सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ बापाची पुस्तकं… – श्री सौमित्र  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मी गेल्यावर

तुला वाटेल की आपल्या बाबांनी

वाचलीयेत ही सारी पुस्तकं,

पण नाही

अर्धंही वाचता आलेलं नाहीय,

येणारही नाही हे ठाऊक होतं मला

तरी

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.

 

माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागे,

ही अक्षर ओळख सोडून फक्त

जिच्या मागे धावत मी

पोहोचलो आहे इथवर….

 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की

मलाही सोडता येणार नाहीय मागे

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी….

 

ही काही पुस्तकं  आहेत फक्त!

जी तुला दाखवतील वाट

 

चालवतील तुला, थांबवतील कधी, पळवतील कधी

निस्तब्ध करतील,

बोलतं करतील कधी

टाकतील संभ्रमात

सोडवतील गुंते….

 

वाढवतील पायाखालचा चिखल

कधी बुडवतील ,  तरवतील कधी,

वाहवतील कधी थोपवतील प्रवाह,

अडवतील तुडवतील सडवतील…

बडवतील हरवतील सापडतील…

तुझ्याशी काहीही करतील

ही पुस्तकं…

 

तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड

तुला देण्याचा प्रयत्न करतो

तशीच ही पुस्तकं

उघडतील . मधोमध पसरतील हात.

मिठीत घेतील तुला…

आपोआप होतील हृदयाचे ठोके.

 

यांच्यात रहस्यं आहेत दडलेली

अनेक उत्तरंही असतील

प्रश्नांमधे

कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील..

 

एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच

पल्प फिक्शन

कधी क्लासिक

सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल

कधी कवतिक,

कधी किचकट

कधी सोपं असतं.

 

लक्षात असू दे या सगळ्यात

वाईट काहीच नसतं.

त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक

त्याच वेळची गरज असतं . समज नसतं….

 

मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील..

जी नेतील तुला जायचं आहे तिथं…

 

फक्त, मी असेन तिथं मात्र…

तुला पोहोचता येणार नाही.

कारण,मी आधीच

होऊन गेलेलो असेन तुझ्यासाठी-

एखादी कथा एखादी कादंबरी….

एखादी कविता एखाद्या पुस्तकातली.

 

माझी आठवण आली की

या प्रचंड ढिगाऱ्यातलं

ते एखादं पु्स्तक शोध

तुझा प्रवास,बघ, कसा

सोपा होऊन जाईल.

लेखक : श्री सौमित्र

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments