? मनमंजुषेतून ?

☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

आकाशवाणी, पुणे हा  मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेला, लगडलेला एक  कल्पवृक्षच होता. बा.भ.बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा अनेक मंडळींनी इथे काम केले. हेही त्यापैकीच. निर्माता या पदावर  काम करणारे हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर एक उत्कृष्ट कलावंत-वादक-लेखक-संवादक अशा बहुगुणांनी  नटलेले एक व्यक्तिमत्व होते . आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करताना अनेक दिग्गज संगीतकार आणि वादक त्यांच्या सहवासात आले. ते केवळ सरकारी बाबू नव्हते तर संगीताचे साधक आणि जाणकारही. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया असोत किंवा बेगम अख्तर, ही मंडळी यांच्या गुणग्राहकतेवर आणि संगीत साधनेवर खूश असायची. हरिप्रसाद यांना खूप मानायचे. धारवाड, नागपूर येथील आकाशवाणी केंद्रांवरची त्यांची कारकीर्दही  गाजली.

ते गोष्टी वेल्हाळ होते. गोष्ट कशी सांगायची हे त्यांच्याकडून शिकावं. हा अनोखा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू  होता. हाडाचे शिक्षक होते ते. सायन्स पदवीधर. शिक्षण शास्त्राचाही रीतसर अभ्यास केलेले. माझे एक गृहितक आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयाचा अगदी साधा पदवीधर जरी असला तरी तो / ती वैचारिक दृष्ट्या एक विशिष्ट पातळी कधी सोडत नाहीत. वस्तुनिष्ठता हा गुण आणि no nonsense हा Approach त्यांचा वागणूकीचा भाग बनून जातो. अण्णाही त्या पठडीतले. संगीताचा गाढा अभ्यास ,व्यासंग इतका की केवळ संगीत साधना आणि वादन कौशल्य एवढ्यावर ते थांबले नाहीत. या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली.

पन्नालाल घोषांची शागिर्दी केलेल्या अण्णांची बासरी वादनावर तर हुकमत होतीच. पण स्वरमंडळ सारखे फारसे प्रचलित नसलेले वाद्य त्यांनी आपल्या अदाकारीने झंकारत ठेवले. संगीतावर व्याख्याने दिली. संगीत परीक्षा सुलभ व्हाव्यात म्हणून मार्गदर्शनपर पुस्तकेही लिहिली. वेगवेगळ्या पट्टीत गाणाऱ्यांसाठी त्यांनी तानपुरा वादनाच्या ध्वनीफिती बनवल्या.  वर्तमानपत्रात लेख लिहिले. संगीतातल्या सर्वच क्षेत्रात अधिकार असलेले ते एक दुर्मीळ व्यक्तिमत्व होते. 

अण्णांची (अरविंद गजेंद्रगडकर ) माझी ओळख त्यांचा मुलगा निखील याच्यामुळे झाली. तो माझ्या वर्गात होता; पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या. पण खरं सांगू का, त्यांचे माझे सूर अधिक जमले आणि खूप लवकरही. मी मुंबई दूरदर्शनला असताना ते आमच्याकडे कार्यक्रम करायला येत असत. कधी वादनासाठी तर कधी मुलाखती घ्यायलाही. माझ्या माहिमच्या मठीवरही ते अनेक वेळा येऊन गेले. दादा म्हणजे जी.एन.जोशी यांच्याकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहात होतो. अण्णांना तर त्यांच्याबद्दल विशेष आदर. मला वाटते दादाना भेटण्याच्या ओढीने ते माझ्याकडे येत असावेत. कारण काहीही असो. ते प्रेमाने येत. त्यांनी मला संगीत विश्वातील सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, पण प्रत्यक्ष घडलेल्या अनेक कथा सांगितल्या.

मुंबईत त्यांचे वास्तव्य बोरीवली इथे होते. पण संचार मात्र शहरभर असायचा. कुठे चांगले ध्वनिमुद्रण असले, एखादा दुर्मीळ गाण्याचा कार्यक्रम असला की यांची उपस्थिती ठरलेली. मला एक दोनदा त्यांनी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही नेले होते . ‘माझा लवतोय डावा डोळा’.. शांताबाई यांच्या महानंदा चित्रपटातील लताबाई यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी यांच्याच सहवासात अनुभवले आहे . 

स्वतःवर ज्याला विनोद करता येतो किंवा स्वतःची फजिती ज्याला ग्रेसफुली सांगता येते तो माणूस निर्मळ मनाचा असतो. अण्णा असे अनेक किस्से सांगत. त्यातील हा एक अफलातून किस्सा — ते अनेक दिवाळी अंकांसाठी लिहित असत. पण मानधनाची मात्र वाट पाहावी लागे. अशाच एका अंकाचे मानधन आले नाही म्हणून ते त्यांच्या कार्यालायात सदाशिव पेठेत गेले. थोड्या इतर गप्पा मारुन त्यांनी मानधनाचा विषय काढला. संपादकाने नेहमीप्रमाणे रडगाणे गायले . शेवटी हे म्हणाले मग असे करा मला पाच अंक द्या. मानधन नको. त्यावर संपादक म्हणाले ते परवडणार नाही, त्यापेक्षा मानधन देतो. यावरुन मानधनाचा आकडा किती अशक्त होता हे कळले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली . 

१९८०च्या दशकात मुंबईत नुकतीच हॉटेलमध्ये लाईव्ह संगीत कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. गायक, संगीतकार यांना हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करत. ३,४ तास गायन ,वादन यांच्या मैफिलींचा आनंद लुटत. ग्राहक खानपान सेवेचाही आस्वाद घेत असत. कलाकारांनाही उत्तम मानधन मिळे. वरळी व्हिलेज या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना करारावर आमंत्रित केले होते . या मंडळीना एक पाहुणा आणायला परवानगी होती. तो भाग्यवंत मीही एक दोनदा ठरलो . अण्णांची बासरी ऐकत , नयनरम्य माहोल असलेल्या त्या गार्डनमधल्या ओल्या संध्याकाळी कशा काय विसरता येतील ? 

मी पुण्यात आल्यावर तर ते आमचे हक्काचे आर्टीस्ट झाले. माझ्या अनेक जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत त्यांनी दिले. युनायटेड बँक, केप्र मसाले ,शतायुषी मासिक, एवढेच नव्हे तर माझ्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘न्याय’ या फिल्मलाही त्यांचाच संगीतसाज लाभला होता.

‘सृष्टी’ या प्रशांत कोठडियाच्या संस्थेचे ते नियमित कलाकार होते. तिथल्या अनेक मैफिली त्यांनी आपल्या शब्द सुरांनी उजागर केल्या. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचा घरोबा असल्यामुळे आणि त्यांच्या कलांचे नेमके मर्म ठाऊक असल्यामुळे त्यांचे लेखन अतिशय मनोवेधक होत असे. कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर यांच्यावरील त्यांचे लेख म्हणजे व्यक्तीचे आस्वादक आणि सखोल मूल्यमापन कसे करावे याचे उत्तम नमुने आहेत.

’अंतर्नाद’ हे मासिक अल्पावधीत गाजले. त्या लोकप्रियतेत यांचाही मोठा वाटा होता. आपली पंचाहत्तरी त्यांनी अनोख्या रीतीने साजरी केली होती. दोन दिवसांच्या कार्यक्रमात बासरीवर त्यांनी ७७ राग वाजवून आपल्या आयुष्यात बासरीच्या सुरांचे असलेले महत्व अधोरेखित केले होते. एक अतिशय रसिक ,चाणाक्ष , चांगल्या अर्थाने चोख व्यावसाईक, गुणग्राहक आणि जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले अरविंद गजेन्द्रगडकर हे माझ्या स्मरणकुपीत ऐशआरामात कायमचे विराजमान झालेले आहेत. 

(जन्म ११ जानेवारी ,१९२८) त्यांच्या  जयंती निमित्त विनम्रतापूर्वक आदरांजली !

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments