेच केलं असतंत मॅडम.”

त्यांना अजूनही दिगंतबद्दल आश्चर्य वाटत होतं पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

दिगंत आपल्या टेबलजवळ गेला .त्यानं टेबलवरची फाईल व्यवस्थित जास्थानी ठेवली आणि तो परत मॅडमांच्या टेबलजवळ आला. समोरची खुर्ची ओढून बसला.

“ मॅडम, तुमचे काम आधी पूर्ण करूया. म्हणजे तुम्हाला लवकर जाऊन आराम करता येईल.”

खरं तर त्यांना स्वतःला इतका त्रास होत होता की , काम बिनचूक होण्यासाठी कुणीतरी मदतीला धावून आले तर खूप बरं होईल असे मनापासून वाटत होते पण साऱ्यांनाच वेळेत काम पूर्ण करायचं होतं त्यामुळे नाईलाजाने त्रास होत असतानाही काम करीत होत्या.

“ अहो, पण तुमचं काम?,”

“ माझं जवळपास पूर्ण आहे . थोडंसं आहे ते मी तुमचं झाल्यावर करू शकतो.प्लिज ss!”

दिगंत असल्यामुळे त्यांचं काम अपेक्षेपेक्षा कमी वेळात झालं. दिगंतला कामाचा चांगला उरक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. जास्त काम त्यानेच केलं होतं. सगळ्या फाईल्स साहेबांच्या पी.ए.कडे देऊन, तब्येतीबाबत कल्पना देऊन त्या पुन्हा दिगंतचे आभार मानून बाहेर पडल्या.   पाठोपाठ येऊन दिगंतचे त्यांना पोर्चमध्येच गाठले. 

“ चला मॅडम , मी माझ्या गाडीने घरी सोडतो.”

“ अहो, कशाला त्रास तुम्हाला? आधीच तुम्ही इतकी मदत केलीत. तुमचेही काम राहिलंय अपूरे.. नको, जाईन मी.”

“ मॅडम, तुमच्या अंगात ताप नसता तर मी आलोच नसतो. चला, बसा पट्कन.”

त्यानं त्यांचं काहीच ऐकले नाही. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या घरी कोणी नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्लिनिक जवळ गाडी थांबवली. त्या इंजेक्शन, औषध घेऊन आल्या तोवर तो थांबला होता. त्यांना अगदी घरात पोहचवून, तो ‘ मी निघू का मॅडम आता ?’ म्हणून बाहेर पडू लागला.

“ अहो, चहा..”

“ पुन्हा कधीतरी. रेस्ट घ्या मॅडम.”

मॅडमना जास्त बोलू न देता तो पट्कन बाहेर पडला.

त्या रात्री आणि नंतरचे तीन दिवस तब्येतीची विचारपूस करणारा, आणि ‘ काही हवंय का ?’ ते विचारणारा त्याचा फोन येत होता. फोन आला त्यामुळेच नव्हे तर दिगंत ऑफिसमध्ये त्यांना काहीतरी होतंय हे जाणवून विचारपूस करायला आला त्या क्षणापासून त्यांच्या मनात दिगंतबद्दलचे

विचार येत होते. त्याच्या अगम्य व्यक्तिमत्वाचे कोडे त्यांना उलगडत नव्हतं.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

सारिका मॅडमना अपघात झाल्याचा फोन हॉस्पिटलमधून ऑफिसच्या फोनवर आला आणि ती बातमी एका क्षणात ऑफिसभर झाली. सगळ्यांनाच धक्का बसला. सारे ऑफिस त्यांना भेटायला, बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा काही वेळापूर्वीच मॅडमना तिथं आणलं होतं. त्यांना वेदना कमी  व्हाव्यात म्हणून पेनकिलर इंजेक्ट करण्यात आलं होतं.अजून तपासणी चालू असल्याचं समजलं. ‘ अपघात कसा झाला ?  किती लागलंय ? ‘ याची चौकशी ऑफिसमधल्या काही जणांनी केली .एकदोन जणं डॉक्टरना भेटून आले होते.मॅडमना स्ट्रेचर वरून एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना धीर देऊन, ‘ काहीही लागलं सवरलं तर फोन करा आणि महत्वाचं म्हणजे कसलीही काळजी न करता लवकर बऱ्या व्हा.’ असे सांगून, सगळे निघून गेले

मॅडमनी सगळ्यांना पाहिलं पण त्यांच्यात दिगंत नव्हता. त्याही स्थितीत, ‘ दिगंत कसा नाही आला ?’ हा प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेलाच.एक्स-रे काढून झाल्यावर त्यांना स्ट्रेचरवरूनच रुमकडे नेत असताना मध्येच एका सिस्टरने विचारलं ,

“ घरचं, नातेवाईक कुणी आलंय काय?”

त्या नकारार्थी मान हलवत असतानाच, त्यांच्या कानावर ‘ हो. मी आहे.’ असा आवाज आला. ‘ दिगंतss?’त्यांनी आश्चर्यानं स्वतःशीच पुटपुटत आवाजाच्या रोखाने पाहिलं. दिगंत त्यांच्याकडेच येत होता.त्यानं हसून त्यांच्याकडे पाहिलं. त्या त्याच्याकडे बघतच राहिल्या.

“ ओके. तुम्ही जरा सरांना भेटून या.”

सिस्टरने डॉक्टरांच्या केबिनकडे बोट दाखवत दिगंतला सांगितलं.

दिगंत मॅडमांचा हात हातात घेत,’ काळजी नका करू. मी आहे आता इथं.’ असे त्यांना म्हणून डॉक्टरांच्या केबिनकडे निघून गेला.

मॅडमना झालेला अपघात किती गंभीर आहे ते त्याला डॉक्टरना भेटल्यावरच समजलं आणि त्याला धक्काच बसला. मॅडमना पाहिलं त्यावेळी त्याला तेवढं काही जाणवलं नव्हतं पण वास्तव समोर आलं होतं. सम्पूर्ण परावलंबीत्व तेही वर्ष – दोन वर्षा चा काळ ?  जीवावरचे  पायावर निभावले होते हे खरं … पण असे? मनातून विचार जात नव्हते.

मॅडम महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. दिगंत चोवीस तास त्यांच्या सोबत होता. तीन दिवसानंतर जेव्हा मॅडमना सारे कळालं तेव्हा त्यांना बसलेल्या धक्क्यातून सावरायला,त्यांना धीर द्यायला तोच होता. त्यासाठीची त्यांची मानसिक तयारी त्यानेच करून घेतली होती.तेवढया काळात चार मेजर ऑपरेशन्स झाली होती.

मॅडमना एकदा वाटलं की घरी कळवावे… पण गेल्या दहा वर्षात धडधाकट असताना ज्यांनी साधं जिवन्त आहे का नाही याची चौकशीही केली नाही त्यांना काय आणि कशासाठी कळवायचं ? साऱ्या कटू आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दिगंत तिथंच होता.

“ आज अचानक अवेळी पाऊस कसा काय आला बुवा ?”

“  कुठाय ?”

दिगंतच्या प्रश्नानं डोळ्यातलं पाणी पुसता पुसता खिडकीतून बाहेर बघत त्यांनी विचारलं.

“ हा काय इथं ?”

त्याचा रोख लक्षात येऊन मॅडम म्लान हसल्या.

“ तुम्ही ऑफिसला ….”

विचारावं कि नको असं वाटून मॅडमनी प्रश्न अर्ध्यातच सोडला.

“ जाणार ना. डिस्चार्ज होऊन घरी गेल्यावर.”

“ अहो, पण…. “

त्यांना बोलावं असं वाटलं पण तो त्याच्या निर्णयाशी ठाम आहे हे जाणवल्याने त्या काही बोलल्या नाहीत. नाही म्हणलं तरी त्यांना दिगंतचा खूप आधार वाटत होताच. तो नसता तर आपण एकट्या काय करू शकणार होतो ? हा प्रश्न अनेकदा त्यांच्या मनात यायचाच. आणि त्यावेळी दिगंत देवासारखा धावून आलाय असे त्यांना वाटायचं.

तो स्वतःबद्दल काहीच बोलायचं नाही पण इतर विषयांवर खूप बोलायचा, गप्पा मारायचा, इतका कि कधी कधी त्यांना प्रश्न पडायचा , ‘आपण ऑफिसमध्ये पाहतो तोच हा दिगंत आहे की दुसरं कुणी?’ पण त्याच्या असण्याने त्यांचा वेळ छान जायचा.

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. खरं म्हणायचं तर तात्पुरता डिस्चार्ज. पुन्हा काही ऑपरेशन्स होणार होती. त्यासाठी यावं लागणार होतं. व्हीलचेअर वरुन गाडीत आणि गाडीतून व्हीलचेअर वरून घरात असा प्रवास करून त्या घरात आल्या. या प्रवासात सोबत दिगंत होता पण पुढे काय? हा प्रश्न मॅडमना मनोमन सतावत होता. घरी आल्यावर दिगंतने त्यांना उचलून बेडवर ठेवलं तेव्हा त्यांना कसंतरीच झालं. दिगंतला ते न बोलताही जाणवलं.

“मॅडम, रिलॅक्स. काहीही विचार न करता आराम करायचा.मी आता दोघांसाठी चहा करतो छानपैकी. मला चांगला चहा करता येतो बरं का? “

तो हसून म्हणाला आणि कुणाला तरी फोन करून चहा करायला किचनमध्ये गेला. त्याने आणलेला चहा मॅडमना काहीसं बसतं करून दिला आणि नंतर शेजारी खुर्ची ओढून चहा पिऊ लागला तेवढ्यात एक पन्नाशीच्या बाई आल्या.

“ आलात? बरे झालं. मॅडम ,या निर्मलाताई. सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत इथं असतील.दोन्ही वेळचा स्वयंपाक करतील आणि तुमचं स्पंजिंग वगैरे सगळं करतील. आता तुम्ही आराम करा. ताई हे पैसे ठेवा. घरात काय काय आहे ते ठाऊक नाही. काही हवं असेल तर ते आणा. मी आता संध्याकाळी येतो. मॅडम, मी येऊ का ? आता काहीही विचार न करता आराम करा.”

तो सगळी व्यवस्था लावून निघून गेला. मॅडम त्याच्याकडे पाहतच राहिल्या. तो निघून गेला आणि त्यांचं मन दिगंतचाच विचार करत बसले. खूप दिवसापूर्वी ऑफिसमध्ये असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली होती तो प्रसंग त्यांना आठवला.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares