श्री मयुरेश उमाकांत डंके
इंद्रधनुष्य
☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
मध्यंतरी माझा एका पालकांशी वाद झाला. त्यांची अशी फार प्रबळ इच्छा होती की, त्यांच्या मुलानं सीए व्हावं. पण त्या मुलाच्या एकूण बुद्धिमत्ता आणि क्षमतांचा अंदाज घेता ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. मी त्यांना माझं मत सांगितलं. त्यावर ते उसळून म्हणाले, “रिक्षावाल्याची मुलगी सीए होऊ शकते तर हा का होऊ शकत नाही?” एका उच्चशिक्षित पालकांचा दृष्टीकोन असा असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
सीए हे केवळ एक उदाहरण आहे. पण अनेक क्षेत्रांच्या बाबतीतही पालकांचे हेच दृष्टीकोन पहायला मिळतात. पुण्यात शिकायला ठेवलं, मोठमोठे महागडे क्लासेस लावले, ट्यूशन्स लावल्या म्हणजे हवं ते यश मिळतंच, अशा गोड भ्रमात पालक आणि मुलं मस्त डुंबत असतात.
मी त्यांना विचारलं, “मग ह्याच न्यायानं एका गरीब सामान्य नावाड्याचा मुलगा जर जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनू शकतो तर अन्य मुलं का बनू शकत नाहीत?” माझ्या प्रश्नाचा त्यांना राग आला. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतच होतं.
“तुम्ही ‘स्लमडाॅग मिलेनिअर’ हा सिनेमा पाहिलाय का?” मी विचारलं.
“हो. मी पाहिलाय. ” ते म्हणाले.
“झोपडपट्टीत राहणारा, कधीही शाळेत न गेलेला, आणि कंपनीत ऑफिसबाॅयचं काम करणारा मुलगा करोडपती कसा काय बनला?” मी विचारलं.
“कसा काय म्हणजे? समोरच्या व्यक्तीनं त्याला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं त्यानं अगदी अचूक दिली. म्हणूनच तो करोडपती झाला. यात न समजण्यासारखं काय आहे?” ते विजयाच्या सुरात म्हणाले.
“बरोब्बर. आता माझा एक साधा प्रश्न आहे. जर तो अडाणी, गरीब मुलगा १५-२० प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी रूपये मिळवू शकतो, मग तुम्ही तर उच्चशिक्षित आहात. त्याच कार्यक्रमामधून एक कोटी रूपये मिळवणं तुम्हाला अजिबातच अवघड नाहीय. ” मी असं म्हटल्यावर त्यांचा नूरच पालटला. ते खूप अस्वस्थ झाले.
“ह्याच न्यायानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलानं त्यात भाग घेऊन दणादण एकेक कोटी रूपये कमवायला हवे होते ना? दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेल्या कुणालाही यात भाग घेऊन ही रक्कम जिंकता आली असती. पण तसं घडलं का?” मी आणखी एक पिल्लू सोडलं. ते गप्प झाले.
स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करणारी मुलं तर दिवसरात्र अभ्यास करत असतात. मग त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या शोज् मध्ये भाग घेणं आणि भरपूर पैसे कमावणं मुळीच अशक्य नाही. एक मिनिटही अभ्यास न केलेला एक मुलगा एक कोटी रूपये जिंकतो आणि वर्षानुवर्षं दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षा पास होता येत नाहीत, ही काय भानगड आहे?
“तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. त्या मुलानं कार्यक्रमासाठी कसलाही विशेष अभ्यास केला नव्हता. तयारी केली नव्हती. साधं चहावालं पोरगं होतं ते. रोजचा पेपरसुद्धा वाचत नसेल. तर मग जनरल नाॅलेज च्या पुस्तकांचा तर संबंधच येत नाही. ” मी म्हटलं.
“हो ना. पण अशा परिस्थितीतही तो करोडपती झालाच ना?” ते.
“इथंच तर तुम्ही चुकताय. त्याला जे जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न सुशिक्षितांच्या दृष्टीने कठीण होते. पण, तो अशिक्षित मुलगा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कारण, त्यातले प्रश्न त्याच्या रोजच्या जगण्यावागण्याशी निगडीतच होते. त्या प्रत्येक प्रश्नाशी त्याची एकेक आठवण जोडली गेली होती. केवळ तेवढ्याच बळावर तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कोणताही विशेष अभ्यास न करता! ” मी म्हटलं.
“मी हा विचारच केला नव्हता! ” ते आश्चर्यानं म्हणाले.
“तेच मी म्हणतोय. गरीब अडाणी माणूस केवळ अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं काय देतो आणि चक्क करोडपती काय होतो! यात कष्टांचा किंवा अभ्यासाचा संबंधच कुठं आला? म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच होता ना?” मी विचारलं.
“हा जुगारच म्हटला पाहिजे. ” त्यांचं उत्तर.
“बिनअभ्यासाचे कुणी एक कोटी रूपये का देईल का?” माझा सरळ प्रश्न.
“खरं आहे. ” ते.
“हेच माझं म्हणणं आहे. आपण नुसत्या दिसण्यावर जाऊ नये. खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. खातरजमा केली पाहिजे. आपण यातलं काहीच न करता मोठी जोखीम पत्करतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ”
“मग आता काय करावं?” ते.
“माश्यानं पाण्याबाहेर सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्याला लोक मूर्ख म्हणतात. कारण, काल्पनिक भराऱ्या मारून करिअर होत नाही. त्याला वास्तविकतेचा आधार असलाच पाहिजे. तुम्ही मुलांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करणार आणि नको त्या रेसमध्ये त्यांना पळवणार, हे खरोखरच आवश्यक आहे का? प्रत्येक स्लमडाॅग हा मिलेनिअर होऊ शकत नाही आणि प्रत्येक मिलेनिअर हा स्लमडाॅगच असतो असाही नियम नाही. अपवादांनाच सिद्धांत समजण्याची चूक आपण कधीही करू नये. ” मी.
पालक आणि मुलं ‘मला नेमकं काय जमेल?’ याहीपेक्षा ‘मला काय जमू शकेल?’ याचाच विचार अधिक करतात. म्हणूनच, ज्या गोष्टींचा भरवसा नाही आणि ज्यांच्याविषयी धड माहितीही नाही, असेच निर्णय मोठ्या आशेने आणि धाडसाने घेतले जातात. खरं तर अशी विचित्र रिस्क आपण कधीच घेत नाही. पण शिक्षण आणि करिअर निवडीमध्ये मात्र ती घेतली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आपण आपल्या सोयीनं नेमके अपवादच शोधतो आणि त्यांनाच सिद्धांत समजण्याची चूक करतो. ही फार मोठी चूक आहे.
आपण आणि आपल्या मुलांनी फॅन्टसीमध्ये जगणं सोडायला हवं. निदान करिअरच्या बाबतीत तरी..!
© श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈