मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–   

सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.” 

मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”

“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”

“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “ 

“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली.  परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”

“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.

शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.

शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”

“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”

त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.

त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।” 

आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..

कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.

हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.

हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.

माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.

या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.

Celebrate the Real Activists and not Just Celebrities.

हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 

जयहिंद. 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

( ही घटना साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे याची कृपया नोंद घ्यावी. ) 

जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत:चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला होता …..

पत्रात ते लिहितात, की त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे, आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व  त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. 

हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतू या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.

या शूरवीराच्या हुतात्मादिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.

तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.

शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले… “ तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात… तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युटला प्रतिसाद दिला असता..! ”

“नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”

 “मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये होतो , त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता, आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही….. ” तो काही क्षण बोलायचं थांबला …..

शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “ मला सांगा… जे काही मनात असेल ते  कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा… मी रडणार नाही…..”

“ मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर… पण मीही रडायला नको ना ….” तो सैनिक पुढे म्हणाला….

“ त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीनगनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमच्या हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग …. ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.

” पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली…    

क्रमशः…

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं. 

 एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात.  स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !  

पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं,  ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो.  त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.

प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.

 नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.

ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया.  ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते.  आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते.  स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.  

सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.  

एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!

दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !

बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते.  सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.*  पण तीच सगळं सतत नीट करत असते.  नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते. 

पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची ! 

आपण पसरायचं, तिनं आवरायचं !

तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !

” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !  

ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार? 

—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

◆ कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही,

◆ कोणाला निमंत्रण नाही,

◆ कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही,

◆ कुठलीच भंपकबाजी नाही,

◆ कोणालाही कसलंही प्रलोभन नाही,

◆ कोणाचा कोणावर राग रूसवा नाही,

◆ कोण खायला घालेल,  की नाहीच , ते पण माहीत नाही, आज मिळालंय, उद्या मिळेल की नाही याची चिंताच     नाही,

◆ खिशात एक रूपयाची पण गरज नाही ,

◆ तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो ,

◆ कुठलंही गालबोट लागत नाही ,

◆ इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही,

◆ म्हणून कोठेच गर्वाचा /अहंकाराचा लवलेशही नाही….

◆ दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा,

◆ डोळ्याचं पारणं फेडणारा….

◆  ऊर भरून आणणारा सोहळा,

◆ श्रीमंतच नाही, गर्भश्रीमंत सोहळा…

◆ अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती …

आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी…

—–तर फक्त…..

मुख दर्शन व्हावे आता…

तु सकळ जनांचा दाता….

घे कुशीत या माऊली…

तुझ्या पायरी ठेवतो माथा …..

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम. हा शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

“ साहेब, जरा काम होतं.” 

“ पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?” 

“ नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.” 

“ अरे व्वा ! या आत या.” 

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून. मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

“ किती मार्क मिळाले मुलाला ?” 

“ बासट टक्के.” 

“ अरे वा !”  त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाली आहे  की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूष दिसत होता.

“ साहेब मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !” 

“ अच्छा, म्हणून पेढे वगैरे !” 

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, “ साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.” 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, “ साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. तो म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको सगल्य्यांना वाट ! हे नुसते पेढे नाय साहेब, हा माझा आनंद 

आहे !” 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, “ शिवराम, मुलाचं नाव काय?”

“ विशाल.” बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा – तुझ्या बाबांसारखा !

“ शिवराम हे घ्या.” 

“ साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.” 

“ हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.” 

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

“ चहा वगैरे घेणार का ?” 

“ नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून…” 

“ घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !”  मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय म्हणे.

आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय “ आनंद  लांबणीवर टाकणारे !”

‘ माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे- मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून…आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे, तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत

आणखी पैसे,

आणखी कपडे,

आणखी मोठं घर,

आणखी वरची ‘पोझिशन’,

आणखी टक्के.. !_ 

—या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक : अनामिक

संग्राहक : श्री शामसुंदर धोपटे 

चंद्रपूर

मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे।। ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे।। ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।

पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।

कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll १ ll

 

त्यागून सूर्यपुत्रा, कुंती पुन्हा कुमारी ।

कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।

कौतुक का करावे, त्या रक्तबंधनाचे ….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll २ ll

 

केली द्यूतात उभी, साक्षात कृष्णभगिनी ।

सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।

पति पाच देवबंधू , तरी भोग हे तियेचे…….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll३ll

 

ठेवू नको अपेक्षा, असल्या जगाकडूनी

निरपेक्ष आचरी तू, कर्तव्य प्रेम दोन्ही,

मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे  ।।४।।

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कोणाचे..

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय?… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

 अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही. 

 लक्झरी म्हणजे निरोगी असणे.

 

 लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे.

 लक्झरी म्हणजे  आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा परसात उगवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्या खाता येणे.

 

 लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे—

 लक्झरी म्हणजे विनासायास 3-4 मजले चढण्याची क्षमता असणे

 

 लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही.तर….

 लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे.

 

 लक्झरी म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.

 लक्झरी म्हणजे हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे.

 

 60 च्या दशकात एक कार असणे लक्झरी होती.

 70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती.

 80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.

 90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …

 

 मग आता लक्झरी म्हणजे नेमकं काय ??

 तर आता लक्झरी म्हणजे ——-

—– निरोगी असणे, प्रामाणिक असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवन असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांची सोबत असणे, गुरुंची सोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे—–

 

आणि याच सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत —–

 —–आणि ह्या दुर्मिळ गोष्टी आपणापाशी असणे हीच खरी आजची “ लक्झरी ! “ 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोयंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला….. मै हुँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू… आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर…. कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर… मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात…. जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग….. अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरून जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत… घरात… समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं… दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण…. काय उपयोग. मित्र कायमचा गेला.

आपणही जरूर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे.

संग्रहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

😳😨नवऱ्यांचे प्रकार:

१) प्रेमळ 😄: ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस !

२) उदार 😎: तुला हवी ती साडी घे.

३) समजुतदार : तु आज खूपच दमलेली दिसतेस, चल आज बाहेर जेवायला जाऊ.

४) हौशी : तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ.

५) प्रामाणीक 😒: मित्राने खूप आग्रह केला, पण मी फक्त दोनच पेग घेतले. आणी सिगरेट तर अजिबात  ओढलीच नाही. तुला शब्द दिलाय नां ?

६) एकनिष्ठ 😞 : अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण. पण स्वभावाने एकदम खडूस, तुझ्यासारखी मनमिळावू नाही.

७) कष्टाळू 😟: ऑफिस मधून येताना भाजी घेऊनच आलो, उगाच तुला परत मंडईत जायचा त्रास नको.

८) आज्ञाधारक 🥺 : मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणी मगच कळवावं.

९) स्वाभिमानी ☹️ : मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे कां ?

१०) काटकसरी 😖: मोत्यांचा नेकलेस काय करायचाय? मण्यांची माळ घातलीस तरी चालेल. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं.

११) धाडसी 😗: तुझी आई आणखीन किती दिवस राहाणार आहे ?

१२) मितभाषी😇 :  हो !

१३) खंबीर 😆: तु म्हणशील तसं, तू आणी मी काय वेगळे आहोत कां ?

१४) आर्जवी 😘: मी चहा करणारच आहे, तूही घे नां !

वरीलपैकी  कोणत्याही कॅटेगरीत नवरा बसत नसल्यास……

आपलंच नशीब खोटं…

असं मानून गप्प बसावे…!

😷🙊

संग्राहक – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 17 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 17 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२४]

 दिवस ढळू लागला आहे,

 पक्षी गायचे थांबले आहेत,

 वाराही वहायचा थांबला आहे.

 अशा वेळी झोपेच्या पातळ पडद्याने,

 माझ्या भोवती अंधाराची चादर लपेटून

 कमळाच्या पाकळ्या मिटून घे.

 

प्रवास संपण्यापूर्वीच माझी शिदोरी संपली आहे

धुळीनं भरलेली माझी वस्त्रं फाटली आहेत

मी गलीतगात्र झालो आहे.

माझी लज्जा, माझं दारिद्र्य दूर कर.

 

दयामय रात्रीच्या पंखाखाली

एखाद्या पुष्पाप्रमाणं माझं जीवन पुन्हा उमलू दे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares