☆ “महानायक “… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
” राम ” आणि ” कृष्ण ” हे भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !!
एकाने “अयोध्या ते रामेश्वर”, तर दुसऱ्याने “द्वारका ते आसाम” पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत गेली हजारो वर्षे या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!
तसं पाहिलं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे. एकाचा जन्म रणरणत्या उन्हाळ्यात दुपारी, तर दुसऱ्याचा मुसळधार पावसाळ्यात मध्यरात्री !!
एकाचा राजमहालात तर दुसऱ्याचा कारागृहात !!
साम्य म्हणावं तर दोघांच्याही हातून पहिले मारल्या गेल्या त्या राक्षसिणी….. त्राटिका आणि पुतना !
शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जातात.
ज्यांच्यामुळे त्यांच्या चरित्राला वेगळे वळण लागले, त्या कैकेयी आणि गांधारी एकाच प्रांतातल्या…ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यांनी स्वीकारले.!!
एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले, तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !
एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला, तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!!
एकाने पुत्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.
एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले, तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.
एकाने अंगदाकरवी, तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जात, शिष्टाई करत, युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.
एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली, तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.
एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली, तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातून मृत्यू पत्करला.
एक Theory…. तर…दुसरा Practical !!
दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत, आपल्या चरित्राच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता, ह्या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील राहील.!!
जय श्रीराम … जय श्रीकृष्ण !!
इदं न मम ……
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा- ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.
या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.
त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.
मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.
संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.
दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.
पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती ‘रामकृष्ण मठ’ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था ‘रामकृष्ण मिशन’ अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.
स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते
|| ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च’ ||
आज शंभर वर्षे आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.
☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
इयत्ता सहावीत असताना एके दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले. “आज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी शाळेच्या सभागृहात जमा. तुम्हाला आत्तापासून बचतीची सवय लागावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येणार आहेत. नीट ऐकून घ्या ते काय सांगतात ते.”
बँकेचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे आले. त्यांनी लहान मुलांसाठी अल्पबचत योजना म्हणजे काय, त्याचे फायदे वगैरे समजावून सांगितलं. वर्गातल्या माझ्यासकट बहुतेक सगळ्या मुलांनी त्या पुढच्या आठवड्यात आपली बचत खाती उघडली.
त्यानंतरच्या सहा महिन्यात खाऊचे पैसे, कुणी वाढदिवसाला दिलेली भेट या स्वरूपात जमा झालेली रक्कम त्या खात्यात मी भरत राहिलो. माझ्या हिशेबाने खात्यामध्ये 127 रुपये जमा असायला हवे होते. पण प्रत्यक्षात होते 125. लेखनिकाकडे त्या दोन रुपयाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” नोंदीमध्ये काहीतरी चूक झाली असावी. दोनच तर रुपये कमी आहेत. जाऊ दे.विसरून जा. अक्कलखाती जमा करून टाक ” मला वाटलं बचत खात्याला संलग्न अशा विशेष अक्कलखात्याची सोय पण बँक देते. मी भाबडेपणे विचारलं,” त्या अक्कलखात्यावर किती व्याज देतात” माझा प्रश्न आजूबाजूच्या अनेकांनी ऐकला असावा कारण बँकेत हास्याची एकच लाट उसळली. लेखनिकाची विनोदबुद्धी कुशाग्र होती. तो म्हणाला, “अरे गेले ते. अक्कलखाती जमा म्हणजे झाला तुझा मामा!”
अक्कलखात्याची झालेली माझी ती आयुष्यातली पहिली ओळख. नंतरच्या आयुष्यात या खात्यातली जमा उत्तरोत्तर वाढतच गेली. रेल्वेचे तिकीट वेळेवर रद्द केलं नाही म्हणून झालेलं नुकसान, सहल आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे हॉटेल बुकिंगमधील बरेचसे पैसे कापून मिळालेला परतावा, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत खाल्लेली आपटी, आदल्याच दिवशी नियम बदलल्यामुळे जागेच्या नोंदणी शुल्कामधे झालेली 2 टक्क्यांची भरघोस वाढ वगैरे वगैरे अनेक. सर्व काही अक्कलखाती जमा केलं म्हणून डोकं शाबूत राहीलं.
अक्कलखातं आपल्याला खूप काही शिकवून जातं. विसरणं अथवा विस्मरण हे मानव जातीला मिळालेलं वरदान आहे ही पहिली शिकवण. झालेलं नुकसान वेळीच अक्कलखाती जमा केलं नाही तर फक्त मनस्ताप नशिबी असतो. अतिशय दयाळू असलेलं हे खातं आपल्या पोटात पैशांबरोबर वस्तूंनाही सामावून घेतं. पेनं, रुमाल आणि छत्र्या मी किती अक्कलखाती जमा केल्या असतील याची काही ददातच नाही. ह्या तीनही वस्तूंचे उद्योगधंदे केवळ मानवी स्वभावाच्या विसरणे आणि हरवणे ह्या दोन गुणधर्मांवर जिवंत आहेत.
अक्कलखात्याची व्यापकता विस्तृत असते. आपल्या देशाचं अक्कलखातं तर इतकं मोठं आहे की त्यात इंग्रजांनी केलेली लूट आणि स्वातंत्र्यानंतर जमा झालेली पुंजी एकत्र केली तर आपल्या इतक्याच मोठ्या दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था आरामात चालवता येईल. पडलेले पूल, खणलेले रस्ते, आधी बांधून मग पाडून पुन्हा बांधलेले उड्डाणपूल, कागदावर उमटलेल्या आणि खर्च होऊनही प्रत्यक्षात उभ्या न राहिलेल्या असंख्य सरकारी आणि खाजगी योजना …. सर्व काही वर्षानुवर्ष अक्कलखाती जमा. देशाच्या अर्थसंकल्पात त्याची कुठेही नोंद नाही.आपल्या देशबांधवांच्या उदार आणि सहनशील मनाचं सर्वात मोठं प्रतिक.
लहानपणी खेळात पहिला डाव हरला की आम्ही म्हणत असू,” हा डाव देवाला”. गेली दीड-दोन वर्ष जागतिक महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट लक्षात घेता अख्ख्या जगालाच” ही दोन वर्ष देवाला” असं म्हणून अक्कलखाती जमा करावी लागणार.
अक्कलखातं जसं आर्थिक आणि वस्तुरूपदृष्ट्या मोठं असावं लागतं, तसंच भावनांचं अक्कलखातं सहिष्णू असल्याशिवाय आयुष्यात तग धरणं अवघड. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून झालेली कानउघडणी आणि कधी कधी अपमानसुद्धा, भरवशाच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारांमध्ये उडालेले खटके, ओढवलेले दुर्दैवी प्रसंग या सर्वांमधून वेळोवेळी होणारा मानसिक कल्लोळ पचवण्यासाठी भावनिक अक्कलखातं बक्कळ मोठं असावं लागतं. “जाऊ दे, विसरून जा” हे अक्कलखात्याच्या बँकेचं ब्रीदवाक्य आहे.
मागच्या आठवड्यातली गोष्ट. शेअर बाजारात पूर्वी जबरदस्त घाटा सहन केल्यामुळे मी डिमॅट अकाउंट बंद करून टाकलं होतं. एक शेअरमहर्षी सद्हेतूने मला भेटायला आला. डिमॅट अकाउंट पुन्हा उघडून देतो म्हणाला. त्याची थोडी गंमत करावी असा खट्याळ विचार मनात आला. ह्या मार्गाने पुन्हा जायचं नाही असा मी कानाला खडा लावला असल्याने त्याला म्हणालो,” जा, तुझ्या बँकेला विचारून ये. डिमॅट खात्याला जोडून एक अक्कलखातं पण देता का? देत असतील आणि त्यावर चांगलं व्याज मिळत असेल तर लगेच उघडू.” इंग्रजी भाषेत शिकलेल्या त्या भिडूला “अक्कलखातं” ही संज्ञा माहित असण्याची अजिबात शक्यता नव्हती. निष्पापपणे तो म्हणाला,” चौकशी करतो सर”. नंतर परत त्याचा फोन आला नाही
वर्षातून एकदा मी अक्कलखात्याचं पासबुक मनातच भरतो. स्वतः वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अक्कलशून्यतेवर हसून विलक्षण मनोरंजन करून घेण्याचा तो खात्रीशीर मार्ग आहे. स्वतःवर हसलं की खूप मोकळं वाटतं मला. बचत खातं बंद करावं एक वेळ पण अक्कलखातं कधीच नको.
लेखक : डॉ शिरीष भावे
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
इतिहास, दुर्ग अभ्यासक, दरमहा गडकोट भटकंती. निसर्ग विषयक विपुल लेखन. अनेक मराठी ग्रंथाचे समिक्षण.
विविधा
☆ “जागतिक हास्य दिन…” ☆ श्री कचरू चांभारे ☆
मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जीवंत राहण्यासाठी आवश्यक ती धडपड करण्याची शक्ती प्रत्येक सजीवास नैसर्गिकरित्याच लाभलेली आहे.भूक ,भय,तृप्ती या सजीवाच्या प्राथमिक भावना आहेत.सजीव सृष्टीमध्ये मानव हा प्रचंड संकरित प्राणी आहे.बुद्धीवादाच्या काही पैलूंनी संशोधनाचे नवीन आयाम मांडले व मानवी जीवनात आमुलाग्र बदल झाला.इतर प्राणी व मानव यांची तुलना केली तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण देणाग्यांमुळे मानव इतरांपेक्षा खूप वेगळा ठरला आहे.हास्य ही अशीच एक मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे.सूक्ष्मपणे विचार केला तर हास्य ही स्वतंत्र भावना नाही ,हास्य हे आनंदाचे ,समाधानाचे प्रगटीकरण आहे.हसणं , नाचणं ,रडणं हे तीनही भावाविष्कार मानवासाठी अप्रतिम गॉडगिफ्ट आहे.पण लाज नावाची आणखी एक भावना मानवास मिळालेली आहे.ही लाज नेहमीच हसणं ,रडणं व नाचणं यांचा कोंडमारा करत आली आहे.वाढत्या वयाप्रमाणे माणसाची सामाजिक समज अधिक प्रगल्भ होत जाते ,अन् माणूस वरील तीनही प्रकारच्या भावना प्रगटीकरणाला स्वतःच लगाम घालतो.
हसणं ही नैसर्गिक भावना आहे.ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो आनंदी ,उत्साही अन् प्रेमळही असतो.आनंद शोधणं ही एक कला आहे.ज्याला आनंद शोधता येतो,हास्य त्याची आनंदाने गुलामी करतं.कशातही आनंद शोधणारास हास्याचे झरे सापडतात.ज्याला हास्य सापडतं ,ती व्यक्ती प्रभावशाली असते.हास्य हा आपला अविभाज्य घटक असला तरी ज्याने हा घटक अधिक विकसित केला आहे त्यालाच त्याचा मनमुराद आनंद घेता येतो.आज गतिमान आयुष्यात निवांतपणा हरवून गेला आहे.मानवी सहजीवनाची सहजता गुंतागुंतीची झाली आहे.ताणतणाव व दगदग यां सोबत मैत्री करून माणूस आपला सूर्योदय-सूर्यास्त मोजत आहे.हास्य ही फक्त भावनाच आहे असे नाही तर ते एक प्रभावी औषध आहे.दहा मिनिटाच्या व्यायामाने हृदयाचा जेवढा व्यायाम होतो,तेवढाच व्यायाम एक मिनिटाच्या प्रसन्न हसण्याने होतो.हसल्यामुळे शरीरात सेटोटेटीन हे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात.त्यामुळे भूक कमी लागते.’तुला पाहून मन भरलं ‘.असं जे आपण व्यवहारात बोलतो ना त्याचं मूळ इथं आहे.हसण्यामुळे एंडोर्फिस हे हार्मोन्स सुद्धा निर्माण होते.या हार्मोन्समुळे मनात फील गुडची भावना तयार होते.त्यामुळे दुःखावर हलकी फुंकर राज्य करते.
हास्याचेही अनेक प्रकार पडतात.स्मित हास्य हे सर्वश्रेष्ठ हास्य आहे.जिथं ओळख आहे ,तिथेच ते निर्माण होते.ओळखीच्या व्यक्तीच्या नजरानजरीची ओळख पटली की हृदय त्या ओळखीचा पुरावा स्वीकारते व चेह-यावर मंद प्रसन्न स्मित झळकते.स्मित हास्यात चेह-यावरचे स्नायू फार प्रसरण पावत नसले तरी अंतरीच्या खोलातून आलेली प्रसन्नता संपूर्ण चेह-यावर पसरते.हास्य हा कबुली जबाबाचा करारनामा म्हणून सुद्धा काम करते.एखाद्याची गोष्ट पटली तर हसून दाद दिल्यास ,दोन्ही पक्ष खूश होतात.गडगडाटी हास्य हा हास्याचा प्रकार सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो पण पाहणारांची नाराजी झाल्यास ,हसणाराच्या मनात अपराधीभाव येतो.हसून काय पाप केलं ? याच्या उत्तरात तो गुंतून जातो.विनोदाला दाद हे ही हास्याचे एक रूप आहे.हास्याचे सगळेच प्रकार आनंद व्यक्त करणारे असतात.पण याला अपवाद आहे तो कुत्सित किंवा छद्मी हास्याचा.हास्याच्या प्रकारात कुत्सित हास्य हा अतिशय निकृष्ट प्रकार आहे.एकवेळ हास्य थांबलं तरी चालेल ,पण कुत्सित हास्याचा उगम कोठेच होऊ नये.हास्य ही माणसाला मिळालेली देणगी असली तरी आज आपल्यावर हास्य क्लब निर्माण करण्याची वेळ आली आहे.ही घटना म्हणजे नैसर्गिकतेचा अभाव अन् कृत्रिमतेचा प्रभाव सांगणारी आहे.
हास्य हे एक जादूई रसायन आहे.माधुरी दिक्षित नेने झाली.हळुहळू पन्नाशीत गेली. तरी तिचं हसणं फिल्म इंडस्ट्रीतलं भूरळ आहे.पुढे हाच हास्य वारसा मुक्ता बर्वे ,अमृता खानविलकर या मराठी तारकांनी जपला आहे.हसताना गालावर पडली ,की ती खळी कितीतरी जणांसाठी वरदानच ठरते.लहान मुलांचं हसणं अतिशय लोभस अन् गोंडस.हसरं मूल दिसलं की त्याला उचलून घेण्याचा मोह आवरतच नाही.हसताना उघडलेल्या मुखात,सरळ दिसणारी दंतपंक्ती ,केसांची हालचाल हास्याचे सौंदर्य अधिकच खुलविते.हसण्याचं ठिकाण बदललं की त्याप्रमाणे भावही बदलत जातात.लहानमुलांसोबतच्या हास्यात दुःख विरघळविण्याची क्षमता असते.आई वडीलांसोबत हसताना विश्वास वाढतो.बायकोसोबत हसताना अनेक संमिश्र भावाच्या छटा असतात.कारण ती जबाबदार आयुष्याची भागीदार असते.ही जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रतिपूर्तीचे अनेक क्षण हास्य जन्माला घालतात.मित्रा मित्रातले हास्याचे फवारे मानवी जगतापासून दूर गेलेल्या दुनियेतले असतात.तिथे फक्त मैत्री हीच दुनियादारी असते.प्रिय व्यक्तीच्या हसण्याचा आवाज ऐकण्याची आतुरता व त्याचं नेहमीचं चिरपरिचित हसणं ऐकून होणारी तृप्तता ; हे हास्य मात्र अवर्णनीय तृप्ती देणारं असतं.त्या हास्यासाठी दोन्ही मने सारखीच वेडावलेली असतात.
मानवानं या देणगीचं मोल समजून घ्यायलाच हवं.हसरी व्यक्ती नेहमीच त्याच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावत असते.नव्हे नव्हे ,अशा व्यक्तीची दखल घेणं इतरांनाच खूप आवडत असतं.हसा आणि हसवा हा मार्ग दीर्घायुषी रस्त्याला समांतरपणे धावत असतो.म्हणून हसा ,हसत राहा,हसवत राहा.
तारीख होती 2 मे. त्यामुळे बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांना सुट्टी होती. मग मनात विचार आला आपणही सुट्टी घेऊन बघूया कां ? मग ठरवलं आजच्या दिवशी लिखाणाला सुट्टी. आता कुणी ह्याला आळस म्हणू शकता किंवा कुणी रोजच्या रुटीन मध्ये केलेला हलकासा बदल. आज सोशलमिडीया मग व्हाटस्अँप वा फेसबुक ह्यावर पोस्ट लिहायला सुट्टी, त्यामुळे काल ह्यावर इतरांनी लिहीलेल्या पोस्ट चं भरभरून वाचन केले. मस्त आलेल्या आँडीओ,व्हिडीओ क्लिप्स चा मस्त आस्वाद घेतला. काल सगळ्यांचे आलेले गुडमाँर्निंग वाफाळत्या आलं,गवतीचहा टाकून केलेल्या वाफाळत्या चहाबरोबर आस्वाद घेतला. काल अगदी समरसून ह्याचा स्वाद घेतांना जिभेवर स्वाद घोळवत तोंडून आपोआप उस्फुर्तपणे निघालं ,”वाह आज”.
काल मनोमन एक उपास करायचं ठरविले होते,खरतरं माझ्यासाठी अशक्यप्राय वाटणारा उपास होता,पण स्वतःवर श्रद्धा असली की उपास पण सहज निभावता येतो ही खात्री पटली.
त्यामुळे कालचा दिवस कुणालाही कोणतीही पोस्ट न पाठवणे ह्या निश्चयाने सुफळ संपूर्ण झाला. ह्याचा फायदा म्हणजे काल भरपूर वाचन करता आलं. आणि भरपूर लोकांनी पोस्ट नसल्याची दखल घेऊन मेसेजेस केले.त्यांच काळजी करणं,पोस्टची ओढ ही मला नक्कीच सुखावून गेली.असो
कालच्या सुट्टी मुळे असे सुखद अनुभव आले. ह्या सगळ्यांचे धन्यवाद मानून औपचारिकता दर्शविणार नाही आणि त्यांना परकंही करणार नाही.
तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.
आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा कदाचित तिचा नाईलाज असावा . आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही.
ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची . गळ्यात चार मणी, हातात दोनच काचेच्या बांगड्या. माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे.
लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश…. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.
हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता, कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली.
एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंगमध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …” अग तो बघ तो ! तो first आला ना, so मी second आले …” आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. मी त्याची paper sheet पाहिली …
मोत्यासारखं सुंदर अक्षर …! अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले , ” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? ” माझे डोळे संताप ओकत होते.
त्याची आई शांतपणे म्हणाली , ” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना ! ” ….. सणसणीत चपराक…. मी निरुत्तर.
मी खोचकपणे विचारलं, “कोणत्या क्लासला पाठवता याला?”
ती म्हणाली, ” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं .. ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे !’
हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .
पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली…” टिचरने खूप कौतुक केले त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या.. फक्त थोडे बोलता येत नाही म्हणाल्या …. त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ” मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले…
…” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यातलं पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसली. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.
मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”, सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना नुकतीच पार्लरमधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा” , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा “, स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” , किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी ” जोहरी मम्मा ” ….. ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे…..
… फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक…
लेखिका : अज्ञात
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पोखरण येथे १९७४ आणि १९९८ ला भारताने अणुचाचणी घेतली, त्या दोन्ही दिवशी बुध्दपौर्णिमा होती.
१९७४, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने सर्वप्रथम अणुचाचणी घेतली, त्या संपूर्ण प्रकल्पाला *’Operation Smiling Buddha’ (‘हसरा बुध्द’) असं नाव देण्यात आलं होतं.
अणुचाचणी यशस्वी झाली आहे, हे सांकेतिक भाषेत पंतप्रधानांना कळवण्यासाठी ‘The Buddha Has Smiled’ (‘बुध्द हसला आहे’) हा कोड वापरण्यात आला होता.
१९९८ ला अटलजींच्या कार्यकाळात झालेल्या अणुचाचणीचे वैज्ञानिक सल्लागार होते – एपीजे अब्दुल कलाम. यशस्वीतेनंतर त्यांना सर्व शास्त्रज्ञांच्या चमूने ‘बोधीवृक्षाखालील ध्यानस्थ बुध्दा’ची प्रतिमा भेट म्हणून दिली होती.
१९९८ च्या प्रकल्पावर काम केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी पूर्वी माझी भेट झाली. खूप माहिती मिळवल्यावर, वरील बाबींवर आधारलेली मी एक शंका सरांना विचारली,
— “सर, बुध्द हे तर अहिंसेचे प्रणेते आणि अण्वस्त्र हे तर महाविनाशक, हिंसेचं सगळ्यात विक्राळ स्वरूप जगाने हिरोशिमा-नागासाकीच्या अणुहल्ल्यात बघितलं. मग अण्वस्त्रसज्ज होताना, भारताने ‘बुध्द’ या प्रतीकाचा वापर का केला? हे विसंगत नाही का?”
सर हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली —
एका गावाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक जवळची वाट आणि एक वळणाने गेलेली लांबची वाट.
जवळच्या वाटेवर नागाचं मोठं वारूळ होतं. नाग क्रूर होता. वाटेवर कुणी दिसलं की तो दंश करत असे. माणसं जागीच मरत. नागाने अशी अनेक माणसं मारली होती. लोकांनी अखेर ती वाट वापरणंच बंद केलं. गावकरी, गावाला येणारे जाणारे प्रवासी, सर्वजण लांबच्या वाटेने जात.
एकदा त्या गावात एक योगी आला. मोठा सिद्धपुरूष होता. गावक-यांनी योग्याकडून ज्ञान-उपदेश घेतला, त्याचं आतिथ्य केलं. योगी निघाला, तेव्हा गावक-यांनी त्याला जवळच्या वाटेने न जाण्याचा, लांबचा रस्ता पकडण्याचा सल्ला दिला. योग्याने कारण विचारलं, तेव्हा गावक-यांनी नागाची हकीकत सांगितली.
योगी म्हणाला, “मला मृत्यूची भीती नाही. मी नागाला वठणीवर आणतो. चला माझ्या मागोमाग.”
गावक-यांना वाटलं, हा भलताच सिद्धपुरूष दिसतोय. काही चमत्कार पहायला मिळणार, म्हणून गावकरी त्याच्या पाठोपाठ गेले.— योगी वारुळापुढे जाऊन उभा राहिला, गावकरी भयाने जरा दूर थांबले.
आपल्या वाटेवर कुणी आलंय हे बघून नागाचा संताप झाला. नागाने चवताळून फणा काढला, योग्याला डसणार तोच योगी म्हणाला – “मला मारून तुझा फायदा काहीच होणार नाही. उलट तुझ्या भक्ष्यासाठी जमवलेलं तुझं हे बहुमोल विष मात्र वाया जाईल. नुकसान माझं नाही, तुझंच आहे.”
नागाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी न भिणारा भेटला होता.
नाग म्हणाला, ” ही वाट माझी आहे. इथे कुणालाही येण्याची परवानगी नाही.”
योगी म्हणाला, “हा तुझा अहंकार आहे. तुझ्या जन्माच्या आधीही हे गाव आणि ही वाट अस्तित्वात होती. उलट तुझ्या भीतीने लहान मुलं, म्हातारे, रुग्ण, या सर्वांना दूरच्या वाटेनं जावं लागतं. किती लोकांचा जीव घेतलायस तू. सोडून दे ही हिंसा. अहिंसेचा मार्ग धर. लोकांना दंश करणं सोडून दे. ते तुझं भक्ष्य नाहीत.”
नागाला हे पटलं. त्याने अहिंसेचा मार्ग पत्करला. गावकरी आनंदले. योगी तिथून निघून गेला. ती वाट पुन्हा वापरात आली.
काही महिने गेले. योगी परिव्रजा करत परतीच्या मार्गावर होता. पुन्हा ते गाव लागलं. नागाशी भेट होईल म्हणून योगी त्या मार्गाने गेला, वारुळापाशी पोचला.
नाग वारूळाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत, विव्हळत पडलेला दिसला. योग्याने त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं, तेव्हा नाग रडत म्हणाला —
“तुमचं ऐकून मी दंश करणं सोडून दिलं आणि लोक हा रस्ता वापरू लागले. मी त्यांना कुठलाही त्रास देत नाही. पण टवाळखोर लोक मला काटे टोचतात. मला लाथाडून निघून जातात. लहान मुलंसुध्दा मला बोचकून गंमत बघतात.”
योगी म्हणाला, ” तू इतक्यांचे जीव घेतलेस, त्या कर्माचं फळ तुला मिळतंय. बघ, लोकांच्या मनात किती घृणा निर्माण केली होतीस तू स्वतःबद्दल.”
नाग वैतागत म्हणाला, “असंच सुरू राहिलं तर हे लोक जीव घेतील माझा. काय रुबाब होता माझा पूर्वी, तुमच्या अहिंसेच्या उपदेशाने वाटोळं केलं माझं.”
मग योगी म्हणाला—
“बाबा रे, दंश करू नकोस असं मी सांगितलं होतं. पण फुत्कार करण्यापासून तुला कोणी रोखलं होतं? कुणी त्रास देऊ लागल्यावर, तू केवळ फणा उभारून फुस्स केलं तरी समोरचा भीतीने दहा पावलं मागे सरकला असता. तुझी ही अवस्था अहिंसेमुळे नाही, तर अहिंसेचा तू चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे.”
गोष्ट संपली. सर म्हणाले, ” भारताने घेतलेली अणुचाचणी हा स्वसंरक्षणासाठी केलेला फुत्कार होता असं समज. कारण दुबळ्या लोकांच्या अहिंसेला किंमत नसते. तिबेट अहिंसावादी राष्ट्र. दुबळे राहिल्यामुळे चीनने गिळंकृत केलं. अखेर दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने…..
…. स्वतः बलशाली असल्यामुळेच भारत अहिंसेच्या पुजा-यांना आश्रय, संरक्षण देऊ शकतो.”
त्या नागाला कितपत कळलं होतं ठाऊक नाही. मला मात्र पुरेपूर कळलं.
☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
शाळेत असताना टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँटला हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….
कारण मी हातावरील छडीची घाण पुसायचो..
तसा साफसफाईच्या बाबतीत मी खूपच जागरूक होतो!
माझ्या शालेय दिवसांमध्ये माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत. कदाचित ते मला काहीही direct सांगायला मला घाबरत असावेत…
मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असावं, माझ हस्ताक्षरच त्याला कारणीभूत असणार.. म्हणूनच बऱ्याच वेळा ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…
कितीतरी वेळेला शिक्षक मला न विचारता त्यांचा chalk माझ्या दिशेने फेकत असत…
उद्देश एकच होता की मी नेहमीच अतिशय दक्ष असावं..
परीक्षेच्या वेळी नेहमीच 3-4 शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजुबाजूलाच पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत..
अगदी Z security च असायची!
कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून माझा सन्मान करण्यात येत असे..
म्हणजे मी इतर सर्व मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, हाच प्रमुख उद्देश असावा…
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती..माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बर्याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर उभा करत असत. आणि मैदानाला रोज ५-५ फेर्या पण मारायला सांगितल्या जात असत…. हु:! तेव्हा बाकीची मुलं मात्र वर्गात घामाघूम होऊन त्या कोंडलेल्या, गुदमरलेल्या वातावरणात शिकत असत..
तसा मी इतर मुलांपेक्षा खूपच हुशार असल्यामुळे माझे बहुतेक शिक्षक मला नेहमीच म्हणत असत….
“ तू शाळेत का येतोस? …खरं तर तुला ह्याची काहीच गरज नाहीये…”
वा !!! काय सोनेरी दिवस होते ते …. अजूनही आठवतात मला !
— यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग वेगळं असूच शकत नाही —–
“कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचा जन्म आहे म्हणून अमृता इतकी गोरी आहे!” हे माझ्या आईचं लोकांनी विचारलेल्या “इतकी कशी गोरी हो तुमची पोर?” या प्रश्नाला ठरलेलं उत्तर होतं.😅 लहानपणी काहीही वाटत नव्हतं. पण जसजशी समज येत गेली तसतशी गोऱ्या रंगाच्या तोट्यांची कल्पना यायला लागली.😐
जरा मोठी झाल्यावर तर फारच भयानक अनुभव यायला लागले… एका बाईनं चक्क मला विचारलं “तुला कोड आहे का गं?” मला तर त्या वयात कोड म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 😂 आणि हो, हे विचारणारी ती एकटीच नव्हती… अनेकांनी अनेकदा मला हाच प्रश्न विचारलेला आहे…🤣 अगदी लहान असताना माझ्या अंगी असलेल्या रेसिस्टपणाचं हे फळ आहे असं मला नेहमी वाटत आलंय. ते कारण म्हणजे माझे बाबा मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात… बाबांना भेटायला त्यांचा एक पोलिस मित्र येणार होता. नेहमीप्रमाणे आईने मला बाबांच्या कडेवर पार्सल केलेलं त्यामुळे ते आणि त्यांच्या कडेवर मी असे आम्ही दोघे त्यांच्या मित्राला भेटायला गेलो. त्यावेळेस मी दोन वर्षांची असेन… मला बघून बाबांच्या मित्राला आनंद झाला… “प्रमोद किती गोड आहे रे तुझी पोर!” असं म्हणून त्या सावळ्या माणसाने माझ्या गालाला स्पर्श केला. मला ते आवडलं नसावं कदाचित म्हणून मी माझ्या हाताने माझा गाल पुसला आणि बाबांना म्हंटले, “बाबा त्याला सांगा हात नको लावू त्याचा रंग लागेल…” बाबा हसून बेजार झाले… तो इन्स्पेक्टर अगदी ओशाळला… “प्रमोद अरे माझ्यासमोर मान वर करायची हिम्मत होत नाही लोकांची आणि तुझ्या पोरीने पार लाजच काढली माझी एका वाक्यात…”😂
शाळेत गेल्यावर तर आणखी वेगळी तऱ्हा… मी कधीच बॅकबेंचर नव्हते. अगदी पहिल्या बेंचवर बसायला आवडायचं म्हणून वर्गात सगळ्यात आधी येऊन बसायचे. मी बसायचे तिथे नेमकी वर्गाच्या दारातून उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडायची. एकदा शिकवता शिकवता मध्येच बाईंनी मला उठून मागच्या बेंचवर जाऊन बसायला सांगितलं… मला कळलं नाही की काय झालं… बाई म्हणाल्या, “तुझा चेहरा आणि घारे डोळे मांजरीसारखे चमकतात उन्हात ते बघून शिकवण्यात लक्ष लागत नाहीय.”🤣 काय बोलणार यापुढे? बिच्चारी मी बसले गपचुप मागच्या बेंचवर!😅
अजून एक अनुभव आला तो लग्न ठरल्यावर. लग्न ठरलं की ब्युटी पार्लर हा पर्याय अपरिहार्य असतो हे माझ्या मनावर ठसविण्यात माझी मोठी बहीण यशस्वी झाली होती. त्यामुळे पैसे देऊन भुवया बिघडवून घ्यायला मी पार्लर मध्ये गेलेली असताना माझ्या सोबतच एक बाई तिच्या आठ – नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली होती. तिने पार्लर मधल्या काकुंना विचारलं “मी चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी कोणत्या ब्रँडचं क्रीम वापरू?” काकू म्हणाल्या, ” हर्बल क्रीम वापरा एखादं” बाई म्हणाली”मी फेअर अँड लव्हली वापरू का?” काकू म्हणाल्या, “अजिबात नको! चांगलं नाहीये ते स्किन साठी.” हा सुखसंवाद चाललेला असताना त्या बाईचा मुलगा एकाएकी माझ्याकडे बोट दाखवून तिला म्हणाला, “आई तू कोणतंही क्रीम लावलंस तरी या ताईसारखी गोरी नाही होणार!” हा घरचा आहेर मिळाल्यावर बाई पेटलीच एकदम… माझ्यावरच घसरली… “काही कामधंदे नसतील त्या ताईला… आम्ही उन्हा तान्हात काम करून रापतो!” माझं हसू मी दाबून ठेवण्याच्या नादात तिला प्रत्युत्तर द्यायचं राहूनच गेलं…🤣 तात्पर्य: मुलांना पार्लर मध्ये आणू नये ती खूप खरं बोलतात.😬
माझ्या लग्नात पण “कशी दिसतेय जोडी, अगदी ब्लॅक अँड व्हाईट!” असं चिडवणारी भावंड मागल्याजन्मीचं उट्टं काढायला आलेली पितरं असावीत असा विचार मनात येऊन गेला…😅 नवऱ्याचे मित्र देखील कमी नव्हते त्यात – “पार्लरचा खर्च वाचवलास लेका!” असं म्हणणारे!
एकदा आईसोबत पुण्यात तिच्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं. एक रात्र मुक्काम करावा लागणार होता. गप्पा, जेवणं वगैरे उरकल्यावर मी माझं अंथरूण आईच्या बेडशेजारी जमिनीवर अंथरलं. झोपून गेले. रात्री तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले तर लक्षात आलं की आईची मैत्रीण पण उठून बसली आहे आणि आपल्याकडे विस्मयाने एकटक पाहत आहे! माझी घाबरगुंडी उडाली! हे काय आता… या बाईला वेड – बीड लागलं आहे की काय? पाणी न पिता तशीच गपचुप झोपून गेले. सकाळी उठल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला विचारलं का बघत होतीस रात्री अमृताकडे? तर ती म्हणाली, “अगो नीलांबरी, तुझ्या मुलीचा चेहरा रात्री चमकत होता. खूप तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर! रुक्मिणीस्वयंवरात जसं वर्णन आहे अगदी तसंच!” मग मी “नाही हो, तो बाहेरचा प्रकाश शोकेसच्या काचेवर पडून माझ्या तोंडावर रिफ्लेक्ट होत होता.” असं सांगून समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दुपारपर्यंत माझ्या चेहऱ्यावरचं ‘ तेज ‘ पहायला त्यांच्या आणखी काही अध्यात्मिक मैत्रिणी जमल्या. आई मात्र माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती…😂
आमच्याकडे सैरंध्री नावाची एक आजी धुणी- भांडी करायला येत होती. माझी आणि तिची चांगली गट्टी होती… खूप प्रेमळ होती ती… सैरंध्री लांबूनच मला पहायची. मी दिसले नाही अंगणात तर लगेच आजीला विचारायची “तुमची ढवळी कुठाय वैनी?” तिने केलेलं माझं ‘ ढवळी ‘ हे नामकरण मला अजिबात आवडत नव्हतं. मी आईला विचारलं, आई ढवळी म्हणजे काय गं? आई म्हणाली, “खूप गोरी”…
ढवळी! खरंच कितीतरी रंग आणि अंतरंग पहायला मिळाले या एका गोऱ्या रंगामुळे! कधी अगदी डांबरट तर अगदी साधीभोळी रंगाने कितीही सावळी असली तरी मनाने अगदी शुभ्र, निर्मळ. काय भुललासी वरलिया रंगा… या अभंगासारखी अभंग! त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने कधीही गोऱ्या रंगाबद्दल अहं मनात डोकावला नाही. तसंच मिळालेल्या वर्णाबाबत कधी वैषम्य सुद्धा वाटलं नाही. कधीकधी सैरंध्रीची हाक आठवते… “ढवळे, चुलिपाशी जाऊ नको बाय अंगाला काळं लागेल गो!” मी मोठी झाल्यावर मला कळलं की सैरंध्रीची नात साथीच्या रोगात वारली होती. ती माझ्याइतक्याच वयाची होती. मला बघून डोळ्यांत पाणी यायचं तिच्या! अनेक वेळा वाटलं असेल तिला मला उचलून कडेवर घ्यावंसं माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवावा असं… पण परत नाही अडकली ती त्या मायेच्या स्पर्शात… आता वाटतं चुलिपाशी जाऊन अंग राखेने माखून घेतलं असतं तर कदाचित सैरंध्रीने मला उचलून घेतलं असतं… माझा ढवळा रंग तिला नक्की लागला असता…
✍️ सौ. अमृता मनोज केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
ठराविक वयाच्या टप्प्यावर नाही म्हटले तरी…तीच ती घरकामे करून करून,नकोशी वाटू शकतात…. सर्वांनाच नाही लागू पडणार….पण मला तरी वाटत…..कुठे थांबावं हे समजणे आवश्यक….पूर्णपणे नाहीच.. अडीअडचणीला आपण निभावून नेलंच पाहिजे….
पण काही जणींचा अट्टाहास असेच पाहिजे तसेच पाहिजे.माझ्याच हाताला चव…माझे मलाच आवडते…
कामे,घरातील टापटीप मलाच त्यातच रस वाटतो…. त्यानिमित्ताने व्यायाम होतो….
पण घरासाठी कितीही करा कमीच..पण खरच आपण घरासाठी की घर आपल्यासाठी….किती जीवापाड जपावं….स्वतःला मात्र गुंतवून त्याच त्या कामात कितपत योग्य आहे….स्वतःसाठी जगणे होते का? बरे खूप वर्ष मनलावून कामे केली…कुणी घरातील व्यक्ती शाब्बास,तरी म्हटलेले आठवत नाही…की घरकामासाठी पुरस्कार पण देण्यात येत नाही….का करावी मनाची ओढाताण का घ्यावं इतके टापटीप , स्वच्छ्ता ह्यांचे वेड…जे मनास पटले नाही तरी करीत राहणार…कधीतरी ह्यावर विचार करण्याची गरज आहे….
काय बाई दोन तीन पोळ्या तर करायच्या म्हणून स्वतःच करतात….तीच ती कामे डोक्यात आज काय स्वयंपाक करायचा…पुन्हा रात्री भाजी काय करायची….
दुसऱ्या कुणाच्या कामाला नावे ठेवणे….काय बाई लगेच भांडी घासली कि हाता सरशी लगेच साफ होऊन जातात…तीच ती कामे त्यातच अडकून पडतात….
कितीतरी अजून जगण्याला वाव द्यायचा असतो इकडे लक्षच नसतं….. सार आयुष्य ह्यातच घालून पुन्हा वर म्हणायचं आता बाई होत नाही,पूर्वीसारखं…. शरीर पण कुरकुर करत असत…मन पण नको म्हणून सांगत असत…..पण सरळ दुर्लक्ष करत करण्याची तयारी दाखवतात….पण कुठेतरी थांबले पाहिजे हे कळतच नाही….मीच राबराब राहते …..माझी कदर नाही कुणाला.तूच कर ना तुझीच कदर….घे मोकळा श्वास कधीतरी….दे सोडून मनातील विचार माझ्याशिवाय घराचे कसे होईल……मस्त चालत आपण नसलो तरी ,हा विश्वास हवा…..
किती करणार तीच ती कामे…..नकोच गुंतवून घेऊ ना…केलीत की आतापर्यंत … तूच वाहिलीस घरकामाची धुरा….. मान नाही का दुखत, दे झुगारून आता तरी…..हो घरकामातून रिक्त…..असेल आर्थिक स्थिती संपन्न तर मोलानी करवून घे ना.की त्यातही मला नाही आवडत बाई.कस ग सोड ना आता हट्ट…
कर वेगळे हट्ट जगेन तर मस्तच… माझ्यावर नितांत प्रेम करणार…….मस्तच वेगळे काहीतरी जगणार नकोच तीच ती चाकोरी…..म्हण स्वतःला थांब ग बाई आतातरी….
जीवन जगायचं कसं तर भरभरून स्वतःला वेळ राखून ठेवला की मग स्वतः खरच जगलो म्हणून भारी वाटतं…..घरकामे करावीत ज्यांना आवड आहे त्यांनी…पण कामाचे योग्य नियोजन केले की त्यात अडकून न पडता…..अजून बरेचसे आवडीचे जगणे होते….फिरणे….मस्त रमतगमत, मैत्रिणी – त्यांच्यात रमणे….गप्पागोष्टी हक्काचे स्थान मन मोकळे मनमुराद जगणे होते…..
मैत्रिणी जमवणे ती मैत्री जोपासणे, टिकवणे ही सुध्दा कलाच आहे….ती अवगत करून, मस्त जीवन जगण्याचा आनंद मिळतो….मस्त आयोजन, नियोजन केले की स्वतः आनंदी असलो की घरदार पण आनंदी राहणार यात वादच नाही…..चला तर मस्त स्वतःसाठी वेळ राखून ठेवू आणि मस्त आनंदी आनंद घेत राहू…..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈