श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी 

हातातली पिशवी खाली ठेवून कुलूप काढेपर्यंत त्यांन ती पिशवी उचलली. तो काहीच ऐकणार नाही असं वाटून त्या काहीच बोलल्या नाहीत आत जाऊन त्यांनी फॅन लावला.

“ बस. आतातरी देणार आहेस ना पिशव्या?”

“ द्याव्याच लागतील, घरी नेवून काय करणार? मला स्वयंपाक करायला थोडाच येतोय?”

तो हसत म्हणाला पण लगेच गप्प झाला. त्यांना त्याचं एकदम गप्प होणं जाणवलं.. त्या खरंतर त्याला त्याच्याबद्दल विचारणार होत्या पण ओठात आलेला प्रश्न त्यांनी तसाच गिळून टाकला. आणि आत जाऊन पाण्याचा तांब्या-भांडं आणून त्याच्या हातात दिलं.

“ आलेच चहा घेऊन. तुला साखर कशी लागते ?”

“ तुमच्या हाताला गोडी असणार तेव्हा थोडी कमीच घाला.”

तो स्वतःच्याच मनावरचा ताण घालवण्यासाठी हसत म्हणाला. मॅडमनाही आलेलं हसू रोखता आलं नाही. त्या काही बोलल्या नाहीत. हसत हसत चहा करायला आत गेल्या. तो घोटभर पाणी पिऊन हॉल न्याहाळत बसला. हॉलमध्ये  लावलेला फोटो दिसताच उठून जवळ जाऊन पाहू लागला.

“ मिस्टरांचा आहे .”

किचनमधून चहा घेऊन हॉलमध्ये आल्यावर त्याला फोटोजवळ उभं राहिलेलं पाहून मॅडम म्हणाल्या.त्यांच्या आवाजाने,त्या आल्याचं जाणवून ‘ ओ s ह !’ ,म्हणत मनातले विचार पुसून टाकत तो खुर्चीवर बसला.. त्यांनी दिलेल्या चहाचा एक घोट घेऊन ,’ एकदम मस्त’ अशी कॉम्प्लिमेंट देऊन वातावरणात नकळत निर्माण झालेला ताण कमी करण्याचा प्रयत्न त्यानं केला.

“ खरंच म्हणतोयस कि उगाच ?”

“ अहो खरंच.इतका चांगला चहा झालाय कि रोज प्यायला यावं वाटायला लागलंय. ”

“ मग येत जा.नको कोण म्हणतंय आणि हे बघ साडे सहा झालेत आता जेवूनच जा. “

“ नको मॅडम, जेवण कशाला ?”

“ मी म्हणतेय म्हणून.”

“ अहो पण…”

“ मी काहीही ऐकणार नाही. सिनियर आहे मी, इट्स माय ऑर्डर ..आणि महत्वाचं म्हणजे मी चांगला नसला तरी बरा करते स्वयंपाक.”

“ पण उगाच तुम्हाला..”

“ उगाच मला त्रास व्हायला नकोय ना ? मग थांब.”

त्याचं बोलणं मध्येच थांबवत त्या म्हणाल्या. त्यानं होकारार्थी मान हलवली.

“ काय करू सांग? तुझ्या आवडीचं करते काहीतरी.”

“ काहीही करा साधंसं. आवडेल मला.”

‘ओके ‘ म्हणून मॅडम चहाचे कप घेऊन विसळून ठेवायला आत गेल्या. त्याची नजर परत मॅडमांच्या मिस्टरांच्या फोटोकडे गेली. मिस्टरांचा फोटो ते साधारण त्याच्याच वयातले असतानाचा होता.मॅडमांच्या मिस्टरांचं व्यक्तिमत्व  हसतमुख, प्रसन्न आणि लोभस असं वाटत होतं. मॅडम बाहेर आल्या तेव्हाही तो खुर्चीवर बसल्या बसल्या फोटोकडे पहात होता. त्याला काही विचारावंसं, बोलावंसं वाटतंय पण तो काहीच विचारणार , बोलणार नाही हे त्यांना आजवर उमगलेल्या त्याच्या स्वभावावरून वाटत होतं. त्या समोरच्या खुर्चीवर बसल्या.

क्षणभर कुणीच काही बोललं नाही. ती क्षणभराची शांतता त्यांना असह्य झाली कदाचित त्यालाही.

“ एखादी गोष्ट शिगेला पोहोचली कि तिचा उतरता प्रवास सुरु होतो . ती कमी कमी होत जाते . कधी उतू जाऊन तर कधी आटून.. दुःखाचंही तसंच आहे दिगंत.”

“ म्हणजे ? मी नाही समजलो.”

“ मघापासून तू तो फोटो पाहतोयस. तूला विचारावं वाटतंय त्यांच्याबद्दल पण मला त्रास होईल म्हणून तू विचारत नाहीस हे लक्षात आलंय माझ्या … पण दिगंत, दुःख न बोलता, न सांगता काळजात ठेवली तरी त्रास होतोच. शिवाय तुला  ठाऊक व्हायला हवं असताना कळलं नाही म्हणून तुलाही त्रास. प्रत्येकाजवळ नाही पण आपल्या वाटणाऱ्या आणि खरंच ज्यांना आपल्याबद्दल आपलेपणा वाटतो त्यांच्याजवळ बोलावं, मोकळं व्हावं.

दहा वर्षे झाली त्यांना जाऊन.. अपघातात ऑन द स्पॉट गेले ते. वर्षही झालं नव्हतं लग्न होऊन..दुःख करायलाही वेळ दिला नाही नियतीनं.  वर्षभर घरची लक्ष्मी वाटणारी सून एका क्षणात पांढऱ्या पायाची ठरली. घरातून कुठं जाणार? माहेर होतं पण ते चार दिवसाचं असते. चार दिवसानंतर सारे बदलतं. नकोसे वाटतो आपण सगळ्यांनाच, जेव्हा आपण पर्याय नाही म्हणून त्यांच्या आश्रयाला जातो तेव्हा. तेच जाणवलं. आधी नोकरी करत होतेच. परत तिथेच गेले .तिथं मात्र दैवाने साथ दिली.. माझी रिकामी झालेली जागा भरली नव्हती.. पुन्हा जॉयनिंग मिळालं . लगेच विनंती करून बदली घेऊन दूरवर इथं आले.

दिगंत, आपण नको असतो ना तिथं कधीच राहू नये.. अगदी क्षणभरही. इथं आले पुन्हा मागं वळून नाही पाहिलं. अर्थात त्यांनीही कुणी, ‘ आहे का मेले’ याची चौकशीही कधी केली नाही , माहेरच्यांनी नाही.. सासरच्यांचा तर प्रश्नच नव्हता. जो आपला होता तो गेला. ज्यांच्यामुळं ते जग आपलं असते , आई-वडिलांमुळं माहेर आणि नवऱ्यामुळं सासर, तीच माणसे गेली म्हणल्यावर  त्या जगात आपलं काहीच उरत नाही. ते जगही नाही.”

“सॉरी मंडम, माझ्यामुळे…”

“ नाही दिगंत, काही दुःख, काही जखमा अशा असतात, त्या कधीच खपली धरत नाहीत. भळभळत असतात आतल्याआत.”

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments