श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ क्षण सृजनाचे : माझा नवरा माझी पाहुणी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
साधारण ३४ वर्षांपूर्वीची गोष्ट. १९९० साल असेल. एके दिवशी सकाळी ११ च्या सुमाराला, माझ्याकडे एक तरुणी आली. असेल पंचविशीची. म्हणाली, ‘मी गोव्याहून आले. मला बा. द. सातोस्करांनी तुम्हाला भेटायला सांगितलं, म्हणून इथे आले. आता बा. द. सातोस्करांनी पाठवले म्हंटल्यावर तिची विचारपूस करणं, आदरातिथ्य करणं, माझ्या दृष्टीने ‘मस्ट’च होतं, कारण ते मला आपली मुलगीच मानत. मी म्हंटलं,’तुम्ही गोव्याला राहाता का?’
नाही. मी शहापूरला रहाते. गोव्याला कामाला गेले होते.’
‘कोणतं काम?’
‘मी पीएच. डी. करतेय. त्या संदर्भात काही जुनी वर्तमानपत्रे, , नियतकालिके, पुस्तके मिळतात का, हे बघायला गेले होते.’
‘कुणाकडे राहिलीस तू?’ मी आता ‘आहो’वरून एकेरीवर आले होते.
तिथे मी गोवा विद्यापीठाच्या अतिथीगृहात दहा दिवस राहिले होते. आत्ता इथेही याच कारणासाठी आले आहे.’
‘इथे तुझ्या कुणी ओळखीचे, नात्यातले आहे?’
‘नाही.’
‘मग कुठे रहाणार तू?’ हे विचारायला माझी जीभ काही रेटली नाही.
‘तुझ्या पीएच. डी.चा विषय काय आहे?
‘१९व्या शतकातील निबंध वाङ्मायातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’
‘अरे बाप रे!’
‘का हो?’
अगदी जडजंबाळ विषय आहे.’ माझी प्रतिक्रिया.
तिने स्मितहास्य केले. बोलली काहीच नाही. त्यासाठी तिला इथली वर्तमानपत्रे, नियतकालिके बघायची, अभ्यासायची होती. मी तिला सांगली नगरवाचनालयाविषयी सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. तारा भावाळकर, प्रा. हातकणंगलेकरसर, प्रा. व्ही. एन. कुलकर्णी इ.ची नावे सांगितली. तिच्याकडेही काही व्यक्ती, संस्थांची नावे, संदर्भ होते. या कामासाठी तिला तीन-चार दिवस तरी लागतील, असे तिच्या बोलण्यात आले. माझ्या मनात आलं, ही तरुण मुलगी, एकटी कुठे रहाणार? मग मी ठरवले, तिला आपल्याकडेच ठेवून घ्यायचं.
मी त्यावेळी डी.एड. कॉलेजमध्ये अध्यापन करत होते. मुलगा नववीला. यांचा पॉवरलूमचा व्यवसाय. मी स्वैपाक-पाणी, घर आवरून जेवणं करून बाहेर पडायची. हे यांच्या सवडीप्रमाणे येऊन जेवायचे. उषा कधी माझ्याबरोबर, तर कधी आधी, बाहेर पडायची. घरात असली, तर मला मदत करायची. एकदा तिने विचारलं, ’आमच्या सिंधी पद्धतीचा स्वैपाक करू का? पण ते काही जमलं नाही. तिने विचारलं, याचीच मला अपूर्वाई वाटली. बाहेर पडताना मात्र मी तिला बजावलं, ‘सातच्या आत घरात ये. उगीच आम्हाला काळजी नको.’ त्याप्रमाणे ती खरंच सातच्या आत घरी येऊ लागली. एक दिवस तिला रात्रीचे आठ वाजले, तर ती दोघांना पोचवायला घेऊन आली. ‘तू रागावशील, म्हणून यांना पोचवायला सोबत घेऊन आले.’ ती म्हणाली.
उषा मला काहीशी गंभीर, थंड प्रकृतीची आणि अबोल वाटली. जेवढं विचारावं, तेवढंच बोलायची. मी तरी इतक्या अपरिचित व्यक्तीला जास्त काय विचारणार? इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण –
हा पण मोठा चमत्कारिक होता. उषा घरात नसली, की हे मला म्हणायचे, ‘कशावरून घरातून पळून आली नसेल?’ किंवा ‘कुणाशी तरी लफडं …..’ किंवा मग ‘कुठल्या तरी टोळीतली…. चोर-दरोडेखोरांच्या ….’ मी म्हणायची, मी माझ्याकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतलीय. ती मुलगी काही तशी नाही. पण तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही विचारा. हे म्हणाले, ‘मी काही विचारणार नाही. तुझं तू बघ. पेपरला आपण अशा बातम्या वाचतो. कुणी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस चौकशीला आले, तर तुझं तू निस्तर. मी काही मदत करणार नाही.’
‘ती मुलगी तशी वाटत नाही’, हे मी पुन्हा पुन्हा म्हणत राहीले, तरीही यांचं बोलणं मला अस्वस्थ करून गेलं. डोक्यात शक्यतेचा एक किडा वळवळत राहिला.
चार दिवसांनी तिचं काम संपलं आणि ती निघून गेली. मी ‘हुश्श्य’ केलं. आमच्याकडून पुढे ती सातारला गेली.
मी यांना म्हंटलं, ‘बघा. चांगली होती ना मुलगी ! तुम्ही काय मुकताफळं उधळलीत तिच्याबद्दल.’ त्यावर हे म्हणाले, मला पण वाटलंच होतं, ही मुलगी चांगली आहे, त्याशिवाय का मी तिला माझ्या घरात राहू दिलं? पण म्हंटलं, तुझी जरा गम्मत करू या.’ म्हंटलं, ‘अच्छा . हे असं होतं का?’ खरं तर घर माझ्या नावावर होतं. कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जात होते. पण हे म्हणाले, ‘माझ्या घरात मी राहू दिलं.’ शेवटी आपण पुरुषसत्ताक संस्कृतीचाच भाग बनलेलो असतो ना!
पण या सगळ्या प्रसंगातून गेल्यावर मला एक छान कथा सुचली आणि मी आठ दिवसात ती लिहूनही काढली. ‘माझा नवरा, माझी पाहुणी.’ नंतर ती मासिकात छ्पून आली. अनेकांना आवडली. मी ही कथा काही ठिकाणी सांगितली. मैत्रिणींच्यातही कथेची आणि कथेमागच्या कथेची चर्चा झाली. पुढे पुस्तकातही ती आली. कथा लिहिताना आणि त्याबद्दल बोलताना मला पदोपदी उषाची आठवण येई. ती आली. तिने मला एक चांगली कथा दिली आणि ती निघून गेली. कथेमागची कथा किंवा हकिकत म्हणू आपण, ती तुम्हाला सांगितली. आता मी कथा म्हणून काय बदल केले, हेही तुम्हाला सांगावसं वाटतय, लेख विस्तारणार आहे तरी…..
मी माझ्या पाहुणीचं नाव बादललं. मीनाक्षी नटराजन ठेवलं. तिच्या प्रबंधाचा विषय बदलला. तो ’मंदिराच्या माध्यमातून झालेला नृत्यकलेचा विकास ‘ असा ठेवला. ती चेन्नईची. माझी मावसबहीण रेखाताईची शेजारीण. रेखाताईच्या मुलीच्या श्रेयाच्या बरोबरीची. दोन्ही कुटुंबात जवळीक. महाराष्ट्रातील मंदिरांबरोबरच, इथल्या वाघ्या-मुरळी, गोंधळी, देवदासी, जोगतिणी यांच्या, परंपरेत टिकून राहिलेल्या नृत्यशैलीचा, गीतांचा अभ्यास तिला करायचा होता. काही लोककलाकारांच्या मुलाखतीही ती घेणार होती. तिला पाच-सात दिवस तरी हे काम करायला लागणार होते. तिने कुठे राहायचं हे ठरवलं नव्हतं. मग मी तिला माझ्याकडेच रहा म्हंटलं.
संध्याकाळी प्रभाकरला तिच्याबद्दल सांगितल्यावर तो म्हणाला, ‘तिला राहायला कशाला ठेवून घेतलंस?’
‘श्रेयाला नसतं का ठेवून घेतलं?’
‘तिची गोष्ट वेगळी.’
तो मिनूशी व्यवस्थित बोले. ती नसताना मात्र नाही नाही त्या शंका उपस्थित करी. अलकडे ऑफिस सुटल्यावर तो थेट घरी येई. म्हणायचा, ‘काही भानगड उपस्थित झाली तर…. तुला एकटीला कशी निस्तरता येणार?’
‘पण मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं. रोज विचारते. माझं समाधान होतं.’
‘दुसर्याचा विश्वास संपादन करायचा, म्हणजे, एवढं फिल्ड वर्क हवंच!’ तो म्हणे.
तो रोज नाना शंका बोलून दाखवी. घरातून पळून आली असली तर? दागिने, पैसे घेऊन आली असली तर? कुणाशी लफडं करून एक दुजे के लिए म्हणत, किंवा दोघांनी आत्महत्या करण्याचा विचार केला असला तर… कुणा चोर, दरोडेखोरांच्या टोळीतली असली तर… किंवा नक्षलवादी संघटनेतील असली तर… रोज नवीन शंका. मी अस्वस्थ. विचारांचं जाळं त्याभोवती विणत राह्यची.
आमच्या दोघातील संवाद आणि त्यानंतरच्या विचारांची आवर्तनं लिहिताना मी कल्पनेची उंचच उंच नि स्वैर भरारी मारली होती.
एक दिवस तिला यायला रात्रीचे नऊ वाजून गेले. मी अस्वस्थ. कीचन टू बाल्कनी येरझारा मारतेय. शेवटी एकदाची बाल्कनीतून ती दूरवरून येताना दिसली. तिच्याबरोबर दोघेजण. हे पोलीस किंवा सी. आय. डी. ऑफिसर तर नसतील? साध्या वेषातले. तिची बॅग तपासतील का? फायलींखाली काय काय असेल? पिस्तूल, पैसे-दगदागिने, गुप्त कागदपत्रे, सायनाईडची बाटली…. आम्ही पण त्यांना सामील असू असं वाटेल का त्या दोघांना? माझी कल्पनाशक्ती भन्नाट वेगाने धावत नव्हे उडत होती.
तिने त्या दोघांना आत बोलावले. माझी ओळख करून दिली. ‘उजूआंटी तू रागावशील उशीर झाला म्हणून, म्हणून यांना पोचवायला घेऊन आले.’
त्यानंतर दोन दिवसात तिचं काम संपलं. ती निघून गेली. आणि मी ‘हुश्श्य….’ करत सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर तिची अधून मधून पत्रे, फोन येऊ लागले. आपल्या कामाची प्रगती त्यातून ती सांगे. पुढे तिला पीएच.डी. मिळाली हे सांगणारे, तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाविषयी तिचे फोन येत. प्रत्येक फोनमध्ये आमचे आभार व आम्ही तिच्याकडे कधी येणार, याविषयी विचारणा. आता तिचा प्रबंध पुस्तक रूपात येणार होता. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण व त्याचबरोबर रेल्वेची दोन तिकिटेही तिने पाठवली होती. मी डिक्लेअर केलं, ‘तू आलास तर तुझ्याबरोबर, नाही तर तुझ्याशिवाय मी जाणारच! ती दर वेळी बोलावते. तू नुसताच ‘हो… हो…’ म्हणतोस.’ मग एकदाचा तो तयार झाला.
आम्ही कार्यक्रमाला गेलो. तो छानच झाला. नंतर आसपासची प्रेक्षणीय स्थळे, छोट्या छोट्या सहली, नृत्याचे दोन-तीन कार्यक्रम…. आठवडा कसा गेला, ते कळलच नाही. तिने चांगलच आदरातिथ्य केलं. माझ्या नवर्यानेही आपल्या बोलण्याने, तिच्या आणि रेखाताईच्या घरातील सर्वांना चांगलंच प्रभावित केलं.
घरी परतल्यावर त्याला म्हंटलं, ‘किती चांगली मुलगी….’
‘मला माहीतच होतं ते.’
‘कसं?’
‘आतला आवाज…’
आणि तू काय काय तारे तोडलेस…… ‘
‘तुझी जरा गंमत केली. पण मजा आली, तुला असं घाबरताना पाहून!’
‘तुझी मजा झाली, पण माझा इकडे जीव जात होता, तुझ्या शंका-कुशंकांनी…’
‘अग, ती मुलगी चांगलीच आहे, याबद्दल माझी खात्रीच होती. नाही तर माझ्या घरात मी राहू दिलं असतं का तिला?’
म्हणे माझ्या घरात… घर माझ्या नावावर . कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जातात आणि हा म्हणतोय, ‘माझ्या घरात राहू दिलं असतं का?’ पुरुषी अधिकार आणि अहंकार कसा पेशीपेशीत भिनलेला असतो या पुरुषांच्या.’ इथे मी कथा संपवली.
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈