जपानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले.
तो म्हणाला: “आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्वात नाही.”
माझ्या मनात एक विचार आला. ‘एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक दिन’ का साजरा करत नाही?’
एकदा, कार्यालयातील कामानंतर, यमामोटा नावाच्या त्या मित्राने मला आपल्या घरी आमंत्रित केले. त्यासाठी आम्हाला मेट्रोने जावं लागलं. तिथं लोकांची गर्दी होती. माझ्याकडे एक बॅग सुद्धा होती. अचानक, माझ्या बाजूला बसलेल्या वयस्क व्यक्तीने स्वतः उठून मला त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली. वृद्ध व्यक्तीच्या अशा सत्कारपूर्ण व्यवहाराने मी ओशाळून गेलो.
हा वृद्ध माणूस मला त्यांची जागा बसायला का देत असेल, हा प्रश्न मी यमामोटा यांना विचारला. माझ्याकडे असलेल्या ‘शिक्षक’ या टॅग कडे पाहून त्यांनी बसायला आसन दिले आहे, असं तो म्हणाला. मला अभिमान वाटला.
ही यमामोटांना भेटण्याची माझी पहिली वेळ होती, त्यामुळे एखादी भेटवस्तू त्यांच्यासाठी घ्यावी, असं मला वाटलं. मी दुकानाबद्दल विचारलं. ते म्हणाले की थोडं अंतरावर खास शिक्षकांसाठीचं एक दुकान आहे, ज्यात विविध वस्तू कमी किंमतीने विकत घेण्याची सुविधा दिली जाते. हा मला दुसरा सुखद धक्का होता.
या सोयीसुविधा फक्त शिक्षकांसाठीच आहेत का? मी प्रश्न केला.
यमामोटा म्हणाले:
जपानमध्ये, शिक्षकी पेशा हा सर्वात प्रतिष्ठित पेशा आहे आणि शिक्षक ही सर्वात आदरणीय व्यक्ती आहे. जपानी उद्योजकांना शिक्षक त्यांच्या दुकानांमध्ये येताच अत्यंत आनंद होतो.त्यांना तो त्यांचा सन्मान वाटतो.
जपानमध्ये माझ्या प्रवासाच्या काळात, मला शिक्षकांच्या प्रती जपानी लोकांकडून अत्यंत सम्मान मिळतो, याची अनेकदा प्रचिती आली. त्यांना मेट्रोमध्ये विशेष आसने आरक्षित असतात, त्यांच्यासाठी विशेष दुकाने आहेत, जपानमध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या प्रवासाच्या तिकीटांसाठी रांगेत उभं राहावं लागत नाही.
म्हणूनच की काय ! जपानमध्ये शिक्षकांसाठी ‘शिक्षकदिन‘ या दिवसाची गरज नाही, कारण तिथे शिक्षकांच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा सणच असतो.
मी आपणां सर्वांकडून अनेक चांगल्या ज्ञानांचे धडे शिकलो…त्या माझ्या शिक्षकांनो, माझा तुमच्या चरणी प्रणाम!
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“काहीतरी कमी करा आणि कढीपत्ता द्या. त्याचे पैसे देणार नाही.”
“माउली, तुमच्याकडून कशाला जास्त घेईन? दोनशे वीस झाले.दोनशे द्या.”
म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बोलले की आपसूक हात पर्समध्ये गेला. पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला.
बॉसचा फोन.
“येस सर.”
“मेल चेक कर, दहा मिनटात रिप्लाय दे. इट्स अर्जंट.” फोन कट झाला.
बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाले.
“माउली, अवो ताई,”
म्हातारबा हाका मारत आहेत, असं वाटलं. पण मी लक्ष दिलं नाही. अर्जंट मेलच्या नादात घरी पोहोचले अन लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले.
तासाभराने काम संपलं . टेन्शन कमी झालं. कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी ठेवायची आहे. सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरवात केली. म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता. चक्क कढीपत्ता फुकट दिला होता. रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली, तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या. नोटा पाहून डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो आहोत.
“अय्योsssss ”मी जोरात किंचाळले.
“काय गं,काय झालं?” घाबरून नवऱ्यानं विचारलं.
सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला,
“बरंय की मग.भाजी फुकट मिळाली…”
“काहीही काय!”
“म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगले वागले आणि मी पैसे न देताच…
माझ्याविषयी ते काय विचार करत असतील?”
“हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस.”
“त्यांचं विनाकारण नुकसान झालं हो..”
“पण तू मुद्दाम केलं नाहीस ना.”
“हो. तरी पण नुकसान ते नुकसानच.”
“मग आता काय करणार ???”
“मी जाऊन पैसे देऊन येते.”
“अग…बाहेर मुसळधार चालूये. उद्या सकाळी दे…”
“अरे पण…
मनाला चुटपूट लागलीय. म्हातारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं. मी अशी का वागले?डफर…”
“तू ओव्हर रिऍक्ट करतेस.
एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही.”
नवरा वैतागला.
“मला खूप अपराधी वाटतंय.
म्हातारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही.”
“मग चेहरा पाडून दु:ख व्यक्त करत बस. मला काम आहे.”
कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला.
माझी अवस्थता वाढली. ‘शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात. नावालाच चांगल्या घरातली.बाकी …..’.असं म्हणत भाजीवाले बाबा शिव्या हासडतायेत असं वाटायला लागलं.
नको त्या विचारांचे डोक्यात थैमान सुरु झालं. कामात लक्ष लागेना. झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली.
तडक जाऊन पैसे देऊन यावे असा विचार आला. पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटले नाहीत.
निराश होऊन घरी परतले. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं. काही बोलला नाही, पण खवटपणे हसला.
नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला. दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली कामं आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसले नाहीत. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी माहिती नव्हती. प्रचंड निराश झाले.अपराधी भाव प्रचंड वाढला. त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरु झाली.
“बास आता,अति होतंय”
नवरा डाफरला.
“तुला माहितीय. म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.”
“तू प्रयत्न केलेस ना. थोडी वाट पहा. जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे.
आपल्याला पैसे बुडवायचे नाहीत.”
“आता आठ दिवस लॉकडाऊन आहे”
“म्हणजे दोनशे रुपयांचे भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही.”नवऱ्यानं चिडवलं, तेव्हा मला सुद्धा हसायला आलं.
लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात, तिथं रोज जात होते. पण एकदाही बाबा भेटले नाहीत.
म्हातारबांविषयी सारखी चौकशी करत असल्याने तिथले भाजीवाले ओळखायला लागले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्याने म्हातारबांच्या भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितले.
“दादा, मला तुमच्या आजोबांना भेटायचे आहे.”
नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं,
“कशासाठी ?काय काम आहे ?”
“कुठं भेटतील ?”
“आज्याची तब्येत बरी नायी. घरीच हाय. ते आता गाडीवर येणार न्हाईत.”
“मला त्यांना भेटायचंय. पत्ता देता, प्लीज.”
नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला.
“माज्याकडे द्या. आज्याला देतो.”
“नाही. मला बाबांनाच भेटायचंय. त्यांची माफी मागायचीय.”
त्याने घरचा पत्ता दिला.
ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले. एकाला एक लागून असलेली घरे आणि त्यांच्यामधेच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता. अरुंद बोळ, उघडी गटारं, धो धो वाहणारे नळ, तिथंच कपडे धुणाऱ्या बायका, खेळण्यात हरवलेली लहान मुलं…अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो. अलीबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळंच जग होते.
अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एकदाचं घर सापडलं.
“आजोबा आहेत का?”
दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं ?
त्यांनी हाका मारल्यावर म्हातारबा बाहेर आले.
“आजोबा, ओळखलं का ?”
चटकन डोळ्यात पाणी आलं. “वाईच थांबा.चष्मा आणतो.”
म्हातारबा चष्मा घालून आले. मी तोंडावरचा मास्क बाजूला केला.
“आ…,माउली..,तुमी इथं?आत या.”
म्हातारबांचे आदरातिथ्य पाहून आम्ही दोघंही भारावलो.
घरी आलेल्यांचे मनापासून स्वागत होणं,हे आजकाल दुर्मिळ झालंय.
“बाबा,पुन्हा येईन. आज जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले होते.”
“कसले पैसे?”
“भाजीचे. त्या दिवशी गडबडीत…..”
दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला, तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले.
“माफ करा. चुकून झालं.”
मी हात जोडले.
“अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती.”
“कशावरून??”
“माणूस चांगला की लबाड, हे माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं.”
“ताई, पैशासाठी यवडी इतवर आलात तवा घोटभर च्या तरी घ्याच.”
आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही. चहा घेऊन निघताना….
“बाबा, पुन्हा सॉरी…..”
मी वाकून नमस्कार केला. तेव्हा म्हातारबांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला.
“हॅप्पी ?” घरी जाताना नवऱ्याने विचारलं…
तेव्हा मी मान डोलावली.
“पैसे दिले नसते तरी चाललं असतं.बाबा तर साफ विसरले होते.”
“ते विसरले होते. पण मी नाही. त्या चुकीची सल मला त्रास देत होती.”
“काय मिळवलं एवढं सगळं करून??”
“ मनःशांती…!”
मोजता येणार नाही असं समाधान मिळालं. ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही तर स्वतःसाठी केली.
माझ्यातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठीच हा सगळा आटापिटा.
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘वाचताना वेचलेले’ अलिप्तता
प्रस्तुती :सौ. उज्ज्वला केळकर
अलिप्त होणं.. Disconnect with Something/Somebody..
धक्का बसला ना.. पण खरं आहे.. पटणार नाही काहींना.. आयुष्यात वेळ आली की Detach होणंच योग्य..
असं म्हणतात की वयाच्या “साठी” नंतर ही प्रक्रिया सुरु करावी.. “अलिप्त” होणं म्हणजे Separation नाही की Aloof नाही.. फक्त कुठलीही गोष्ट “मनाला लावून” न घेणं.. ज्या गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारणं.. आणि खोटी आशा न बाळगणं..
नेहमी एक लक्षात ठेवावं.. माणसाचा मूळ “स्वभाव” कधीच बदलत नाही.. स्वभावाला औषध नाही हे खरं आहे.. त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा.. तो बदलण्याचा प्रयत्न पण करू नये..
Detach..
मुलगा/मुलगी परदेशी आहेत… हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही.. प्रत्यक्ष होणं शक्य नाही हे सतत मनाला सांगणं.. अलिप्त…!!
आपली स्थावर जंगम.. Property.. खूप कष्टाने उभी केलेली.. मान्य.. पण आता उपभोग घेण्याची अंगात शक्ती नाही.. आसक्ती नाही.. त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे.. Disconnect…!!
आपल्या घरामध्ये अशा खूप वस्तू असतात.. कधी Marketingच्या “सापळ्यात” फसल्यामुळे तर कधी गरज नसतानाही पत्नीच्या व मुलांच्या आग्रहामुळे घेतलेल्या… अशा कित्येक वस्तू ज्या आपण वापरत नाही पण जपून मात्र ठेवतो.. May be “Emotional Attachment”… भांडी, कपडे, असंख्य Dinner sets, काचेचे वेगवेगळे Glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले, पर्सेस इत्यादी इत्यादी..
आठवून पहा.. लग्नानंतर छोट्या घरात संसार झालाच ना.. आता घर मोठ्ठं आहे.. घरात खूप अत्याधुनिक साधनं आहेत.. पण माणसं इन मिन दोनच… काय करायचं… अशा वेळी Detach होणंच महत्वाचं…_
हे झालं “निर्जिव वस्तूं” बद्दल.. आता “सजीव माणसं” चेक करू या…
काही वर्षांपूर्वी इतर कोणाच्याही आयुष्यात आपण “डोकावणं” हे सहज स्वाभाविक होतं.. कारण व्यक्ती वेगळ्या होत्या.. त्यांचे “स्वभाव आणि व्यवहार” सगळं अगदी स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं… पण आज परिस्थिती बदलली आहे, मित्रांनो.. विचार एकमेकांत share होत नाहीत.. कोणी सल्ला मागत नाहीत.. काही न पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत… Detach…!!
“रिक्त” होण्यात सुख आहे, मित्रांनो.. दुःखाला Delete करता यायला हवं.. खूप कठीण आहे, मान्य.. पण मग पुढे नाही जाऊ शकत…
अशा वेळी कृष्णाचं चिंतन करावं… त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला की देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे… कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या मनसोक्त घागरी फोडाव्यात.. बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं… मान्य आहे, कृष्ण “परम परमेश्वर” होता… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्यच… पण आयुष्यात जर कधी “अलिप्त” व्हायचं असेल तर कृष्ण आठवा… तो स्फूर्ती देईल…
मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे.. काहीच नाही.. ते जर त्यांचे “कर्तव्य” पार पाडीत असतील, तर तक्रारीला जागा नसावी.. पण “माझं ऐकावं” हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची प्रत्येकाची “क्षमता” वेगळी असते.. मान्य.. पण जबरदस्ती नको… लागू द्या त्यांना एखादी “ठेच”… शिकतील मुलं आपोआप…!!
लहानपणी आई म्हणायची.. तुला कळणार नाही आत्ता. पण एकदा बाप झालास की कळेल… इतक्या साध्या भाषेत एवढं मोठं “तत्वज्ञान” फक्त आईच सांगू शकते… अलिप्त होण्यात सुख आहे… पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल… वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल… मनात प्रेम, सहानुभूती नक्कीच राहील.. पण “गुंतणं” रहाणार नाही…!!
जिथे व्यक्ती “गुंतते” तिथे राग, लोभ हे येणारच… हे “मळभ” दूर झालं की सर्व कसं छान, स्वच्छ आणि निर्मळ…!!
बघू या प्रयत्न करून… जमलं तर ठीक… नुकसान तर काहीच नाही…!!
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “निवांत जगणं..” – लेखक : श्री विजय चौधरी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडूत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय?निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, “मग आतापासूनच का निवांत जगत नाही?”
यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगून जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय, ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.
कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या० प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं, नितांत गरजेचं आहे. इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे. ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका.ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते. त्यामुळे ते क्षण वेचा.
तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर “निरोगी कसं जगावं” हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?
एक शायर म्हणतो……
उम्र-ए-दराज
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में
लेखक : श्री विजय चौधरी
प्रस्तुती : सौ.शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा एक कुटुंब त्यांच्या चारचाकी गाडीतून फिरायला चालले होते, वडील गाडी चालवत होते. जाताना त्यांच्या गाडीला २-३ गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या. ते बघून मुलगा वडिलांना म्हणाला, “बाबा, स्पीड वाढवा ना !” म्हणून बाबांनी स्पीड वाढवला व पुढील १-२ गाड्यांना ओव्हरटेक केले.
पुन्हा एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले व पुढे निघून गेली म्हणुन त्या मुलाने पुन्हा भुणभुण सुरु केली, “बाबा स्पीड वाढवा ना”. म्हणुन बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात अजून १-२ गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केले. म्हणून पुन्हा तो मुलगा म्हणाला की “बाबा, स्पीड अजून वाढवा ना.”
तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले व म्हणाले, “बाळा ! आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे. ज्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत, त्या जास्त ताकदीच्या आहेत. त्यांची बरोबरी करायला आपण गेलो, तर आपल्या गाडीचे नुकसान होईल. त्यापेक्षा ज्या गाड्यांना आपण मागे टाकले आहे, त्यांच्याकडे बघ आणि समाधान मान रे.”
यावर तो मुलगा म्हणाला.
“बाबा, हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळतंय. मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का नाही कळत ?”
खरोखर अंतर्मुख करणारी ही गोष्ट आहे.
आज प्रत्येक पालक आपल्या पाल्याला “Rat Race” मध्ये पळवतोय, पण त्याची बौद्धिक व शारीरिक ताकद याचा अंदाज घ्या व मगच त्याने किती गती ठेवावी हे प्रामाणिकपणे ठरवा. मग तो अभ्यास असो वा Extracurricular Activities असोत.
थोडा स्पीड वाढवायला काहीच हरकत नाही पण दमछाक होईपर्यंत नका पळवू पाल्याला. बिचारा अर्धाच पल्ला गाठून थकून जाईल !
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तहानलेल्या माणसाची कथा ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं,त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं, तर आपलं मरण निश्चित आहे, हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूरदूरपर्यंत जेवढी नजर जाईल, तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. ..हा भास तर नाही?
नाहीतर मृगजळ असेल.
पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल, असा विचार करत पाय ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता. झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला.
आणि समोरचं दृष्य पाहून तो थबकलाच.
माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं, जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलं नाही. नुसताच पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली .तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते, “हे पाणी पंपात ओता.पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवा.”
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं?
या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सूचनेप्रमाणे करावं?
To be or not to be?
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर? पंपाचा पाईप तुटला असेल तर? खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल. सगळा खेळ खल्लास!
पण सुचना बरोबर असेल तर?तर भरपूर पाणी.
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही, यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी आलं.त्याला काय करू नि काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला.स्वतः जवळच्या बाटल्या काठोकाठ भरल्या त्याने.
तो खूप खूश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष दुसऱ्या कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून लक्षात आलं की तो मानवी वस्तीपासून खूप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. “विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता.पाणी येतंच.”
आणि तो पुढे निघाला.
———-*——–
ही गोष्ट आहे देण्याचं महत्त्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं, हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते.
खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
“गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.
“विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल.” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.
मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही; पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “
सखी: “उदाहरण दे.”*
हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले,”भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”
मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.
भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही, म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.
जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो.
कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सदसद् विवेक बुद्धीवर आहे.ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.
गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.
आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.
कमळ म्हणजे बुद्धी,
भ्रमर म्हणजे मन,
पाकळ्या म्हणजे चक्षु,
रात्र म्हणजे अज्ञान,
सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच.
प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.
पण माणूस जी प्रतिक्रिया देतो, त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.
ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.
माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धरणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.
गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.
पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.
कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.
गीता भक्ती शिकवते.डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते.
गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.
गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.
सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.
“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
घरातील सर्व कामे तर करायचीच होती, वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.
जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले, “काय करतेयस?”
मुलगी म्हणाली,
“आज Teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे ‘Negative thanks giving’ आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा की ज्या आपल्याला सुरुवातीला आवडत नाहीत, पण नंतर आवडायला लागतात.”
आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली.
बघू या आपल्या मुलीने काय लिहीलंय.
मुलीने लिहीलं होतं –
“मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देते, कारण त्यानंतर उन्हाळी सुट्टी चालू होते.
मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते, कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.
मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते, कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .”
वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की –
“अरे, माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते.”
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या.
“Income Tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे.”
“घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे.”
” सणासुदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते, म्हणजेच मला भरपूर नातेवाईक आहेत, जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत.”
गोष्टीचे तात्पर्य –
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा….
चला, आपणही असाच Positive Attitude ठेवून आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता.त्याचे सहज लक्ष गेले.त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे,बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले,” यात काय आहे?” दुकानदार म्हणाला – “त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले- “यात काय आहे?” दुकानदार म्हणाला- “यात साखर आहे.” असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले-“आणि यात काय आहे?” दुकानदार म्हणाला, ” यात श्रीकृष्ण आहे.” संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “अरे, या नावाची कोणती वस्तू आहे?मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” दुकानदार संशयी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला,”महाराज तो रिकामा डबा आहे. पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.ते ईश्वराला म्हणाले “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस.ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस.परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे”. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.
जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह,मद,मत्सर, अहंकार,ईर्षा,द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख अशा लौकिक गोष्टींनी भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन,बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.
लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही, म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.
लेखक : श्री मनोहर कानिटकर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈