मराठी साहित्य – विविधा ☆ “गंगूताई हनगल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गंगूताई हनगल…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(पाच मार्च- जन्म दिनानिमित्त)

श्रीमंती म्हणजे नेमकं कायं ह्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या त-हेने देऊ शकतील.मला विचारलं तर मी म्हणेन आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्यक्ती म्हणजे आपली श्रीमंती.आणि म्हणूनच आपला भारत देश हा मला वाटतं ह्या अर्थाने एक खूप जास्त श्रीमंत राष्ट्र असावं. 

ह्या अनुभवी,जेष्ठ मंडळींबद्दल तर आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर हा असतोच. म्हातारं वयानं असणं आणि म्हातारपणं येणं ह्या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत हे ह्या निमीत्ताने मला नव्यानेच उमगलं.म्हातारपण येण्यात खरतरं वयाचा संबंध नसून त्या मनोवृत्तीचाच खरा संबंध असतो हे अगदी मनोमन पटलं.कित्येक वयानं वयस्कं झालेल्या लोकांमधील तरुणाईला सुद्धा लाजवेल अशी कामाची आवड,चपळता,हौस, सकात्मकता, एनर्जी बघायला मिळते तर कित्येक तरुण व्यक्तींमध्येही कित्येकदा कमालीची विरक्ती,आळस,कामाची नावड,नकारात्मकता, औदासिन्य बघायला मिळतं.अशावेळी खरचं कळतच नाही म्हातारपणं हे कोणत्या मापदंडाने मोजावं.ही म्हातारपणातील तरुणाई आणि तरुणाईतील म्हातारपणं बघितले की चटकनं ती चवनप्राश वाली जाहिरात आठवते, “सोला साल के बुढ्ढे ओर सौ सालके जवान”वाली जाहिरात.

5 मार्च.आज अशाच एका अगदी कापसासारख्या म्हाता-या होऊन गेलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाई टिकवून ठेवणा-या व्यक्तीची जयंती. ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील असून हे क्षेत्र प्रिय असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ह्या दैवतच.ह्या व्यक्ती म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका गंगूताई हनगळ.

ह्यांचा जन्म 5 मार्च 1913 ला धारवाड येथे झाला. संगीताचे प्राथमिक धडे ह्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच्या आईकडून घेण्यास सुरवात केली आणि वयाच्या अकराव्या वर्षी 1924 साली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी,नेहरुजी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनीदेवी नायडू ह्यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गाऊन वाहवा मिळविली. काही काळ त्या कथ्थक नृत्य शिकल्या.मग 1938 पासून सवाई गंधर्व म्हणजेच रामचंद्र कुंदगोळकरांकडे किराणा घराण्याची गायकी पंधरा वर्षे साधना करून प्राप्त केली. त्यांना भिमसेनजी जोशी ह्यांचीही संगत लाभली.

सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह हुबळी येथील वकील व्यावसायिक गुरुराज कौलगी ह्यांच्याशी झाला. कौलगींना संगीताची जात्याचं खूप आवड असल्याने ग़गूताईंची संगीतसाधना ही शेवटपर्यंत टिकली,जोपासल्या गेली. त्यांचे संगीतसाधनेतील कारकीर्द आणि लोकप्रियतेचे टप्पे बघितले की खरचं अचंबीत व्हायला होतं. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात 1931मध्ये

त्यांची एच.एम.व्ही.कडून गाण्याची पहिली तबकडी 1932 मध्ये तर आकाशवाणी वर पहिला कार्यक्रम 1933 मध्ये झाला.

कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती कितीही आणि कोणतेही अडथळे पार करु शकते.फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा गंगूताई आपल्या संगीतसाधनेच्या जोरावर धारवाड विद्यापीठाच्या मानद संगीत प्राध्यापक झाल्यात.त्यांनी परदेशात अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत.संगीताच्या कार्यक्रमांमुळे त्या अमेरिका, इंग्लंड, कँनडा, नेपाळ,नेदरलँड, पाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स व बांगलादेश इ.ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी गेल्या.

भारतसरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले.त्यांना पन्नास पेक्षाही जास्त मानाचे पुरस्कार मिळालेत.त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी शाळा,महाविद्यालयातून सुमारे 200 जाहीर कार्यक्रम केलेत.त्यांना गानरत्न, गानसरस्वती,रागरागेश्वरी ह्या सारख्या उपाध्या मिळाल्यात.हुबळीमधील त्यांचे “गंगालहरी” नावाचे घर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.हुबळीला सुमारे पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल उभारण्यात आले.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगूताईंनी त्यांचा तब्बल दीड तास चाललेला शेवटचा जाहीर गाण्याचा कार्यक्रम वयाच्या अवघ्या 89 व्या वर्षी दणदणीत पार पाडला. वयाच्या 96 व्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचे गायन केले.त्या दिवशी त्या दहा मिनीटे सलग गायल्या.खरचं आहे नं हा तरुणाईला लाजवणारा उत्साह, मेहनत, साधना अशा ह्या थोर,अख्ख आयुष्य संगीतसाधनेला वाहून घेणाऱ्या गंगूताई हनगळांनी 21 जुलै 2009 रोजी अखेरचा श्वास घेतला.खरचं अशा थोर विभुती बघितल्या की नतमस्तक व्हायला होतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

?  विविधा ?

☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

(आजची स्त्री कशी असावी ? याबद्दल सावरकरांच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थान पोस्टला लिहिलेला लेख !)

….विनायकाची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली, आईनंतर आईच्याच मायेने येसूवाहिनीने त्यांच्यावर प्रेम केलं, सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढलं, आणि देशासाठी लढलं सुद्धा ! विनायकराव परदेशात असतांना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन्ही स्त्रिया उघड्यावर पडल्या…अशा अवस्थेत आपल्या परमप्रिय वहिनीला लिहिलेल्या पत्रात विनायकराव म्हणतात,

तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती

रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच

“सांत्वन” नावाचं हे सावरकरी काव्य ! इतकी उलथापालथ घडूनही, आभालाहून मोठं संकट येऊनही आपली वहिनी, आपली बायको, खंबीरपणे सगळ्यावर मात करेल हा त्या स्त्रीवर दाखवलेला विश्वास, विनायकरावांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असला तर स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: जबाबदारीने संकटाशी सामना करावा असेच तात्या सुचवतात, होय ना !

विनायक जिथे वाढला तो भाग आणि तो काळ एका संकुचित, रूढीग्रस्त मानसिकतेत जगणारा. रांधण्यात आणि वाढण्यात जन्म घालवावा बायकांनी, बाकी रमूच नये कशात अशीच तेंव्हाची रीत. पण चूल आणि मुल वाट्याला येण्याआधीच ज्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण दुर्दैवाने ओढून नेले अशांचे अभाग्यांचे काय ? अशांच्या भाळी लिहिल्या होत्या अबोल यातना फक्त ! या निष्पाप स्त्रियांच्या वेदनांना शब्दरूप दिलय विनायकाने. बालविधवांचे दु;खस्थिती कथन हे विनयकाचे काव्य अशा अनेक मूक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. “ही विवाहव्यवस्था आहे ही वैधव्यव्यवस्था” असा करडा सवाल विनायकराव करतात तो उगाच नाही, स्त्रीने सती जाणे हे धर्माला मान्य नाहीच शिवाय ते माणुसकीलाही लाज आणणारे आहे असं विनायकराव सप्रमाण पटवून देतात हे विशेष !

गुलामगिरी मान्यच नव्हती तात्यांना ! माझी भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये, तिची गुलामगिरी संपावी तशीच आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी, मुक्तपणे तिने करावा संचार या मताचे होते तात्या ! “राज्याची सूत्र हातीघे तो तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जीच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे !’’ असं म्हणत सहजीवनाचा केवढा आदर्श सांगितलाय तात्यांनी !

“स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नितीमत्ता पक्षपाती नि टाकाऊ आहे” हे तात्यांचे वाक्य वाचले की वाटते हा माणूस वैचारिक दृष्ट्‍या सगळ्या समकालीन नेत्यांच्या किती पुढे गेला असेल, किती प्रगल्भ असेल.

हा माणूस सौंदर्याचा उपासक होता. जे जे उत्तम उदात्त उन्नत्त महन्मधुर त्याचा ध्यास घेतलेला होता. जीवनात कुठल्याही बाबतीत कुरूपता याला नकोच होती. आपल्या दूरस्थ वहिनी आणि पत्नीला “नवकुसुमयुता” असं लोभसपणाने म्हणणारे विनायकराव समस्त स्त्रीवर्गाला  सांगतात…“…लावण्यवती कुमारीनो, जननिंनो, तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीला, तुमच्या सौंदर्याला आपल्या पूर्वपुण्याईचं वरदान माना आणि ते सौंदर्य जपा ! हल्लीच्या आधुनिक काळात, सौंदर्य प्रसाधने वापरा, खुलून दिसा !” …विनायकराव हा विचार अशा काळात सांगत होते जिथे त्यांचे हे शब्द ऐकून बायका गालातल्या गालात, खुदकन् हसून लाजेने चूर होण्याचीच शक्यताच जास्त होती, पण आजच्या बायका तात्यांचा हा सल्ला खुबीने राखताहेत खऱ्या…!

एके ठिकाणी मॅझिनीच्या विचाराचा संदर्भ देतांना विनायकराव म्हणालेत, “पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाहीत.” हा विचार देऊन आताशा पन्नास वर्ष उलटूनही गेली असावीत. तात्यांच्या कल्पनेतली शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होतांना फार वर्ष लागलेले नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरलेत. आज घराघरात, आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई मोठ्या अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, वादळ पेलते आहे, आणि लढते आहे.

तिच्या प्रत्येक भरारीसोबत एक नवं आव्हान तिच्यासमोर उभ आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अश्या कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुधा नाहीत. या मुक्या वेदना समोर येतील तेंव्हा काय होईल ? कोणते नवे प्रश्न उभे रहातील ? यापैकी अगदी सगळ्याच नाही पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या “सावरकरी” विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे !

© श्री पार्थ बावसकर

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वांच्या आवडीचा, खमंग,चटकदार आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी मानाने विराजमान झालेला  पदार्थ म्हणजे ‘थालीपीठ’. इतकचं काय तर हाँटेल,टपरी,अगदी पंचतारांकित हाँटेल मध्ये सुध्दा हे थालीपीठ स्पेशल डिश म्हणून आपल्यासमोर येते.नुसत नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ.थालीपीठ कुणाला आवडत नाही असा माणूसच विरळा.अगदी राजेशाही थाटापासून ते झोपडीपर्यंत आणि आयत्या वेळी पटकन करुन खाण्याजोगा हा पदार्थ. संध्याकाळच्या वेळी संपुर्ण स्वैपाकाचा कंटाळा आला तर ” चला,चार थालीपीठ लावते ” असे म्हणून वेळ मारुन नेणारा ग्रुहिणींचा पक्का दोस्त.

पण तरीसुध्दा ही इतकीच महती नाही बरं का या थालीपिठाची कारण साग्रसंगीत, व्यवस्थित डावं,उजवं सोबत घेऊन पानात येणारा हा खमंग, चविष्ट पदार्थ आहे.त्यामुळेच तो सर्वांच्या आवडीचा आहे.

मंडळी,अहो पुराणातही या थालीपीठाचा उल्लेख आढळतो बरं का.यमुनेच्या तीरावर क्रुष्णाच्या सवंगड्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करुन केलेल्या काल्यामध्ये या थालीपीठाचाही समावेश होता.क्रुष्णासह सारे सवंगडी याचा आस्वाद घेत होते तेव्हा क्रुष्णाच्या पानात आलेला पेंद्याच्या घरचा थालीपीठाचा तुकडा अगदी आवडीने,चवीने क्रुष्णाने खाल्ला होता म्हणे.

पु. ल. देशपांडे यांच्या ‘ असा मी असामी ‘ या पुस्तकात पु. ल.म्हणतात  ” संसारातील रोजच्या कटकटींना कंटाळून कधी कधी संसार सोडून जावेसे वाटते पण त्याच दिवशी सौ. ने कांद्याचे थालीपीठ केलेले असते. “पहा मंडळी, एका मोडणाऱ्या संसाराला वाचवायचं काम हे थालीपीठ करतं अस म्हणता येईल. तर, ‘जाऊबाई जोरात’ या नाटकामध्ये महिलांच्या बसमध्ये दरोडेखोर येतात आणि सामानाची झडती घेताना त्याच्या हाती एक डबा लागतो तेव्हा त्यातील पदार्थाच्या वासाने तो मोहून जातो आणि यात काय आहे असे एका महिलेला विचारतो. तेव्हा त्यात थालीपीठ आहे असे सांगितल्यावर म्हणजे काय असे तो विचारतो त्यावेळी त्या थालीपीठाच्या रेसिपीचे वर्णन त्या नायिकेने (निर्मिती सावंत) इतके अफलातून केले आहे कि बस्.

म्हणजे पुराणापासून चालत आलेल हा पदार्थ आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवून आहे.

आता हे थालीपीठ बनते कसे? तर ज्वारी,बाजरी,गहू,चणाडाळ, तांदूळ या धान्याच्या एकत्रीकरण केलेल्या पीठापासून.अगदी खास पध्दतीने करायचे असेल तर ही धान्ये भाजून घेऊन त्याचे पीठ करुन त्यात कांदा,मिरची,कोथिंबीर, हळद,हिंग,तीळ,जीरे,मीठ असे सर्व साहित्य घालून मळून पोळपाटावर पातळ फडक्यावर भाकरीसारखे थापून तव्यावर तेल सोडून खमंगपणे दोन्ही बाजू भाजून घेतल्या जातात.अशा पध्दतीने थालीपीठ बनवताना आपल्या आवडीनुसार यात काही भाज्यासुध्दा घातल्या जातात.

घरी, प्रवासात, डबापार्टी, भिशीपार्टी, डोहाळजेवण असा कुठेही चालणारा आणि चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पंजाबी,चायनीज,गुजराती,बंगाली, इटालियन अशा विविध पदार्थांची कितीही रेलचेल असली तरी लोणी,दही,लसणाची चटणी,लोणचं असं सार सोबत घेऊन ताटात येणारे हे थालीपीठ म्हणजे सर्वांची आवडती महाराष्ट्रीयन परिपुर्ण थाळीच. महाराष्ट्रात  श्रावणात,नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.ग्रामीण भागात याला ‘ धपाटे ‘असेही म्हणतात.म्हणजे तसं तर  धपाटे हा थालीपीठाचा जुळा भाऊ म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे सणावारीसुध्दा थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.अगदी नवरात्रीच्या नवू दिवसांच्या उपवासातही बदल म्हणून शाबूदाणा,वरी,बटाटा यापासून थालीपीठ बनविले जाते.

मंडळी,भारतीय खाद्यसंस्कृती अनेकविध पदार्थांनी परिपुर्ण तर आहेच पण या थालीपीठाचीसुध्दा चांगलीच महती आहे म्हणूनच अलिकडे गावागावातील प्रत्येक खाऊगल्लीमध्ये भेळ,आईस्क्रीम, पिझ्झा,बर्गरच्या जोडीला दही,खर्डा थालीपीठाच्याडिशने मानाचे स्थान मिळवले आहे.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

आपण भारतीय लोक उत्सव प्रेमी लोक. भारत संस्कृती प्रधान देश. कृषी प्रधान देश. आपल्या संस्कृतीत सणांना खूपच महत्त्व आहे. सर्व सण हे पर्यावरणावर आधारित असेच आहेत. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना. शेतकऱ्यांचा थोडा निवांतपणाचा काळ. सृष्टीमध्ये नवनवीन रंग घेऊन येणाऱ्या, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि थंडीला निरोप असा हा सण  म्हणजे होळी.

हा सण फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जातो. काही ठिकाणी तो दोन दिवस , तीन दिवस तसेच पाच दिवसही साजरा करतात. पौर्णिमेच्या दिवशी ‘ होळी ‘ दुसरे दिवशी धुळवड, आणि पाचवे दिवशी रंगपंचमी असा साजरा करण्याची प्रथा आहे. ‘होलीका ‘  या नावावरून ‘,होळी’ हे नाव या सणाला पडले आहे .आपल्या देशाच्या उत्तर भागात ‘ होरी ‘ किंवा  ‘दोलायात्रा ‘असेही म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात कोकणात ‘ शिमगा ‘ ‘हुताशनी ‘ ‘होलिका दहन ‘ ‘ फाल्गुनोत्सव ‘ वसंतोत्सव  तसेच दक्षिणेत काम दहन असेही म्हणतात.

पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते .त्यानंतर त्यांनी रंग रूपाने पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हाही या उत्सवा मागील हेतू आहे. आणखीही अशी कथा सांगितली जाते की ,लहान मुलांना  पीडा देणाऱ्या ‘ होलिका ‘, किंवा  ‘होलाका ‘   ‘ढुंढा’, ‘ पूतना,’ यासारख्या राक्षसींच्या प्रतिकांचे होळी पेटवून दहन केले जाते.

त्याचबरोबर आणखीही अशी कथा सांगतात की ,हिरण्यकश्यपू या अहंकारी राजाचा प्रल्हाद हा मुलगा नारायणाचा भक्त होता. राजाला नारायणाचे नाव घेतलेले पसंत नव्हते. अनेक प्रकारे तो प्रल्हादाला घाबरवत होता. जेणेकरून त्याने नारायणाची भक्ती सोडून द्यावी .राजाने आपली बहीण ‘होलीका ‘ हिच्याकरवी एक योजना आखली. ‘ होलीकेला’ अग्नीवर विजय मिळविण्याचे वरदान मिळाले होते .त्यामुळे होलीकेला राजाने सांगितले की, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बैस . त्याप्रमाणे ती  प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात लीन झाला होता .इतक्यात होलिका जळायला लागली. आकाशवाणी झाली . तिला वरदानात असं सांगितलं होतं की, तिच्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर , ती स्वतः जळून जाईल. त्याप्रमाणे ती स्वतः भस्मसात झाली .आणि प्रल्हादाला काहीच झालं नाही .सृष्टीचा दृष्टांवर होणाऱ्या  विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी .

होळी प्रज्वलित करताना, रचनेच्या मध्यभागी खोड उभे केले जाते . त्याला ‘माड ‘ असे म्हणतात. .त्याच्याभोवती इतर लाकडे रचली जातात. होळी प्रज्वलित करताना कर्त्याने शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. “सहकुटुंबस्य मम  ढुंढा राक्षसी प्रित्यर्थं  तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये” असा मंत्र म्हणून, समिधा वाहून होळी पेटवितात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला ‘पूर्वा फाल्गुनी ‘ नक्षत्र येते. त्या नक्षत्राची ‘भग ‘ ही देवता आहे. महाराष्ट्रात भगाच्या नावाने बोंबा मारत होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. यामागचे मानसशास्त्रीय कारणही आहे .मनात जे किल्मिष, द्वेष, राग ,चीड ,असे शड्ररिपू  बाहेर पडून जावेत. मन स्वच्छ  हॅलो अँड एमटी असे व्हावे . मनातले अमंगल अशुभ होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे. आणि चांगल्या शुभ, मंगल अशा गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा आहे. होळी शांत झाली की दूध आणि तूप शिंपडून शांत केली जाते.

उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात .इंदूर शहरात वेगळी पद्धत आणि एक  शान असते .या दिवशी शहरातील सर्व लोक राजवाड्याजवळ एकत्र येऊन होळी साजरी करतात. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी, ब्रजप्रदेशातील श्रीकृष्णाच्या मथुरा , वृंदावन ,बरसाना ,नंदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम करून करमणूक  केली जाते .इंग्रजीत या सणाला ” होली फेस्टिवल ऑफ कलर्स ” असे म्हणतात. वजीराला होळी दिवशी पुरुष– महिला  एकमेकांना रंग लावतात. आणि महिला पुरुषांना काठीने मारतात . ही प्रथा पाहण्यासाठी लोक मुद्दाम  व्रजयान या ठिकाणी जातात. आपण टीव्हीवरही प्रथा पाहतो.पहाताना गंमत वाटते.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘ ‘धुळवड’, असे म्हटले जाते. या दिवशी, आदल्या दिवशीच्या होळीच्या रक्षेची म्हणजे धुळीची पूजा करून ,रक्षेची प्रार्थना करतात. ” वंदितासि  सुरेंद्रेण ब्रम्हणा शंगकरेणच ।

अतस्तं  पाहिनो देवी भूतो भूतिप्रदा भव ।। हे देवी धुली, तू ब्रम्हा, विष्णू ,महेशानी  वंदित आहेस. म्हणून तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो. आणि आमचे रक्षण कर. असे म्हणून ती रक्षा, शेण, आणि चिखल असे पदार्थ अंगाला लावून नृत्य गायनही करतात. आयुर्वेदात मडथेरपी अशाच पद्धतीची असावी.

फाल्गुन वध पंचमीचा दिवस म्हणजे ” रंगपंचमी “.महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी ग्रुप करून, एकमेकांच्या घरी जाऊन, रंग आणि गुलाल लावण्याची किंवा उडवण्याची प्रथा आहे.  ” “बुरा मत मानो,  होली है।असं म्हणतात. पूर्वीच्या काळी केशराचे आणि नैसर्गिक रंग उडवून आनंद लुटत असत .रासायनिक रंग उडवणे म्हणजे प्रकृती बिघडवून घेणे होय.

आता होळी साजरी करत असताना, आपणही मनातील किल्मिष, एकमेकांबद्दल वाटणारा राग सोडून देऊन नवीन वर्ष रंगा रंगात  न्हाऊन जाऊन एकमेकात आदर आणि प्रेम प्रस्थापित करूया. होळीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ या.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 59 – सारा चॅपमन बुल (१८५० -१९११) ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 59 – सारा चॅपमन बुल (१८५० -१९११) ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

सप्टेंबर महिना स्वामी विवेकानंद यांनी बोस्टन मध्ये घालवला. थोडी फार व्याख्याने झाली पण मोकळा वेळ बराच मिळाल्याने आता शांतता मिळते तर काहीतरी धर्माविषयक लिहावे ,अनेक भेटी, अनेक चर्चा, अनेक संवाद झालेले होते. तेंव्हा काही गोष्टी अजूनच स्पष्ट झाल्याने, धर्म या बद्दल मोकळेपणाने आपले विचार कागदावर उतरवावेत असे वाटून, ते मिसेस आर्थर स्मिथ यांना पत्र लिहून म्हणतात की, “ आपल्याला शांतता हवी आहे आणि तशी व्यवस्था मिसेस ग्युएर्न्सी आनंदाने करतील” . नेमके हेच सारा बुल यांच्या कानावर आले आणि लगेच त्यांनी विवेकानंदांना पत्र लिहून मी तुमची सारी व्यवस्था करेन तुम्ही केंब्रिज ला  यावे असे कळवले. त्याप्रमाणे विवेकानंद ऑक्टोबर मध्ये बुल यांच्याकडे गेले.तशी सारा ची विवेकानंद यांच्याबरोबर १८९४ मध्ये भेट झाली होती, तेंव्हाच ती विवेकानंद यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे प्रभावित झाली होती.     

  नॉर्वेमधील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक/ संगीतकार ओले बुल यांची पत्नी .म्हणजे सारा बुल . लग्ना आधीची मिस सारा थॉर्प. यांची कहाणी फार वेगळी आहे.

वयाच्या सतराव्या वर्षीच ओली बुल यांच्या व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम ऐकून त्यांच्यावर लुब्ध होऊन यांच्याशीच लग्न करायचे ठरवले.सारा वीस वर्षांची, तर बुल साठ वर्षांचे. एव्हढे मोठे अंतर . वडिलांनी विरोध केला पण आईने संमती दिली आणि १८६८ मध्ये लग्न झाले. सारा, ओले बरोबर कार्यक्रमाच्या दौर्‍यावर अमेरिका आणि युरोपला जात असे. त्यांच्या संगीत मैफिलीत ती पियानोवादक म्हणून साथ करे.   दोन वर्षानी मुलगी ओलियाचा जन्म झाला. आणि सारा च्या आईला अनुभवायला आले की हा अव्यवहारी नवरा साराला योग्य नाही/ चुकीची निवड झाली आहे, म्हणून तिने मुलीसह सारा ला परत आपल्या घरी आणले. पण सारा चे बुल यांच्यावरील प्रेम जिंकले आणि परत आईवडिलांना न जुमानता ती मुलीला घेऊन बुल यांच्याकडे नॉर्वेला येऊन राहिली. आता मात्र तिने स्वतात बदल केला होता. त्याचे व्यवहार सुरळीत करण्या करिता तिने आपल्या हातात सर्व सूत्रे घेतली. आणि जीवनाला एक शिस्त आणली . त्याच्या कार्यक्रमांची आखणी करणे, प्रोग्राम ठरवणं, प्रवास नियोजन, आर्थिक व्यवहार सर्व काही स्वत: हिमतीने पाहू लागली. तिच्या कुशलते मुळे या कलाकाराच्या जीवनाच्या उत्तरार्धात शांती आणि स्थैर्य आले.

कारण त्या आधी लोक ओली बुल यांना व्यवहारात लुबाडत असत. त्यांना अमाप पैसा मिळत होता. प्रसिद्धी होती. म्हणून सारा कार्यक्रमाचे बारीक बारीक तपशील सुद्धा नियंत्रित करू लागली आणि व्यवहाराचे अनुभव घेत यातूनच समृद्ध होत गेली. पण हे सगळं होतं ते तिच्या ओली बुल यांच्या प्रेमावरील अत्यंत निष्ठेमुळे . अशा अल्लड लहान वयात सुद्धा ती विचाराने आणि अनुभवाने परिपक्व झाली. तत्वज्ञानाचा लौकीकार्थाने अभ्यास नसला तरी जीवनाचे तत्वज्ञान शिकली. आणि जीवनाकडे बघण्याचा तीचा एक दृष्टीकोण तयार झाला. विचार पक्के झाले. १८८० मध्ये ओली बुल यांच्या मृत्यूमुळे एकतीस वर्षांची सारा केंब्रिजला आपल्या आई वडिलांकडे परत आली. लग्न करताना असलेलं बुल यांच्यावरील प्रेम आणि त्या वयातली विलासी वृत्ती आता संपून विचारात गांभीर्य आले. सारा ने ओले च्या मृत्यूनंतर लगेचच ‘ओले बुल एक संस्मरण’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. बोलता बोलता चौदा वर्षे झाली होती बुल यांना जाऊन. पुढे एव्हढं मोठ्ठं आयुष्य पडलं होतं. पण बुल यांच्यावरील प्रेम तसच कायम होतं. आपल्या घरात सारा यांनी कलावंत बुल यांची अनेक चित्रे ठिकठिकाणी लावली होती. आपले बुल वरील प्रेम नंतरही जपले होते.

 कुठल्याही विषयावर चर्चा आणि विचार याची ओढ सारा ला नेहमीच असायची. पुढे पुढे ती अध्यात्मिकतेकडे ओढली गेली. तिचे घर एक वैचारिक घडामोडींचे केंद्रच बनले होते. त्यामुळे प्रसिद्ध अशा बुद्धिजीवींचे तिच्याकडे सतत येणेजाणे असायचे. सारा ने आता एक केंब्रिज कॉन्फरन्स आपल्या घरात चालू केली होती. त्यात विल्यम जेम्स,थॉमस वेंटवर्थ, हिगिन्सन, जेन अॅडम्स, जोशिया रॉईस, अशा नामवंत व्यक्ती सहभागी होत. हे सर्व जण  तत्वज्ञानाचे  एक स्वतंत्र दृष्टीकोण असणारे विचारवंत, गाजलेले प्राध्यापक होते. हार्वर्ड विद्यापीठातले असे अनेक विचारवंत प्राध्यापक बुल यांच्याकडे विवेकानंदांच्या व्याख्यानला व वर्गाला येत. विषय असे वेदान्त. त्यामुळे विवेकानंद यांचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला. इतका की पुढे याच विद्यापीठात विवेकानंद यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही अमेरिकेच्या विश्वातली मोठ्या सन्मानची बाब होती. आणि एव्हढच काय पुढे जाऊन तर हार्वर्ड विद्यापीठातील पौर्वात्य तत्वज्ञानाच्या विभागाचे अध्यासनपद स्वीकारण्याची विनंती विवेकानंद यांना केली गेली होती, पण ती त्यांनी नाकारली. खरच अमेरिकेसारख्या देशात एका भारतीय नागरिकाला ही संधी म्हणजे अभिमानाचीच गोष्ट होती.   

केंब्रिज हे गजबलेल्या बोस्टन शहरातले एक शांत उपनगर होते. वातावरण शांत, गर्दी नाही. हार्वर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज यांच्यामधून वाहणारी शांत चार्ल्स नदी. हे निसर्गरम्य शांत सुंदर वातावरण असलेलं ठिकाण विवेकानंदांना न आवडेल तरच नवल.

सारा ने विवेकानंद हे आध्यात्मिक धारणा असलेले एक महापुरुष आहेत हे केंव्हाच ओळखले होते. त्यांच्या जीवनात आणि कार्यात आपण कशी मदत करू शकू याचा सारासार विचार करून ठेवला होता. ही मदत  ती कुठेही याची वाच्यता न करता आपल्या कृतीतून  सहजतेने, आदरपूर्वक आणि कौशल्याने वेळोवेळी करत असे. सारा ने विवेकानंदांना अतिथि म्हणून बोलावले .तिच पत्र व्यवहार विवेकानंद यांच्या बरोबर होत होता त्यात तिने एकदा म्हंटले होते की माझे पती आज हयात असते तर त्यांनी तुम्हाला आपला पुत्र मानला असता.तर माझ्या या घराचा पण आपल्या महान कार्यासाठी केंव्हाही उपयोग करून घ्यावा, तुम्ही आणि तुमचे देशबांधव हे आमचेही बांधव आहेत ,यांच्यासाठी मदत म्हणून मी पैसे देईन त्याचा उपयोग करावा. आणि हे वचन त्यांनी पुढे निभावलेले दिसते.विवेकानंद त्यांचे भारतीय पुत्र आणि गुरु झाले.    

अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांचा हा मुक्काम आठवडा भर होता. जसे सारा ने विवेकानंद यांचे श्रेष्ठत्व सुरुवातीलाच ओळखले होते तसेच विवेकानंद यांनीही या भेटीत, सारा यांचे व्यक्तिमत्व ओळखले होते. त्यांचा मोठेपणा ओळखला होता.आपल्याकडे बघण्याचा सारा यांचा दृष्टीकोण  त्यांना कळला आणि त्यांनीही सारा यांना आपली अमेरिकन माता या रूपात स्वीकार केला. ते त्यांना धीरा माता/शांत माता म्हणत . विवेकानंद सारा यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे नव्हते तरीही त्यांनी आदरपूर्वक  मातेच्या रूपात सारा यांना स्वीकारले होते ते त्यांच्या धीरोदात्त, समंजस आणि निर्मळ प्रेमा मुळेच.या पहिल्याच अतिथि भेटीत सारा यांनी पाचशे डॉलर भेट दिले आणि एक आदरपूर्वक पत्रही. त्यात लिहिले होते, “आपल्या वास्तव्याने आपल्या उच्च कार्यासाठी या घराचा उपयोग केल्याने माझी ही वास्तू पावन झाली आहे..” त्यांचा हा विश्वास आणि भाव पुढे विवेकानंद यांचे कार्य, वेदान्त वर्ग, पुढे बुल यांच्या घरात सुरू होण्यात उपयोगी ठरला.पुढे विवेकानंद यांचा पुढचा प्रवास वोशिंग्टन,बाल्टिमोर न्यूयॉर्क असा सुरू झाला. उपक्रमशील सारा यांनी डिसेंबर मध्ये केंब्रिज येथे २,३ आठवड्यांचा असा कार्यक्रम ठरवला. त्या व्याख्यानला त्यांनी संगीताची जोड दिली. एम्मा थर्स्बी यांना सारा यांनी पियानो ची साथ दिली. व्याख्यानला संगीतसाज ही कल्पना वातावरण निर्मितीला पोषक ठरली.  

सारा बुल यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने हेरले की, सार्वजनिक व्याख्यानांपेक्षा विवेकानंद यांचा आध्यात्मिक विचार नीट पोहोचायला हवा असेल तर ३०,४० जिज्ञासू च पुरेत. मोठ्या समुदायापुढे ठराविक व्याख्यानपेक्षा २,३ आठवड्याचा वर्ग घेतला तर विषय सलग पोहोचेल. कमी माणसां मुळे श्रोता आणि वक्ता यांच्यात चांगला संवाद होऊ शकेल आणि जिज्ञासूंना त्याचा उपयोग होईल. हे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले . सारा यांनी विवेकानंद यांसी जी काही भाषणे, व्याख्याने चर्चा झाल्या त्या सर्व , त्या  स्टेनेग्राफर कडून नोंद करून ठेवत.   

अभेदानंद, तुरीयानंद. सारदानंद, हे विवेकानंद यांचे गुरुबंधु अमेरिकेत आले ते सारा यांच्या आधारावरच.पुढे सारा यांनी भारत दौरा केला.वेदान्त सोसायटीच्या या कार्यासाठी मोठी आर्थिक मदत करत राहिल्या.त्यांच्या घरातच वेदांताचे वर्ग चालू झाले.शेवट पर्यन्त सारा काम करत राहिल्या.      श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या परिवरातीलच एक सदस्य झाल्या . कलकत्त्यामध्ये जिथे शारदा मातांसाठी बांधलेलं घर होतं, त्या घरात पुढे सारदानंद बसत तिथे शारदा मातांच्या फोटो बरोबर सारा बुल यांचाही फोटो लावलेला असे.  १९११ साली सारा बुल अर्थात विवेकानंद यांच्या अमेरिकन माता स्वर्गवासी झाल्या.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

पुणे विद्यापीठातल्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात मी रूजू झालो त्यावेळी विद्यापीठ कक्षेतल्या पाच जिल्ह्यांतल्या शेकडो महाविद्यालयांमधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम धडाक्यात चालू होता.कार्यकर्त्यांची शिबीरं,प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे इथपासून राष्ट्रीय, विभागीय चर्चासत्रं,कृतिसत्रं सतत होत होती. विविध स्तरावरच्या कार्यकर्त्यांची उठबस इथं नेहमीच असायची. विविध पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांचा इथं खच पडलेला असायचा. भितींवर अनेक तक्ते, पोस्टर्स आणि चित्रं असायची.  त्यात एक चित्र उठून दिसायचं. एक माणूस या विभागाची दिशा दाखवत असलेले हे चित्र होते. एअर इंडियाच्या महाराजाच्या  वेषात हा माणूस आदबीनं उभा होता. पण या माणसाला चेहरा नव्हता. त्या ठिकाणी प्रौढ शिक्षणाचं चिन्ह होतं-गोलात इंग्रजी वाय आकार. वायमध्ये  एक भरीव ठिपका. या चित्राचे मला नेहमी कौतुक आणि कुतूहलही वाटत असे. आयडिया भन्नाट होती. कुणाकडून तरी कळलं की, आपल्या विभागात एक चित्रकार होते  रामनाथ चव्हाण नावाचे. त्यांनी अशी बरीच चित्रं काढली होती.

चित्रकार रामनाथ चव्हाण  

केवळ रेखाटलेल्या चित्राला व्होकॅब्युलरी पिक्चर म्हणतात. त्यापेक्षा आशयघन कन्सेप्ट पिक्चर्सना प्रौढ शिक्षणात महत्वाचे मानले जाते.चव्हाणांची चित्रं कन्सेप्ट पिक्चर्स होती. चव्हाणांविषयी मी खूप ऐकून होतो.सर्वसामान्य नव्हे तर गरिब घरातून जिद्दीनं पुढं आलेल्या या युवकाला त्याच्या विचारांच्या माणसांची साथ इथं मिळाली.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

एखाद्या व्यक्तीबद्दल सहज बोलतांना आपण कधीकधी म्हणतो, तो चांगला आहे, पण…….. या पण नंतर सगळे वाईटच असते असे नाही. पण त्यामुळे संमीश्र भावना मनात येतात.

एखाद्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दांबद्दल अशाच भावना मनात येतात का?……..

कसं काय ते सांगता येणार नाही, पण क या अक्षरा पासून सुरू होणाऱ्या शब्दांसाठी  मनात अशा संमीश्र भावना येतात. हा माझा बालीशपणा असेल. (हो बालीशपणा, कारण सगळे मनातल्या भावना शब्दात उतरवतात, माझ्या मनात मात्र शब्दांमुळे संमीश्र भावना येतात.) यांचे कारण त्यात प्रश्न, निषेध, राग,  तीरकसपणा, वाईटपणा, नाराजी बरोबरच चांगलेपणा देखील बरोबरीने जाणवतो.         

आपल्याला पडणारे किंवा विचारले गेलेले बरेचसे प्रश्न हे क पासूनच सुरु होतात. आणि त्याच बाराखडीतले (कुटुंबातील) असतात असे वाटले. जसे…..

क – कधी? कसे? कशाला? कशासाठी? कळेल का?

का – का? काय? कारण काय? काय करशील?

कि की – किंमत किती? किंमत आहे का? किती वेळा? किती?

कु कू – कुठे?

के – केव्हा?

को – कोण? कोणी? कोणाला? कोण आहे? कोणासाठी? कोणी सांगितले? कोण म्हणतो? कोण समजतो?

असे बरेच प्रश्न क पासूनच सुरु होतात. इतकेच नाही तर वाईट अर्थाने, किंवा नाराजीने वापरले जाणारे क पासून सुरू होणारे बरेच शब्द आढळतील.

काळा पैसा, काळा धंदा, कट कारस्थान, कारावास, करणी, कुरापत, कुख्यात, कावेबाज, कळलाव्या.

एखाद्या गोष्टीकडे मुद्दाम लक्ष दिले नाही तरी कानाडोळा केला असे म्हणतात.

“स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातंल कुसळ दिसतं.” हा कुसळ देखील चांगल्या अर्थाने वापरलेला नसतो.

निरर्थक गप्पा मारल्या तरी म्हणतात “बसले असतील कुटाळक्या करत.”

नको त्या वेळी कोणी आलं तरी म्हणतो “कोण कडमडलं आता.”

कोणाचा संसार मोडू नये असे वाटते. पण तसे झाले तरी काडीमोड झाला असे म्हणतात.

अती शुल्लक गोष्टीला कवडीमोल म्हणतो. तर अबोला धरल्यास देखील कट्टी झाली असे म्हणतो.

नाराजीच्या अथवा विरोधाच्या सुरात हळूच बोललं तरी कुरकुर नकोय, कटकट नकोय असे म्हणतात.

त्रासदायक वाटणारी, खोड्या, मस्ती, दंगा करणारी लहान मुले कौरवसेना म्हणून ओळखली जाते. तर माणूस कंसमामा म्हणून.

अपरिपक्व असेल तर कच्चा आहे असे म्हणतो. पण ताजा आणि हवासा असतो तो कोवळा.

बरं वाटतं नसले, चांगले दिसत नसले तरी म्हणतो कसंतरी होतय, किंवा कसंतरीच दिसतंय. हिंमत हरली तरी कच खाल्ली असे म्हणतो. घर झाडण्यापूर्वी पायाला जाणवते ती कचकच. आणि टाकायचा असतो तो कचरा. आणि टाकतो (कचरा) कुंडीत.

वाइटाशी वाइट वागून काम साध्य करायचे असेल तर, “काट्याने काटा काढायचा.” (सगळेच शब्द क पासून सुरू होणारे.)

निषेध नोंदवण्यासाठी रंग सुध्दा काळा.  वाइट घटना घडली तरी काळा दिवस, काळी रात्र असे म्हणतो.

अर्जुनाला पडलेले अनेक प्रश्न आणि झालेले युद्ध ते ठिकाण देखील कुरुक्षेत्रच. पण उत्तर देणारे मात्र कृष्ण.

पण सगळेच क पासून सुरू होणारे शब्द प्रश्न निर्माण करणारे आणि नकारात्मकच आहेत असे नाही.

सकाळी उठतानांच “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. कर मुले……….” म्हणतात.

नमस्कार करतांना कर जोडावे लागतात.  देवालयाचा कळस पवित्र भावना जागवतो. धार्मिक विधीसाठी कद नेसावा लागतो. पहाटे होणारी आरती काकड आरती असते. तसेच किर्तन देखील असते. काशी, केदारनाथ, करवीर (कोल्हापूर) पवित्र स्थान. तर काश्मीर, कोकण, केरळ निसर्गाने नटलेले. कन्याकुमारीचे आकर्षण वेगळेच.

वस्तू आणि स्थळ नाहीत. तर माणसांमध्ये देखील वेगवेगळ्या स्वभावाच्या माता  कौशल्या, कैकयी, कु़ंती पण सुरुवात क पासून. दानशूर पणाचे उदाहरण म्हणजे कर्ण.  तर झोपाळू माणूस म्हणजे कुंभकर्ण.

प्राणी पक्षी यात स्वामीनीष्ठ असतो तो कुत्रा, तर लबाड, धुर्त कोल्हा. बारीक नजर ठेवणारा कावळा. तर गाणारी कोकीळा‌‌.

सहज खुशाली विचारतांना देखील काय? कसं काय? असे विचारले तरी त्यात सुखाचे उत्तर अपेक्षित असते. पण सुरुवात होते क पासूनच. आणि ते प्रश्नच असतात.

कट्टर हा शब्द मात्र शत्रू आणि मित्र दोघांसाठी असतो. ठाम पणे किंवा निश्चयाने बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.

कृतघ्न जरी क पासून सुरू होत असला, तरी कर्तृत्व, कर्तबगार, कृतज्ञ, कलावंत, कलाकुसर, कलात्मक, कसब, कणखर असे आब वाढवणारे क पासून सुरू होणारे शब्द देखील आहेत.

कवी, कथाकार, कादंबरीकार असे सगळे साहित्यिक, तर प्रेमळ असणारा कनवाळू हे शब्द क पासूनच सुरु होतात.तर चित्रकाराच्या हाती असतो कुंचला.

त्यामुळेच माझ्या मनात क ने सुरु होणाऱ्या शब्दाबद्दल संमीश्र भावना असतात.

आता माझ्या नावांचे काय?……… ते तुम्ही ठरवा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ‘ पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ‘ त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ‘ तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ‘ किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत.

तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ‘ उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..’ त्याच गाण्यात पुढे ‘ चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ‘ असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ‘ फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे तो सोबत येतांना नव्या दिवसाबरोबर नव्या आशा घेऊन येतो. नव्या आशा, नव्या दिशा आणि जीवनाचे नवे गाणे.

वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ‘ तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..’ हे गाणं मनाला स्पर्शून जातं .  कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .

आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने  मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे.  आम्ही सूर्योपासनेच्या बळावर कोरेनासारख्या  संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकलो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

 सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘ मित्र ‘ आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी

एखाद्या शब्दात किती अभूतपूर्व ऊर्जा सामावलेली असते याची प्रचिती मोठी आश्चर्यकारक असते. तो शब्द ..केवळ शब्द नसून तमाम मोठया समूहाचे स्वप्न असते , काटेकोर नियमावली देखील असते. तो एक शब्द असंख्य मोठ्या समूहाला आपल्या जगण्याची हमी पुरवू शकतो. तो एक शब्द राष्ट्र नावाच्या रचनेतून एकदा वगळून टाकण्याची कल्पना केली तरी त्याक्षणी त्या राष्ट्र नावाच्या रचनेचे शतशः तुकडे होत असल्याची व्यापक जाणीव पसरते. तो एक शब्द जेव्हा मोठमोठया समूहांना ऊर्जेबरोबरच हमी व विश्वास पुरवू लागतो तेव्हा तो शब्द त्या लोकसमूहाच्या दृष्टीने अगदी पवित्र होऊन जातो. इतका महत्त्वाचा असा तो शब्द …त्याची नेमकी जाणीव मात्र बहुतांशी समाजमनाला योग्यरित्या नसते ही एक शोकांतिकाच आहे. एका महान वारश्याला लागलेला तो एक अभूतपूर्व असाच शाप आहे.

संविधान….म्हणजे लोकशाही रचनेतील व्यापक लोकसमूहाला जगण्याची हमी पुरवणारा शब्द आहे. संविधान हे एका दृष्टीने त्या लोकशाही राष्ट्रांतील लोकसमूहावर टाकलेली जबाबदारी देखील असते. संविधान नावाचा शब्द जेव्हा व्यापक लोकसमूहाला ऊर्जा , हमी व विश्वास पुरवतो तेव्हा त्या संविधान नावाच्या रचनेला तोलून धरण्याचे , सतत योग्य रितीने कार्यान्वित ठेवण्याचे आणि त्याच्या पवित्रपणाला बाधा येऊ न देण्याची जबाबदारी मात्र त्याच लोकसमूहाला उचलायची असते. संविधान जिवंत आहे तोवर प्रत्येक जनसमूह प्रचंड आत्मविश्वास राखून आपल्या राष्ट्रांप्रती जागरुकता ठेवून एका विशिष्ट पण विधायक नियमावलींना प्रमाण मानून खुशाल जगू शकतो. संविधान जिवंत असते तोवर आपल्या अवतीभवती कितीही वेगवेगळ्या विषमतेच्या रचना उभारल्या जात असल्या तरीही आपल्या जगण्याची हमी देणारी संविधान नावाची रचना उपलब्ध आहे ही भावनाच सर्व अल्पसंख्य समूहाला आश्वस्त करत असते. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या राष्ट्रांच्या प्रगतीत सर्वसामान्य माणूस आपला वाटा उचलण्याची उमेद बाळगून जगत असतो. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या मतांना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध असते याची जाणीव होणे आवश्यक आहे. संविधान हा नुसताच शब्द राहत नसतो तर तमाम लोकसमूहाची जगण्याची व जगवण्याची हमी घेऊन उभारलेली पेटती मशाल असते. या मशालीला जिवंत राखण्यासाठी मात्र लोकसमूहाला जागरुकता नावाचे तेल अखंड पुरवत रहावे लागते. ही जागरुकता जेव्हा नष्ट होईल तेव्हा संविधान नावाची पेटती मशाल थंडावत जाईल अन् नष्ट होईल. संविधान नावाचा एक शब्द किती मोठ्या क्रांती प्रतिक्रांतीला जन्माला घालू शकतो आणि मिटवू देखील शकतो याची उदाहरणे जगभर पसरलेली आहेत….” संविधान बचाव ” ही आरोळी एकाचवेळी ” राष्ट्रबचाव व कॉमन मॕन बचाव ” या अर्थाची होऊन जाते ती याकरीताच….

संविधानविना कोणत्याही लोकशाही राष्ट्रांचा गाडा पुढे जाऊ शकत नाही . तो कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे याची खबरबात लोकांना लागत नाही . राष्ट्रांच्या जडणघडणीत सर्वाधिक प्रभावशाली भुमिका संविधान नावाचा शब्द अर्थात रचनाच बजावू शकते. संविधान याचकरीता एखाद्या भविष्यकालीन स्वप्नांची मूर्ती बनून समोर उभी असते. त्या पवित्र मूर्तीला कोणतेही कर्मकांड करण्याची जरुरी नसते…आवश्यकता असते ती लोकसमूहाच्या अखंड जागरुकतेची , विधायक जाणीवेची.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ज्ञानपीठाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ज्ञानपीठाच्या निमित्ताने…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

26 फेब्रुवारी.! आजच्याच तारखेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर ह्यांच्या “ययाती”ला मिळाला होता.

कुठलीही व्यक्ती, व्यक्तीमत्व वा पुस्तकातील गाभा जाणून घ्यायचा असेल तर थेट तिला अगदी मूळापासून गाभ्याला जाणून घेऊनच अभ्यासावं लागतं.अन्यथा वरवर ती व्यक्ती वा ते पुस्तक अभ्यासलं वा चाळलं तर खरे रुप न जाणून घेताच मनात गैरसमज वा संभ्रम निमार्ण व्हायचीच दाट शक्यता.

बरेचदा काही पुस्तकं वा काही व्यक्ती वाचण्याची वा जाणण्याची तीव्र ईच्छा होते, तेव्हा जसजसं त्या गोष्टीच्या खोलापर्यंत आपण अभ्यासतो तो आपण जे बघतं होतो, जाणतं होतो ते निव्वळ हिमनगाचे दिसणारे टोकच होते बाकी सगळा उर्वरित गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे ह्याची जाणीव होते.काही व्यक्तींच्या हातून खूप सारी साहित्य निर्मीती होते.पण त्या साहित्यातील एखादे साहित्य पराकोटीचे लोकप्रिय होऊन त्या व्यक्तीची जणू ओळखच बनते.वि. स. खांडेकर हे ह्याच प्रकारातील “ययाती”ह्या पौराणिक कादंबरीमुळे अजरामर झाले. जणू वि.स.खांडेकर आणि ययाती हे एक समीकरणच बनले. आपलं आवडीचं वाचनं आणि पुस्तक ह्याचा विचार आल्याबरोबर जी काही पुस्तक माझ्या चटकन नजरेसमोर येतात त्यात ययाती हे असतचं.

सांगली,मिरजकडील खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात विविध पदं भुषविलीतं,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना अकादमी पुरस्कार, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण तसेच कोल्हापूर च्या शिवाजी विद्यापीठाची मानाची डिलीट पदवी मिळाली.आज 26 फेब्रुवारी. 1976 साली ह्याच दिवशी ययाती साठी वि.स.खांंडेकरांना  शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा  पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

ययाती मी कित्येक वेळा वाचली असेल ह्याचं काही गणितचं नाही. काँलेजजीवना पासून आजवर वाचतांना तिच्यातील दरवेळी नवीनच पैलू नजरेसमोर येतात.खूप सारं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलयं,शिकवलयं ह्या कादंबरीनं.

आधी ऋषीकन्या आणि नंतर राणी झालेल्या देवयानीची संसारकथा,प्रेमाचेच दुसरे नाव त्याग,समर्पण हे मानणाऱ्या राजकन्या शर्मिष्ठेची प्रेमकथा,संयमी कचाची भक्तीगाथा, त्यागमूर्ती शर्मिष्ठा पूत्र पुरूरवाची त्यागकथा, आणि मुख्य म्हणजे आधी राजपुत्र व नंतर राजा झालेल्या ययातीची भरभरून जगण्याच्या आसक्तीची कथा ह्यात सुरेख रंगवलीयं.विशेष म्हणजे एकेक घटनांची साखळी गुंफतांना कुठलीही कडी विस्कळीत झाल्याची वा निखळून पडल्याची अजिबात जाणवत नाही.

ह्यातील एक एक पात्र सजीव होऊन आपल्या डोळ्यासमोर अवतीभवती वावरल्याचा वाचतांना भास होतो.कामुक,लंपट

संयम न पाळणारा ययाती आपल्याला खूप काही शिकवतो.त्याच्या कामुकपणाचा राग न येता त्याच्या शारीरिक मागणीमुळे येणाऱ्या हतबलतेची कीव येते तेव्हाच तो कुठेतरी जवळचा पण वाटायला लागतो.देवयानी च्या प्रबळ महत्वकांक्षे बद्दल वाचतांना अचंबित होतो.शर्मिष्ठेचा त्याग व समर्पण बघितले की नतमस्तक व्हायला होत.खरचं मनापासून केलेलं प्रेम ही खूप उदात्त संकल्पना आहे.ख-या प्रेमात एकमेकांची काळजी घेणं,काळजी वाटणं,हे सगळं असतं.ख-या प्रेमात ना वैषयिक भावना असते ना सतत डोक्याला डोकी लाऊन सतत जवळ राहण्याची गरज हे आपल्याला हे लिखाण समजावून सांगतं.शर्मिष्ठा व ययाती हे दोघे घालवित असलेले काहीच क्षण हे देवयानी ययातीच्या एकत्र सहवासापेक्षाही जास्त समाधान देऊन जातात हे कांदबरीत अतिशय छान उलगडून सांगितलयं.प्रेम हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद देऊन जात हे ही वाचतांना जाणवतं. गुरुबंधू कचाने वेळोवेळी केलेली मदत किती अनमोल असते हे उलगडतं.ख-या सद्भावना असल्या की ती व्यक्ती नेमक्या अडचणीच्या प्रसंगी परखडपणे वागून योग्य मार्गदर्शन करते ह्याचा प्रत्यय गुरूपुत्र कचदेव देतात.रक्ताच्या नात्यात प्रसंगी सर्वात प्रिय असलेले तारुण्यही लिलया हसतहसत कसे पित्याला द्यावे हे राजपुत्र पुरुरवा कडून. शिकावं.आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांनी आलेल्या शहाणपणामुळं किंवा आलेल्या समजामुळं राजा ययाती ला उपरती होऊन त्याच्यात होणारे सर्वांगिण चांगले बदल आपल्याला खूप काही शिकवून जातात.

…म्हणून जर कोणी चुकून ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा इतकचं मी म्हणेन. आज काही वाचकांच्या आग्रहास्तव ह्या दिवसाचे औचित्य साधून परत ही ययाती बद्दल पोस्टलयं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares