मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पक्ष्यांपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे :

१. ते रात्री काही  खात नाहीत.

२. रात्री फिरत नाहीत.

३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.

४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात….बरोबर घेऊन जात नाहीत..!

५. अंधार पडल्यावर झोपून जातात आणि पहाटेच गाणी  गात उठतात.

६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

७. आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात.  बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.

८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात,स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती घेत नाहीत.

९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.

१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात.

११. आपापसात मिळूनमिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

१२. निसर्गनियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

१३. आपलं घर इको-फ्रेंडलीच बनवतात.

१४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोट भरण्याइतकी मोठी झाली की त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

 

खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..!

त्यांच्या या सवयी अंगीकारून आपल्याला आपलं जीवन पण

सुखी व निरोगी ठेवता येईल…

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग-1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग – 1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो !

आज १९ जून २०२३, आजची तिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा, अर्थात आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस साहित्य प्रेमींसाठी सुवर्ण दिन, कारण या दिवशी आपण साजरा करतो ‘कालिदास दिन’. मैत्रांनो, हा त्यांचा जन्मदिन अथवा स्मृती दिन नव्हे, कारण ते दिवस आपल्याला माहीतच नाहीत. मात्र त्यांची काव्यप्रतिभा एवढी उत्तुंग आहे की, आपण हा दिवस त्यांच्याच एक अजरामर खंडकाव्यातून शोधला आहे. कालिदास, संस्कृत भाषेचे महान सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटककार! दुसऱ्या-पाचव्या शताब्दीतील गुप्त साम्राज्यकाळातील अनुपमेय साहित्यकार म्हणून त्यांना गौरवान्वित केलेले आहे. त्यांच्या काव्यप्रतिभेला अनुसरून त्यांना दिलेली “कविकुलगुरु” ही उपाधी स्वतःच अलंकृत आणि धन्य झाली आहे! संस्कृत साहित्याच्या रत्नमालेत त्यांचे साहित्य या मालेच्या मध्यभागी चमकत्या कौस्तुभ मण्याप्रमाणे जाणवते! पाश्चात्य आणि भारतीय, प्राचीन आणि अर्वाचीन विद्वानांच्या मते कालिदास हे जगन्मान्य, सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय असे कवी आहेत! या साक्षात सरस्वतीपुत्राच्या बहुमुखी व बहुआयामी प्रज्ञेचे, प्रतिभेचे आणि मेधावी व्यक्तिमत्वाचे किती म्हणून गोडवे गावेत? कालिदास दिनाचे औचित्य साधत या अद्वितीय महाकवीच्या चरणी माझी शब्दकुसुमांजली ! 

सुज्ञ वाचकांनी यात कालिदासांच्या प्रती असलेली माझी केवळ आणि केवळ श्रद्धाच ध्यानात असू द्यावी. मात्र माझे मर्यादित शब्दभांडार, भावविश्व आणि संस्कृत भाषेचे अज्ञान, या सर्व अडसरांना पार करीत मी हा लेख लिहिण्याचे ठरवले. मित्रांनो, संस्कृत येत नसल्याने, मी कालिदासांच्या साहित्याचे मराठीतील अनुवाद (अनुसृष्टी) वाचलेत! त्यानेच मी इतके भारावून गेले. कालिदासांच्या महान साहित्याचे मूल्यांकन करण्यास नव्हे तर एक वाचक म्हणून रसास्वाद घेण्याच्या दृष्टीनेच हा लेख लिहीत आहे!   

या कविराजांच्या अत्युच्य दर्जाच्या साहित्याचे मूल्यमापन संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक रित्याच केले पाहिजे. राष्ट्रीय चेतनेचा स्वर जागवण्याचे महान कार्य करणाऱ्या या कवीचा राष्ट्रीय नव्हे तर विश्वात्मक कवी म्हणूनच गौरव करायला हवा! अत्यंत विद्वान म्हणून गणले जाणाऱ्या त्यांच्या समकालीन साहित्यकारांनीच (उदा. बाणभट्ट) नव्हे, तर आजच्या काळातल्या जगभरातल्या साहित्यकारांनी देखील तो केलेला आहे! त्यांच्या जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर असलेल्या अंदाजे ३० साहित्य निर्मितींपैकी ७ साहित्यकृती निश्चित रूपाने त्यांच्याच आहेत असे मानले जाते. असे काय वैशिष्ट्य आहे कालिदासांच्या सप्तचिरंजीवी साहित्य अपत्यांमध्ये, की पाश्चात्य साहित्यिक कालिदासांचे नामकरण “भारताचा शेक्सपियर” म्हणून करतात! मला तर असे प्रकर्षाने वाटते की, यात गौरव कालिदासांचा नाहीच, कारण ते सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वगुणातीत अशा अत्युच्य गौरवशिखरावर आधीच आरूढ आहेत, यात खरा गौरव आहे शेक्सपिअरचा, त्याची तुलना केली जातेय कुणाशी, तर कालिदासांशी!

या महान रचयित्याचे जीवन जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचं वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्यांच्या जीवनाचे बरेच प्रसंग त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उतरले आहेत, अशी मान्यता आहे. उदाहरण द्यायचे तर मेघदूत या खंडकाव्याचे, विरहाचे शाश्वत, सुंदर तथा जिवंत रूप म्हणून या काव्याकडे बघितले जाते, बरेच तज्ज्ञ मानतात की कल्पनाविलासाचे उच्चतम निकष ध्यानी धरूनही हे कल्पनातीत दूतकाव्य अनुभवाच्या अभावी रचणे केवळ अशक्य आहे. तसेच कालिदासांनी ज्या अचूकतेने विविध स्थळांचे आणि तिथल्या नगरांचे सविस्तर वर्णन केले आहे, ते ही त्यांचे त्या त्या ठिकाणी वास्तव्य असल्याशिवाय शक्य नाही. कालिदासांच्या सप्त कृतींनी संपूर्ण विश्वाला समग्र भारतदर्शन घडवले! उज्जयिनी नगरीचे वर्णन तर अगदी हुबेहूब, जणू चलचित्रासारखे! म्हणूनच बरेच विद्वान मानतात की कालिदासांचे वास्तव्य बऱ्याच कालावधीकरिता बहुतेक या ऐश्वर्यसंपन्न नगरीतच असावे! त्यांच्या रचना भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनशास्त्रावर आधारित आहेत! यात तत्कालीन भारतीय जीवनाचे प्रतिबिंब दृष्टीस पडते, रघुवंशम् मध्ये इतिहास आणि भूगोल याविषयी त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांच्या अगाध बुद्धिमत्तेचे आणि काव्यप्रतिभेचे द्योतक आहे यात शंकाच नाही. या भौगोलिक वर्णनासोबतच भारतातील पौराणिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक दृष्टी व ज्ञान, तसेच सामान्य तथा विशिष्ट व्यक्तींची जीवनशैली, या सर्वांचे यथोचित दर्शन त्यांच्या रचनांमध्ये आढळते.    

त्यांच्या काव्य आणि नाटकांतील भाषा आणि काव्यसौंदर्य काय वर्णावे? भाषासुंदरी तर त्यांची जणू आज्ञाधारक दासी! निसर्गाची विविध रूपे साकारणारे ऋतुसंहार हे काव्य तर निसर्गकाव्याचे अत्युच्य शिखरच जणू! त्यांच्या इतर साहित्यात त्या त्या अनुषंगाने प्राकृतिक सौंदर्याचे बहारदार वर्णन म्हणजे जणू कांही अद्भुत इंद्रधनुषी रंगांची उधळण, आपण त्यांत रंगून जायचे, कारण हे सगळे काव्यप्रकार वृत्तांच्या चौकटीत अवचित विराजमान झालेले, ओढून ताणून बसवलेले नव्हेत! 

हे अनवट साहित्य म्हणजे अलंकारयुक्त अन नादमधुर अश्या भाषेचा सुरम्य आविष्कार! एखादी सुंदर स्त्री जेव्हा अलंकारमंडित होते, तेव्हा कधी कधी असा प्रश्न पडतो की अलंकारांचे सौंदर्य त्या सौंदर्यवतीमुळे वर्धित झालंय, की तिचे सौंदर्य अलंकारांनी सजल्यामुळे आणिक खुललय! मित्रांनो कालिदास साहित्य वाचतांना हाच भ्रम निर्माण होतो! या महान कविराजांच्या सौंदर्यदृष्टीची किती म्हणून प्रशंसा करावी! त्यात काठोकाठ भरलेल्या अमृतकलशांसम नवरस तर आहेतच, पण विशेषकरून आहे शृंगाररस! स्त्री सौंदर्याचे लोभस लावण्यमय आविष्कार तर त्यांच्या काव्यात आणि नाटकात ठिकठिकाणी आढळतात! त्यांच्या नायिकाच अशा आहेत की त्यांचे सौंदर्य वर्णनातीत असेलही कदाचित, पण कालिदासासारखा शब्दप्रभू असेल तर त्याला अशक्य ते काय? मात्र या सौंदर्यवर्णनात तत्कालीन आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांचा कुठेही ऱ्हास झालेला नाही! अलंकारांच्या गर्दीत सर्वात उठून दिसणारा अलंकार म्हणजे उपमालंकार, त्या उपमा कशा तर, इतरांसाठी अनुपमेय! मात्र जोवर या महान संस्कृत भाषेतील रचना प्राकृत प्रांतीय भाषांत सामान्य जनांपर्यंत पोचत नाहीत, तोवर या विश्वात्मक कवीचे स्थान अखिल जगात शीर्ष असूनही आपल्याच देशात मात्र अपरिचितच राहणार! अर्थात या वाङ्मयाचे कैक भारतीय भाषांमध्ये अनुवाद (अनुसृष्टी) झालेले आहेत हे ही नसे थोडके !

मेघदूत (खंडकाव्य)

खंडकाव्यांच्या रत्नपेटिकेत विराजित कौस्तुभ मणी असलेल्या मेघदूत या कालिदासांच्या रचनेचा काव्यानंद म्हणजे स्वर्गातील सुमधुर यक्षगानच होय! असे मानले जाते की, महाकवी कालिदासांनी मेघदूत हे त्यांचे प्रसिद्ध खंडकाव्य रामगिरी पर्वतावर (आत्ताचे रामटेक) आषाढ मासाच्या प्रथम दिनी लिहायला प्रारंभ केला! त्यांच्या या काव्यातील दुसऱ्याच श्लोकात तीन शब्द आलेले आहेत, ते म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे”! आषाढाच्या प्रथम दिवशी कालिदासांनी जेव्हा आकाशात संचार करणारे कृष्णमेघ पाहिले तेव्हाच त्यांनी आपल्या अद्भुत कल्पना विलासाचे एका काव्यात रूपांतर केले, हीच ती त्यांची अनन्य कृती “मेघदूत”! यौवनातील सहजसुंदर तारुण्यसुलभ तरल भावना आणि प्रियेचा विरह या प्रकाश आणि अंधाराच्या संधिकालाचे शब्दबद्ध रूप पाहतांना आपले मन हेलावून जाते.

अलका नगरीत यक्षांचा प्रमुख, एक यक्ष कुबेराला महादेवाच्या पूजेसाठी सकाळी उमललेली ताजी कमलपुष्पे देण्याचे काम रोज करत असतो. नवपरिणीत पत्नीबरोबर वेळ मिळावा म्हणुन तो यक्ष रात्रीच कमळे तोडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेर पूजा करत असताना त्या उमलू लागलेल्या फुलात रात्री कोंडला गेलेला भुंगा कुबेराला डंख मारतो. क्रोधायमान झालेला कुबेर यक्षाला शाप देतो. यामुळे त्या यक्षाची व त्याच्या प्रियेची ताटातूट होते. हीच शापवाणी मेघदूत या अमर खंडकाव्याची निर्माती ठरली. यक्षाला भूमीवर रामगिरी येथे १ वर्ष अलकानगरीत राहणाऱ्या आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. त्याच विरहव्यथेचे हे “विप्रलंभ शृंगाराचे कवन” आहे. कालिदासांच्या कल्पनेची भरारी म्हणजेच हे अजरामर नितांतसुंदर असे प्रथम “दूत काव्य” म्हणून रचले गेले! मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक! 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढ महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ आषाढ  महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस… अर्थात महाकवी कालिदास दिन..

आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाकवी कुलगुरू कालिदास दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो…

रणरणत्या उन्हानंतर वेध लागतात ते पावसाच्या सरींचे…या पावसाच्या सरी तन आणि मन चिंब भिजवून टाकतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की आकाशात हळूहळू मेघांची गर्दी होऊ लागते आणि मग आठवण येते ती महाकवी कुलगुरू कालिदासाची…! 

कालिदासाच्या ‘ मेघदूत ’ या काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा अतिशय प्रसिद्ध असा श्लोक. आषाढ म्हटले की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यातून गडगडाट करीत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्य कृती..!

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. आपल्या मेघदूत या महाकाव्याच्या प्रारंभी पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांत सुंदर वर्णन कालिदासांनी केले आहे… ” मेघदूत’ हे एक सर्वांगसुंदर प्रेमकाव्य आहे. हे कोणत्याही पुराणकथेवर आधारित नाही. यात कालिदासाचा स्वतंत्र निर्मितीक्षम प्रज्ञाविलास, आणि तरीही मानवी अंतःकरणातील एका सुकोमल वास्तव भावनेचाच आविष्कार करणारे कालिदासरचित “मेघदूत’ हे एक मनोज्ञ काव्य आहे..! निसर्गावर प्रेम करणारा निसर्ग प्रेमी कवी..! निसर्गाबद्दल असणारं अतोनात प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं. प्रत्येक निसर्गप्रेमींना त्यात चिंब चिंब भिजवून टाकतो..!

ग्रीष्मातील उष्मा सरला.. ढग दाटून आले की आपसूकच वातावरणातील होणारा तो बदल..सृष्टीला चढणारे नावीन्याचे रंग, सृजनाने खुललेले ते निसर्गाचे रुपडे आणि त्याला चिंब भिजवून टाकणारा आषाढ लागला की जणू हे संपूर्ण जग नव्याने जन्म घेतल्यासारखे भासू लागते…!

उपमा या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत…!

कवी कालिदासांचे संस्कृत कवींमधील उच्च स्थान दर्शविणारे एक सुंदर सुभाषित……

पुरा कवीनां गणना प्रसंगे ll

कनिष्ठीकाधिष्ठति कालिदास: 

अद्यापि तदतुल्य कवेर्भावादी 

अनामिका सार्थवती बभूव ll

…. याचा अर्थ असा आहे की– पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेतल्या कवींची गणना करताना त्यांना मोजताना आपल्या हाताच्या करंगळीवर पहिलं नाव कवी कालिदास यांचे आले पण त्यानंतरच्या हाताच्या बोटावर कोणाचेही नाव आले नाही कारण महाकवी कालिदासांच्या इतका उच्च प्रतीचा संस्कृत कवी कोणी नव्हताच. त्यामुळे करंगळीच्या आधीच्या बोटावर कोणाचेच नाव न आल्यामुळे त्या बोटाला अनामिका असे म्हणतात..!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

भाऊ आणि बहिणी हे आपल्या आई-वडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वात मौल्यवान ठेवी आहेत याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो.  आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. मोठे झाल्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आम्ही भाऊ बहिणी सहसा क्वचितच भेटतो. आमचे पालक हा एकमेव दुवा होता ज्याने आम्हा सर्वांना जोडले.

आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू, आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे, त्याचवेळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता.  थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले.  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही गेले असतील, तेव्हा तुमचे भाऊ आणि बहिणी या जगातील सर्वात जवळचे लोक असतात. मित्र दूर जाऊ शकतात, मुलं मोठी होतात, तीही दूर जातात. पण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल नसेल, तरी फक्त तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी साथ देवू शकतात.

आपण म्हातारे झालो तरी बंधु भगिनी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात आम्हाला उबदारपणाची कमतरता भासणार नाही.  त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.  वृद्धापकाळापर्यंत, कृपया आपल्या बंधू आणि बहिणींशी जुळवून घ्या.

भूतकाळात काहीही अप्रिय घडले असले तरीही, भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील आणि क्षमाशील असले पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ-बहिणीमध्ये बांधता येत नाही.  अशी कोणतीही ढाल नाही जी काढली जाऊ शकत नाही.—  बंधू-भगिनींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत किंवा जुनी नाराजी बाळगू नये.  थोडे अधिक परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने, संबंध अधिक चांगले आणि चांगलेच होतील, कारण —– 

—  कारण या जगात आपल्या पालकांनी फक्त आपल्यासाठी दिलेल्या या सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहेत.

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता, तोच त्यांना त्यांच्या गुरू रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते विवेकानंदाना सांगत होते की “तू लगेच खाली उतर. ह्या बोटीने जावू नकोस .”

गुरूचीच आज्ञा ती, विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली. त्यांना समजेना,गुरूजींनी त्यांना कां उतरवलं त्या बोटीतून? पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदाना अतिशय वाईट वाटले. प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णाना परत भेटले तेव्हा ते म्हणाले, “गुरुजी, तुम्ही मला वेळीच सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण ते इतर प्रवासीही माणसंच होती की. तुम्ही तर विश्वरूप आहात.

मग तेच प्रेम सर्व प्रवासी व तो बोटवाला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलेत…?   का नाही त्याना हाक मारलीत…?    का नाही त्यांना सावध केलंत आणि वाचवलंत… ? “

रामकृष्ण म्हणाले,  “अरे मी असं करीन का..?   तेही माझेच होते. मी त्यांना पण ओरडून सांगत होतो, पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. तुझं अंत:करण शुद्ध आहे, म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला.’ “

परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय, आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय, अयोग्य काय सांगत असतात. पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो, ह्या विषयवस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो, की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्याची बरीवाईट फळंही भोगावीच लागतात.

आपल्या अंत:करणशुद्धीसाठीच तर सेवा, सत्संग व साधना असते.

हे ऐकताच विवेकानंदांनी रामकृष्णांना साष्टांग प्रणाम केला.

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

लोकरंग च्या पुरवणी मधील एक खूप मस्त आणि मुख्य म्हणजे खरोखरीच विचारात पाडणारा लेख शनिवारी  चतुरंग ह्या पुरवणीत वाचनात आला. हा लेख “वळणबिंदू” ह्या सदराखाली डॉ. अंजली जोशी लिखीत “वैचारिक स्वावलंबन” ह्या नावाचा.  विशेषतः पालकत्वाची सुरुवात होतांना पासून हातपाय थकल्यावर देखील तेवढ्याच सुरसुरीनं पालकत्व निभावणा-या पालकांसाठी तर खास भेटच.

“स्पून फिडींग” ,पाल्याची अतिरिक्त टोकाच्या भूमिकेतून घेतलेली काळजी पाल्यांना कुठलाही अवयव बाद न होता कसे पंगू करुन सोडते हे परखड सत्य ह्या लेखातून चटकन उमगतं, आणि मग खोलवर विचार केल्यानंतर त्यातील दाहकता जाणवते.

खरोखरीच मुलं ह्या जगातल्या तलावात पोहोचतांना त्यांना बुडू नये म्हणून पालकत्वाचं रबरी टायर न चुकता बांधून द्या व लांबून काठावरुन त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघतांना त्यांचे त्यांना पोहू द्या, कधी गटांगळ्या खाऊ द्या, अगदी काही वेळा थोडं नाकातोंडात पाणी जावून जीव घाबरु द्या, पण हे होऊ  देतांना एक गोष्ट नक्की …. आपला पाल्य हा तावूनसुलाखून, अनुभव गाठीशी बांधून पैलतीर हा यशस्वीपणे गाठणारच, आणि मग तो विजयाचा आनंद  तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना कितीतरी पट सुखं देऊन सुवर्णक्षणांची अनुभूती देऊन जातो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे – प्रसंगी अपत्यांच्या कुबड्या बनण्यापेक्षा त्याच्या मनाला उभारी देणारी संजीवनी पुरवा.

मी तर सांगेन हा लेख नीट विचारपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतः ला प्रश्न विचारायचा की … ड्रेस कुठल्या रंगाचा घालू ह्या अगदी साध्या प्रश्नापासून, ते लग्नासाठी आपल्याला नेमका जोडीदार कसा हवायं ह्या गहन प्रश्नापर्यंत, आपण आपल्या मनाने, स्वतंत्र विचारशक्तीने किती निर्णय घेतलेत ? त्यापैकी किती निर्णय तडीस नेलेत ? ह्या तडीस नेलेल्या आपल्या स्वतंत्र मतांमुळे, किंवा तडीस न नेता केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने कायम पाणी प्यायल्यामुळे, आपले नेमके नुकसान झाले की फायदा झाला ? .. आणि तो नेमका किती झाला ? …..  ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपल्याला नेमक्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि मग अभ्यास वा विचारांनी बनवलेली स्वतंत्र स्वमतं, स्वकृती किती महत्त्वाची असते आणि ती आपल्या जीवनात किती चांगला आमुलाग्र बदल करते हे पण कळून येईल. 

तेव्हा डॉ अंजली जोशी ह्यांचा चतुरंग पुरवणीमधील “वैचारिक स्वावलंबन” हा लेख तुम्हाला मिळाला तर जरूर स्वतः आधी वाचा आणि मग आपल्या पाल्यांना पण वाचायला सांगा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुझ्या डोळ्यांत पाहू जाता !

जीवनाची उत्पत्तीच पाण्यातून झाली असल्यानं पाण्याला जीवन म्हणणं तसं सयुक्तिकच ! वारि, नीर, तोय,सलिल,अंबु,उदक,जल ह्या अन्य नावांनीही तृषातृप्ती करणारं हे द्रव जेंव्हा डोळ्यांतून स्रवणा-या अश्रूंचं आवरण घेऊन वाहू लागतं तेव्हाच पाण्याचा आणि जीवनाचा अर्थ खोल आहे, याची जाणिव होऊ लागते.

तुझ्या डोळ्यांतलं पाणी म्हणजे जीवनच जणू. या जीवनाच्या ओलाव्यानेच तर तुझी नेत्रकमळं सदोदित ओली दिसतात…पापण्यांवरचे दंवबिंदु मोत्यांसारखे चमकत असतात सकाळच्या कोवळ्या उन्हांच्या तिरीपेत. माझ्या जगण्याचा डोह आता मरणासन्न आहे….तप्त सूर्य या डोहातले शेवटचे थेंब शोषून घ्यायचा कंटाळा करतोय बहुदा. त्याला काही एकच डोह शुष्क करायाचा आहे थोडाच! जगभरातले सर्व सागर,सर्व जलाशय त्याच्याच तर धाकात जगत असतात.

का जगावं असा यक्षप्रश्न सतत शिल्लक पाण्याच्या अंतरंगात ठिपकत असतो सारखा…तेव्हा जगण्याला उभारी तरी का म्हणून यावी? पण तुझे हे डोळे….जगण्याचा किनारा सोडून दूर जाऊ देत नाहीत .

सागराला तसं काय कमी आहे गं? सर्व खळाळत्या नद्या त्याच्याच तर बाहुपाशात विसावतात अखेरीस….येताना मातीला धावती आलिंगनं देत आलेल्या असल्या तरी. त्यांचे सुगंधी श्वास तर त्याच्याच अंगणात भरती-ओहोटीचा फेर धरून नाचत असतात की. किना-यावर येण्याचं नुसतं नाटक…त्यांना परत त्याच्याच कडे जायचं असतं हे काय कुणाला ठाऊक नाही होय? पण हा सागरही तुझ्या रूपाच्या रसाची आस बाळगून असतो…..म्हणूनच तर पुनवेला दोन पावलं पुढं येत असतो….न चुकता. आणि रुसून माघारीही जातो कोस दोन कोस !

तुझं रूप रंग-रेषांच्या क्षितिजावर मावत नाही, आकारांचे बांध तुझ्या रुपाला अडवून ठेऊ शकत नाही…तुझं हुबहू चित्र कोण कसं आणि कधी काढू शकेल, देव जाणे ! आणि तुझ्या वर्णनासाठीचे शब्द, त्यांना बद्ध करणारे छंद-वृत्त कवींना सुचावेत तरी कसे? तुझं रूप शब्दांना, चित्रांना कायमच अनोळखी राहून जातं…त्यांचा शोध सतत सुरू असला तरी.

काळजाला जागं ठेवणारे श्वास आणि त्याची आवर्तनं आहेस तू . तू आहेस म्हणून हृदय धडधडतं आहे त्याच्या अधीर वेगानं आणि तुझ्या रुपाच्या आवेगानं. तू  म्हणजेच जगणं, तू म्हणजेच जगत राहणं…अविरतपणे.

तुझ्या श्वासांच्या सुगंधाला मधुबनाचं कोंदण लाभलंय…आणि तुझे बाहुपाश…पाश नव्हेत कमलदलेच जणू. त्यातून स्वतंत्र होण्याचा विचारही मनाला शिवत नाही. अपार पसरलेल्या नभात तुझा मुखचंद्र म्हणजे किरणांची पखरणच जणू. या किरणांच्या उजेडात जीवनाचा अंधार विलुप्त होऊन जावा ! हिरव्यागर्द हिरवळीतून तुझी पावलं एखाद्या हरिणीच्या वेगाशी लीलया स्पर्धा करतील अशी नाजूक आणि तितकीच चपळ. तू गोड गोजि-या हरिणांच्या सोबत चार पावलं जरी चाललीस तरी त्यांच्यातलीच एक दिसशील…..गोड !

आयुष्याच्या धकाधकीत काळजाला पडलेल्या चिरा तशाच राहतात…ठसठसत. या जखमांना टाके घालणं म्हणजे आणखी वेदना पदरात पाडून घेण्यासारखं…दुखणारं. पण तुझ्या पदराचा एक धागाही पुरेसा होईल हे जीवनवस्त्र पुन्हा होतं त्या रूपात पाहण्यासाठी….तुझ्या डोळ्यांतील जीवन पाहून का नाही कुणाला पुन्हा जीवनाच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटणार? हे तर हवेहवेसे वाटणारे बांधलेपणच ! जोपर्यंत तुझ्या डोळ्यांतल्या जीवनाचा निर्झर खळाळत राहील…तोवर माझं आयुष्य वहात राहील…तृप्ततेच्या आभाळाखाली !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

इतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मस्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.

गाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलुतेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.

दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.

देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.

पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . 

हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. 

असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.

– समाप्त – 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दृष्टीकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दृष्टिकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवऱ्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’

बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो.पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो…

अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस समजणे सोपे जाते…दृष्टिकोन म्हणजे नकाशा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही शब्द लक्षात राहतात. ते कायम एकमेकांच्या सोबतच असतात. किंवा त्याच पध्दतीने ते म्हटले, वाचले, किंवा लिहिले जातात. जसे दिल, दोस्ती, दुनियादारी. किंवा अन्न, वस्त्र, निवारा. सत्यम, शिवम, सुंदरम्. तन, मन, धन. तसेच वही म्हटले की पुस्तक, आणि शाळा हे शब्द आपोआप डोळ्यासमोर येतात.

आपल्या शाळेतील ती पाच सहा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील लक्षात राहण्याचा वेधक आणि वेचक काळ.

पुस्तक हे आपल्याला शिकवते. ते आपलं जरी असलं तरी आपण शिकण्यासाठी दुसऱ्याने मेहनत घेऊन ते तयार केलेलं असतं.

पण वही ही आपली असते. या वहित दोन प्रकार असतात. एक प्रत्यक्षात असते. आणि दुसरी असते पण दिसत नाही.               

आपण काय शिकलो हे  वहीत उतरवतो. शाळेच्या वह्या यात प्रश्नोत्तराच्या, गणिताच्या, निबंधाच्या या पुढल्या वर्षी जवळपास रद्दीतच जात असत. 

पण अदृश्य वही जी अद्याप माझ्या स्मरणात आहे. आणि त्यातले अक्षर अन् अक्षर, शब्द, आणि ओळ आजही मी न अडखळता वाचु शकतो. किंवा आज तो माझा विरंगुळा आहे. माझा आनंद आहे. आणि बऱ्याच प्रमाणात माझी संपत्ती. अशी वही म्हणजे मित्रपरिवाराची वही. हि वही रद्दीत जाणे शक्यच नाही. उलट जसजशी ती जुनी होते, तसतसे तिचे मुल्य वाढत जाते. ती जीर्ण होईल पण टाकाऊ होणार नाही हा विश्वास आहे.

कोणतीही गोष्ट उतरवण्यासाठी ती अगोदर मनात असणे गरजेचे असते. मनात असलेल्या गोष्टीत आपलेपणाचा ओलावा असतो. तर नसलेल्या गोष्टी उतरवायचा प्रयत्न केल्यास त्यात कोरडेपणा असतो. आणि अशी माझी मित्रपरिवाराची वही ज्यात फक्त आपलेपणा आणि ओलावा असल्याने कायम ताजी टवटवीत जाणवते.                    

हि वही चाळतांना एक वेगळाच चाळा मनाला लागतो. हाच चाळा म्हणजे आपण सोबत एकत्र घालवलेले दिवस आठवणे.  

माझ्या या अदृश्य वहित प्रश्न नाहीत, तर आठवणींची साठवण आहे. गणिते नाहीत, तर पडलेली गणिते सोडवण्याची पद्धत आहे. शुद्धलेखनाच्या चुका नाहीत, तर चुकू नये म्हणून मैत्रीचा सल्ला आणि विश्वास देणारे आहेत. धीर देणारे आणि मदत करणारे हात आहेत. थोडक्यात जिथे उत्तर, सल्ला, विश्वास, आणि हात असतो त्यालाच आपण साथ म्हणतो. म्हणून यात आठवणींची साठवण आहे.

हे दिवस आठवले की अनेक गमती,जमती. राग, रुसवे. कट्टी, बट्टी. पास, नापास. हुशार, मठ्ठ. अभ्यास, मस्ती. अशा शब्दांच्या जोड्या तोंडातून बाहेर पडतात.

आपल्यासारखी पायी, किंवा क्वचित सायकलवर एकत्र शाळेत जायची मजा हि आजच्या स्कुलबस मध्ये कदाचित नसावी.

बऱ्याचदा मला काय मिळाले? किंवा मी काय मिळवले? असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न उलट विचारला मी काय आणि कोणामुळे मिळवले? तर त्याचं उत्तर एकच आहे. ते उत्तर म्हणजे शाळा.

शाळा म्हणजे अनेक खोल्या असणारी भव्य इमारत नव्हे. तर माणूस घडवणारे मंदिर असते. यात शिक्षक नावाचा पुजारी असतो. विद्यार्थी नावाचा भक्त. आचार, विचार, आणि संस्कार यांचा प्रसाद,तर सदाचार आणि प्रामाणिक पणा यांचे तिर्थ असते. बुद्धी, शक्ती, विश्वास, आणि सामर्थ्य देणाऱ्या देवतांची पुजा होते.

असे हे माझ्या वहिचे एक पान आहे जे भगिरथ शाळा आणि १९८१ च्या १० वीच्या वर्गमित्र आणि शिक्षकांमुळेच लक्षात आहे, आणि राहिलं…

(१० वी चा वर्गमित्र ::: शाळेतील मित्रांचे झालेले गेट टुगेदर या नंतर २०२२ मध्ये लिहीलेले…) 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares