? विविधा ?

☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(दि. नऊ फेब्रुवारी हा कवी निदा फाजली यांचा स्मृतिदिन. त्यानिमीत्त त्यांच्या विषयी रेखाचित्रकार श्री.मिलिंद रतकंठीवार यांनी लिहीलेला लेख: निदा फाजली)

निदा चा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वर किंवा आवाज. खरे त्यांचे पाळण्यातील नाव हे मुक्तिदा (मुक्तीदाता तर नव्हे ?) हसन पण त्यांनी स्वीकारलेले टोपण नाव म्हणजे निदा… आणि फाजली हे काश्मीर मधील एका गावाचे नाव.. असे असले तरीही, त्यांची प्रतिभा ही सर्वांना कवेत घेणारी सार्वत्रिक होती, वैश्विक होती. त्यांच्या पत्नीचे नाव मालती जोशी. आणि गोड अश्या कन्येचे नाव तहरीर तहरिर चा अर्थ लिखित (प्रमाणपत्र).

त्यांच्या प्रागतिक धारणांमुळे पाकिस्तानात त्यांना गैरइस्लामिक मानत असत. त्यांच्या रचनांचा आशय, गर्भार्थ हा सर्वांच्या मानवी जीवनाला स्पर्श करणारा होता. मानवतेला साद घालणारा होता. दुनिया जिसे कहते हैं, जादू का खिलौना हैं, मिल जाए, तो मिट्टी हैं, खो जाये तो सोना हैं… धूप मे निकले हो तो, घटाओं मे नहा कर तो देखो, जिंदगी क्या हैं, किताबो को हटाकर देखो… कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कही जमी, तो कही आस्मा नही मिलता, होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज हैं.. एक आदर्श, वस्तुनिष्ठ, संयमी, विचारवंत पण खोडकर प्रियकर त्यांचे शायरीत, दिसायचा.. त्यांची शायरी, ही मला नेहेमीच भावायची त्यांचे रेखाचित्र काढावे असे माझ्या मनात होतेच, त्यांच्याशी संपर्क साधला असता, पुण्यात त्यांच्या आगमनानंतर त्यांचा निरोप आलाच…योगायोगाने प्रसिद्ध गझल गायक आल्हाद काशीकर यांचा देखील परिचय झाला. “मै बहुत खुश हूँ, कि आपने मुझे इस काबिल समझा” ” सर, मै होता कौन हूँ? आप की शायरी ही उतना हौदा रखती हैं..” मी शक्य तितका नम्र होत म्हणालो.. एका प्रथितयश शायर शी शक्य तेवढ्या मृदू भाषेत, शक्य तेवढ्या अदबीे ने बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो.. पण गतिरोधका वर वाहन जसे डचमळते तसा मी अडखळत होतो.

त्यांना पोर्ट्रेट दाखवताच, त्यांनी मनमोकळे पणाने कौतुक केले, त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील बोलावून घेतले.. आणि स्वाक्षरी केली… “मै भी, मै भी” असे त्यांची छोटीशी गोड कन्या तहरीर, उडी मारत हट्ट करू लागली . मी म्हणताच तिने देखील स्वाक्षरी केली. नंतर खूप दिलखुलास गप्पा झाल्या.. अगदी मुस्लिम मन ते मोदी सरकार. धर्म ते राष्ट्र.. संस्कृती ते राष्ट्र.. अगदी पाकिस्तान सुद्धा.. “दुश्मनी लाख ही सही, खत्म ना किजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहीये”

असा संदेश सरते शेवटी त्यांनी दिला. आपल्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले. “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को, हंसाया जाये…”

त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच, त्यांच्या सारख्या विचारवंत कलाकाराला आम्ही ओळखू शकलो नाही, याची रुखरुख लागून राहिली.

नऊ फेब्रुवारी या निदा फाजली यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण होणे.. हे नितांत गरजेचे आहे..

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments