मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

मला दिनांक 31 मार्च२३ रोजी ब्रह्मनाळला व्याख्यानाला जाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आनंदमूर्ति स्वामींची माहिती मिळाली .ती येथे देत आहे

आनंदमूर्ती स्वामींचे मूळ नाव अनंतभट होते. रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु. रघुनाथ स्वामी एकदा परगावी गेले.आनंदमूर्तींना त्यांचा शोध घेण्यासाठी तीन वर्षे लागली. तीन वर्षानंतर ते भेटले तेव्हा दोघांना खूप आनंद झाला.  स्वामी म्हणाले, अनंता, तीन वर्षे बायको मुले एकटी सोडून माझे स्वतःसाठी तू वणवण फिरलास ही एक तुझी तपसाधना झाली. माझ्यावरची तुझी निष्ठा पाहून मला खूप आनंद झाला तू माझ्या अंतर्यामीच्या आनंदाची मूर्ती आहे. आज पासून आम्ही तुला आनंदभट न म्हणता आनंदमूर्ती असेच नाव ठेवत आहोत. आम्ही तीन वर्षे जी साधना केली त्याचे पुण्यफल तुझे पुढील सात पिढ्यांचे  योगक्षेम सुव्यवस्थित चालावेत म्हणून आशीर्वाद पूर्वक तुला अर्पण करीत आहे. यापुढे तुझ्या तोंडून जे शब्द निघतील ते सत्य होतील. आणि तसेच झाले. चिकोडीत सौ. कुलकर्णी बाई त्यांच्या दर्शनास आल्या. स्वामींनी आशीर्वाद दिला .”पुत्रवती भव”. बाई  म्हणाल्या स्वामी माझे वय 60 आहे.  स्वामी म्हणाले मी आशीर्वाद दिला तो सहजस्फूर्त होता.

अंतर्यामीच्या आत्म्याचे बोल आहेत. हे सत्य  होणारच. दुसरे असे की एखाद्याने शाप दिला तर त्याला उ:शापाचा उतारा देऊन मुक्त करता येते. परंतु दिलेला शुभाशीर्वाद परत घेता येत नाही .तुम्हाला एक वर्षाचे आत मुलगा होऊन वंश वाढेल हे निश्चित. त्याप्रमाणे त्या बाईंना मुलगा झाला. त्यांचा वंश पुढे वाढत गेला. 

रघुनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती तीन वर्षांनी वसगडे येथे परत आले. अनेक भक्त स्वामींना गाई भेट देत. संध्याकाळचे स्नान संध्या करण्यासाठी स्वामी नदीवर जात. येताना दान मिळालेल्या गाई ,दुपारी रानात चरायला सोडलेल्या गाई स्वामी परत आणून गोठ्यात बांधीत.गाईंचे गोठ्याजवळ एक मोठी चतुष्कोनी शिळा होती. त्यावर बसून स्वामी ध्यानधारणा करत. पुढे त्या शिळेवर मारुतीची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. स्वामींचे समाधीनंतर त्या स्वयंभू मारुतीची शिळा ग्रामस्थानी आजच्या श्री लक्ष्मी मंदिरात स्थापन केली. त्या शिळेला श्री रघुनाथ स्वामी असे संबोधतात. त्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करतात.रघुनाथ स्वामी आनंदमूर्तीना घेऊन संगमावर आले. स्वामी म्हणाले हे संगमस्थान पवित्रांमध्ये पवित्र आहे. देह त्यागास हे स्थळ उत्तम आहे.

स्वामी म्हणाले एका व्यक्तीने कितीही कार्य केले तरी ते अपुरेच असते .पुढच्या लोकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. जगदोध्दाराचे जे कार्य अपुरे राहिले ते तू पुढे चालू ठेव. जनता जनार्दनाला जप ,तप, भक्ती मार्गाचा उपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. स्वराष्ट्र आणि स्वधर्म याची जाणीव देऊन त्याच्या रक्षणाची त्यांच्या मनात प्रेरणा उत्पन्न कर. आनंदमूर्तीना उपदेश करून स्वामींनी देहत्याग केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे देह दहनाकरता संगमावर आणला. पण ब्रह्मनाळचे ग्रामस्थांनी परगावचे प्रेत म्हणून आपल्या गावी दहन करण्यास नकार दिला. मग आनंदमूर्तिनी संगमाकाठी ४० हात लांब रुंद जागा पंधरा होन देऊन विकत घेतली. त्या ठिकाणी स्वामींच्या पार्थिव देहाचे यथाविधी  दहन केले. दहनस्थानी उत्तर कार्य करून स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. पादुकांवर आच्छादन म्हणून त्यावर वृंदावन बांधले. बांधकाम वरच्या थरापर्यंत येताच वृंदावन थरारले आणि वृंदावनाचा थर पूर्णपणे पडला. असे चार वेळा झाले. आनंदमूर्ती पादुकांसमोर एक दिवस एक रात्र निर्जली उपोषण करीत बसले. स्वामी, वृंदावन बांधण्याची आमची मनोमनीची इच्छा आहे. कृपावंता, कृपा करून बांधकाम पूर्ण होऊ द्या. लाडक्याची इच्छा जाणून स्वामींनी पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला. यापुढे बांधकामात व्यक्त येणार नाही. वृंदावनाचे बांधकाम सुरू झाले. रंग दिला. एका बाजूस शिवपंचायतन  आणि दुसऱ्या बाजूस रामपंचायतनाची चित्रे रेखाटली. वास्तु्पूजा केली. आरती झाली. कीर्तन सुरू झाले आणि वृंदावन डोलले. फुलांचे हार हालले. वृंदावनाचा हा पहिला डोल.रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींना निर्याणापूर्वी संगमस्थानी आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या जागृत अस्तित्वाची जाणीव दिली. श्री समर्थ रामदास स्वामींना हे कळले. ते ब्रह्मनाळला आले. पादुकांची पूजा केली आणि वृंदावनाचा डोल झाला. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले

जळघी गिरिशिळांनी सेतु बांधी तयाचे |

नवल नच शिवाही  ध्यान ते योगियाचे ||

अभिनव जगी तुझी कीर्ती आनंदमूर्ती |

 अचळ दगड प्रेमे डोलती थोर ख्याती ||

रघुनाथ स्वामींच्या पहिल्या वर्षाची पुण्यतिथी होती. त्यादिवशी चाफळहून रामदास स्वामी, वडगाहून जयराम स्वामी, निगडीहून रंगनाथ स्वामी, कराडचे निरंजन स्वामी, अनेक अन्य  साधुसंत, स्वामी ,वैदिक ब्राह्मण ,कथा- कीर्तनकार, भक्त मंडळी आली. सर्वांनी शिधा आणला होता. तो एकत्र करून भात व वरण फळे करून तो दिवस “फळ पाडवा” म्हणून साजरा केला .भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा पुण्यतिथीचा दिवस उत्साहात संपन्न झाला. तिसरे दिवशी रामदास स्वामींच्या सांगण्यावरून गोपाळकाला केला. त्या दिवशी स्वतः रामदासांनी कीर्तन करून पहिला पुण्यतिथी उत्सव पूर्ण केला.

आनंदमूर्तींनी कांही आरत्या रचल्या. त्यातून बरीच माहिती मिळते. सध्या तिथे पाडवा ते दशमी उत्सव असतो. रहायला खोल्या बांधल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी येऊन रहातात. सेवा करतात. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. राम जन्माचे कीर्तन झाले की तिथे डोल होत असे. दगड चुन्यात बांधलेल्या वृंदावनाचा डोल हे लोकांना पटत नव्हते. अनेकांनी  प्रत्यक्ष पाहूनच खात्री केली होती. आनंदमूर्तींना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. एकदा चोर त्यांच्या मागे लागले पण त्या चोरांना यांच्याबरोबर दोन धनुर्धारी तरुण दिसले. त्यामुळे त्यांना चोरी करता आली नाही. त्यांनी सांगलीत पोचल्यावर आनंदमूर्तींना ते धनुर्धारी कोण असे विचारले. तेव्हा आनंदमूर्तींना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले आमचे गुरु रघुनाथ स्वामींनी ही अघटित घटना घडवून आणली. धनुर्धारी रूपात तुम्हास त्यांचे दर्शन झाले. तुम्ही पुण्यवान आहात. आता हा व्यवसाय सोडा आणि चांगले आयुष्य जगा. चोरांनी ते ऐकले.

स्वामींना आपल्या अवतार समाप्तीची जाणीव होऊ लागली. थोरला मुलगा कृष्णाप्पा याला बोलावून त्यांनी माझ्यामागे गुरु रघुनाथ स्वामींच्या पादुकांची पूजा, ब्रम्हनाळ गावचे इनाम, मठ, शेती, स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था, वार्षिक उत्सव, आल्या गेल्या भक्तांची वास्तव्य व भोजनाची कायम व्यवस्था करण्यास सांगितले. त्याला समोर बसवून कानात तत्वमसी-“सोऽहं”मंत्राचा उपदेश केला. भूमध्यावर अंगठ्याने दाब देताच त्याची समाधी लागली. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यास पाणी लावून त्यांनी समाधी उतरवली‌. व सांगितले तू दिवसा संसार व देवस्थानचा व्यवहार व ब्राह्ममुहूर्ती जप ,तप, ध्यान  करत रहा. 

आनंदमूर्तींनी पूजा आटोपली. बाहेर भक्तमंडळींना सांगितले आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या पुण्यदिवशी आम्ही देह त्याग करणार. देह त्यागानंतर सत्वर ब्रम्हनाळ येथे श्री गुरु  रघुनाथ स्वामींचे वृंदावनासमोर आमचा देह दहन करा. नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

ब्रम्हनाळ मठाची उपासना श्रीरामाची. इथे रामनवमी ,महाशिवरात्र, रघुनाथ स्वामी व  आनंदमूर्तींचे पुण्यतिथी उत्सव व अन्य काही लहान उत्सव कार्यक्रम होतात. सज्जनगडचे श्रीधर स्वामी सुद्धा ब्रह्मनाळला आले होते . त्यावेळी डोल पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या ज्या वेळी वृंदावन समाधीसमोर वेद घोष होतो व भक्तिभावाने भजन, कीर्तन, नाम संकीर्तन,   प्रवचने, साधुसंत करतात व ब्रह्मनिष्ठ योगी ,तपस्वी पुरुष दर्शनास येतात त्यावेळी  वृंदावन डोलते असा अनुभव आहे.

 नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

परम कठीण शीला- डोलवी वृक्ष जैसा |

जननी जठर कोषी जन्मला कोण ऐसा ||

हरिभजन प्रतापे ख्याती झाली दिगंती |

अनुदिनु स्मरचित्ता श्री आनंदमूर्ती ||

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. 

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.     

—  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. 

प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

३) चौकी म्हणजे चार वेद —  (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)

४) पंजी म्हणजे पंचप्राण —  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षडरिपू —  (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये 

१०) गुलाम- मनातील वासना 

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील.  परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

घड्याळाचे काटे घड्याळात आडवे झाल्याचे दिसले (सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे.) आणि मी माझा अंथरुणावर पडलेला आडवा देह उभा केला. (सहा वाजता काटे असतात तसा उभा केला. खरेतर सकाळी सहा वाजता असतात तसा. असे म्हणणार होतो पण मी संध्याकाळचेच सहा वाजल्याचे बघतो. सकाळची सहाची वेळ घड्याळात बघायला वेळ कुठे असतो.)

ब्रश काढला. त्यावर पेस्ट पसरवली. तोपर्यंत लगेच माझ्या मोबाईलवर मॅसेज येण्याचे टोन ऐकू येऊ लागले.

आज सकाळी सकाळी इतके मेसेज कसे काय? हा प्रश्न पडला. कोणाचा तरी Birthday असावा अशा विचारात मी मोबाईल हातात घेतला. कारण Birthday wishes चे विशेष सांभाळायचे होते.पण तोंडातला ब्रश, आणि मोबाइलवर बोटे एकाचवेळी फिरवण्याची कसरत जमली नाही.

मग मोबाईल बाजूला ठेवला, आणि ब्रश केला. फ्रेश झालो. न्यूज पेपर हातात घेत सावकाश चहा घेता घेता परत एकदा मोबाईल हातात घेतला. परत तेच. कपबशी, न्यूज पेपर, आणि मोबाईल यांचा हाताशी ताळमेळ बसला नाही. परत मोबाईल बाजूला ठेवला. पण मॅसेज चे टोन सुरुच होते. आज काय विशेष आहे याचा विचार करता करताच अगोदर चहा संपवला.

आणि मग शांतपणे खुर्चीवर बसून अधिरतेने मोबाईल ओपन केला. थोडावेळ सगळे मॅसेज बघितले. एक लक्षात आले.

गुलाब, मोगरा, प्राजक्त, कमळ, बकुळी, चाफा अशा अनेक  छानशा पण टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या सुरेख चित्रांसोबत Hi, Hello, Good morning, Have a nice day असे Pop corn सारखे टणाटण फुटणाऱ्या सगळ्या मॅसेजेस् च्या जागी चक्क नमस्कार मंडळी, सुप्रभात, काय म्हणता…, कसे आहात, आजचा दिवस सुखाचा जावो असे चक्क मराठीत लिहिलेले बरेच मॅसेजेस् मोबाईलवर आले होते.

आणि लक्षात आले. आज मराठी राजभाषा दिन. मग काय?…..

मी कसा काय मागे राहणार. भ्रमराने फुलाफुलांवर जाऊन त्यातील मधुकण गोळा करावेत तद्वतच मी देखील माझ्या भ्रमणध्वनीवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या समुहात पाठवलेले वेगवेगळे पण त्यातल्यात्यात काही वेचक संदेश टिपले. आणि कापा व चिकटवा अथवा नक्कल करा व चिकटवा या मार्गाचा अवलंब करत एकाचे दुसऱ्याला पुढे पाठवायला सुरुवात केली.

सध्या परिक्षेचे दिवस सुरू आहेत. नक्कलमुक्त अभियान राबवले जात असल्याचा भास निर्माण केला जातोय. पण तिथे जसा नक्कल करण्याचा सुळसुळाट असल्याचे वृत्त येते, तसेच मी देखील नक्कल करतोय याचे भान मला राहिले नाही.

निदान आज परत अंथरुणावर आडवे पर्यंत तरी शुभरात्री, शुभरजनी असे मराठीतलेच संदेश येतील.

हे ही नसे थोडके…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताटी लावता आली पाहिजे..! – लेखक : श्री प्रवीण ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाला हे करता आलं पाहिजे. स्वतःला आतून काहीकाळ तरी बंद करून घेता आलं पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.! विचारांना आतून थांबवायचं..! चक्क कडी घालायची..!

— विरक्तपणाची कडी..! माउलींना हे सहज शक्य झालं..! कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.– आपल्याला स्वतःला आवरणं अवघड आहे.– पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आल पाहिजे.— नात्यांना काही काळ लांब ठेवता आल पाहिजे.

अगदी तो विश्वंभरही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.– श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

— ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..– दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..— पण अंतर ठेवावं.!

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.! आतली हाक समजून घ्यावी.

— आणि स्वतःला समजावून द्यावी.!

 

— न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडी बाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.— तीच हाका देईल..! जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक..! हे झालं पाहिजे.

या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मी..! पण केव्हातरी..—– 

— ताटी लावता आली पाहिजे..!!!!

लेखक : श्री प्रवीण 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ रासलीला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ रासलीला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

माझे मन तुझे झाले..

 तु आणि मी आता एकरूप झालो. 

अद्वैताचे निधान लाभले. 

असोनी लौकिकी संसारी मी तुलाच वाहिली जीवाची कुर्वंडी.. बासरीच्या मोहक धुनी धावत आले यमुना थडी. 

गुंतले गुंतले मन तुझ्यात 

 सोडविले मला तू संसाराच्या कह्यात.. 

बोल लाविती निंदा करती गणगोत किती

जनरितीचे भान हरपले चाड ना उरली कसली ती, 

तु माझा कृष्ण सखा नि मी तुझी सखी. 

मी तू तद्रूप झाले यमुनेच्या जळासारखी

कान्हा माझाच असे तो एकटीचा…

 

…हो हो मीच असे फक्त तुझाच एकटीचा 

कान्हा सांगे कानात एकेकीचा .. 

रंग रंगली ती रासलिला.. 

धावो आले सगळे गाव यमुनातीरी 

धरुनी आणाया आप आपल्या कुल स्त्रीला

मग कृष्णे केली माव दाविली आपली लिला

गोपिकांच्या वस्त्रप्रावरणात गोकुळात

 दिसे नयनी एकच निलकृष्ण तो अनेकात

भाव विभोर ते भवताल दंगले.. 

अद्वैताचे निधान लाभले. 

माझे मन तुझे झाले..

यमुनेचेही जल प्रेमाने सलज्ज लाजले.. 

तरंग तरंग लहरी लहरी उठते झाले.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचनवेड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वाचनवेड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

…नव्याची नवलाई खरच आगळीवेगळीच असते हे काही खोट नव्हे. सगळं कसं अप्रुप, कौतुकाचं. माझं जरा बरं नसणं पण मी नवलाईने एन्जॉय करतेयं. हा आता मोबाईल, वाचन ह्या आवडत्या गोष्टींवर आलाय खरा थोडा अंकुश पण त्याजागी मस्त आराम,लाड कौतुक हे मिळतयं हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे कधी नवीन पोस्ट लिहीणं तर कधी जुन्या पोस्ट मध्ये अजून भर टाकून वरणात पाणी घालून वरण वाढवण्यासारखे सुरू आहे. अर्थात नवीन आजाराचं कौतुक पण खूप वाटतयं, त्या औषधांच्या,उपचारांच्या वेळा पाळणे, आज नवीन जागी कुठं दुखतयं कां ह्याचा शोध घेणे,आणि नोकरी वगळून उर्वरित वेळात मस्त आवडता आराम, ताणून देणं छान उपभोगतेयं. डॉ. म्हणलेत एवढी आजाराबाबत सकारात्मकता असल्यामुळे आजार चुटकीसरशी पळतोय,थोडक्यात काय तर हे आरामाचे दिवसही उरकत येताहेत.असो.

…नुकताच वाचनदिन झाला. त्या निमीत्ताने एक लता मंगशकरांवरील द्वारकानाथ सांझगिरी लिखित एक मस्त पुस्तक वाचायला हाती घेतलयं.आता हे पुस्तक हळूहळू सावकाश वाचावे लागणार, पुर्वीसारखे फडशापाडल्यागत वाचन आता करता येणार नाही.

वाचनाचं आणि माझं एक अलवार,सुंदर पण घट्ट जुळलेलं नातं. ना ह्या नात्यात कोणता स्वार्थ ना कुठलाही वेळेचा दुरूपयोग,असलीच तर ती फक्त चांगल्या गोष्टींची वैचारिक देवाणघेवाण. पुस्तक दिनाच्या निमित्ताने ह्या आमच्या अऩोख्या बंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

प्रत्येक पुस्तकाची वेगवेगळीच खासियत असते बघा. काही पुस्तकात समाविष्ट असलेलं कथानक, विषय हा बाजी मारून जातो तर कधी त्या पुस्तकाच्या लेखकाची लेखनशैली भाव खाऊन जाते. कधीकधी हे कथानक पटणारं असतं म्हणून आवडून जातं तर कधीतरी न पटणारं कथानक पण आपण ह्या अँगलने कधी विचारच केला नाही हे शिकवून जातं. काही पुस्तकांतील अलंकारिक,नटवलेली भाषा मेंदूत ठसते तर कधीकधी अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडलेले विचार अगदी आपल्या मनात घर करून राहतात.काही वेळा पुस्तकात ह्या दोन्ही भट्टी एकदम जमून येतात मग तर ते पुस्तक म्हणजे क्या कहना. अगदी हातातून सोडवत नाहीत अशी पुस्तकं.

वाचनासारखी मनं रमवणारी, चांगल्या गोष्टी शिकवणारी,नवनवीन माहितीचे भांडार खुली करून देणारी दुसरी कुठलिही गोष्ट नाही. अर्थातच मी हे म्हणायचं, लिहायचं म्हणून नाही तर स्वानुभवाने मनापासून सांगतेयं.

वाचनाइतका दुसरा चांगला मित्र नाही. फक्त हवा मात्र ह्या मैत्रीचा मनापासून स्विकार, आवडीने जवळीक. फक्त एक नक्की ह्या मित्राची निवड जरा दर्जेदार आणि चोखंदळपणे करावी लागते. आपण जे मनापासून वाचतो नं ते आपल्या मनातून मेंदूपर्यंत थेट झिरपत जाऊन वसतं. ह्या वाचनवेडा वरुन मला वपुंच एक वाक्य आठवलं,”प्रत्येकाला कसलतरी वेड हे हवचं,वेड असल्याशिवाय शहाणी व्यक्ती होऊच शकत नाही”.

जशी झाली बघा अक्षरओळख

तशी हाती आली मस्त अंकलिपी

बघून त्यातील अंक ,अक्षरे आणि चित्रं

गावला मला त्या रुपाने एक सच्चा मित्रं ।।।

 

शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकं

खरतरं वाटतं होती जराशी निरस,

पण त्यांनीच तर  केले अवघे

सगळ्यांचे उत्तरायुष्य खरे सरस।।।

 

किशोरावस्थेत अभ्यासला इतिहास

वाचनातून उमगले हिंदवी स्वराज्याचे तोरण,

ऐतिहासिक पुस्तके बनली

चढविण्या देशप्रेमाचे स्फुरण ।।।

 

ज्ञानसंपत्ती मध्ये नित्य करावी वृद्धी

पुस्तकांनी बहाल केली आपल्याला समृध्दी

पुस्तकांनीच बहाल केली खरी समृद्धी ।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिल खुलास दाद…” लेखिका – सौ.अंजली औटी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “दिल खुलास दाद…” लेखिका – सौ.अंजली औटी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती. या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात. 

त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं, म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..

एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने  टपोऱ्या  मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते.  पण ‘त्याच्या’ समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते. 

गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..

तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर…. त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली…, किधर चली..?”

एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..” डिस्को चली..!!!”

त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.

तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच… तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..

त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..

माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले ! 

एका हजरजबाबी उत्तराला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो’ आणि त्याला एक ‘माणूस’ म्हणून समजून घेणारी ‘ती’… मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..

आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा ! — आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..

छोट्याशा क्षणात घडलेल्या त्या  माणुसकीच्या आणि कलात्म रसिकतेच्या  मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे !

लेखिका : डॉ. अंजली औटी.

(#कॅलिडोस्कोप )

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रौचे आणखी एक दमदार पाऊल ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोचे आणखी एक दमदार पाऊल ☆ श्री राजीव गजानन पुजारी

स्रोचे आणखी एक दमदार पाऊल ::: 

इस्रोचे पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान बनविण्याच्या दिशेने दमदार पाऊल 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) २ एप्रिल २०२३ रोजी पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची यशस्वी चाचणी घेतली. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील हवाई परीक्षण केंद्रात (aeronautical test range-ATR) ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरणाची क्षमता इस्त्रोने प्राप्त केली असून पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान मोहिमेची ही सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही.

भारतीय हवाई दलाच्या चीनुक हेलिकॉप्टरचा एक अधिभार म्हणून RLV (reusable launch vehicle) ने सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उड्डाण भरले आणि समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटरची उंची प्राप्त केली. RLV च्या मोहीम व्यवस्थापन संगणक आज्ञेनुसार (mission management computer command) ठरविलेले अवतरणाचे मापदंड (landing parameters) प्राप्त झाल्यावर RLV ला मध्यआकाशात चीनुक पासून वेगळे करण्यात आले. RLV ला वेगळे करण्याच्या दहा मापदंडमध्ये स्थिती, वेग,उंची आदि गोष्टींचा समावेश होतो. RLV ला वेगळे करणे स्वायत्त (autonomous) होते.  एकात्मिक दिक् चलन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीचा (integrated navigation, guidance and control) वापर करून RLV ने उपगम (approach) आणि अवतरण (landing) प्रयुक्त्या (maneuvers) केल्या आणि भारतीय वेळेनुसार सात वाजून चाळीस मिनिटांनी ATR च्या धावपट्टीवर यशस्वीरीत्या स्वायत्त अवतरण केले.

अंतराळ वाहन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना जी परिस्थिती असते अगदी तशाच परिस्थितीत म्हणजे उच्च वेग, विनाचालक आणि परतीच्या मार्गावरून अचूक अवतरण अशा परिस्थितीत -जणूकाही अंतराळ वाहन अंतराळातून परतत आहे- स्वायत्त अवतरण पार पाडण्यात आले.

कक्षीय पुनर्प्रवेश अंतराळ वाहनास त्याच्या परती च्या मार्गावर जमीन सापेक्ष गती (ground relative velocity), अवतरण प्रणालीच्या ऋण प्रवेगाचा दर (sink rate of landing gears- हा साधारण तीन फूट प्रतिसेकंद असतो ) आणि विमान क्षितिज समांतर असतांना त्याच्या दिशा बदलाचा अचूक दर (precise body rate – हा सर्वसाधारण तीन डिग्री प्रती सेकंद असतो ) वगैरे जे अवतरण मापदंड (landing parameters) असायला हवेत त्या सर्वांची या प्रयोगात पूर्तता झाली. RLV LEX (Reusable Launch Vehicle Landing Experiment) साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्यामध्ये अचूक दिक् चलन हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्युडोलाईट1  प्रणाली, का बँड रडार अल्टीमिटर, NavIC रिसिव्हर, स्वदेशी अवतरण प्रणाली, एरोफॉइल हनिकोंब फिन आणि ब्रेक पॅरेशूट प्रणाली वगैरे गोष्टींचा समावेश होतो. या प्रयोगामुळे वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सिद्धता आपण करू शकलो.

जगात पहिल्यांदाच एखादे विमान हेलिकॉप्टरद्वारा  ४.५ कि. मी. उंचीवर नेऊन धावपट्टीवर स्वायत्त अवरोहण करण्यासाठी सोडण्यात आले. RLV हे एक अंतरीक्ष विमान असून त्याचे उच्चालन व अवरोध यांचे गुणोत्तर (lift to drag ratio) कमी असते. त्यासाठी उपगम (approach) समयी सर्पण कोन (glide angle) मोठा असणे आवश्यक असते. हे साध्य करण्यासाठी अतीवेगाने म्हणजे साधारण ताशी ३५० कि.मी. ने अवतरण करावे लागते.

LEX मध्ये विविध स्वदेशी प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. स्युडोलाईट प्रणालीवर आधारित स्थानिक दिक् चलन(navigation) प्रणाली, उपकरणयोजना (instrumentation) आणि संवेदक (sensors) प्रणाली वगैरे अनेक गोष्टी इस्रोने विकसित केल्या आहेत. का बँड रडार अल्टीमीटर सहित असणाऱ्या अवतरणाच्या जागेच्या अंकीय उत्थान प्रारूपामुळे (Digital Elevation Model-DEM) उंचीसंबंधीची अचूक माहिती मिळते. विस्तृत पवन बोगदा चाचण्या (Extensive wind tunnel tests) आणि CFD प्रतिरूपविधानांद्वारा (Simulations) उड्डाणाआगोदरच RLV चे वायुगतिकी वैशिष्ट्यचित्रण (Aerodynamic Characterization) करता आले. RLV LEX साठी विकसित केलेल्या समकालीन (Contemporary) तंत्रज्ञानामुळे इस्रोच्या इतर वापरत असलेल्या प्रक्षेपकांच्या प्रक्षेपणाच्या खर्चात बचत होणार आहे.

ISRO ने मे २०१६ मध्ये HEX (Hypersonic Flight Experiment) मिशनमध्ये RLV-TD (Reusable Launch Vehicle-Technology Demonstrator) या विमानाच्या  पुन: प्रवेशाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. हायपरसॉनिक सब-ऑर्बिटल वाहनाच्या पुन:प्रवेशाने पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन विकसित करून इस्रोने एक मोठी उपलब्धी प्राप्त केली होती. HEX मध्ये, वाहन बंगालच्या उपसागरावर एका काल्पनिक धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवर अचूक लँडिंग हा एक पैलू होता जो HEX मिशनमध्ये समाविष्ट नव्हता. LEX मोहिमेमध्ये अंतिम उपगम टप्पा (Final approach phase) गाठता आला त्या बरोबरच परतीच्या उड्डाणमार्गाने पुनःप्रवेशासाठीचे स्वायत्त, उच्चगतीच्या (३५०कि.मी.प्रती तास) अवतरणाचे प्रात्यक्षिक पण पार पाडण्यात आले. LEX ची सुरुवात २०१९ मध्ये एकात्मिक दिक् चलन चाचणीने झाली. त्यानंतरच्या वर्षांत अनेक अभियांत्रिकी प्रारूप चाचण्या व बंधनस्त टप्पा चाचण्या (Captive Phase Tests)पार पाडण्यात आल्या.

ISRO सोबत IAF, CEMILAC, ADE, ADRDE यांनी या चाचणीसाठी हातभार लावला. IAF टीमने प्रोजेक्ट टीमसोबत हातात हात घालून काम केले.  डॉ.एस उन्नीकृष्णन नायर, संचालक, व्हीएसएससी, आणि श्री श्याम मोहन एन, कार्यक्रम संचालक, एटीएसपी यांनी  मार्गदर्शन केले. डॉ. जयकुमार एम, प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे संचालक होते आणि श्री मुथुपांडियन जे, सहयोगी प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे वाहन संचालक होते. यावेळी ISTRAC चे संचालक श्री रामकृष्ण उपस्थित होते. अध्यक्ष, ISRO/सचिव, DOS श्री एस. सोमनाथ यांनी चाचणी पाहिली आणि सर्वांचे अभिनंदन केले.

LEX मुळे भारताचे पुन: वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाचे स्वप्न वास्तवतेकडे जाण्यास सुरुवात झाली आहे.

टीप :

1.स्युडोलाईट – हे स्युडो सॅटेलाईट शब्दाचे संक्षिप्त रुप आहे. हा खरा उपग्रह नसतो पण सर्वसाधारणपणे उपग्रहाच्या कार्यक्षेत्रात असणारी कामे करतो. बहुतेकदा स्युडोलाईट्स हे लहान पारेषकग्राही-transceivers- असतात व त्यांचा उपयोग  GPS प्रणालिला पर्यायी प्रणाली स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी केला जातो.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “Coordination Cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार. 

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला. “Duty Manager please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.” 

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.” 

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मै तुम को जमीन मे जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?” 

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले. “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मै आप की मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी मे ठीक तरह  से बातचीत करने नही आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उन की तरफ से माफी मांगता हूं . ” 

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली पण चढ्या आवाजांत म्हणाली “मेरे दांत मे बहोत दर्द है . मै सफर नही कर सकुंगी. बस इतना मैने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये है ? मै उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?” 

यावर बनर्जीने जे उत्तर दिले ते ऐकून मला हंसावे की रडावे ते कळेना. 

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मै वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैने लेडी को बोला टांग उपर करो. असं म्हणून बनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिटमे दोर्द गायब होता है.” 

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जीभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा. 

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जय जय महाराष्ट्र  माझा… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌸 विविधा 🌸

जय जय महाराष्ट्र माझा!… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!

एक मे, महाराष्ट्र दिन! माझ्या लाडक्या महाराष्ट्राचे पोवाडे मुक्तपणे गायचा दिवस! ज्या पवित्र भूमीत मी जन्म घेतला, त्या भूमीचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी कसे करावे? त्यापेक्षा या मंगलमय दिनी शब्दपुष्पांची सुंदर माळच तिच्या कंठात घालते!

महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेतला ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच! या महान महाराष्ट्र देशाची महती अन श्रीमंती मी एका मुखाने काय आणि कशी वर्णावी? त्यासाठी प्रतिभावंत शब्दप्रभू गोविंदाग्रज यांनी रचलेले मनमोहक महाराष्ट्राचे महिमा-गीत “मंगल देशा” ऐकायला हवे. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा अपमान करणे होय. त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य, रणकौशल्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, इत्यादी इत्यादी विषयी मी पामराने काय लिहावे, केवळ नतमस्तक व्हावे अन “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप”! आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अंमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. त्याचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरे हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज!

आमची लाडकी दैवते म्हणजे, विठू माऊली, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा इत्यादी इत्यादी! माझा महाराष्ट्र देश हा संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट” या हाकेनिशी संतांच्या मागे हजारोंनी दिंडीत सामील होत “राम कृष्ण हरी” चा टाळ मृदुंगासहित गजर करणारे वारकरी आजही त्याच भक्तीने वारी करीत हा अनमोल भक्तीचा नजराणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि समाज प्रबोधनाची श्रीमंती काय वर्णावी? फक्त नाव जरी उच्चारले तरी आपोआपच “तेथे कर माझे जुळती”! आपण ज्या स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेतोय, ते मिळवून देण्यात येथील अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. किती म्हणून नावे घ्यावीत! आज त्यांच्या स्मृती-चरणी नतमस्तक होऊ या!

अभिजात भाषा आणखी किती समृद्ध असू शकते? सरकारदरबारी “मराठी” या माझ्या मायबोलीला हा दर्जा केव्हा मिळेल? या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! तिची थोरवी गातांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “माझ्या मराठीचे बोल कवतुके। परी अमृतातेंही पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें। मेळवीन॥“ ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात.

हे अभिजात साहित्य रचणारे हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, किती म्हणून नावे घ्यावीत! या साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! महाराष्ट्राची संगीत परंपरा अतिशय जुनी अन समृध्द आहे. संगीत नाटकांची परंपरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आणि मक्तेदारीच समजा ना! स्त्रीसौंदर्याचे नवथर निकष निर्माण करणारे बालगंधर्व, त्यांचे आम्हा रसिकांना कोण अप्रूप. ज्यांच्या स्त्रीसुलभ विभ्रमांचे इथल्या स्त्रियांनीच अनुकरण करावे असा रसिकांना वेड लावणारा हा एकमेवाद्वितीय कलाकार!

मुंबापुरी अन कोल्हापूर म्हणजे सिनेसृष्टीची खाणच! रजतपटाचा “प्रथम पटल” निर्माण करणारे दादासाहेब फाळकेच! इतर प्रांतातून मुंबईच्या मायानगरीत स्थायिक झालेले अन कर्माने मराठीची बिरुदे अभिमानाने मिरवणारे संगीतकार, गायक, गीतकार अन कलाकारांची तर यादी संपता संपत नाही. अश्या या महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते, यशवंतराव चव्हाण!

आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास जाणून घेऊ या. त्याला काळी चौकट आहे हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोराफाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.

१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला, शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

मी जन्मले आणि वाढले या पुण्य-पावन मातीत, जिथे सुवर्णालंकार अन रत्ने तितकी नव्हती, मात्र होते सुवर्णकांचनासम झळाळणारे अस्सल संस्काराचे तेज! पुस्तके वाचता-वाचता, नाटके बघता-बघता अन वय वाढता- वाढता ओळख पटली इथल्या साहित्यिक वैभवाची! मन मोहोरून विचारायचे; आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’ चाखू, की, गडकऱ्यांच्या सुधाकर अन सिंधूच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या ‘एकच प्याल्याचे’ रंग रंगमंचावर बघू, की पु ल देशपांडेंच्या त्या अवखळ फुलराणीचे “तुला शिकवीन चांगलाच धडा!” हे प्रसिद्ध स्वगत आत्मसात करू, की ‘मृत्युंजयाच्या’ उत्तुंग विविधरंगी व्यक्तिमत्वाने स्तिमित होऊ! “घेता किती घेशील दो कराने” अशी तेव्हा माझी अवस्था व्हायची! नागपूरच्या नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे शिक्षण घेतले अन चाकरी केली तिथेच, भरून पावले अन आयुष्य सार्थकी लागले. इथल्या मातीचे ऋण चुकवण्याचा विचार पण मनात येत नाही, कसा येणार? इतके विशाल आहे ते! ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना करते की, वारंवार याच पवित्र मातीत जन्मावे अन तिच्याच कुशीत शेवटी विश्रांती घ्यावी, यापरीस सौभाग्य ते कोणते! 

कुणीतरी म्हटले आहे की ठेच लागल्यावर “आई ग!” म्हणून कळवळतो तो खरा मराठी माणूस, पण आता इंग्रजाळलेले ओरिजिनल मराठी बॉय आणि गर्ल म्हणतात “ओह मम्मा!” ते बी मराठीच हायेत की! परप्रांतातून आलेले, येथील मातीशी नाते जोडून आता महाराष्ट्रीयन झालेल्यांचे काय? (याचे उत्तर जाणून घ्यायला अवधूत गुप्ते यांचे गाणे अवश्य ऐका अन पहा, ते देखील मनोभावे गाताहेत “जय जय महाराष्ट्र मेरा!”) शेवटी मने जुळली की मातीशी नाते जुळणारच की भावा! बंबैय्या मराठीची सवय झाली की, सारे सारे कसे सोपे होते! 

मंडळी, हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून उपभोगण्याचा नसून मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचा आणि ती जपण्याचा आहे. मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतांना धोतर, फेटे, नऊवार साडी, नथ इत्यादी पारंपरिक वेषभूषांपुरतेच आणि मराठी पाट्यांपुरतेच मराठीपण जपायचे की त्यापलीकडील आपला जाज्वल्य इतिहास देखील आठवायचा हे आपले आपणच ठरवणे योग्य!!!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares