श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “हे शूरा… निश्चिंतपणे जा तुझ्या प्रवासाला ! —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

(The Last Post story ! – यावर आधारित ) 

वातावरणात शोक भरून उरलेला असतो…..कुठे पापण्यांचा बांध धुडकावून लावून आसवांच्या धारा अधोदिशेला धावत असतात, तर कुठे आसवांचा झरा मनातल्या मनात.. आतल्या आत झिरपत झिरपत अधिक खोलवर जात असतो. कितीही सुकुमार देह असला तरी त्यातील चैतन्याने निरोप घेतलेला असला की देहालाही निरोप देणे भाग पडते. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देऊन आपल्या जन्माचं सार्थक करून तृप्त झालेल्या त्या सैनिकाचा देह आता अंतिम निरोपाच्या प्रतिक्षेत असतो. तो क्षण आता समीप आलाय…..त्याचे सहकारी सज्ज उभे आहेत…..आणि दुस-याच क्षणाला आसमंतात बिगुलचे सूर अलगदपणे अवतरतात. या सूरांना शब्दांची सोबत नाही….पण तरीही ते काहीतरी निश्चित असे सुचवू पाहतात……निरोप देऊ पाहतात !

दी लास्ट पोस्ट….ही सुरावट वातावरण अधिकच गंभीर बनवून टाकते…..ती संपल्यानंतर काही क्षणांचा सागराच्या धीरगंभीर शांततेचा प्रत्यय देणारे क्षण अवतरतात आणि संपता संपत नाहीत…..पण क्षणांनाही थांबता येत नाही मर्यादेपलीकडे….त्या संपणा-या क्षणांना बाजूला सारून आणखी एक काहीशी उच्च स्वरातील धून कानी पडते….’ रिवाली ‘ म्हणतात तिला सैनिकांच्या जबानीत……ही सुरावट जन्मापासून सुरू झालेलं आवर्तन पूर्ण करूनच विसावते…नंतर इतर भावना पुढे सरसावतात !

१७९० या वर्षापासून विलायतेतील सैनिकांच्या आयुष्यात ‘ दी लास्ट पोस्ट ‘ नावाच्या एका ध्वनिकल्लोळाचा प्रवेश झाला आणि आजच्या घडीला जगातल्या सर्वच सैनिकांच्या जीवनाचा आणि मृत्यूचाही एक भाग बनली आहे ही…लास्ट पोस्ट !

खरं तर पहा-यावर उभ्या असलेल्या सैनिकांच्या चौक्या व्यवस्थित आहेत ना? हे तपासून पाहण्याचं काम एखाद्या वरिष्ठ अधिका-याकडे सोपवलेलं असायचं. हे काम दिवसभर सुरू असायचं. जुन्या काळी निरोप देण्याचं काम करायला यंत्रं नसत, सैनिकांच्या मनगटांवर घड्याळं नसत. मग हे काम वाद्यं करत असत. प्राण्यांची लांब शिंगे आतून पोखरून पोकळ केली, आणि त्या शिंगाच्या निमुळत्या शेवटच्या टोकास छिद्र पाडले आणि त्याला ओठ लावून जोरात हवा फुंकली की एक विशिष्ट तार स्वर निर्माण होतो, हे माणसाने बसल्या बसल्या शोधून काढले होतेच. त्यातूनच शिंग फुंकणे हा शब्दप्रयोग रूढ झाला. ही शिंगं नंतर विविध आकार आणि प्रकार घेऊन वाद्यवृंदांत सामील झाली.

तपासणी करणा-या सैन्याधिका-याने त्या सैन्यशिबिरातली शेवटची पहारा-चौकी तपासली आहे…सर्व काही ठीक आहे…सुरक्षित आहे….आता सैनिकांनी दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आराम करायला हरकत नाही असं सांगणारी बिगुलची किंवा अन्य वाद्याची धून म्हणजेच दी लास्ट पोस्ट. इथे पोस्ट म्हणजे सैन्य चौकी असा अर्थ अभिप्रेत आहे. आणि सूर्योदय झाला आहे…आता सैनिकहो, उठून कर्तव्यावर रुजू व्हा…..अशी साद देणारी सुरावट म्हणजे ‘ दी रिवाली ‘ !

सैनिकांच्या मृत्यूंचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे. मानवी वर्चस्ववाद, मतभेद इत्यादी कारणांमुळे झालेल्या युद्धांत बलिदान देणा-या सैनिकांची संख्या अर्थातच अपरिमेय आहे. या सैनिकांना अखेरची मानवंदना देण्याची पद्धत देशपरत्वे वेगळी असेलच. पण दुस-या महायुद्धात सैनिकांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी दी लास्ट पोस्ट ही धून वाजवण्याची परंपरा सुरू झाली. या स्वरांचा मूळ उद्देश आधी अर्थातच वेगळा होता आणि आता हीच धून आपल्या वेगळ्या स्वरूपात रूढ झाली आहे, हे सहज ध्यानात येते.

ही धून रचणारा तसा स्मृतींच्या पडद्याआड निघून गेला आहे. ऑर्थर लेन नावाच्या एका बिगुलरने ही धून जास्त उपयोगात आणली. पण या धुनेचे शब्द मात्र अज्ञातच आहेत. सैनिकांच्या अंत्यसंस्कारांप्रसंगी वाजवली जाणारी ही धून नंतर काही राजकीय नेत्यांच्या अंत्यसंस्कारांतही वाजवण्याची प्रथा सुरू होऊन बरीच वर्षे झालीत. विंस्टन चर्चिल यांनाही दी लास्ट पोस्टने निरोप दिला आहे. देशांच्या सीमा ओलांडून दी लास्ट पोस्ट सध्या तरी अमर झाली आहे…..भावना व्यक्त करण्याचं सुरांचं सामर्थ्य दी लास्ट पोस्ट ने अधोरेखित केले आहे…हेच खरे !

इथं सारं काही ठीक आहे…सैनिका…मित्रा…तू  तुझे कर्तव्य पूर्ण केले आहेस…आता तू शांतपणे तुझ्या वाटेवर चालू लाग…असा भावनेने ओथंबलेला निरोपच देतात हे सूर. पण त्यानंतरच्या काही क्षणांनंतर लगेच रिवाली ही धून वाजवली जाते. दी लास्ट पोस्ट हे मृत्यूचं प्रतीक …  तर दी रिवाली ही मृत्यूनंतर पुन्हा जन्माला येण्याचं प्रतीक. म्हणूनच रिवाली चे सूर म्हणतात…..चल,उठ गड्या….आपल्याला देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी पुन्हा सज्ज व्हायचं आहे…..हे आपणच तर करू शकतो !

(दी लास्ट पोस्ट या विषयावर लिहिलेली ही ‘ दी लास्ट पोस्ट ‘ ! काहीजणांना पोस्ट म्हणजे पत्रं वगैरे किंवा हल्ली पोस्ट म्हणजे फेसबुकवरचा लेख एवढं ठाऊक असतं. काही जणांना युद्धचित्रपटांमुळे पोस्ट म्हणजे सैन्यचौकी हेही माहीत झालेलं आहे. दी लास्ट पोस्टबद्दल मी इंटरनेटवर वाचलेलं मराठीत आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. तपशील तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहता येतील. इथे तांत्रिक बाबी मी थोड्या बाजूला ठेवल्या आहेत. कॉपीराईट नाही. छायाचित्र इंटरनेटवरून साभार. धन्यवाद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments