तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा।।
किंवा एके ठिकाणी ते असेही म्हणतात•••
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
☆
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
☆
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
☆
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
☆
– संत तुकाराम महाराज
तशी शब्दांची महती ही शब्दातीत आहे. पण मला याठिकाणी शब्दाची एक व्याख्या सांगावीशी वाटते, दोन किंवा अधिक अक्षरे जोडल्याने त्या अक्षरांना मिळालेला अर्थ म्हणजे शब्द.
मग शब्दाचा हा अर्थ असला तरी या शब्दाचा अर्थ त्याला क्रियापद जोडल्याने बदलतो. यासाठी एक प्रसंग वर्णन करते.
कॉलेजातील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे आणि केव्हा पडले हे त्यांनाच कळले नाही . लग्नाचा विषय येताच तो म्हणाला मी तुला शब्द देतो की मी माझ्या पायावर व्यवस्थित उभा राहिलो की तुझ्याशीच लग्न करेन. ती म्हटली मी हा शब्द घेते पण तू तुझा शब्द नक्की पाळशील ना?
तो म्हणाला मी आमच्या अण्णांचा शब्द मानतो. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. गावातही त्याच्या शब्दाचे वजन पडते त्यामुळे त्यांनी हो म्हटले की लगेच मी शब्द प्रमाण मानून तुझ्याकडे येणारच .
ती म्हणाली ए तू उगाच शब्दात अडकवू नकोस हां !! नंतर म्हणशील मी शब्द टाकला पण त्यांनी नाही माझा शब्द झेलला त्यामुळे माझा शब्द चालला नाही. असा तुझा शब्दाघात मी सहन नाही करू शकणार. तुला तुझ्या शब्दांची किमया तुझ्या अण्णांवर करावीच लागेल. तुला तुझा शब्द फिरवता येणार नाही. तू म्हणशील मी शब्द मागे घेतो पण शब्दांचा असा महाल बांधून माझा शब्द तुला तुडवता येणार नाही.
तो म्हणाला अगं वेडे तुझ्यावर उधळलेला शब्द म्हणजे शब्दांची पेरणी करून शब्दांचे फळ मिळेपर्यंतच्या प्रक्रीयेचा आनंदोत्सव आहे. मग उगीच शब्दाने शब्द कशाला वाढवायचा ? त्यापेक्षा शब्द तोलूया. तू आणि मी शब्दजोडून आपण होऊया. या शब्दाची कधीच फोड नाही होणार ही खात्री बाळगूया. आणि नि:संदेह होऊन म्हणू•••
☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
मध्यंतरी सातारला गेलो होतो. हॉटेलची खिडकी सहज उघडली तर समोर २,३ चिमण्या, अगदी दोन फूटांवर. हरखून पहात बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा मोर बघितला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता. आता ‘चिमणी’ हा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे दुर्लभ झालंय. निदान आमच्या कोथरुडमध्ये तरी.
चिमणी ही आपली लहानपणापासूनची सखी आहे. आम्ही फलटणला राहत होतो, पहिल्या मजल्यावर. तिथे मोठे माळवद (पाऊस कमी होणाऱ्या प्रदेशात माळवदी घरे असतात) होते. असंख्य चिमण्या तुरुतुरु चालत पुढ्यात यायच्या. टाकलेले दाणे, पदार्थ ऐटीत टिपायच्या आणि भुर्र उडून जायच्या. चिमणी हा घरातलाच सदस्य आहे, अशी भावना माझ्यासारख्या लाखोजणांची असेल. किंबहुना चिमणी हा आपल्या जगण्याचा एक भागच झाली होती. तिला वेगळे तरी कसे करणार?
राखाडी, भुरा रंग, प्रमाणबद्ध शरीर, इवलीशी चोच, टुक टुक पाहणारे डोळे, न घाबरता, बिनधास्त पुढ्यात येऊन बसायच्या. पण हे चित्र गेल्या १०, १५ वर्षांत झपाट्याने बदलले. चिमण्या दिसेनाश्या झाल्या. त्यांची जागा कबुतरांनी, पारव्यांनी घेतली. आजही कुणी खेड्यात, थोड्या दुर्गम भागात गेला आणि त्यांनी चिमणी पाहिली असे सांगितले की, मन त्या रम्य आठवणीने भरुन येते.
‘या चिमण्यांनो परत फिरा’ सारखे गाणे लागले, किंवा बाळ जेवावे म्हणून एखादी आई ‘हा घास चिऊचा’ असे म्हटलेले ऐकले, की अधिकच गलबलून येते. आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टी स्मरणरंजनाच्या कप्प्यात जाऊन बसल्यात. त्यातच ही पण जाऊन बसली. हे दुःख आपल्या सर्वांचेच आहे आणि त्यात भर म्हणजे आता ती नसण्याचा दिवसही आपण साजरा करायला लागलोय.
त्यामागे हेतू चांगला असला तरी तिचे नसणे अशा दिवसाने अधिक ठसठशीत होते. अर्थात आपण आपली कातडी टणक करुन टाकलीय म्हणा. एक असते चिमणी… एक असतो कावळा… कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो, कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं.. ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खोटी ठरली म्हणायची. कारण कावळे बहुसंख्य दिसतात. म्हणजे चिमणीचं घरच वाहून गेले म्हणायचे..
आज जागतिक चिमणी दिवस (२० मार्च), त्या निमित्त…
लेखक : डॉ. केशव साठये
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ माझा कात्र्यांचा संग्रह !… श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
सर्वसाधारण माणसांच्या घरात हमखास आढळणारी एक साधी पण उपयुक्त वस्तू म्हणजे कात्री ! लहानपणी वापरायला बंदी असलेली आणि ” काका काकूवर कातावले. कारण काकूने काकांचे कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून काढले ” अशा अनुप्रासातून मनात जाऊन बसलेली कात्री. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया ( इजिप्त ) येथे एकाच धातूच्या पट्टीच्या दोन्ही टोकांना धारदार पाती असलेली कात्री अस्तित्वात होती. १६६३ मध्ये चीनमध्ये आणि १७६० मध्ये इंग्लंडमध्ये कात्र्यांचे उत्पादन होऊ लागले. आत्ताच्या स्वरूपातील कात्री रॉबर्ट हिंक्लीफ याने १७६१ मध्ये वापरात आणली. फिनलँडमधील कात्र्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या फिस्कर या गावाच्याच नावाने, म्हणजे FISKAR या ट्रेड मार्कखाली १८३० मध्ये कात्र्यांचे मोठे उत्पादन व्हायला सुरुवात झाली.
माझ्याकडे अशा अनेक कात्र्यांचा एक छोटेखानी संग्रह आहे.
कात्री ही दोन पात्यांची बनलेली असल्याने इंग्रजीत कात्रीला pair of Scissors किंवा नुसतेच Scissors (मूळ फ्रेंच शब्द Cisoires) असे अनेकवचनी नाव वापरले जाते. संस्कृतमध्ये कात्रीला शरारी मुखी म्हणजे ” शर (↑ = बाण ) + आरी (l = छोटी करवत ) मुखी ” असे एक संयुक्तिक नाव आहे. कात्रीचे ‘ कापणे ‘ हे एकच काम असले तरी ती अत्यंत बहुगुणी, सर्वगामी, बहुरूपी आहे. महागाईमुळे खिशाला लागणारी, चित्रपटाला आणि नाटकाला सेन्सॉरची लागणारी, बजेटमध्ये खर्चाला लागणारी अशा अनेक अदृश्य कात्र्या आहेतच !
कात्रीने व्यापलेली क्षेत्रे, तिचे उपयोग आणि तिची भन्नाट रूपे पाहिली की आपण चक्रावून जातो.
कापडाशी संबंधित — कापणे, भरतकाम,नक्षीकाम, काज करणे ( बटन होल ), काही खास आकार कापणे या सर्वांसाठी वेगवेगळ्या कात्र्या
कागद —————— कापणे, किरीगामी, नक्षीकाम यासाठी वेगवेगळ्या कात्र्या
धातू —————— पत्रे, तारा कापणे.
झाडे ——————- छोट्या फांद्या छाटणे, मोठ्या फांद्या तोडणे, गवत कापणे, फुले तोडणे, बोन्साय वृक्ष निर्मिती या सर्वांसाठी खास कात्र्या
सौंदर्य साधना ——— केस, नखे, मिशी, भुवया कापणे / कोरणे. अगदी नाकातील व पानावरील केस कापण्यासाठी सुद्धा अत्यंत वेगळ्या कात्र्या उपलब्ध आहेत.
वैद्यकीय शास्त्र ——– अत्यंत उच्च दर्जाच्या पोलादापासून बनविलेल्या कात्र्या – विविध अवयवांच्या शस्त्रक्रिया, बँडेज बांधणे – काढणे
प्राणी ——————– शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरील लोकर कापणे
स्वयंपाकघर ———— विविध भाज्या कापण्यासाठी, तुकडे करण्यासाठी.
गालिचे —————— गालिच्याच्या विणकामातून वर येणारे जाड धागे कापण्यासाठी.
दिव्यांच्या वातींसाठी — दिव्याची वात जळत असतांना त्यावरील काजळी काढून टाकणे, वात कापणे यासाठी अत्यंत कलात्मक कात्र्या वापरल्या जात असत. त्यांना वातेऱ्या म्हटले जाते.
काही खूप वेगळ्या प्रकारच्या कात्र्या — जर अर्धाच चिरूट ओढायचा असेल तर त्यासाठी चंद्रकोरीसारखी पाती असलेली कात्री उपलब्ध होती. याच आकाराची पण खूप मोठी कात्री बर्फाच्या मोठमोठ्या लाद्या ओढून नेण्यासाठी वापरतात. पानवाले विड्याची पाने कापण्यासाठी हलकी व मोठ्या मुठींची कात्री वापरतात. आपल्याकडे विविध उदघाटनांसाठी सुंदर आकाराच्या, चांदीच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या कात्र्या वापरण्याची पद्धत आहे. पाश्चिमात्य देशात अगदी ३ ते ४ फुटांच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या आणि हजारो रुपये किंमत असलेल्या कात्र्या वापरल्या जातात.
डावखुऱ्यांसाठी खास कात्र्या — कात्रीच्या टोकेरी पाते असलेल्या बाजूला अंगठा अडकविला जातो व अंगठा हा पात्याच्या अधिक जवळ असतो. खालच्या बाजूचे पाते हे रुंद असून त्याची मूठ ३ किंवा ४ बोटे राहतील इतकी मोठी असते. अशी रचना उजव्या हाताने कापणाऱ्यांसाठी आहे. डावखुऱ्या माणसासाठी असलेल्या कात्रीमध्ये ही रचना बरोबर उलट म्हणजे आरशातील प्रतिमेप्रमाणे असते. पण याचा खप फारसा नसल्याने ती आता खूपच दुर्मिळ झाली आहे. त्याचप्रमाणे पायाने चालविता येईल अशी कात्रीही निर्माण केली गेली होती.
कात्री आणि अंधश्रद्धा ?
आता अंधश्रद्धा म्हटल्यावर त्या हिंदूंच्याच असतात का ? आपल्याकडे कात्री ही कुणाच्याही हातात देऊ नये, ती उघडलेल्या स्थितीत ठेऊ नये आणि त्याचा कचकच असा आवाज करू नये असे म्हणतात. पण याच्या मागे फक्त सुरक्षिततेचाच विचार आहे. कात्री दुसऱ्याच्या हातात न देता ती खाली ठेवावी व त्यांनी ती उचलून घ्यावी. देताना जर ती हातातून सुटली तर खाली पायावर उभी पडून मोठी इजा होऊ शकते. कात्री उघडी ठेवल्यामुळे आणि कचकच वाजवतांना होणारी हालचाल यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे या अंधश्रद्धा मुळीच नाहीत. पाकिस्तानात अशी कात्री ठेवणे किंवा वाजविणे अशुभ मानले आहे. ( म्हणजे एकूण तेच ). युरोपमध्ये लहान मुलाला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून बाळाच्या पाळण्यावर नुसतीच छोटी कात्री किंवा क्रॉसप्रमाणे उघडून ठेवण्याची पद्धत होती. न्यू ऑर्लिन्स मध्ये तर रात्री उशीखाली उघडी कात्री ठेवल्यास दुष्ट शक्तींपासून रक्षण होते असे मानले जात असे. तर काही ठिकाणी कात्री उघडून ठेवल्यास एकमेकात भांडणे होतात असे मानत असत. आफ्रिकेतील काही भागांमध्ये नवरदेवाला अपशकुन करण्यासाठी, वाईट शक्तींकडून विघ्न यावे यासाठी उघडलेल्या कात्रीचा वापर केला जात असे.
इतकी बहुगुणी आणि बहुपयोगी कात्री आपल्या समजुतींमुळे उगाच बदनाम होते. पण तिची मात्र काहीच कचकच नाही !
सोबतच्या विविध कात्र्यांची चित्रे जरूर पाहा !
(काही संदर्भ सौजन्य – विकिपीडिया)
(हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत)
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहताना दुपारच्या उन्हाच्या झळा अंगाला जाणवत होत्या. मार्च, एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसत होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होते!
लहानपण डोळ्यासमोर आले! परीक्षा संपण्याच्या आनंदा बरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टीची चाहूल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आता सारखे टीव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हतं! फार तर परीक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुट्टीत दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी समुद्रावर फिरायला जाणे, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे,घरी आले की परवचा म्हणणे, गाण्याच्या भेंड्या लावणे हीच करमणूक होती. सकाळी आठवण भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरात फिरकत नसू. आंबे बाजारात सुरू झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वाहत असायच्या पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझण वाऱ्यासारखा वाटायचा!
बालपण कोकणचा मेवा खात कधी संपलं कळलं नाही आणि कॉलेज साठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी चार-पाच नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वाऱ्याबरोबरच बाहेरची हवा ही बदलती असे! दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वाऱ्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे. हॉस्टेलवर राहत असताना जानेवारीनंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे. आमच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत. अधून मधून वावटळ सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतुच्या चाहुलीने निसर्गात सूजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडावर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई तर कुठेतरी निष्पर्ण पांढऱ्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा, मदनबाणाची छोटी छोटी झुडपे पांढऱ्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत. संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!
अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे. पांढरे शुभ्र ढग हळूहळू 9करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाई. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रुपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत. आणि मग जी वळवाची सर येई ती मृदगंध उधळीत जीवाला शांत करत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टप टप पडलेल्या गारा वेचू असे होऊन जाई! छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे! डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मनमोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही!
पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबता आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते! पांढऱ्या शुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग असा ओथंबून येतो की त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते! कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ते पांढरे ढग पांढरे ढग काळयामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भाव व्याकुळ ढग पृथ्वीवर रिते कसे बरं होत असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स. खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्हीही ढग तितकेच महत्त्वाचे! करड्या ढगांचे अस्तित्वच मुळे पांढऱ्या ढगांवर अवलंबून असते.विचारांच्या आवर्तात ही ढगाळलेली अवस्था येते. कधीकधी विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे मनाचे आभाळ दाटून येते आणि योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत राहतात. मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! अशा नवनिर्मिती करणाऱ्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पाहत राहते!
☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्यान पिढ्या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.
‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा.
महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.
असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.
कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.
‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ देण्याचे वचन निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला.
माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो.
असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’ हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.
मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले.
ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत.
एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.
कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.
इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची हार्टफेलने डेथ झाली.’ हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून आजतागायत सुटलेला नाही.
शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.
लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अगोदर ‘क’ बद्दल देखील मी काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पण ‘ळ’ बद्दल लिहिण्यासारखे काही वाटले ते “जोगळेकर” या आडनावाच्या एका व्यक्तींमुळे.
यांनी एक ऑडीओ व्हिडिओ क्लिप केली आहे. आणि त्यात “जो ग ळे क र” असा उच्चार करतांना “ळ” वर खास जोर दिला आहे. कारण त्यांचे काही मित्र त्यांना “जोगलेकर” अशी हाक मारत असत. ल आणि ळ यातला फरक आणि ळ चे महत्व सांगण्यासाठी त्यांची क्लिप.
ही क्लिप ऐकल्यावर मी पण या ळ च्या प्रेमळ विळख्यात अडकलो. विळखा घातल्यावर ळ समजतो.
ळ आणि ळ ची बाराखडी चा संबंध माझ्या जन्मापासून आहे, आणि शेवटपर्यंत तो राहणार आहे. अगदी जन्माला आल्यावर पहिला संबंध असतो तो नाळ शी. आणि मग सांगितले जाते ते असते बाळ.
माझ्या बालपणी छान, सुंदर, गुटगुटीत अशी विशेषणे मला नसली तरी मी काटकुळा देखील नव्हतो. घरच्यांना माझा लळा लागला होता.
बाळाच्या रंगावीषयी देखील बोलले जाते. मी गोरा नाही. त्यामुळे काळा, किंवा सावळा असाच आहे, किंवा उजळ नाही असेच म्हणतात. तिथेही ळ शी संबंध ठेवलाच.
नंतर टाळू भरणे, जाऊळ, पायात वाळा, खेळायला खुळखुळा, पांगुळ गाडा, असा ळ शी संबंध वाढवला. गोंधळ घातला तो आंघोळीचा. मी एकदा मीचकावला तो डोळा. याचेही कौतुक झाले. (डोळा मीचकवण्याचे कौतुक लहानपणीच असते हे लक्षात घ्या.)
पुढे संबंध आला तो शाळा आणि फळा यांच्याशी. फळा सुध्दा काळा. शाळेत मी अगदीच ढ गोळा नव्हतो हे नशीब. पण त्यामुळे एक (गो)ळा मात्र कमी झाला. शिकतांना सुध्दा कावळा, बगळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, चाफेकळी, करंगळी, तळ हात, मळ हात, न नळाचा, क कमळाचा, घ घड्याळाचा असेच शिकलो. यात ळ कशाचा हेच शिकायचे राहिले, पण ळ नकळत लक्षात आला. (तळहात, कमळ, घड्याळ यांचा आणि माझा संबंध किती काळापासून पासून आहे हे कळले.)
शाळा, महाविद्यालय असे करत धरली ती नोकरी. पण यातही कपाळावर कर्तृत्वाचा खास असा टिळा काही लागला नाही. पण कामात घोळ घातला नाही.
इतर कामात देखील मी नामानिराळा असतो. कामाचा कळवळा दाखवत नाही. किंवा काम करायला उतावळा देखील नसतो. म्हणूनच माझा उल्लेख कोणी(च) साधा भोळा असा करत नाही. पण मी आवळा देऊन कोहळा काढणारा नाही. किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील मी सोवळा नाही. तसाच मी आगळा वेगळा देखील नाही.
मी देवळात जातो, तसेच सोहळ्यात देखील जातो. सकाळ आणि संध्याकाळ नजरेत साठवतो. काही काळ मित्रांसोबत घालवतो, तर काही वेळ घरासाठी.
येतांना नाळ तोडून आलो, आणि जातांना गोतावळा सोडून जाणार आहे. म्हणून वर म्हटले ळ माझ्या जन्मापासून आहे आणि शेवटपर्यंत राहील.
☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो, तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करतांना दिसला.
मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो, “ बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? “
“ सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी ऐपत नाही.”
“ बाळ तू मला बघून का गोड हसलास ? “
“ सर तुम्ही देव आहात !”
“ नाही रे! “
“ सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. “
“ ते जाऊ दे. तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. “
“ सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होतं. तो देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो, तो काहीना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं….तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !”
मी निःशब्द झालो, नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, “ सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.”
…. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्याअगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.
“ सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.”
…. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.
अशीच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती.
देवळाच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला.
‘ या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ?’ असे नाना प्रश्न आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
“ सर …. “
“अरे तू इथे काय करतोस ? “
“ सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शिव – मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली….. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो….. सर मी हार नाही मानली. आई सांगायची……..‘ ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.’
“ बरं….. तुझी आई कुठे आहे ? “
“ सर ती कोरोनाच्या आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. १४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो … ‘ सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो,’ असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं……. सर तरी मी हरलेलो नाही. पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून… कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत… पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही….. असो . सर, तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? सर, तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. “
.. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
“ सर तोंड गोड करा. “
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.
भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.
“ सर, मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.”
… त्याने पुढे काही बोलण्याअगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.
आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो……न सांगता.
खरा देव तर कधीच नाही दिसला पण …. मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ….
देव पाहिला….
लेखक – अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.
तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे.
आज सर्व मित्र शांत बसले होते.
एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.
“तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो? आज मी सांगेन.” रामेश्वर बोलला!
“सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का?” एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले!
“नाही यार! असं काही नाही, सून खूप छान आहे.
वास्तविक “पोळी” चार प्रकारची असते.
पहिल्या “मजेदार” पोळीमध्ये “आईची” ममता “आणि” वात्सल्य “भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही.
एक मित्र म्हणाला, “शंभर टक्के खरं आहे, पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते”,
“दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे, जी “पोट” आणि “मन” दोन्ही भरते.” तो पुढे म्हणाला..
“आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे?” मित्राने विचारले.
“तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात फक्त “कर्तव्या ची” भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासांपासून वाचवते,”
तिथे थोडा वेळ शांतता पसरली!
“मग ही चौथी पोळी कसली आहे?” शांतता मोडून एका मित्राने विचारले!
“चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही! चवीचीही हमी नसते.”
मग माणसाने काय करावे?
“आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा, सूनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.
“जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चविकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरुन आपलं म्हातारपण आरामात आणि आनंदात व्यतीत होईल.”
सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत!!
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ नाचून गेल्या चिमण्या…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
सकाळी अंगणातल्या चिवचिवाटानं जाग आली.चिमण्यांचा थवा अंगणात गलका करत होता.चटचट चटचट किड्या मुंग्या वेचण्यात सगळ्या गुंग होत्या.आईनं शेणानं सारवलेल्या अंगणाला नुकताच लखलखीतपणा आला होता.त्या शेणातल्या किडया अळ्या आणि धान्य वेचण्यात रममाण झालेल्या चिमण्या माझी चाहूल लागताच भुरकन उडून लिंबांच्या झाडावर बसल्या आणि अंदाज घेऊन काही क्षणात पुन्हा सारवलेल्या अंगणभर पसरल्या.चिमणा चिमणीचे ते चिवचिव करत,चटचट अन्न वेचत आणि टूणटूण उड्या मारत अंगणभर हुंदडणं डोळ्यात साठवत मी बाजूला बसून पहात होतो.काही अगदी माझ्या जवळ येऊन मला निरखून पहात होत्या.मीही कुतुहलानं त्यांच्या डोळ्यात एकटक पहात त्यांचं निरागसपण टिपून घेत होतो.आपल्याच तालात नाचणाऱ्या चिमण्यांनी अंगण सजून गेलं होतं.मध्येच शेळ्यामेंढ्यांचं ओरडणं,गाईगुरांचं हंबरणं आणि कावळ्यांचं कारकारनं ऐकत..एकटक त्या अंगणाचं जीवंतपण अनुभवत होतो.बाजूला आईनं पाणी भरून ठेवलेली दगडी काटवटीत चिमण्यांची अंघोळीसाठीची धडपड आणि उडणारं पाणी कोवळया उन्हात अंगणाला सोनेरी झालर लावून जात होतं. तिथंच टपून बसलेली मनी आणि चिमण्यांचं हुंदडणं पहात दोन्ही पायावर तोंड ठेवून शांतपणे पहुडलेला काल्या होता. मध्येच अंड्याला आलेल्या करडया कोंबडीचं देवळीत उडी मारण्यासाठी चाललेली धडपड आणि फांदीवर लक्ष ठेवून टपलेले कावळे सारे काही माझ्या बनपुरीच्या घराच्या अंगणाची शोभा वाढवत होते.नुकत्याच चार पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या शेळ्यांच्या करड्यांनी अंगणभर उड्या मारत चालवलेला धिंगाणा आणि सारवलेल्या अंगणात बारीक बारीक पडलेल्या लेंड्याचा अंगणभर सडा पसरलेला होता.अंगणातल्या चूलीवर काळ्याकुट्ट अंगानं डिचकीत पाणी तापत होतं.दुसऱ्या बाजूला काट्याकुट्यात भक्ष शोधणारी पंडी मांजरीन तिच्याच तालात होती.पाणी तापवत डोळं चोळत,फुकणीनं फुकत शेकत गप्पा हाणित बसलेली पोरं.असं गावाकडचं घरदार भरलं की अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी रोजच्या सकाळचं अंगण असं उजळून निघतं…..
आज चिमण्यांचं चिवचिवनं क्वचितच ऐकायला मिळतं.लहानपणी माळवदी घराच्या किलचानात चिमण्या घरटं करायच्या.घरटं बनवताना त्यांची चाललेली धांदल सारं घर उघडया डोळ्यानं बघायचं.कधी कधी घरात पसरलेला कचरा, त्यातच पडलेलं एखादं फुटलेलं अंडं आणि कधीतरी उघडया अंगाचं पडलेलं चिमणीचं पिल्लू पाहून मन हळहळायचं. चिमण्यांचं सुख आणि दुःख अनुभवत बालपण कधी सरलं समजलच नाही.चिमण्यांनी मात्र घरात आणि मनात केलेलं घरपण हटता हटलं नाही.
आज मात्र अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी मनाचं अंगण पुन्हा हरखून गेलं…..अशा अंगणभर पसरलेल्या चिमण्या पुन्हा पुन्हा मनात नाचत रहाव्यात..आणि घराचं अंगण पुन्हा सजीव होत रहावं..!
(आज अंगण हरवलेली घरं आणि चिमण्यांचं ओसाडपण मनाची घालमेल वाढवत राहते अगदी माझ्या आणि तुमच्याही.)