मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…
पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…
कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .
दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.
काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …
तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..
ती प्रचंड खुश…
तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..
भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.
ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली होती ….
त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..
“ आई इतकं काय निरखून बघताय?”
“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “
सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..
“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…
तिचा तिला वेळ द्या…. कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”
तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “ अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “
सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .
‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .
अनेक जण सांगणारे भेटले. माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .
एकदा सुन म्हणाली ….
“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”
तिने सुनेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.
यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही कमी झाला .
मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …
ती चमकली. फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं….
वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…
ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.
मनोमन तिला सगळं काही उमगलं…
अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…
… आई स्टूलावर चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल पकडले…
आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा डोळ्यात दिसत होती….
दोघी कौतुकाने छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…
सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……
कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
सियाचिन….जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहा-यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं… तिचं नाव शिवा चौहान…अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम.
१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली. घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच मुळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.
सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या, यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुरुषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये नेमणूक मिळाली.
त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘ फायर अॅन्ड फ्यूरी सॅपर्स ‘ ….अर्थात ‘ अग्नि-प्रक्षोप पथक.’ .हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खो-यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते…त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे…सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात…अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच फायर अॅन्ड फ्यूरीच्या अधिकारी.
Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं ! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत.
आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणं, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.
कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे, इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या. त्यांच्या आधी महिला अधिका-यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं….. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहीम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक, अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही.
आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला…प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिनवर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले…एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा!
सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरुण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे !
☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
बायको घरात फार कटकट करते म्हणून एखाद्या माणसाने घर सोडून रानात जावे, यासारखे मूर्खपण कोणते? अरे, तुला एका अबलेची कटकट वाटते, तर रानातला लांडगा तुझ्याकडे टकमक पाहात राहील, तेव्हा तुझे काय होईल? भातात खडा सापडला, म्हणून तू घरातून निघून जातो आहेस, त्या जंगलात तुलाच खाऊन टाकण्यासाठी वाघ खडा आहे.
संकटामध्ये पलायनवाद हा सोपा वाटतो; पण तो तसा नसतो. तुकाराम महाराजांच्यासारखे संत म्हणूनच सांगतात,
नको गुंतो भोगी
नको पडो त्यागी।
लावूनि सरे अंगी देवाचिया॥
सुख मिळत नाही म्हणून त्रागा करण्यापेक्षा, सुखाच्या वेळीसुद्धा तू देवाला भागीदार करून घे. म्हणजे दुःख आपोआप भागले जाईल. देवमातेच्या खांद्यावर, कडेवर तू सुरक्षित नाहीस, ही भावनाच खोटी. देवमातेच्या कडेवर एकदा बसले म्हणजे मखमलीवरून चालण्याचे सुखही त्या मातेलाच आणि मध्ये काटेरी वाटेचे बोचरे दुःखही तिलाच. यापेक्षा अधिक उत्तम मार्ग शिल्लक नाही.
संकटे काय ती सामान्य माणसाला असतात, ही समजूत खोटी आहे. संकटे भक्तांना जास्त असतात. आणि देवाच्या आयुष्यात संकटांचा कळस असतो. राम, कृष्ण, शिव, सगळ्यांच्या जीवितामध्ये संकटांचे कळस झाले. आणि तसे ते झाले म्हणून लोकांनी त्यांच्या मूर्तीवर कळस चढवून, देवमंदिरे बांधली.
संकटे यावी लागतात, ती सोसावी लागतात, त्यातच पुरुषार्थ असतो. छोट्या चमत्कारात नव्हे.
लेखक :स्वामी विज्ञानानंद
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “WhatsApp वर बोलू काही…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी आयुष्यावर बोलू काही… असा एक खास आणि छान कार्यक्रम सगळ्यांना दिला. त्यावरून हे सुचल.
खर तर आयुष्यावर बोलू काही म्हणत खरेच (खरेच म्हणजे संदिप खरे) बोलले आणि सलील कुलकर्णी यांनी गाणी म्हटली आम्ही फक्त त्यांचे (खरे) बोलणे आणि सलील यांची गाणी ऐकली. (त्यांचे आडनावच खरे अस असल्याने जे बोलले ते खरे बोलले असेच म्हणावे लागेल.) आम्ही कार्यक्रम सुरू असताना बोललोच नाही. बोललो असेल ते सुद्धा आपसात. इतका मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम.
आयुष्यावर बोलू काही… आणि WhatsApp वर बोलू काही यात काही साम्य आहे. तर काही फरक.
साम्य अस कि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम प्रामुख्याने दोघांचाच आहे, तिसरा हा सहाय्यक म्हणून असतो. तसाच WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील दोघांचाच आहे.
आयुष्यावर… यात काही वेळा दोघांची जुगलबंदी बघायला मिळते, तशीच जुगलबंदी WhatsApp वर… यावेळी असते.
जुगलबंदी बरोबरच या कार्यक्रमात काहीवेळा संदिप खरे बोलत असतात तेव्हा सलील शांतपणे ऐकत असतात. WhatsApp वर… या कार्यक्रमात देखील एकजण बोलत असतांना दुसरा शांतपणे ऐकत असतो. किंबहुना त्याला फक्त ऐकावेच लागते. त्याने मधे बोलण्याचा प्रयत्न केला तर… वाढलेल्या आवाजात जुगलबंदी सुरू होते. आणि ती तितकी श्रवणीय नसते.
दुसरे साम्य अस कि या गाण्याच्या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपलीशी वाटणारी गाणी आहेत. अग्गोबाई… देते कोण… देही वणवा पिसाटला… पासून मी मोर्चा नेला… दमलेल्या बाबाची कहाणी… अशी सगळ्यांसाठी व काही अंतर्मुख करणारी गाणी आहेत.
तसच WhatsApp वर बोलू काही. यात यश, वाढदिवस, लग्न, चिमुकल्यांचे आगमन, उत्सव, सणवार ते श्रध्दांजली पर्यंत सगळ्यांसाठी आनंद देणाऱ्या आणि दु:खाच्या गोष्टी फोटो आणि व्हिडिओ सह येतात.
फरक असा आहे की आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम व्यवस्थित नियोजन करून होतो. त्या कार्यक्रमाची तारीख, वार, वेळ, ठिकाण, कार्यक्रमाचा साधारण कालावधी हे ठरलेल असत. तसेच त्याची जाहिरात देखील होते. कदाचित कार्यक्रमाची रंगीत तालीम देखील होत असावी.
पण WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमाचे मात्र कोणतेही नियोजन नसते. वेळ, काळ, आणि त्यावेळी होणारा WhatsApp चा (अति) वापर यावरून हा कार्यक्रम केव्हाही, कुठेही होऊ शकतो. वेळ (कार्यक्रम सुरू होण्याची, आणि संपण्याची) त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. या कार्यक्रमाची जाहिरात नसते. (पण कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींकडून खाजगीत सर्वदूर पसरणारी चर्चा होण्याची शक्यता असते.)
थोडक्यात आयुष्यावर बोलू काही याची जाहिरात करावी लागते, WhatsApp वर बोलू काही याची जाहिरात काहीवेळा कार्यक्रम संपल्यावर (रंगून आणि रंगवून) होते. रंगीत तालीमची गरज नसते. उत्स्फूर्त आणि जोशपुर्ण सादरीकरण असते.
दुसरा फरक WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमात काही वेळा जोडी बदलते. नवराबायको, आईमुलं, वडीलमुलं अशा जोड्या बदलत असतात. तिसरा येथे सहाय्यक म्हणून असतो.
आयुष्यावर… यात आवाज सगळ्यांपर्यंत ऐकू जाईल याचा प्रयत्न. तर WhatsApp……. यात आपल बोलण दोघांतच आणि दोघांचच राहिल याची दक्षता. पण आवाज मोठा असतो. काही वेळा परिस्थिती नुसार नुसत्या डोळ्यांनीच हा कार्यक्रम होतो.
आयुष्यावर… यासाठी घराघरांतून लोकं ऐकण्यासाठी शक्य असल्यास मित्रमंडळीसह जातात. तर WhatsApp…. हा कार्यक्रम खाजगीतला, कौटुंबिक असतो.
पण एक नक्की… आयुष्यावर बोलू काही हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम आहे. आणि अवेळी आणि अती होणाऱ्या WhatsApp च्या वापरानंतर WhatsApp वर बोलू काही हा अंतर्मुख करणारा कार्यक्रम आहे.
WhatsApp वाईट नाही. पण चांगल काय आहे? किती, केव्हा, कुठे, कसं वापरायचं हे समजलं तर WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील आयुष्यावर… याचा इतकाच चांगला होईल.
WhatsApp वर बोलू काही, हे WhatsApp वरच लिहून पाठवत असल्याने येथेच कार्यक्रम थांबवतो…
गणेशोत्सव संपला की सर्वांना नवरात्राचे वेध लागतात ! नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. नऊ हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.
सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आली आहे. पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो तर अश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो..
आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकांशी जोडलेले असतात. भौतिक प्रगतीच्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप, तेज, माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची ‘श्री महालक्ष्मी’, ‘श्री महासरस्वती’ आणि ‘श्री महांकाली’ ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ज्ञानाची देवता आहे. श्री महाकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे महाकाली ही वाहनावर बसून हातात आयुधे घेतलेली अशी आपण पाहतो.
पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सर्जनाचे प्रतीक असणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरु होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्तधान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन रोपे तयार होतात. यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो. मातीच्या घटातून येणारी ही छोटी रोपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात. ही ‘आदिशक्ती’ असते.
याच काळात “सरस्वती”ची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटीपूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘ तू शक्ती दे, तू बुद्धी दे ‘ असे म्हणून सरस्वती पूजन होते. पाटी पूजन अजूनही कित्येक मराठी शाळांमधून केले जाते. ते नवमीच्या दिवशी होते.
या नवमीला खंडे नवमी असेही म्हणतात.त्या दिवशी पांडव वनवासातून परत आले आणि वनवासाला जाताना शमीच्या झाडांवर ठेवलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली आणि कौरवांशी युध्दाची तयारी केली. अशा या खंडेनवमीचे स्मरण म्हणून आपण घरी शस्त्र पूजा करतो. देवासमोर घरात असणारी छोटी मोठी शस्त्रे जसे की सुरी, कात्री, कोयता मांडून ठेवतात व त्याची पूजा करतात. (आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही स्टेथोस्कोप, फोर्सेप्स, सिरींज यासारख्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करत होतो.) शेवटी ही पण आत्ताच्या काळातील शस्त्र आहेत ना ! खंडेनवमीला वाहनांची पूजाही करण्याची पद्धत आहे.. अर्थात काहीजण दसऱ्याच्या दिवशीही करतात. त्यानिमित्ताने वाहने स्वच्छ करणे, धुऊन काढणे, झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सुशोभित करणे, दाराला तोरण बांधणे हे सर्व घडते.
देवीचे तिसरे रूप म्हणजे “महाकाली” ! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रुप ! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते. आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठीही “महाकाली” ची पूजा आहे !
या सर्व देवी रूपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र ! या नवरात्राला “शारदीय नवरात्र” हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजनशक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे, यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर केले जातात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ ! त्यामुळे आपल्याला बुद्धी वैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते.
ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते तो हा ‘ नऊ ‘ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळे ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे, गुजरातमध्ये देवीसमोर गरबा खेळला जातो. बंगालमध्ये कालीमाता उत्सव होतो. उत्तर भारतात दुर्गा पूजन होते, तसेच महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आणि इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.
सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवीस्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी, हीच या शारदीय नवरात्राच्या काळात मी देवीची प्रार्थना करते.
☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
मला पाहून ती थबकली….जागच्या जागी खिळून राहिली जणू ! अजून अंगाची हळदही न निघालेली ती….दोन्ही हातातील हिरव्या बांगड्या सुमधूर किणकिणताहेत. केसांमध्ये कुंकू अजूनही ताजंच दिसतं आहे. तळहातावरील मेहंदी जणू आज सकाळीच तर रेखली आहे…तळहातांचा वास घेतला तर मेहंदीच्या पानावर अजूनही झुलणारं तिचं मन दिसू लागेल… तिनं केसांत गजराही माळलेला आहे….तिच्या भोवती सुगंधाची पखरण करीत जाणारा. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष आधी माझ्या कपाळाकडे आणि नंतर आपसूकच गळ्याकडे गेलं….बांगड्या फोडल्या गेल्या त्यावेळी हातांवर झालेल्या जखमांचे व्रण तिच्या नजरेतून सुटले नाहीत….आणि तिच्या चेह-यावरच्या रेषा सैरावैरा होऊन धावू लागल्या….एकमेकींत मिसळून गेल्या….एक अनामिक कल्लोळ माजला तिच्या चेह-यावर !
ती शब्दांतून काहीही बोलली नसली तरी तिची नजर उच्चरवाने विचारत होती….. ही अशी कशी माझ्या वाटेत येऊ शकते? खरं तर हिने असं माझ्यासारखीच्या समोर येऊच नये….उगाच अपशकुन होतो. मी सौभाग्यकांक्षिणी होते आणि आता सौभाग्यवती….सौभाग्याची अखंडित कांक्षा मनात बाळगून असणारी! सौभाग्याची सगळी लक्षणं अंगावर ल्यायलेली. कपाळी कुंकू, नाकात नथ, कानांत कुड्या, दोन्ही हातांत हिरवा चुडा, बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या, बोटांत अंगठ्या, केसांमध्ये कुंकवाची रेघ, पायांत जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र….त्याचा आणि माझा जीव एका सूत्रात बांधून ठेवणारं मंगळसूत्र. आज घटस्थापनेचा मुहूर्त….आणि त्यात हिचं येणं…काहीच मेळ लागत नाही !
मी म्हणाले…तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या कुंकवानं राखलंय…माझ्या कपाळीचं पुसून. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कायम रहावं म्हणून तो माझं मंगळसूत्र तोडून निघून गेलाय मला शेवटचही न भेटता. कडेवर खेळणा-या लेकात आणि माझ्या पोटात वाढणा-या बाळात त्याचा जीव अडकला नसेल का? बहिणींच्या राख्या त्याला खुणावत नसतील का? दिवसभर कमाई करून दिवस मावळताच पाखरांसारखं घरट्यात येऊन सुखानं चार घास खाणं त्याला अशक्य थोडंच होतं..पण त्यानं निराळा मार्ग निवडला…हा मार्ग बरेचदा मरणाशी थांबतो.
पण मीच कशी पांढ-या कपाळाची आणि पांढ-या पायांची? माझं कपाळ म्हणजे जणू माळरान आहे जन्म-मरणातील संघर्षाचं. इथं मैलोन्मैल काहीही नजरेस पडत नाही. रस्त्यात चिटपाखरू नाही आणि सावलीही. झळा आणि विरहाच्या कळा. मनाचं रमणं आणि मरणं….एका अक्षराचा तर फेरफार ! मन थोडावेळ रमतं आणि बराच वेळ मरतं.
मी सुद्धा अशीच जात होते की सुवासिनींच्या मेळ्यांमध्ये. एकमेकींची सौभाग्यं अखंडित रहावीत म्हणून प्रत्येकीच्या कपाळी हरिद्रम-कुंकुम रेखीत होतेच की. मग आताच असं काय झालं? कपाळावरचा कुंकुम सूर्य मावळला म्हणून माझ्या वाटेला हा अंधार का? माझ्या कपाळी कुंकू नाही म्हणून का मी दुसरीला कुंकू लावायचं नाही? माझ्याही पोटी कान्हा जन्मलाय की….माझ्या पोटी त्यांची ही एक कायमची आठवण! मी कुणा गर्भार सुवासिनीची ओटी भरू शकत नाही.
कुणाच्या मरणावर माझा काय जोरा? मरणारा कुणाचा तरी मुलगा,भाऊ,मामा,काका इत्यादी इत्यादी असतोच ना? मग त्याच्या मरणानं मी एकटीच कशी विधवा होते? नव-याच्या आईचा धनी जगात असेल तर तिला कुंकवाचा अधिकार आणि जिने आपले कुंकू देशासाठी उधळले तिच्या कपाळावर फारतर काळ्या अबीराचा टिपका?
मूळात हा विचार कदाचित आपण बायकांनीच एकमेकींच्या माथी चिकटवलेला असावा, असं वाटतं. आता हा विचार खरवडून काढायची वेळ आलेली आहे…कपाळं रक्तबंबाळ होतील तरीही. मातृभूमीच्या रक्षणासाठी मरण पत्करणा-यांच्या आत्म्यांना अंतिमत: स्वर्ग देईन असं आश्वासन दिलंय भगवान श्रीकृष्णांनी. मग या आत्म्याच्या जीवलगांना देव अप्रतिष्ठेच्या,अपशकूनांच्या नरकात कसं ठेवील…विशेषत: त्याच्या पत्नीला? त्याच्या इतर नातलगांना हा शाप नाही बाधत मग जिने त्याचा संसार त्याच्या अनुपस्थितीत सांभाळला तिला वैधव्याच्या वेदना का? का जाणिव करून देतोय समाज तिला की तु सौभाग्याची नाहीस? सबंध समाजाचं सौभाग्य अबाधित राखण्यासाठी ज्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या सौभाग्याचं कुंकू असं मातीमोल करून टाकण्याचा अधिकार कुणी का घ्यावा आपल्या हाती?
उद्या पहिली माळ….जगदंबा उद्या युद्धाला आरंभ करेल…दानवांच्या रुधिराच्या थेंबांनी तिचं अवघं शरीर माखून जाईल आणि कपाळ रक्तिम..लाल दिसू लागेल. जगदंबा अखंड सौभाग्यवती आहे…कारण देवांना मृत्यूचा स्पर्श नसतो होत. मग तिच्या लेकींना तरी या पिवळ्या-लाल रंगाच्या रेखाटनाविना कशी ठेवेल ती?
जगदंबेची लढाई तर केंव्हाच संपून गेली….दानव धुळीस मिळवले तिने. तिच्या देहावरील रक्त केंव्हाच ओघळून जमिनीत मुरून गेलंय. आता आपण अनुभवतो तो स्मरणाचा आणि राक्षसांच्या मरणाचा सोहळा. नवरात्र हे प्रतीक आहे त्या रणाचं. आया-बायांनो,बहिणींनो,सौभाग्यवतींनो..आजच्या पहिल्या माळेला तुम्ही किमान माझ्यासारखीच्या भाळावर तरी हळदी-कुंकवाची दोन बोटं उठवलीत ना तर हुतात्म्यांचे आत्मे तृप्त होतील, सीमेवर लढणारी इतरांची सौभाग्यं आणखी प्राणपणानं झुंजतील. कारण आपल्या माघारी आपल्या नावाचं सौभाग्य पुसलं जाणार नाही ही जाणीव त्यांना प्रेरणा देत राहील.
स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी जिजाऊ मांसाहेबांना शहाजीराजेसाहेबांच्या मागोमाग सती नाही जाऊ दिलं….त्यांच्या चितेच्या समोर हात पसरून उभं राहून त्यांनी आईसाहेबांना रोखून धरलं. राज्याभिषेकातल्या होमातील रक्षा जिजाऊंनी आपल्या कपाळी लावली. जिजाऊ राहिल्या म्हणूनच स्वराज्याच्या कपाळावर स्वातंत्र्याचा कुंकुमतिलक सजू शकला.शूर धुरंधराची स्वाभिमानी पत्नी आणि लाखो कपाळांवरील कुंकू टिकावं म्हणून जीवाचं रान करणा-या शूर सुपुत्राची माता म्हणून जिजाऊसाहेबांचा मान उभ्या महाराष्ट्राने राखला. असाच मान आजही हुतात्म्यांच्या पत्नींना,मातांना,लेकींना मिळावा हे मागणं फार नाही !
आज मी निर्धारानेच आले आहे आईच्या गाभा-यात…तुम्हां भरल्या कपाळांच्या पावलांवर पाऊल टाकून. .. पण आज मी ठरवलं….देवीसमोर जाऊन तिच्याकडे आणखी काहीतरी मागायचं….एक आठवण आहे सौभाग्याची माझ्या पदरात..त्यांचा लेक….त्यालाही मातृभूमीच्या सेवेत धाडायचं !
*************************************
रास्ते मे विधवा वीर-वधू को देख;
एक नववधु ठिठक गई !
यह विधवा मेरे रस्ते में;
क्यों आकर ऐसे अटक गई?
तुम यहां कहां चली ;आई हो भोली !
यह नववधुओं की तीज सखी;
यह नहीं अभागन की टोली !
यह सुनकर वह वीर पत्नी बोली
मुझको अपशकुनी मत समझो
मैं सहयोगिनी उसे सैनिक की;
जो मातृभूमि को चूम गया !
तुम सब का सावन बना रहे;
वो मेरा सावन भूल गया!
तुम सब की राखी और सुहाग;
वो मंगलसूत्र से जोड़ गया !
तुम सब की चूड़ी खनकाने;
वो मेरी चूड़ी तोड़ गया !
मेरी चुनरी के लाल रंग;
वो ऐसे चुरा गया!
उनकी सारी लालिमा को;
तुम्हारी चुनरी में सजा गया !
उनकी यादों की मंदिर में;
मैं आज सजने आई हूं !
मेरा बेटा भी सैनिक हो;
भगवान को मनाने आई हूं !
विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य उपक्रम काही सामाजिक संस्थांनी हाती घेतला आहे. सैनिक आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्यरत असणा-या जयहिंद फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या शूर सौभाग्यवतींसाठी आणि इतर भगिनींसाठी विधवा प्रथेला मूठमाती देऊन वीरपत्नींना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातीलच एका वीर सैनिक – वीर पत्नीची कहाणी वाचून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. उपरोल्लेखित हिंदी कविता त्यांच्याच लेखात आहे. आज नवरात्रातली पहिली माळ….चला उजाड कपाळांवर सौभाग्याचा सूर्य रेखूया….जयहिंद !
भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.
भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे—
।।नभ: स्पृशं दीप्तम्।।
हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आलेले आहे. (भगवद्गीता ११.२४)
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी हे वाक्य सुचविले. त्याचा अर्थ असा आहे “हे! विष्णो, आकाशस्पर्शी ज्योती सारखा आणि अनेक वर्णयुक्त, उघड्या मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्राच्या तुला पाहून भयभीत झालेल्या माझ्यामध्ये धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.”
थोडक्यात ज्या भयभीत झालेल्या अर्जुनातली वीरश्री जागृत करण्याचं काम भगवंताने केले त्याप्रमाणे वायुसैनिकांना हे घोषवाक्य लढण्यास प्रवृत्त करते.
८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली म्हणून ८ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन समजला जातो. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
ब्रिटिशकालीन वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे होते (१२ मार्च १९४५). मात्र स्वातंत्र्यानंतर त्यातले रॉयल जाऊन भारतीय वायुसेना दल असे त्याचे नामकरण केले गेले.
१९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. नंतर वेगवान जेट विमाने आली. नेट, हंटर कॅनबेरा यासारखे ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी झाली. परराष्ट्रीय धोरणानंतर रशियन हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली. सध्याच्या काळात रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वाॅरफेअर सी —४—आय संगणकीय सुविधा वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूरस्थ शत्रूच्या विमानाची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरच्या शत्रूंच्या तळाचा शोध घेणारी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत सहभागी आहेत. येत्या काही वर्षात हवाई दलाच्या यादीत २२० एलसीए चा(L C A) ताफा असेल.त्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.
भारतीय वायुसेनेचे प्रमुख मिग२९या लढाऊ विमानाचे पायलट विवेक राम चौधरी हे आहेत. ते २७वे एअर चीफ मार्शल आहेत.(३० सप्टेंबर २०२१) ते नांदेडवासी आहेत.महाराष्ट्रासाठी ही गौरवशाली बाब आहे.
वायुसेना दिनाच्या वेळी भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. विशेष पराक्रम गाजवण्यार्या हवाईदल सैनिकांना सन्मानचिह्ने दिली जातात. यावर्षीचा हा ९१ वा वायुसेना वर्धापन दिन आहे. यावर्षीचा फ्लाय पास्ट उत्तर प्रदेश मधील सांस्कृतिक नगरी प्रयागराज इथे होणार आहे.
भारतीय वायुसेना म्हणजे भारताचा अभिमान आणि शान आहे.
प्राणपणाने भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या या वायुसैनिकांना मानाचा मुजरा !!
लहानपणी शिकलेला व कायम लक्षात राहणारा एक धडा आठवला डोळ्यांचा भाव असे नाव होते. त्यातही डोळ्यांची किंमत एका एक डोळा नसलेल्या श्रीमंत व्यक्तीने सांगून डोळस माणसाचे डोळे उघडले होते.डोळ्यां वरून खूप म्हणी व वाक्प्रचार पण आहेत.आणि डोळ्यांचे उपयोग पण खूप आहेत.अगदी व्यक्ती शब्दाने बोलू शकत नसेल तरी डोळ्यांनी बोलतो.डोळ्यांची भाषा कधीच खोटे बोलत नाही.डोळे माणसाच्या मनाचा आरसा असतात.डोळे वाचता आले की माणूस वाचता येतो आणि समजतो.मग आपकी नजरोने समझा असेही होते.जसे नजरेने भाव वाचले जातात तशी नजर लागते पण.मग काय नजर काढावी लागते.ही नजर केव्हा,कुठे,कोणाची लागली?ती कशी काढायची हे प्रेमळ नजरेला व्यवस्थित कळते.तसेच एखाद्या चांगल्या उत्तम गोष्टींवर डोळा पण ठेवला जातो.हा डोळा त्यातील भाव चांगले असतील तर नजर लागी राजा असे होते. किंवा आँखो ही आँखो मे इशारा पण होतो. अगदी लहान बाळाचे भाव व्यक्त करणारे निरागस डोळे त्याच्या भावना सांगून जातात.तर म्हातारे,आजारी लुकलुकणारे डोळे पण बरेच काही सांगून जातात.माणूसच काय पण पशू,पक्षी हे सुध्दा डोळ्यांनी बोलतात.फक्त डोळे वाचण्याची नजर हवी.
डोळ्यांचे रंग,रूप,आकार खूप भिन्न भिन्न असतात.नुसते डोळे दिसले तरी व्यक्ती ओळखू येते.सध्याच्या स्कार्फ लपेटून घेण्याच्या काळात फक्त डोळ्यांच्या मदतीने माणूस ओळखण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे.अगदी कोणतेही सौंदर्य टिपायचे असेल तर आपला व कॅमेऱ्याचा दोन्ही डोळे उत्तम असावे लागतात.एखाद्या मंदिरात गेल्या नंतर उघड्या डोळ्यांनी ती अंतर्मनात साठवून घ्यावी आणि नंतर जेव्हा जेव्हा डोळे बंद करू त्या वेळी ती अंतर्चक्षूंनी पहावी.हे खरे दर्शन.त्राटक ध्यान करताना डोळ्यांचे खूप महत्व.नुसते बाह्य डोळे तर महत्वाचे असतातच पण त्याच बरोबर नजर असावी लागते.आणि सिद्ध हस्त नजर असेल तर कोणतीच गोष्ट त्या नजरेतून सुटत नाही.किंबहुना असे म्हणणे योग्य ठरेल की,ती नजर सगळ्यातले चांगले टिपून घेते.ज्याला कोणातील चांगले दिसत नसेल त्याला सहज आंधळा आहेस का म्हंटले जाते.किंवा काहीजण डोळे असून पण आंधळे असतात.म्हणजे डोळ्यांनी बघतात.पण त्याचा अर्थ लक्षात घेत नाहीत.
अशा उपयुक्त जग,चराचर दाखवणाऱ्या डोळ्यांची काळजी पण तितकीच महत्त्वाची.त्या साठी खाणे,पिणे ( योग्य प्रमाणात पाणी ),विश्रांती,व्यायाम आवश्यक आहे.
डोळे त्याचे वाक्प्रचार,म्हणी,गाणी, डोळसपण,नजर,डोळ्यातील भाव,वेळोवेळी डोळ्यात येणारे पाणी,डोळ्यांची काळजी,त्या साथीचे उपाय असे वेगवेगळे लेख होऊ शकतात.
डोळसपणे डोळ्यांनी वाचल्यामुळे योग्य नजर मिळते.असे बरेच लेख वाचून बरेच विषय मिळतात.असे म्हणता येईल,काही लेखा मुळे डोळे उघडले जातात.आणि नवीन नजर मिळते.अशीच नवीन नजर मिळण्या साठी नवीन लेख वाचण्याची डोळ्यांना उत्सुकता असते.
आणि हे सगळे करण्यासाठी आजचा दिवस! डोळ्यांची जपणूक व आरोग्य याचे महत्व सांगणारा!
‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव ! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…
कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू!” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे?….. त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.
तेव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची!
अॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं. ‘धन्य अॅना मिलार्ड बाई…!’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!
त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले, ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला.
त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय.
मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं..
बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible…’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें….’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.
मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,….
☆ ‘सीडी’ देशमुख !–रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
२ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा – महाडजवळ ‘नाते’ गावात – हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) – पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला – १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली – १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला – लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे – पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल – लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले – मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) –
सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी केली – १९३१ मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला हा माणूस सचिव म्हणून गेला होता – १९४१ मध्ये तो रिझर्व्ह बॅंकेचा डेप्युटी गव्हर्नर बनला – ११ ऑगस्ट १९४३ रोजी बॅंकेचा गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर हा माणूस रिझर्व्ह बॅंकेचा सर्वात तरूण आणि पहिला भारतीय गव्हर्नर बनला – दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते त्यावेळेस ह्या माणसाने योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले – ह्या कामाबद्दल २१ मार्च १९४४ रोजी ह्याला ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला – बॅंकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमणकाळात हा माणूस व्हाईसरॉयज कौन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमला गेला – १९४९ मध्ये ह्या माणसाने बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली होती (कारण १९२० मध्येच त्याने रोझिना विलकॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना १९२२ साली मुलगीही झाली होती – तिचं नाव प्रिमरोझ) – पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने ह्या माणसाने रिझर्व्ह बॅंकेची धुरा पुन्हा सांभाळली –
१९५२ साली हा माणूस कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला आणि जिंकलाही (कारण तो ‘कॉंग्रेस’चा सदस्य कधीच नव्हता!) – ह्या माणसाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं – भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून नाराज होऊन ह्या माणसाने पुढे राजीनामा दिला – त्यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी) चा पहिला अध्यक्ष म्हणून ह्याची नेमणूक झाली – शिक्षणक्षेत्रातही ह्या माणसाने भरपूर योगदान दिलं – आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस हैदराबादला स्थायिक झाला आणि २ ऑक्टोबर १९८२ रोजी ह्याचं निधन झालं – हा माणूस म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख – उपाख्य ‘सीडी’ देशमुख !
त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकारदरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या सीडींना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. सीडींचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. ह्याचं उदाहरण म्हणजे – सीडींनी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये ‘साऊथऐंड ऑन सी’ गावाजवळच्या ‘वेस्टक्लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘रोहा’ – कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे सीडींचं मूळ गाव! रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या सीडींच्या जन्मगावात – महाडजवळ ‘नाते’ गावात – जिथे सीडींचा जन्म झाला होता – ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसंबसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंची अशी अनास्था करण्याची आपली सवयही तशी जुनीच आहे. हे चालायचंच !
आज ४१ व्या स्मृतीदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना !
लेखक : श्री संकेत कुलकर्णी (लंडन)
(पहिला फोटो: १९५२ साली एलिझाबेथ राणीच्या राज्यारोहणास गेलेल्या पाहुण्यात सीडी (सर्वात उजवीकडचे), इंग्रजी राजमुद्रा असणाऱ्या नोटेवर सीडींची गव्हर्नर म्हणून सही.)
माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈