मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ?

☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँचमॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधील गर्दी याने सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचे हॅण्डओव्हर यात जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलेच नाही. तिने डब्बा आणलाच होता. आधीचे ब्रँचमॅनेजर, श्री गोरे ह्यांच्याबरोबर ती डब्बा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ‘ती’ एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला न्याहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ अली तेव्हा ती निघून गेली. ती कोण? हे सुद्धा सारिकाने विचारलं नाही, इतकी ती नगण्य होती. चार दिवसांनी गोरे सर गोरेगाव ब्रँचला, जिथे त्यांची बदली झाली होती, तेथे निघून गेले. ‘काही अडलं तर नक्की फोन करा’ असं सांगून गेले. जाताना एवढेच म्हणाले ‘त्यादिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती, त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठचे तरी जुने पैसे मागत असते व त्रास देते’. मी सुटलो. सारिकाने फक्त ‘हो’ म्हंटल.

दुसऱ्या दिवशी पासून सारिकालाच ब्रॅन्चचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून, जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होत. मात्र झोनची मिटिंग होऊन ब्रॅन्चच टार्गेट दिल गेलं. सारिकाने मार्केटिंग साठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. आठ दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशारितीने कामाला सुरवात झाली. ह्या ब्रॅन्चमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मुलबाळ हे विषय सतत चालू असायचे.

सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले. ते समोर ठेऊन काम कोणाला वाटून द्यायची ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धप्पकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकाने मानवर करून बघितलं तर ती ‘तीच’ होती. पाहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारी. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. ती शरीराने कृश, काळीसावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहेर्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहेरामोहरा होता. तिने पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाउज व पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक केबिन मध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेनेच तिला विचारले काय काम आहे? ती म्हणाली ‘माझे हरवलेले पैसे पाहिजेत’. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली दहा वर्षांपूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितले पुरावा घेऊन ये आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारले, आता काय राहील? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचे पासबुक देखील नव्हते. मी तिला सांगितले बँकेचे पासबुक घेऊन ये मगच आपण बोलू आणि आता तू निघू शकतेस, मला खूप काम आहे. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचे नाव माझ्या डायरीत लिहून घेतले. पासबुकच नसेल तर मी देखील काय करणार होते.

घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. पंधरा दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धप्पकन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. हातातली विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्या समोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या व एक फाटके आणि भिजून पुसट झालेले पासबुक होते. माझ्या महत्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली घरात होत ते सगळं मी शोधून आणलं आहे. आता माझे पैसे द्या. मी चिडलेच, मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेऊन जा. मला वेळ मिळाला की मी बघीन, ती बाई हुशार होती मला म्हणाली, ‘मला याची पोचपावती द्या’. मी तिला सांगितलं, ‘ह्या चिठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही. त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्या वेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता.

मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेट मध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचे नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेऊन दिले. आठ दिवस मी त्या डॉकेट कडे ढुंकून देखील बघितले नाही. पण का कोण जाणे मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवले. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून एक तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिन मध्ये बोलावले. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेट मधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखे प्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या दहा वर्षा पूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रान्चला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. ‘मॅडम एवढा जुना डेटा अकौंट्स डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं.

सोमवारी बँकेत आल्यावर मी अकौंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांना सगळी केस सांगितली. मी तारखे प्रमाणे पावती वरील रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकौंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला व काहीही झालं तरी ह्या पैशाच्या एन्ट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती.

माझ्या लक्षात आलं पूर्वीच्या ब्रँच मॅनेजरने एवढे सुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होत. आठ दिवसाने मला अकाउंट्स डिपार्टमेंटहून एक मेल आलं. त्यात म्हंटल होत. या बाईचा खात नंबर ५००१ आहे आणि या बाईने सगळे पैसे ५०१० या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर खाते नंबर ५०१० असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खाते तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहाने हे पैसे दहा वर्षांपूर्वीच काढून घेतले आहेत आणि खात बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवत आहे तुम्ही ब्रान्चला हे प्रकरण सोडवा. अशारितीने अकौंट्स डिपार्टमेंटने हात झटकले.

मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला व डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणाल, ‘तिचीच चूक आहे. खाते क्रमांक चुकीचा का घातला?’ दुसरं मन म्हणाल ‘कर्मचाऱ्याने आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरने देखील का बघितलं नाही?’, त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता.

मी प्रथम कुलकर्णी बाईला बोलावून घेतलं. आज सुद्धा ती त्याच साडीत, तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्या बद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकौंट्स डिपार्टमेंटच लेटर प्रिंट काढून वाचायला दिल.. मी तिला विचारले, ‘तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री मिताली वर्दे 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गैरसमज… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ गैरसमज…  ☆ सौ. वृंदा गंभीर

राहुल आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेजचा पहिला दिवस होता. सगळे अनोळखी होते म्हणून कुणी कुणाशी बोलले नाही.

आठ दिवस असेच निघून गेले हळूहळू ओळख झाली. मुलं मुली बोलायला लागलो … मैत्री झाली.

एक दिवस अचानक एक नवीन मुलगा वर्गात आला आणि आजच ऍडमिशन घेतलं असं सांगितलं सगळ्यांची ओळख करून घेतली. खूप हुशार शांत लाघवी होता राहुल. आमची मैत्री लगेच झाली.

फस्ट सेम झाली आणि आणि आम्हाला सुट्टया लागल्या. सगळे घरी गेले. राहुलशिवाय करमत नव्हतं कधी सुट्टी संपते असं झालं होतं. मी राहुलला कॉल केला. तो म्हणाला “ हा रूपा बोल.. कसा फोन केला. ”

मी म्हणाले, “ सहज केला. सुट्टया संपतील, सेकण्ड सेम सुरु होईल, अभ्यास वाढेल तेव्हा जरा अभ्यासाचं नियोजन करावं, , , “

राहुल म्हणाला, “ हेच कारण आहे ना कि दुसरं काही कारण आहे. असेल तर सांग, , , ”

मी शांत झाले. राहुल हसून म्हणाला, “ करमत नाही का माझ्याशिवाय.. बोलावं वाटतं कि भेटावं वाटतं.. येऊ का भेटायला कि प्रेमात पडली आहेस ? ” माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी हसले आणि तुझं काहीतरीच म्हणून फोन ठेवला.

मी विचार करू लागले त्याने माझ्या मानतलं कस ओळखलं ? त्याच्याही मनात असंच असेल का, तोही माझ्यावर प्रेम करत असेल का? मी विचारात हरवले होते तेवढ्यात आई आली, म्हणाली “रूपा चल आपण बाहेर जाऊन येऊ. तुला बर वाटेल. ? मी माझ्या आईबरोबर मावशीच्या घरी गेले. मावशीला खूप आनंद झाला कारण आम्ही खूप दिवसांनी भेटत होतो.

मावशी म्हणाली, “ बरं झालं तुम्ही आल्या. त्यांचे मित्र व त्यांचा मुलगा येणार आहे, मला तुमची मदत होईल, , ”,

मी म्हणाले, “ सांग मावशी काय करायचं … स्वयंपाक कि नाष्टा करायचा “.. आई तू बोलत बस. मी तयारी करते. ” मावशीने सांगितलं.. “ छान स्वयंपाक करायचा आहे. आम्ही त्यांच्या गावी बदलीला होतो तेंव्हा त्यांनी खूप काही केलं आमच्यासाठी. खूप प्रेमळ आणि समाधानी लोक आहेत ते. त्यांचा मुलगा खूप हुशार आहे. तो इंजिनिअरिंगला आहे. सुट्टीमुळे घरी आलाय.. करमत नाही म्हणून आपल्या घरी येतो आहे. ”

आई मावशी बोलत बसल्या. मी स्वयंपाक केला. वरण भात कोशिंबीर चटणी मटकी, पनीरची भाजी पोळी गव्हाची खीर केली. तेवढ्यात काकांचे मित्र व त्यांचा मुलगा आला. मावशीने त्यांचं स्वागत केलं.

“ रूपा पाणी आण ग काकांना “ 

मी आईला म्हणाले “ आई तू जा पाणी घेऊन, मी जात नाही. अनोळखी लोक आहेत. मी कसं जाणार “ आई बर म्हणाली आणि ती पाणी घेऊन गेली. मी कॉफी करून दिली आईनं नेऊन दिली. त्यांच्या गप्पा झाल्या काका जेवायला वाढा म्हणाले, , , , , , ,

मी ताटं करायला घेतली आणि राहुल हात धुवायला बेसिनकडे आला तो मला आणि मी त्याला बघतच राहिले. बोलायचं पण सुचेना. काका म्हणाले “ राहूल हात धुवून जेवायला बस. ”

ताट वाढली आणि मी वाढायला पुढे गेले. आई पहात होती ती म्हणाली “ अनोळखी आहेत ना मग कशी वाढते तू, ? “, मी लाजले आणि आईला म्हणाले “आता बराच वेळ झाला काका येऊन त्यामुळे काही वाटत नाही वाढते मी “

सगळे जेवायला बसले. काका स्वयंपाकाचं कौतुक करत होते.. काकांनी सांगितलं सगळा स्वयंपाक रूपाने केला आहे. राहुल बघतच राहिला.. मनात विचार करत होता ही दिसायला सुंदर.. अभ्यासात हुशार.. घरकामात हुशार.. नावाप्रमाणे रूपा हे नाव शोभतं हिला, , , , , , ,

जेवणं झाली. मी आवरून ठेवलं व हॉलमध्ये जाऊन बसले. सगळे गप्पा मारत होते. मावशीने सांगितलं ही ‘ माझी बहीण व तिची मुलगी रूपा.. ही पण इंजिनिअरिंगला आहे.. खूप हुशार आहे. ’ 

राहुल काही बोलणार तोच रूपा म्हणाली “ हा काय करतो.. म्हणजे शिक्षण कि जॉब “ त्याने ओळखलं हिला सांगायचं नाही आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. तिने डोळ्याने खुणावले.. तो शांत बसला, , , , , , ,

राहुल व काका निरोप घेऊन गेले मी आणि आई घरी आलो, , , , , मनात कुतूहल होत करमत नव्हते म्हणून गेले तर राहुल भेटला मनात आनंद होता एक अनामिक ओढ होती सुट्टी संपायची वाट बघायची होती.

सुट्टी संपली. कॉलेज सुरु झालं. रिझल्ट लागला. राहुल पहिला तर मी दुसरी आले, , , , , , , ,

राहुल म्हणाला “ सांगितलं का नाही घरी आपण एकाच वर्गात आहोत ?”

मी म्हणाले “ कसं सांगायचं होतं ? तू तर मला तू प्रेमात पडली का विचारून ब्लँक केलं होतस. मनातील भावना ओठांवर आली असती, , “,

तो – “ तू खरंच प्रेमात पडली आहेस का ? “

मी – “ तू नाही का पडला ? तुझ्या डोळ्यात दिसतं म्हणून तर ओठांवर आलं.. हो ना राहुल, , , , , , ”,

राहुल -. ” रियली लव्ह यू स्वीट हार्ट, , ”

रूपा – “ लव्ह यू टू राहुल, ”

… मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले होते.

आम्ही ठरवलं आधी शिक्षण, मग वेळ द्यायचा.. करिअरकडे लक्ष द्यायचं.. एकत्र अभ्यास.. कारण आठवड्यातून एखादा तास द्यायचो एकमेकांना हेच खूप होतं. डिग्री पूर्ण केली.. कॅम्पस सिलेक्शन झालं.. दोघांना नोकरीं लागली, खूप आनंद झाला आणि आता घरात सांगायचं ठरवलं.

मी आईला सांगितलं, आई मावशीकडे घेऊन गेली. राहुलचे पप्पा आधीच तिथे आले होते. आईने मावशीला सांगितलं आणि ते सगळे हसायला लागले कारण त्या दिवशी आई मला मुद्दाम घेऊन आली होती स्वयंपाक मला करायला लावला होता.. हे नातं त्यांनी आधीच घट्ट केलं होत.

लग्नाचा मुहूर्त काढला. जोमाने तयारीला लागले. सगळ्यांच्या पसंतीने कपडे साड्या दागिने घेतले. आनंदी होते सगळे. लग्न थाटात पार पडलं, , , , , पूजा झाली.. मालदीवला फिरायला गेलो.. ते सुखद क्षण मनात साठवून माघारी आलो.

राहुलने जॉब सोडून बिझनेस सुरु केला. स्पेअरपार्ट व इंजिन बनवण्याची कंपनी टाकली. तो त्यात खूप बिझी झाला. घराकडे माझ्याकडे आई बाबांकडे त्याचं दुर्लक्ष झालं. कंपनीचं काम वाढलं होतं. त्यात मला दिवस गेले ही आनंदाची बातमी ऐकायला सुद्धा त्याला वेळ नव्हता. मी मनातून नाराज रहात होते अशा वेळी तरी राहुल बरोबर असावा असं वाटतं होतं.

जुळी मुलं झाली.. एक मुलगा एक मुलगी. त्याला आम्हाला भेटायला वेळ नव्हता. मुलं मोठी होत होती. मुलांसाठी मला घरात थांबावं लागलं होतं. आई बाबांना वाईट वाटत होतं पण काय कारणार कामच होतं आणि आमच्यासाठी करत होता.

पुढे पुढे हे मला असहाय्य झालं. मला राहुलची कमी भासू लागली. मी उदास राहायला लागले त्याचा परिणाम तब्बेतीवर झाला. मी ठरवलं राहुलला सोडायचं आणि आपण आपली मुलं घेऊन नोकरी करून मजेत जगायचं. अशातच राहुलचा आणि माझा मित्र संजू मला भेटला. मी त्याला सगळं सांगितलं. त्याने मला समजून सांगितलं.. “ असा टोकाचा निर्णय घेऊ नको.. तुझ्या मनातलं त्याला सांग मग हा निर्णय घे. त्याची चूक त्याला दाखवून दे.. पैशापेक्षा माणूस कुटुंब महत्वाचं असतं हे पटवून दे त्याला. मग त्याला कळेल ज्या कुटुंबासाठी तो पळतोय तेच बरोबर नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय?” 

मी विचार करत घरी आले. राहुलबद्दल किंवा आमच्या दुरावलेल्या नात्याबद्दल जो गैरसमज झाला होता तो मनातून काढून टाकला व एक चिट्ठी लिहून राहुलच्या उशाशी ठेवली व मी झोपायला गेले.

राहुल उशिरा घरी आला. त्याने चिट्ठी वाचली.. डोळ्यात पाणी आलं आणि मुलांच्या बेडरूममध्ये आला. माझी माफी मागितली.. मुलांची आई बाबांची माफी मागितली. ‘ मला तू हवी आहेस ‘ म्हणून मिठीत घेऊन रडायला लागला आणि आम्ही ठरवलं.. एकमेकांना वेळ द्यायचा.. पुन्हा नातं पूर्वीसारखं घट्ट करायचं, , , , , , ,

राहुल आता घराकडे लक्ष देत होता. एक दिवस मला म्हणाला “ रूपा, ऑफिस जॉईन करते का? माझा ताण थोडा कमी होईल आणि तुलाही बरं वाटेल.. ” 

तो दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस होता. आज आमची हैप्पी फॅमिली उठून दिसत होती.

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वीकार…  लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ स्वीकार…  लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचे पुस्तक टेबलावर ठेवले व परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले. नुकत्याच कामाला लागलेल्या सुमनने गरम चहा मॅडमना आणून दिला.

“वैनी, तुम्ही गणित शिकवता?” सुमनने पुस्तकाकडे बघत विचारलं.

“हो!” मनीषाने चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमनने चहा घेतला का विचारलं व ती कामाला लागली.

“मला येत नाही गणित” – “मला जमत नाही” – मला आवडत नाही” अशी वाक्यं बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला तिच्या वर्गातील करूणाला गणितात ५० मार्क देखील मिळत नव्हते. तिला आज ७० मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं. कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता ! जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली..

तिची लेक नेहा घरी आल्याचा आवाज आला.

“नेहा, कशी झाली ग गणिताची टेस्ट? किती मार्क पडले?” तिनं आतून ओरडून विचारलं.

“ शी काय हिची कटकट ! हिला व बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का? बाबा ISRO मधे मोठे इंजिनीअर आणि ही गणित शिकवणारी म्हणजे मी रामानुजन असावं ही यांची अपेक्षा.. नाही येत मला गणित ! नाही मला आवडतं ! “.. वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं ते आतल्या आत गिळून टाकले.

“आई, खूप अवघड होता पेपर. ७० मार्क पडले !” तिनं खाली बघत उत्तर दिलं.

मनीषाचा चेहरा बदलला. “Highest कोण आहे?”

“ शीतलच की.. तिला १०० मार्क पडले. तिला नेहमी जमतं सगळं !” नेहाला आता रडायला येऊ लागलं..

मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं.. खरंच पेपर कठीण असेल तर highest पण कमी मार्कांचा असतो असं झालेलं नाही.. म्हणजे..

तिनं नेहासमोर ओटमील व दूध ठेवलं व खाऊन होताच ‘ गणिताचं पुस्तक घेऊन ये ‘ म्हणाली..

“आई, तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी कधी ॲक्सेप्ट कराल ग?” हे वाक्य बाहेर येऊ पहात होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिने ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही..

नेहा ओटमील खाऊन नाराजीने मनीषा समोर बसली.. मनीषाने तिला पाच सहा गणितं करायला दिली.

“मी भाजी घेऊन येते खालून. येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव” ती पिशवी घेऊन बाहेर पडली.

सुमन केर काढत होती. नववीतली पोर.. कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता. रात्रीची शाळा अन दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती.

सुमननं केर थांबवून वाकून नेहाने सोडवलेली गणितं बघितली.

“नेहा ताई, पहिलं गणित बरोबर आहे. दुसरं चुकलंय.. हे बघ मी हे असं सोडवेन “ म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं. “ आमाला हे असं सोडवायला शिकवलय.. ”

“ सुमन, किती हुशार आहेस ग !” नेहाचा चेहरा खुलला होता.

मनीषा भाजी घेऊन आत आली. आपण करुणा, सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वत:च्या लेकीला का नाही शिकवू शकत? कुठे कमी पडतेय मी? मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला. किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात ६५- ७०% हून पुढे ती जाऊ शकत नाही.

नेहाने बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली.

“आई, सुमनने मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं ” नेहा प्रामाणिक होती.

“सुमनने?” तिनं आश्चर्याने विचारले. सुमनने भराभर ती गणितं कशी करायची याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या. मनीषा थक्क झाली..

“सुमन, उद्यापासून थोडी उशीरा ये. नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस. नेहाबरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून. केरवारे वगैरेसाठी मी दुसरी बाई शोधेन! कळलं? ”.. मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खूष झाली. नेहाचा चेहरा सुद्धा उजळला..

दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला. सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत, मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं. नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती. अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत.

पुढची परीक्षा झाली. नेहाला गणितात ७९ मार्क पडलेले बघून मनीषा खूष झाली.

मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातले. दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या. दोघी छान अभ्यास करत होत्या. संध्याकाळी पळायला जात. सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे. मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर.. वाटतच होते.

वार्षिक परीक्षेला नेहा व सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते. कशीबशी ७०% मिळवणारी नेहा यावेळी ८६% मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती.

मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली. “ सुमन, तू नक्की काय केलस म्हणून नेहाला गणित यायला लागलं?”

सुमन म्हणाली, “वैनी, नक्की सांगता येणार नाही मला.. पण तुम्हा दोघांच्या धाकात ती घाबरून जात होती. कधी कधी “शी कसला बेकार प्रॅाब्लेम “ म्हणून आम्ही कठीण गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो. असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो. ” नेहा खुदकन हसली..

“नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं.. वैनी, राग मानू नका पण प्रसिध्द गणित शिक्षिका, गोल्ड मेडॅलिस्ट मनीषा बेडेकर आणि ISRO इंजिनीअर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर.. तिला ते झेपत नव्हतं. ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करावासा वाटू लागला.. “

“वैनी, माझे वडील पण म्युनिसिपालिटीच्या शाळेत गणित शिकवत. मी बाबांकडेच गणित शिकत असे. बाबा म्हणत, ” सुमन तू गणितात डिग्री मिळव.. तू खूप हूशार आहेस. ” ते अचानक गेले.. आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही. डोक्यावर परिणाम झाला म्हणून ती त्या दवाखान्यात आहे. त्या डॅाक्टरीण बाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला वैनी !

नेहा, मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचे बोलणे ऐकत होते. देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं, पण कुशाग्र बुध्दी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं.

“वैनी, सर तुम्हाला एक सांगू का? नेहाचे मराठी, इतिहास हे मार्क बघा. कायम हायेस्ट असते त्यात. तिला लिबरल आर्ट्समधे करिअर करायचं आहे.. त्या विषयात ती काही तरी उत्तम करेल बघा !” सुमन धैर्य एकवटून म्हणाली.

मनीषा व आमोद विचारात पडले…

आज बावीस वर्षांनी डॉ. नेहा बेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचे भाषण ऐकण्यासाठी मनीषा व आमोद सभागृहात पोचले होते.. हॅाल पूर्ण भरला होता. नेहाने पीएचडी संपताच अनेक पॅाडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता. तिचं नाव झालं होतं.. कार्यक्रमाचे संचालन करत होत्या ISRO इंजिनीअर, सुमन पवार ! सुमनने माईक हातात घेतला व नेहाची ओळख करून दिली !

नेहाने बोलायला सुरुवात केली.. विषय होता,

“When will you accept me as I am?”

आई वडीलांनी मुलांना, सुना जावई यांनी सासु सासऱ्यांना, लहानांनी वृध्दांना, वृद्धांनी तरूणांना आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारले तर केवढी नकारात्मक ऊर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती..

“कसं स्वीकारायचं असतं समोरचं माणूस जसं आहे तसं? अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता, टीका न करता, दोष न देता? कसा आदर दाखवायचा मतभेद असताना? माझ्या आई बाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचे? दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्सकडे जाणारी व गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती, पण तिला आर्ट्सला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं? घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसे मान्य केले? त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीने आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिला पण उत्तम शिक्षण कसे दिले…. “

नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती ! मनाचा मोठेपणा आणि ईर्षा, स्पर्धा यावर कसे काम करायचे सांगत होती.

… मनीषा व आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते ! सुमनचे ते शतश: आभार मानत होते ! सुमनला कसलं शिकवलं आपण? अत्यंत बुध्दीमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकली असती ! पण स्वतः चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो तो खरा वाटाड्या असतो !

सुमन व नेहा घरी आल्या. मनीषाने तिला मिळालेले गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला ISRO मध्ये मिळालेले मेडल नेहाच्या गळ्यात घातलं..

“ बाबा, Propulsion Module बद्दल मला तुमच्यासाठी काही बोलायचं आहे.. “ सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते..

आणि

“झोपडी ते ISRO” या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती !

आई बाबानी मुलींना त्या जशा आहेत तसे ॲक्सेप्ट केले होते.. त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या.

लेखिका : सुश्री  ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ मोबदला… भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(पॅरॅलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. नंतरही कधी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही. विचार करा…)  – इथून पुढे —

या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं?या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो. अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की ‘शिरीष किती बिल झालं?आम्ही काही मदत करु का तुला?’अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का?अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलंय मग त्यांची काही जबाबदारी नाही का?तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पध्दत?निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही. पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा”

शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती?आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषलाही ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला.

” तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना?जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा, गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खुप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा “

नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली

“तसं असू शकतं. पण मन मात्र मानत नाही हेच खरं “

रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता.

दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ होत होता. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसत होते. एकदा भावांकडे जाऊन जोरदार भांडणं करावं असंही त्याला वाटू लागायचं पण अण्णा गेल्यावर आणि त्यांनी केलेल्या मृत्युपत्रांनतर बोलण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाही हे त्याच्या लक्षात यायचं.

आठदहा दिवसांनी रविवारी सकाळी तो नाश्ता करत असतांना रणदिवे वकीलांचा फोन आला

” शिरीष घरी आहेस का?यायचं होतं जरा बोलायला”

“हो या ना. का हो काका काही विशेष काम?”त्याने धास्तावून विचारलं

“अरे काही नाही जरा बोलायचं होतं. मी आलो की सांगतो सर्व”

“या या मी घरीच आहे”

शिरीषच्या पोटात खड्डा पडला. निर्मल आणि गुणवंतने वकीलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना?दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होतं.

अर्ध्या तासातच वकीलसाहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं

” काका निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का?”त्याने वकीलांना विचारलं

” नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे”

त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीशचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं

” तुला माहितच असेल शिरीष की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत”

“हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खुप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता”

वकीलसाहेब हसले

“नाही. त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही”

“अच्छा!पण या सगळ्याचा आता काय संबंध?”

” तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली. तीन महिन्यांपुर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना सांगू नये आणि त्यांच्या मृत्युनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतील आणि नाही दिला तर कोर्टकचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भिती वाटत होती”

“पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर अण्णांनी शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितलं?”नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं

वकीलसाहेब क्षणभर शांत बसले. मग आनंदाने ओरडून म्हणाले

” अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत”

” काय?माझ्या नावावर?” आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं

“हो!पण शिरीष आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली. ती जवळजवळ अडिच कोटीच्या आसपास आहे”

“ओ माय गाॅड!अडिच कोटी!!”शिरीषचे डोळे विस्फारले. नेहाही आ वासून वकीलांकडे पहात राहिली.

“आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे” वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईल मधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले.

” ते ठिक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगल प्राॅब्लेम्स तर येणार नाहीत ना?अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?”शिरीषने काळजीने विचारलं.

“तशी शक्यता फार कमी आहे. कारण तीन महिन्यापुर्वीच आणि शेवटचं मृत्युपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते. आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपुर काही दिलं आहे. तरीसुध्दा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलेब्रेट. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली”

“कोणती?”

” अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राध्दाला व्रुध्दाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस”

” जरुर देईन काका”

वकीलसाहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येतायेता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला

” तू म्हणत होतीस ना नेहा की आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून?बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही” हे म्हणता म्हणता त्याच्या आणि नेहाच्या डोळ्यातून कधी अश्रू वाहू लागले हे दोघांनाही कळलं नाही.

— समाप्त —

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ मोबदला… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, ” डाॅक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…” 

पुढे त्याला काही बोलता येईना.) – इथून पुढे 

डाॅक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करुन गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला-निर्मलला फोन लावला.

” दादा अण्णा गेले”

“काय?असे कसे गेले?मागच्या आठवड्यात तर चांगले होते. मग अचानक असं कसं झालं?तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”

” अरे सकाळपर्यंत चांगले होते. माझ्या हातून पाणी प्यायले. नंतर अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये मग सांगेन तुला सविस्तर”

“अरे बापरे, शिरीष, आम्हांला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार “

तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला

” शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये. तिचे पैसे आता कोण देणार?”

शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्याने फोन बंद करुन मधला भाऊ-गुणवंतला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली

“अरे बापरे. मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”

“अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो”

” बरं. मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची सगळी तयारी झाली की मला कळव. मग मी येतो “

शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली. पण बोलण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.

निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. जणू अण्णा त्याचे कुणी लागत नव्हते. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला

“अरे मी दोन तासापुर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली सगळी तयारी?बरं आलोच”

सगळेजण त्याची वाट पहात बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.

तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता. तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला.

चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने विषय काढला

“अरे शिरीष अण्णांनी काही मृत्युपत्र करुन ठेवलं होतं का?नाही म्हणजे आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटेहिस्से नको का व्हायला?” हा विषय निघणार याची कल्पना शिरीषला होतीच पण तो इतक्या लवकर काढल्या जाईल अशी मात्र त्याला अपेक्षा नव्हती.

” दादा मला तरी मृत्युपत्राबद्दल काही माहीत नाही. आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली मेडिकल एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही “

“असं कसं म्हणता भाऊजी?त्यांची काही फिक्स्ड डिपाॅझिट्स असतील किंवा एखादा प्लाॅट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?”शोभा वहिनी मध्येच बोलली

“हो शिरीष” गुणवंत म्हणाला” मरण्यापुर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे. म्हणजे पुढे आपल्यात वादविवाद नकोत “

” रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं ” शिरीष आठवून म्हणाला

” अरे मग वाट कसली बघतोस?लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला

” ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे”

दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले.

वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.

” मृत्युपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही” वकीलसाहेबांनी मृत्युपत्र काढून वाचायला सुरुवात केली ” निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये रहातोय म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तीची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे”

” याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत ” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.

वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं. मग म्हणाले ” अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर”

निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.

“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं, भानगडी उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा” वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.

” बस एवढंच होतं मृत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.

“पण वकीलसाहेब अजून काही प्राॅपर्टी नव्हती का अण्णांकडे?”गुणवंतने विचारलं

” ते मला कसं माहित असणार?तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब म्हणाले.

वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायकांसह निघून गेले.

ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला

“चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटेहिश्शांच्या भानगडीही मिटल्या “

” ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खुपच कमी दिलंय?”

” त्यामानाने म्हणजे?”

” म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खुपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय”

शिरीष हसला

“नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही”

“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या तुलनेत आपल्याला कमी दिलंय असं मला म्हणायचं होतं. विचार करा. तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं? 

त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरॅलिसीस झाला. पॅरॅलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. नंतरही कधी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही. विचार करा…..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ मोबदला… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली

” अहो जरा अण्णांना बघता का?खुप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत “

“हो. फ्रेश झालो की लगेच बघतो “

बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं

” काय झालं अण्णा?काय होतंय?”स्वतःलाच धीर देत त्याने विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला

“काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा”

“म…. ला….. दे…… वा…… क….. डे…… जा…. य… चं…. य” परत हात वर करुन ते अस्पष्ट आवाजात म्हणाले शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला

“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा. त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”

अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले.

“बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं?”

त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं

“डाॅक्टरला बोलावू?”

त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.

“बरं बरं. मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”

अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला

“काय झालं?काय होतंय त्यांना?”नेहानं काळजीनं विचारलं

” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत. कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच ” उदास होत शिरीष म्हणाला.

शिरीष योग्यच म्हणतोय हे 

नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्ष अण्णा पॅरॅलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल, गुणवंत आणि त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिनं मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या शिरजोरपणाला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसतांनाही त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं. नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून देत नव्हतं. त्या औषधांचा खर्च कुणी करायचा यावरुन दोघा भावांची आणि जावांची भांडणं व्हायची. शेवटी अण्णांकडूनच पैसे घेतले जायचे. आपण आपल्याच घरात निराधार झालोय या जाणीवेने अण्णा मानसिकरीत्या खचत गेले. त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांचा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढून त्यांना पॅरॅलिसीसचा अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्या तरी घेऊन किती घेणार? केअरटेकर ठेवला तरी त्याचे पैसे द्यायची एकाही भावांची तयारी नव्हती. घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी “अण्णांची ही ब्याद आता शिरीषनेच सांभाळावी. अशीही त्याची बायको रिकामटेकडीच असते “या विचारावर संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं. शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा एक जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.

झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला

” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत ” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला

” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला”

अण्णांनी मान डोलावली.

रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.

सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते.

“कसं वाटतंय?”त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.

“अण्णा मी येतो अंघोळ करुन. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन”

अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं.

शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली

“अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही”

शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला

“डाॅक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…. ” पुढे त्याला काही बोलता येईना.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ४९८–अ… – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ४९८ – अ… – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

(आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ” आता आमची उत्सुकता वाढली होती.) – इथून पुढे 

‘‘मग सोमवारी काय झालं?”

सोमवारी आम्ही आधी पोचलो – नंतर थोड्या वेळाने सरिता आणि सीताराम आले. मला सरिता शांतशी, गप्प गप्प व बदललेली वाटली. तिने आमच्याकडे मान वर करून पाहिले देखील नाही. केंद्राच्या इनचार्ज मॅडमनी सरिताला विचारले, ‘तू तुझ्या घरी का जाऊ इच्छित नाहीस?’ सरिता तरीदेखील काही न बोलता खाली मान घालून उभी होती. मला रहावलं नाही. मी म्हणालो, ‘आमच्या प्रेमात कुठे कमतरता होती का?’ सरिता तरीही गप्प होती. आता तिचे डोळे पाण्याने भरले होते. केंद्रप्रमुख म्हणाल्या, ‘सरिता, काही तरी बोल. तू काहीच बोलली नाहीस, तर आम्ही निर्णय कसा घेणार?’ आता सीतारामजी मधेच म्हणाले, ‘बोल सरिता बोल!’ आता माझा माथा ठणकला. काही तरी अनिष्ट होईल असं वाटू लागलं. सरिताने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि नजर पुन्हा जमिनीकडे वळवली. केंद्रप्रमुख समजदार होत्या. वास्तव काय असेल, याचा त्यांना अंदाज आला. आता त्यांनी आपल्या पध्दतीने चौकशीस सुरूवात केली. त्यांनी अतिशय प्रेमाने सरिताला विचारले आणि प्रत्येक वेळी सरिता होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवत राहिली. प्रमुखांनी प्रेमाने विचारलं, ‘तुला सासरी कुणी कधी रागावलं?’ तिने ‘नाही’ अशा अर्थाने मान हलवली. ‘तुझे पती, सासू, सासरे यांना तू आवडतेस ना?’ तिने होकारार्थी मान हलवली. आता सीताराम मधेच जरबेच्या सुरात म्हणाले, ‘बोल सरिता बोल…’

केंद्रप्रमुख त्यांना टोकत म्हणाल्या, ‘आपण मधे बोलू नका. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल, तेव्हाच बोला. ’ सीताराम सरिताकडे टवकारून बघू लागले. प्रमुख म्हणाल्या, ‘हे बघ, सरिता, जोपर्यंत तू काही बोलत नाहीस, तोपर्यंत आम्ही तुझी काहीच मदत करू शकणार नाही. ’ मग त्यांनी मला विचारलं, ‘तुमची काय इच्छा आहे?’

मी म्हंटलं, ‘आमचं निवेदन आहे की सरिताने आपल्या घरी रहायला यावं. बाकी आम्हाला काही नको. ’

त्यांनी पुन्हा सरिताकडे बघत म्हंटलं, ‘तुझं यावर काय म्हणणं आहे?’ सरिता पुन्हा गप्प झाली. मग त्या म्हणाल्या, ‘सरिता तुला विचार करायला आणखी थोडा वेळ हवाय का?’ तिने काहीच उत्तर दिले नाही. प्रमुखांनी तिथल्या अन्य सदस्यांशी चर्चा केली आणि तिला सांगितलं, ‘ठीक आहे. तुला विचार करायला आणखी एक दिवस देते. उद्या याच वेळी इथे या.’

सीताराम लगेच उभे राहिले. त्यांनी हात जोडले आणि सरिताचा हात धरून बाहेर पडले. सरिताने एकदाही आमच्या नजरेला नजर मिळवली नाही. प्रमुख म्हणाल्या, ‘रामजी, सरितावर बहुतेक दडपण आणलं जातय. तुम्ही आम्हाला आधी भेटला नसतात, तर कदाचित या केसने भलतंच वळण घेतलं असतं. आपण पुन्हा उद्या या. ’

‘याचा अर्थ सीतारामजींची काही वेगळीच इच्छा होती. ’

‘आपलं अनुमान अगदी बरोबर आहे. त्या दिवशी मी भरत बरोबर जयाला तिच्या माहेरी पाठवलं. तिच्या वातावरणात जरा बदल होईल, असा विचार तेव्हा केला. दुस-या दिवशी केंद्रावर यायला त्यांना बजावून सांगितलं. नंतर घरी आलो. रात्रीचं जेवण केलं आणि झोपलो. एवढ्यात दारावरची बेल वाजली. ‘आत्ता यावेळी कोण आलंय!’ असा विचार करत मी उठलो. दारात इन्स्पेक्टर बन्सीलाल होता. कन्हैयालालचा मुलगा. मला वाटलं की कन्हैयानेच त्याला पाठवलंय. पण तो म्हणाला, ‘काका, सरिताने आपल्याविरुध्द हुंड्यासाठी छळ केला, म्हणून अर्ज दाखल केला आहे. आपल्या वडलांना घेऊन ती आली होती. ’

‘अरे, काय बोलतोयस काय?’

‘खरं तेच बोलतोय. मला आपल्याला, भरतला आणि जयाकाकींना ४९८ अ या कलमाखाली अटक करावी लागेल. ’

मी त्याला भरत आणि जया घरात नसल्याचं सांगितलं. आता माझी शुध्द बुध्द हरपली. मी गर्भगळित झालो. पण स्वत:ला सावरत त्याला म्हंटलं, ‘चल, मी तुझ्याबरोबर येतो. पण मला बेड्या तेवढ्या घालू नको. ’ एव्हाना ही बातमी सगळ्या गावभर झाली होती. ”

रामजींचा चेहरा रागाने लालीलाल झाला होता. ते पुढे म्हणाले, ‘‘काय आहे साहेब, वाईट बातम्या पसरायला वेळ लागत नाही. मी गुपचुप बन्सीलाल बरोबर पोलीस ठाण्यात गेलो. त्याने आश्वस्त केलं. म्हणाला, ‘काका, मला खरं काय ते माहीत आहे. पण माझा नाईलाज आहे. पण आपण काळजी करू नका. आपल्याला कुणीही हात लावणार नाही. ’

त्या दिवशी रात्रभर ठाण्यात राहिलो. आजसुध्दा तो विचार आला की माझ्या शरिरावरचे केस ताठ उभे राहतात. ”

‘‘मग काय झालं? आपण कसे सुटलात?’’

‘‘साहेब, दुस-या दिवशी हरीभाई वकिलांनी धावपळ केली. परिवार केंद्राचा रिपोर्ट आणि एस्. पी. मॅडम सुधा गुप्ता यांच्या मेहेरबानीने आम्हाला जामीन मिळाला. कुटुंब कल्याण केंद्राच्या प्रमुखांनी माझी माहिती आणि आपला रिपोर्ट एस्. पी. मॅडमना दिला. मॅडमनी आमच्या केसच्या पैलूचा सखोल अभ्यास केला.

दुस-या दिवशी त्यांनी मला, भरतला, सीतारामना आणि सरिताला ठाण्यात बोलावलं. बरोबर केंद्राच्या प्रमुख मॅडमही होत्या. एस्. पी. मॅडम अतिशय कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या होत्या. माझा देवीआईवर पूर्ण विश्वास होता. मी जर काहीच चूक केली नाही, तर ती मला साथ देईलच, याची मला खात्री होती.

एस्. पी. मॅडमनी सगळ्यांचे चेहरे एकदा नीट पाहून घेतले, जसं काही एकेक चेहरा वाचते आहे. मग त्या कडक आवाजात म्हणाल्या,

‘मी ज्यांना विचारीन त्यानेच उत्तर द्यायचे आहे. मधे कुणीही बोलायचं नाही. ’

प्रथम त्यांनी मला विचारलं की ‘माझी काय इच्छा आहे?’ मी हात जोडून म्हंटलं, ‘मी माझ्या मुलीपेक्षा सरितावर जास्त प्रेम केलं. सामुदायिक विवाहात स्वेच्छेने तिचा विवाह करून तिला घरी घेऊन आलो, तेही कुठल्याही प्रकारचा हुंडा न घेता. परंतु आता तिने मला लावलेल्या या कलंकानंतर ती मुलगी माझ्या घरात नको. ’

मग त्यांनी भरतला विचारले. तोही म्हणाला की, तो अशा मुलीबरोबर राहू शकणार नाही.

सरिता आमच्या नजरेला नजर भिडवू शकली नाही. मॅडम सरिताला म्हणाल्या, ‘मुली, तुला त्या घरात प्रेम, सुख, शांती मिळत होती, तर तू त्यांच्यावर हुंड्याबद्दल आरोप का केलास? तुमच्याकडून हुंडा घ्यायचाच असता, तर या लोकांनी सामुदायिक विवाहात, तुमचा विवाह करून तुला घरी का आणलं असतं. तुझ्याकडे काही पुरावा आहे का की त्यांनी तुला हुंडा मागितला? किंवा तुझ्या शरिरावर काही मारल्या-डागल्याच्या खुणा आहेत का?’ आता सरिता घाबरली. आपल्या वडलांकडे बघून रडू लागली. एस्. पी. मॅडमच्या सगळं लक्षात आलं. त्या पुढे म्हणाल्या, ‘वडलांकडे बघण्याची गरज नाही. संसार तुला करायचाय. वडलांना नाही. आता तू फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा शब्दात उत्तर दे. तुझ्यावर कुणी अन्याय, जुलूम केलाय?’ आता ती घाबरली. ‘नाही’ तिने उत्तर दिले.

‘तू परत जाऊ इच्छितेस?’ ती पुन्हा गप्प बसली. मॅडम पुन्हा म्हणाल्या, ‘हो की नाही. ’ ती रडत रडत म्हणाली, ‘हो. ’ मॅडमने भरतला विचारलं, ‘तुझी काय इच्छा आहे?’ भरत म्हणाला, ‘मॅडम, जी आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात पाठवू इच्छिते, तिच्याबद्दल आता आम्हाला कोणताही विश्वास वाटत नाही. तिने आमच्याकडून फार तर आणखी पैसे घ्यावे, पण मी आता तिच्याबरोबर राहू शकणार नाही. ’

मॅडम सरिताला कडक आवाजात म्हणाल्या, ‘सरिता हे लोक तुला ठेवून घ्यायला तयार नाहीत. तू चार-पाच लाखांचे दागिने आणि भारी किमतीच्या साड्या आपल्या बरोबर घेऊन गेलीच आहेस. तुला यांच्याकडून आणखी किती पैसे हवेत? दीड लाख दोन लाख- अडीच लाख?.. ’ तिने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि फारसा विचार न करता म्हणाली, ‘दोन लाख’.

आता एस्. पी. मॅडमपासून काही लपून राहिलं नाही. त्यांनी सीतारामकडे पाहिलं. तो बेशरम, निलाजरा मॅडमकडे बघत बसून राहिला. तोंड उघडण्याची त्याची हिंमत झाली नाही. आता मॅडमनी सरिताला शेवटचं विचारलं, ‘दोन लाख… ठीक आहे?’

मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हंटलं, ‘मी अडीच लाख रुपये द्यायला तयार आहे, पण ही केस इथेच संपवा. ’ 

एस्. पी. मॅडमनी लगेच कारवाई केली आणि एक तडजोडीचा अर्ज तयार केला. त्यावर भरत आणि सरिताच्या सह्या घेतल्या. सरिताच्या बाजूने साक्षीदार म्हणून सीतारामची व भरतच्या बाजूने साक्षीदार म्हणून माझी सही घेतली. नंतर त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, ‘‘आपल्याला जामीन मिळालेलाच आहे. यापुढील कार्यवाही कोर्ट करेल. जरूर पडल्यास मी स्वत: साक्ष द्यायला येईन. लक्षात ठेवा, ही तडजोड माझ्यासमोर दोन्हीकडच्यांनी पूर्ण स्वेच्छेने स्वीकारली आहे. ’

‘‘मग घटस्फोट झाला?”

‘‘होय साहेब! चार-पाच वेळा सुनावणी झाली आणि घटस्फोट झाला. त्या एस्. पी. मॅडमचं भलं होवो. सत्य परिस्थिती त्यांच्या लगेच लक्षात आली. देवीआईनेच त्यांना पाठवलेलं असणार. नाही तर आमचं जगणंच मुश्कील झालं असतं. त्यावेळी लक्षात आलं, की समाजसेवा म्हंटलं की लोक हात आखडता का घेतात?”

‘‘अच्छा!’ राजेशने मग दीर्घ श्वास घेतला. त्याची उस्तुकता पुन्हा वाढली. त्याने विचारले, ‘‘मग आपल्या मुलाचे पुन्हा लग्न झाले का? आणि सरिताचे काय झाले?”

‘‘साहेब, आपल्या आपल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. माझ्या हातून कळत-नकळत काही चुकीचं काम झालं असेल, ज्यामुळे मला हे सगळं भोगावं लागलं, ज्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, तेही आता आमच्याकडे साशंकतेने बघू लागले. भरतसाठी बराच काळ मागण्या आल्या नाहीत. चार वर्षापूर्वी आमच्या जावयांच्या दूरच्या नात्यातून एक मागणी आली. आम्ही त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवले नाही. मग दोन्ही कडचे लोक तयार झाल्यावर भरतचे लग्न झाले. त्यानंतर दोन वर्षांनी लखनचेही लग्न झाले. आता देवीआईच्या कृपेने आमचा सगळा परिवार सुखात, आनंदात नांदतोय. ”

‘‘आणि सरिताचं काय झालं?”

‘‘साहेब, खरं सांगू, मला या सगळ्यात सरिताचा फारसा दोष वाटला नाही. तिला तिच्या वडलांनी आणि आसपासच्या लोकांनी भडकावलेलं असणार. काही जण नंतर आम्हाला म्हणाले की आम्हाला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. पुढे कळलं, गाव आणि समाजातील लोकांनी खूप दिवसपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आजपर्यंत सरिता, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांची अद्याप लग्ने झाली नाहीत. ”

‘‘ओह!” राजेशच्या तोंडून सहजच बाहेर पडलं. त्याला थोडीशी सरिताबद्दल सहानुभूतीही वाटली, पण तिथे त्या क्षणी ती प्रगट करणं अप्रस्तुत झालं असतं.

रामजी खिडकीबाहेर बघत म्हणाले, ‘‘बहुतेक भोपाळ आलेलं दिसतय. ”

मीही बाहेर बघीतलं. जंगल, शेतं, नद्या, ओहोळ मागे टाकत ट्रेन भोपाळ शहरात प्रवेश करत होती.

बघता बघता भोपाळ स्टेशन आलं. त्यांचे उरलेले सहयात्री इथे चढले. गाडी मथुरेच्या दिशेने पुढे निघाली. लोकांनी आपापल्या बर्थवर आंथरूण पसरले आणि ते झोपून गेले. राजेशच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता.

बाहेर एकामागून एक छोटी स्टेशन्स मागे पडत होती. राजेशच्या डोक्यातून मात्र विचारांचा नुसता गुंता झाला होता. हुंडा विरोधी कायदा, कलम ४९८-अ विवाहितेने आणि तिच्या माहेरच्यांनी ‘हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार केली, तर तिचा पती, आई-वडील, भाऊ-बहिण, घरातली जवळची नातेवाईक मंडळी यांना बिनाचौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार’ या कायद्याने पोलिसांना दिला होता. हे बरोबर आहे का? चौकशीच झाली नाही, तर कोण निर्दोष आहे, हे कसं कळणार?

रात्रीचे दीड वाजून गेले, तेव्हा कुठे राजेशला झोप लागली. सगळी यात्रा संपेपर्यंत रामजी आणि जया त्यांच्याबरोबरच होते. या दीर्घ सहवासात हे दोन्ही परिवार मनाने जवळ आले. आत्मीय झाले. जया सरोजला नणंद मानू लागली तर रामजींनी तिला आपली बडी दीदीच करून टाकलं.

इटारसी स्टेशन जवळ आलं. जयाने सरोजला हळद-कुंकू लावून तिला चरणस्पर्श केला. रामजींनी आणि राजेशने गळामिठी मारली. ते उतरताना सगळ्यांनाच भरून आलं.

– समाप्त –

मूळ हिंदी कथा – ४९८ -अ

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ४९८–अ… – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ४९८ – अ… – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

 (‘‘साहेब, आपण अगदी खरं बोलताय. जावयाच्या बाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत. पण साहेब, हे सुख पदरात टाकण्यासाठी देवीआईने आमची अगदी कठोर परीक्षा घेतली होती. ”) – इथून पुढे — 

राजेश काहीसा चमकला. रामजी हे काय बोलताहेत?

सरोजदेखील रामजींकडे उत्सुकतेने बघू लागली. रामजी थोडा वेळ गप्प बसले. जसा काही विचार करत होते की आपली व्यथा, दु:ख बोलावं की न बोलावं? त्यांच्या चेहे-यावरचे भाव भराभरा बदलू लागले. ते बघता बघता राजेश पुन्हा म्हणाला, ‘‘अखेर, देवीआईने आपली कोणती परीक्षा घेतली?”

रामजीची पत्नी जया हिला आपल्या पतीचं बोलणं मुळीच पसंत नव्हतं. तिला वाटायचं, आपलं दु:ख आपल्यापाशी आपल्यापुरतं. ते जाहीर कशाला करायचं? पण रामजींचं मत मात्र वेगळं होतं. त्यांना वाटायचं, ‘दु:ख वाटल्याने कमी होतं आणि सुख वाटल्याने वाढतं. ’ राजेशने पुन्हा एकदा विषय उकरून काढायचा प्रयत्न केला. ‘‘काय झालं रामजी? आपण कोणत्या विचारात पडलात?”

रामजींनी एक दिर्घ श्वास घेतला. आपले डोळे बंद केले. देवाला हात जोडले. आणि आपला माथा झुकवून त्याला नमस्कार करत, आपल्या विनम्र शैलीत बोलायला सुरूवात केली. ‘‘देवीआईची कृपा आहे. आणि तिचं बोलावणं आलं म्हणून आम्ही आपल्या सोबत यात्रेला निघालो. एरवी, आमचं आयुष्य बरबादच होत होतं. तसंही सध्या भलेपणाचे दिवस राहिले नाहीत. ”

रामजी काही वेळ स्तब्ध राहिले आणि नंतर सुरूवातीपासूनच सगळं सांगू लागले.

‘‘राजेश साहेब, मला तीन मुले. मोठी मुलगी सविता. आणि तिच्या पाठीवरची दोन मुले, भरत आणि लखन. मुलीचा विवाह तसा लवकरच झाला. आमचे जावई सुरेश किती चांगले आहेत, हे आपण बघीतलंच. त्यांचा बु-हाणपूरला मोठा व्यापार आहे. मी स्वत: अतिशय धार्मिक स्वभावाचा, श्रध्दाळू आणि देवीआईचा भक्त आहे. देवीच्या कृपेने माझ्याकडे सगळे आहे. एक मोठं दुकान आहे. गोदाम आहे. शेत आहे. एक ऍम्बॅसेडर गाडी आहे. माझा किराणा मालाचा ठोक व्यवसाय आहे. आसपासच्या छोट्या गावातील दुकानदारांना किरकोळ भावाने माल सप्लाय करतो. गेल्याच वर्षी सिमेंटची एजन्सी घेतली. तेही काम चांगलं चाललय. ”

आता रामजी थोडा वेळ थांबले. दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेमधून पाण्याची बाटली उचलून पाणी पिऊ लागले. बोगीत आता पहिल्यापेक्षा शांतता होती. आसपासच्या बर्थवरील लोक झोपू लागले होते. ट्रेनने नर्मदा नदी पार केली होती. बाहेर चांगलाच काळोख झाला होता. रामजींनी पाण्याची बाटली ट्रेमध्ये ठेवली आणि आपलं बोलणं पुढे चालू केलं.

‘‘सगळं काही ठाक-ठीक चालू होतं, पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. काम-व्यापार करता करता समाजसेवा करण्याचं व्यसन मला जडलं. त्या कामामुळे समाजातली माझी प्रतिष्ठा वाढली. काही मोठे लोक, राजकारणी पुढारीसुध्दा मला ओळखू लागले होते. मनात इच्छा होती, समाजातील गरीब, तळा-गाळातील लोकांसाठी काही करावं, त्यामुळे मान-सन्मान वाढेलच, पण मनाला शांतीही मिळेल. पण या समाजसेवेनेच मला बरबाद केलं. ”

‘‘समाजसेवा तर पुण्याचं काम आहे. ”

‘‘बस्स! काही पुण्य कमवावं, गरीबांना काही मदत व्हावी, म्हणून एक दिवस आवेशात येऊन सामूहिक विवाहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मनापासून कौतुक केलं. मोठ्या लोकांनी सर्व त-हेच्या मदतीचं आश्वासन दिलं. काहींनी ते निभावलं पण बहुतेक जण पैसे देऊन मोकळे झाले. हिंडून-फिरून सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी केवळ माझ्यावर येऊन पडली. देवीआईच्या कृपेने सगळं व्यवस्थित पार पडलं. पण तेव्हा लक्षात आलं नाही, की त्यावेळी माझी बुध्दीच भ्रष्ट झाली होती. विवाहापूर्वी वधु-वर मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मला काय सुचलं, कुणास ठाऊक? जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय मी कोणताच विचार न करता घेतला. ”

आता रामजी पुन्हा थोडा वेळ गप्प बसले. आणि खिडकीबाहेर बघू लागले. रामजींची पत्नी जया गुपचुप आपल्या पतीचं बोलणं ऐकत होती. आता सरोजलाही रामजींच्या कथेत रस वाटू लागला होता. रामजींना खिडकीबाहेर दूरवर नजर टाकताना बघून, बोलणे पुढे वाढवावे, या दृष्टीने राजेशने म्हंटले, ‘‘आपण केलेली समाजसेवा, म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे. सामूदायिक विवाहाचा निर्णय खरोखरच मोठे पुण्याचे काम आहे. यात कसली आलीय चूक?”

‘‘काय आहे, समाजातील प्रतिष्ठित लोक आपल्या मुलांचा विवाह सामूदायिक विवाह सोहळ्यात करत नाहीत. मला वाटलं, माझ्या मुलाचा विवाह मी असा सामूदायिक विवाह सोहळ्यात केला, तर लोकांना, समाजाला ते उत्तम उदाहरण घालून दिल्यासारखं होईल. त्याच भावनेच्या आवेशात मी वधू-वर मेळाव्यात सरिता नावाच्या मुलीला माझ्या भरतसाठी पसंत केलं. पत्नी, मुलगी, जावई, मुले सगळ्यांशीच बोलून मग त्यांच्यासह सरितेच्या घरच्यांशी बोलणी केली. त्यांनी तत्काळ संमती दिली. बोला-चालायला, व्यवहाराला माणसं बरी वाटली. मग मी जास्त काही जाणून न घेता, सार्वजनिक मंचावरून भरत आणि सरिता यांच्या विवाहाचा निर्णय जाहीर केला. एक पैसाही हुंडा न घेता, हा विवाह होईल, असेही तेव्हा सांगितले. अनेकांनी टाळ्या वाजवून माझ्या या निर्णयाचे स्वागत केले. स्तुती केली. नाही म्हणायला, माझा अगदी लहानपणापासूनचा दोस्त मला म्हणाला, ‘तू जरा घाईच करतो आहेस, असं नाही तुला वाटत? हा भरतच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. ’ परंतु माझा निर्णय घेऊन झाला होता.”

‘‘मग? तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह केलात?”

‘‘होय राजेश साहेब. तुम्ही विश्वास ठेवा. देवीआईच्या कृपेने अजूनही मुले माझ्यापुढे तोंड उघडत नाहीत. मोठं हसत-खेळत इतर सामुदायिक जोड्यांबरोबर भरत आणि सरिताचंही लग्न झालं. समाजात आमची प्रतिष्ठा वाढली. घरातील सगळ्यांनी सरिताला मुलीचीच माया दिली. सरिताने देखील, सगळ्यांचीच मने जिंकून घेतली. ‘माँजी-माँजी’ म्हणत ती सतत जयाच्या मागे असायची. मी कामावरून आलो, की ‘बाबूजी-बाबूजी’ म्हणत मागे यायची. माझा नाश्ता, जेवण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायची. भरतच्या चेह-यावरसुध्दा एक प्रकारचं तेज आलं होतं. एका नव्या-नवेल्या सुनेकडून आमची तरी यापेक्षा काय जास्त अपेक्षा असणार? मला वाटलं, माझा निर्णय अगदी शंभर टक्के बरोबर आहे. पण दैवाला मात्र काही वेगळंच मंजूर होतं. ”

राजेशला आश्चर्य वाटलं. ‘‘मग काय झालं?”

‘‘राजेश साहेब, इथूनच आमचे वाईट दिवस सुरु झाले. तीन-चार महिने गेले असतील, एक दिवस सरिताचे वडील सीताराम घरी आले. हात जोडून अतिशय विनम्रतेने म्हणाले, ‘मुलीची खूप आठवण येतेय. काही दिवस पाठवलंत तर मोठी मेहेरबानी होईल. ’ मी त्यांना म्हंटलं, ‘सरिताचा तो हक्कच आहे. मीदेखील मुलीचा बाप आहे. ’ खरं म्हणजे सरिता आमच्या घरात इतकी रमून गेली होती की तिने एकही दिवस माहेरची आठवण काढली नव्हती. मी सीतारामना म्हंटलं, ‘सरिता प्रथमच माहेरी चाललीय. भरत तुम्हाला पोचवायला येईल. ’ सीतारामनी मान हलवली आणि आपल्या मुलीशी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मला त्यात काहीच अडचण वाटली नाही. आम्ही सरिता आणि सीताराम यांना बैठकीच्या खोलीतच एकांतात बोलण्याची संधी दिली. त्यानंतर भोजन करून त्यांना निरोप दिला. ”

राजेश सहजपणे म्हणून गेला, ‘‘इथपर्यंत सगळं ठीक वाटतंय. ’

‘‘इथपर्यंत सगळं ठीकच होतं राजेश साहेब! सरिताला निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा सगळं घर उदास झालं. सरिताच्या चेह-यावर मात्र माहेरी जात असल्याची खुषी होती. आम्हाला वाटत होतं, सरिता नाही, जशी काही आमची मुलगीच काही दिवसांसाठी जात आहे. तिच्या बरोबर देण्यासाठी अनेक खाण्या-पिण्याचे जिन्नस पॅक केले. ”

यावेळी प्रथमच जया सरोजकडे बघत म्हणाली, ‘‘ताई, खरोखरच काजू, बदाम, आक्रोड, बेदाणे आणि सरिताला आवडणारी मिठाई मी सगळं माझ्या हाताने बांधून दिलं. ”

बहुधा रामजींना जयाचं हे मधे बोलणं योग्य वाटलं नाही. त्यांनी नजरेने इशारा केला आणि जया गप्प बसली.

सरिताने बॅग भरताना मोठ्या प्रेमाने जयाला विचारलं, ‘‘माँजी मी या साड्या नेऊ? हे दागिने घेऊन जाऊ?” असं म्हणत जवळ जवळ सगळेच दागिने बॅगेत भरले. ते चार-पाच लाखांचे सहज असतील. त्याच प्रमाणे सगळ्या किमती, महाग-मोलाच्या साड्या ठेवल्या. मी भरतला माझ्या ऍम्बॅसेडर गाडीत त्यांचे सगळे सामान ठेवायला सांगितले आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. मला त्यावेळी काय माहीत होतं की ती सरिताची शेवटची पाठवणी असेल. ”

‘‘शेवटचा निरोप?”

‘‘नाही. आपल्याला वाटतय, तसं काही नाही. असं झालं की सरिता माहेरी गेली, त्याला तीन महिने झाले, पण ती काही परत येण्याचे नाव घेईना. मी सीतारामांना निरोप पाठवला की त्यांनी सरिताला आता परत पाठवावे. त्यांचा निरोप आला की तिला आणखी काही दिवस माहेरी राहू दे. मी विचार केला, ठीक आहे. सगळ्यांनाच तसं वाटतय, तर तसं होऊ दे. होता होता सहा महिने झाले. दोन वेळा भरत आणायला गेला, तर त्यालाही असंच सांगून परत पाठवलं. असं करता करता नऊ-दहा महिने होऊन गेले. आता मला वाटलं, मी स्वत:च जायला हवं. मग मी आणि भरत दोघेही सरिताला आणायला गेलो. मी प्रथमच त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं एकूण घर, रहाणी पाहून मला माझा मित्र कन्हैयालालचं बोलणं आठवलं. मग पुन्हा मनात आलं, सरिताच्या माहेरचं घर, रहाणी याच्याशी आपला काय संबंध? आपला संबंध फक्त सरिताशी. ती खूश, तर आम्ही खूश. सीतारामांनी आमचं आदरातिथ्य केलं. सरितादेखील चहा-नाश्ता घेऊन आली. आम्हाला नमस्कार केला. पण तिला बरोबर चलण्याविषयी बोललो, तेव्हा सीताराम गप्प बसले. त्यांनी सरिताकडे पाहिले. सरिता मान खाली घालून म्हणाली, ‘बाबूजी मी नंतर येते. ’ आणि ती आत निघून गेली. सीतारामही दोन्ही हात जोडून म्हणाले, ‘रामजी आपण काळजी करू नका. आम्ही तिला पाठवतो. ’ मी म्हंटलं, ‘सीतारामजी दहा महिने होत आले. ’ ते पुन्हा हात जोडून म्हणाले, ‘रामजी आम्ही पाठवतो म्हंटलं नं!’ मी भरतकडे पाहिले, तो उदास झाला होता.

आपलं बोलणं पुढे चालू ठेवत रामजी म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या कारमध्ये बसून घरी आलो. मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी कन्हैयालालकडे गेलो. त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, ‘तरी मी तुला सांगत होतो, इतकी घाई करू नको. असो. जे झालं ते झालं. आता आपण याबाबतीत हरीभाईंचा सल्ला घेऊ या. ’ हरीभाई आमचे लहानपासूनचे मित्र. ते सध्या वकिली करतात. हरिभाईंचा सल्ला घेऊन मी घरी आलो आणि त्यांनी सुचवलेल्या योजनेसंबंधी जया आणि भरतशी चर्चा करू लागलो.

भरत केवळ हो ला हो करत होता. गेले कित्येक दिवस तो गप्प गप्पसाच होता. आणि ते स्वाभाविकही होतं. त्याचं खाणं-पिणं कमी झालं होतं. मन लावून कामही करू शकत नव्हता. ”

नंतर मी, जया, भरत आणि कन्हैयालाल पोलीस ठाण्याला लागून असलेल्या कुटुंब कल्याण केंद्रात पोचलो. हरिभाईंकडून आधी अर्ज लिहून घेतलेला होताच. आम्ही जेव्हा कुटुंब कल्याण केंद्राच्या इनचार्जला सगळी हकिकत सांगितली, तेव्हा त्यांना प्रथम खूप आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, ‘मुलाकडच्यांनी, मुलगी नांदायला येत नाही, अशा प्रकारची तक्रार करणारी, तुमची पहिलीच केस आमच्याकडे आली आहे. ’

मी त्यांच्यासमोर भरत-सरिताच्या विवाहा संबंधीची सगळी कागदपत्रं ठेवली. योगायोगाने माझ्याजवळ त्या वेळच्या वर्तमानपत्रातून सामूदायिक विवाहासंबंधी आलेल्या बातम्यांची कात्रणेही होती. त्याच्या झेरॉक्स प्रतीदेखील मी अर्जासोबत जोडल्या. माझा अर्ज आणि अन्य कागदपत्रे पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘आपली काय इच्छा आहे?’ मी म्हंटलं, ‘सरिता आपल्या घरी पुन्हा नांदायला यावी, एवढीच इच्छा आहे. ’

इनचार्ज मॅडमनी केंद्रातील अन्य लोकांशी चर्चा केली. मग त्या म्हणाल्या, ‘पुढच्या सोमवारी मुलीकडच्यांना केंद्रात उपस्थित रहाण्यासाठी आम्ही नोटीस पाठवतो. आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ”

आता आमची उत्सुकता वाढली होती.

– क्रमशः भाग पहिला 

☆☆☆☆☆

मूळ हिंदी कथा – ४९८ -अ

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ४९८–अ… – भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ४९८ – अ… – भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

उत्तर भारतातील काही धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी, या विचाराने राजेश आणि त्याची पत्नी सरोज घराबाहेर पडले खरे, पण जबलपूर स्टेशनवर पाय ठेवला आणि राजेशला एप्रिल महिन्याची प्रचंड गर्मी आणि स्टेशनवरची गर्दी पाहून आपला निर्णय चुकला की काय, असं वाटू लागलं होतं. पण मग त्याने आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला, की इतक्या कमी पैशात इतक्या स्थळांचं दर्शन हे तसं शक्य नव्हतंच. शिवाय त्यांच्यासारखे इतरही अनेक पर्यटक त्या ट्रेनने प्रवास करणार होते. ९ डब्यांची ती विशेष ट्रेन होती. जी त्यांची स्थिती होईल, तीच आपली. राजेशने आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला. 

गाडीची ठरलेली वेळ रात्रीची साडेअकराची होती, पण तीन वाजेपर्यंत गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार, हेच कळलं नव्हतं. लोक आपापल्या पध्दतीने काऊंटरपाशी, प्रबंधकांपाशी जाऊन चौकशी करत होते. यात्रा प्रबंधक रेल्वे प्रशासनाला आणि चौकशीच्या काऊंटरवरील स्टाफ यात्रा प्रबंधकांना दोष देत होते. आणि स्वत:ची सुटका करून घेत होते. सगळ्यांचे कान अनाउंसमेंटकडे लागले होते. चारच्या सुमाराला स्पीकरवरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्म नंबरची सूचना दिली गेली.

आता विशेष ट्रेनमधील विशेष प्रवाशांची गर्दी आपापलं सामान घेऊन, अनाउन्स केलेल्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाली. प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर थोड्याच वेळात अनपेक्षित अशी निर्मळ, स्वच्छ ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. सर्व प्रवाशांना आपापले बर्थ क्रमांक माहीत होते. 

बोगीत आपापल्या जागी आपापलं सामान ठेवता ठेवता सहप्रवासी एकमेकांबद्दल जाणून घेऊ लागले. काही प्रवाशांना आपले परिचित मित्र भेटले. काही प्रवासी शेजा-यांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी रिझर्व्ह स्वभावाचे प्रवासी आपापल्या बर्थवर सामान ठेवून गुपचुप खिडकीबाहेर पाहू लागले.

राजेशनेही आपले सामान वरती बर्थवर ठेवले. प्रत्येक बोगीत एक टूरगाईड, एक गार्ड आणि एक सफाई कामगार होता. ट्रेनच्या बोगीत २ स्पीकर लावलेले होते. थोड्याच वेळात एक विशेष सूचना प्रसारित केली गेली. टूर गाईड सर्व प्रवाशांची तिकिटे तपासतील. त्यानंतर, संपूर्ण यात्रेबद्दलच्या सूचना आणि माहिती दिली जाईल. तिकीट तपासणीच्या प्रक्रियेत अर्धा तास गेला. स्पीकरवर पुन्हा सूचना आली, ‘ट्रेन लवकरच सुटेल.’ गाडीची शिट्टी वाजली आणि ट्रेन निघाली. काही प्रवासी पुढे इटारसी आणि भोपाळला गाडीत चढणार होते.

साधारण इतर स्लीपर ट्रेनप्रमाणेच इथेही कूपेमध्ये आठ बर्थ होते. आरक्षण चार्ट पाहिल्यावर राजेशच्या लक्षात आलं की लोअर आणि मिडल बर्थ प्रवाशांसाठी व वरची बर्थ, त्यांचं सामान ठेवण्यासाठी ठेवलेली होती. चार्ट बघून त्याच्या हेही लक्षात आलं, की त्यांचे दोन सहप्रवासी इटारसी स्टेशनवर चढणार आहेत. त्यामुळे आपलं सामान व्यवस्थित ठेवून राजेश समोरच्या लोअर बर्थवरच बसला. 

प्रवाशांचं बोलणं, गप्पा अजूनही चालू होत्या. थोड्याच वेळात चहा सर्व्ह केला गेला. मग चहावर चर्चा सुरू झाली. जसजसा चहाचा प्रभाव कमी होत गेला, लोक आपापल्या बर्थवर आडवे होऊ लागले. सरोज म्हणाली, ‘जोपर्यंत समोरच्या सीटवरची माणसे येत नाहीत, तोपर्यंत तुम्ही लोअर बर्थवरच पडा.’ अशा प्रकारे दोघेही आपापल्या कुपेत लोअर बर्थवर आडवे झाले. प्रत्येक बोगीत गार्ड होता. शिवाय, या ट्रेनमध्ये अन्य प्रवाशांना चढायची परवानगी नव्हती. त्यामुळे सामानाची काही काळजी नव्हती. आडवं झाल्यावर कधी डोळा लागला, त्यांचं त्यांनाच कळलं नाही. 

इटारसी स्टेशनवर गाडी थांबली. प्रवाशांच्या आणि हमालांच्या बोलण्यामुळे त्यांना जाग आली. बोगीत तिघे जण चढले. त्यांच्यामध्ये दोघे वृध्द नवरा-बायको होते. तिसरा चाळीशीच्या आसपासचा तरुण होता. त्याने सर्व सामान बर्थवर ठेवले. तो कदाचित् त्यांचा मुलगा असेल, असं राजेशला वाटले. सामान ठेवून झाल्यावर तो राजेशला म्हणाला, ‘‘अंकल-आंटी जरा बाबूजी आणि अम्मांकडे लक्ष ठेवा हं!”

दोघेही जवळजवळ एकदमच म्हणाले, ‘‘आपण अजिबात काळजी करू नका.” हात जोडून त्यांना नमस्कार करत तो तरूण खाली उतरला. व प्लॅटफॉर्मवरच्या बेंचवर जाऊन बसला. आणि राजेश-सरोजकडे पाहू लागला. ट्रेन चालू झाल्यावर त्याने अतिशय विनम्रतापूर्वक हात हलवत दोघांना बाय-बाय केलं. राजेशनेही हात हलवून अभिनंदनाचा स्वीकार केला. 

राजेशचं लक्ष मग या पती-पत्नीकडे गेलं. वृध्द व्यक्ती साठीच्या आसपास असावी. त्याची पत्नी छप्पनच्या आसपासची असेल. उत्सुकतेने राजेशने विचारले, ‘‘आपल्याला पोचवायला आपला मुलगा आला होता का?”

‘‘नाही साहेब! ते आमचे जावई आहेत.” वृध्द गृहस्थ हसत हसत म्हणाले.

‘‘अरे वा! आपण मोठे भाग्यवान आहात!” राजेशच्या तोंडून सहजच बाहेर पडलं.

ते भावनावश झाले. दोन्ही हात जोडून देवाचे आभार मानत म्हणाले, ‘‘ही सगळी देवीमातेची कृपा.”

त्यांचं बोलणं पुढे चालू होणार, एवढ्यात स्पीकर वरून अनाउन्समेंट झाली, की भोजनाची वेळ झाली आहे. आता एवढ्यातच सर्वांना भोजन देण्यात येईल. राजेशने विचार केला, ‘आत्ताशी कुठे प्रवासाला सुरूवात झालीय. नंतर सावकाशपणे ओळख करून घेता येईल.’ पण वृध्द गृहस्थ जरा जास्तच उत्साही दिसले. ते म्हणाले, ‘‘मी रामजी आणि ही माझी पत्नी जया. आम्ही महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील दूरच्या गावामधून आलोय.”

राजेशने आपला परिचय दिला, ‘‘मी राजेश, आणि ही माझी पत्नी सरोज. आम्ही जबलपूरहून आलोय.”

एवढ्यात जेवण आले. लोक जेवू लागले. जेवता जेवता राजेशने एक दृष्टीक्षेप समोरच्या दंपतीकडे टाकला. रामजी सावळ्या रंगाचे, उंचे-पुरे, भारदार व्यक्तिमत्त्व असलेले दिसत होते. वयाच्या मानाने प्रकृती निकोप होती. त्यांनी काळ्या रंगाचा, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि गडद निळ्या रंगाची पँट घातली होती. उजव्या बाजूला मनगटात लाल-काळ्या धाग्यात एक ताईत बांधलेला होता. गळ्यात छोट्या रुद्राक्षांची माळ होती. त्याबरोबरच आणखीही रंगी-बेरंगी मोत्यांच्या माळा आणि एक स्फटिकांची माळही होती. पायातली चप्पल काळ्या रंगाची आणि जुनी, झिजलेली होती. त्यांच्या पत्नीने, जयाने फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसली होती व डोक्यावरून पदर घेतलेला होता. ती गहू वर्णी आणि गोल-मटोल अशी महिला होती. आणि एकंदरीने त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की ते आदिवासी बहूल क्षेत्रातून आले आहेत. 

आता जेवणे झाली आहेत. लोक पुन्हा पहिल्यासारखे एकमेकांशी बोलू लागले होते. सरोज आणि जया यांचं अद्याप एकमेकींशी बोलणं झालं नव्हतं. त्या जरा एकेकट्या बसल्या सारख्याच बसल्या होत्या, पण त्यांचे कान मात्र इतरांचं बोलणं ऐकत होते. भोपाळ यायला अद्याप अडीच-तीन तास होते. राजेश सरोजला म्हणाला, ‘‘भोपाळहून ट्रेन सुटली की मगच झोपू या. नाही तर भोपाळ स्टेशनवर पुन्हा झोपमोड होईल.” सरोजने होकारार्थी मान हलवली.

रामजी ऐसपैस बर्थवर बसले. आता राजेशलाही बोलण्याची उत्सुकता वाटत होती. एक आठवडाभर एकमेकांच्या सोबतीने काढायचा होता. त्याने विचार केला, जरा गप्पा मारूयात. मग त्याने विचारले, ‘‘रामजी आपल्याला मुले किती?”

‘‘दोन मुले आणि एक मुलगी. देवीआईच्या कृपेने सगळ्यांची लग्ने झाली आहेत. सगळे आनंदात, सुखात आहेत.”

राजेश म्हणाला, ‘‘मला एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्नं झाली आहेत, आता निवृत्त झालोय. सगळ्या जबाबदा-यातून मुक्त झालोय.”

‘‘आपण मोठे नशीबवान आहात. पेन्शन आहे. त्यामुळे आरामात जगत असाल. आमचं नशीब कुठे एवढं बलवत्तर असायला. आम्ही पडलो व्यापारी.”

‘‘रामजी, व्यापारात पैशाला काय कमी? नोकरी पैशात आम्ही आयुष्यभर जेवढं कमावतो, तेवढे आपण काही काळातच मिळवू शकता. आपण खरोखरच नशीबवान आहात. आपल्याला इतका चांगला जावई मिळाला, आपली किती काळजी ते घेतात. हे काय कमी आहे?”

‘‘साहेब, आपण अगदी खरं बोलताय. जावयाच्या बाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत. पण साहेब, हे सुख पदरात टाकण्यासाठी देवीआईने आमची अगदी कठोर परीक्षा घेतली होती.”

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – ४९८ -अ

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सायसाखर… भाग-२ – लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ सायसाखर… भाग-२ – लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(प्रसंगपरत्वे जुनी गाणी गुणगुणत, स्तोत्रे म्हणत आणि सवड झाली की असेल, मिळेल, दिसेल ते पुस्तक वाचत बसलेली असायची. त्यातूनच तिचं जीवनविषयक तत्वज्ञान बनत गेलं होतं.) – इथून पुढे 

सगळे सण आमच्याकडे आईच्या स्पर्शानं पावन व्हायचे.

प्रत्येक सणाला खास काहीतरी असायचं.

मग कधी ते ठिपक्यांच्या रांगोळीत दिसायचं. कधी गणपतीत आरास करताना दिसायचं. दिवाळीत आकाशकंदील तयार करताना दिसायचं.

आम्हाला गणपतीच्या मूर्तीला हात लवायला परवानगी नसायची. पण चतुर्थीच्या आधल्या सायंकाळी मूर्ती घरी आली की आईबरोबर मूर्ती बघताना मजा वाटायची.

अण्णांच्या नकळत आई गणपतीला औक्षण करायची, त्याच्या गालावरून हात फिरवायची. रंगसंगतीचं कौतुक करायची. उंदीरमामाला गोंजारायची. बाप्पाला जपून आणलं म्हणून त्याच्यासमोर गूळ ठेवायची.

गणपती विसर्जनाच्या दिवशी ती रडवेली व्हायची, म्हणायची, ” चेहरा बघ कसा उतरलाय तो. जपून जा बाबा, आणि पुढल्या वर्षी लवकर ये “

गणपतीच्या दिवसातल्या प्रत्येक दिवसाच्या भावना ती बोलून दाखवायची. गणपतीवर मानवी भावभावनांचं आरोपण कसं करायचं, ते तिनं शिकवलं.

– त्या दिवशी न्हाणीघरात रडण्याचा आवाज आला म्हणून मी बघायला गेलो तर, वाडीतली दरडातली लक्ष्मी रडताना दिसली.

आई तिला बडबडत होती.

“– रानडुकराचं मटण खायची गरज होती काय त्याला ? आठलीडोंगरातून अख्खा गाव त्या डुकराचा माग काढत होता. त्यात सगळा दिवस घालवलात, आणि वाट्याला काय आलं, तर वाटीभर मटण. ते सुद्धा पचवता आलं नाही, मग हे असं होणारच… “

आईनं मग तिला कसलं तरी झाडपाल्याचं औषध दिलं.

दोन दिवसांनी पुन्हा लक्ष्मी आली.

” आता काय झालं ? “

” पोराच्या तोंडास चव नाय. “

आई आत गेली.

आणि चांद्याच्या पानांचा द्रोण तयार करून त्यात लिंबाचं लोणचं घालून दिलं.

” कायतरी मटण म्हावरं खाता नी आजारी पडता, त्यापेक्षा गरम भात, वरण खायला दे. “

ती बडबडत म्हणाली. लक्ष्मी निघून गेली पण खाण्यावर नेमकं भाष्य करून गेली.

आमच्याकडे प्रघातच पडून गेला होता. कुणी आजारी पडला की हमखास आमच्याकडल्या लोणचं, मिरचीला पाय फुटायचे.

कधीकधी मी रागावायचो.

मग ती म्हणायची,

” आपल्याला देवानं काही कमी दिलेलं नाही. आणि मी तरी माझ्याकडचं कुठं काय देते ? जे देवानं दिलं, त्यातलंच तर मी त्यांना देते. “

असं काही आई सांगू लागली की राग पळून जायचा.

– आई अशी कुठून कुठून मनात उगवत राहिली.

कधी हौसेनं लावलेल्या हापूसच्या कलमांना स्वतः कळशीनं पाणी शिंपून निगराणी करणारी आई…

देवाला वाहण्यासाठी, अण्णांना भरपूर फुलं लागतात म्हणून स्वतः फुलझाडं लावून, झाडं बहरली की आनंदी होतानाची आई…

पासष्टच्या चक्रीवादळात झाडांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर कोलमडून गेलेली पण पुन्हा तितक्याच जिद्दीनं उभं राहण्यासाठी खंबीर बनलेली आणि आम्हाला खंबीर बनवणारी आई…

शिमग्यात पालखी नाचवणाऱ्यांचे खांदे सोलपटून निघाल्यानंतर त्यांना लोणी हळद देणारी आई…

एका शिमग्यातल्या आईचं रौद्ररूप अजून आठवतं.

आईचं आणि अण्णांचंसुद्धा.

गावकऱ्यांना शिमग्यात मोठी होळी, तीसुद्धा आंब्याच्या झाडाची लागायची.

दरवर्षी अशी अनेक झाडं तोडली जायची.

त्यावर्षी आमच्याकडील झाड तोडायला गावकरी पहाटे चारच्या सुमारास आले.

ढोल ताशांच्या आवाजाने आम्ही जागे झालो.

सगळे गावकरी आमच्या आवारातील मोठे झाड तोडायला आले होते.

आम्ही सगळ्यांनी विरोध केला, पण ते कुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

कधी न भांडणारे आई अण्णा खूप भांडले, रागावले, झाड तोडायला विरोध केला. पण काही उपयोग होत नव्हता. शेवटी आईनं मला पुढं ढकललं, म्हणाली, ” जा त्या झाडाला मिठी मारून उभा राहा, तुला तोडल्याशिवाय त्यांना आंब्याला हात लावता यायचा नाही, जा, बघतोच आम्ही आता, ते काय करतात ते. “

आईचं हे असं रुद्ररूप मी कधी पाहिलंच नव्हतं.

मी तिरिमिरीनं पुढं झालो आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारून उभा राहिलो.

पुढं काय होईल याचा विचारसुद्धा मी केला नाही. बिथरलेले आणि झिंगलेले गावकरी काय करतील याचा अंदाज नव्हता.

आणि तसंच झालं.

दोन चार गावकरी कुऱ्हाडी घेऊन पुढे आले. सगळ्यांचा श्वास अडकला. ढोल वाजवणारे अचानक थांबले. काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आली.

इतकावेळ भांडणारे, बडबडणारे गावकरी अवाक होऊन पाहू लागले.

कुऱ्हाडी घेऊन आलेल्यांकडे मी एकदा पाहिलं. आणि त्यांचा अवतार बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. पण क्षणकालच. मी स्वतःला सावरलं. डोळे मिटून मी झाडाला चिपकून उभा राहिलो.

पण काहीच घडलं नाही. मी डोळे उघडले. आता सीन पालटला होता.

बाकीच्या गावकऱ्यांनी, अंगावर धावून येणाऱ्यांना आवरलं होतं.

आम्हाला शिव्या देत सगळे निघून गेले होते.

आई अण्णा धावत माझ्याजवळ आले.

आईचं रौद्ररूप मावळलं होतं.

ती धाय मोकलून रडत होती. माझ्या गालावरून तिचा हात फिरत होता. मध्येच ती झाडावरून हात फिरवत होती. पुन्हा रडत होती. अण्णा तिला सावरत होते.

” या झाडासाठी मी तुला पणाला लावलं. “

एवढं बोलून ती मटकन खाली बसली.

खूप वेळानं आमचं घर सावरलं.

त्यादिवशी आईनं पंचपक्वान्न करून नैवेद्य दाखवला.

मला जवळ घेऊन ती म्हणाली,

” आज तुझ्यामुळं माझं आणखी एक लेकरू वाचलं. “

अण्णा हसत घरात आले.

” ही सायसाखरेची वाटी आंब्याच्या झाडाजवळ मिळाली. “

” मीच नेऊन ठेवली होती. त्यातली सायसाखर आंब्याच्या मुळांना लावली. आता उरलेली तुम्ही सगळ्यांनी खा. “

सायसाखर ही आमची गंमत होती.

साखरेची गोडी सायीत मिसळली की नातं घट्ट होतं. सायीची स्निग्धता सगळ्यांना सामावून घेते. असं आईचं तत्वज्ञान होतं.

त्यामुळं कामात राबराब राबलेले आईचे हात कितीही खरखरीत असले तरी सायसाखरेसारखे मृदू मुलायम आणि गोड वाटायचे.

– आज सगळं आठवलं.

– एसटी थांबली. मी उतरलो. घरी निघालो. रात्र झाली होती. घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली. आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती.

सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती…

समाप्त

लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी

 ९४२३८७५८०६

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares