☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
आपल्या जीवनात आपण योग्य मार्गावर असण्यासाठी वेळोवेळी स्वतःचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.एकदा एक गोष्ट वाचण्यात आली…..
एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खूश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : नको. मी एका महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
तरुण हसत हसत फोन ठेवून निघाला.
दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, “तू प्रयत्न केलास, पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस.”
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, “मला नोकरी नकोय. नक्की नकोय.”
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो. तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही, हे चेक करत होतो.
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही. तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का, हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो?तर आपण स्वतः !!
जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग –५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.
मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं . पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.
कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते, आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, ‘हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे’. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.
या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर, एकट्या असणार्या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या विरुद्ध लढणार्या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलासिंगा यांचे कौतुक केले.
आणि ….. मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले . याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.
याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन यावर सुरुवात करून ते म्हणतात, मद्रासला झालेला सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”
“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.
यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स…. जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जरी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता.
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले, संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’) आता इथून पुढे )
नाना गेल्यानंतर ओढगस्तीची दोन वर्षे सरली. दादा मॅट्रिक झाले आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला गेले. ते होते ४३ साल. पुण्याला त्यांचे एक दूरचे नातेवाईक दातार यांच्याकडे ते राहिले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा झाली. मग सुट्टीत दोन महिने त्यांनी देहूरोडला नोकरी केली. मग त्यांनी विचार केला, ‘नोकरीच करायची, तर पुण्यात कशाला? सांगलीलाच जाऊ या.’ मग ते पुना ४४साली सांगलीला परतले. इथे त्यांना माधवनगर कॉटन मिल्सला नोकरी लागली. दरम्यान ते कॉलेजची परीक्षा पास झाले. इथेही त्यांनी विलिंग्डन कॉलेजला नाव घातले, पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही जमेना, तेव्हा त्यांनी शिक्षणाचा विचार सोडून दिला. माधवनगर कॉटन मिल्सला त्यांची ५० वर्षे नोकरी झाली.
४६ साली दादांना कंपनीच्या व्यवस्थापनाने, माधवनगर येथे कंपनीच्या घरात रहायला येण्याविषयी विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. तीन खोल्यांचं छोटसं घर . पुढे अंगण. मागे परस. परसात भाजीपाला होऊ लागला. पुढे आपली कार्यनिष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, दूरदर्शित्व, व्यावहारिक शहाणपण, या गुणांच्या बळावर पदवीधर नसूनही दादा माधवनगर कॉटन मिल्सचे मॅनेजर झाले. दादांना नोकरी लागली. घरात निश्चित असे उत्पन्न येऊ लागले आणि कुटुंबाची विपत्तीतून सुस्थितीकडे वाटचाल सुरू झाली.
परिस्थिती कशीही असली, तरी कोंड्याचा मांडा करायची हातोटी आजींना छान साधली होती. माझ्या चुलत वन्स पमाताई म्हणतात, ‘आम्ही भावंड अधून मधून माधवनगरला राहायला जात असू. काकू स्वयंपाक छान करत असे. साधं पिठलं भाकरीच, पण ती इतकी चविष्ट होत असे, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला तर वाटतं, तिच्या हातात अन्नपूर्णेचा वास होता. ‘ कुणाला त्यांनी केलेल्या खव्या-रव्याच्या साटोर्या आठवतात, तर कुणाला त्यांनी केलेल्या साध्या भाकरीचा कुस्करा.
सगळं ठाक-ठीक होतं म्हणेपर्यंत आणखी एक आपत्ती येऊन ठाकली. मात्र ही आपत्ती केवळ केळकर कुटुंबावरच आलेली नव्हती, तर सार्या गावावर, किंबहुना सगळ्या महाराष्ट्रावर ही आपत्ती ओढवली होती. ४८ साली गांधीजींचा खून झाला. तो करणारा ब्राम्हण. त्यामुळे ब्राम्हणांच्या विरुद्ध वातावरण अतिशय तापले. ब्राम्हण अन्य समाजाच्या रोषाचेच नव्हे, तर द्वेषाचेही बळी ठरले. त्या निमित्ताने लुटालूट झाली. जाळपोळ झाली.
माझे दीर दादा संघाचे असल्यामुळे त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. (कदाचित त्यामुळे ते सुरक्षितही राहिले.) गावात काही जणांची धिंड काढली गेली. त्यांना मारण्याचाही जमावाचा मनसुबा असावा, पण तेवढ्यात गावात मिल्ट्री आली आणि लोक वाचले. दादा तुरुंगात, उषाताई, कुसुमताई, सुशीताई, बाळू ही मुले घरात. माझ्या सासुबाईंची, आजींची ही सत्वपरीक्षाच होती. पण मोठ्या धीराने त्यांनी ते दिवस काढले. त्यांचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता. त्यांच्या शेजारी देशिंगचे घोरपडे म्हणून रहात होते. जे काही घरात किडूक मिडूक होतं, ते आजींनी गाठोड्यात बांधलं आणि विश्वासाने घोरपड्यांकडे सुपूर्त केलं. घर लुटलं गेलं, जाळलं गेलं, तरी निदान तेवढं तरी वाचावं, म्हणून धडपड. घोरपडे मंडळींनी तितक्याच खबरदारीने त्याचं जतन केलं आणि सगळं वातावरण निवळल्यावर ते आजींच्या स्वाधीन केलं. माणसांवर असलेला आजींचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. आमचं घर जाळायला लोक आले होते, पण तेवढ्यात कर्फ्यू लागला आणि आमचं घर वाचलं. नंतर लगेचच दादाही तुरुंगातून सुटून आले. त्या काळाबद्दल आणि त्यावेळच्या वातावरणाबद्दल ऐकलं की मला रविंद्रनाथ टागोरांचं एक मुक्तकाव्य आठवतं. त्यांनी लिहिलंय ,
‘किती कोमल असतो माणूस आणि किती क्रूर असतात माणसं. ‘
निपाणीला आजींचे भाऊ रहात. पंचनदीकर वैद्य म्हणून ते सुप्रसिद्ध होते. पडत्या काळात त्यांचीही आजींना खूप मदत झाली होती. आमचं सगळं कुटुंबच त्यांच्याबद्दल मनात आदर आणि कृतज्ञता बाळगून होतं. त्यांचे हे भाऊ माझ्या लग्नानंतरही माधवनागरला आमच्या घरी खूपदा आलेले आठवतात. माझ्या मनात संशोधक मामा म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली आहे. ते आले, की घरी भट्टया लावत. पार्यापासून सोनं करण्याचे त्यांचे प्रयोग चालत. त्यांना हवं असेल ते सगळं, आजी आणि घरातील इतर माणसं तत्परतेने उपलब्ध करून देत. पार्यापासून त्यांना सोने काही मिळवता आले नाही, पण ज्या एकाग्रतेने, तन्मयतेने ते प्रयोग करत, त्याचं आणि त्यांच्या प्रयोगाचं आम्हाला खूप अप्रूप वाटे.
५० साली दादांचं लग्न झालं. आजींच्या हाताखाली सून आली. हाताखाली सून आली असं म्हणण्यापेक्षा आजींनी कोठीची किल्लीच सुनेकडे सोपवली. म्हणजे आमच्या घरी कोठीला काही कुलूप नव्हतं, पण पुरवणं-उरवणं, ठेवणं- टाकणं, देणं- घेणं, मुलींची माहेरपणं, हे सगळे व्यवहार त्यांनी मुलाच्या आणि सुनेच्या हाती सोपवले आणि घरात राहूनही त्या वानप्रस्थात असल्यासारख्या राहिल्या. गरज असेल तेव्हा स्वैपाकघरात मदत, एरवी त्यांचे पोथीवाचन वगैरे चाले. भाजी आणणे, निवडणे, चिरणे ही कामे मात्र त्या मोठ्या हौसेने करत. बाहेरच्या सोप्यावर बसून त्यांचे हे काम चाले. बाहेर कुणी आलं गेलं तर लक्ष राही. तिथेच बसून त्या पोथी, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वगैरे वाचायच्या. देवळात भजन –कीर्तन असे, तेव्हा देवळात जात.
सुनेकडे आजींनी सगळी जबाबदारी सोपवली खरी, पण त्यावेळी असेही ठरले की घरातील मिळवत्या व्यक्तीने दरमहा आजींना शंभर –दीडशे रुपये द्यायचे. मला नोकरी लागल्यावर मीही द्यायला लागले. या पैशांचा खर्च त्यांनी कसाही करावा. त्याचा त्यांना कुणी हिशेब मागू नये. त्याचं काय केलं हे विचारू नये. त्यातून त्यांचा देव-धर्म होई. कुणा गरजू व्यक्तीला पैसे द्यावेसे वाटले, तर त्यातून दिले जात. नातवंडांना त्या पैशातून बक्षिसे मिळत. सणावाराला जो नमस्कार करे, त्याला आशीर्वादासोबत एक रुपया मिळे. आजही आपण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा करतो. ६०- ७० वर्षापूर्वी आमच्या आजींनी ते मिळवलं होतं. मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते.
माहेरवाशिणी असोत, किंवा नाती, भाच्या वगैरे असोत, देण्या-घेण्याचे व्यवहार त्यांनी केव्हाच दादा-वहिनी कडे सोपवले होते, पण घरातल्या देण्या-घेण्याव्यतिरिक्त आजींचा एक स्वतंत्र खाऊ असे. तो म्हणजे, शेवया, साबुदाण्याच्या पापड्या, तसेच उकडलेले बटाटे, आणि भिजवलेला साबुदाणा घालून केलेल्या व वाळवलेल्या चकल्या असा तो खाऊ असे. सकाळी शेवयाचं पीठ भिजवायचं किवा साबुदाणा भिजवायचा आणि बटाटे उकडायचे. दुपारी जेवणं झाली की आजींचा हा कारखाना सुरू होई. हा लघूद्योग पैशासाठी नसे. बनवणे आणि घरी आलेल्यांना तो खाऊ म्हणून वाटणे हा आजींचा छंद होता. आम्ही घरातल्या दोघी जणी त्यांच्या हाताखाली असूच. मुली-नातींना आणि आल्या-गेल्यांना हा खाऊ देताना, त्यावर त्यांचं भाष्य असे, ‘आपापली दूध-साखर घाला आणि खा’ किंवा ‘आपापल्या तेला-तुपात तळा आणि खा.’ या शेवया, पापड्या नि उपासाच्या चकल्या केवळ माहेरवाशिणींकडेच नव्हे, तर मी माहेरी निघाले की माझ्या माहेरीही आजींनी त्या दिलेल्या असत. माझ्या वडलांना डायबेटीस होता. त्यांच्यासाठी गव्हाच्या पोह्यांचा चिवडा आणि गव्हाचे पोहे घेऊन जा, असं त्यांचं खास सांगणं असे. एरवी मुली माहेरून आल्या की काही ना काही घेऊन येत, अशी रीत होती. आमच्या घरी उलटं होतं. आम्ही माहेरी जाताना सासरहून काही ना काही घेऊन जात असू. मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’
‘ एकदा साथ द्यायची ती कधीही न सोडणे ‘, हा कुत्र्याचा धर्म ! सेनादलातील चार अधिकाऱ्यांना ,
(जानेवारी ८१ ) एका कुत्र्याच्या छोट्या पिलाने १६ महिने साथ दिलेली घटना. भूतानमधील बोंगयांग या दरीतून जात असताना, तिबेटी ‘ मँस्टिफ’ जातीचे पिल्लू त्यांच्या मागे धावायला लागले .दया येऊन अधिकाऱ्यांनी त्याला बरोबर घेतले. ‘ द्रुग ‘ (घोडेस्वार ) असे त्याचे नामकरण झाले. सिक्कीममध्ये १९५०० मीटर उंचीवरून प्रवास करताना, सगळे सहन करत आनंदाने ‘ द्रुग ‘ प्रवास करत होता .जाताना वाटेत त्याला कसला तरी वास आला. आणि ‘ द्रुग’ वेगळ्याच दिशेला जायला लागला. अधिकाऱ्यांना शंका आली. म्हणून जवळ जाऊन त्यांनी उकरून पाहिले. तो शाल गुंडाळलेले एक प्रेत त्यांना दिसले. दोन महिन्याच्या पिलाच्या आत्मज्ञानाला काय म्हणावे ! कर्तबगारीच्या वर्णनाला, विशेषणांचे शब्दही कमी पडावेत.
एक जुलै. अमरनाथ यात्रेचा पहिला दिवस होता. लेफ्टनंट जनरल ( चिनार कोर कमांडर ) के. जे .एस. धिल्लन, काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या ‘ के 9 योद्धा ‘मेनका,’ या श्वानाला सलामी देत असलेला फोटो पाहिला. पाहून नवल वाटलं . धिल्लन पवित्र अमरनाथ गुहेत जात असताना, ५० मीटरवर ‘मेनका’ श्वान कर्तव्य बजावत होते. कोअर कमांडर तेथे पोहोचताच, श्वानाने– ‘ मेनकेने ‘ त्यांना सलामी दिली. धिल्लन यांनीही सलामीनेच त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या छायाचित्राखाली धिल्लन यांनी लिहिले, ” अनेकांचे प्राण वाचविलेल्या या जिवलग मित्राला सलाम”.
२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात मिरज ठाण्यात ‘ निरो ‘ या श्वानाची नियुक्ती झाली होती . दक्षिणेतून आलेल्या एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा स्टेशनमध्ये फोन आला. निरोने संपूर्ण गाडी तपासून धोका नसल्याचा निर्वाळा देऊन, सर्वांना हायसे केले. पंढरपूर यात्रेसाठी मिरजहून हजारो भाविक जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘ निरो ‘ ने वेळोवेळी संपूर्ण गाड्या तपासून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे काम केले . पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेला श्वान हाच तो
‘निरो’. निरोचा जोडीदार ‘ सोलो ‘ निवृत्त झाला. आणि मग ‘निरो ‘ एकटाच कोल्हापूर — सातारा विभागाची जबाबदारी सांभाळत होता. एक तपाच्या कर्तव्यपूर्तीनंतर तो सन्मानाने निवृत्त झाला. एखाद्या क्लास वन ऑफिसरला निरोप द्यावा , तसाच सन्मानाने त्याला निरोप दिला गेला. ” पीपल फॉर ॲनिमल ” या संस्थेच्या मागणी आणि विनंतीनुसार त्यांच्याकडे तो सन्मानाने राहिला.
विठुरायाच्या दर्शनाचे क्षेत्र पंढरपूर. हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सुरक्षा यंत्रणा राबत असते .या यंत्रणेचा एक भाग म्हणजे, लॅब्रॉडॉर जातीचे ‘ तेजा ‘ हे श्वान. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक दलातील अव्वल श्वान म्हणून ‘ तेजाला ‘ ओळखत होते .विठ्ठल गाभारा आणि मंदिराच्या सुरक्षेचे काम ‘तेजाने ‘ नऊ वर्षे इमाने इतबारे केले. इतके की त्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ‘ ‘तेजाचे ‘ एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, नऊ वर्षे, तो विठ्ठल मंदिरात तपासणीला आल्यानंतर, गाभाऱ्यात कोणत्याही इशाऱ्याशिवाय सर्वप्रथम विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचा. आणि मग तपासणीचे काम सुरू करायचा. देवापुढे नम्र होण्याचे शिक्षण खरंतर त्याला दिले गेले नव्हते. हे शिक्षण त्याला कोठून दिलं गेलं असेल बरं ! त्याच्या आत्मज्ञानाने तर नसेल ! प्रशिक्षणानंतर २००९ साली ‘ तेजा ‘ सेवेत दाखल झाला. अव्वल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजाला २०१५, २०१६, आणि २०१७ असे सलग तीन वर्षे ,उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले . वृद्धापकाळाने तो शेवटी विठ्ठलचरणी लीन झाला .पोलीस दलाने त्याला अखेरची सलामी दिली. सलाम.
सांगलीकरांना अभिमान वाटावा असा आणखी एक हिरो म्हणजे ‘ लॅब्रॉडॉर ‘ जातीचा ‘ ‘मार्शल ‘ हा कुत्रा. सांगली जिल्हा पोलीस पथकात बॉम्बशोधक कार्यासाठी तो कार्यरत होता. त्याने २००९ ते २०१९ असे प्रदीर्घ काळ काम केले. २०१२ मध्ये जत तालुक्यात गोंधळेवाडी या ठिकाणी, शाळेतील मुलांना खेळत असताना एक बाँब सदृश्य वस्तू दिसली .पोलीस दलाला फोन आला. ‘ मार्शल ‘ ला पाचारण केले गेले. त्या ठिकाणी
‘मार्शलने ‘ पुन्हा पुन्हा वास घेऊन, धोकादायक बॉम्ब असल्याचे सूचक विधान केले. पथकाद्वारे पुढील कारवाई केली गेली. आणि शाळेचे टेन्शन संपले. त्याचप्रमाणे कवलापूर येथे विहिरीचा गाळ काढत असताना, लोकांना एक संशयास्पद वस्तू दिसली. मार्शलचे व्यक्तिमत्व सर्वांना ठाऊक होते. म्हणून त्याला बोलावले गेले .मार्शलने आपल्या पथकाला ही वस्तू धोकादायक असल्याचा “शब्देविण संवादू “,असा निर्वाळा दिला. पंढरपूर आणि पुणे येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या काळात, बंदोबस्त, सुरक्षितता आणि तपासणीचे महत्त्वाचे कर्तव्य त्याने बजावले होते. आणि वाहवा मिळवली होती .पंढरपूरच्या प्रत्येक वारीच्या काळात आणि तुळजापूरला नवरात्राच्या काळात तेथील तपासणी आणि बंदोबस्ताचे जबाबदारीचे काम त्याने यशस्वीपणे केले होते. दहा वर्षे निष्ठेने कार्य करून सन्मानाने तो निवृत्त झाला. वयस्क झाला. वृद्धापकाळाने, पाच जून २०२२ या दिवशी तो विठ्ठलाचा आणि तुळजाभवानीचा वरदहस्त घेऊन, ईश्वरचरणी लीन झाला .आज त्याचे उत्तर अधिकारी म्हणून ‘सनी’ नावाचा लाब्राडोर , ‘तेजा ‘ नावाचा डॉबरमॅन, ‘ लिओ’ नावाचा लँब्राडोर , ‘ लुसी’ नावाची जर्मन शेफर्ड हे श्वान निष्ठापूर्वक कर्तव्य बजावत आहेत.
सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना ,कौटुंबिकदृष्ट्या कर्तव्य पार पाडलेल्या श्वानांच्या असंख्य घटना सांगता येतील.
कर्जत गावाजवळ टेकडीखालील वाड्यात आरेकर यांचा ‘काळू ‘ हा लाडका कुत्रा होता. त्याचेही आरेकरांवर खूप प्रेम होते. आरेकर काकांच्या निधनानंतर, ‘ काळू ‘ त्यांच्या भोवती फिरत राहिला. कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देईना. प्रेताला हात लावू देईना. अखेर त्याला घरातल्यांनी साखळीने बांधून घातले. नंतर त्यांचा देह अंत्यसंस्काराला नेला गेला . ‘काळू’ने हिसडे मारून , आरडा ओरडा करून, साखळी तोडून तो स्मशानात आला. मालकाच्या चितेवर बसून राहिला. बाजूला घेण्याचे सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण तो ऐकायला तयार नव्हता. सर्वांनी अखेर एकत्रितपणे ताकत लावून, त्याला उचलून घरी आणले . आणि खोलीत बंद केले. त्याचा आरडाओरडा चालूच होता. नंतर काकांचे अंत्यसंस्कार झाले. आठच दिवसात ‘ काळू ‘ आपल्या मालकाला भेटायला गेला.– स्वर्गात ! या प्रेमाला आणि निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.
दाविद काकडे यांचा दुग्ध व्यवसाय होता. गायीबरोबर जर्मन शेफर्डची जोडीही त्यांनी पाळली होती. रोज पत्नी आशासह ते गाईला चारा आणायला शेतात जात असत. बैलपोळ्याचा दिवस होता. शेतात जाताना एक कुत्रा बरोबर होता. आशा गवत कापत होती. आणि एक फुटावर असलेल्या नागाने फणा काढला. आशाचे लक्ष्य नव्हते. कुत्र्याने नागावर झडप घातली. नागाने कुत्र्याच्या नाकावर डंख मारला. आशाने आरडाओरडा केला . लगेच कुत्र्याला दवाखान्यात नेले. आशाचे आणि कुत्र्याचेही प्राण वाचले .कुत्र्याने मालकिणीवर होणारा दंश स्वतःवर घेतला. आणि मालकिणीचे प्राण वाचविले.
माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.
जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.
काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.
कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.
शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?
वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.
काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
बर्याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’
मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.
त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.
‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.
माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.
‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.
माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.
माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना गरिबीत दिवस काढावे लागले होते.
माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.
नानांचे बिर्हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी, असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.
‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.
त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या, ‘शेजार्या-पाजार्यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’
इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर ‘ एरडेल टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘ धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.
ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.
दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.
‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते. लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.
मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.
सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच ‘हीरो’, हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.
अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.
२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .
एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.
शिक्षण – एम,काॅम पर्यंत.
विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.
दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.
विविधा
☆ “बोलणे…” ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆
नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:
बोलणे….कौस्तुभ परांजपे.
बोलणे……
बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….
बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.
आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.
बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.
बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.
काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.
राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.
बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.
बोलण्यात ताकद आहे, “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.
बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.
काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.
काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.
काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.
पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.
मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.
असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.
☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆
आकाशवाणी, पुणे हा मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेला, लगडलेला एक कल्पवृक्षच होता. बा.भ.बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा अनेक मंडळींनी इथे काम केले. हेही त्यापैकीच. निर्माता या पदावर काम करणारे हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर एक उत्कृष्ट कलावंत-वादक-लेखक-संवादक अशा बहुगुणांनी नटलेले एक व्यक्तिमत्व होते . आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करताना अनेक दिग्गज संगीतकार आणि वादक त्यांच्या सहवासात आले. ते केवळ सरकारी बाबू नव्हते तर संगीताचे साधक आणि जाणकारही. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया असोत किंवा बेगम अख्तर, ही मंडळी यांच्या गुणग्राहकतेवर आणि संगीत साधनेवर खूश असायची. हरिप्रसाद यांना खूप मानायचे. धारवाड, नागपूर येथील आकाशवाणी केंद्रांवरची त्यांची कारकीर्दही गाजली.
ते गोष्टी वेल्हाळ होते. गोष्ट कशी सांगायची हे त्यांच्याकडून शिकावं. हा अनोखा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू होता. हाडाचे शिक्षक होते ते. सायन्स पदवीधर. शिक्षण शास्त्राचाही रीतसर अभ्यास केलेले. माझे एक गृहितक आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयाचा अगदी साधा पदवीधर जरी असला तरी तो / ती वैचारिक दृष्ट्या एक विशिष्ट पातळी कधी सोडत नाहीत. वस्तुनिष्ठता हा गुण आणि no nonsense हा Approach त्यांचा वागणूकीचा भाग बनून जातो. अण्णाही त्या पठडीतले. संगीताचा गाढा अभ्यास ,व्यासंग इतका की केवळ संगीत साधना आणि वादन कौशल्य एवढ्यावर ते थांबले नाहीत. या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली.
पन्नालाल घोषांची शागिर्दी केलेल्या अण्णांची बासरी वादनावर तर हुकमत होतीच. पण स्वरमंडळ सारखे फारसे प्रचलित नसलेले वाद्य त्यांनी आपल्या अदाकारीने झंकारत ठेवले. संगीतावर व्याख्याने दिली. संगीत परीक्षा सुलभ व्हाव्यात म्हणून मार्गदर्शनपर पुस्तकेही लिहिली. वेगवेगळ्या पट्टीत गाणाऱ्यांसाठी त्यांनी तानपुरा वादनाच्या ध्वनीफिती बनवल्या. वर्तमानपत्रात लेख लिहिले. संगीतातल्या सर्वच क्षेत्रात अधिकार असलेले ते एक दुर्मीळ व्यक्तिमत्व होते.
अण्णांची (अरविंद गजेंद्रगडकर ) माझी ओळख त्यांचा मुलगा निखील याच्यामुळे झाली. तो माझ्या वर्गात होता; पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या. पण खरं सांगू का, त्यांचे माझे सूर अधिक जमले आणि खूप लवकरही. मी मुंबई दूरदर्शनला असताना ते आमच्याकडे कार्यक्रम करायला येत असत. कधी वादनासाठी तर कधी मुलाखती घ्यायलाही. माझ्या माहिमच्या मठीवरही ते अनेक वेळा येऊन गेले. दादा म्हणजे जी.एन.जोशी यांच्याकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहात होतो. अण्णांना तर त्यांच्याबद्दल विशेष आदर. मला वाटते दादाना भेटण्याच्या ओढीने ते माझ्याकडे येत असावेत. कारण काहीही असो. ते प्रेमाने येत. त्यांनी मला संगीत विश्वातील सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, पण प्रत्यक्ष घडलेल्या अनेक कथा सांगितल्या.
मुंबईत त्यांचे वास्तव्य बोरीवली इथे होते. पण संचार मात्र शहरभर असायचा. कुठे चांगले ध्वनिमुद्रण असले, एखादा दुर्मीळ गाण्याचा कार्यक्रम असला की यांची उपस्थिती ठरलेली. मला एक दोनदा त्यांनी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही नेले होते . ‘माझा लवतोय डावा डोळा’.. शांताबाई यांच्या महानंदा चित्रपटातील लताबाई यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी यांच्याच सहवासात अनुभवले आहे .
स्वतःवर ज्याला विनोद करता येतो किंवा स्वतःची फजिती ज्याला ग्रेसफुली सांगता येते तो माणूस निर्मळ मनाचा असतो. अण्णा असे अनेक किस्से सांगत. त्यातील हा एक अफलातून किस्सा — ते अनेक दिवाळी अंकांसाठी लिहित असत. पण मानधनाची मात्र वाट पाहावी लागे. अशाच एका अंकाचे मानधन आले नाही म्हणून ते त्यांच्या कार्यालायात सदाशिव पेठेत गेले. थोड्या इतर गप्पा मारुन त्यांनी मानधनाचा विषय काढला. संपादकाने नेहमीप्रमाणे रडगाणे गायले . शेवटी हे म्हणाले मग असे करा मला पाच अंक द्या. मानधन नको. त्यावर संपादक म्हणाले ते परवडणार नाही, त्यापेक्षा मानधन देतो. यावरुन मानधनाचा आकडा किती अशक्त होता हे कळले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली .
१९८०च्या दशकात मुंबईत नुकतीच हॉटेलमध्ये लाईव्ह संगीत कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. गायक, संगीतकार यांना हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करत. ३,४ तास गायन ,वादन यांच्या मैफिलींचा आनंद लुटत. ग्राहक खानपान सेवेचाही आस्वाद घेत असत. कलाकारांनाही उत्तम मानधन मिळे. वरळी व्हिलेज या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना करारावर आमंत्रित केले होते . या मंडळीना एक पाहुणा आणायला परवानगी होती. तो भाग्यवंत मीही एक दोनदा ठरलो . अण्णांची बासरी ऐकत , नयनरम्य माहोल असलेल्या त्या गार्डनमधल्या ओल्या संध्याकाळी कशा काय विसरता येतील ?
मी पुण्यात आल्यावर तर ते आमचे हक्काचे आर्टीस्ट झाले. माझ्या अनेक जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत त्यांनी दिले. युनायटेड बँक, केप्र मसाले ,शतायुषी मासिक, एवढेच नव्हे तर माझ्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘न्याय’ या फिल्मलाही त्यांचाच संगीतसाज लाभला होता.
‘सृष्टी’ या प्रशांत कोठडियाच्या संस्थेचे ते नियमित कलाकार होते. तिथल्या अनेक मैफिली त्यांनी आपल्या शब्द सुरांनी उजागर केल्या. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचा घरोबा असल्यामुळे आणि त्यांच्या कलांचे नेमके मर्म ठाऊक असल्यामुळे त्यांचे लेखन अतिशय मनोवेधक होत असे. कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर यांच्यावरील त्यांचे लेख म्हणजे व्यक्तीचे आस्वादक आणि सखोल मूल्यमापन कसे करावे याचे उत्तम नमुने आहेत.
’अंतर्नाद’ हे मासिक अल्पावधीत गाजले. त्या लोकप्रियतेत यांचाही मोठा वाटा होता. आपली पंचाहत्तरी त्यांनी अनोख्या रीतीने साजरी केली होती. दोन दिवसांच्या कार्यक्रमात बासरीवर त्यांनी ७७ राग वाजवून आपल्या आयुष्यात बासरीच्या सुरांचे असलेले महत्व अधोरेखित केले होते. एक अतिशय रसिक ,चाणाक्ष , चांगल्या अर्थाने चोख व्यावसाईक, गुणग्राहक आणि जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले अरविंद गजेन्द्रगडकर हे माझ्या स्मरणकुपीत ऐशआरामात कायमचे विराजमान झालेले आहेत.
(जन्म ११ जानेवारी ,१९२८) त्यांच्या जयंती निमित्त विनम्रतापूर्वक आदरांजली !