सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता.त्याचे सहज लक्ष गेले.त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे,बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले,” यात काय आहे?” दुकानदार म्हणाला – “त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले- “यात काय आहे?” दुकानदार म्हणाला- “यात साखर आहे.” असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले-“आणि यात काय आहे?” दुकानदार म्हणाला, ” यात श्रीकृष्ण आहे.”  संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “अरे, या नावाची कोणती वस्तू आहे?मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” दुकानदार संशयी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला,”महाराज तो रिकामा डबा आहे. पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”

बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.ते ईश्वराला म्हणाले “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस.ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस.परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे”. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह,मद,मत्सर, अहंकार,ईर्षा,द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख अशा लौकिक गोष्टींनी भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन,बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.

लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही, म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.

लेखक : श्री मनोहर कानिटकर 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments