मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

कधी नळाला पाणी नसतं…

कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…

 

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

 

कधी जागा नसते . .

कधी जागा असून स्पेस नसते . .

कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .

 

कधी डब्यात आवडती भाजी नसते . .

कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .

दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

 

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .

कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .

 

कधी काही शब्द कानावर पडतात . .

कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

 

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .

कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

 

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .

कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

 

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .

कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

 

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .

कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

 

कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?

 

ताण घेतला तर तणाव . .

आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.

 

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं ….  –

 

लेखक : श्री विजय बोंगिरवार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाण्याची expiry date ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाण्याची expiry date?  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

जिथे रोज नळाला पाणी येते, तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची.

जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते

जिथे 8 दिवसांनी पाणी येते तिथे ते  8 दिवसांनी expire होते.

लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली, की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expire होते आणि फेकून दिली जाते.

वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही, तोपर्यंत जवळचे पाणी चालते..

धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते.

जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते…

जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते – expiry date शेकडो वर्षे.

जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात, तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठलेले असते, तरीही ते चालते..

एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेवर Flash जाते…😢

पाणी जपून वापरा, आपले विचारच आपला घात करतील…

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

सकाळी सातची वेळ, शांतारामअण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.

अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईम करुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.

आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले; पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू  लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,”रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?” काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे, याहून क्लेशदायी काही नाही.

“आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?” अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले;पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.

शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे. त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,”काय हे अण्णा? सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही.”

“हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार?”

“काय ती तुमची नोकरी, अण्णा! कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊस घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?”

अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.

अण्णांची सौ., लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले.ते पाहून मधुराला गलबलून आलं.

मधुराला वडील नव्हते; पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती.

संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला, तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली,”मयंक, तू लग्न झालं, तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे; पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू ‘अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?’ या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते, ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत.”

आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला, त्यांना कळलंच नाही.

आर्य म्हणाला,”खलंच, पप्पा. तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही.”

मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,”आपला बाथरुम मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं, तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा.”

घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात  व मठ्ठा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व  तो त्यांना ‘सॉरी’ म्हणाला.

आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला,”बाबा,यू आल आलवेज वेलकम.” अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले; पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, “we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same”

म्हणजे,

“आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे.”

किती सुंदर वाक्य आहे, नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे, तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो… अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

 “जिंदगी एक बार मिलती है”

  “बिल्कुल गलत है!”

सिर्फ मौत एक बार मिलती है!

 जिंदगी हर रोज मिलती है !!

  बस जीना आना चाहिए!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

काल ताई कडे गेले होते. सहजच आठवण आली आणि गेले. ताई व भाऊजी आरामात TV बघत बसले होते. ताई माझ्या पेक्षा चार वर्षं मोठी.आमच्या बागेतले देवगड हापूस घेऊन गेले.•••

छान गप्पा रंगल्या आमच्या. जुन्या गोष्टी निघाल्या व वेळ कसा गेला कळलेच नाही.••••

 संध्याकाळ झाली.मी ताईला म्हणाले,•••• निघते ग मी आता, •••

 अग !! आरती येण्यातच आहे, तिला भेटून जा.ताई म्हणाली.••••

 भावजी म्हणाले,हो,मी तसा तिला मेसेज केला आहे,येईलच ती इतक्यात.•••

 थोड्या वेळाने आरती आली.

 कशा आहात मावशी ? तिने विचारले. छान झालं मावशी, तुम्ही आलात.••••

आई बाबांना पण छान वाटलं असेल. आमच्या दोघांच्या नोकरी मुळे त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही,अडकलेले असतात ते दोघे.••••

 ताईने विचारलं,••••

 कसा गेला ग दिवस आज ऑफिस मधे ?

खूप काम असतं ग दोघांना.आम्ही काय घरीच असतो. शनिवार, रविवारी आरती काही करू देत नाही आम्हाला. कधी कधी तर नाटक / सिनेमाची तिकीटं हातात आणून देते.••••

माझ्या लक्षात आलं,दोघी आपापली बाजू मांडत होत्या.व एकमेकांच्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत होत्या.••••

मावशी !! आई बाबा आहेत म्हणून मला घरची, आर्याची काळजी नसते हो. आर्या म्हणजे ताईची नात. ••••

ताई म्हणाली,••••

अग !! आर्या आज दूध प्यायला नाही म्हणाली बघ.मग मी तिला केळं आणि थोडे ड्राय फ्रूट दिले व खेळायला पाठविलं.

अग !! आज तिला औषध द्यायचे राहून गेलं बघ,विसरलेच ग मी. असं कर आरती,तू माझ्या मोबाईलवर अलार्म लावून दे. म्हणजे मग मी विसरणार नाही. •••••

ठीक आहे आई.काही हरकत नाही.होतं कधी कधी असं. मी देते.आरती म्हणाली.•••

ताई चहा करायला उठणारच होती, तर लगेच आरती म्हणाली, ••••

आई !! तुम्ही रोज करताच चहा. आज बसा मावशीबरोबर गप्पा मारत, मी करते सगळ्यांसाठी चहा. बाबांचा मेसेज मिळाला होता. म्हणून येताना मी समोसे आणले आहेत.•••••

मी शांतपणे दोघींचे बोलणे ऐकत होते.ताई म्हणाली,•••

अग आरती !! मावशीने आंबे आणले आहेत. उद्या न विसरता घेऊन जा हं तुझ्या आईसाठी. ••••

आई बाबा, औषध घेतले ना वेळेवर?..आरती ने विचारले.•••

हा हिचा रोजचाच प्रश्न असतो बघ आम्हाला. कौतुकाने ताई म्हणाली,•••

आरती आल्यापासून, त्यांच्या गप्पा ऐकून,एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की दोघी एकमेकींना सांभाळत आहेत. एकमेकींची काळजी घेत आहेत.•••

छान वाटलं बघून.•••••

‘Old Age Parenting’ म्हणजे आजी आजोबा नातवंडे सांभाळतात. हे आता बरेच ‘Common’ झाले आहे.पण ते सोप्पं नाही.••••

दोन पिढ्यांनी एकत्र रहायचे व तिसऱ्या पीढीला सांभाळायचे, म्हणजे तारेवरची कसरतच.••••

खरं तर यापेक्षा मोठे सुख तरुणांना काय असू शकतं की त्यांची मुलं सुरक्षित हातात आहेत. मुलांची मुलं तर ‘दुधावरची सायच ‘. त्यांना सांभाळणे तर आनंदाची गोष्ट आहे आजी आजोबासाठी, पण दडपणाखाली नाही. ••••

 ताई आणि आरतीची रिलेशन्स बघून खूप छान वाटलं.••••

 ” दोन शब्द काळजीचे, प्रेमाचे पुरतात आजी आजोबांना.”••••

खूप नाजूक धागा आहे हा दोघांच्या मधला. एकमेकांच्या अडचणी समजल्या, चुका पदरात घातल्या,थोड्या सवयी बदलल्या, मदतीचा हात पुढे केला तर ,सर्वच आनंदात राहू शकतात.मोकळेपणा हवा नात्यात.•••••

आजी आजोबांची ही ‘second inning ‘आहे मुलांना मोठं करायची. वेळेनुसार सर्वच बदललंय. पद्धती पण. आजी आजोबांची पण वयाप्रमाणे शक्ती,गती कमी झाली आहे. विस्मरण होऊ लागलं आहे.••••

तडजोड,आदर सर्वांचा सर्वांसाठी हवाच. ही ‘Two Way प्रोसेस’ आहे. बोलणे स्पष्ट पण मधुर ठेवलं तर छानच. आमच्या वेळेस, तुमच्या वेळेस हे शब्द नकोच.••••

सोपं नाही,पण अशक्य नक्कीच नाही. तरुण व जेष्ठ -दोघेही आपलं जीवन आनंदाने जगू शकतील.दोघांचा अधिकार आहे तो व गरजही.••••

ताई निश्चिंत झाली आहे.कारण आता तिला अमरची काळजी नाही.त्याला तिने सुरक्षित हातात सोपवले आहे.•••••

ताईला सासू सूनेचे समीकरण चांगलं जमलंय. ती म्हणते,•••

आरती माझी ‘स्पर्धक’ नाही, माझी जबाबदारी उचलणारी माझी ‘सहयोगी ‘ आहे.ती आणि मी या घराचे ‘आधारस्तंभ’ आहोत.•••••

आनंदाचे दिवस केव्हा येतील ?याची वाट बघायची नसते. दोन्ही कडून प्रयत्न करुन ते आणायचे असतात.••••

म्हणतात ना,•••

” जहां चाह वहां राह “••••

“रिश्ते बरकरार रखने की सिर्फ एक ही शर्त है,किसी की कमियां नहीं अच्छाइयां देखें “•••

 

लेखिका: सुश्री संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे,” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “ Coordination cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

 हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला, “Duty manager , please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना, की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार, तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मैं तुम को जमीन में जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले, “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मैं आपकी मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी में ठीक तरह  से बातचीत करने नहीं आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उनकी तरफ से माफी मांगता हूं . ”

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली, पण चढ्या आवाजांत म्हणाली, “मेरे दांत में बहोत दर्द है . मैं सफर नहीं कर सकुंगी. बस इतना मैंने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये हैं ? मैं उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार, पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”

यावर बनर्जीने जे उत्तर दिले, ते ऐकून मला हसावे की रडावे, ते कळेना.

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मैं वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैंने लेडी को बोला: टांग उपर करो,” असं म्हणून बॅनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग,’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी, तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिट में दोर्द गायब होता है.”

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जिभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

देवाला पण मानलं पाहिजे.

तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

 

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं म्हणून तो

मित्रांच्या, प्रेमाच्या

अगदी

नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना

दोन अशा व्यक्तिमत्त्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

 

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो,

गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो,

भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो

आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,

ज्या योगे त्यांचं  कुठे अडणार नाही…

 

खरं तर

दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच.

 

परंतु हा जो फरक आहे, तो ओळखून, तुम्ही कसे निभावता, हे जास्त महत्त्वाचं असतं.

 

कधी कधी आपण हतबल होतो..

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतं

हे एकदा कळलं, की उत्तरं सोपी होतात.

 

अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

 

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

 

पण आपणही समोरच्याच्या * *अपेक्षांमध्ये उतरतो का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे..

 

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे,

नीरस होईल ?

 

उदास व्यक्तीच्या

सोबत उदास माणूस

कसं वाटतं ?

 

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा,

एकटं राहू नये ह्यासाठी

मैत्री, जोडीदार, सहचर

अशा गोष्टी उदयास आल्या,

 

पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

 

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे,

वेगळं आहे पण

गोड आणि प्रिय आहे, असा विचार करायला सुरुवात केली,

की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं .

 

‘अनुरूप’ शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही नं ?

 

एकमेकांना अनुरूप म्हणजेच

जिथे एक कमी, तिथे त्याची कमतरता दुसरा भरुन काढतो.

कधी गुणांनी,

कधी स्वभावाने,

कधी विचारांनी….

 

म्हणूनच विविधतेत एकता असते.

 

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं. जे आपल्याला जपते

आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ……

 

जीवन सुंदर आहे।

सदा आनंदी रहा

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

तो म्हणाला – दिसायला देखणी, गोरीपान, मनमिळाऊ , मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहेमी आनंदी आणि समाधानी असावी एवढंच !

 

त्याला समजावले. . .

पोरा, एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई, जुई, कमळ, रातराणी, निशिगंध, चाफा लागत नसतात रे !

 

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराया मात्र देवळाबाहेर लोकांच्या चपलांचा ढीग होता, त्यावर बसले होते. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं , “असे का चपलांवर बसलात ?”

तेव्हा रामराया म्हणाले, “जाता जाता देवळातून मला ऐकू आलं , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ,

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

सगळ्यांचं मन बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे बसलोय !”

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

नेहमीच नसतं अचूक कुणी,

घड्याळ देखील चुकतं राव.

जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता

निसटून जातो हातून डाव.

 

पडत जातात उलटे फासे

घरासोबत फिरतात वासे,

अश्या वेळी मोडू नये

धीर कधी सोडू नये.

 

नशिबाच्या नावानेही

उगीच बोटं मोडू नये.

भरवश्याचे  करतात दावे,

आठवू नये त्यांची नावे.

 

सगळी दारं मिटतात तेव्हा

आपणच आपला मित्र व्हावे…

 

मग अचूक दिसते वाट,

बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत

झेलता येते प्रत्येक लाट,

 

ज्याला हे जमलं त्याला

सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी

वाट सोडून वाहतील वारे,

 

म्हणून म्हणतो इतकं तरी

फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार,

स्वतःत शोधून पहा.…!

 

कवी : श्री गुरु ठाकूर

प्रस्तुती – सुश्री श्रेया साने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधुनिक भूपाळी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आधुनिक भूपाळी… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

लिसन माझ्या सोन्या बाळा

केव्हाच झाली मॉर्निंग

वेक अप फ्रॉम द बेड आता 

शेवटची ही वॉर्निंग

 

छानपैकी ब्रश कर

चमकव तुझे टीथ

स्मॉल थिंग समजू नकोस

त्यातच तुझं हित

 

हॉट हॉट मिल्क केलंय

घालून बोर्नव्हीटा

या ड्रिंकने सहज फोडशील

हाताने तू विटा

 

वन ग्लास ट्वाईस घेताच

व्हीटामीन्स मिळतील मेनी

थोड्याच दिवसात तूही

होशील महेंद्रसिंग धोनी

 

मॅथ्सवाल्या टीचरला त्या

विचार सगळ्या क्वेरी

पाठ कर लंच ब्रेकला

मराठी लॅंग्वेज स्टोरी

 

स्कूल फिनिश करून इव्हला

होम झटपट गाठ

येता येता बसमध्येच

फ्रेझेस होऊ दे पाठ

 

ग्रॅंडपाच्या बर्थ डेची

आहे नाईट ला पार्टी

असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये

ग्रो होतात कार्टी !

 

मराठी च्या स्पीकिंगचेही लावू तुला कोर्स,

शोधलं खूप टाईम्स मध्ये पण सापडला नाही सोर्स.

 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares