☆ काहीही चालवून घ्यायचे का ???☆ श्री संभाजी बबन गायके ☆
“ ह्याचा पेक्षा चांगला मराठी नाही येतात का? “
वरील ह्याचा या शब्दातील ‘चा’ या शब्दाचा उच्चार ‘चार’ मधील ‘चा’ सारखा समजावा. तसाच ‘चांगला’ शब्दातील ‘चां’ चा उच्चार ‘च्या’ सारखा समजावा!
तर तमाम मराठी वर्तमानपत्रात आज ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वर्तमानपत्रे जाहिरातदारांनी दिलेला मजकूर जसाच्या तसा छापतात हे कबूल. पण म्हणून या मराठी वर्तमानपत्रांनी काहीच नाही म्हणायचं का?
किमान मराठी वृत्तपत्रे आपण मराठी वृत्तपत्रे आहोत याचे भान राखून जाहिरातदारांना बदल, दुरुस्ती सुचवू शकत नाहीत का? की पैसे मिळाले की काम झाले? इतर भाषिक, विशेषतः दाक्षिणात्य लोक त्यांच्या भाषेत एक काना मात्रा अधिक उणा खपवून घेत नाहीत. संगणकामध्ये इंग्लिश स्पेलिंगची अगदी किरकोळ चूक जरी झाली तरी त्वरित तांबडी अधोरेखा दिसू लागते. असे मराठीत कधी होईल?
जर खरेच आपली मराठी भाषा अभिजात म्हणून प्रस्थापित करायची असेल तर सर्व ठिकाणी किमान स्वीकारार्ह मराठी उच्चार, लेखन व्हावे, याचा आग्रह धरला पाहिजे. जाहिराती, सार्वजनिक सूचना या जर मराठीत लिहायच्या असतील तर त्यांतील मजकूर तपासून घ्यायला पाहिजे. यासाठी हे काम करून देणारी अधिकृत संस्था असणे गरजेचे आहे. अशी संस्था नसेल तर ती स्थापन केली गेली पाहिजे. तोवर मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठे यांतील तज्ज्ञ यांचेकडून हे काम विनंतीपूर्वक आणि सशुल्क करून घेणे अनिवार्य करावे.
एक तर बहुतांश जाहिरातदार संस्था अमराठी असाव्यात, असे दिसते. महामार्गांवर जे सूचना फलक दिसतात त्यात लेखन अपराध दिसतात, त्याचे एक कारण म्हणजे देश पातळीवर बहुधा contracts दिली जात असावीत आणि ही contracts बहुदा अमराठी लोकांकडे जात असावीत. अन्यथा असे प्रकार झाले नसते. आंबेगाव चे अम्बेगाव झाले असते का? हिंजवडी (म्हणजे हिंजव हा सलग उच्चार आणि लगेच डी.. जसे पुनव… डी.. म्हणजे पुणे) असे गावाचे नाव आहे.. त्याचे हिंजेवाडी झाले नसते. लोह गाव लोहे गाव झाले नसते. या अमराठी लोकांकडे हिंदी, इंग्लिश जाणणारे लोक उपलब्ध असतात आणि ते याच लोकांकडून मराठी मजकूर लिहून, वाचून घेतात. मग अशा चिंधीवृत्तीने घोटाळे होणारच !
अभिजात मराठीची अशा प्रकारांनी इभ्रत जात असते, हे ध्यानात कधी घेणार आपण? की हेच भाषेचे प्रवाहीपण असे मानायचे?…..
मोरया चा मोरिया, गोट्या चा गोटिया, शेतकऱ्याचा शेतकरीयाचा …. असा हिंदी उच्चार जवळपास सर्वमान्य झाला आहेच. च, ळ इत्यादी मुळाक्षरे अमराठी बांधवांना आणि भगिनींना जड जातात, हे मान्य.. पण म्हणून काहीही चालवून घ्यायचे का?
केवळ पैसे वाचवण्यासाठी contractors, copy writers कुणाकडूनही मराठी कामे करून घेत आहेत.
जर एखादी अधिकृत संस्था स्थापन केली गेली तर बरेचसे नियंत्रण येईल, असे वाटते !
तोवर नाही येत ऐवजी नाही येतात, असे वाचायची आणि ऐकायची सवय करून घ्यावी लागेल.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच असते. मस्ती, गाणी, आणि आटीव मसाला दूध ! तरुणाई तर या पर्वणीची वाटच पहात असते. त्यांना चांदण्यात फिरण्याची एक आगळीच मौज अनुभवायची असते. अगदी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. ‘. अशीच.
अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी व इंद्र ऐरावत पूजनाचा हा दिवस. रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्राला अटीव दुधाचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. यादिवशी नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चंद्राचं एक वेगळंच रूप आपल्याला भासतं. व त्याचं महत्त्वही आहेच. खरंतर पौर्णिमेचा चंद्र नेहमीच छान दिसतो म्हणून तर कितीतरी कवींनी त्याच्यावर कविता केल्यात. अगदी चंद्राची कोर ते पौर्णिमेपर्यंतच्या चंद्राचं आगळं रूप यावर. !
त्यात हवीहवीशी थंडी अन मधुर सुंदर चंद्रप्रकाश मन प्रसन्न करतोच.
निसर्गाचा प्रत्येक रूप तसं लोभस सुंदरच असतं. चंद्र प्रकाशा इतकाच रात्रीचा आभाळभर पसरत जाणारा अंधार देखील. ! अमावस्येलाही स्वतःचं असं एक देखणे पण असतं तसंच पौर्णिमेला पूर्ण बिंबानं शोभणाऱ्या चंद्राचं सौंदर्य ही असतं…. खरंच मुळात पौर्णिमा मनाला भुरळ घालते त्यात शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सौंदर्य अन सगळ्यांचा जल्लोष, गाण्यांच्या मैफिली मस्तच. अगदी लक्ष लक्ष चांदण्यांना स्वच्छ निरभ्र आकाशानं मैफिलीचं निमंत्रणच दिले असं वाटतं. शहरापासून थोडं लांब किंवा एखाद्या बागेत घराच्या टेरेसवर असं मोकळ्या वातावरणात मोकळ्या जागेत याचा जास्त आनंद घेता येतो.
असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्र मंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन. प्रत्येकालाच ती विचारते की ‘को-जागर्ती ‘ ? म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कोणी जागा आहे का ?आणि तिच्या या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. जागरण करतात मग तिची वाट पाहणाऱ्या.. साद देणाऱ्या सगळ्यांनाच ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी देते. हे शीतल कोजागिरीचं चांदणं अंगावर घेतलं की मन:शांती, आरोग्य लाभते कारण अमृताचे काही थेंब तरी आटलेल्या दुधात पडतात. सारं जग जरी झोपलं तरी बुद्धिमान, विचारी, संयमी अन आपले कर्तव्य चोख बजावणारे लोक जागे राहतातच. याबरोबर निदान मौज करण्यासाठी तरी सगळे जागे असतात.
माझ्या माहेरी वालचंदनगरला चाळ संस्कृती हो. सगळे शेजारीपाजारी मैत्रिणी जमून चंद्र चांदण्या पौर्णिमा यांना अनुसरून गाणी म्हणायची. ग्राऊंडवर मस्त फेरफटका मारायचा आणि नंतर दूध घ्यायचे. त्याबरोबर भेळही असायची. लग्नानंतर रेल्वे क्वार्टरच्या पटांगणातच दूध आटवत ठेवायचे. भेंड्या खेळायच्या. शरदाचं चांदणं अंगावर घेत चंद्राच्या सोबतीनं महालक्ष्मीच्या हाकेची वाट पाहायची. आजही आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र जमतो आणि या पौर्णिमेचा आनंद घेतो. चांदण्यात फिरतो. दुधाबरोबरच एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. जीवन जगताना आपल्याला असे छोटे-मोठे आनंद नेहमीच सुंदर जगायला हवे असतात. आपली संस्कृती नेहमीच आपल्याला आरोग्य आणि जीवन याचा समतोल राखायला मदतच करत असते. मनाच्या, शरीराच्या, व्याधी म्हणजे सगळा अंधार त्यामुळे नाहीसा होतो आणि एक सुंदर निरामय जीवन आपल्याला लाभतं …. अन् आजही तनामनातला अंधार मिटवून, एक एक चांदणी मनाच्या निरभ्र आकाशात उमलते. अन पूर्ण चंद्रबिंब अमृत धारा बरसतांना महालक्ष्मीची हाक ऐकू येते,
९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे…
३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!
भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते.
स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.
यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!
अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..
पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.
‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!
पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…
उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.
संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.
आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!
मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.
आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!
आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?
आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!
बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…
आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.
सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !
… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…
☆ शौर्य गाथा : नायक जदुनाथ सिंह राठोड… परमवीर चक्र – लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
नौशेरा सेक्टर येथे एकट्याने डझनावारी शत्रू सैनिकांशी लढून भारतीय सैन्यासाठी महत्वाचा असा एक दिवस वाचवलेला योद्धा.
ही खऱ्या अर्थाने हिरो असलेल्या नायक जदुनाथ सिंह राठोड या राजपूताची वीरगाथा आहे. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तरप्रदेशातील शहाजहानपूर च्या खजुरी गावी झाला होता. भारतीय सैन्याच्या 1/7 राजपूत रेजिमेंट (आताची ब्रिगेड ऑफ गार्डस् ची चौथी बटालियन) मध्ये ते सेवेत होते..
६ फेब्रुवारी १९४८ रोजी काश्मिर मधील नौशेरा सेक्टरच्या तैंधर येथे शत्रूसैन्याच्या अगदी समोरची दोन नंबरची चौकी आर्मी नंबर 27373 जदुनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली होती. ही चौकी शत्रुच्या अगदीच समोर होती. हत्यारांनी सज्ज मोठ्या संख्येतील शत्रुला सामोरे जाण्यासाठी फक्त नऊ सैनिक या चौकीवर होते. ही चौकी जिंकण्यासाठी शत्रूने हिरीरीने लागोपाठ हल्ले केले. शत्रूसैन्याच्या हल्ल्याची पहिली लाट या चौकीवर येऊन आदळली. आपले शौर्य व नेतृत्वगुणाचे प्रदर्शन करीत आपल्या जवळ असलेल्या छोट्या तुकडीच्या हिंमतीच्या बळावर नायक जदुनाथ सिंह यांनी शत्रुला गोंधळात टाकत पळवून लावले.
आपल्यापैकी चार सैनिक जखमी झाले पण तरीही जदुनाथ सिंह यांनी आपले उच्च नेतृत्वगुण व समजदारीच्या बळावर आपल्या हुकुमातील, संख्येने कमी असलेल्या सैनिकांचा मोर्चा बांधून पुढच्या हल्ल्यास सामोरे जाण्यास ते सज्ज झाले. त्यांचे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व व हिम्मतीवर त्यांच्या सैनिकांना पुर्ण विश्वास होता व ते शत्रुच्या हल्ल्याचा सामना करण्यास जय्यत तयार होते. शत्रूसैन्याने दुसरा हल्ला मोठ्या उमेदीने व आधीपेक्षा जास्त सैनिकांसह प्रखरतेने चढवला. शत्रूच्या अपेक्षेविपरीत, अगदीच नगण्य सैनिक राहिले असतांनाही, नायक जदुनाथ सिंह यांच्या शौर्यपुर्ण नेतृत्वाखाली त्यांनी ही चौकी लावून धरली. सर्वच सैनिक जखमी झाले होते. नायक जदुनाथ सिंह यांचाही उजवा हात जखमी झाला होता, तरीही घायाळ ब्रेन गनरला बाजूला सारून त्यांनी स्वतः ब्रेनगनचा ताबा घेतला.
शत्रुसैन्य चौकीच्या अगदी भिंतींपर्यंत येऊन पोहोचले होते, पण नायक जदुनाथ सिंह यांनी पुन्हा अतुलनीय धैर्य दाखवत शर्थीने शत्रूशी लढत राहिले. स्वतःच्या जिवीताची पर्वा न करता जखमांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आपला धीरगंभीर स्वभाव व शौर्य दाखवत लढत रहाण्यासाठी आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवत राहिले.
नायक जदुनाथ यांचा गोळीबार इतका विध्वंसक होता की, चौकी हरण्याच्या स्थितीत असतांनाही विजयश्री खेचून आणल्याचे स्पष्ट दिसत होते. शत्रूसैन्य जमीनीवर विखुरलेल्या त्यांच्या मृत व जखमी सैनिकांना सोडून आरडाओरडा करत पळून गेले.
आपल्या अतुलनीय शौर्याने अत्यंत बिकट परिस्थितीत खऱ्याखुऱ्या योद्ध्याप्रमाणे लढत, कणखर नेतृत्वगुणाचे उदाहरण स्थापित करीत नायक जदुनाथ सिंह यांनी दुसऱ्या हल्ल्यापासून आपल्या चौकीचे रक्षण केले. आतापर्यंत या चौकीवरील इतर सर्वच भारतीय सैनिक वीरगतीस प्राप्त झाले होते. ही चौकी जिंकायचीच या निर्धाराने शत्रूसैन्याने मोठ्या संख्येने आपला तिसरा निर्णायक हल्ला चढवला.
आतापर्यंत खूपच जखमी झालेले नायक जदुनाथ सिंह अक्षरशः एकहाती तिसऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज झाले. अगदी हिंमतीने व कणखरपणे ते आडोशामधून बाहेर आले व पुढे सरसावत असलेल्या शत्रुसैन्याच्या तुकडीवर एकट्याने आपल्या स्टेनगनने अविश्वसनीय असा हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने विस्मयचकीत होत शत्रूसैन्याची तुकडी सैरावैरा पळत सुटली.
नायक जदुनाथ सिंह यांना या तिसऱ्या व निर्णायक हल्ल्यात डोक्यात व छातीवर अशा दोन गोळ्या लागल्याने वीरमरण प्राप्त झाले. अशारीतीने पुढे सरसावणाऱ्या शत्रूवर एकहाती हल्ला चढवतांना दाखविलेल्या धाडस व अतुलनीय शौर्य गाजवत केलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे युद्धातील महाभयंकर अडचणीच्या वेळी या वीर सैनिकाने, नौशेराच्या संरक्षणासाठी असलेल्या आपल्या सैन्याची कुमक व संपुर्ण विभागावर शत्रूसैन्याला चाल करून जाण्यापासून रोखले होते.
अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती समोर दिसत असतांनाही अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वोच्च बलिदान देत हौतात्म्य पत्करल्याचे उतराई होत, नायक जदुनाथ सिंह राठोड यांना युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परम् वीर चक्र’ (मरणोपरांत) प्रदान करुन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते चौथे वीर होते.
देशाला त्यांच्यावर गर्व आहे. “ हे वीर जवान, तुझे सलाम।”
मूळ लेखक- अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांना वेळ देता येतो. आपण म्हणतो पण, काही क्षण हे त्या दोघांनीच स्वतःसाठी जगले पाहिजे. कशी गंमत असते, लग्नाच्या बेडीत अडकलं की जबाबदाऱ्यांमधून दोघांचीही सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवेफुगवे होतात, कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ या वरुन तात्त्विक वाद होतात. पण, दोघांपैकी एक जण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकूळ होते. संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या, काही नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात समजतो. पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्याचे असते ना!कारण, दोघे संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात. भाळणं संपलेलं असतं, आता जपणूक सुरू झालेली असते. म्हणून तर व. पु. म्हणतात, “आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे..”
हे लिहिण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी ” शुक्रतारा मंद वारा.. ” या गीताला पन्नास वर्षे पूर्ण झाली. आणि मुख्य म्हणजे प्रेम, निर्मळ प्रेम काय असते त्याचा अर्थ सांगणारे हे भावगीत आहे. ज्याची मोहिनी आपल्या सर्वांच्या मनावर अजूनही आहे. व. पु. म्हणतात, ” प्रेम म्हणजे नेमके काय तर समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं.. ” या गाण्यातील नायकाची इच्छा काय आहे तर, बाहेर इतके सुंदर वातावरण आहे, मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदने ही तिच्याजवळ व्यक्त करताना, तिने डोळ्यातील भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सारं काही सांगतील. तसंच, तिची साथ ही कायम त्याला हवी आहे. म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत,
” आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा.. “
तारुण्यात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत कितीही वाद झाले तरी त्यांच्यापासून फार काळ दूर राहणे शक्य नसते. एकदा का वयाची पन्नाशी ओलांडली की खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. पण प्रेम कमी होते का? अजिबात नाही. व. पु. म्हणतात, ” भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे.. ” प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं. स्त्री ही जन्मतः लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे हळुवार बंध जोडीदार समजून घेईल असे तिला वाटत असते, किंबहुना खात्री असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासाने इतका भारावून गेला आहे की, त्या प्रेमाचा, मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला आहे. ही मनातली भावना आतादेखील ओठांवर आणताना थोडासा बुजरेपणा अजून आहे. पण एक मात्र नक्की, जसं व. पु. म्हणतात, ” सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.. ” त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळे, तिच्या साथीमुळे सार्थकी लागला हे खरं. म्हणून तर म्हटलं आहे,
” भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा,
तू अशी जवळी रहा.. ”
हे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटले पाहिजे. आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्नं आपण प्रत्येक जण बघतोच. आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा ना, जेव्हा ही दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी तो धरलेला हात हा न सुटणारा आहे, ही भावना मनात असते. आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात, तेव्हा हाच प्रवास जेव्हा डोळ्यासमोर येतो, तेव्हा डोळ्यांतून येणारे अश्रू हे आनंदाचे असतात. कारण, सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो. हेच व. पु. म्हणतात, ” पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो.. ” या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो, “जा, मला तुझी गरज नाही. ” पण जेव्हा गात्रं क्षीण होत जातात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असावी हाच मनाचा हट्ट असतो. किती बदल होतो ना!
” वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा,
तू असा जवळी रहा.. ”
एकमेकांची झालेली सवय, एकत्र घालवलेले क्षण हे आठवून खरंच वाटतं, किती मोठा प्रवास होता हा! या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते. कारण, हे वयच असे असते की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते, तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमताच उरलेली नसते. मी आधी देखील लिहिले होते, साठी, सत्तरी पार केलेल्या तसेच कोणालाही परावलंबित्व नको असते. आपल्या सवयी या जोडीदाराला माहित असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात. म्हणून तर हे सांभाळणं याचसाठी महत्त्वाचे असते. ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी हे गीत इतकं सुंदर गायलं आहे की, जेव्हा ते म्हणतात, तू अशी जवळी रहा. तेव्हा डोळ्यांसमोर झोपाळ्यावर बसलेले आजी आजोबा दिसतात. ज्यांना फक्त सहवास हवाहवासा आहे. म्हणून तर, या गाण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली, पण कधीही कानावर पडले तरी कर्णसुख मिळाल्याशिवाय राहत नाही.
लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आदर फक्त उच्चारी नको, मनापासून हवा–” ☆ श्री जगदीश काबरे ☆
परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी जेव्हा अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, “मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. ” त्यांच्या ह्या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्क बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण ह्या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखावालाच पाहीजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असे नाही वाटत?
वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पध्दतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का मजवातो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे!
कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एकाप्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनीचतेची सुरुवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला आती महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा.
वाचकहो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, नेमके आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचे असे झाले की, नुकताच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काँ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ दिला म्हणून एका प्राध्यापिकेवर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अवमान केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारले गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिले. त्या पत्रातही मराठी भाषेच्या व्याकरणातील त्याने असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचे व्याकरण कळते का हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलिस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचले आहे काय? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहित आहे काय?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरे झाले.
हे ‘उच्चारी आदर’ देण्याचे प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सअप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेले दिसतेय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगायला लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. इ. इ. त्यावेळी मला हसू येते. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरावणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजींचा अपमान करत नाही असे त्यांना वाटते काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचे राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणेच महत्वाचे वाटते. पण खरेतर शब्दांपेक्षा त्याच्या मागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. पण आपल्याकडे आपण उच्चारवाने काय बोलतो यालाच महत्व दिले जाते, आणि हे आपल्या दांभिक संस्कृतीला साजेसेच आहे.
विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान कारतात असे होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसेच देवी आणि आईला सुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा जर अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजीचा एकेरी उल्लेख का खटकावा?
‘शिवाजी कोण होता?’ या पानसरे लिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यात आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून नॉन ईश्शुचा ‘ईश्शु’ करणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातील मतितार्थ बदलणार आहे का?
तसेही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस म्हणून उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणे आवश्यक आहे. पण ज्यांचे भाषेचे ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तींच्या आदर्श आचारणापेक्षा नुसते नामस्मरणच महत्वाचे वाटते. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचे काहीच नसते. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून…
1) कोणाला एकेरी नावाने संबोधले तर त्यांचे मोठेपण कमी होते असे मला वाटत नाही. त्यांचे मोठेपण त्यांच्या कर्तृत्वात असते… नावात नाही.
2) पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” वा प्रा. नामदेवराव जाधव लिखित “खरा संभाजी” अशी कितीतरी पुस्तके आहेत जिथे एकेरी उल्लेख आढळेल. पण याचा अर्थ हा नक्कीच नाही की या लेखकांचा दोन्ही छत्रपतींचा अवमान करण्याचा उद्देश होता. उलट ही दोन्ही पुस्तके वाचल्यावर कळेल की, वास्तववादी चरित्रे तर याच पुस्तकात आहेत.
3) याशिवाय प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘दगलबाज शिवाजी’ हेही एक पुस्तक आहे. नाव वाचून तेव्हाही लगेच लोक असेच भडकत होते. पण जेव्हा हे पुस्तक बाजारात आले, लोकांनी वाचले आणि “दगलबाज” या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तेव्हा टीका करणार्या लोकांनीच प्रबोधनकार ठाकरे यांचे कौतुक केले.
4) सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. एवढेच काय पण मागच्या शतकातील अनेक इतिहासकारांनी – अगदी सेतू माधवराव पगडी यांच्यापासून अनेकांनी शिवाजी राजांचा एकेरीच उल्लेख केला आहे. याचा अर्थ या सगळ्या थोर माणसांना शिवाजी राजांचा अपमान करायचा होता असे म्हणता येईल का?
स्वतःच्या नावापुढे शिवभक्त लावणे, गळ्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा अथवा राजमुद्रा यांचे लॉकेट घालणे ही तर हल्ली फॅशन झाली आहे. पण काय या गोष्टी करून महाराजांवर आपलाच हक्क प्रस्थापित झालाय असे ते समजतात का? खरे पहाता जो कोणी शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवत असेल तर तो जातपात पाळूच शकत नाही. कारण स्वतः महाराज धर्मनिरपेक्ष (secular) म्हणजेच त्या काळाततील 18 पगड जातीतील सर्वांना एक साथ घेऊन स्वराज त्यांना एकसमान मानणारे होते… ते मुस्लिम द्वेष्टे तर नव्हतेच नव्हते. पण हे सर्व शिवभक्त मानतात का? नाही. त्यामुळे असे खोटे शिवभक्त होण्यापेक्षा, आणि एकेरी उच्चारामुळे राजांचा अपमान होतो, असे समजण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलेली थोडी तरी पुस्तके मन लावून त्यांनी वाचली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराज बऱ्यापैकी समजतील. तसेही महाराष्ट्र सोडून सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करूनच त्यांचा इतिहास शिकवला जातो, त्यामुळे एकेरी नावाने त्यांचे कर्तृत्व तसूभरही कमी झाले आहे असे मला तरी वाटत नाही. तेव्हा राजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शंख करण्यापेक्षा स्वतःला शिवभक्त समजणाऱ्यांनी राजांना ‘डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे’, हेच एक मागणे.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
अन्नपूर्णेची परिक्षा-
माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा. “अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.
लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे… असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला….. मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. सौ. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.
एकदा शाळेत जाताना सौ. आईने मला त्या ब्राह्मणाला “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पुजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी मानगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय. ” गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी… तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली. ” ते काय पुटपुटले ते मला काहीच कळले नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरे.
इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरुजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.
आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या, ‘ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर….. ”
गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो.. उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो. ” तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. “ साडेबाराला नक्की जेवायला या. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. ”
आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्हते. आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली, आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.
“बसा नं जेवायला. माझ्यामुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला. ” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे. आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, चवीष्ट होतं जेवण. खरं सांगू माई, आमची मंडळी गेल्यापासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.
आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरुजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे सौ. आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होता. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.
त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझी मोठी बहिण कु. लीला ने गाठले आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्यामुळे बघ आईला केवढा त्रास झाला, ‘ असं म्हणून भरपूर झापलं.
मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. माझ्या क्षमाशिल आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले….. “
तर, असा सकारात्मक विचारांचा धडा सौ. आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणूं.
कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागे आहे असे विचारते.
नुसते शरीराने जागे नव्हे, तर शरीराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा ह्याचा अर्थ.
जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.
आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.
कोजागरी म्हटली की आमच्या लहान पणाचे दिवस आठवतात.. लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्री जागरण करून कोजागरी साजरी करायचो. आधी सगळ्या मैत्रिणी एकत्र येवून कोजागरीचा कार्यक्रम कसा करायचा हे ठरवायचो. मग वर्गळी गोळा करणे व मग सामानाची खरेदी अशी एक दोन दिवस आधी पासून तयारी असायची. कोणाची आई नाहीतर आजी प्रेमाने एखादा पदार्थ करून द्यायची.
सगळ्यात आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या घरासमोरचे अंगण साफ करायचो. ह्याच अंगणात रात्री आम्ही सगळे खूप मैदानी खेळ खेळायचो. खेळून दमल्यावर बैठे खेळ खेळायचो. मधेच मध्यरात्री मसाला दूध प्यायचो. मग नाचं, गाणी, भेंड्या, पत्ते, कानगोष्टी असे कार्यक्रम असायचे.. ह्यात कुणाच्या आई, काकू व आजीचाही सहभाग असायचा. थोडे दमल्यावर कोणी चुटकुले सांगायचे तर कोणी आपल्याला आलेले वेगळे अनुभव सांगायचे.
पहाटे पहाटे सगळ्यांनी मिळून केलेली भेळ, पोहे, बटाटावडा नाहीतर विकत आणलेला सामोसा असा काहीसा बेत असायचा. नंतर सगळ्यांनी अंगणात गोल करून ते सगळे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आनंदात भर म्हणून कधी कधी कोणाचे काका नाहीतर बाबा यांच्याकडून पेप्सीकोला नाहीतर आइस्क्रीम चा कप ही मिळायचा.
त्यानंतर सगळे आवरून पहाटे पहाटे भटकंती म्हणजे फिरायला जायचो. रस्त्यावर थोडी रहदारी वाढली की सगळे आपापल्या घरी छान आठवणी घेवून परतायचो.
लहानपणीच्या ह्या कोजागिरीच्या आठवणी अजूनही इतक्या ताज्या वाटतात की आत्ता एखादी मैत्रीण येईल व आपल्याला खेळायला येतेस का ग म्हणेल असा भास होतो.
आत्ताच्या आणि पूर्वीची कोजागरी साजरी करण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचा समाधान वाटायचे. सगळी मैत्रीची नाती निर्मळ व निरपेक्ष असायची अगदी घट्ट.
आजकालच्या आभासी आयुष्यात सगळ्याच गोष्टीमध्ये कृत्रिमपणा, दिखावा आला आहे …. मग तो नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीमध्ये … अथवा साजरे करण्यामध्ये.
लहानपणीच्या कोजागरीच्या आठवणींची मनात एक विशेष जागा आहे.. नेहमीच लक्षात राहील अशी एक गोड आठवण.
… मैत्रिणी एकमेकांना जणू विचारात आहेत ‘ को जागर्ति ‘ कोण जागर्ती…