☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .
हस्ताक्षर,सही,दिसणे, काही लकबी वगैरे.पण कधीकधी असे वाटते की पंगतीत ताट वाढल्यावर जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते, त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.
म्हणजे बघा …..
समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.
तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो.त्यांच्यात patience कमी असतो.
वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.
भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात.यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.
जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.
लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात.
काही लोक सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.
यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.
पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणानंतरची reaction असणारे.
जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली, की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही, हे बघून त्याची चर्चा करणार.
हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .
अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून न घेणारी असतात.अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच. मित्र असलेच तर तेही याच catagory तील असतात.
पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,
अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही… आत्ताच हवे म्हणून लोक वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jealous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच,”मी काय म्हणालोे, अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले,”असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.
जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक
‘बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते,”असं म्हणत राहतात, ते अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीचे असतात .
समोर चांगले ताट वाढले आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी!
या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .
सगळे जेवण झाल्यावर
“ताक आहे का ?”
म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर
” अरेरे! ताक असते ना, तर मजा आली असती “
असा शेरा मारणारे … किरकिरे.
लेखक – अज्ञात
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मुलांना जबाबदार बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ, त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘हेल्दी निग्लिजन्स’हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन.या ‘दोन बाय दोन’च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात.लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं,नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.
त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास ,या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची.मुलं अगदी जखडून गेली ,कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.
आईची प्रतिक्रिया, “मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा अजून किती लक्ष द्यायचं?”
“तू जरा जास्तच लक्ष देते आहेस,” रेणूताईंनी म्हटलं,”थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे.जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर तू ताबा ठेवलास, तर कसं चालेल?जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.”
मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच, की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना ,हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच,पण न जाचणारं! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय, यावर विश्वास ठेवायला हवा. आपण, ते बुडेल, ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे ,थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात, त्याप्रमाणे ,’ ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं,’ असं तोंडानी बोलत ,मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं .आपण ‘मूल’ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’
ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा अधून मधून राजीनामा द्यायला हवा.
लेखक – श्री शिवराज गोर्ले
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू…
एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्योंकि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। ’
—- फार छान ओळी आहेत या की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’
आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?
आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो. जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.
पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही.
दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का?
— सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल.
— तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे.
— तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल.
— तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे.
— तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.
सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे.
सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.
आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे…..
— प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता,
— आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.
— नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता.
— दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.
आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे.
आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे.
आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते.
गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया.
तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका.
जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा.
आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका.
…… म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल.
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.
एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.!
म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.
म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!
टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.
ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.!
मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.
आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.
चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.
तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली रिकामी पडलेली दिसली.
तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.
मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!
लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.
मी बागेला पाणी घातलं नाही,
कार धुतली नाही,
डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,
बिलांचे चेक टाकले नाहीत,
वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,
कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!
माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?
अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.
२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा.
३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.
४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.
५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.
६. स्वयंशिस्त बाळगावी.
७. वय वाढते तसे ‘मन धावते, पण शरीर धावू शकत नाही’ याचेही भान ठेवावे. शारीरिक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या.
८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी.
९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल.
ध्यानधारणेचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.
संग्राहक : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(Glory of Indian Architecture…)
ऐहोळे, दख्खनचं पठार, कर्नाटक…
Khalil Gibran says …. “And let to-day embrace the past with remembrance and the future with longing. Art arises when the secret vision of the artist and the manifestation of nature agree to find new shapes.“
पाषाणातली अथांग मृदुता ….
ही अद्वितीय निर्मिती सातव्या शतकातली आहे. म्हणजे आजमितीला बाराशे तेराशे वर्ष एवढा कल्पनेपलीकडचा काळ या मूर्तीने वादळं, उन्हाळे, पावसाळे झेलले आहेत. दख्खनच्या पठारावरचा अविरत वाहणारा वेडापिसा वारा झेललाय. तरीही ही कला दिमाखात उभी आहे. हे पाषाण चिरंजीव आहेत.
थोडंसं नीट बघा. मन देऊन बघा. तो किती आर्जव करतोय. आणि ती लटक्या रागाने हे सगळं सुख उपभोगत्येय. त्या दोघांचं हे प्रेम कालातीत आहे, हेच ही मूर्ती सांगत्येय. त्या शिल्पीनी … कलाकारांनी पराकोटीची कमाल केल्येय. महाकठीण पाषाणाला जुईच्या फुलासारखं नाजूक, मृदू केलंय. दोघांच्या शरीरातला कण न कण ती मृदुता … त्यांचं प्रेम, भावना दर्शवतोय. कलेची आपली परंपरा किती दिव्य आहे, हे आपल्याला सांगतोय. नीट बघा …कलाकारांच्या छिन्नी हातोडयाची अगाध किमया. त्यात त्यांनी प्राण ओतला. भावना, घाट, पोत, प्रमाणबद्धता, बारीक कलाकुसर यांची अजोड घडण सामान्य मनाला देखील जाणवत्येय.
…… खरंच पाषाणातली मृदुता अथांग आहे.
चित्र साभार – श्री प्रकाश पिटकर
लेखक – श्री प्रकाश पिटकर
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈