डॉ. ज्योती गोडबोले

??

☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

इयत्ता सहावीत असताना एके दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले. “आज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी शाळेच्या सभागृहात जमा. तुम्हाला आत्तापासून बचतीची सवय लागावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येणार आहेत. नीट ऐकून घ्या ते काय सांगतात ते.”

बँकेचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे आले. त्यांनी लहान मुलांसाठी अल्पबचत योजना म्हणजे काय, त्याचे फायदे वगैरे समजावून सांगितलं. वर्गातल्या माझ्यासकट बहुतेक सगळ्या मुलांनी त्या पुढच्या आठवड्यात आपली बचत खाती उघडली.

त्यानंतरच्या सहा महिन्यात खाऊचे पैसे, कुणी वाढदिवसाला दिलेली भेट या स्वरूपात जमा झालेली रक्कम त्या खात्यात मी भरत राहिलो. माझ्या हिशेबाने खात्यामध्ये 127 रुपये जमा असायला हवे होते. पण प्रत्यक्षात होते 125. लेखनिकाकडे त्या दोन रुपयाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” नोंदीमध्ये काहीतरी चूक झाली असावी. दोनच तर रुपये कमी आहेत. जाऊ दे.विसरून जा. अक्कलखाती जमा करून टाक ” मला वाटलं बचत खात्याला संलग्न अशा विशेष अक्कलखात्याची सोय पण बँक देते. मी भाबडेपणे विचारलं,” त्या अक्कलखात्यावर किती व्याज देतात” माझा प्रश्न आजूबाजूच्या अनेकांनी ऐकला असावा कारण बँकेत हास्याची एकच लाट उसळली. लेखनिकाची विनोदबुद्धी कुशाग्र होती. तो म्हणाला, “अरे गेले ते. अक्कलखाती जमा म्हणजे झाला तुझा मामा!”

अक्कलखात्याची झालेली माझी ती आयुष्यातली पहिली ओळख. नंतरच्या आयुष्यात या खात्यातली जमा उत्तरोत्तर वाढतच गेली. रेल्वेचे तिकीट वेळेवर रद्द केलं नाही म्हणून झालेलं नुकसान, सहल आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे हॉटेल बुकिंगमधील बरेचसे पैसे कापून मिळालेला परतावा, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत खाल्लेली आपटी, आदल्याच दिवशी नियम बदलल्यामुळे जागेच्या नोंदणी शुल्कामधे झालेली 2 टक्क्यांची भरघोस वाढ वगैरे वगैरे अनेक. सर्व काही अक्कलखाती जमा केलं म्हणून डोकं शाबूत राहीलं.

अक्कलखातं आपल्याला खूप काही शिकवून जातं. विसरणं अथवा विस्मरण हे मानव जातीला मिळालेलं वरदान आहे ही पहिली शिकवण. झालेलं नुकसान वेळीच अक्कलखाती जमा केलं नाही तर फक्त मनस्ताप नशिबी असतो. अतिशय दयाळू असलेलं हे खातं आपल्या पोटात पैशांबरोबर वस्तूंनाही सामावून घेतं. पेनं, रुमाल आणि छत्र्या मी किती अक्कलखाती जमा केल्या असतील याची काही ददातच नाही. ह्या तीनही वस्तूंचे उद्योगधंदे केवळ मानवी स्वभावाच्या विसरणे आणि हरवणे ह्या दोन गुणधर्मांवर जिवंत आहेत.

अक्कलखात्याची व्यापकता विस्तृत असते. आपल्या देशाचं अक्कलखातं तर इतकं मोठं आहे की त्यात इंग्रजांनी केलेली लूट आणि स्वातंत्र्यानंतर जमा झालेली पुंजी एकत्र केली तर आपल्या इतक्याच मोठ्या दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था आरामात चालवता येईल. पडलेले पूल, खणलेले रस्ते, आधी बांधून मग पाडून पुन्हा बांधलेले उड्डाणपूल, कागदावर उमटलेल्या आणि खर्च होऊनही प्रत्यक्षात उभ्या न राहिलेल्या असंख्य सरकारी आणि खाजगी योजना …. सर्व काही वर्षानुवर्ष अक्कलखाती जमा. देशाच्या अर्थसंकल्पात त्याची कुठेही नोंद नाही.आपल्या देशबांधवांच्या उदार आणि सहनशील मनाचं सर्वात मोठं प्रतिक.

लहानपणी खेळात पहिला डाव हरला की आम्ही म्हणत असू,” हा डाव देवाला”. गेली दीड-दोन वर्ष जागतिक महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट लक्षात घेता अख्ख्या जगालाच” ही दोन वर्ष देवाला” असं म्हणून अक्कलखाती जमा करावी लागणार.

अक्कलखातं जसं आर्थिक आणि वस्तुरूपदृष्ट्या मोठं असावं लागतं, तसंच भावनांचं अक्कलखातं सहिष्णू असल्याशिवाय आयुष्यात तग धरणं अवघड. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून झालेली कानउघडणी आणि कधी कधी अपमानसुद्धा, भरवशाच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारांमध्ये उडालेले खटके, ओढवलेले दुर्दैवी प्रसंग या सर्वांमधून वेळोवेळी होणारा मानसिक कल्लोळ पचवण्यासाठी भावनिक अक्कलखातं बक्कळ मोठं असावं लागतं. “जाऊ दे, विसरून जा” हे अक्कलखात्याच्या बँकेचं ब्रीदवाक्य आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट. शेअर बाजारात पूर्वी जबरदस्त घाटा सहन केल्यामुळे मी डिमॅट अकाउंट बंद करून टाकलं होतं. एक शेअरमहर्षी सद्हेतूने मला भेटायला आला. डिमॅट अकाउंट पुन्हा उघडून देतो म्हणाला. त्याची थोडी गंमत करावी असा खट्याळ विचार मनात आला. ह्या मार्गाने पुन्हा जायचं नाही असा मी कानाला खडा लावला असल्याने त्याला म्हणालो,” जा, तुझ्या बँकेला विचारून ये. डिमॅट खात्याला जोडून एक अक्कलखातं पण देता का?  देत असतील आणि त्यावर चांगलं व्याज मिळत असेल तर लगेच उघडू.” इंग्रजी भाषेत शिकलेल्या त्या भिडूला “अक्कलखातं” ही संज्ञा माहित असण्याची अजिबात शक्यता नव्हती. निष्पापपणे तो म्हणाला,” चौकशी करतो सर”. नंतर परत त्याचा फोन आला नाही

वर्षातून एकदा मी अक्कलखात्याचं पासबुक मनातच भरतो. स्वतः वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अक्कलशून्यतेवर हसून विलक्षण मनोरंजन करून घेण्याचा तो खात्रीशीर मार्ग आहे. स्वतःवर हसलं की खूप मोकळं वाटतं मला. बचत खातं बंद करावं एक वेळ पण अक्कलखातं कधीच नको.

लेखक : डॉ शिरीष भावे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments