श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ सुगी… भाग-३ ☆ श्री आनंदहरी ☆
(“ न्हाय व्हय ? मला आपलं वाटलं..नसंल तर ऱ्हाऊदेल..”
सुमा त्याच्या डोळ्यांत पहात म्हणाली.. तो गडबडला.ते पाहून हसत म्हणाली,
“ सजागती गंमत केली तुमची. चला, आय वाट बगीत आसंल..”) – इथून पुढे —
सुमा माळवं तोडाय येरवाळीच रानात आली होती. तालुक्याचा आठवड्याच्या बाजारचा दिवस. बाजारदिवशी तालुक्यासने दिवसातून चारवेळा एसटीच्या बाजारगाड्या यायच्या. साडेअकराच्या गाडीनं माळवं घेऊन गेलं का दोनच्या नाहीतर चारच्या गाडीनं माळवं विकून घरी येता यायचं. इत्तर दिवशी एकच गाडी मुक्कामाला येणारी आणि सकाळी जाणारी.
जयसिंगशी बोलायचे असल्यामुळे ती नेहमीपेक्षा जरा लवकरच रानात आली होती. माळवं तोडण्यात सुमी गर्क होती. जयसिंग आल्याचंही तिच्या लक्षात आलं नव्हतं. जयसिंग दूर उभा राहून आचंबीत करणारा सुमीचा कामातला उरक पहात होता.
“ बसा वाईच बांदावं.. “
जयसिंग आल्याचं ध्यानात येताच ती त्याला म्हणाली.
“ मी तोडू लागतो की माळवं..?”
“ नगं, त्येनं लय येळ लागंल..”
“ ती कसं.. उरकंल न्हवका झटशिरी..”
“ नगं, तुमचं ध्यान काय रानातल्या माळव्याव ऱ्हायाचं न्हाय.. आन त्येच्यामुळं माजं ध्यान तुमाकडं जात ऱ्हाईल.. रानातलं माळवं तोडायचं ऱ्हाऊन जाईल.. बसा तकडं बांदाव.. वाईच ऱ्हायलंय तोडायचं…. आल्येच बगा..”
मिश्किलपणाने हासत सुमी म्हणाली. जयसिंगने मनोमन सुखावत ‘ कायबी झालं तरी हिच्याशीच लगीन करायचं ‘ असा निश्चय केला. थोड्या वेळात माळव्याची पाटी घेऊन सुमी बांदाकडं आली.. बरचसं अंतर ठेवून बसली.
“ ह्ये बगा.. मी काय सांगत्येय तुमास्नी त्ये कान देऊन ऐका.. त्येच्याव इचार करा..”
“ इचार काय करायचा हाय.. माजा जीव तुज्याव जडलाय.. तुजी बी ना न्हाय.. मंग दुसरं काय बी असूनदेल मला तुज्यासंगं लगीन करायचंच हाय. “
“ ऐकून तरी घ्या.. मला तुमास्नी फसवायचं न्हाय.. माज येक लगीन याद्याच्या वक्ताला मोडल्यालं हाय…..”
सुमीने त्याला लग्न मोडल्याची सगळी घटना सविस्तर सांगितली. स्वतःला पांढरा डाग असल्याचं सांगितलं आणि म्हणाली,
“ सावचित इचार करा. उगा घाई करू नगा. मी ही न सांगता होय म्हणलं आस्तं.. तर ती फशीवल्यागत झालं आस्तं. मला तुमास्नी फसवायचं, अंदारात ठेवायचं न्हाय.. नवरा-बायकूच्या नात्यात इस्वास पायजेल. आसं हाय म्हणल्याव तुमच्या घरचा इरोध असणार, पावनं-पै बोलणार.. समदा इचार करा. आन तरीबी तुमाला माज्यासंगंच लगीन करायचं आसंल तर तालुक्याला चारच्या येष्टीआगुदर या.. तुमी आला न्हाय तर मी समजून घिन…”
तिनं डोक्यावर चुंबळ ठेवून माळव्याची पाटी उचलून घेतली. विषयामुळे आलेली गंभीरता कमी करण्यासाठी हसत त्याला म्हणाली,
“ उठा आता.. आन रानाकडं जावा….
काय बी आसलं, तुमी तालुक्याला आला.. न्हाय आला तरीबी सांच्याला च्या प्याला घरला याचंच हाय ही इसरू नगा.. “
सुमा माळवं घेऊन झपाट्याने निघून गेली. जयसिंग ती दृष्टीआड होईपर्यंत पाठमोऱ्या तिच्याकडे पाहत राहिला होता. ती दिसेनाशी झाल्यावर तो उठला. रानाकडे जाताना तिचे प्रत्येक वाक्य त्याला आठवत होतं. ती म्हणाल्याप्रमाणे त्याच्या घरचा होणारा विरोध, पाहुण्या- पै मध्ये होणारी चर्चा… सारा त्याच्या मनात चित्रपटासारखं दृश्यमान होत होतं. बाहेर कुणाला काही ठाऊक नसलं तरी रंगातात्यांना, वहिनीला सगळं ठाऊक असणार आणि त्यामुळे आपण कितीही घरच्यांपासून सारं दडवून लग्न करायचं म्हणलं तरी ते शक्य होणार नाही. तात्या, वहिनी घरी सांगणारच.. काय करावं ?, कसं करावं ? अनेक प्रश्नांच्या जाळ्यात जयसिंग गुरफटत चालला होता.
सुमीचं माळवं दोनच्या गाडीआधीच विकले गेले होते.. पण जयसिंगला चारची गाडी सांगितल्याने तिने बाजारातच फिरत राहून दोनची गाडी चुकवली. जयसिंगला सारं सांगितल्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी झाला होता. जयसिंग तिला आवडत होता.. त्याच्याशी लग्न व्हावे असे तिलाही वाटत होतं.. तो निश्चित येईल असे तिचे मन तिला सांगत असलं तरी आपलं मन आपल्याला हवं असतं त्येच सांगत असतं.. हे ही तिला ठाऊक होतं. आपल्याला व्हावंसं वाटते तसंच घडतं असं नाही हे ती अनुभवाने जाणत होती.. त्यामुळे जयसिंग येईल का ? की नाही येणार ? या प्रश्नाच्या उत्तरात तिचं मन घड्याळाच्या लंबकासारखं आंदोलीत होत होतं.
“ किस्तं वाजलं वो दादा ? “
तिनं हातात घड्याळ असणाऱ्या एकाला विचारलं.
“ तीन वाजले..”
तीन वाजल्याचं ऐकून तिची पावलं स्टँडच्या दिशेने वळली. स्टॅण्डवर न जाता स्टँडच्या बाहेर असणाऱ्या झाडाखाली ती थांबली. तिला स्टँडवर आलेला जयसिंगही दिसणार होता आणि चारही लागलेली गाडीही. गावाकडनं येणाऱ्या जयसिंगला स्टँडवर जाण्यासाठी वळताना ती दिसणार होती. बराच वेळ ती उभा होती.. मनात आशा- निराशा लपंडाव खेळत होती.. लपंडावात कोण जिंकणार हे चारची गाडी आणि जयसिंग यात आधी कोण येईल त्यावर ठरणार होतं.
स्टँडवरची गावातली माणसं गाडीकडे जाऊ लागली तसं चारची गाडी फलाटावर लागत असल्याचं तिला समजलं.. तिच्या मनानं होकार-नकार काहीही स्वीकारण्याची तयारी केली असली तरी तिच्याही नकळत डोळ्यांत पाणी दाटून आलंच..तिने पदराने चेहरा पुसण्याचं निमित्त करत डोळे टिपले. मनाला समजावलं, सावरलं. नकारला तिने स्वतःशीच हसून स्वीकारले आणि पाटी उचलून गाडीत बसण्यासासाठी स्टँडवर जायला वळली.…
… आणि मागून हाक आली ‘ सुमा ‘
ती मागं वळली, फटफटी घेऊन जयसिंग उभा होता.
ती मटकन खालीच बसली आणि मनात दाटून आलेला निराशेचा उमाळा डोळ्यांतून बाहेर पडू लागला होता. ती तोंडावर पदर घेऊन डोळे टिपत स्वतःला सावरत होती.. जयसिंग तिच्या पाठीवर हात ठेऊन तिला म्हणाला,
“ उठ, चल जाऊया. “
*****
जयसिंगचे आबा सोप्यातल्या माचावर बसले होते..
“ येवडा कसला इचार करीत बसलायसा ? दोन-तीन डाव हाळी मारली तुमास्नी ।।”
जयसिंगच्या आईने सोप्यात येताच विचारलं.
“ पोराचं लगीन न्हाय आजून.. कसलं दिस आल्यात.. पोरीचं न्हाय म्हंत्यांत “
“ उगा काळजी करून काय हुतंय वी.. देवीच्या मनात आसंल तसं हुईल..”
“ कंची देवी ? “
“ अवो, आसं काय करतायसा… आपली डोंगराई.. तिच्या मनात आसंल तर कवा लगीन हुईल ती उमगायचं बी न्हाई..”
“ तसं झालं तरी चालंल.. पर पोराचं लगीन हूदे.. आई डोंगराई.. लेकरावर किरपा आसूदेल तुजी..”
जयसिंगच्या बापानं मावळतीकडे तोंड करून हात जोडले.
थोड्याच वेळात फटफटीवरून जयसिंग नी सुमन दारात दत्त झाले.. जयसिंगचा आबा अवाक झाला.
“ देवी पावली गं आमास्नी.. “
भाकरतुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकत जयसिंगची आई म्हणाली..
“ पळवून आणलीस ? “
“ पळवून कशापाय आणायची.. लगीन करून आलूय.. रजिस्टर..”
“ आरं पर..”
“ आता कायबी बोलू नगासा, चांगली धडूतं घाला.. तवर शिरा आणते.. त्वांड गोड करून , ईवाय पावण्याकडं जाऊन भेटून याचं हाय..”
“ म्हंजी तुला…”
“ समदं ठावं हुतं.. उठा आता..”
तासाभरात गाडी भिवाच्या दारात होती.. रंगातात्याही सांगावा गेला होताच.. ती नवरा -बायको दोघंही भिवाच्या घरात आली होती.. एवढं तातडीचे काय हे कुणालाच माहीत नव्हतं. गाडीतून नवरा- नवरीच्या वेशात जयसिंग, सुमी, मागनं ईवाय पावणा, ईन बाई असे सगळे आलेले पाहून सगळेच आवाक. भिवाला तर जोराचा धक्का बसला होता . सुमीच्या आईने पुढं होऊन त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून सर्वांना घरात घेतलं..
चहा-पाणी झाल्यावर ईवाय पावणा म्हणाला ,
“ औदाची सुगी लंय भारी झालिया .. पुरण-पोळीचा ब्येत हून जाऊदे..”
“ आवो पर…”
जयसिंगची आई नवऱ्याला म्हणाली..
“ ईन बाई, समदी तयारी हाय.. कराय घ्येत्ये..”
“ म्हंजी तुमास्नीबी …. ? “
“ व्हय..”
“ बरं पोरानु , देवाला जाऊन या हितं बी.. गाडीतनं जावा..”
“ नग.. तात्यांची फटफटी हाय की भायेर.. सुमीला फटफटीवनं तिचं म्हायेर दावून आणतो..तात्या किल्ली द्या..”
फटफटी गेल्याचा आवाज झाला..
“ कायबी म्हना पर पोरं लईच फास्ट.. ही मजाच न्यारी हाय बगा. आपल्या टायमाला आसं काय आस्तं तर फटफटीवनं पळवून आणून लगीन केलं आस्तं..”
कणिक तिम्बताना जोराचा आवाज झाला तसं सगळ्यानी तिकडे पाहिलं.. तात्यांच्या मालकिणीनं कणकेवर जोराचा गुद्दा मारला होता..
“ आगं तुज्यासंगतीच म्हंतुय मी..”
तात्या म्हणाले आणि आत-बाहेर जोराचा हशा पिकला.
– समाप्त –
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈