मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी ऐकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली.

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती.

पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता.

मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या “त्र्यंबक बापूजी ठोंबरे” यांची ही गोष्ट आहे.

जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस ५ मे रोजी संपन्न झाला.

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही.

आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला

मत्सर गेला

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, वा. रा. कांत, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा. भ. बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे.

त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते.

त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०४ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.. !!.. 🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री श्रीकांत उमरीकर

 जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर,

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘घर …. घरातलं.. आणि मनातलं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘घर …. घरातलं.. आणि मनातलं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

मी घर बांधतो घरासारखं आणि हा पक्षी माझ्याच घराच्या व्हरांड्यात लोंबत्या वायरवर घर बांधतोय त्याच्या मनासारखं…

मी विचारलं त्याला, “बाबारे, ना तुझ्या नावाचा सातबारा, ना तुझ्या नावाचं मुखत्यारपत्र.. ”

तर म्हणतो कसा, “अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं आणि कुणाच्या मनात घर करणं”…

माझं घर तर काड्यांचं आहे. तुझं घर सिमेंटचं आहे.. ”

… नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं..

मला आधी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.

आता वाटतंय त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.

तो डोळे झाकून घरट्यात बसला की समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.

त्या पक्षाने शिकवलं मला… एका घराची दोन घरं होण्यापेक्षा घरात घर करुन राहाणं आणि दुसऱ्याच्या मनात घर करुन राहाणं कधीही चांगलं…

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

एखाद्या कार्यक्रमात प्रमुख किंवा आमंत्रित व्यक्तींची ओळख करून देताना त्या ओळखीत काही चांगल्या गोष्टीच अपेक्षित असतात. अगदी तसा नियम नसला तरीही. पण अति उत्साहात काही गोष्टी घडतात.

एका फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनाला एका राजकिय नेत्याला बोलवल होत. त्यांची ओळख पुढिल प्रकारे करण्यात आली.

या महाशयांची जशी ओळख आहे तसा हा माणूस नाहिच. आणि जसा हा माणूस आहे तसं यांना कोणीही ओळखत नाही. आपली खरी ओळख जाणिवपूर्वक लपवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. व पुढेही यशस्वी होतील.

या सामन्याच्या उद्घाटनाला जे महाशय बोलवले आहेत त्यांचा राजकिय प्रवास आणि फुटबॉल यांचा जवळचा संबंध आहे. खेळावे कसे हे त्यांना माहित नसले तरी तुडवले कसे जाते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केल्यापासून आज नावाला येईपर्यंत (खरंतर नावारुपाला असंच म्हणणार होतो. पण त्यांच्याकडे पाहून फक्त नावाला येईपर्यंत असच म्हणतो.) पक्षातीलच वेगवेगळ्या मान्यवरांनी वेळोवेळी त्यांना व्यवस्थित तुडवले आहे.

आपल्याच पक्षात आपली प्रचंड घुसमट होत आहे असं त्यांना पदोपदी वाटत असल्यानेच त्यांनी चारपाच वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश सोहळा म्हणून कधीच झाला नाही. फुटबॉल मध्ये जस पास देतांना झालेल्या चुकीमुळे तो सहज प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायात जातो, तसेच हे पक्षातील लोकांच्या चुकीमुळेच दुसऱ्या पक्षाच्या पायावर पोहोचले. प्रतिस्पर्धी असलेल्या काही थोड्याच लोकांनी यांना पायात घेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असेल. थोडक्यात त्यांना तुडवतांना झालेल्या चुकीमुळे ते प्रत्येकवेळी दुसऱ्या पक्षात (पायाशी) गेले.

फुटबॉल, जस प्रत्येकाला तो आपल्या पायात असावा असं वाटत असलं तरी त्याला समोरच्याच्या जाळ्यात टाकण्यासाठीच धडपड असते तशीच धडपड यांच्या आयुष्यात आली आहे. कितीदा तरी यांना जाळ्यात ढकलण्याचा मनापासून आणि जोर लाऊन प्रयत्न झाला.

फुटबाॅलच्या मैदानात त्याला हात लागला की फाऊल असतो, त्याच पध्दतीने कोणत्याही परिस्थितीत आपला हात सगळ्यांनीच यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी डोक्याच्या वापर केला, पण हात लांब ठेवला. हात दाखवून अवलक्षण याच धर्तीवर हात लावून अवलक्षण कोणालाही नको होतं.

फुटबॉल मध्ये जसं काही चुका मुद्दाम केल्यातर यलो किंवा रेड कार्ड दाखवून एक प्रकारची तंबी दिली जाते, तशाच यांना वेगवेगळ्या नोटीस देऊन तंबी देण्यात आली आहे.

आज स्पर्धेच उद्घाटन करतांना तुडवण्यात काय मजा असते, याचा आनंद त्यांना घेता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि यांचा परिचय थांबवून त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा माझा एक मित्र मराठवाड्यातील लातूर या जिल्हयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला. तो मुंबईला असताना त्याची नेहमी भेट व्हायची. आता तो लातूरला गेल्यामुळे त्याची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मुद्दाम लातूरला गेलो.

दुपारी डब्बा खात असताना तो एका व्यक्तीची ओळख करून देत मला म्हणाला, ‘हे राजीव कुलकर्णी, अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन खूप वर्ष कसली. आता कुलकर्णी काही कारणास्तव लातूरमध्ये वापस आले आहेत. माझे जवळचे मित्र आहेत’.

मी कुलकर्णी यांना नमस्कार केला. बराच वेळ गप्पा मारल्यावर कुलकर्णी वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला म्हणाले, ‘मी खूप अडचणींत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मी येथे आलो आहे’.

ते वरिष्ठ अधिकारी मित्र म्हणाले, ‘बोला ना’.

माझ्याकडे बघत ते मित्र दबक्या आवाजात म्हणाले, ‘माझा मुलगा समर्थ आता आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्यसनाधीन झालाय. आम्ही अमेरिकेत खूप इलाज केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही अमेरिका सोडून पुन्हा गावी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला’.

माझे अधिकारी मित्र त्यांना म्हणाले, ‘तो इतका व्यसनाच्या आहारी गेला, तेव्हा तुम्ही काय करत होतात?’

कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेती उपक्रमात होतो. माझी बायको यमुना नोकरी करायची. तो नाना प्रकारचे व्यसन करायचा. आम्हाला कळू न देता गोळ्या खायचा’.

कुलकर्णी त्यांच्या मुलाच्या व्यसनाधीनतेचे किस्से सांगत होते आणि आम्ही अवाक् होऊन ऐकत होतो. कुलकर्णी यांच्या आपबीतीने माझे हातपाय एकदम गळून गेले. आम्ही एकदम नि:शब्द झालो. सर्व सांगून झाल्यावर कुलकर्णी यांनी खिशातला रुमाल काढून आसवांनी डबडबलेले डोळे पुसले.

माझ्याकडे बघत माझा तो अधिकारी मित्र म्हणाला, ‘या स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे दररोजच्या आहेत. आईवडीलांना मुलांकडे बघायलाही वेळ नाही, आणि सहज करता येतात म्हणून मुले व्यसनांचे अनेक प्रयोग करतात. ‘

अधिकारी मित्राने बेल वाजवून शिपायाला बोलवले. ते त्या शिपायाला म्हणाले, ‘जरा विजयकुमार यादव सर यांना फोन करून बोलावून घ्या’.

शिपाई गेला. कुलकर्णी यांनी सांगितले की अमेरिकेसह भारतातही पालकांच्या लाडामुळे, दुर्लक्षामुळे लहान लहान मुले खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. अनेक मुले व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहेत. नशील्या पदार्थांच्या सेवनाबरोबर मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे अनेकांचा कसा सत्यानाश झाला. आज दहावीच्या आतमधली ३० टक्के मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी मित्राच्या बोलण्यातून समजले.

इतक्यात यादव सर आले. यादव सरांची ओळख करून देताना अधिकारी मित्राने सांगितले, ‘हे यादव सर. यांनी आजवर तब्बल दोन पिढ्यांना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचवले आहे. मी अनेक वेळा त्यांच्या व्यसनमुक्ती सेंटरला जाऊन आलो. मी अनेक माणसं त्यांच्याकडे पाठवली. यादव सरांनी अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ‘ वरिष्ठ अधिकारी मित्र आणि कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाची सर्व परिस्थिती यादव सरांना सांगितली.

यादव सर म्हणाले, ‘लहान मुलांच्या व्यसनाचा प्रकार खूप वाढलाय. बरं, या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. मोठ्या माणसांप्रमाणे त्यांना कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. लहान मुलांसाठी खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे या लहान मुलांचं काहीही करता येत नाही. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांनाच रोज त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांच्या व्यसनाधीनतेवर करायचे काय हा प्रश्न पडतो आहे. ‘

वरिष्ठ अधिकारी असलेले मित्र मला म्हणाले, ‘संदीपराव, तुम्ही एकदा जाऊन यादव सर करत असलेलं काम पाहून या. तुमच्या लक्षात येईल, त्यांचं काम किती मोठे आहे!’

अधिकारी मित्र यादव सरांविषयी भरभरून बोलत होते. मलाही यादव सर यांचे काम जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. कुलकर्णी यांना यादव सरांनी त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर कसे काढायचे, याबाबत योग्य तो सल्ला दिला. त्या मुलांचे समुदेशन कसे करायचे, कोणते औषध द्यायचे हे सांगितले. मुलाला वेळ देणे, मुलावर खूप प्रेम करणे, त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे, हे यादव सर यांनी समजावून सांगितले. ‘तुम्हाला जर या मुलांना खरंच व्यसनातून बाहेर काढायचे असेल तर, तुम्हाला वैयक्तिक त्यांना वेळ द्यावा लागेल. तरच ती बाहेर येतील, अन्यथा येणार नाहीत. ‘

अधिकारी मित्र आणि कुलकर्णी हे दोघे बोलत बसले. मी उठलो आणि यादव सरांसोबत त्यांच्या आंबेजोगाई रोडवर असलेल्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये जाऊन पोहोचलो. दारू, गांजा अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेकडो लोकांचे तिथे इलाज केले जात होते.

लातूर मधलं हे व्यसनमुक्तीचं सेंटर कसं सुरू केलं? त्या एका सेंटरचे अनेक सेंटर कसे झाले? राज्यभरातले व्यसनमुक्तीचे यादव सरांचे काम भारतभर कसे पोहोचले? आणि आज एक दोन हजार नाही तर तब्बल साठ हजारांहून अधिक लोकांना व्यसनमुक्त कसे केले, याचा खूप मोठा इतिहास यादव सरांनी माझ्यासमोर ठेवला.

प्रचंड आत्मविश्वास, प्रत्येकाचे चांगले करायची भावना आणि माझा जन्म देण्यासाठीच झाला आहे, ही उदात्त भावना, यातून यादव सरांचे काम कुठलीही प्रसिध्दी न करता देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहे.

डॉ. विजयकुमार यादव (9372346476) उच्चशिक्षित, मोठ्या घरात जन्मलेले, एका शिक्षकाचे सुपुत्र. तरुण वयामध्ये आजूबाजूला असलेली व्यसनाधीन मंडळी यामुळे व्यथित होऊन ‘मी आयुष्यभर लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कार्य करेन’, या निर्धाराने पेटून उठलेले यादव सर यांनी १९९९ला लातूरमध्ये ‘जीवनरेखा प्रतिष्ठान‘ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र’, ‘एकात्मिक व्यसनाधीनता पुनर्वसन केंद्र’ आणि ‘व्यसनमुक्तीचे पुनर्वसन केंद्र’ असे दोन सेंटर लातूरमध्ये सुरू केले. पैसे मिळोत वा न मिळोत, व्यसनग्रस्त माणसाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले.

जसजसं काम वाढत गेलं, तशी काही अंशी शासनाची मदतही मिळू लागली. पण शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर काही भागेना. स्वतःच्या जवळचे जे काही होते ते सरांनी अनेक वेळा विकायला काढले, पण सेंटरच्या माध्यमातून चालत असलेले काम काही थांबू दिले नाही.

दारू, गांजा आणि वेगवेगळ्या रसायनांचे सेवन करून त्याच्या आहारी गेलेले, पेट्रोलचा वास घेणारे, व्हाइटनरपासून ते चप्पल पॉलिश करण्याच्या क्रिमला व्यसनाचे साधन बनवणारे असे अनेक महाभाग त्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये होते. कोणी दारूच्या व्यसनापायी वडिलांची होती नव्हती ती सगळी शेती विकली. कोणी दारूच्या व्यसनातून अनेक ठिकाणी चोरी केली. कुणाला दारूच्या व्यसनामुळे वेगवेगळे आजार झाले होते. गांजाच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले होते.

एक दोन नाही, हजार नाही, तर ६० हजार लोकांना व्यसनांच्या विळख्यातून यादव सर यांनी बाहेर काढले आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक माणसावर स्वतंत्र चारशे पानांचा ग्रंथ होऊ शकेल, इतकं व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य खंगून गेले होते.

प्रत्येकाची करूण कहाणी ऐकून असं वाटत होतं की, या जगात प्रचंड आनंद आहे, पण तुम्हाला जर एखादं व्यसन जडलं तर ते व्यसन कॅन्सरपेक्षाही खतरनाक असतं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यांतील आसवांना पाहून जाणवत होते.

यादव सर त्यांच्या कामात व्यग्र झाले. एका केंद्रात असलेली एक व्यक्ती संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी निघाली होती. त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी सोबतचे अनेकजण गेटपर्यंत आले होते.

मी त्या माणसाला विचारले, “काय झाले? तुम्ही कुठले? आता सुटले का व्यसन?”

तो माणूस मला म्हणाला, “मी राजीव रस्तोगी. मी ट्रक डायव्हर होतो. मित्रांच्या संगतीने दारूच्या व्यसनात बुडालो. शेवटी ज्या मित्रांची दारू यादव सर यांच्या सेंटरमुळे सुटली, त्याच मित्रांनी मला पैसे गोळा करून इकडे पाठवले. आज निर्व्यसनी बनून एक नवे आयुष्य मी सुरू केले आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ हे सारे काही केंद्रात मिळणाऱ्या शिकवणीतून शक्य झाले. माणूस कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो, तो एकदा व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. मला दोन मुली आहेत. त्या कधी मोठ्या झाल्या आणि कधी त्यांचे लग्न झाले, हे मला कळलेच नाही. दारूपायी आयुष्य कसे उध्वस्त झाले, हे समजलेच नाही”, असे म्हणत राजीव रडत होते. बाकी सर्व जण त्यांची समजूत काढत होते. राजीव गेले. त्यांना पाठवताना त्यांचे सर्व मित्र भावुक झाले होते. मी यादव सर यांच्याकडे निघालो.

यादव सर यांच्याकडे असताना एक व्यक्ती तिथल्या सर्वांना घेऊन समुपदेशनाचे धडे देत होती. त्याचे समुपदेशन ऐकत राहावे असेच होते. त्या सेंटरमध्ये औषधाशिवाय वाचन, चिंतन, मनन, कीर्तन, हे सारे काही होते.

मी यादव सर यांच्याकडे गेलो. समुपदेशन करणारे सरही तिथे आले. त्या सरांची ओळख करून देताना यादव सर म्हणाले, “हा माझा मुलगा कृष्णा यादव. सर्व कामं आता हाच पाहतो. “

अजून एका मुलीला यादव सरांनी जवळ बोलावले. तिची ओळख करून देत ते म्हणाले, “ही कान्होपात्रा नखाते. चंद्रपूरची आहे. पुण्याच्या दवाखान्यात अधिकारी आहे. आमच्याच नर्सिंग कॉलेजमध्ये शिकली आहे. नखाते यांच्यासारख्या १५० मुली दरवर्षी आमच्या कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. आम्ही जो सेवाभाव ठेवून काम उभे केले आहे, त्या कामाला ह्या सर्व मुली हातभार लावतात. पाचवीच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या व्यक्तीपर्यत सर्वांच्या व्यसनाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. “

अतिशय चिंताग्रस्त चेहरा करून यादव सर म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने जाण्याचा कानमंत्र दिला खरा, पण प्रचंड प्रगती आणि सहजतेने, निष्काळजीपणाने आम्ही खूप गतीने मनोरुग्णतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अनेक ठिकाणी हेच चित्र आहे”. यादव सर खूप तळमळीने बोलत होते आणि मी खूप हतबल होऊन ऐकत होतो.

यादव सरांचे काम समजून घेताना रात्रीचे अकरा कधी वाजले, ते कळलेच नाही. यादव सरांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. यादव सर, त्यांचे वडील रघुनाथ यादव, सरांची आई भगीरथबाई आणि आता तिसरी पिढी, म्हणजे यादव सरांचा मुलगा कृष्णा यादव हे सर्व कुटुंबीय सुरू केलेले काम खूप नेटाने पुढे नेत आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे अनेक यादव परिवार आपल्या आसपास आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे, बरोबर ना? 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

मध्यंतरी माझा एका पालकांशी वाद झाला. त्यांची अशी फार प्रबळ इच्छा होती की, त्यांच्या मुलानं सीए व्हावं. पण त्या मुलाच्या एकूण बुद्धिमत्ता आणि क्षमतांचा अंदाज घेता ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. मी त्यांना माझं मत सांगितलं. त्यावर ते उसळून म्हणाले, “रिक्षावाल्याची मुलगी सीए होऊ शकते तर हा का होऊ शकत नाही?” एका उच्चशिक्षित पालकांचा दृष्टीकोन असा असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

सीए हे केवळ एक उदाहरण आहे. पण अनेक क्षेत्रांच्या बाबतीतही पालकांचे हेच दृष्टीकोन पहायला मिळतात. पुण्यात शिकायला ठेवलं, मोठमोठे महागडे क्लासेस लावले, ट्यूशन्स लावल्या म्हणजे हवं ते यश मिळतंच, अशा गोड भ्रमात पालक आणि मुलं मस्त डुंबत असतात.

मी त्यांना विचारलं, “मग ह्याच न्यायानं एका गरीब सामान्य नावाड्याचा मुलगा जर जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनू शकतो तर अन्य मुलं का बनू शकत नाहीत?” माझ्या प्रश्नाचा त्यांना राग आला. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतच होतं.

“तुम्ही ‘स्लमडाॅग मिलेनिअर’ हा सिनेमा पाहिलाय का?” मी विचारलं.

“हो. मी पाहिलाय. ” ते म्हणाले.

“झोपडपट्टीत राहणारा, कधीही शाळेत न गेलेला, आणि कंपनीत ऑफिसबाॅयचं काम करणारा मुलगा करोडपती कसा काय बनला?” मी विचारलं.

“कसा काय म्हणजे? समोरच्या व्यक्तीनं त्याला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं त्यानं अगदी अचूक दिली. म्हणूनच तो करोडपती झाला. यात न समजण्यासारखं काय आहे?” ते विजयाच्या सुरात म्हणाले.

“बरोब्बर. आता माझा एक साधा प्रश्न आहे. जर तो अडाणी, गरीब मुलगा १५-२० प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी रूपये मिळवू शकतो, मग तुम्ही तर उच्चशिक्षित आहात. त्याच कार्यक्रमामधून एक कोटी रूपये मिळवणं तुम्हाला अजिबातच अवघड नाहीय. ” मी असं म्हटल्यावर त्यांचा नूरच पालटला. ते खूप अस्वस्थ झाले.

“ह्याच न्यायानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलानं त्यात भाग घेऊन दणादण एकेक कोटी रूपये कमवायला हवे होते ना? दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेल्या कुणालाही यात भाग घेऊन ही रक्कम जिंकता आली असती. पण तसं घडलं का?” मी आणखी एक पिल्लू सोडलं. ते गप्प झाले.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करणारी मुलं तर दिवसरात्र अभ्यास करत असतात. मग त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या शोज् मध्ये भाग घेणं आणि भरपूर पैसे कमावणं मुळीच अशक्य नाही. एक मिनिटही अभ्यास न केलेला एक मुलगा एक कोटी रूपये जिंकतो आणि वर्षानुवर्षं दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षा पास होता येत नाहीत, ही काय भानगड आहे? 

“तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. त्या मुलानं कार्यक्रमासाठी कसलाही विशेष अभ्यास केला नव्हता. तयारी केली नव्हती. साधं चहावालं पोरगं होतं ते. रोजचा पेपरसुद्धा वाचत नसेल. तर मग जनरल नाॅलेज च्या पुस्तकांचा तर संबंधच येत नाही. ” मी म्हटलं.

“हो ना. पण अशा परिस्थितीतही तो करोडपती झालाच ना?” ते.

“इथंच तर तुम्ही चुकताय. त्याला जे जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न सुशिक्षितांच्या दृष्टीने कठीण होते. पण, तो अशिक्षित मुलगा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कारण, त्यातले प्रश्न त्याच्या रोजच्या जगण्यावागण्याशी निगडीतच होते. त्या प्रत्येक प्रश्नाशी त्याची एकेक आठवण जोडली गेली होती. केवळ तेवढ्याच बळावर तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कोणताही विशेष अभ्यास न करता! ” मी म्हटलं.

“मी हा विचारच केला नव्हता! ” ते आश्चर्यानं म्हणाले.

“तेच मी म्हणतोय. गरीब अडाणी माणूस केवळ अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं काय देतो आणि चक्क करोडपती काय होतो! यात कष्टांचा किंवा अभ्यासाचा संबंधच कुठं आला? म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच होता ना?” मी विचारलं.

“हा जुगारच म्हटला पाहिजे. ” त्यांचं उत्तर.

“बिनअभ्यासाचे कुणी एक कोटी रूपये का देईल का?” माझा सरळ प्रश्न.

“खरं आहे. ” ते.

“हेच माझं म्हणणं आहे. आपण नुसत्या दिसण्यावर जाऊ नये. खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. खातरजमा केली पाहिजे. आपण यातलं काहीच न करता मोठी जोखीम पत्करतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ” 

“मग आता काय करावं?” ते.

“माश्यानं पाण्याबाहेर सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्याला लोक मूर्ख म्हणतात. कारण, काल्पनिक भराऱ्या मारून करिअर होत नाही. त्याला वास्तविकतेचा आधार असलाच पाहिजे. तुम्ही मुलांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करणार आणि नको त्या रेसमध्ये त्यांना पळवणार, हे खरोखरच आवश्यक आहे का? प्रत्येक स्लमडाॅग हा मिलेनिअर होऊ शकत नाही आणि प्रत्येक मिलेनिअर हा स्लमडाॅगच असतो असाही नियम नाही. अपवादांनाच सिद्धांत समजण्याची चूक आपण कधीही करू नये. ” मी.

पालक आणि मुलं ‘मला नेमकं काय जमेल?’ याहीपेक्षा ‘मला काय जमू शकेल?’ याचाच विचार अधिक करतात. म्हणूनच, ज्या गोष्टींचा भरवसा नाही आणि ज्यांच्याविषयी धड माहितीही नाही, असेच निर्णय मोठ्या आशेने आणि धाडसाने घेतले जातात. खरं तर अशी विचित्र रिस्क आपण कधीच घेत नाही. पण शिक्षण आणि करिअर निवडीमध्ये मात्र ती घेतली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आपण आपल्या सोयीनं नेमके अपवादच शोधतो आणि त्यांनाच सिद्धांत समजण्याची चूक करतो. ही फार मोठी चूक आहे.

आपण आणि आपल्या मुलांनी फॅन्टसीमध्ये जगणं सोडायला हवं. निदान करिअरच्या बाबतीत तरी..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ W F H…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ W F H… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एक विनोदी पण कटू सत्य 

कोरोना जाता जाता आपल्याला Work from home हा एक नवीनच रोग देऊन गेला

…. फार पूर्वी प्रत्येक घरात एक बाळंतीण रूम असायची, just like that आताही बऱ्याच घरी ती रूम असते, तेथे एक आय टी इंजिनिअर दिवाणावर वाकडा तिकडा पडलेला असतो, फक्त बाळाऐवजी लॅपटॉप असतो.

 

कहर म्हणजे बरेचसे जस्ट मॅरीड पोट्टे रात्री दोन पर्यंत लॅपटॉपशी झुंजत असतात, आता त्या घरातील आजीच्या मांडीवर नातू कसा आणि कधी खेळेल?

रिटायर्ड माणूस घरात जड होतो, पण ही बाळंतीण आय टी वाली जड नाही कारण मोठे पॅकेज असते ना आणि घरातील म्हाताऱ्या लोकांना कधीतरी कार मध्ये फिरवतो.

घरात चहा, नाश्ता तयार झाला की अगोदर ह्या आय टी बाळंतिणीला मिळाला पाहिजे, फक्त शेक, शेगडी आणि अळीवाची खीर तेवढी बाकी राहते, डिंक लाडू सुद्धा माऊली तयार ठेवते कारण तिच्या नवऱ्याने एवढे मोठे पॅकेज कधी तिला दिलेले नसते ना

काही असे आय टी वाले तर दिवाळीत नवे कपडे म्हणून ओन्ली बनियन आणि बर्मुडा घेतात म्हणे.

Work from home ही कॉन्सेप्ट आमच्या पुण्यात नवीन न्हाय, लै वर्षापूर्वी विडी कामगारांना विडीची पाने आणि तंबाखू मोजून दिली जायची आणि ते घरून विड्या करून आणायचे.

बऱ्याच ठिकाणी नवरा घरून काम करतो आणि बायको ऑफिसला जाते कार घेऊन, आणि येताना कोथींबिर घेऊन येते.

ही अशी दिवाणवरची दिवाणी मंडळी मग वीकेंड ला जवळच्या एखाद्या वागळीवर जाऊन, वडा पाव खाऊन येतात आणि नायगारा फॉल्स ला गेल्यासारखे बडेजाव करतात

ही आय टी वाली मंडळी लाँग टूर म्हणून कधी कधी सासुरवाडीला निघतात, U S वरून इंडिया ला निघाल्यासारखे आणि मग धुतलेले, इस्त्री केलेले कपडे शोधत बसतात.

कायम स्वरुपी ह्यांना W F H दिले तर पुण्याचे फ्लॅट रेट तरी कमी होतील, एवढेसे खुराडे एक कोटीला म्हणे पुण्यात, कशाला रहायचंय पुण्यात? चितळ्यांची बाकरवडी आणि जोशीचा वडा पाव खायला?

ह्या आय टी वाल्यांना आत्ताच बॅक पेन, मणके, कंबरदुखी, eyesight weak होणे असे प्रॉब्लेम सुरू झालेत, मोठे पॅकेज आणखी पाच दहा वर्षांनी ट्रीटमेंला लागणारच आहे म्हणा

आय टी वाल्याला महिना दोन लाख पगार असतो, पण सोसायटी मध्ये पण कोणी ओळखत नाही आणि सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याला पन्नास हजार पगार पण अर्धी सिटी त्याला ओळखते आणि त्याचे कुठले काम अडत नाही, हा फरक आहे.

पूर्वी इंग्रजांची वेठबिगारी केली आणि आता अमेरिकेची वेठबिगारी,

काय होणार आहे पुढच्या पिढ्यांचे देव जाणे……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “कानाचे आत्मवृत्त —…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “कानाचे आत्मवृत्त —…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

मी आहे कान!

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत’ कान! कारण आम्ही दोन आहोत! आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहीलेलंही नाही.

कुठल्या शापामुळेआम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या, चांगलं असो की वाईट, सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हाला खुंटीसारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे. आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला!

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं… त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही. डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टीक! पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटाॅलचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

कीती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे.. सर्व भार सांभाळायला!

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी रहा! …

टवकारलेत ना कान!

कुठल्या कानान लिवलं म्हाईत नाय 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हिरवा निर्सग हा भवतीने… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हिरवा निर्सग हा भवतीने… जीवन सफर करा मस्तीने…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ये ये आलास! .. अरे इकडे इकडे बघ वेड्या.. मी बोलवतोय तुला… इतक्या कडकडीत उन्हातान्हातून, धुळवटीच्या फुफाट्यातून तंगडे तोड करुन कुठं बरं निघालास.. बरं निघालास ते निघालास घरी सांगून सवरुन तरी निघालास आहेस ना.. कुठं जाणारं आहेस.. किती लांब जाणार आहेस.. कसा जाणार आहेस.. परत कधी येणार आहेस… घरी विचारलेल्या तुझ्या मायेच्या माणसांच्या प्रश्नांची नीट उत्तरे दिली आहेस ना.. नाहीतर ते उगाच तुझ्या काळजीत पडतील… दिवसभरात दिसलास नाहीस आणि अंधार पडल्यावर घरी परतला नाहीस तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल…. बघं मी सुद्धा किती किती प्रश्नांचाच भडिमार करतोय तुझ्यावर नाही का… अरे अजूनही तू उन्हातच का उभा राहिला आहेस… घामाने सगळंच अंग तुझं चिंब झालयं की… आणि चेहरा तर किती क्लांत झालेला दिसतोय… उन्हाच्या तावाने चेहरा लाल लालबुंद झालाय.. जसं काही घरातल्या माणसांवर रागावून चिडून संतापून तडकाफडकी घरा बाहेर पडलेला असावास असाच दिसतोस.. अरे ये रे या माझ्या हिरव्यागार थंड सावलीत येऊन बैस जरा.. हं हं त्या तापलेल्या मातीच्या पायवाटेवर बसू नकोस… या शांत हिरव्यागार कोमल अश्या तृणपातीवर बैस… वाटल्यास जरा पहुडशील… उन्हाच्या कावात चेचले अंगाला जरा थंडावा लागू दे.. वाऱ्याची झुळुकेने घाम सुकून गेला की थोडं तुला हायसं वाटेल.. बाहेरच्या रखरखीने मनात उसळलेल्या रूखरूणाऱ्या काळजी चिंता या इथं बसवल्यावर बघ कशा निभ्रांत होऊन जातील त्या… आणि हो आल्या आल्या तू मला सगळं सांगावासं असं माझं बिल्कुल म्हणणं नाही बरं… मला ठाऊक आहे ते.. तु घरापासून किती लांब आला आहेस.. एकही गोष्ट तुझ्या मनासारखी कुठेच कधीही घडून येत नसल्याने आणि तरीही सगळ्या गोष्टीला तुचं जबाबदार असल्याने.. कारण तुझं उत्तरदायित्त्व तुलाच निभाऊन न्यायला हवं असताना.. काळ किती प्रतिकुल असताना.. सगळंच प्रतिकुल घडत जातयं हे समोर दिसताना आपण किती हतबल आहोत याची जाणीव जेव्हा होते… तेव्हा राग, संताप, अनावर होतो… वादाच्या ठिणग्याने वणवा पेटतो तेव्हाच कुठलाही माणूस डोक्यात राख घालून घराबाहेर पडतोरे पडतोच.. जाउ दे सारे मसणात हाच टोकाचा विचार येतो मनात आणि पाय नेतील तिकडे माणसाचा दिशाहीन प्रवास सुरू होतो.. बाहेरही उन्हाळा आणि मनातही उन्हाळा… या उन्हाच्या लाही लाहीने जीव नकोसा होतो… वाटेत कुणी भेटलं.. का बरं म्हणून विचारलं तरी वाळली चौकशीने सुद्धा जखमेवरची खपली निघाल्यासारखी वाटते.. त्याचा सुद्धा अधिकच त्रास वाटतो… पण तू माझं ऐकलास इथं सावलीत घटकाभर बसलास मलाच फार फार बरं वाटलं बघं… इथं तुला गारव्यानं तनाला नि मनाला विश्रांती मिळाली.. मस्तक नि मनही शांत झालं.. डोळे ही निवले.. आणी संतापलेल्या विचारांचा धूरळाही खाली बसला असच दिसतयं तुझ्या या देहबोलीतून..

आता अविचार सोडून देऊन पुन्हा परतीचा घराकडचा मार्ग धरावास.. संध्यासमय जवळ येत चालला आहे.. आणि तुझ्या येण्याकडे तुझी घरातली सारी तुझी माणसं वाटेला डोळे लावून बसलेत…. कारण त्यांना तू आणि तूच हवा आहेस.. तुझ्या शिवाय त्यांना दुसरा कुठलाच आधार नाही हे तुलाही चांगलचं ठाऊक आहे… तेव्हा तू असाच घरा कडं जा.. आणि पुन्हा म्हणून अविचाराने असं पाऊल उचलू नकोस….

आज मी तुझ्या आजोबांनी लावलेल्या या झाडाने तुझी होत असलेली तगमग ओळखली म्हणून तुला या टोकाच्या निर्णया पासून परावृत्त तरी करु शकलो… तुझ्या आजोबांनी अगदी हाच विचार समोर ठेवून मला म्हणजे झाडाला उभं केलं.. वाढवलं.. त्यांना देखील तसाच अनुभव आलेला असणार… आणि असही वाटलं असणार की पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीलाही असाच अनुभव येत राहणार त्यात बदल काही होणार नाही तेव्हा त्या सगळ्यांना शांतता मिळावी विचारात परिवर्तन व्हावं असं वाटून मला इथं वाटेवर उभं करून गेलेत… मगं मी देखील पहात असतो असा कुणी रंजलेला गांजलेला पांथस्थ या वाटेवरून जाताना दिसतो का ते…. पण तू पुन्हा असं केलास आणि दुसऱ्याच रस्याला गेलास तर न जाणो माझ्या सारखं कुठलं झाडं तुला वाटेत भेटेल न भेटेल… पण माझी तुला सतत आठवण रहावी असं वाटंत असेल तर तू मात्र एक करू शकशील या गावाच्या माळरानाच्या वाटेवर माझ्यासारखी कितीतरी झाडं लावू शकशील की जेणेकरून त्याच्या सावलीत हिरव्यागार थंडाव्याने तिथं येणाऱ्या पांथस्थांना सुख समाधानाचा लाभ होईल…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

अल्प परिचय

शिक्षण – बी.एस.सी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हाॅस्पिटल मॅनेजमेंट.

छंद:—

ऑइल पेंटिंग, गायन, वादन.

आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललितबंधिंचे सादरीकरण व अभिवाचन.

? विविधा ?

☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

जगात शुभंकराकडं जसं मन आकृष्ट होतं, तसंच भयंकराचं देखील वेगळं आकर्षण आहे. लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा ठेवत प्रथम बाऊची आणि नंतर बागुलबुवाची भीती दाखवली जाते. या भीतीनं मनाचा एक कप्पा व्यापला जातो. लहान मुलं रडता रडता आपण कशासाठी रडत होतो हे विसरतात. त्यांच्या डोळ्याचे रांजण कोरडे पडतात. आवाजाची तान शिथिल होते, पण मायेची माणसं जवळ असल्याने अपेक्षा मात्र पूर्ण होते हे नक्की…. वय वाढेल तसं भीती एक मानसिकता होते. मनाला जाणवणारी संवेदना असते ती. अनाठाई भीतीनं विचारांचे पंख कापले जातात. भीतीनं कापरं भरलेलं मन, ‘सिदन्ती मम गात्राणी मुखम् च परिशुष्यते’ अशी तक्रार करायला सुरुवात करतं. मन पुट पुटायला लागतं ‘भय इथले संपत नाही. ‘ भयानक हा स्थायीभाव असणारा हा रस नवरसातला एक… जणू लाव्हाच!

आयुष्याला एक शिस्त असावी म्हणून माणसाने देव, धर्म, नियमावली, जाती, समाजमान्यता या भयांना जन्माला घातलं. मुकपणे पाहणाऱ्या या निसर्गाला देखील माणूस खाऊ की गिळू असं करू लागला. म्हणूनही ही बंधने असावीत. हास्य रस हा केवळ मनुष्य प्राण्यात स्त्रवतो परंतु भयरस मात्र समस्त प्राणिमात्रात दिसून येतो. साहित्यसृष्टीही या रसाने व्यापून गेली आहे. केवळ भयकथा लिहिणारे लेखक प्रसिद्ध आहेत. चित्रपट सृष्टीतील भयपटांचा एक चाहतावर्ग आहे. मृत्यू, सूड, खून, मारामारी, रक्तरंजित कथा यांचे सिनेमे पाहणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. ‘भुताचा पिक्चर सुपरहिट’ हे समीकरण बनलंय. आताशा माणसं भुतांना घाबरत नाहीत. ती स्वतःच चालती-बोलती भूतं झालीत. माणूसच माणसाला घाबरायला लागलाय. पूर्वी भुतं तरंगायची पण आता माणसंच हवेत असतात. त्यांचेच पाय जमिनीला लागत नाहीत. ती स्वतः भूतं झालीत. मारामाऱ्या, युद्ध, मृत्यु, खून, सूड यांची शस्त्र घेऊन ही भूतं पृथ्वीवर नंगा नाच करू लागलीत. त्यांच्यावर इलाज करणारा यांत्रिक बोलवायला हवा. ही भूतं निसर्गालाही डिवचतात. त्यानं निसर्गाचाही कोप होतो. निसर्गाची प्रतिक्रिया म्हणून पाझरलेला भयरस तर अति दाहक! आताशा नवरसातून निर्माण झालेले राग, द्वेष, त्वेष, मत्सर, लालसा, अहंकार यांची भूतं मनाच्या रंगमंचावर नंगानाच करू लागली. आयुर्वेदात भयज्वर भयअतिसार अशा रोगांवर भयचिकित्सा सुरू झाली आहे आहे हे आपल्या संस्कृतीचं दुर्दैव आहे..

मोठे होऊ तसं बाऊ गेला… बागुलबुवा गेला. नंतर आला करोना नावाचा गब्बर सिंग! ! जो डर गया वो मर गया असं म्हणून थैमान घालू लागला. भितीची अनेक रूपं दाखवू लागला. भीतीतून अस्वस्थता वाढू लागली आणि अनामिक विचारांना मोकाट वाव मिळाला. आणि मग उत्तराऐवजी नवीन प्रश्नच निर्माण झाले. समाजाच्या अवहेलनेची भीती, जिथे जिथे आपण जोडले गेलोय तो जोड तुटण्याची भीती. आर्थिक विपन्नतेची भिती अपयशाची, अज्ञानाची, अज्ञाताची, निर्णय चुकल्याची अशा अनेक भीतीने जीव ग्रासून गेलाय.

जीवन आव्हानांचा सागर आहे त्याकडे कसं पाहायचं लढून म्हणजेच फाईट करून की पळून जाऊन म्हणजे फ्लाईट घेऊन की फ्राईट होऊन म्हणजे थिजून हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा भयरस आटेल.. आणि तो मनकंपनास कारणीभूत होणार नाही…

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी… खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

खवय्येगिरी, पुणेकर…

गणेशोत्सव बघायला बाहेर पडल्यावर दणकून चालल्यावर सणकून भूक लागायची. अर्ध शतकापूर्वी पुणेकरांनाही बाहेरचं खाण्याचा शौक होता, पण अर्थाजनाला मर्यादा असल्यामुळे पदार्थ घेण्याला आणि खाण्यालाही निर्बंध असायचा. आप्पा बळवन्त चौकातून पुढे गेल्यावर भडभुंजाची भट्टी लागते. आतल्या बाजूला सतत भट्टी रसरसलेली असायची. 1 की. ज्वारी तांदूळ घेऊन, आई, काकू तिथून लाह्या फोडून आणायच्या. लालबुंद झालेल्या मोठ्या कढईत वाळू टाकून त्यात जोंधळे टाकले की फटाफट चांदण्यासारख्या चांदणी आकाराच्या शुभ्र लाह्या उमलून यायच्या. एरवी कंटाळा करणारे आम्ही, इथे मात्र आवर्जून जायचो कारण वाळूच्या उबेतून बाहेर पडलेले गरमागरम चणे फुटाणे, लाह्यांचे प्रकार बोकणा भरून खाता येत होते ना! म्हणून तर ही धडपड. तर अशा भडभुंज्याकडे हारीनें लावलेली आमच्या बजेटमध्ये बसणारी, कोरडी भेळ घेऊन आम्ही गणपती बघायला बाहेर पडल्यावर, पायाबरोबर तोंडही चालायचे. आमच्या मोठ्या बहिणी, जातांना बरोबर वर्तमानपत्र घ्यायच्या. नाहीनाही! वाचायला नाही हो! भेळ पसरून खायला पेपर हवा ना, अहो! तेव्हा कुठे होत्या पेपर डिश ? एखाद्या ओट्यावर ठाण मांडून कागदावरच्या कोरड्या भेळेच्या दहा मिनिटात फडशा पाडत होतो आम्ही. भेळ वाल्याकडची सणसणीत मिरची खातांना डोळे पांढरे झाले तर, बरोबर घेतलेल्या प्रवासी फिरकीच्या तांब्यातलं पाणी एका दमात रिकामं व्हायचं. तेव्हां काही आता सारखा बिसलेरीचा शोध लागला नव्हता. आमचा आपला स्वच्छ, चकचकीत घासलेला फिरकीचा तांब्याच बरा होता. पुण्यात सगळे गणपती बघायला, अगदी अख्ख पुणं पालथं घातलं जायचं. खाऊ गल्लीतली कोपऱ्यावरची हॉटेलं आम्हाला खुणवायची हो! पण बजेट ? हॉटेल बिल बसायला हवं ना त्यात! मग काय भेळेवरच भागवून आम्ही पुढे सरकायचो.

टिळक रोडवरचं जीवन, बादशाही, फडतरे चौकातले स्वीट होम, सदाशिव पेठेजवळचं पेशवाई, दत्त उपाहारगृह, आनंद विलासची मिसळ, घावन, संतोष भुवनची पुरी भाजी आणि बेडेकरांची प्रसिद्ध मिसळ हे सारं सारं काही नजरेआड करून प्रभा विश्रांती गृहाकडे आमचे पाय वळायचे. कारण तिथला बटाटेवडा स्वस्त आणि मस्त असायचा. तो वडा मात्र आम्ही दणकून हादडायचो. कारण तो चवदार आणि फ्रॉकच्या खिशाला परवडेल असा म्हणजे फक्त चार आण्याला मिळायचा. चवीला चवदार चटणी असायचीचं वाढणाऱ्याला जरा मस्का मारला की दोन चमचे चटणी जास्तच मिळायची.

श्रीमंत पोरं मात्र केसांचा कोंबडा उडवत, बापाच्या पैशावर, सिगरेटचा धूर सोडत, इम्प्रेशन पाडायला पोरींना रीगल, गुडलक कॅफे, सनराइज, पुना कॉफी हाऊस, मध्ये स्पेशल ‘च्या’प्यायला घेऊन जायची. सोळाव्या वरीसातलं धोक्याचं पाऊल, या रेस्टॉरंट मध्येच घसरायचं. म्हणजे प्रेमात पडायचं. त्यावेळी ‘मेळे’ असायचे. गजानन वाटवे, जोस्ना भोळे यांचा कार्यक्रम ऐकण्याऐवजी, ‘केला इशारा जाता जाता ‘करण्यातच प्रियकर प्रेयसींचा वेळ जायचा. तिकडे चोरून बघत कानाडोळा करुन आम्ही आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी परिसरात यायचो. पण घरी परततांना अचरबचर न खाण्याने, मन आणि पोट शांत असायचं.

जास्तीत जास्त पाच रुपये खर्च करणारे आम्ही, आजच्या पिढीला दोन, पाच हजार खर्च करून बिल देतांना बघतो नां, तेव्हां आम्ही अचंबित होतो. बाई गं! खाण्यावर हा केवढा खर्च?त्यांचेही बरोबर आहे म्हणा खाण्याचे दिवस आहेत त्यांचे. आणि मिळवतायेत पण ते तेवढे पैसे. माझ्या भावाला शरद आप्पाला आणि बहिणीला लीलाला कुलकर्णी भेळ फार आवडायचीनु. म. वि हायस्कूल कडे जातांना आनंदाश्रमाच्या अलीकडे छोट्याशा कोपऱ्यात श्री. कुलकर्णीनी आपला भेळेचा संसार मांडला होता. वाहनं चुकवत ओल्या वेळेचे बोकणे भरतांना भेळ खाणाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडायची पण ती ‘हटके’ भेळ खायला लोकं सहाच्या आत धडपडत हजेरी लावायचीचं. कुलकर्णी भेळ, गोड आणि चविष्ट बनवायचे पण त्यांच्या जिभेवर मात्र तिखट होतं. त्यांचा काटेकोर नियमच होता, सहानंतर, भेळेच दुकान बंद होणार आहे. सहाच्या पुढे काटा गेल्यावर ते स्पष्ट सांगायचे, “वेळ संपली, आता तुम्ही निघा. उद्या भेटू. ” शिष्ठ वाटणारे हे कुलकर्णी मनाने उमदे होते. दुर्दैवाने माझा भाऊ स्वर्गवासी झाला. त्याची नेहमी तिथे हजेरी असायची. माझ्या वडिलांची काही उधारी तर राह्यली नाही ना?असं विचारायला नंतर माझा भाचा हेमंत त्यांच्याकडे गेला व वडील नसल्याची दुःखद बातमी त्यांनी कुलकर्णींना सांगितल्यावर ते ताडकन उठले, हेमंतला जवळ घेऊन सगळ्यांसमोर उभं करून म्हणाले, ” ह्याला म्हणतात संस्कार. शरद माजगावकरांनी कधीच उधारी ठेवली नाही. लोक उधारी बाकी ठेवतात, पैसे बुडवतात. तोंड लपवतात पण हा त्यांचा मुलगा वडिलांच्या पश्चात त्यांची उधारी राह्यली आहे का? हे विचारायला इथे आला आहे. अशी पितृऋण फेडणारी मुलं ह्या जगांत आहेत. मग तुम्ही सांगा! कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे म्हणून. सगळे गिऱ्हाईक कुलकर्णीच्या कौतुकाने भारावले. आणि माझ्या भाच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अशी होती ती सुसंस्कारित त्यावेळीची पिढी. त्यांच्या संस्काराच्या पायावर आजच्या आदर्श पिढीची इमारत उभी आहे, नाही का! भेळवाल्या कुलकर्णींना आणि वाचकहो तुम्हालाही धन्यवाद.

– क्रमशः भाग २६   

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares