मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ….

त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे, कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा …

पण आज उलट झालंय.. प्लास्टिक व थर्मोकोलमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे…

शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण, मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत… कृपया वेळ आली आहे, 

“जुनं ते सोनं ” आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून  सिद्ध झाले आहे ..

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

– केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

– केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.

– त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते; ’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

केरळमध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींगसाठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..

लेखक : डॉ कल्याणकर किरण, M.D. (Ayu.)

आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ, -स्वायु कॅन्सर केयर सेंटर 

-श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म, खारघर, नवी मुंबई. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

 मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

व्यायाम हे औषध आहे.

सकाळ/संध्याकाळ चालणे हे औषध आहे.

उपवास हे औषध आहे.

कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे.

हसणे आणि विनोद हे देखील औषध आहे.

गाढ झोप हे औषध आहे.

सर्वांशी मिळून वागणे हे औषध आहे.

आनंदी राहण्याचा निर्णय हे औषध आहे.

मनातील सकारात्मकता हे औषध आहे.

सर्वांचे भले हे औषध आहे

कधी कधी मौन हे औषध असते.

प्रेम हे औषध आहे.

मन:शांती हे औषध आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत

आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?

प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.

निरोगी रहा आणि आनंदी रहा

दिवसाचा आनंद घ्या

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे 

1950 ते 1970 च्या दोन दशकात जन्म घेतलेले माझ्याशी सहमत होतील. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश केलेली ही पिढी.

पाचव्या वर्षी पर्यंतचे लालनपालन आजी-आजोबा,  काका काकू, आत्या,  आईबाबा,  मोठी भावंडे यांच्या सहवासात होत असे. आजोळचे मातुल लोक तर खूपच लाड करायचे. तिथे रागावणे, डोळे मोठे करणे हे नसायचेच. फक्तच कौतुक आणि लाड. चारच दिवस आलेली माहेरवाशीण आणि नातवंडे आजोळच्या घराचा परमानंद होता.

लालन म्हणजे लाड आणि पालन म्हणजे पाळणे. पाच वर्षांपर्यंत घरात भरपूर लाड असायचे. मुख्य म्हणजे लवकर उठण्याची सक्ती नसे. घरातले सगळेच खाऊ द्यायला, गोंजारायला,  सतत आसपास असत.

आज्जीनं दिलेला लाडू, आईनं दिलेल्या गूळ-शेंगा,  काकानं आणलेला ऊस, बाबांनी आणलेला सुका मेवा अशा खाऊच्या लाडाकोडातलं श्रीमंत बालपण!

आजोबांची काठी,  आत्याची पर्स,  काकांच्या चपला, बाबांच्या स्कूटरच्या किल्ल्या असे ऐवज लपवणे ही त्यावेळेस आवडती खोड होती. त्यावेळी त्यांच्या मूडप्रमाणे मारही भरपूर खावा लागे.

घरची मुले कुठे आणि काय खेळाहेत,  कशानं खेळत आहेत यावर घरातल्यांचं बारीक लक्ष असे. हेच पालन! अशा प्रेमळ शिस्तीच्या  लालनपालनात आयुष्याचा पाया भक्कम व्हायचा. घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी, ओढ आणि सुरक्षितता वाटण्याचं कारण हा भक्कम पायाच आहे.

पाच वर्षांनंतर गुढीपाडव्याला पाटीपूजन केले जायचे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जायची. पाटी आणि पेन्सिल या दोन वस्तू मुलांच्या हाती सोपविल्या जायच्या.

मुलांना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव करून दिली जायची. त्यावेळी पाटीपेन्सिल हे आयुष्यातलं पहिलं साधन. पुढे वही-पेन, फळा-खडू, हे तिचे वारसदार.

पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायची. एक एक अशा अकरा आकड्यांची.  देवासमोर पाटीपूजन करायचं. मग ती मुलांच्या स्वाधीन केली जायची. मार्च-एप्रिल मध्ये गुढीपाडवा येतो, महिनाभर पाटी जपून ठेवली जायची. कधीतरी दुपारी हळूच पाटीवर सूर्य, फूल, चांदोबा ,  झाड अशी चित्रे काढायचा प्रयत्न चालू असायचा.

जून मध्ये शाळा सुरू होते.  एका हातात डबा ( कडीचा स्टीलचा डबा)

आणि दुस-या हातात पाटी. खिशात पेन्सिलीचा तुकडा.  नवा कोरा शाळेचा ड्रेस. तो मापानं मोठाच शिवलेला, दोन वर्षांची बेगमी.  

अगदी सुरवातीला मण्यांची पाटी म्हणजे पाटीच्या अर्ध्या भागात दहा तारा , प्रत्येक तारेवर दहा, नऊ, आठ, सात असे एक पर्यंत रंगीत मणी ओवलेले.( आठवले का?) त्या मण्यांच्या मदतीने गणिताच्या दुनियेत पाऊल टाकलं.

त्यानंतर मणी नसलेली पाटी. तीही दोन आकारात उपलब्ध होती..लहान आणि मोठी. आम्हाला दुसरीच्या वर्गात लहान पाटी आणि तिसरी, चौथीला मोठी पाटी दिली गेली. आणखीही एक पाटी मिळायची, डबल पाटी.

म्हणजे दोन पाट्या जोडपट्टी लावून एकत्र केलेल्या असत. पेन्सिलीनं लिहिलेलं पुसलं जाऊ नये, म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे ठेवले जायचे.

एक अख्खी पेन्सिल शाळेत पोचेपर्यंत अख्खी असायची, लिहायला सुरुवात केली कि, तुकडे कधी व्हायचे ते कळतच नव्हते. मग ते तुकडे लिहून संपेपर्यंत नवी मिळायची नाही. त्यावेळी एकमेकांना पेन्सिलीचे तुकडे देऊन  मदत करण्यात खूप आनंद वाटायचा.

पेन्सिलीचा षटकोनी आकार इतका योग्य कि चिमुकल्या बोटांतली शक्ती गरजेपुरतीच लागेल, इतका विचार करून निर्मात्यांनी तयार केली असे.

अंगठा, तर्जनी आणि मधले बोट या त्रयींची पेन्सिलीशी दोस्ती झाली की पाटीवर अक्षरे व अंक डौलदारपणे उतरत. या तीन बोटांचा संबंध थेट मेंदूशी होऊन तिथल्या पेशी तरतरीत होऊन अपेक्षित परिणाम पाटीवर दिसे. अॅक्युप्रेशर हा शब्द खूप नंतर कळला. त्यावेळच्या शिक्षण तज्ञांनी इतक्या लहान वयाच्या मुलांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा सर्वांगाने विचार करून ही पद्धत आचरली असणार.

पाटी सांभाळणे म्हणजे लिहिलेले पुसले जाणार नाही  आणि पाटी फुटणार नाही याची काळजी घेणे,  पेन्सिलीचे तुकडे सांभाळणे ही जबाबदारी पाच ते नऊ वर्षाच्या बालकांवर होती .

पाटीवर लिहिल्याने अक्षर वळणदार आणि टपोरे होते, हे मात्र खरं!!

चौथीतून पाचव्या इयत्तेत गेल्यावर पाटी पेन्सिल चा निरोप घेऊन वही पेन यांची ओळख होत असे.

त्या बालवयातलं बालगीत ” शाळा सुटली पाटी फुटली,  आई मला भूक लागली ” हे गाणं प्रत्येक बालकाच्या मनातलं होतं.

कालानुरूप ते बालवयही मागे पडले,  त्याबरोबरच पाटीपेन्सिल ही कालबाह्य झाली.

इतका मोठा बदल होईल, अशी कल्पना ही कुणी केली नसेल.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

(म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. इथून पुढे…)  

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा ! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी …. 

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा 

…असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले ! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता,तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे. 

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान ! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे. 

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं ? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे. 

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहूचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले. तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे. 

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं. 

– समाप्त –

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बोका तांदूळ… लेखक श्री किशोर देसाई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(न शिजवलेला बोका तांदूळ व  शिजवलेला भात)

? इंद्रधनुष्य ?

☆ बोका तांदूळ… लेखक श्री किशोर देसाई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ

भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यातही तांदूळ हे मुख्य पीक आहे. महाराष्ट्राचा आंबेमोहोर, अजरा घनसाळ तांदूळ, कोकणातील लाल उकडा तांदूळ, उत्तर प्रदेशाचा कालानमक तांदूळ, बासमती तांदूळ, पश्चिम बंगालचा गोविंदभोग, तुलाईपंजी, मणिपूरचा चकहाओ, केरळचा हट्टा तांदूळ, पोक्कली तांदूळ, वायनाडचा गंधकसाला, जीराकसाला, तसाच आसामचा करणी तांदूळ आणि बोका तांदूळ….  हे सगळे भारतीय सरकार द्वारे GI  (Geographical Identification) मानांकनप्राप्त तांदूळ आहेत.

हे जरी खरे असले तरी आसामच्या बोका तांदळाची गोष्ट काही औरच आहे आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण उठून दिसते. सर्वात प्रथम म्हणजे बोका तांदूळ शिजवण्यासाठी काहीही म़ेहनत लागत नाही. आग नाही, लाकडे नाही, उकळते पाणी नाही, की गॅससुध्दा लागत नाही. तर आसामचा हा सुवासिक असणारा जगप्रसिद्ध बोका तांदूळ चक्क साध्या थंड पाण्यात शिजतो. थंड पाण्यात साधारण एक तासभर ठेवला की खाण्यास भात तयार होतो. आहे की नाही जगावेगळी गंमत ! तर असा हा जादुई बोका तांदूळ आहे. जगात ‘मॅजिक राईस’ म्हणून ओळखला जातो.

आसामच्या बोका तांदळाची लागवड –

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजे जून महिन्यात बोका भाताची पेरणी केली जाते.. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका चाळ आसामच्या डोंगराळ आदिवासी भागात घेतले जाते. या भातामध्ये 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. बोका तांदूळ शेतात पिकायला साधारण साडेचार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

बोका तांदूळ प्रामुख्याने आसाममध्ये डोंगराळ भागात पिकवला जातो. या भाताला इथली माती आणि हवामान यातून एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध असतो. बोका तांदळाची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप येथे केली जाते.  

बोका तांदूळाचे एकरी उत्पादन — बोका तांदळाचे इतर तांदळाच्या तुलनेत एकरी उत्पादन तसे कमीच आहे. एक एकर जमिनीवर साधारण 8 ते 10 क्विंटल तांदूळ पिकतो.

बोका तांदळापासून बनणारे पदार्थ — बोका तांदूळ – बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून देखील ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून जोलपान, पिठात राईस केक असे अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. शिवाय बोका तांदूळ – दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

बोका तांदूळाचा ऐतिहासिक संदर्भ –

बोका तांदूळ हा अहोम सैनिक रेशन म्हणून वापरत असत. इतिहासाची पाने उलटली तर बोका तांदळाचा स्वतःचा एक सुवर्ण इतिहास आहे. या भाताने किती युद्धे जिंकायला मदत केली माहीत नाही. ही कथा १७ व्या शतकातील आहे, जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी बोका तांदूळ खात असत. हा तांदूळ रेशन म्हणून युद्धात नेण्यात आला, ज्याला शिजवण्याची गरज नव्हती, कारण साध्या थंड पाण्यात तासभर टाकला की खायला भात तयार. हा बोका तांदूळ जगात फक्त भारतातील आसाम राज्यातील डोंगराळ भागातच तयार होतो. बोका तांदळाचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. हेच कारण आहे की भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्‍या या भाताला GI टॅग देखील दिला आहे. बोका तांदूळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. किसान टाकच्या ताज्या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील शेतकरीही बोका तांदळाच्या लागवडीत खूप रस घेत आहेत. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील शेतकरी रामगोपाल चंदेल यांनीही बोका भात पिकवून नवा विक्रम केला आहे.

तर मित्रांनो फार शोध घेऊन आपल्या स्थानिक बाजारात जर कुठे आसामचा हा बोका तांदूळ मिळाला तर अवश्य आस्वाद घ्या.

लेखक – श्री किशोर देसाई

[email protected]

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ, त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘हेल्दी निग्लिजन्स’हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन.या ‘दोन बाय दोन’च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात.लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं,नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास ,या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची.मुलं अगदी जखडून गेली ,कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, “मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा अजून किती लक्ष द्यायचं?”

“तू जरा जास्तच लक्ष देते आहेस,” रेणूताईंनी म्हटलं,”थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे.जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर तू ताबा ठेवलास, तर कसं चालेल?जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.”

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच, की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना ,हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच,पण न जाचणारं! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय, यावर विश्वास ठेवायला हवा. आपण, ते बुडेल, ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे ,थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात, त्याप्रमाणे ,’ ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं,’ असं तोंडानी बोलत ,मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं .आपण ‘मूल’ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा अधून मधून राजीनामा द्यायला हवा.

लेखक –  श्री शिवराज गोर्ले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री…ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही  अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते,  मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांनी विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रतींनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे  संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर केलेल्या कामावर पाणी चं फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता.  काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी  संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने.याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून, तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

परिचय

श्री विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापक .
  • सोशल मीडियावर गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर लेखन.
  • वर्तमानपत्र, दैनिके इ तून विविध लेख प्रसिद्ध
  • औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून अनेक लेख ‘ उगवतीचे रंग ‘ या सदराखाली प्रकाशित
  • तरुण भारतच्या ‘ आसमंत ‘ पुरवणीत ‘ थोडं मनातलं ‘ हे साप्ताहिक सदर सुरू.
  • आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार इ पुरस्कार…
  • सहसचिव, म सा परिषद, पुणे शाखा चाळीसगाव

प्रकाशित पुस्तके :

  1. कवडसे सोनेरी… अंतरीचे
  2. आकाशझुला
  3. अष्टदीप (आठ भारतरत्नांची प्रेरणादायी चरित्रे)
  4. आनंदाच्या गावा जावे. (आनंद, ज्ञान देत सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेख)
  5. रंगसोहळा (ललित लेख)
  6. रामायण : महत्त्व व व्यक्तिविशेष (रामायणातील पात्रे आणि त्यांचा आजच्या संदर्भातील संदेश, रामायणकालीन शिक्षण, समाजरचना इ रसाळ भाषेत सांगणारे पुस्तक)
  7. महर्षी वाल्मिकी चरित्र (या पुस्तकावर आधारित महर्षी वाल्मिकीच्या जीवनावर एक लघु चित्रपट देखील येणार आहे.)

विशेष :

  • नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वासावर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी आठ वाजता ‘या सुखांनो या’ हा कार्यक्रम प्रसारित होतोय.
  • याच रेडिओवर आनंदघन लता हा कार्यक्रम अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 46 भाग सादर झाले आहेत.

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

गारंबीचा बापू ‘  या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’ रवींद्र साठे यांनी  असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की  मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे.  पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं. 

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली ? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न. 

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या. 

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ 

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ 

‘जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरू राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला. 

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला ( पैस ) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. 

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । 

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

— अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. 

काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.  पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. 

–क्रमशः भाग पहिला 

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् / भरडधान्ये खालीलप्रमाणे :-

1) ज्वारी/ Sorghum millet                                                                           

 – प्रकृतीने थंड, उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खावी. Glutein free भाकरी, लाह्या, पोहे बनवून खाऊ शकतो. 

2) बाजरी/ Pearl Millet                  

  – उष्ण प्रकृतीची, बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी. कॅल्शियम, आयर्न, मुबलक. गरोदर माता, स्तनदा माता यांनी जरूर बाजरी खावी. फायबर्स खूपच असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 

3) नाचणी/ रागी / Finger Millets                                                      

 – नाचणीला Nutrients Powerhouse असे म्हणतात. नाचणीचे दूधही (Ragi milk) तयार करता येते आणि ते खूप पौष्टिक असते. 

4) राळे वा कांगराळे/ Foxtail millet                                    

 – राळ्याचा भात, खिचडी, पोहे असे पदार्थ बनतात. मेंदू आजार, विकार, गरोदर मातांच्यासाठी खूप चांगले. अस्थिरोग/हाडांचे रोग व विकार, स्पाईन/मज्जारज्जू संदर्भातील आजार, विकार यात फायदेशीर. 

5) वरी वा वरीचे तांदूळ वा भगर / Barnyard Millet                          

 – उपवासासाठी, अल्प उष्मांक अन्न / low calorie food, कॅल्शियम, आयर्न खूप जास्त प्रमाणात. फायबर्स खूप जास्त म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर. लिव्हर, किडनी, पित्ताशय/gall bladder आजारात फायदेशीर.  endocrine glands functioning मध्ये महत्त्वाचा रोल व शुद्धिकरणासाठी. 

6) कुटकी / Little millets                      

 – डायबिटीस, थायरॉईड, नपुंसकता ह्या विकारात फायदेशीर, कुटकीपासून भात, पोहे, पापड बनतात. 

7) हिरवी कांगणी / Browntop millets / Green millets                                       

– हिरव्या कांगणीत सर्वाधिक 12.5% फायबर्स असतात. मूळव्याध, पाईल्स, अल्सरमध्ये जादुई परिणाम, मज्जारज्जूचे विकार, आजार, ह्या ब्राऊन टॉप मिलेटची लापशी फारच छान बनते. spine disorders & diseases मध्ये फायदेशीर.

8) कोदरा / Kodo millets/ Himalayan millet                                                       

 – पंजाबमध्ये पूर्वी खूप खात होते. शीख धर्मगुरू गुरू नानकजी कोद्र्याचा भात, भाकरी, साग खात होते. आता बोटावर मोजण्याइतकी शेती केली जातेय कोद्र्याची पंजाबमध्ये. रक्त शुद्धीकरण, हाडीताप (fever), Bone marrow disorders मध्ये फायदेशीर. (अस्थिमज्जा, आजार, विकार). मंदाग्नी प्रदिप्त करतो, म्हणजे पोटात पाचकरस digestive enzymes वाढवतो. भूक वाढवतो. 

9) राजगिरा/ Sudo millets/ Amaranthus                                            

 – राजगि-याचे लाडू, वडी, राजगिरा दुधात टाकून खाल्ला जातो. लहान मुलांना फार पौष्टिक. 

गहू, तांदूळ (Paddy) आणि भरडधान्ये यांत मूलभूत फरक काय? 

– गहू, तांदूळ आणि भरडधान्ये यांत पिष्टमय पदार्थ / स्टार्च, फॅटस्, काही अंशी प्रोटिन्स, सारखीच असतात. परंतु भरडधान्यांमध्ये फायबर्स/तंतुमय पदार्थ खूपच असतात, जे गव्हामध्ये फक्त 1.2% असतात, तर तांदूळ/paddy मध्ये 0.2% इतके असतात. खरी ग्यानबाची मेख येथेच आहे. तसेच भरडधान्यात विटामिन्स, खनिजे, फायटोकेमिकल्स प्रचंड प्रमाणात असतात – गव्हाच्या अन् तांदुळाच्या तुलनेने. मिलेटसमधील फायबर्स आणि पिष्टमय पदार्थाचे एक विशिष्ट linking असते, ज्यामुळे मिलेटस् खाल्ल्यावर हळूहळू रक्तात साखर सोडली जाते, म्हणजे रक्तात साखरेचा पूर येत नाही, अन् आरोग्यसंवर्धन होते. उलट गव्हाच्या अन् तांदळाच्या सेवनाने रक्तात साखरेचा पूर येतो, अन् चित्रविचित्र आरोग्यसमस्या, आजारांना, विकारांना सामोरे जायला लागते. आधुनिक वैद्यकीयशास्त्र त्याला जेनेटिक डिसऑर्डर म्हणते.

हे सर्व आपण टाळू शकतो फक्त मिलेटस् खाद्यसंस्कृतीकडे पुन्हा वळून. तसेच मिलेटस् हे ग्लुटेन फ्री अन्न असल्यामुळे स्वादुपिंडाला बळ मिळते. स्वादुपिंडाचे शुद्धीकरण होते. ग्लुटेन फ्री अन्न म्हणजे लिव्हर, किडनीचा विमा असेच समजा. 

मिलेटस् असे खा :-

मिलेटसपासून पीठ, पोहे, भाकरी, धपाटे, खिचडी, पुलाव, बिर्याणी, डोसे, बिस्कुट बनवता येतात. फक्त मिलेटस् खरेदी करताना एक काळजी घ्यावी. मिलेटस् पॉलिश (polished)  केलेले नसावेत. ते त्याच्या नैसर्गिक रंगात असावेत. 

मिलेटस् अशी वापरा :-              

सर्वप्रथम हलके, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. म्हणजे त्यावरील माती, कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत, नंतर सुकवून, वाळवून वापरावेत.

एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये / तृणधान्ये / millets ला परत पुनर्वैभव प्राप्त करून देणे, हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे.

अन्नाची पुण्याई! 

जुनं ते सोनं!

“पेट सफा तर हर रोग दफा.”

सर्वात महत्वाची बाब म्हणजे फायबरयुक्त अन्नाची आज सर्वांना गरज भासत आहे!

— ते म्हणजे “भरडधान्य” होय!

– समाप्त –

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(दि. नऊ फेब्रुवारी हा कवी निदा फाजली यांचा स्मृतिदिन. त्यानिमीत्त त्यांच्या विषयी रेखाचित्रकार श्री.मिलिंद रतकंठीवार यांनी लिहीलेला लेख: निदा फाजली)

निदा चा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वर किंवा आवाज. खरे त्यांचे पाळण्यातील नाव हे मुक्तिदा (मुक्तीदाता तर नव्हे ?) हसन पण त्यांनी स्वीकारलेले टोपण नाव म्हणजे निदा… आणि फाजली हे काश्मीर मधील एका गावाचे नाव.. असे असले तरीही, त्यांची प्रतिभा ही सर्वांना कवेत घेणारी सार्वत्रिक होती, वैश्विक होती. त्यांच्या पत्नीचे नाव मालती जोशी. आणि गोड अश्या कन्येचे नाव तहरीर तहरिर चा अर्थ लिखित (प्रमाणपत्र).

त्यांच्या प्रागतिक धारणांमुळे पाकिस्तानात त्यांना गैरइस्लामिक मानत असत. त्यांच्या रचनांचा आशय, गर्भार्थ हा सर्वांच्या मानवी जीवनाला स्पर्श करणारा होता. मानवतेला साद घालणारा होता. दुनिया जिसे कहते हैं, जादू का खिलौना हैं, मिल जाए, तो मिट्टी हैं, खो जाये तो सोना हैं… धूप मे निकले हो तो, घटाओं मे नहा कर तो देखो, जिंदगी क्या हैं, किताबो को हटाकर देखो… कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कही जमी, तो कही आस्मा नही मिलता, होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज हैं.. एक आदर्श, वस्तुनिष्ठ, संयमी, विचारवंत पण खोडकर प्रियकर त्यांचे शायरीत, दिसायचा.. त्यांची शायरी, ही मला नेहेमीच भावायची त्यांचे रेखाचित्र काढावे असे माझ्या मनात होतेच, त्यांच्याशी संपर्क साधला असता, पुण्यात त्यांच्या आगमनानंतर त्यांचा निरोप आलाच…योगायोगाने प्रसिद्ध गझल गायक आल्हाद काशीकर यांचा देखील परिचय झाला. “मै बहुत खुश हूँ, कि आपने मुझे इस काबिल समझा” ” सर, मै होता कौन हूँ? आप की शायरी ही उतना हौदा रखती हैं..” मी शक्य तितका नम्र होत म्हणालो.. एका प्रथितयश शायर शी शक्य तेवढ्या मृदू भाषेत, शक्य तेवढ्या अदबीे ने बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो.. पण गतिरोधका वर वाहन जसे डचमळते तसा मी अडखळत होतो.

त्यांना पोर्ट्रेट दाखवताच, त्यांनी मनमोकळे पणाने कौतुक केले, त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील बोलावून घेतले.. आणि स्वाक्षरी केली… “मै भी, मै भी” असे त्यांची छोटीशी गोड कन्या तहरीर, उडी मारत हट्ट करू लागली . मी म्हणताच तिने देखील स्वाक्षरी केली. नंतर खूप दिलखुलास गप्पा झाल्या.. अगदी मुस्लिम मन ते मोदी सरकार. धर्म ते राष्ट्र.. संस्कृती ते राष्ट्र.. अगदी पाकिस्तान सुद्धा.. “दुश्मनी लाख ही सही, खत्म ना किजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहीये”

असा संदेश सरते शेवटी त्यांनी दिला. आपल्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले. “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को, हंसाया जाये…”

त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच, त्यांच्या सारख्या विचारवंत कलाकाराला आम्ही ओळखू शकलो नाही, याची रुखरुख लागून राहिली.

नऊ फेब्रुवारी या निदा फाजली यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण होणे.. हे नितांत गरजेचे आहे..

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares