मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

 

☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

सुभाष गेले पंधरा दिवस अत्यंत अस्वस्थ होता. त्याच्या मनाची सगळी शांतता ढवळून निघाली अगदी. त्याला कारणही तसंच घडलं. गेले महिनाभर त्याला सिंगापूरहून अमिताचे सतत मेल, फोन येत होते. त्याचं सुखी आयुष्य अगदी ढवळून निघालं या मेल्स आणि फोन्स ने.

मागचे दिवस आठवले सुभाषला. किती सुखात जगत होता सुभाष. मध्यमवर्गीय रहाणी, लहान कुटुंब आणि सुखी दोनच भावंडे. लहान सुभाष मोठी ताई गीता. सुभाषचे वडील जरी साध्या नोकरीत होते तरीही आईही शिक्षिका होती आणि त्या दोघांनी आपल्या गुणी मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. फाजील लाड केले नाहीत आणि अगदी डोक्यावरही बसवलं नाही मुलांना. गीता आणि सुभाष अभ्यासात चांगले होते. , गीता कॉमर्सला गेली. आपल्या इच्छेप्रमाणे तिने मास्टर्स डिग्री घेतली आणि एका चांगल्या टॅक्स कन्सल्टंटच्या फर्म मध्ये छान जॉब करायला लागली.

यथावकाश गीताने आपलं आपण लग्न ठरवलं. इतक्या चांगल्या मुलाला आईवडील का नकार देतील? घरबसल्या छान जावई चालत आला. गीताच्या आईवडिलांनी अगदी हौसेने लग्न करून दिले. गीता आनंदात सासरी नांदायला लागली.

सुभाष अत्यंत चांगले मार्क्स मिळवून इंजिनिअर झाला. त्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगला जॉब मिळाला.

आई म्हणाली ”सुभाष, आता तुझं लग्नाचं बघायला लागू या ना? छान पगार मिळतोय तुला. नुकताच फ्लॅटही बुक केला आहेस. आता नाव नोंदवायचं का? तुझी तू कोणी बघितली आहेस का ? मोकळेपणाने सांग हो. ”

सुभाष म्हणाला, ”नाही ग आई. माझी काही हरकत नाही मुली बघायला. तुम्हाला योग्य वाटतील त्या मुली मी बघेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ”

मोठ्या उत्साहाने मीनाताईंनी सुभाषचं नाव विवाहमंडळात नोंदवलं. चांगल्या मुली सांगून येऊ लागल्या सुद्धा. त्या दिवशी मीनाची बहीण मधुरा सहज भेटायला आली.

“काय ग मीना, काय म्हणते मोहीम सुभाषची?” हसून तिनं विचारलं.

“चालू आहे, बघतोय मुली. ”

“ बघतेस का एक मुलगी? छान आहे दिसायला. नवीनच आलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. मला फारशी माहिती नाहीये हं. बघ तू सगळं नीट. ” पत्ता फोन देऊन मधुरा निघून गेली.

पुढच्या आठवड्यात मीना आणि सुभाष मुलगी बघायला गेले. सुरेखच होती पल्लवी दिसायला. छान नोकरी होती, बोलायला चांगली वाटली. सुभाषला आवडली पल्लवी.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी साठ्यांची अमिता त्याला भेटली. हेही स्थळ विवाह मंडळातूनच आलं होतं. अमिता अतिशयच स्मार्ट, मॉडर्न आणि पहिल्याच भेटीत इम्प्रेशन पडेल अशीच होती.

सुभाष म्हणाला, ”आई मला फार आवडली अमिता. ती पल्लवी छान आहेच पण ही जास्त स्मार्ट आहे. आपण हिलाच होकार कळवूया. ”

मीना विचार करून म्हणाली.. “सुभाष, नीट विचार कर. मला ही ओव्हर स्मार्ट वाटतेय. अशा मुली संसाराला जरा कमी महत्व देतात असं माझं मत आहे. पल्लवी योग्य मुलगी वाटते मला तुझ्यासाठी. बघ. शेवटी संसार तुला करायचा आहे. ” सुभाष अमिताला चार वेळा भेटला. आणि त्याने तिला होकार द्यायचे ठरवले. पल्लवीच्या घरी, क्षमस्व असा नकार कळवण्यात आला.

एकुलती एक लाडात वाढलेली, कुठेही तडजोड करायला तयार नसणारी अमिता गोखल्यांच्या घरात सून म्हणून आली. सुभाष तर तिच्या रुपाला इतका भुलून गेला होता की तिचे दोष त्याला खटकेनात.

उशिरा उठायचं, तयार डबा घेऊन ऑफिसला जायचं. कामात सासूला मदत करायची असते हे ती लक्षातच घ्यायची नाही. पुन्हा आपल्या पगाराचे ती काय करते हे तिने सुभाषला कधीही सांगितलं नाही. अफाट खरेदी, सतत बाहेर खाणे, शॉपिंग हेच आयुष्य होते तिचे.

एकदा सहज म्हणून मीना तिच्या आईला भेटायला गेली. बोलता बोलता म्हणाली ”अहो, आता अमिताच्या लग्नाला सहा महिने झाले. अजूनही ती उपऱ्यासारखीच रहाते घरात. आमच्याशी तिचा संवादच नसतो. बाकी काम, भाजी काही सामान आणणे हे तर लांब राहिलं. ”

अमिताच्या आई म्हणाल्या, ” अहो, अलीकडच्या मुली या. मिळवत्या. त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं मीनाताई. आम्ही तिला लाडात वाढवली आहे. ती इथे तरी कुठे काम करायची? दमून जाते हो ऑफिस मध्ये काम करून. ”

मीना हताश होऊन घरी आली. नवऱ्याला म्हणाली, ” बघा. काय बोलल्या विहीणबाई. मलाच चार शब्द सुनावले. कठीण आहे बरं आपलं आणि सुभाषचं. जे जे होईल ते ते पहावे. ”

चार महिने असेच गेले.

एक दिवस अमिता उत्साहाने घरी आली. हे सांगतच की “ मला सिंगापूरला छान जॉब मिळालाय. मी पुढच्या महिन्यात तिकडे जॉईन होणार आहे. ” 

थक्क होऊन सुभाष आणि त्याचे आईबाबा बघतच राहिले.

“ अग पण मग तू एकटीच जाणार का तिकडे? मग सुभाषचं काय?”

बेफिकिरीने ती म्हणाली, ” मला संधी मिळतेय तर मी जाणार. सुभाषने यावं तिकडे आणि करावा प्रयत्न की. मिळेल की त्यालाही चांगला जॉब तिकडे. ”

सुभाष संतापून म्हणाला, ” मी अजिबात माझा हा उत्तम जॉब सोडून तिकडे येणार नाही. मूर्ख आहेस का? हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायला मी मूर्ख नाहीये. तूही नीट विचार केला आहेस का अमिता? उगीच इथला जॉब सोडून तिकडे एकटीने जाऊ नयेस असं वाटतं मला. ”

अमिता म्हणाली, ”वाटलंच होतं मला. बस इथेच. मी जाणार. नवीन क्षितिज मला खुणावतंय तर मी ही संधी घेणारच. मी आईकडे जातेय आता. मला खूप तयारी करायचीय जायची. मग मी तिकडूनच एअरपोर्ट वर जाईन. येणार असलास तर ये भेटायला. माझ्या जायच्या डिटेल्स कळवीन तुला. ”

थक्क होऊन मीना आणि मोहन तिच्याकडे बघतच राहिले. अशुभाची पाल चुकचुकली मीनाच्या मनात. ठरल्यावेळी अमिता सिंगापूरला निघून गेली. सुभाष तिला पोचवायला एअरपोर्टवर गेला होता. अतिशय उद्विग्न होऊन तो घरी परत आला.

आयुष्यच बदललं त्या दिवसापासून सुभाषचं. लग्नाला वर्ष झालं नाही तोच हे खेळ सुरू झाले आपल्या नशिबाचे, असं मनात आलं त्याच्या. अमिताचे उत्साहाने भरलेले फोन, फोटो व्हिडिओ यायचे सुभाषला. सुरुवातीला तू ये ना इकडे म्हणणारी अमिता आता त्याला फोनही करेनाशी झाली. तिचा सिंगापूरलाच कायम रहाण्याचा निर्णय तिने माहेरी आणि सासरीही कळवला.

सुभाष संतापला. तिच्या आईवडिलांना भेटला. ते म्हणाले, “ उलट तूच तिकडे जायला हवंस सुभाष. चांगला जॉब मिळव आणि सुखात रहा तिकडे. पण तू जर तिकडे जायला तयार नसलास तर मात्र अमिता तुला घटस्फोट द्यायचा विचार करतेय. आम्हीही तिच्या पाठीशी कायम उभे रहाणार. ” 

सुभाष म्हणाला”, हो का? मग मलाही हवाय घटस्फोट तुमच्या लाडावलेल्या मूर्ख लेकीपासून. बस झालं आता. ”

तो तिरीमिरीने घरी आला आणि आईवडिलांना हे सगळं सांगितलं. मीना मोहन हताश झाले हे ऐकून. कमाल आहे हो या मुलीची.

“आई, यावर मला अजिबात चर्चा नकोय. तूही जाऊ नकोस आता तिच्या माहेरी. मला आवडणार नाही तू गेलीस तिकडे तर. ” मीना गप्प बसली. आपल्या मुलाच्या नशिबात काय आहे हेच तिला समजेनासे झाले.

अमिता भारतात आली आणि भरपूर मनस्ताप देऊन अखेर सुभाषला घटस्फोट देऊन पुन्हा सिंगापूरला निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. ऑफिस मधल्या कृपाला एक दिवस सुभाष घरी घेऊन आला.

“आई ही माझी कलिग कृपा देशमुख. मी हिला बरीच वर्षे ओळखतो. मला लग्न करायचंय हिच्याशी. ”

कृपा मीनाजवळ बसली आणि म्हणाली, “सुभाषच्या आई, मला थोडं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. माझे मिस्टर चार वर्षांपूर्वी अपघातात गेले. मी इथे एकटीच रहाते. माझे आईवडील औरंगाबादला असतात.

मी आणि सुभाष एकमेकांना खूप वर्षे ओळखतो. पण ते फक्त टीम लीडर आणि मी सबॉर्डीनेट स्टाफ असं आमचं नातं आहे. आम्हाला सुभाष सरांची पत्नी निघून गेली, तिने घटस्फोट घेतला हे ऐकून माहीत होतं. मागच्या महिन्यात सुभाष सरांनी मला लग्नाबद्दल विचारलं. माझा निशांतशी फक्त पाच वर्षे संसार झाला हो. अचानकच एका कार अपघातात त्याचे निधन झाले. मलाही सुभाष सरांशी लग्न करावेसे वाटते.

पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” कृपाचे डोळे पाणावले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वासुदेव…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “वासुदेव…” ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची आळसावलेली सकाळ, सात वाजण्याच्या सुमारास सोसायटीत झाडावरच्या पाखरांचा किलबिलाट आणि ये-जा करणाऱ्या गाड्यांचा आवाज सोडला बऱ्यापैकी शांतता. जॉगिंगवरुन परतलेले आकाश, कुणाल बाकावर मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न होते. तितक्यात “वासुदेव आला हो वासुदेव आला”असं खणखणीत आवाजात ऐकायला येऊ लागलं आणि अंदाजे चाळीशीचा एक माणूस वासुदेवाच्या वेषात सोसायटीत आला. सुरेल आवाजात पारंपारिक गाणी म्हणत होता. ऐकायला फार छान वाटत होतं. काही वेळानं वासुदेव विश्रांतीसाठी बाकावर बसले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून आकाश-कुणाल छदमीपणे हसले.

“यांचं बरंयं”आकाश.

“कुणाचं! ! ”कुणालनं विचारलं.

“अरे यांच्याबद्दल बोलतोय. शिक्षण नाही. नोकरी नाही. दिवसभर गाणी म्हणत फिरायचं. पैसे मिळतात आणि खायलाही म्हणतं. डबल फायदा! ! ”आकाश.

“हळू बोल. त्यांनी ऐकलं तर फालतूची लफडी होतील. ”

“खोटं काय बोलतोय. सालं, हाल तर आपल्यासारख्यांचे आहेत. जीव तोडून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले पण काय उपयोग??चार महीने झाले अजूनही जॉबच शोधतोय. ”आकाश 

“खरंय यार! ! ”कुणालनं दुजोरा दिला. जवळच असलेल्या वासुदेवांनी दोघांचे बोलणं ऐकलं पण प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा न राहवून आकाशनं थेटच विचारलं “बाबा, नशीबवान आहात”

“खरंय. म्हणून एवढं पुण्याचं कार्य हातातून घडतंय”वासुदेव प्रसन्न हसत म्हणाले.

“दारोदार फिरणं हे चांगलं काम??. ”आकाश 

“याला भीक मागणं म्हणतात”कुणाल.

“हे काम आम्ही पिढ्यान पिढ्या करतोय”

“पूर्वजांनी केलं म्हणून तुम्ही पण तेच करता. धन्य आहे तुमची! ! ”आकाश.

“या सगळ्या आता गोष्टी आऊटडेटेड झाल्यात. लोकांचा रिस्पॉन्स सुद्धा मिळत नाही आणि तरीही हे करता. ऑड वाटत नाही. ”कुणाल.

“जमाना बदललाय म्हणून तर करतोय”वासुदेव.

“म्हणजे. समजलं नाही. ”

“जाऊ दे ना. तुला काय करायचं”आकाश वैतागला.

“एक मिनिट. जरा बोलू दे रे. दिवसभर फिरून होणाऱ्या कमाईवर घर चालतं”

“कसली कमाई???मी कोणाकडून काहीही घेत नाही. ”वासुदेव.

“अरे बाप रे! ! ”कुणाल पुढे काहीच बोलू शकला नाही.

“चांगले धडधाकट आहात दारोदार फिरण्यापेक्षा नोकरी करा. असं वणवण फिरून काय मिळणार”आकाश.

“वासुदेवाच्या रूपात समाधान आणि ऊर्जा मिळते. तुमच्या भाषेत सांगायचं तर फुल एनर्जी. ”

“रोज असं फिरून कंटाळा येत नाही”

“फक्त विकेंडला फिरतो”

“तरीच मी विचार करतोय की घर चालतं कसं?”कुणाल.

“कोणत्या कारखान्यात नोकरी करता”

“आय एम आय टी प्रोफेशनल, मल्टीनॅशनलमध्ये सिनियर मॅनेजर आहे”वासुदेवाचं ऐकून आकाश-कुणाल ताडकन उभे राहिले. नक्की काय रिऍक्ट व्हावं हेच लक्षात न आल्यानं फक्त एकटक पाहत राहिले.

“काय झालं. असे का पाहताय”

“सर, माफ करा. आम्ही मूर्खा सारखं बोललो. चूक झाली रियली सॉरी! ! ”आकाश.

“मी पण सॉरी! ! ”कुणाल.

“ईट्स ओके”

“एक विचारू. चांगला जॉब आहे मग हे वासुदेवाचं रूप??”

“स्वतःच्या आनंदासाठी आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा टिकवण्यासाठी. पणजोबांपासूनचा वारसा चालवतोय. ”

“तेव्हा ठीक होतं आता कशाला?”

“काळाच्या ओघात वासुदेव सुद्धा लुप्त होईल. नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून छोटासा प्रयत्न आणि हा वारसा पुढे नेणारा आमच्या घराण्यातला कदाचित मी शेवटचाच असेल. ” 

“असं का?”

“झेड जनरेशन मधला माझा मुलगा हे करेल की नाही याविषयी खात्री नाही. ”

“आजच्या काळातसुद्धा परांपरा टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात हे कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. यु आर संपली ग्रेट! !

“ग्रेट वैगरे काही नाही मित्रांनो, यात माझाही स्वार्थ आहे. हा वारसा मिळाला म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पूर्वजांसारखं पूर्णवेळ हे काम करू शकत नाही कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी आणि आताची तर फारच वेगळी आहे. म्हणून शनिवार-रवीवारचा थोडा वेळ देतो. हे कर असं कोणीही सांगितलं नाही की बळजबरी केली नाही. सगळा स्वखुशीचा मामला. नोकरी पोटापाण्यासाठी आणि हे स्वतःसाठी करतो. छंद म्हणा हवं तर….. लहानपणी वडिलांना पाहिलंय. सगळी गाणी तोंडपाठ आहेत. आजकाल इतरांसाठी जगताना स्वतःसाठी फार काही करत नाही. म्हणूनच स्वतःला रिचार्ज करण्यासाठी करतो. रुटीन कामासाठी एनर्जी मिळते. छान वाटतं”

“तुमचा हेवा वाटतो”आकाश.

“का?”

“परंपरा आणि आधुनिकता यांची सुंदर सांगड घालून आनंदी आयुष्य जगताय. ” आकाश.

“याविषयी घरच्याचं काय मत आहे आणि महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात आला नाही”कुणाल.

“घरच्याचा पूर्ण पाठिंबा आहे म्हणूनच हे शक्य आहे आणि लोकांचं फार मनावर घ्यायचं नाही कारण ते काहीतरी म्हणणारच. ”

“एक विनंती”

“सेल्फी” वासुदेव 

“हो आणि परवानगी असेल तर व्हिडिओसुद्धा.. ”

“अवश्य करा. त्यानिमित्ताने वासुदेवाविषयी लोकांना माहिती होईल. ”आकाशनं शूटिंग सुरू केल्यावर तल्लीन होऊन वासुदेव गायला लागले…..

“उजळून आलं आकाश रामाच्या पारी,

अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी.

वासुदेव आला हो वासुदेव आला,

सकाळच्या पारी हरीनाम बोला,

वासुदेव आला हो वासुदेव आला” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धुकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ धुकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

(मागील भागात आपण पाहिले – आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही

फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप

गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या

आईचा जन्म झाला. – आता इथून पुढे)

एका आईचा नव्याने जन्म झाला खरा, पण ही गोष्ट कुणाच्याच गळ्याखाली उतरली नाही. घरात इन मीन चार माणसे. दोन मुले, दोन मोठी. आई-बाप-भाऊ-

बहीण. तिघे जण एका बाजूला होते, तर दुसरीकडे आई. आईचं म्हणणं म्हणजे वटहुकूमच असायचा. सक्तीने त्याचं पालन व्हायचं. सगळे आईला घाबरायचे. समोर

काही बोलायचे नाहीत, पण तिच्यामागे तिच्याकडे रागाने पहायचे. आता ही नवी आई सगळ्या घरासाठी अपरिचित होती. इतकी वर्षे त्या वातावरणात राहायची सवय झाली होती.

चर्चेचा मुद्दा असा होता – ‘असं काय झालं की आई, आई राहिली नाही. ’

‘आई, तू माझ्यावर ओरड. तुझ्या गप्प बसण्याने मला माझी चूक सतत सतावते. ’

आईला राग येण्याचे सतत प्रयत्न केले जात होते. ‘आई, सगळ्या फाईल्स डिलीट झाल्यात.

‘इस्त्रीमुळे पॅंट जळाली. ’

‘अवीचा परीक्षेत खूप खालचा नंबर आला. जेमतेम पास झाला. ’

आईला राग नाही आला, तर नाहीच आला. गोल मेज सभा झाली. जसं काही आई बेहोश होऊन कामातून गेलीय आणि अनेक गोष्टींची तिला आठवण करून देत

तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न चालू आहे. कुठल्याच उपायाचा उपयोग झाला नाही. इकडे आई पूर्णपणे शुद्धीवर होती. स्वैपाक करत होती. जेवत होती. पण नेहमीसारखं

पुन्हा पुन्हा सांगत नव्हती, की ‘नीट जेवा. ’

‘तुम्ही लोक बाहेरचं जेवण मजेत जेवता. घरचं जेवण आवडत नाही तुम्हाला. ’

‘पौष्टिक जेवण आहे. स्वाद बघू नका. त्याचे गुण बघा. ’

हे सगळं इतिहासाच्या पानांवर अंकित झालेलं होतं. सगळ्यात अवी बेचैन होता.

‘बाबा, आज-काल घरात असं वाटतय, की हे घर नाही, शांतिनिकेतन आहे. ’

‘जसं काही शांतिनिकेतनमध्ये तू राहून आला आहेस! इलाने भावाची तंगडी ओढली.

‘राहिलो नाही, म्हणून काय झालं? त्याबद्दल खूप वाचलं आहे. साउथ एशियन स्टडीज़ हा माझा एक विषय आहे. ’

‘बाबा, आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या. ’

‘अशा स्थितीत ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकतो. ’

‘तिच्या डोक्यात काही शिरतच नाही. ’

‘आईला सांभाळलं पाहिजे तिला राग आणायला पाहिजे. ’

दोघे बहीण-भाऊ रोजच्या कटकटीने वैतागत होते. आता शांततेमुळे वैतागले. आम्ही स्वार्थी आहोत, तर आहोत. आम्हा घरातल्या लोकांचा आईसाठीचा दुराग्रह योग्य

असेल, वा नसेल, पण आई तर दटावणी देणारीच असायला हवी ना! तिच्या दटावणीतही केवढं प्रेम असतं. हे आईचं थंडपणे ‘ठीक आहे’, असं म्हणणं सतत

सुरीसारखं टोचत रहातं. जेव्हा आई सारखी ओरडत होती तेव्हा अवीच जास्त तक्रार करायचा आणि आता आई शांत आहे, गप्प बसली आहे, तरीही तोच जास्त तक्रार करतो आहे. शेवटचं हत्यार होतं त्याच्यापाशी. त्याने नळ सुरू केला आणि तसाच चालू ठेवला. म्युझिक सिस्टीम चालू केली. ती इतकी जोरात, की ऐकणार्‍याचे कान फाटले पाहिजेत.

तिघेही जिथे उभे होते, तिथून हसायला लागले. असं वाटू लागलं की दोन दिवसापासून दाटलेलं धुकं, कुंदपणा आता सरेल आणि ढगाआडून सूर्य आग ओकू लागेल. आईने गुपचुप जाऊन म्युझिक सिस्टीम बंद केली आणि शांतपणे म्हंटलं,

‘ज्याने नळ उघडा टाकलाय, त्याने तो बंद करावा आणि फारशी पुसून काढावी. ’

अवीने पळत जाऊन नळ बंद केला. गडबडीत तिन्ही फारशा स्वच्छ करू लागला. जेवढा परिणाम आईच्या ओरडण्याचा होत नव्हता, त्यापेक्षा किती तरी जास्त परिणाम हा कोमल आणि मुलायम आवाज करत होता.

‘कोणत्या गोष्टीने नाराज आहेस का? की डोकेदुखी किंवा तापावरची चुकीचे औषध तर घेतले नाहीस ना! ’ बाबांनी अखेर बेचैन होऊन विचारलेच.

‘मी नाराज नाही की आजारीही नाही. खरं सांगायचं तर मी आत्ता ठीक झाले आहे. ’

तिघांचे डोळे उत्सुक होते. कान ऐकत होते – ‘मी तुम्हा सगळ्यांची इतकी काळजी करता करता तुम्हा सगळ्यांनाच दु:खी करते. माझ्या लक्षातच आलं नाही, की

तुम्ही आता लहान मुलं राहिली नाही आहात. तुम्ही आता मोठे झालात. आपली काळजी घेऊ शकता. आपले निर्णय स्वत: घेऊ शकता आणि तुमचे बाबा, तेही

माझ्यापुढे बालक बनूनच राहीले. आता तुमच्या कामांची जबाबदारी तुमची स्वत:ची. काही चुकीचं केलंत, तर ते तुमचं तुम्हीच सुधारायचं! ’

तिघे जण आवाक झाले होते. आई रागावायची म्हणून खुश नव्हते, आईच्या गप्प बसण्यावरही नाही. धुकं शा तर्‍हेने निवळलं होतं, की आईसाठी आकाश स्वच्छ

करून गेलं होतं. आता घर स्वयं अनुशासित होतं. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वत: घेतली होती. पण तरीही तिघे जण, धुकं निवळण्याच्या थोड्याशा आशेने आपल्या आपल्या आकाशाकडे लक्षपूर्वक बघत रहात.

– समाप्त –

मूळ हिन्दी कथा – “कुहासा“

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – [email protected]

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धुकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ धुकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

आज नक्कीच विटेला वीट टक्करणार. आरडा-ओरड्याचा आवाज येणार. घरात भांडणं होणार. घटनेची गंभीरता लक्षात घेता तीक्ष्ण आणि धारदार वाद-वितंडवाद होणार, याची सगळ्यांना खात्री होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

भिंती शांत होत्या. कुठेच भड-भड, खड-खड झाली नाही. घरातली सारी भांडी गुपचूप आपआपल्या जागी बसलेली होती. रोटयांच्या कडाही चमकत होत्या. जाळल्याची कुठे नामोनिशाणीही नव्हती.

इतकी शांतता का होती? अवीने गाडी धडकवली होती. पांढरी मर्सिडीज गाडी. बाबांची जान आणि आईची शान. वादळ येऊ घातलं होतं. ‘कितीदा सांगितलं तुला, गाडी नीट ल्क्षपूर्वक चालव. हजारदा सांगितलं तुला, गाडी चालवताना रस्त्याकडे फोकस कर. फोनवर बोलण्यास मनाई आहे. ऐकतं कोण? इयर फोन लावून बोलत असतोस. लक्ष विचलित होणारच ना! ’ 

‘आता घ्या. इतक्या चांगल्या, महागड्या गाडीची वाट लावलीस. ’

‘गाडीचा नेम ब्रॅंड पाहून दुरुस्त करणारे वाटेल ती किंमत सांगतील! कुठून आणायचा इतका पैसा?’ 

हे सगळं आईकडून बोललं जायचं होतं. बाकी सगळ्यांनी गप्प बसून ऐकायचं होतं. रागारागाने बाबा बाहेर निघून जाणार होते. अवीला बाईक स्टार्ट करून निघून जायचं होतं. इलाला आपल्या पुस्तकात डोकं खुपसून बसायचं होतं. पण क्रियेची प्रतिक्रिया न होता घर शांत होतं.

अवीने खुणेनेच बाबांना विचारले, ’ आई ठीक आहे ना?’

बाबांनी मूकपणेच उत्तर दिले, ‘थांब जरा, आत्ता सुरू होईल तुझी खिचाई! ’

अवी विचार करत होता, ‘जे बोलायचं आहे, ते लवकर बोलून टाक आई. हे बेचैन क्षण लवकर संपूदेत आणि मला इथून लवकर बाहेर पडता येऊ दे. ’ 

अवी, बाबा, आणि इला तिघे वाट वाट होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत होते. की आईचा राग आत उसळून उसळून लाव्हासारखा फटकन बाहेर येईल. तेव्हा त्यात जळून तिघांच्या अंतरातील गर्मी थंड होईल.

बाबांनी आईला उकसत म्हंटलं, ’अग, ऐकलस का? याने गाडीने धडक मारली. सगळं बॉनेट खराब झालं! ’

‘हं! ’

‘आणि बाबा, तुम्ही मिठाई खाताय. ’ अवी मोठ्याने म्हणाला, म्हणजे आईला नीट ऐकू येईल.

‘होय. गाडीचं टेंशन आहे. टेंशनमध्ये गोड खाल्ल्याने शांत वाटतं. ’ बाबांनी विनाविलंब आपली बाजू मांडली.

आई, जशी पुतळाच बनली होती. भावविहीन चेहरा. जसं काही कुठल्याही गोष्टीचा तिच्यावर परिणामच हहोत नाहीये. आईच्या या नि:शब्दतेने घराच्या भिंती विरूप वाटू लागल्या होत्या. एकदम उजाड. अपमान, उपहास, टीका-टोमणे, आरडा-ओरड्याचा तो कारखाना, न थांबणार्‍या मशीनसारखा धडधड चालायचा, तो आज ठप्प झाला होता. एक तास असा गेला.

घरच्या तिन्ही सदस्यांनी बाहेरच्या खोलीत जाऊन मीटिंग घेतली. ‘आईचं असं गप्प बसणं कुठल्या आजाराचं लक्षण तर नाही न?’ 

‘चुकून कुठलं चुकीचा औषध तर घेतलं नाही ना, जे डोक्याच्या नसाच बदलून टाकेल. ’ 

‘बाबा काही तरी चुकीचं घडलय आईच्या बाबतीत. ‘ 

‘आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हवं’ आईच्या लाडक्या इलाच्या कपाळावर चिंतांचं जाळं उमटलं.

प्रत्येक वेळी ‘ठीक आहे, ’ असं आईचं उत्तर सामान्य नव्हतं. दोन्ही मुले आणि त्यांचे बाबा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होते. बाबांसाठी आईच्या खांद्यांचा मोठा आधार होता. तिचं मुलांना रागवणं, ओरडणं बाबांचा राग बाहेर निघण्याला मादत करत होतं. एक तर स्वत: मुलांच्या नजरेत वाईट ठरत नसत. पण पत्नी बोलत असल्यामुळे त्यांचं ब्लडप्रेशर सामान्य होत असे. जेव्हा स्वत: बोलायचे, तेव्हा बी. पी. वाढायचं आणि मग नॉर्मलला यायला खूप वेळ लागायचा. त्यामुळे त्यांच्या गप्प बसण्याने एकाच वेळी अनेक फायदे होत असत.

आज मुलांची आई गप्प बसली होती. बाबांचं सगळं लक्ष तिचाकडे होतं. अनेक विचारांनी गोंधळलेलं मन कुठल्याही ठोस परिणामाशी येऊन पोचत नव्हते. अखेर, तिला झालं तरी काय? इतकी विरक्ती फक्त मृत्यूच्या आधी येते. मग काय, तिचा शेवट जवळ आला की काय? तिच्याशिवाय हे घर कसे चालेल? खाणे-पिणे, कपडे-लत्ते, रागावण्या-ओरडण्यापासून ते अनुशासनापर्यंतची जबाबदारी बाबांना आणि मुलांना पेलवणारी नाही.

आईच्या विचारात आज सूर्य पश्चिमेकडे उगवला होता. स्वत:ला तोलून बघू लागली होती. घरातल्या तिन्ही सदस्यांची काळजी घेता घेता थकली होती. घराची गाडी रुळावर ठेवण्याच्या प्रयासात तिचा स्वत:चा स्वभावाच बदलून गेला होता. रागावणं, संतापणं, ओरडणं हे सगळं, सतत चालू राहायचं. सारी इंद्रीय, चैतन्यावस्थेतही चेतनाशून्य होऊन जायची. आतला देव झोपायचा आणि दैत्य जागा व्हायचा. तेव्हा घर, घर न होता त्रासघर बनायचं. आईला स्वत:ला या वागण्याचं दु:ख व्हायचं. आपाल्यांच्याच वर रागावून ती कशी खुश होणार? तिला स्वत:चाच राग यायचा. मुलांची काळजी वाटायची. दोन्ही तर्‍हेने ती तुटून जायची. सगळ्यांना खूश बघण्याच्या प्रयत्नात सगळ्यांना दु:खी करायची आणि स्वत:देखील दु:खी व्हायची.

आज पूजा करून उठली, तेव्हा ती खूप थकलेली होती. शारीरिक नाही, मानसिक थकवा होता तो. आता तिला शांती हवी होती. तिने विचार केला, का ओरडायचं, ? कुणासाठी ओरडायचं, ? माणसाने चूक केली, स्वत: समजून घ्यावी. नाही समजला तर ठोकर खाईल. पडला, तर आपला आपण उठेल आणि स्वत:ला सावरायचा प्रयत्न करेल. जो करेल, तो भोगेल. मग जाणेल. आपलेपणालाच निष्ठूरतेने अस्वीकृत केलं. जेव्हा दु:खही राहिलं नाही, तेव्हा रागही उडून गेला. त्यामुळेच आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या आईचा जन्म झाला.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिन्दी कथा – “कुहासा“

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – [email protected]

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फोनकाका…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ फोनकाका…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

” फोनकाका…. “

“ नमस्कार, बोला… “

फोनकाका कधीच ‘हॅलो’ म्हणायचे नाहीत. त्यांचं फोनवरचं बोलणं ‘ नमस्कार ‘ म्हणतच सुरू व्हायचं.

मला फार आवडायचं ते.

फोनकाकांचं खरं नाव मधूकाका दांडेकर. ते आता आठवावं लागतं. कारण, आमची आख्खी बिल्डींग,

त्यांना ‘फोनकाका’ म्हणूनच ओळखायची. ओनरशीपच्या ऊमेदीच्या काळातली आमची बिल्डींग.

अवतीभवती भरपूर रिकामी जागा. सगळी मध्यमवर्गीय घरं. कुठल्यातरी वाड्यातून नाहीतर चाळीतून इथं आलेली… इथला ‘फ्लॅट’ घेताना ‘फ्लॅट’ झालेली साधी माणसं.

आपली मूळ अघळपघळ संस्कृती न विसरलेली. खाजगीपणाचा संसर्गजन्य रोग इथं पसरला नव्हता.

सगळ्या फ्लॅट्सची दारं सताड उघडी असायची. पंचवीस तीस पोरांचा धुडगूस सतत चालायचा.

दांडेकरांचं घर तेवढं उच्चभ्रू वाटायचं. बाकी कुठल्याही फ्लॅटमधे न दिसणारी एक वस्तू… अनमोल, अलौकिक… ती मधुकाकांच्या घरी होती. काळा कुळकुळीत फोन. कोकिळेने कुहू कुहू करावं, तसा ट्रिंग ट्रिंग वाजायचा.

लहान असताना मला, श्रीमंतीची भारी भारी स्वप्न पडायची. स्वप्नात मी मोठ्ठा माणूस झालेला असायचो.

मला गाडी, बंगला काहीही दिसायचं नाही. दिसायचा तो फक्त, पुढच्या खोलीत ठेवलेला फोन.

खरंच, फोन असणं मोठेपणाचं लक्षण असायचं तेव्हा. फोनकाकांचं पेठेत मोठ्ठं किराणामालाचं दुकान.

घरी आणि दुकानात दोन्हीकडे फोन. सकाळी सकाळी फोनकाकांचे पुण्यामुंबैला ट्रंककाॅल चालायचे.

ट्रंककाॅल म्हणजे गावजेवण. भावांच्या चढऊतारानुसार फोनकाकांचा आवाज फिरायचा.

आम्ही खाली खेळत असायचो. सगळं ऐकू यायचं. आम्ही तालासुरात फोनकाकांच्या आवाजाची नक्कल करायचो.. अगदी फोनकाकांची चिलूसुद्धा. फोनकाका कधीही रागवायचे नाहीत. खिडकीतून खाली बघत आपल्या सफरचंदी गालातल्या गालात हसायचे.

एकदा गंमतच झाली. आम्ही खाली खेळत होतो. खेळता खेळता माझी फोनकाकांची नक्कल चालूच होती… 

” नमस्कार, बोला… “.. मी फाॅर्ममधे.

एकदम फोनकाकांची हाक. ” कौत्या, वर ये जरा.. “.. चिडका आवाज. माझी तंतरली. मी घाबरत घाबरत वर..

‘ बस… एक फोन येईल आता. माझ्या सासूचा. माझ्या आवाजात बोलायचं.

‘ सध्या दुकानात दिवाळीची गडबड आहे. डिसेंबरात येवू.. ‘.. असं सांगायचं.. “

मी डिट्टो फोनकाकांसारखं बोललो… फोनकाका खूष. मूठभर काजूचा प्रसाद घेवून खाली पळालो.

संध्याकाळी मातोश्रींनी पाठीचा पाटा-वरवंटा केला.

” मेल्या, काय मिळवलंस असा आवाज काढून? दीड वर्ष झालं, चिलूची आई माहेरी गेली नाहीये.

मधुभाऊजींचा आवाज काढून, नाही जमणार म्हणालास, थांब तुझ्या कानात फोनची ट्रिंग ट्रिंग वाजवते. “

नंतर खरंच चार दिवस माझ्या कानात ट्रिंग ट्रिंग ऐकू यायचं.

 

एरवी फोनकाकांचं घर म्हणजे चावडी. सतत कुणीतरी बसलेलं असायचं. स्वयंपाकघरात चहाचं आधण सदैव ठेवलेलं. कुणाचा तरी फोन आलेला. कुणाचा तरी यायचा असायचा. फोनकाकांच्या घरानं कधी तक्रार केली नाही. घरचं कार्य असल्यासारखं फोनकाका निरोप द्यायचे.

कधीतरी बाबांचा फोन यायचा. फोनकाकांची हाक ऐकू यायची.

” भार्गवा कर्दनकाळ बोलावतोय रे… “.. कर्दनकाळ म्हणजे बाबांचे बाॅस. बाबा पळत पळत फोनकाकांकडे.

 

बिल्डिंगमधील कित्येक पोरींच्या लग्नाचा होकार फोनकाकांकडनंच समजायचा.

मला अजूनही आठवतंय. वैशूताईचे बाबा फोनकाकांकडे बसलेले. रात्री आठची वेळ. ते फोनकडे डोळे लावून बसलेले. तिकडून पसंती यायची होती.

फोन वाजला. फोनकाकांनी घेतला. काही न बोलताच ठेवून दिला.

” आप्पा, योग नाहीये रे.. ” वैशूताईचे बाबा डोळे पुसत घरी गेले.

मी बिल्डींगभर सांगत सुटलो.

” मी वैशूताईच्या बाबांना रडताना बघितलंय. “

तेव्हा काही नाही वाटलं. आता आठवलं की स्वतःचीच लाज वाटते.

महिनाभरानंतरची गोष्ट. मी वैशूताईकडे बसलेलो. फोनकाका धावत धावत आले… 

” आप्पा, नशीब काढलं पोरीनं. वहिनी साखर आणा आधी. आपली वैशू पसंत आहे त्यांना. आत्ताच नवऱ्या मुलाच्या काकाचा फोन आला होता. ” एवढं बोलून फोनकाकांचे डोळे वहायला लागले.

मला कळलंच नाही… ‘ एवढी मोठी माणसं आम्हा लहान मुलांसारखी, सारखी रडतात काय ?’

एकदा रात्री पावणेबारा वाजता आमचं दार वाजलं. बाहेर फोनकाका. मी जागा झालो.

हलक्या आवाजात बाबांशी काहीतरी बोलले. बाबांच्या डोळ्यात पाणी. फोनकाकांनी बाबांच्या हातात, एक खाकी पुडकं दिलं. आई तर रडायलाच लागली. फोनकाका बाबांना घेवून स्टॅन्डवर गेले. मी तसाच झोपलो.

दुसऱ्या दिवशी कळलं. गावाकडनं फोन आला होता. माझी आजी सिरीयस होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचं होतं. फोनकाकांनी दहा हजार रुपये आणून दिलेले. बाबा नको नको म्हणत होते.

फोनकाकांनी ऐकलंच नाही. फोनकाका म्हणजे, फोनबाप्पा वाटायचे आम्हाला.

हळूहळू आम्ही मोठे झालो. काॅलेजात जायला लागलो. एके दिवशी सकाळी फोनकाकांनी बोलावलं.

” कौत्या, ही पमा कोण ?” मी जीभ चावली.

” काल रात्री फोन आला होता तिचा. तुला मुद्दामहून बोलावलं नाही. तुझा बाप होता ना घरात. बस इथं फोनजवळ. साडेसातची वेळ दिलीय तिला. आवाजावरनं चांगली वाटत्येय पोर. बघ, काही जमतंय का ?”

आयुष्यात मी पहिल्यांदा लाजलो.

.. जमलं. पमाशीच जमलं माझं. आधी आमचे गुपचूप फोन. मग दोन्ही व्हीलन बापांची समजूत.

साखरपुडा… लग्न… हनीमूनला गेल्यानंतर घरी केलेला फोन… सगळी फोनकाकांची कृपा.

एवढंच काय, मृण्मयीचा जन्म झाल्याची बातमी सुद्धा पहिल्यांदा फोनकाकांनाच समजली.

मृण्मयीचा जन्म झाला त्याचवर्षी फोनकाकांच्या चिलूचं लग्न झालं. चिलूशिवाय जगणं फोनकाकांना फार जड गेलं.

याच काळात बिल्डींगीत फोनची संख्या वाढली. घरटी फोन आला. फोनकाकांचं काम संपलं.

आता तर… पंधरा वर्ष झाली बिल्डींग सोडून. मृण्मयी दहावी झाली यंदा. तिला काल नवीन सेलफोन घेवून दिला.

” बाबा, पहिला फोन मी तुला करणार. “.. गॅलरीतनं तिनं फोन लावला.

मी उचलला.

” नमस्कार, बोला…. ” एकदम जीभ चावली. कधी सवय लागली, कुणास ठाऊक ? एकदम फोनकाकांची आठवण आली.

‘ते काही नाही. उद्या रविवार आहे. भेटून येवू यात. सगळेच जाऊ यात… ‘

ठरलं तर.

फोनकाकांचा नंबर पाठ होताच. मी डायल केला. पलीकडनं कापरा आवाज आला.

” नमस्कार, बोला…. “

माझ्या डोळ्यातून पाणी.

‘ एवढी मोठी माणसं लहान मुलांसारखी रडतात कशी ? ‘

– – तेव्हा नव्हतं कळलं.

पण आता कळलं – – 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बैल गेला नि झोपा केला… + संपादकीय निवेदन – सुश्री शीला पतकी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शीला पतकी 

💐 अ भि नं द न 💐

“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..

खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.

– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.

© सुश्री शीला पतकी

सोलापूर 

मो. 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वृद्धाश्रम… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ वृद्धाश्रम… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मागच्याच आठवड्यात आईवडिलांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस लेका सूनाने (राज आणि नेहाने) मोठ्या उत्साहात साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सून मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली.

राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथ ब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला.

राज किती खर्च करतोस आमच्यावर ? न राहवून आई-बाबांनी विचारले.

दोन दिवस आपल्याला पाचगणी, महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला, राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला.

पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी, महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहवून आईने विचारले, राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे ?

आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून, राज त्याच्या रूममध्ये गेला.

तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईकडून चुकून फोन स्पीकर मोड मध्ये टाकला गेला.

फोनवरून नेहा विचारत होती राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले ? पाचगणी, महाबळेश्वर दर्शन झाले ? आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचायचे आहे, पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला.

नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का ? कशासाठी ? आपलं काही चूकलय का ? निर्णय पोटच्या गोळ्याचा, की सुनेचा ? असंख्य, अनुत्तरित प्रश्न !

आबासाहेब म्हणतात, साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो, त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले, आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे, घरातील कटकटी कमी झाल्या, आणि शांतता निर्माण झाली, असे राजचा मित्र राजला सांगत होता.

आई म्हणते, मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून ऊठूही शकत नव्हते, आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो, आपण आपलं सर्व काही करतो, शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोहोचवता, शाळेतून घरी आणता. मी देखील नेहाला स्वयंपाकात, नी घर कामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना ?

मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले, तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून, त्यावर पट्टी बांधली, आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा, अजिबात काम करू नका. खुप प्रेमळ आहे हो नेहा !

आबासाहेब म्हणतात, राज ही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो, तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला, तर रात्रभर उशाशी बसून होता.

आई म्हणते, दोन-तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल, म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल.

आबासाहेब म्हणतात, अगदी तसेच असेल, तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे, आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ.

आई म्हणते, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते, आणि खूप हाल होतात, असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का?

आबासाहेब म्हणतात, नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा, ते न मिळालेलंच बरे!

चला उशीर होतोय झोपू या, उद्या सकाळी लवकर उठायचे, आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी (वृद्धाश्रमात) जायचे ना. आलिया भोगासी असावे सादर म्हणत, आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली, राज आणि नेहाचा प्लॅन, अर्थात् कटकारस्थान आपल्याला समजला आहे, हे अजिबात दाखवायचे नाही. जे होतेय त्यात समाधान मानायचे.

प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. दोघांचा संवाद चालूच असतो.

आई : एक विचारू ?

आबासाहेब – विचार !

आई – वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का ? निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का ? राहायला नव्हे, फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. आपण तेथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे. फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. राज, नेहा आणि नातवा शिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून. अजून एक विचारू ?

आबासाहेब – तुझा एक कधीच संपत नाही. विचार, विचार.

आई – निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो ?

आबासाहेब – येईल, राज नक्की येईल, तो तितका कठोर नाही. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल. मी सांगतो ते ऐक. जर मी प्रथम गेलो, आणि राज आला नाही, तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस, आणि राज आला नाही, तर मी तुला अग्नी देईन.

आई – जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर ?

आबासाहेबाकडून कोणतेही उत्तर आले नाही, बहुधा त्यांचा डोळा लागला असावा.

साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता, आणि बरंच काही बोलत होता, आई बाबा मात्र गप्प गप्पच ! दुतर्फा दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले, बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता – पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा !

वृद्धश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून, ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॅानफरन्स हॅाल, मिटींग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर रहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता. वार्षिक फी १ लाख प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिले होते.

चहा पिता पिता, मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे, चला आपण जाऊया. आई-बाबांनी मन घट्ट केले.

मिटींगरूममध्ये २५-३० लोक जमले होते. राज पुढे झाला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आई-बाबांना खूप आवडला. हो ना ? राजने आई-बाबांकडे पाहिले. डोळ्यांतले अश्रू लपवत, आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलावली !

राजने आईबाबा दोघांना पुढे बोलावले, आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आई-बाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही.

मॅनेजर साहेब, निघतो. राज म्हणाला.

राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव, आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आई-बाबा म्हणाले.

हे काय, आईबाबा ? मला एकट्यालाच पाठवता ? राजने विचारले.

म्हणजे, आम्हीही यायचे ? खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले.

अर्थातच, राज उत्तरला.

आणि ते २ लाख रुपये, वृद्धाश्रमाच्या फी चे ? आईबाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले.

छे, छे, ते तर तुमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त, तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय, राजने उत्तर दिले.

आई-बाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला, आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम ? लवकर परत या. मी आणि मुलं तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत, आणि हो, येताना, शिरवळला आईंची आवडती भजी, आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका.

नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने, झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवापासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नी मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते.

कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता – मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ? काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाग्यवान – सौ. उज्ज्वला केळकर, वेळेचा अभाव – सुश्री अनिता रश्मि, संशोधन – सुश्री अर्चना तिवारी, ममत्व – सुश्री अर्चना तिवारी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भाग्यवान – सौ. उज्ज्वला केळकर, वेळेचा अभाव – सुश्री अनिता रश्मि, संशोधन – सुश्री अर्चना तिवारी, ममत्व – सुश्री अर्चना तिवारी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

☆ ☆ ☆ ☆

१) भाग्यवान

दादा आणि भाऊ बालमित्र. दोघेही एका शाळेत, एका वर्गात शिकले. पुढे दादासाहेब शाळेत मास्तर झाले आणि नंतर हेडमास्तर. भाऊसाहेब एका कचेरीत कारकून म्हणून लागले. पुढे हेड क्लार्क झाले.

दोघांची लग्ने जवळपास एकदमच काही महिन्यांच्या अंतराने झाली. दादांचा मुलगा आदित्य आणि भाऊंचा मुलगा गौरव हेही समवयस्क. दादांना पुढे अमेय झाला. भाऊंना मुलगी झाली गौरी. ही सारी मुलेही एकाच शाळेत शिकली.

दादांची मुले आदित्य आणि अमेय अतिशय हुशार आणि प्रखर बुद्धीची. सतत नंबरात असलेली. स्कॉलरशिप मिळवणारी. दादांना त्यांचा अभिमानच नव्हे, तर गर्व होता. भाऊंच्या पुढे ते आपल्या मुलांचं वारेमाप कौतुक करत. आपण किती नशीबवान आहोत, हे वारंवार बोलून दाखवत. त्यांना थोडसं हिणवतसुद्धा. भाऊंची मुलेही हुशार होती, पण दादांच्या मुलांप्रमाणे चमकत्या करिअरची नव्हती.

आदित्य पवईहून एम. टेक. झाला. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. सुंदर, सुविद्य पत्नी मिळाली. पुढे परदेशात मोठे पॅकेज मिळाले. तो अमेरिकेला निघून गेला. अमेयही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेला गेला. तिथेच स्थिरावला. तिथेच लग्न केले. संसार मांडला.

गौरव डिप्लोमा झाला. नंतर एम. बी. ए. केले. टू व्हीलर दुरुस्तीचा वर्कशॉप सुरू केला. गोड बोलणं, कष्ट करण्याची तयारी यामुळे गौरवचा धंद्यात चांगलाच जम बसला. पुढे त्याने टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. त्याचाही संसार मार्गी लागला.

दादा आणि भाऊ आता निवृत्त झाले होते. ते रोज संध्याकाळी भेटत. एकत्र फिरायला जात. वाढत्या वयानुसार रोजची भेट अधून मधून झाली. नंतर नंतर दुर्मिळ होऊ लागली. दोघांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. गौरव आपल्या वडलांची काळजी घेत होता. अधून मधून आपल्या दादा काकांकडे येऊन त्यांचीही विचारपूस करत होता. त्यांना काय हवं- नको ते बघत होता. गरजेच्या गोष्टी आणून देत होता

दादांची मुले अमेरिकेत गेल्यानंतर सुरूवातीला एक-दोनदा येऊन गेली. नंतर नंतर मात्र त्यांना यायला वेळ मिळेनासा झाला. दादांना पेन्शन होती. ते काही आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलांबून नव्हते.

दादांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ दादांच्या रक्तप्रवाहात ब्लॉकेजेस निघाली. अ‍ॅंजिओप्लास्टी करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ दादांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ गौरवने दादांचे सारे मुलाच्या मायेने केले.

दादांना आताशी वाटू लागलय, आपली मुलं थोडी कमी हुशार असती तर बरं झालं असतं. भाग्यवान आपण नाही. भाऊ आहे.

लेखिका : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(२) वेळेचा अभाव 

फेसबुकवर जशी काही स्पर्धा चालू होती. क्षणांशात एक नवीन पोस्ट त्याने टाकली. त्यात अनेक फोटो सामील होते. रंग बदलणारे ढग, चित्रकार सूर्य, झाडांचे, पर्वतराज हिमालयाचे, मोहवणार्‍या आकर्षक धारणीचे, हसणार्‍या खिदळणार्‍या रत्नाकराचे, सर्पिणीसारख्या नागमोडी वळणाने जाणार्‍या सरितांचे, याचे… त्याचे… आणखी किती तरी…

यावेळी दु:खी-कष्टी झालेल्या सुनीलने आपल्या मृत झालेल्या वडलांचा देह आणि हार घातलेला त्यांचा फोटो अपलोड केला. आसपासच्या आगरबत्यातून, वर वर चढत जाणार्‍या धूम्ररेखा नुकतंच त्यांचं निधन झाल्याची ग्वाही देत होत्या.

सगळ्यात जास्त लाईक्स या फोटोला मिळाले.

एका बहिणीने आपल्या भावाला फोन केला,

‘तू त्यांच्याकडे जाऊन का आला नाहीस? निदान पोस्टवर त्यांच्याविषयी श्रद्धांजलीचे दोन शब्द तरी लिहायचे. सुनीलला सांत्वना मिळाली असती. ’

‘ताई तेवढा वेळ नव्हता. लाईक तर केलं ना?’ आणि तो पुन्हा विविध सुंदर दृश्यांचे फोटो आपलोड करू लागला.

मूळ कथा – समयाभाव

मूळ लेखिका – सुश्री अनिता रश्मि, मो. 9431701893

अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(३) संशोधन

‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा. ’

‘फारच छान!’

‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या. ’

‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय. ’

‘अरे, नि:संकोचपणे सांग. ’

‘सर, शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’

‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं. ’

‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’

‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’

‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’

‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’

‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’

अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्‍यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये. ’

‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’

‘हे बघ, ज्या शेतकर्‍यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’

‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय. ’ 

‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्‍या ठरतात.

मूळ कथा – शोध

मूळ लेखिका – सुश्री अर्चना तिवारी, मो. – 7499103852 

अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(४) ममत्व 

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये. ’ 

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व

मूळ लेखक – अशोक दर्द

मो. 9418248262 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… भाग – २ – लेखिका : सौ. आशा दिपक पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मोलकरीण… भाग – २  – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.) – इथून पुढे — 

सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलता बाईंना प्रश्न केला, “मॅडम आपल्या सोसायटीतल्या मोलकरणीबाबत सगळं ठाऊक असतांनाही तुम्ही तिला कामावर ठेवलंत, इतकंच नाही तर सोसायटीतल्या इतर फॅमिलीनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात. या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का?

‘हो ना, आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पतीही घरी एकटेच असतात कधीकधी. कसा विश्वास द्यायचा ह्या बाईचा?’ लेलेबाई बोलल्या त्यांच्या मिस्टर आणी इतर बर्‍याचजणांनी त्यांची री ओढली.

“हिला कामावरुन बंद करा चारुलताबाई, आत्तापर्यंत आम्ही हिला सोज्वळ म्हणत होतो. पण नवरा गेल्यापासुन ही बदललीच. विधवा, बेसहारा म्हणून कामं देतो आम्ही पण अहो ही चक्क धंदा करते. “रागिणी धुसफुसली

तशा, चारुलताबाई ओरडल्या, ‘थांब रागिणी, एखाद्यावर आरोप लावण्याआधी, विचार करावा माणसानं, गेली सहा वर्षे ही काम करते आपल्याकडे. आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती?सहा महिन्यापुर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरु घेऊन, खाली मान घालून आपलं काम करत जगते ती. ‘

‘म्हणून काय तिने असं….. ‘

मध्येच बोलणार्‍या रागिणीच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई म्हणाल्या, ‘माझं पूर्ण होऊ दे, मिस्टर ऋषी. असं अचानक काय झालं की तुम्हाला विनया धंदा करते याचा शोध लागला जरा सांगाल आम्हाला?’

‘मी पाहिलंय हिला एका माणसाबरोबर. हे हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्क रागिणी नसतांना मलाही खाणाखुणा करते, घाणेरडे हावभाव करते. ‘

‘नाही ओ साहेब मी कधीच असं केलं नाही. मी नाही ओ तसली बाई. कसं पटवून देऊ तुम्हाला?’विनया कळवळली.

तसं लेलेबाई पुन्हा करवादल्या.. ‘गप्प गं, तुझ्यासारख्या खाली मान घालणार्‍यांच्या अंगातच खेळ असतात. ‘.. खरं म्हणजे लेलेबाईंचा खरा राग चारुलतावर होता. कारण नेहमी टिपटाॅप राहणार्‍या, हसतमुख आणि इंप्रेसिव्ह चारुलताचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोलीत मिळालं होतं. ‘

‘पण माझेही मिस्टर बर्‍याचदा घरी असतात एकटे. त्यांना नाही अनुभव आला कधी असला. ‘चारुलताबाई बोलल्या.

तेवढ्यात सौ. पाटणकर कुजबुजल्या ‘तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर’आणि हास्याची खसखस पिकली.

तशा आवाज चढवून चारुलताबाई म्हणाल्या, ‘ माझे मिस्टर शामळू नाहीत. तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात ते. पाटणकरबाई तुमच्या ह्यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी आॅफिसमध्ये केलेली अफरातफर त्याना तुरुंगात घेऊन गेली असती. ती भानगड माझ्या शामळू मिस्टरांनीच हाताळली होती बरं का?’

तसे पाटणकर बायकोवर खेकसले, ‘ तूला कुठं काय बोलावं हे कळत नाही. आता तोंड मिटा.

‘चर्चेला भांडणाचं रुप येणार असा रंग दिसताच ‘ कामावरुन काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल.’..

तशा चारुलताबाई म्हणाल्या, ‘ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते, मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे, हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही आॅफिसमधून दुपारीच घरी आला होता. कारण तुम्हाला माहित होतं विनया तुमच्याकडे दुपारनंतर येते आणि त्यादिवशी रागिणी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याचवेळी विनयानं तुम्हाला बाजूला ढकललं आणि ओरडली मी हे सगळ्या सोसायटीला ओरडून सांगेन. तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली. विनयानही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिणी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती ढूंकुनही पाहत नसे. चूकून लक्ष गूलं तर तिरस्कारानं मान फिरवत असे. तिला बिचारीला माहितच नव्हतं. माफी मागून तुम्ही स्वःतःला वाचवलं होतं, पण तुमच्यातलं भुकेलेलं जनावर अजूनही तसंच होत. आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात. तेही रागिणी घरी असतांना. विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मात्र तिनंच आपल्याला फशी पाडलंय याचा ओरडून कांगावा केलात. आणि रागिणीनेही कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं. ‘

‘काहीही बोलू नका. ह्यांच्यावर खोटे आरोप करतांना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी. ‘ रागिणी ओरडली.

तशा चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या, ‘लाज तुझ्या नवर्‍याला वाटायला हवी रागिणी. विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घसरुन पडल्या तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोक्त बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून, ती तुला जपत होती. तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तूला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं गं तुला इतक्या चटकन पलटायला. खरी कृतघ्न तर तू आहेस. कसलाच विचार न करता तू विनयाला दोषी ठरवलंस. ‘

”फुकट नाही केलं तिनं काम. जादाचे पैसे मोजलेत तिला. ह्या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करता आहात. काय पुरावा आहे तुमच्याकडे?’

‘पुरावा… ?हा.. हा. पुरावा हवा. तुमच्या आॅफिसमध्ये तुम्ही त्यादिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतलीत. आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरचा सी. सी. टी. व्ही. सांगेलच.. तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे. आपल्या गेटवरचा वाॅचमनही हेच सांगेल. हो ना मिस्टर ऋषी. बर्‍याचवेळा अशी बरीच कारणं देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून. कशासाठी ते सांगू का?’

आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवर्‍याने सरळ माफी मागितली. पण चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ पोलिसकेसची धमकी दिली. तेव्हा रागिणीने पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी केली.

विनया हात जोडून म्हणाली ‘बाईसाहेब, तुम्ही होतात म्हणून मी वाचले. ह्यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगतेय. रागिणीमॅडमनां त्रास नको. ‘

विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यानाच कौतूक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, ‘विनया माझ्याकडे कामाला राहिलच. तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या औटहाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करु. त्याचं भाडं मी स्वतः भरेन. ‘

चारुलताबाईंच्या आभाळाएवढ्या मोठ्या आधारानं विनया भारावून गेली. अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ दहा वर्षे त्या तिथेच राहिल्या. पण विनयाची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती.

पण दिड वर्षापूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये रहायला आल्या. रोज योगा, मैत्रिण कट्ठा, भजन, सत्संग ह्यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला. पण चार महिन्यापुर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला. सुरवातीला निमित्त काढून आत्ता मात्र राजरोसपणे ती चारुलताबाईंच्याकडे जायची. त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने २४तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसवून वेणी फणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्सही चांगलीच होती. पण विनयाच्या मायाळू स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डाॅ. म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात तुम्ही स्वतःहून चालू लागाल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या, ‘नक्कीच होईन डाॅ. कारण ही माझी लेक आहे ना विनया. तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे. ‘

— हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली, ‘आता तूच सांग अश्विन. एका बेसहारा, विधवा स्त्रीला तिचं लेकरु अनाथ होऊ नये म्हणून लेक मानणार्‍या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्‍या त्या महान आईला मी कशी विसरु? मला आता जायलाच हवं. माझ्या मालकीणबाई माझी वाट पहात असतील. ‘ इतकं बोलून विनया घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं झाल्यासारखं वाटत होतं.

सायंकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किटे भरवून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कुणीही घरी न येणार्‍या घराची बेल अशी कुणी वाजविली हे पहायला तिनं दार उघडलं आणि ती पाहतच राहिली. दारात अश्विन आणि अस्मि उभे होते. दोघेही आत आले. बेडवर उठुन बसलेल्या चारुलताबाईंकडे पहात अश्विन म्हणाला, “अगं आई, आटप लवकर. तुझ्या आईलाही तयार कर. अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही नाही आवडणार. आपण ह्यांना आपल्या घरी घेऊन जात आहोत. तिच्या लेकीकडे. चल आटप लवकर. ” विनयाचे डोळे भरुन आले. तिला वाटलं, बघता बघता आपला लेक कित्ती मोठा झाला, वयानं आणि मनानही. तिनं लेकाला आणि सूनेला घट्ट छातीशी धरलं. चारुलताबाई मात्र ह्या आनंदी आणि सुखद धक्क्यानं प्रसन्न हसल्या.. नेहमीसारखं…

— समाप्त —

लेखिका : सौ. आशा दिपक पाटील

कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… भाग – १ – लेखिका : सौ. आशा दिपक पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मोलकरीण… भाग – १ – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे?तुला कितीदा सांगितलं ह्या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलताबाईंकडे गेलीस तर खबरदार” मुलाचं हे रोजचंच होतं;पण आज त्यांच्या सुनेनंही त्यामध्ये तोंड घातलं, “घरात इतकी श्रीमंती असतांना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत कित्ती लाज वाटते. काही तर मुद्दाम विचारतात, तुझी सासू मोलकरीण आहे का गुलमोहरमध्य?”हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती. “आज सोक्षमोक्ष लागू दे आई. तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे?” मुलाने निर्वाणीचं विचारलं. विनयाला माहित होतं, तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घरमालकीणींचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरीबीपोटी आईचा अपमान, हिडीस पिडीस करणार्‍या ह्या सोसायटीनं त्याचं बालपण करपून टाकलं होतं. पण ह्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहित नव्हतं आणि ते कळायचं त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोटतिडकीनं शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत आॅफिसर होता. त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार. महिन्याला घरात लाखानं पैसा येत होता. त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त बंगला बांधला होता. डोळ्याचं पारणं फेडणार्‍या सुखसोयी होत्या त्याच्या बंगल्यामध्ये. नोकरचाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लाऊ देत नसे. अस्मि त्याची बायकोही सासूबाईंचं मन राखून राहत असे. ज्या सोसायटीत त्याची आई धुणीभांडी करत असे, त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानानं आग्रहानं बोलावलं जाई. काही वर्षापूर्वी त्यांना हिडीसफिडीस करणार्‍या ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटे.

पण गेल्या तीन महिन्यापासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारण होत्या ह्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीणबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रांत नटलेली आणि दागिन्यानं सजलेली त्याची आई ह्यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेनं आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विनयाने साबूदाण्याची मऊसुत, गोड खीर बनवून तो नक्षिदार वाडगा घेऊन ती चारुलता बाईंच्या फ्लॅटकडे चालली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा आला होता. एरवी समंजपणे वागणारी सूनही चक्क विरोधात जाउन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली, “बस्स कर रे अश्विन, हो मी आजही मोलकरीणच आहे पण फक्त चारुलताबाईंची आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वेच्छेने स्वीकारलंय हे पद. का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेच तुझ्याशी. आणि हो सूनबाई तू ही ऐक. ‘

असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सूरवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यापुढे उभा राहिला.

विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेल म्हणून आलेलं एक गरीब जोडपं. शहरातल्याच झोपडपट्टीत इतर अनेकासारखं त्यांचं जगणं सुरु झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयानंही इथल्या बायकांच्या ओळखीनं धुण्याभांड्याचं काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करीत होती, त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहरासारखीच श्रीमंत आणि उच्चभ्रु सोसायटी. श्रीमंतीचा तोरा मिरवणार्‍या फॅमिली. पण स्वच्छ, चटपटीत आणि कामापुरतंच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापुनचोपुन साडी, कपाळावर मोठी लाल टिकली, गळ्यात काळ्या मण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांबलचक केसांचा घट्ट अंबाडा, गव्हाळ शेलाटा बांधा आणि काळेभोर मायाळू डोळे असणारी विनया सुहासचीही खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांच एकमेकांवर. वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं. बघताबघता अश्विन चार वर्षांचा झाला. दोन अडीच महिन्याचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची. पण घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी अशी तिची अवस्था व्हायची. सुहास तर बाळाचे कित्ती लाड करायचा. ओढाताण असायची पण आहे त्यात समाधान मानणारी ही नवराबायको त्यामुळेच सुखी होती. पण म्हणतात ना, काहीवेळा नियती खूप परीक्षा घेते एखाद्याची. अगदी तस्सच झालं. साहित्य टेंपोत चढवत असतांना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं. त्याचा निष्प्राण देह पाहून विनयानं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. सैरभैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. माती चावत होती. आसपासच्या बायांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडं पाहताच तिला थोडं भान आलं. या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं हे लेकरु. त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं आणि तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता. दुःखाचे कढ जगण्याला कठोर बनवत होते. नियतीनं केलेल्या विचित्र खेळानं एक हसतं खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विनया सावरली. पोटात अति रक्तस्त्राव झाल्यामूळे सुहास गेला असं निदान झालं. कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच. गरीबाला विम्याचे लाड कुठले करता येणार?त्यात ही टेंपररी नोकरी असल्यानं, कंपनीही खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही.

सुहासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कढ पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली. कोरडी सहानूभुती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाईंच्या घरी गेली. ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. अगदी शिस्तप्रिय आणि कडक. विनयाही टरकून असे त्यांना. पण बाई विनाकारण कुणाला त्रास देत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर. मुलगा आॅस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरु देशात. हे दोघेच पती पत्नी. सामाजिक कार्याची आवड असणार्‍या बाई आणि त्यांना पाठींबा देणारे साहेब. अगदी मेड फॉर इच आॅदर. आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणार्‍या चारुलताला मोकळा गळा, मोकळं कपाळ घेऊन आणि दहाबारा दिवसातच रया गेलेली विनया पाहून भडभडून आलं. त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस्स ह्या एका साध्या कृतीनही विनयाला जाणवलं, कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःख मागे पडत गेलं. विनया कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. ह्या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं दिवसें दिवस. अाणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली. दाणदाण पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिणीने विनयाला फ्लॅटबाहेर ढकललं आणि ती ओरडली, ‘नवरा नाही म्हणून असले धंदे करते. माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटत. पुन्हा ह्या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख. ‘ रागिणीच्या ह्या आकांडतांडवानं अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅटसमोर. प्रत्येकजण काय झाल?काय झालं? असं विचारु लागला. तसं रागिणी जोरात ओरडली, “अहो ही धंदा करते चक्क. माझ्या मिस्टरांनी पाहिलंय हिला. म्हणून त्यांनाही.. शी, सांगवत नाही. इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे. हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून. ” असं सांगून रागिणीने तिला बाहेर काढलं. रडूनभेकून हात जोडणार्‍या, हतबल, अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीनं आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात कुलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन, चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरुन येणार्‍या चारुलताना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. ‘अगं जरा बघून चाल की’, असं म्हणत तिच्याकडे त्या पाहतात तोच, ‘चुकलं हो बाईसाहेब. ‘ म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करुन विनया देऊ लागल्या. तिच्या ह्या भांबावलेल्या, घाबरलेल्या, गालावर बोटांचे ठसे उठलेल्या, बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, ” विनया तू?आणि हे काय झालंय तुला? ” आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून, फिरवलेल्या नजरांनी घायाळ झालेली विनया कोसळली आणि गदगदून रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन आल्या. काय, कसं झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘ तू उद्या सोसायटीत कामाला ये. कुणी नाही घेतलं तर मी तूला कायम कामावर ठेवीन. ‘ ‘पण रागिणीमॅडम, त्या मला कच्ची फाडून खातील. ‘ ती घाबरुन म्हणाली. ‘तिचं मी पाहून घेईन. पण तू कामावर यायचं बंद करु नको’ चारुलताबाईंनी तिला धीर दिला. ह्रदयात वेदनेचा अंगार लपवत विनया दुसरे दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरीबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं. तिनं नेहमीच्या घरांची बेल दाबली पण तिला पाहताच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले… आम्हाला तुझी गरज नाही म्हणत. पण चारुलताबाईनी तिला घरचं काम करू दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती. चारुलताबाईंबरोबर आणखी एकदोघींनी तिला पुन्हा घरकामावर घेतले आणि रागिणीचा थयथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मिटींग बोलावली. आरोपीच्या पिंजर्‍यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चारित्र्यहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं ना. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सौ. आशा दिपक पाटील

कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares